श्री स्वामी समर्थ मठ मंडई पुणे

श्री स्वामी समर्थ मठ मंडई पुणे
श्री स्वामी समर्थ मठ मंडई पुणे

पुण्यातिल श्री स्वामी मंदिर येथे स्वामींनी प्रत्यक्ष वास्तव्य केले

स्वामीभक्त श्री हरिअण्णाजी शेटे व त्यांचे कुटुंबीय दरमहा अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनासाठी जात असत. एकदा असे झाले हरीअण्णाजी स्वामींच्या दर्शनाला गेले असता स्वामी महाराज वटवृक्षाखाली बैसले होते हरि अण्णा आले हे पाहून स्वामींनी आपल्या पादुका अण्णाच्या दिशेने भिरकावल्या आणि म्हणाले आता पुनः इथे येत नको जाऊस. अण्णा स्तब्ध होऊन स्वामींना म्हणाले, "का स्वामी?" यावर स्वामी म्हणाले "अरे त्या म्हातारीला ह्या वयामध्ये इतका प्रवास करवतोस ?" (अण्णांची आई) यावर अण्णा स्वामींना म्हणाले "अहो स्वामी आम्ही अक्कलकोटला निघणार हया गोष्टीची भनक लागताच ती बैल गाडीमध्ये जाऊन बसते." यावर स्वामी म्हणाले "त्याची आता गरज नाही आम्हीच तिकडे येणार आहोत" (पुण्याकडे). तेव्हा अण्णा आनंदित होऊन म्हणाले "केव्हा येणार स्वामी ?" स्वामी म्हणाले "हा ! हे निश्चित नाही".

अण्णा पुण्याकडे निघाले त्याकाळी ४-५ दिवस लागत असावेत बैलगाडीने प्रवासाला. इकडे अण्णा पुण्याला पोहोचले. पाहतात तर स्वामींची स्वारी त्यांच्या अगोदरच त्यांच्या वास्तूमध्ये येऊन तेथे असलेल्या औदुंबर वृक्षाखाली गोट्या खेळत बसलेली त्याकाळी स्वामी तिथे ३ दिवस ३ रात्री वास्तव्यास होते. ती वास्तू परम पवन ऊर्जावान झाली. स्वामींनी दिलेल्या चर्म पादुकांची अण्णाजींनी मनोभावे सेवा केली आणि शके १८०१ श्री स्वामी मंदिर (सध्याचा मठ) स्थापन झाला. मठाला ११० वर्षे होऊन गेली आहेत श्री शंकर महाराजही ह्याच मठामध्ये सेवेस रहायला येऊन पूर्णपणे रोगमुक्त झाले.

॥श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ॥

श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, ११०४ बुधवार पेठ, पुणे ४११००२ येथील मठाचा संकलित केलेला वृत्तान्त 

श्री स्वामीभक्त कै. हरी अण्णा शेटे आणि त्यांचे कुटुंब दरमहा अक्कलकोटची वारी करीत असत. दोघेही वृद्ध झाले होते. शके १७८५ मध्ये अण्णा शेटे यांस त्यांच्या राहत्या घरी (सध्याचे मठात) श्रीस्वामी समर्थांनी दर्शन दिल्यानंतर ते मठात औदुंबर वृक्षाखाली बसले. येथेच श्रीस्वामी समर्थांनी आपल्या पायातील चर्मपादुका अण्णा शेटे यांना दिल्या आणि आता आपण येथेच सेवा करावी अशी आज्ञा केली. ती आज्ञा प्रमाण मानून शेटे यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत मनोभावे श्रीस्वामी पादुकांची सेवा केली आणि या मठाची स्थापना केली. अण्णा शेटे यांच्या पश्चात त्यांचे पुत्र महादेव व त्यांची पत्नी बकुळाबाई हे दोघे श्रीस्वामींचे पादुकांची सेवा करू लागले. महादेव शेटे यांस दोन पुत्र होते. एक मनोहर दुसरा अनंत. पैकी मनोहर याचे अकाली निधन झाले. अनंताचे पुढे लग्न बार्शी येथील कै. नाना मणगिरे यांची सुकन्या त्रिवेणीबाई यांचेबरोबर झाले. परंतु लग्न झाल्यानंतर १६ दिवसांनी अनंताचे निधन झाले. तेव्हापासून त्रवेणीबाई आपल्या वडिलांकडे बार्शी येथे व्रतस्थपणे राहू लागल्या.

महादेव आणि त्याची पत्नी बकुळाबाई यांची श्रीस्वामी सेवा चालू असताना त्याकाळात श्रीशंकरस्वामी महारोगाने त्रस्त होऊन श्रीस्वामींच्या दृष्टान्ताप्रमाणे मठात सेवेकरता आले. पण त्यांना महादेव यांनी मठातून घालवून दिले.

