स्थान: शिर्डी, तालुका रहाता. जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र
सत्पुरूष: श्रीसंत साईबाबा
विशेष: गुरुस्थान, श्रीसाईबाबा समाधी, बाबांची चावडी, मस्जिद, ई .
श्री क्षेत्र शिर्डी हे श्रीसाईबाबांच्या परमपावन पदकमलांच्या वास्तव्याने पूनीत झालेले शिर्डी नगरपंचायतीतील गाव. हे रहाता तालुक्यात असून जि.अहमदनगर आहे. हे नगरपासून ८३ कि. मी. असून कोपरगावपासून १५ कि. मी. अंतरावर आहे. श्रीसाईबाबांच्या वास्तव्यानेच हे शहर जगभरात ओळखले गेले व प्रसिध्दीस पावले. एका अभ्यासकानुसार शिरडी या नावाचा उगम तामीळ शब्द सीर + अडि (seer + adi) म्हणजे ‘समृध्दीची पदकमले’ हे काही असो ही साईंच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी.
शिर्डीत साईबाबांचे आगमन
श्रीसाईबाबा प्रथम शिर्डीस आले ते चांदभाईचे मेव्हण्याच्या विवाहप्रसंगी. तेव्हा त्यांनी मस्तकी पांढरे फडके गुंडाळलेले. त्यांची कांती अत्यंत तेज:पुंज होती. डोळे तेजस्वी होते. त्या फकिराला पाहून म्हाळसापतीने त्यांना नमस्कार केला, म्हणाले "आओ साईबाबा, आम्ही आपल्याच प्रतीक्षेत आहोत. आपल्या पदस्पर्शाने शिर्डी पावन झाली." त्यानंतर बाबांनी आपले वास्तव्य कायमचे शिर्डीतच ठेवले. ते परमेश्वराचे प्रेषित आणि जनकल्याणार्थच तेथे अवतरले.
त्यावेळी शिरडी अत्यंत लहान व खेतीवाडीचे गाव होते. साईबाबांचा मात्र सर्वत्र वावर होता. शिर्डीत आल्यानंतर लगेचच एकदा ते एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेले दिसले. लोकांनी विचारले तर त्यांनी येथे माझ्या गुरूंचे स्थान असल्याचे सांगितले. तेथे खणल्यानंतर तेथे गुरूस्थान आढळले. तेथे पणत्या तेवत असलेल्या लोकांना आढळल्या. आजही गुरूस्थान म्हणून ते प्रथम पुजले जाते. येथील कडुलिंब वृक्षाची पाने कडू लागत नाहीत. गुरूचा महिमा अन्य काय?
स्थान महात्म्य
चावडीत बाबा काही काळ रहात असत. भक्तांना भेटत. त्यांच्या दु:ख वेदना हलक्या करीत. आजही भक्त या पावन वास्तुत जाऊन बाबांची अर्चना करतात. व्दारकामाई श्रीसाईसमाधी मंदिराला लागूनच आहे. तेथील धुनीही वर्षोनवर्षे पेटतीच आहे. बुटींच्या पूर्वीच्या वाडयात बाबांची समाधी आहे. मंदीर परिसरातच मारूती व नवग्रह मंदीरे आहेत. साईबाबा हेच भक्तांचे भगवान आहेत. अनेक भक्त कामनीक सेवा करतात आणि साई त्यांच्या हाकेला ओ देतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. ‘श्रध्दा आणि सबुरी’, ‘अल्ला मालिक’ हे बाबांचे संदेश भक्त पाळतात. साईंनी आपल्या जीवनकाळात दिलेल्या आश्वासनानुसार समाधी भक्तांना पावते व भक्तांची संख्या वाढतच आहे. संस्थानमार्फत अनेक सोई सुविधा पुरवल्या जातात.
पहाटे ४ वाजता मंदीर उघडते. भुपाळी काकडआरती होते. ५ वाजता समाधीस स्नान व आरती होते व दर्शनास प्रारम्भ होतो. ११.३० वाजता व्दारकामाईत धुनीपूजा होते. १२ ते १२.३० आरती होते. दुपारी ग्रंथवाचन, सूर्यास्तास धुपारती होते. संध्याकाळी भजन अर्चन होते. ९.३० वाजता व्दारकामाईस बाबांना जलार्पण करतात व ९.४५ वाजता व्दारकामाई बंद होते. १०.३० वाजता समाधी मठात शेजारती होते व ११.०० वाजता मंदीर बंद होते.
