श्री दासोपंत (शके १४७३ – १५३७)

श्री दासोपंत
श्री दासोपंत 

जन्म: दत्तउपासक कुटुंबात, भाद्रभद व. ८ इ.स.१५५१, बिदरच्या बहामनी शाहीत, नारायण पेठ गावी
आई/वडिल: पार्वती / दिगंबरपंत देशपांडे (वतनदार)
कार्यकाळ: १५५१ ते १६१५
मुंज: मुंज ५व्या वर्षी, 
विवाह:  विवाह १६व्या वर्षी (गव्हाळ सावकाराची मुलगी जानकीशी)
शिष्य: सितोपंत देशपांडे
वाड्ग्मय: दासोपंतांची पासोडी, अवधूतगीता,  दत्तसहस्त्रनाम, संतकवी रचनांची संख्या सुमारे ५ लाख    

दासो दिगंबरपंत देशपांडे उर्फ दासोपंत हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत कवी होते. त्यांचा जन्म भाद्रपद कृष्ण आष्टमी रोजी सोमवारी झाला. ते एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात्रेयांचे परमभक्त होते. त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात. १६व्या १७व्या शतकातले नाथपंचक म्हणजे संत एकनाथ, जनी जनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंद आणि संत सर्वज्ञ दासोपंत हे होय. दासांनी वयाच्या ५व्या वर्षात मुंज होताच चारी ही वेद मुखोद्गत म्हणून दाखवले.

बिदरच्या बहामनीशाहीतील नारायणपेठ नावाच्या गावी दिगंबरपंत देशपांडे यांच्या घरी भाद्रपद व. ८ शके १४७३ रोजी दासोपंतांचा जन्म झाला. घराण्यात चांगली श्रीमंती नांदत होती. याच वेळी प्रांतात मोठा दुष्काळ पडला. म्हणून दिगंबरपंतांनी आपल्या अधिकारात सरकारी कोठारातील धान्य भुकेलेल्यांना वाटून टाकले. या धान्याच्या रकमेची भरपाई वेळेवर खजिन्यात झाली नाही. यामुळे बादशहा नाराज झाला. बादशहाने दासोपंतास ओलीस ठेवून दिगंबरपंतास बजावले की, ‘एक महिन्यात बाकी चुकती झाली नाही तर पोरास मुसलमानी दीक्षा देऊ.’ दिगंबरपंत व दासोपंत या उभयतांनी दत्तप्रभूंची करुणा भाकली. दत्ताजी पाडेवार नावाच्या एका दत्तस्वरूप विभूतीने रक्कम सरकारात भरून दासोपंतांची सुटका केली. दासोपंत मुक्त झाल्यामुळे सर्वांना आनंद वाटला. तरी खुद्द दासोपंतांची चित्तवृत्ती वैराग्याने उजळून निघाली. त्यांना अस्वस्थता वाटत राहिली. ज्या दत्तप्रभूने आपणास वाचविले त्याचाच शोध घेण्यासाठी ते एकाएकी घरातून निघून बाहेर पडले.

हिलालपूर, डाकुळगी, प्रेमपूर, नांदेडवरून ते मातापूर तथा माहूर या क्षेत्री आले. येथील निसर्गरम्य परिसर, रेणुकामातेचे दर्शन, दत्त आणि अनूसयेचे दर्शन, मातृतीर्थावर स्नान इत्यादींत त्यांचे मन रमले. ध्यानधारणेस अतिशय अनुकूल अशा या ठिकाणी दासोपंतांनी दत्तभक्तीचा अनुभव घेतला. ते माहूर येथे सुमारे बारा वर्षेपर्यंत दत्तसेवेत रमून गेले. त्यानंतर ते पुन्हा संचारास निघाले. राक्षसभुवन येथील गोदामाईच्या वाळवंटात त्यांना दत्तपादुकांचा प्रसाद मिळाला. येथेच त्या एकांतवासात अवधूताचे दर्शन झाले. त्यानंतर ते पुन: डाकुळगीस आले. कृष्णाजीपंतास येथे त्यांनी एक दत्तमूर्ती नित्याच्या उपासनेसाठी देऊन ते वाणीसंगमी आले. येथेच त्यांना त्यांच्या घरचा परिवार भेटला. बारा वर्षे पतीचा पत्ता नसल्यामुळे त्या काळच्या लौकिक रूढीप्रमाणे सौभाग्यचिन्हांचा विधिपूर्वक त्याग करण्यासाठी दासोपंतांची पत्नी आपल्या घरच्या लोकांसमवेत येथेच आली होती. अशा त्या नाट्यपूर्ण प्रसंगात सर्वांचे मीलन झाले. वाघेश्वराच्या मंदिरात दासोपंत आपल्या आईवडिलांना व पत्नीला भेटले. सर्वांना अतिशय आनंद झाला. दासोपंतांनी नारायणपेठ येथील आपल्या वतनाचे दानपत्र करून ते कायमचे राहाण्यासाठी म्हणून आंबेजोगाईस येऊन स्थायिक झाले.