तेव्हा श्रीशंकरस्वामी मठाच्या बाहेर रस्त्यावर तीन दिवस पडून होते. तिसरे दिवशी महादेव यांना श्रीस्वामींनी दृष्टान्त देऊन सांगितले की, तो माझी सेवा करण्यासाठी आला आहे, त्यास मठात घेऊन माझी सेवा करू द्यावी. त्याप्रमाणे श्रीशंकरस्वामींना श्री. महादेव यांनी मठात सेवेसाठी घेतले. ज्या ठिकाणी ‘‘श्रीस्वामी मंदिर’’ आहे त्या ठिकाणी श्रीशंकरस्वामींनी श्रीस्वामीसमर्थांची सेवा केली. मठात असलेल्या विहिरीस कुशावर्त तीर्थ म्हणतात. ह्या कुशावर्तात स्नान करून श्रीस्वामी सेवा केली. त्यायोगे श्रीशंकरस्वामी पूर्णपणे रोगमुक्त झाले. त्यांनी तेथून जाताना ज्या ठिकाणी राहून त्यांनी श्रीस्वामी सेवा केली त्या ठिकाणी श्रीस्वामी समर्थ मंदिर (मठ) बांधावे व त्यासमोर श्रीस्वामीसुत व श्रीअवधूत महाराज यांची स्थापना करावी, अशी महादेव व बकुळाबाई यांना आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या ठिकाणी शके १८०१ श्रीस्वामी मंदिर (सध्याचा मठ) स्थापन झाला. मंदिरात स्थापन केलेली श्रीस्वामी समर्थांची संगमरवरी सुबक मूर्ती जयपूर येथील मूर्तिकाराकडून करवून घेतली. कै. मनोहर शेटे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी बकुळाबाई यांनी श्रीस्वामी सेवा चालू ठेवली. त्यांचेबरोबरच श्रीमती पार्वतीबाई दाते यांना अकाली वैधव्य आल्यामुळे (त्यांचे माहेरचे नाव आपटे व त्या सांगलीच्या) त्यांची वृत्ती विरागी बनली व त्या बकुळाबाईबरोबर श्रीस्वामी सेवा करू लागल्या. त्यांचे १९४८ साली निधन झाले. बकुळाबाईंचे नंतर मठाची व्यवस्था स्नुषा श्रीमती त्रिवेणीबाई या पाहू लागल्या व त्यांचे वडीलही मठाची व्यवस्था पाहू लागले.

श्रीस्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या दिवसेंदवस वाढत होती, मठाच्या व्यवस्थेकरता त्यांनी नोकरवर्ग नेमला. नोकरांचे भरवशावर राहून मठाची व्यवस्था नीट होईना. भक्त देणग्या वगैरे देत पण त्याचा विनियोग नीट होईना.

श्री स्वामी समर्थ मठ मंडई पुणे
श्री स्वामी समर्थ मठ मंडई पुणे

विश्वस्त मंडळाची स्थापना

मठाची स्थापना योग्य रितीने व्हावी या हेतूने डॉ. ज. धों. वाडदेकर यांच्या पुढाकाराने स्वामीभक्तांतर्फे मा. चॅरिटी कमिशनर यांचेकडे अर्ज केला. त्या अर्जाचा निकाल डॉ. वाडदेकर यांच्या बाजूने लागून इ.स.१९५८ साली श्रीस्वामी मठाचा पब्लिक ट्रस्ट जाहीर झाला. आतील परिसर व श्रीस्वामी मठ एवढीच ट्रस्टची जागा होती. पहिली ४ वर्षे श्रीमती त्रिवेणीबाई शेटे यांची मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नेमणूक झाली. इ.स. १९६२ ते १९६४ पर्यंत रिसीव्हर नेमण्यात आले. त्यानंतर भक्तमंडळींनी डि. कोर्टात सदर मठासाठी ट्रस्टी नेमावेत असा अर्ज केला. त्याप्रमाणे १९६४ साली नागपंचमीस विश्वस्त मंडळ नेमले. तेव्हापासून आजतागायत ट्रस्टतर्फे श्रीस्वामी मठाची व्यवस्था पाहिली जात आहे. मठाचे नैमत्तिक उत्सव आणि दैनंदिन कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत.

इ.स.१९६६ साली ट्रस्ट मंडळाने श्रीमती त्रिवेणीबाई शेटे यांच्याकडून मठापुढील रस्त्यालागत असलेली इमारत रूपये पस्तीस हजारांस खरेदी केली व मठाला जोडून घेतली. सदर मठ हा संपूर्ण लोकाश्रयावर अवलंबून आहे. मठाला कोणतेही स्थावर जंगम, शेतजमीन वगैरे उत्पन्न नाही. मठातील वार्षिक उत्सव भक्तांच्या देणग्यांवरच सुरू आहेत. मठात येणा-या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भक्तांना मठात काही चांगले अनुभव आल्यामुळे ते मठाकडे धाव घेतात व नाना रूपांनी श्रीस्वामींपुढे देणग्या देतात.

ट्रस्टची संकल्पित योजना

मठाच्या स्थापनेला आज जवळ जवळ ११० वर्षे झाली. इमारत फारच जुनी झाली आहे. तेव्हा मठाचा जीर्णोद्धार करणे आवश्यक झाले आहे. सध्या नव्या बांधकामापैकी श्रीस्वामी मंदिर हे बांधून पूर्ण झाले आहे. त्याचे काम सुबक करण्यात आले आहे. त्याला शोभेल असाच देवापुढील सभामंडप बांधण्यात येणार आहे. त्यात तीन-चारशे लोक बसू शकतील व रस्त्यावरील तीन मजली इमारतपण आकर्षक होईल. एकूण मठाची सर्व इमारत पुण्यात एक आकर्षण ठरेल अशी होईल.
    
श्रीस्वामी मठाकरता विश्वस्त मंडळी निष्काम सेवा करीत आहेत. त्याबद्दल ते धन्यवादास प्राप्त आहेत. श्रीस्वामी भक्तांच्या माहितीसाठी, श्रीस्वामी प्रेरणेने ही माहिती देत आहे.