श्री शांतानंद स्वामी महाराज

जन्म: ओरोस येथे, कश्यप गोत्र
वेष: संन्यासी 
शिष्य: श्री आत्मारामशास्त्री जेरे  

शांतानंद स्वामी महाराज
श्री शांतानंद स्वामी महाराज

नावाप्रमाणे शांततेचे व आनंदाचे प्रतिक म्हणून श्रीमद् प. प. शांतानंद स्वामी महाराज चिरपरिचित आहेत. शांतानंद स्वामींचा जन्म काश्यप गोत्रात ‘ओरोस’ या ठिकाणी झाला. शास्त्रोक्त उपनयन झाल्यानंतर शास्त्र व वेदांचे अध्ययन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यशाशास्त्र गृहस्थाश्रमाचा स्विकार केला. गृहस्थधर्माचे पालन केल्यानंतर श्री शांतानंदानी विधियुक्त ‘चतुर्थाश्रम’ स्वीकारला. त्यानंतर भरतखंडातील तीर्थ क्षेत्रांच्या यात्रा पूर्ण केल्यानंतर ‘परिव्राजक’ ही संज्ञा सार्थ केली. त्यानंतर दत्तात्रेयांची राजधानी म्हणून पावन असलेल्या आपल्या प्राणप्रिय श्रीक्षेत्र नरसोबावाडीत वास्तव्य करून समाधीकालापर्यंत आपले जीवन यथार्थ केले.

उच्चकोटीचे विभूती असणारे श्रीमद् शांतानंद स्वामी सेवावृत्ती धारण करून ज्ञानोत्तर भक्ती करीत शरण आलेल्या भक्तांचा उद्धार करीत असत. स्वत: ब्रह्मानंदी निमग्न होऊन रहात असत. जीवनमुक्त असूनसुद्धा सदैव गुरुभक्ती, गुरुपूजा, गुरुभजन, गुरुस्मरण, गुरुग्रंथ इ. साधनाने गुरुसेवा करणारे स्वामी हे आदर्श महापुरूष होते.

श्रीमद् शांतानंद स्वामींचा रोजचा दिवस प्रात:काळी श्रीदत्ताची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांचे मुख पाहिल्याने सुरू होई. प्रात:काळाचा पुजारी सनकादिकांच्या पूजा करण्यास वरती आल्यानंतर स्वामी निद्रासमाधीतून उठून प्रात: स्मरणाने नित्यकर्म सुरू करीत आपल्या उपास्य दैवत असणाऱ्या दत्तगुरूंची पूजा करणारा पुजारीसुद्धा त्यांना दत्तगुरूच वाटे. सर्वांठायी दत्तगुरू अशी ठाम मनोभूमिका असणारे स्वामी रस्त्याने चालत असताना अनेकदा मस्तक टेकवीत चालत असत. नित्यक्रमामध्ये महापूजेच्या वेळी पादुकांना पाणी घालायला जात असत.

संन्यासाप्रमाणे काटेकोर पालन करणारे श्रीमद् शांतानंद स्वामी सर्वत्र निर्धूम म्हणजे चूली शांत झाल्यानंतर भिक्षेला जात असत. तत्पूर्वी जेवावयास उशीर होणार म्हणून प्रत्येक सनकादिकांना अल्पोपहार म्हणून नैवेद्य देत असत. आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या त्या विदेही पुरुषाचा अल्पोपहार भुकेले ‘श्रीदत्तात्रेयादि देव’ आवडीने भक्षण करीत असत.