श्री दासोपंत मंदिर
श्री दासोपंत मंदिर

सितोपंत देशपांडे यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करून आंबेजोगाईस दासोपंतांची सर्व व्यवस्था लावून दिली. या ठिकाणी दासोपंतांनी अखंडपणे लेखन करून मराठी शारदेस उत्कृष्ट नजराणे समर्पित केले. ‘गीतावर्ण’ नावाचा त्यांचा एक ग्रंथ सव्वा लाख ओव्यांचा आहे. ग्रंथराज, वाक्यवृत्ती, पंचीकरण, पदार्णव, अनुगीता, महापूजा, वज्रपंजरकवच अशी त्यांची लहानमोठ्या प्रमाणावरची रचना विपुल आहे. दत्तात्रेयांचा महिमा तर त्यांनी अनेक पदांतून गायिला आहे. दासोपंतांच्या दत्तोपासनेची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दासोपंतांच्या परंपरेत दत्तात्रेयांचे सोळा अवतार प्रसिद्ध असून सतरावा अवतार म्हणजे स्वत: दासोपंत असून त्यांचा उल्लेख, ‘श्रीसर्वज्ञावत्तार’ म्हणून होतो. उपासनेची त्यांनी ठरवून दिलेली पद्धती अजून चालू आहे. ‘प्रत्येक दिवशीचा उपासनाविधी, सात वारांची वेगवेगळी भजने, पर्वकाळाची आणि उत्सवाची विशेष भजने, पदे, आरत्या, शेजारत्या, अष्टके, स्तोत्रे हे सर्व त्यांनी आखून व रचून ठेविले आहे. विशिष्ट प्रसंगी करावयाची लळिते, संगीत, टिपऱ्या यांचीही रचना केलेली आहे. नित्यासाठी दशनाम, शतनाम, सहस्रनाम, स्तवराज, माहात्म्ये हीही तयार करून दिलेली आहेत… उत्सवपद्धती, सेवा, अर्चन, उत्तरार्चन यांचीदेखील शिस्त त्यांनीच घातलेली आहे…  मूर्तीच्या नित्य स्नानासाठीही काही नियम आहेत. ‘आनंदें दत्तात्रेय देवदेव’ हा दासोपंत परंपरेतील जयघोष आहे’ (दासोपंतांची पासोडी : न. शे. पोहनेरकर, प्रस्तावना, पृष्ठ १७)

दासोपंतांनी वरीलप्रमाणे दत्तोपासना दृढ चालावी म्हणून दत्तात्रेयांवर अनेक प्रकारची स्फुट व प्रकरणात्मक रचना केली आहे. अवधूतराज, दत्तात्रेयमाहात्म्य (संस्कृत), अवधूतगीता, दत्तात्रेयसहस्रनामस्तोत्र, दत्तात्रेयदशनामस्तोत्र, दत्तात्रेयषोडशनामस्तोत्र, शतनामस्तोत्र, द्वादशनामस्तोत्र, सिद्ध दत्तात्रेयस्तोत्र, गुरुस्तोत्र, दत्तात्रेयनामावळी, षोडशअवतारस्तोत्र, षोडशअवतार प्रादुर्भावस्तोत्र, षोडश अवतारध्यानस्तोत्र इत्यादी प्रकरणे  दासोपंतांच्या परंपरेत नित्य म्हटली जातात. दासोपंतांची पदे अतिशय नादमधुर व भक्तिरसपूर्ण आहेत. द्त्तांविषयी दासोपंतांना वाटणारी करुणा, आशा, भक्ती यांचे मूर्तिमंत दर्शन दासोपंतांच्या पदांतून व्यक्त होते.