आजही साधारणत: रोज २५ हजारावर भक्त बाबांचे दर्शनास शिर्डीत येतात. उत्सवप्रसंगी ही संख्या कित्येक लाखात असते. येथे दर्शनबारी, भोजनालय, भक्तनिवास यांची उत्तम सोय आहे. देशातील अत्यंत श्रीमंत संस्थानात शिर्डी संस्थानची गणना होते. या संस्थानमार्फत अनेक समाजोपयोगी कामे केली जातात.
रामनवमी, गुरूपोर्णिमा, दत्तजयंती व बाबांची पुण्यतिथी येथे मोठया प्रमाणात साजरी होते.
श्री क्षेत्र शिर्डी येथील श्रीसाईमुर्तीची कथा!
शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीला ऑक्टोबर २०१७ मध्ये ६३ वर्षे पुर्ण होतील. शिर्डी संस्थानच्या ईतिहासात या दिवसाला खुपच महत्व आहे. बाबांच्या महासमाधीनंतर ३५ वर्षांनी साईबाबांची हि मुर्ती मंदिरात प्रस्थापीत केली गेली. त्याचि विलक्षण कथा खालीलप्रमाणे;
१९५२ मधे पांढरा शूभ्र ईटालीयन मार्बलचा एक मोठा तुकडा ईटालीहुन मूंबई डाॅकयार्ड मधे आला. कोणी पाठवला? कोणी मागवला? कोणालाच माहीती नव्हती. ताबा घेणारा कोणी नाही म्हणुन डाॅकयार्ड अधीकार्यांनी त्याचा लिलाव काढला. ज्याने हा लिलाव घेतला त्याने हा तुकडा शिर्डी संस्धानला दिला. अतीशय मौल्यवान असा तो संगमरवर पाहुन शिर्डी संस्थानने त्याची मुर्ती बनवायची ठरवले. हे काम त्यांनी मूंबईचे प्रसीद्ध शिल्पकार श्री बाळाजी वसंतराव तालीम यांना दिले. आपल्या कामात निष्णात असलेल्या तालीम यांनी या मुर्तीसाठी लागणारी हत्यारे, त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे लोहार व सुतार यांच्याकडून बनवुन घेतली.
सुरुवातीला त्यांनी बाबांचि मातीची माॅडेल मुर्ती बनवली व कामाला सुरुवात केली. बाबांच्या चेहेरे पट्टीशी जुळणारी हुबेहुब मूर्ती त्यांना बनवता येत नव्हती कारण त्यांच्याकडे बाबांच्या चेहऱ्याचे पुर्ण तपशील नव्हते जे काहि होते ते एक जुना ब्लॅक व्हाईट फोटो होता, त्यावरुनच त्यांना हे काम करायचे होते. शेवटी त्यांनी कळकळीने बाबांची प्रार्थना केली व म्हणाले "बाबा, तुम्ही मला दर्शन दिलेत तरच मला ही मुर्ती घडवता येईल, आणी अस झाल तरच हि मुर्ती भक्तांना आनंद देउल व त्यांची भक्ती वाढवील! आणी काय सांगावं! एके दिवशी सकाळी सात वाजता तालीम आपल्या स्टुडीओत गेले असताना त्यांनी एक दिव्य प्रकाश पाहीला व त्या प्रकाशात बाबा प्रकट झाले! बाबांनी तालीमांच्या सर्व शंका दुर केल्या व आपल्या चेहेर्यााचे विविध कोनातुन दर्शन घडवले. तालीमांनी ते सर्व लक्षात ठेवल व सर्व तपशील स्मरणात ठेवले!
ईकडे शिर्डी संस्थानने मातीच्या माॅडेल मुर्तीला मान्यता दिली व त्याच्या अनुषंगाने मुर्ति घडवण्यास सांगीतले! १९५४ साली मुर्तीचे काम अंतीम टप्य्यात असताना, त्या मुर्तीत हवेची एक मोठी पोकळी आढळून आली, कमकुवत असा तो भाग काढणे आवश्यक होते, हा भाग बाबांच्या डाव्या (दुमडलेल्या) पायाच्या गुडघ्याखालचा होता, पण अस केल असता तर कदाचीत मुर्तीच्या आवश्यक भागातला काही भाग पण नीघाला असता तर ती मुर्ती भग्न झाल्यामूळे पुजनीय राहीली नसती. काम थांबले! बाळाजी तो अनावश्यक भाग काढुन टाकायला तयार होईनात. परत त्यांनी बाबांना प्रार्थना केली, "बाबा, मुर्ती तयार आहे, माझ्यावर कृपा करा!" तेवढ्यात त्यांच्या अंतर्मनातुन आवाज आला "कामासुरु ठेव". बाळाजींनी कारागीरना तो भाग काढण्यास सांगीतले. पण ते तयार होईनात. त्यांना भीती वाटत होती की तो गुडघ्याखालचा भाग ढासळेल. शेवटी स्वतः तालीमांनी छीन्नी हातोडा हातात घेतला व तो भाग काढायला सुरुवात केली. त्यांच्या आश्चर्याने तो भाग सहजच बाहेर आला व मुर्तीहि शाबुत राहीली. बाळाजी नाचायलाच लागले, त्यांनी लगेच मिठाई आणून वाटली. अत्यंत सजीव वाटणार्यात त्या मुर्तीची गावातुन समारंभपुर्वक मिरवणुक काढली.