केवळ क्षुधारूप व्याधीचे निवारण करण्याकरिता भिक्षारूप औषध घेण्याकरिताच श्रीमद् शांतानंद स्वामी ४च्या पुढे भिक्षेला जात असत. पुजारी मंडळींना त्यांचा हा नियम माहीत असल्याने त्यांनी दुपारी झोळ्यातील अन्न झाकून ठेवलेले असे. दत्तात्रेय सर्वत्र आहेत. हे अंगी बाणलेल्या श्रीमद् शांतानंद स्वामींना भिक्षा घेऊन येण्यास उशीर होत असे. ती भिक्षा आणल्यानंतर श्री दत्तात्रेयांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भिक्षेची झोळी कृष्णानदीत बुडवीत असत. भिक्षेतील सर्व अन्न बाळगोपाळ, गोग्रास, मासे म्हणजेच सर्व प्राणीमात्रांना तृप्त केल्यानंतर ते अन्न भक्षण करीत. श्री दत्त व कृष्ण हा त्यांची उपास्य दैवते होती. नित्यनियमाने श्री गुरुचरित्र व श्रीमद् भागवताचा एक अध्याय वाचल्याखेरीज ते अन्नग्रहण करीत नसत. सदैव त्यांच्या छाटीत श्री कृष्णाची एक रंगीत तसबीर गुंडाळलेली असे. स्वामी श्रीकृष्ण जन्मोत्सव हा उत्सव पुजारी मंडळींच्याकडून थाटामाटात करवून घेत असत. त्यादिवशी पवमान अभिषेक, पुराण, कीर्तन रात्रौ १२ वाजता जन्मकाळ, सुंठवडा इ. कार्यक्रम असत. दुसरे दिवशी पुजारी मंडळी त्याचे पारणे बाळगोपाळांच्या सहित भोजन करून आनंदाने करीत. स्वत: बाळवृत्तीने राहणाऱ्या स्वामींचे बाळगोपाळांवर निर्व्याज प्रेम होते. त्यांचे उपास्यदैवत कृष्ण होते. त्यामुळे पुजारी मंडळी त्यांना श्री कृष्णस्वरूप समजत.

भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहणाऱ्या सत्पुरुषांना दिवस अपुरा पडतो, तर संसारचक्रामध्ये निमग्न पुरूषाला दिवसाचा वेळ कसा घालवावा? हा प्रश्न पडतो. हाच तर सत्पुरुष व सामान्य पुरूष यांच्यातील भेद आहे. लहान मुलांना त्रास देणाऱ्या एका पिशाच्चाला परतवून लावून त्यांची पंचमहाभूतावरील असणाऱ्या सत्तेचा प्रत्यय येतो. पंचमहाभूतांवर अमर्याद सत्ता गाजविणारे व सर्व द्वंद्वांच्या पलीकडे गेलेले स्वामी लोकांच्या उद्धारासाठी त्यांच्यावरील प्रेम भावनेने आपले कर्तव्य पूर्ण करीत. श्रीमद् शांतानंद स्वामींसारख्या अलौकिक संत माहात्म्याचे पुजाऱ्यांवर अलौकिक प्रेम होते. पुजारी मंडळी म्हणजे प्रत्यक्ष दत्तमहाराजच आहेत, अशी त्यांची विशुद्ध भावना होती. पुजारी मंडळीही त्यांना ‘दत्तस्वरूप’ मानून त्यांची सादर भावाने सेवा करीत असत. आधी केले, मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वत: गुरुचरित्राचे वाचन करीत व शरण आलेल्यांना ते वाचण्याचा मौलिक उपदेश करीत. अनेक शिष्यांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे वेगवेगळ्या साधना भक्तीचे प्रकार सांगून अनेक भक्तांचा उद्धार केला. वाडीच्या पुजारी कुलातील अधिकारी विद्वान पं. आत्मारामशास्त्री जेरे (पुजारी) चा शिष्यांमध्ये समावेश होतो.

आर्त जिज्ञासू, मुमुक्षु भक्तांच्या प्रश्नांना सहज उत्तर देऊन त्यांची मनोकामना पूर्ण करीत. त्यामुळे नरसोबावाडीत त्यांना जीवन्मुक्त महापुरूष म्हणून आदराचे स्थान होते. आयुष्यभर आपल्या नामाभिधानाप्रमाणे शांत व आनंदी राहून शरण आलेल्यांना मुक्त हस्ताने शांतता व आनंद प्रदान करून ब्राह्मविद्वरिष्ठ श्रीमत् शांतानंद स्वामी कार्तिक व ॥१२ रोजी सकाळी दत्तस्वरूपी लीन झाले. श्रीमत् शांतानंद स्वामींचे तैलचित्र वासुदेवानंद सरस्वतींच्या मठामध्ये आहे. त्यांचे नित्य त्रिकाळ पूजन केले जाते. आपल्या पवित्र आचार व विचाराने आदर्श जीवन व्यतीत करणाऱ्या स्वामींनी पुजारी कुलाचे रक्षण केले. अशीच कृपा सर्व दत्तभक्तांवर राहो म्हणून स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना.