श्री यती महाराज

याती महाराज
श्री यतीमहाराज

मूळ नाव: हरिभाऊ दत्तात्रय करमळकर
जन्म: वाई येथे १२-९-१९१५, गणेशचातुर्थी.
शिक्षण: आयुर्वेदाचार्य (१९४७ ला वैद्यकीय व्यवसाय बंद केला) 
गुरु: संन्यास दीक्षा १९६७ साली जनार्दन सरस्वती यांचेकडून   
विशेष प्रभाव: वासुदेवानंद सरस्वती. काहीकाळ सज्जनगडावर श्रीधर स्वामी बरोबर
कार्य:  गणेश दत्त उपासना व प्रसार
महानिर्वाण: वाराणसी येथे ११ एप्रिल १९९९

वाई येथे (आजोळी) गणेशचतुर्थी १२/९/१९१५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे लौकिक नाव हरिभाऊ दत्तात्रय करमळकर असे होते. शिक्षण सातारा येथे झाले. ‘आयुर्वेदाचार्य’ ही पदवी त्यांनी सन्मानपूर्वक संपादन केली होती. इचलकरंजी येथे काही काळ वैद्यकीय व्यवसायही केला होता. लहानपणापासून त्यांना गणेश उपासनेची आवड होती. उत्तम स्वधर्माचरण करून आपला देह ईशकार्यार्थ सार्थकी लावावा, हा ध्यास त्यांना लागलेला होता. त्यामुळे संसार प्रपंचाच्या फापट पसाऱ्यात अडकून न पडता कळत्या वयापासूनच जप, तप, ध्यान धारणा, अनुष्ठाने, उपासना यातच ते अधिक रंगून गेलेले होते. १९४७ साली वैद्यक व्यवसाय बंद करून, आप्तस्वकीयांचा त्यांनी निरोप घेतला. प. श्रीधर स्वामींच्या बरोबरही काही काळ त्यांचे सज्जनगडावर वास्तव्य होते. दोन वर्षे नर्मदा तटाकी त्यांनी तपाचरण केले. संपूर्ण भारताची दोनदा तीर्थयात्रा केली. त्यांनी पंडित लक्ष्मणशास्त्री मुरगूडकर, कल्याणपंत कुलकर्णी, पंडित धुंडिराजशास्त्री कवीश्वर, पं. जेरेशास्त्री यांच्याकडे संस्कृत अभ्यास, शास्त्राभ्यास केला होता. श्री. गुळवणी महाराज, दत्तमहाराज कवीश्वर यांचा व यतिमहाराजांचा भक्तिसुखसंबंध होता. काही काळ त्यांचे आळंदी येथेही वास्तव्य होते. दृढनिश्चयी, संयमी, व्रती साधक म्हणून त्यांना साधना काळात बहुतेक सर्व साधू संतांनी गौरविले होते.

१९६७ साली गरुडेश्वर येथे त्यांनी प. प. जनार्दन सरस्वती महाराजांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हा यती महाराजांच्यासमोर आदर्श होता. संन्यासाश्रमाचे शास्त्रशुद्ध आचरण त्यांनी श्रद्धापूर्वक केले. त्रिकाल स्नान, भजन, वाचन, चिंतन, स्वाध्याय, प्रबोधन यात ते रमून गेले होते. संन्यास घेतल्याक्षणापासून देहसमर्पण करीतोपर्यंत त्यांनी द्रव्याला स्पर्शही केला नाही. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर काही काळ भिक्षा घेतली. त्यानंतर अन्नत्याग करून फक्त गव्हाचे किंवा सातूचे पीठ (५-६ चमचे एवढेच) व नंतर त्याचाही त्याग करून, फलाहार, दूध यावर काही काळ ते राहिले.

आद्य शंकराचार्यांच्या ग्रंथांचा त्यांचा विशेष व्यासंग होता. १९८० मध्ये कांची कामकोटीपीठाचे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी यती महाराजांचा खास गौरव केला. धर्मप्रचाराथ चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांचेबरोबर यतिमहाराजांनी पदयात्रा केली. या शंकराचार्यांच्या परिवारात ते ‘उगार स्वामी’ म्हणून ओळखले जात. जयेंद्र सरस्वतीस्वामी यति महाराजांचेकडून प्रसंगी मार्गदर्शन घेत असत. अथवा कांचीकोटीचे थोरले स्वामी काही संन्याशाना यति महाराजांकडे शिक्षण, शंका निरसन यासाठी पाठवित असत. यावरून यतिमहाराजांचा अधिकार ध्यानी येईल. महाराजांच्या आग्रहामुळे कांच कामकोटी पीठाचे चंद्रशेखरेंद्र स्वामी महाराष्ट्रात आले होते. उगार येथे त्यांचे तीन महिने वास्तव्य झाले होते.

