स्थान: देशपांडे गल्ली, अंबेजोगाई, जिल्हा बीड
सत्पुरुष: श्री दासोपंत, आद्यकवी मुकुंदराज
विशेष: दत्तमंदिर, योगेश्वरीदेवी अंबेजोगाई
दासोपंतांचा दत्त, योगेश्वरी देवीच्यास्थानामुळे प्रसिद्ध असलेले आंबेजोगाईचे ठिकाण आद्यकवी मुकुंदराज व संत दासोपंत यांच्या वास्तव्यामुळेही पुनीत झालेले आहे.
दत्त संप्रदायातील तीन भिन्न पंथ आहेत. ते म्हणजे दासोपंती, गोसावी आणि गुरुचरित्र पंथ. संत कवी दासोपंत हे त्यातल्या पहिल्या पंथाचे अध्वर्यु होते. त्याच्याच नावाने तो पंथ ओळखला जातो. या पंथाचे वैशिष्ट्य म्हणजे एकमुखी द्विभुजी दत्त हेच सद्गुरूंचे रूप मान्य केलेले आहे.
दासोपंत हे एक महान दत्तभक्त होऊन गेले. दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिलेलें होते असे सांगितले जाते. दासोपंतांनी स्थापन केलेले एक दत्तमंदिर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे देशपांडे गल्लीत आहे. तेथे थोरले देवघर धाकटे देवघर असे दोन भाग आहेत. दासोपंतांनी आपले आयुष्य याच मंदिरात व्यतीत केले होते. भगवान दत्तात्रेयांबरोबर त्यांचा सुखसंवाद येथेच चालत असे असे स्थानिक सांगतात. त्यामुळे हे स्थान जागृत असल्याचे अनुयायी सांगतात.
दासोपंतांची औरंगजेबाबरोबर घडलेली एक हकीकत येथे सांगितली जाते. ती खूप रंजक आहे. औरंगजेबाची दासोपंतांवर खूप श्रद्धा होती. परंतु त्यांचे संशयी स्वभावानुसार त्यांनी दासोपंतांची दत्तभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. दासोपंतांच्या दर्शनाला जाताना एकेदिवशी त्यांनी दत्तात्रेयांचे समोर ठेवण्यासाठी नैवेद्याचे एक ताट बरोबर घेतले. या ताटात बकऱ्यांच्या मांसाचे तुकडे होते. कपड्याने झाकलेले ते ताट बादशहाने दासोपंतासमोर ठेवले आणि देवाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले. कुठलीही शंका मनीं न घेता समंत्रक प्रोक्षण करून दासोपंतांनी झाकलेल्या त्या ताटाचा नैवेद्य आपल्या आराध्याला दाखवला. नैवेद्य दाखवून होताच औरंगजेबाने ताटावरील आवरण दूर करण्यास सांगितले आणि आश्चर्याचा धक्काच बसला. हे सगळे नैवेद्याचे ताट सुंदर अशा गुलाबाच्या फुलांनी भरून गेलेले होते. त्या फुलांचा सुगंध संपूर्ण मंदिरात दरवळलेला होता. हा चमत्कार पाहताच औरंगजेब नतमस्तक झाला, आणि त्यांनी तिथल्या तिथे दासोपंतांच्या दत्त मंदिरास तीन गावे इनाम म्हणून दिली अशी ही कथा.
या मंदिरात दत्त जयंती आणि दासोपंतांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हे मंदिर क्षेत्र अतिशय पवित्र व श्रीगुरूंच्या आगमनाने परमपवित्र झालेले आहे.