श्री दासोपंत 
श्री दासोपंत 

‘तुम्ही जा, जा वो झडकरूनी त्यासी येई जा घेऊनी’. ‘चालतां बोलतां तुझें रूप ध्याईन!’ ‘बोलावितां न बोलसी, ऐसें म्यां वो काय केले ?’ ‘जयुतपु तीर्थाटण माझें हेंचि ब्रह्मज्ञान’ इत्यादी ओळींतून दासोपंतांच्या ह्र्दयातील आर्तता जाणवण्यासारखी आहे. दासोपंतांच्या दत्तविषयक काही पदे येथे नमुन्यासाठी देत आहे. 

१)     दत्ते धेनूचे मी वत्स धाकुलें वो ! वत्स धाकुलें वो ! 
मागुताहें येकु पान्हा वो ! कैसी देउं निघाली ! लागो नेदी मज थाना वो ! 
कैसें लल्लाट माझें ! बोलुं मी ठेउ हा कवणा ? वो ! मी पोटिचें बाळ आहे नाही कळेना वो ! ॥ १॥ धृ॥ 
अवो ! अवो ! सुंदरे ! अवो ! सुंदरे ! वो ! 
अवो ! सुंदरे ! वो ! अवो ! सुंदरे ! वो ! 
ह्र्दय उल्लताहे माझें वो ! 
दु:ख कवणासि सांगो ? आहारु दूजा नेणिजे वो ! 
नवमास पोटीं होतियें कैसी वो ! होतियें कैसी वो !
तुझेनि स्वरसें धाली वो ! जन्मु कां मज दिधला उपेक्षा कासया केली ? वो ! 
आतां येथूनि तऱ्हीं जेथिची तेथें मज घाली वो ! 
दिगंबरे ! माये ! भारी होती आस केली वो ! 

२)    आपुला तूं कैसा होसी ? चरण झाडीन कैसीं अवधूता ! सांग मातें तें पद देसी ॥ १॥धृ॥
बापा ! तुझे ध्यान कयी अनुश्रुत लागेल ह्र्दयी? ॥छ॥ 
दिगंबरा ! तुझी माया, सूर मोहले जीयां, न तरवे, जाण, आत्मा साधन – क्रीया ॥ २॥
 

दांभिक औरंगजेबाचे श्री दत्तप्रभूंकडून गर्वहरण; आपला निस्सीम भक्त दासोपंतांसाठी !

श्री दासोपंतांचा दत्त, योगेश्वरी देवीच्या स्थानामुळे प्रसिद्ध असलेले अंबेजोगाईचे ठिकाण, आद्यकवी मुकुंदराज व संत दासोपंत यांच्या वास्तव्यामुळे ही पुनीत झालेले आहे.
दत्त संप्रदायातील तीन भिन्न पंथ आहेत. ते म्हणजे दासोपंती, गोसावी आणि गुरुचरित्र पंथ. संत कवी दासोपंत हे त्यातल्या  पहिल्या पंथाचे अध्वर्यु होते. त्याच्याच नावाने तो पंथ ओळखला जातो. या पंथाचे वैशिष्ट्य म्हणजे एकमुखी द्विभुजी दत्त हेच सद्गुरूंचे रूप मान्य केलेले आहे. दासोपंत हे एक महान दत्तभक्त होऊन गेले. दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिलेलें होते, असे सांगितले जाते. दासोपंतांनी स्थापन केलेले एक दत्तमंदिर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे देशपांडे गल्लीत आहे. तेथे थोरले देवघर धाकटे देवघर असे दोन भाग आहेत. दासोपंतांनी आपले आयुष्य याच मंदिरात व्यतीत केले होते. भगवान दत्तात्रेयांबरोबर त्यांचा सु-संवाद येथेच चालत असे, असे स्थानिक सांगतात. त्यामुळे हे स्थान जागृत असल्याचे अनुयायी सांगतात.