सुमारे तीन तपाहून अधिक काळ यति महाराजांनी, साधकांना मौलिक मार्गदर्शन केले. गणेश, दत्त उपासनेचा प्रसार केला. उपासनेवर त्यांचा विशेष भर असे. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता या ग्रंथाआधारे ते सर्वसामान्य जनांना मार्गदर्शन करीत. अभ्यासपूर्वक, सप्रमाण, तत्त्वचिंतन त्यांना प्रिय असे. सर्व लहान थोरांशी ते प्रेमाने वागत. उत्तर अभ्यास, कुशाग्र बुद्धीचा तत्त्वग्राही चिकित्सक, साधक आल्यास उपनिषदे, गीता भाष्य, विवेक चूडामणी, लघुवासुदेव मननसार यासारख्या ग्रंथातील एखादा सिद्धांत घेऊन ते आत्मीयतेने चर्चा करीत; तेव्हा त्यांचे ज्ञान-योगसमृद्ध, अंतर्याम संतोषाने ओसंडून वाहात असे. त्या प्रेमळ संवादात आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती यांची एकवाक्यता अनुभवावयास मिळे. सर्व द्वैताच्या पैलतीरी पोहोचलेला ज्ञानी महात्मा, भक्तिसुखालागी कसा वागतो, बोलतो हे पाहावयास मिळे. एरव्ही आत्मलाभाची पूर्ण स्थिती प्राप्त झालेली असल्याने "शीतोष्ण सुख दु:खेषु समसंगविवर्जित:" हे वर्तनच अधिक असे. त्यांच्या सांगण्या बोलण्यामागे तप:तेजाचे सामर्थ्य असे. त्यामुळे ऐकणाऱ्या व्यक्तींतील पतित, आपोआपच पावन होऊन जात. साधक, मुमुक्षु होत. प्रापंचिक, लोभ सोडून परमार्थ करू लागत. प्रांजळ, निर्मळ, निष्कलंक परमार्थ कसा करावा याची चर्चा ते तळमळीने करीत. यतिमहाराजांनी लिहिलेली उपासनात्मक पदे, भजन, वेदांत, चिंतनपर पदे, तत्त्वज्ञानपर व काही प्रश्नोत्तररूपी कूटकाव्ये समाविष्ट केली आहेत. ही सर्व काव्ये प्रासादिक, गेय, अर्थवाही आहेत.

"मंगलमूर्ते विघ्नहरा । दुरित नाशना कृपा करा ॥"

हा मंत्र त्यांनी सिद्ध केला होता. या मंत्रालाही कांची मठाधिपतींनी विशेष आशीर्वादमान्यता दिली होती. ‘मंगलमूर्ते करि करुणा’ ही त्यांनी लिहिलेली प्रार्थना त्यांच्या भक्त मंडळीत लोकप्रिय झाली आहे. तसेच गणेश भक्तांत आता ती सर्वत्र म्हटली जाते.

कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर, काशी, उगार, मोरगाव, इंदोर, महेश्वर, नृसिंहवाडी, धारवाड इ. ठिकाणी त्यांचे चातुर्मास साजरे झाले. त्यांचे जेथे जेथे वास्तव्य होईल, तेथे तेथे पारमार्थिक वृत्तीचे, ज्ञानी, अभ्यासू तपस्वी त्यांच्या सत्संगाचा लाभ करून घेत. चातुर्मास समाप्तीनंतर ते खरोखरी अज्ञातवासात एक महिना जात. भाषा, मुलुख, अपरिचित अशा भागात मंगलमूर्तींचे चिंतन स्मरण करीत. बहुधा एकटेच पायी प्रवास करीत असत. अयाचित, निस्पृह वृत्तीनेच सर्वत्र संचार असे । पूर्वाश्रमी उत्तम वैद्य म्हणून व्याधिपीडितांनी सेवा त्यांनी केली होती. त्यामुळे बहुतेक मुक्कामातही आत व्याधिपीडित जीवांना ते औषधोपचार सुचवित. रोगी व्याधीमुक्त होत. मग त्यांना ते गणेश उपासनेस जोडून देत. चतुर्थाश्रम स्वीकारल्यानंतर ते स्वत:साठी मात्र कधीही औषधे घेत नसत, हे उल्लेखनीय वैशिष्ट्य होते. अक्षरश: हजारो लोकांना औषधे देऊन त्यांनी बरे केले असेल. पण स्वत:साठी चिमूटभरही औषध कधी घेतले नसेल. प्रकृती उत्तम होतीच. पण सर्वार्थाने ते योगी व सिद्ध पुरूष होते !

