एकमुखी दत्तमंदीर श्री क्षेत्र नारायणपूर

स्थान: ता. पुरंदर, जिल्हा पुणे (महाराष्ट्र राज्य), सासवडपासून ५-६ कि. मी. अंतरावर
सत्पुरुष: श्री नारायण महाराज (आण्णा)
स्थळ विशेष: एकमुखी सुंदर दत्तमूर्ती, श्रीगुरुपादुका, पुरातन शिवमंदीर

एकमुखी दत्त मूर्ती नारायणपूर
एकमुखी दत्त मूर्ती नारायणपूर 

पुण्यापासून ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. सामान्यत: त्रीमूर्ती व षडभूज मूर्ती प्रचलीत आहे पण येथे ती एकमुखी आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. येथे येणारे भावीक मुख्यत्वे करून श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात. माणसांमधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे असे ते सांगतात.

स्थान महात्म्य 

भक्त सासवड रोडने पुण्याच्या दक्षिणेला जाऊन दिवेघाटातून सासवडला जाऊ शकतात किंवा सातारा रोडने नारायणपूरकडे डावीकडे वळून पोहोचू शकतात. हे स्थान ऐतिहासिक पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आहे. नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे गाव आहे. यागावात जूना औंदूंबर वृक्ष आहे. पूरातन शिवमंदीर हेमाडपंथी  आहे. नारायण महाराज यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात.

दत्त मंदिर नारायणपूर
दत्त मंदिर नारायणपूर 

सदर मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. पूरातन दत्त पादूका आहेत. सदर परिसरात रहाण्यासाठी भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था आहे. प्रशस्त सभामंडप आहे. सत्पुरुष श्री नारायण महाराज उर्फ आण्णा या मंदीर परिसरातच राहतात. येथे काही संन्यासी साधू व उपासक आहेत. निसर्गरम्य किल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्रीगुरुंच्या वास्तव्यांनी अतिशय पवित्र झालेले आहे. "जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता" असा मंत्र येथे जपला जातो.   

येथील दत्त जन्म सोहळा मार्गशिर्ष शु.१४ सायंकाळी असतो. दत्तजन्म पाळणा हलवून करतात. रात्री शोभेचे दारूकाम, दत्तजन्माचे किर्तन असते. दुसऱ्या दिवशी उत्सवमूर्ती व पादुका ग्रामप्रदक्षिणेस जातात. ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते. तेथे मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घालतात. या मिरवणूकीत हत्ती, घोडे, उंट असा सर्व लवाजमा असतो. दत्तभक्तांचा हा सोहळा पहाण्यासाठी महापूर लोटतो.

सदर ठिकाणी अनेक दु:खी, पिडीत व बाधीत भक्तांच्या समस्यांचे निराकरण झालेले आहे. म्हणून हे जागृत स्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे. या ठिकाणी आता विशाल काय मंदिर, पारायणाची जागा, भक्त निवास व भोजनाची व्यवस्था आहे. श्री दत्तजयंती व गुरुपौर्णिमा हे येथे साजरे होणारे महत्वाचे उत्सव आहेत. येथे गुरुवार व प्रत्येक पौर्णिमेस विशेष महत्व आहे.  

दत्त मूर्ती नारायणपूर
दत्त मूर्ती नारायणपूर 
श्री दत्तांची पालखी नारायणपूर
श्री दत्तांची पालखी नारायणपूर