दासोपंतांची औरंगजेबाबरोबर घडलेली एक हकीकत येथे सांगितली जाते. ती खूप रंजक आहे. औरंगजेबाची  दासोपंतांवर खूप श्रद्धा होती. परंतु त्याचा संशयी स्वभाव आणि बादशहीचा गर्व म्हणून त्यांनी दासोपंतांची दत्तभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. दासोपंतांच्या दर्शनाला जातांना एकेदिवशी त्यांनी दत्तात्रेयांचे समोर ठेवण्यासाठी नैवेद्याचे एक ताट बरोबर घेतले. या ताटात बकऱ्यांच्या मांसाचे तुकडे होते. कपड्याने झाकलेले ते ताट बादशहाने दासोपंतासमोर ठेवले आणि देवाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले. कुठलीही शंका मनीं  न घेता समंत्रक प्रोक्षण करून दासोपंतांनी झाकलेल्या त्या ताटाचा नैवेद्य आपल्या आराध्याला दाखवला. नैवेद्य दाखवून होताच औरंगजेबाने ताटावरील आवरण दूर करण्यास सांगितले आणि आश्चर्याचा धक्काच बसला. हे सगळे नैवेद्याचे ताट सुंदर अशा गुलाबाच्या फुलांनी भरून गेलेले होते. त्या फुलांचा सुगंध संपूर्ण मंदिरात दरवळलेला होता. हा चमत्कार पाहताच औरंगजेब नतमस्तक झाला आणि त्यांनी तिथल्या तिथे दासोपंतांच्या दत्त मंदिरास तीन गावे इनाम म्हणून दिली; अशी ही कथा.
या मंदिरात दत्त जयंती आणि दासोपंतांची  पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हे मंदिर क्षेत्र अतिशय पवित्र व श्रीगुरूंच्या आगमनाने परम-पवित्र झालेले आहे.