महाराज अतिशय श्रेष्ठ दर्जाचे रसिकही होते. त्यांना संगीताची, कीर्तन, भजनाची, काव्याची आवड होती. त्या त्या क्षेत्रातील श्रेष्ठ कलावंतांचा त्यांचा चांगला परिचय होता. त्यांनी रचलेली अनेक भजने, पदे, उत्कृष्ट चाली लावून ते एकतारीवर उत्कट भावाने गात असत. सगुण मंगलमूर्ती, हनुमान, शंकर इ. देवांच्या पूजा अतिशय आकर्षक पद्धतीने ते करीत. मूर्तींना सुशोभितपणे नटवीत. सजवीत. महाराजांसमोर संत्री, मोसंबी लोक आणून ठेवीत. त्या फळांच्या साली अशा कौशल्याने ते सहज काढीत की, पूर्ण फळाची साल अखंड निघे व त्यातून एखादी कलाकृती ते तयार करून मांडीत. प्रसाद म्हणून ते सरबत तयार करून ते देत. त्याची रूची खरोखरी अमृतासमान असे. गुलकंदाप्रमाणे तुलसीकंदही त्यांनी एकदा तयार करून दिला होता. इतरांनी केलेली काव्ये ते मोठ्या आवडीने, आत्मीयतेने वाचत. त्यातील मार्मिक सुधारणा सुचवीत. प्रत्येक गोष्ट शिस्तीने, अधिकात अधिक उत्तम, आदर्श अशीच करावी. याकडे त्यांचा कटाक्ष असे !

प्रापंचिक असो वा पारमार्थिक असो, त्याने आचारशुद्ध, धर्मयुक्त जीवनच जगावे हा त्यांचा आग्रह असे. असे वर्तन करणारी माणसे सुखी समाधानी होतात. त्यांचा उत्कर्ष होतो असे ते सांगत. प्रत्येकाने आपली सद्बुद्धी जागृत ठेवावी. आळस, गर्व, मोह, अभिमान हे दुर्गुण वर्ज्य करावेत. विद्याविनयसंपन्न असावे. सत्कर्मेच करावीत. ऐश्वर्यसंपन्नही व्हावे, पण या सर्वांपेक्षा धर्मपरायण राहून जीवन जगावे. त्यातच सुख आहे, असे मार्गदर्शन ते प्रसंगोपात्य करीत. आत्मज्ञानप्राप्तीनेच माणसाला शांती-सुख-समाधान यांचा लाभ होतो. हा त्यांचा स्वानुभवच होता. गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध यांच्या चिंतन मननात ते सतत रमून गेलेले असत.

कांची कामकोटीच्या पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांनी चारही पीठाच्या शंकराचार्यांना एकदा एकत्र आणले होते. योगायोगाने त्यावेळी यतिमहाराजांचा मुक्काम महाराजांकडेच असल्याने त्यांनी चार पीठांच्या आचार्यांबरोबर मानाचे पाचवे आसन यतिमहाराजांचे घालावयास लावले होते. ‘यतिधर्माचे पालन कसे करावे याचा उत्कृष्ट आदर्श म्हणजे हे ‘उगार स्वामी’ आहेत, असा गौरवही त्यांनी केलेला होता. ही एकच घटना यतिमहाराजांचे श्रेष्ठपण सिद्ध करणारे आहे.

समर्थ रामदास वर्णन करतात.

तैसा साधू आत्मज्ञानी । बोधे पूर्ण समाधानी ।
विवेके आत्मनिवेदने । आत्मरूपी ॥

हे वर्णन सर्वार्थाने यतिमहाराजांना लागू पडते. त्याचा सत्संगलाभ आम्हांस घडला. आम्ही धन्य झालो.

यतिराज नारायणानंद सरस्वती यांनी दिनांक ११ एप्रिल १९९९ रोजी वाराणसी येथे महानिर्वाण झाले. निकटवर्ती भक्तांना आधी महासमाधीची तारीख, वेळ निर्धारपूर्वक सांगून, संकल्पपूर्वक आपला देह गंगार्पण केला. नृसिंहवाडीतून काशीस प्रयाण करताना, त्यांनी आपल्या भक्तगणांना "यानंतर पुन्हा वाडी, उगार इकडे परत येणे घडणार नाही, आता काशीतच मंगलमूर्तीच्या अनुज्ञेने या देहाचा शेवट होईल." असे सांगून प्रेमभराने सर्वांचा निरोप घेतला होता. श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत त्यांचे दोन वर्षे वास्तव्य होते. (माघ ९६ ते ज्येष्ठ ९८) त्यांचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीवर विशेष प्रेम होते. पूर्ण शुचिष्मंत, ज्ञान वैराग्यसंपन्न, चतुर्थाश्रमी महात्मा कसा राहतो, नित्य साधना, उपासना कशी करतो, आणि आपली जीवनयात्रा कशी संपवतो याचा एक आदर्शच यतिमहाराजांच्या रूपाने सर्वांना पाहावयास मिळाला.

त्यांच्या चरणी अनंत प्रणिपात!