लक्ष्मीबाई शिंदे व स्वामी शरणानंद जे बाबांचे जवळचे भक्त होतेत्यांनी मुर्तीच्या हुबेहुबपणाबद्दल समाधान व्यक्त केले व जणु "बाबाच परत आपल्यात आले हे उद्गार काढले". हि मुर्ती घडवण्याचे काम चालु असता एकदाबाबांनी बाळाजींना दर्शन दीले व या मुर्तीनंतर तु अन्य कुठलीही मुर्ती बनवणार नाहिस असे सांगीतले. बाळाजींची ही मुर्ती अखेरची ठरली, शेवटि वयाच्या ८२ व्या वर्षी वीस डीसेंबरला तालीमांनी अखेरचा श्वास घेतला.
श्री साईबाबा व श्री क्षेत्र शिर्डी
श्रीसाईबाबांचा जन्म केव्हा, कुठे झाला हे अजूनही अज्ञात आहे. त्यांचे गुरु, आई, वडिल, त्यांची परंपरा याबद्दल काहीही माहीती उपलब्ध नाही. जेव्हापासून ते प्रकट झाले तेव्हापासून ६०-६५ वर्षे ते शिर्डीलाच होते. त्यांनी स्वतःबद्दल कोणाला काही सांगितले नाही. आणि काही लिहूनही ठेवले नाही.
श्रीसाईबाबांचे चरीत्र म्हणजे एकमेव "श्री साईसच्चरित" ही पोथी होय. या पोथीचे लेखक हेमाडपंत म्हणजेच श्री गो. द. दाभोळकर हे आहेत. ही पोथी सर्व साई भक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. श्रीसाईबाबा हे संत-परंपरेतील एक अवतारी सत्पुरुष आणि अवलिया विभूती होते. काही भक्त बाबांना रामाचा अवतार मानतात तर काहीजण कृष्णाचा अवतार मानतात. "जया मनी जैसा भाव! तया तैसा अनुभव" या वचना प्रमाणे साईबाबांनी आपल्या भक्तांना दत्त, राम, कृष्ण, विठ्ठल अशा विविध देवतांच्या रुपात दर्शन दिले आहे. ते स्वतःला मात्र "अल्लाचा बंदा" आहे असे म्हणवून घेत.
श्रीसाईबाबा हे भक्तांना सहज संवादातून बोध करीत. बरेच वेळा त्यांचे बोलणे गूढ व अतर्क्य वाटे. इंग्रजी राजवटीच्या काळात अंधश्रध्दा फार होत्या त्याच वेळी भारतीय वेदविद्यांचाही प्रसार होत होता. खुद्द लोकमान्य टिळकांनीही श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले होते. आधूनिक संतकवी दासगणू महाराज हे त्यांचे शिष्य होते.
त्याच्या असंख्य लीला पोथीत वर्णन केल्या आहे. कोणाची निंदा करु नये, सत्याने वागावे, भुकेलेल्याला अन्न व तहानलेल्याला पाणी द्यावे, कोणाचा द्वेष, मत्सर हेवादावा करु नये. अहंकार असू नये, अडलेल्याला परोपकारी वृत्तीने मदत करावी, ईश्वरी सत्ता श्रेष्ठ मानून नेहमी ईश्वराचे स्मरण करावे, असा उपदेश त्यांच्या लीलांमधून स्पष्ट होतो. जा-धर्म, पंथ-सांप्रदाय उपासना पध्दती असे कोणतेही भेद त्यांना मान्य नव्हते. "सबका मालिक एक" हा त्यांचा संदेश प्रसिध्दच आहे. त्यामुळे शिख, हिंदू, मुसलमान, पारशी अशा सर्व समाजातीललोक त्यांचे भक्त आहेत.
श्रीसाईबाबा आपल्या भक्तांना उपदेश करतांना सांगत, "साधे सरळ, प्रामाणिक पणे कष्ट करुन रहावे, नीतीने धन कमवावे, गरजूंना मदत करावी, वादात व्यर्थ तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा अंतःकरणात परमेश्वराचे स्मरण करुन ओठातून त्याचे नाम घ्यावे. श्रध्देने आपल्या धर्मग्रंथांचे वाचन करावे, सतत आपल्या दैवताचे नामस्मरण करावे आणि माणुसकीने वागावे, किडा, मुंगी, प्राणी या सर्वामध्ये परमात्मा लपलेला आहे. मनातील, हृदयातील ईश्वरावर नामाची धार अखंड ठिबकू द्या" जगाला मानवतेची, विश्वबंधुत्वाची शिकवण देण्याचे महान कार्य बाबांनी केले.
१८५० च्या सुमारास गोदावरी तटी, शिरडीमध्ये श्री साईबाबांचे वास्तव्य होते. सतत ते परमेश्वराचे नामस्मरण करीत, "अल्ला मालिक! हरी हरी". रोगग्रस्तांना ते वनऔषधी देत. नंतर ते म्हणतात, "हरी, हरी म्हणता तो परमेश्वर माझे सद्गुरु प्रसन्न झाले, माझ्या हातून साधा अंगारा दिला तरी तो अमृत होई, ती परमेश्वराची लीला." श्री साईबाबांना ज्या व्यक्ती अनन्यभावे शरण गेल्या त्यांचे ऐहिक जीवन सुखकर झाले, मनःशांती लाभली, त्यांचेमरण सुध्दा सूर्यास्तासारखे सहज विनासायास लाभले.
श्रीसाई म्हणजे साक्षात ईश्वर होय, पूर्वी, आज आणि उद्या ही त्यांच्या कृपेची प्रचिती! लाखो अनुभव, कोट्यावधी लीला!
श्रीसाईबाबा फकिरी वृत्तीचे अवलिया होते. मानवाच्या सुखाचे सार त्यागात, प्रेमात, आपलेपणात, परमेश्वराच्या नामस्मरणात आहे असा त्यांचा उपदेश आहे. श्रीसाईबाबा इ. स. १९१८ मध्ये देहरुपाने अनंतात विलीन झाले पण त्यांचे अस्तित्व आजही जाणवते. असे हे दिव्य क्षेत्र शिर्डी! एकदा दर्शन घ्याल तर वारंवार आपले पाय शिर्डीकडे वळल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.
कथा श्री क्षेत्र शिर्डीतील रामनवमीची
शिर्डीत तीन उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होतात. विजयादशमी, गुरुपौर्णिमा आणि रामनवमी. रामनवमीचा उत्सव तर तीन दिवस साजरा होतो. रामनवमीच्या दिवशी संपूर्ण रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले असते. शिर्डीत रामनवमीचा उत्सव कसा सुरु झाला, त्याची ही कहाणी !
ते साल होते १८९७. गोपाळराव गुंड नावाचा श्री साईबाबांचा एक भक्त होता. बरीच वर्षे त्याला मूलबाळ नव्हते. शेवटी एकदाचा त्याच्या घरी पाळणा हलला. बाबांच्या आशीर्वादानेच पुत्ररत्नाचा लाभ झाला, अशी त्याची धारणा. या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी शिर्डीत बाबांचा उरुस भरवावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. तात्या कोते आणि दादा कोते यांना त्याने मनातील इच्छा बोलून दाखवली. सर्वांनाच ही कल्पना आवडली. पण त्यात एक अडसर होता तो म्हणजे उरुस वा यात्रा भरवण्यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी लागणार होती.
शिर्डी गावात एक कुळकर्णी नावाचा विघ्नसंतोषी इसम होता. त्याने जिल्हाधिका-यांचे कान भरले. उरुस भरवायला जिल्हाधिका-यांनी आधी नकार दिला. लोकांचा हिरमोड झाला. पण त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. सरकारदरबारी पिच्छा पुरवला. तेव्हा गावक-यांची विनंती जिल्हाधिका-यांनी मान्य केली. उरुस भरवायचे नक्की झाले.
भक्तांनी साईबाबांना ही आनंदाची बातमी सांगितली. बाबांनी भक्तांची इच्छा शिरसावंद्य मानली. उरुसाचा दिवस ठरला तो श्री रामनवमीचा. खरेतर उरुस हा मुस्लिम बांधवांचा सण. मुस्लिम संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जाणारा. साईबाबांनी नेमका हिंदूंच्या सणाच्या दिवशीउरुस साजरा करण्याचे ठरवले. दोन्ही समाजाला एकत्र आणण्याचा उद्देश बहुधा त्यामागे असावा. शिर्डीत रामनवमीच्या दिवशी बाबांचा उरुस भरला. सनई-चौघडे-भजनांचा नाद घुमला. गावातून बाबांची पालखी निघाली. अशी पंधरा वर्षे रामनवमीच्या दिवशी शिर्डीत बाबांचा उरुस भरला.
१९१२ सालापर्यंत ही प्रथा याच पद्धतीने सुरु होती. परंतु साईबाबांचे आणखी एक भक्त कृष्णराव जोगेश्वर भीष्म यांना एक नवी कल्पना सुचली. ते दीक्षितवाड्यात रहात. रामनवमीचा उत्सव हिंदूंचा आवडता सण. भगवान श्रीरामाच्या जन्माचा दिवस. मग यादिवशी शिर्डीत रामजन्माचा उत्सवच साजरा का करु नये, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी काका महाजनी यांना ही कल्पना सुचवली. त्यांनाही ती आवडली. रामजन्माचे कीर्तन कोण करणार, अशी अडचण पुढे आली. पण कृष्णराव भीष्म यांनी स्वतःच रामआख्यान म्हणण्याची जबाबदारी घेतली. काका महाजनींना त्यांनी पेटीवर साथ द्यायला सांगितले. राधाकृष्णामाईने रामजन्मासाठी खास प्रसादही तयार केला. सुंठवड्याचा, सुंठामध्ये साखर घालून. एवढी सगळी तयारी तर झाली. परंतु बाबांची परवानगी अजून मिळालेली नव्हती.
साईबाबा परवानगी देतील का, अशी धाकधूक तिघांनाही होती. तसेच घाबरत घाबरत ते तिघे मशिदीत आले. कशीबशी त्यांनी मनातील कल्पना बोलून दाखवली. साईबाबांनी मोठ्या मनाने त्यांना रामजन्माचा सोहळा साजरा करण्याची अनुमती दिली. सर्वांना अत्यानंद झाला. मशीद पानाफुलांनी सजवण्यात आली. मधोमध एक पाळणा बांधण्यात आला. राधाकृष्णाईनेच पाळणा बनवला होता. बाबांच्या समोरच भीष्मांनी कीर्तन केले. बाबांना त्यांचे कीर्तन एवढे आवडले की , त्यांनी मोठ्या आनंदाने त्यांच्या गळ्यात निंबाच्या पानांचा हार घातला. यथासांग आरती आणि महापूजा झाली. महाजनी काका रामाचा पाळणा काढायला गेले. पण बाबा म्हणाले, अजून उत्सव संपलाय कुठे? दुस-या दिवशी पुन्हा एकदा कीर्तन आणि गोपाळकाला झाला. पूजा झाली आणि रामनवमी सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर पाळणा काढण्यात आला. तेव्हापासून बाबांच्या उरुसाला रामनवमी सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले.
आजतागायत शिर्डीत रामनवमीचा सोहळा दोन दिवस साजरा केला जातोय. हिंदू तसेच मुस्लिम बांधवही या उत्सवात मोठ्या संख्येने सामील होतात. खांद्याला खांदा लावून दोन्ही समाजाचे लोक उत्सवात सहभागी होतात. त्यावरुन कधीही तंटा-बखेडा झालेला नाही.
शिर्डीतील रामनवमीला याशिवाय आणखी ऐतिहासिक महत्व आहे. याचदिवशी द्वारकामाईत ठेवलेले धान्याचे पोते बदलले जाते. जुने पोतेप्रसादालयात नेले जाते आणि त्याजागी नवे पोते ठेवले जाते. द्वारकामाईवर लावलेली निशाणेही याचदिवशी बदलली जातात. जेव्हा पहिल्यांदा उरुस सुरु झाला, तेव्हा गोपाळराव गुंड यांनी अहमदनगर येथील दामूअण्णा रसने यांच्याकडून निशाण मागवले होते. तर नानासाहेब निमोणकर यांच्याकडून खास जरीकाम केलेले नक्षीदार निशाणही मागवण्यात आले. या निशाणांची भव्य मिरवणूक काढून नंतर ती द्वारकामाईवर बांधली जातात.
श्रीसाईबाबा संस्थान टस्ट्र (शिर्डी)
RO शिर्डी ता. रहाता, जि. पुणे, महाराष्ट्र.
टेलिफोन: (०२४२३) २५८५००
Email: saibaba@sai.org.in