श्री दासोपंतांचे चरित्र 

आपला भारत देश फार पुण्यवान संतांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. त्यातून महाराष्ट्रात तर फारच ऋषिमुनींनी तप केले, त्यामुळे महाराष्ट्र तपोभूमी म्हणून पण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात परिसरात बीदर शहरी एक यवन राजा राज्य करीत होता. त्याच्या राजदरबारी दिगंबरपंत नावाचे ब्राह्मण गृहस्थ खजिनदार होते. ते फार प्रामाणिकपणे काम करीत असत. पण एकदा काय झाले, फारच मोठा दुष्काळ पडला आणि लोक अन्ना-पाण्याविना तडफडून मरू लागले. दिगंबरपंतांना ते पाहवेना. ते हृदयी कळवळले. ते नारायणखेडचे राहणारे कुलकर्णी होते. तिथे त्यांना मोठी इस्टेट होती. परंतु जनतेला पोसण्याइतपत पुरणारी नव्हती. म्हणून त्यांनी राजाचे भांडार उघडे केले नि जनतेला अन्न-पाणी पुरवले. जनता तृप्त झाली. तथापि राजाला ते सहन झाले नाही. आपल्याला न विचारता राज्याचे कोठार लुटले म्हणून दिगंबरपंताना अटक केली आणि सांगितले की, कोठाराची २ लाखाची नुकसानीची रक्कम भराल तेव्हाच तुमची सुटका होईल. दिगंबरपंतांनी सगळ्या नातेवाईकांना कळविले, पण त्यांना कुणी मदत केली नाही. तेव्हा दिगंबरपंत राजाला म्हणाले, ‘मी गावाकडे जाऊन रक्कम आणून देतो. दोन महिन्यात भरणा करतो. मला परवानगी द्यावी.’ ते अत्यंत प्रामाणिक आहेत, हे राजा जाणून होता. परंतु काहीतरी ओलीस (हमी) ठेवण्याचा कायदा होता. म्हणून दिगंबरपंतांनी आपल्या एकुलत्या किशोरवयीन मुलाला दरबारी बोलावून सांगितले, ‘आपली शेतीवाडी इथे लिहून दे.’ दासोपंत तयार झाले. पण त्या लहान मुलाची तेजस्वी मुद्रा पाहून कर्तव्यकठोर राजाचेसुद्धा मन द्रवले. त्याने मुलाला विचारले, ‘तुझ्या वडिलांनी गुन्हा केला, त्याची भरपाई तू कशासाठी करणार?’ तेव्हा दासोपंतांनी तडफदारपणे उत्तर दिले, ‘जनतेला खायला दिले हा गुन्हा काही होतच नाही, कारण ते धान्य रयतेचेच होते. पण तुम्ही म्हणताच आहात, तर दोन महिन्यात रक्कम भरतो व तोपर्यंत मी ओलीस राहतो.’ आणि पित्याला म्हणाले, ‘दोन महिन्यात रक्कम भरा. तोपर्यंत मी कैदेत राहतो.’ या विचाराने दिगंबरपंतांचे मन कळवळले, पण इलाजच नव्हता तसे केल्याशिवाय. यावर राजानेही बजावले की, दोन महिन्यात भरणा झाला नाही, तर या मुलाला मुसलमान केले जाईल. दिगंबरपंताना धक्काच बसला आणि ते खटपट व रात्रंदिवस दत्तोपासनेत जप, ध्यान, प्रार्थना करू लागले. कुलपरंपरेप्रमाणे इकडे दासोपंतांनीही कैदेतच जप-तप सुरू ठेवले. मुसलमानाकडे काहीच न खाता फक्त फळे व पाणी यावर दोन महिने काढले. आणि प्रार्थना करीत राहिले. असे होता होता शेवटचे ३-४ दिवस राहिले, पण दिगंबरपंत पैसे भरू शकत नसल्याने ते नि दासोपंतांच्या घरचे सर्वजण ‘आपला दासू आता नक्की मुसलमान होणार’ या कल्पनेने व्याकुळ झाले. तथापि त्यांनी मनापासून केलेल्या भक्तीने प्रसन्न होऊन देवाने एका फकिराचा वेष घेतला व दरबारात रक्कम भरली, त्याची पावती राजाकडे दाखवून दासोपंतांना सोडवले. तो तेज:पुंज फकीर पाहून राजाही हरपला. त्याने दासोपंतांना आदराने घरी पाठवले. दासोपंत आलेले पाहून दिगंबरपंतांनी आश्र्चर्य वाटून, कोणी त्यांना सोडवले, हे विचारले. दासोपंत म्हणाले, ‘एका फकिराने रक्कम भरणा केली व तशी पावती राजाला दाखवून माझी सुटका केली. तो कोण होता याची बरीच चौकशी करूनही पत्ता न लागल्यावर दिगंबरपंतांना उमगले की, हे कार्य दत्तप्रभूंनीच केले. राजाही आचंब्यात पडून त्यांना म्हणाला, ‘तो फकीर कोण होता, त्याचे दर्शन मला करवा’ पण देव काही बाजारचा भाजीपाला नाही की कोणालाही आणि केव्हाही त्याचे दर्शन होईल! जो मनापासून भक्ती करील त्यालाच ते भाग्य लाभते.

दासोपंतांचे लग्न लहानपणीच झाले होते. परंतु सुटून आल्यापासून ते उदासीनच होते. कुणाशीच अगदी आई-वडिलांशी, फार काय, पत्नीशीही जास्त बोलत नव्हते. सारखे ईशचिंतनात असत. एके दिवशी मनाचा निश्चय करून कुणालाच काहीही न सांगता घराबाहेर पडले व फिरत फिरत सोनपेठला गंगेच्या (गोदावरी) तीरी वागेश्र्वरी मंदिरात येऊन राहिले. तिथे त्यांनी बारा वर्षापर्यंत तप-अनुष्ठान केले. श्रीदत्ताची उपासना केली. इकडे आई-वडिलांनी त्यांचा बराच शोध घेतला पण त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. दासोपंतांचा शोध घेतघेत फिरत असता ते सगळे सोनपेठला आले.

पूर्वी पतीपत्नीचा वियोग झाला तर पत्नीला संन्यास देत असत. त्या रूढीप्रमाणे दासो-दिगंबरांच्या आई-वडिलांनी त्यांच्या पत्नीला संन्यास द्यायचे ठरविले व गंगेच्या तीरावर आणले. त्यावेळी ती कळवळून म्हणत होती की, ‘पतीचा शोध लागेल; मला संन्यास देऊ नका.’ परंतु बरोबरच लोक मानायला तयार नव्हते. बराच गोंधळ चालू होता. नेमके त्याचवेळी दासोपंत स्नानाला गंगाकिनारी आले होते. आवाज ओळखीचा वाटून आणि काय गडबड आहे म्हणून जवळ येऊन पाहतात, तर आपलेच लोक आहेत. मग आपली ओळख सांगून आपण जीवंत असल्याची खात्री पटवली व बायकोला संकटातून वाचवले. त्यांनी वडिलांना सांगितले, ‘तुम्ही हवे तर सर्व इस्टेट विका आणि माझ्याबरोबर या.’ ते मान्य करून सर्व मालमत्ता विकून दासोपंतांबरोबर अंबेजोगाईला आले.

अंबेजोगाईला आल्यावर त्यांनी दत्ताची उपासना-अनुष्ठाने केली. दत्तप्रभू प्रसन्न झाले व आशिर्वाद देऊन इथेच राहण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे अंबेजोगाईस दत्तमंदिर बांधून राहण्याचे ठरविले. तेव्हा अंबेजोगाईच्या रहिवाशांनीदेखील सहाय्य केले. मुकद्दमांनी दत्तमंदिर बांधायला ४ एकर जमीन दिली. त्या जागेवर त्यांनी दोन दत्तमंदिरे बांधली. पुढे त्यांचे पुष्कळ शिष्य झाले. त्यात मुख्य शिष्य घराणे मुकद्दमांचे आहे. आजही त्याच मुकद्दम घराण्याकडे गुरूपूजेचा पहिला मान दिला आहे. दासोपंतांना दोन मुलगे झाले होते. त्यांच्यात वाटणी करताना एकाकडे घरचे देव व दुसऱ्याकडे आदिगुरूंची (दत्तात्रेयांची) मूर्ती असे वाटून झाले. परंतु त्यांचेकडून दत्तगुरूंची मूर्तीपूजा आवश्यकच व्हावी म्हणून दोन मूर्ती पाहिजेत असे वाटून त्यांनी दोन्ही मुलांना बोलावून सांगितले, ‘तुम्हाला दोन मूर्ती तयार करून देतो, पण मी सांगेन तसे करा.’ त्यानुसार त्यांनी कणीकेच्या दोन मूर्ती बनविल्या. तांदूळाच्या राशीत लपविल्या व सांगितले, ‘या मूर्ती सव्वा महिन्याने बाहेर काढल्या तर सोन्याच्या मिळतील. एक महिन्याने चांदीच्या, तीन आठवड्यांनी पंचधातूच्या, तर आठ-पंधरा दिवसांनी पितळेच्या झालेल्या सापडतील. तेव्हा काय पाहिजे ते तुम्ही ठरवा, व मूर्ती काढून प्राणप्रतिष्ठापूर्वक उत्सव सुरू करा.’ मुलांना महिनाभरसुद्धा धीर धरवला नाही. तीन आठवड्यातच मूर्ती बाहेर काढून पाहिल्या. त्या पंचधातूच्या एक मुखी दत्तमूर्ती होत्या.

पुढे सर्व व्यवहार मुलांवर सोपवून दासोपंतांनी जप-तप अनुष्ठानात वेळ घालवावा, असे ठरवून रोज एका ढबू पैशाच्या वजनाएवढी शाई मोजून घ्यावी. ती काव्यलिखाणात आटवायची. (संपवायची) या हेतूने काव्य लिहिले. त्यांचे बरेच महान ग्रंथ लिहून झाले. ‘पदार्णव’, ‘गीतार्णव’, ‘पासोडीवर काव्यलेखन’, ‘सोळा दत्तावतारांची माहिती व पूजा-उत्सव पद्धत’ असे सर्व ग्रंथ तयार झाले. ही त्यांची भक्ती पाहून श्रीदत्त प्रसन्न तर होतेच; पण त्यांचे रोजचे लिखाण होईपर्यंत स्वयं समोर येऊन उभे राहत.

एकदा काय झाले, श्रीएकनाथ महाराज पैठणहून मुद्दाम त्यांचे काव्य पाहण्याकरिता आले. ते येऊन दहा ते पंधरा घटका झाल्या तरी दासोपंतांनी वर पाहिले नाही. त्यांना तशी चाहूलच लागली नाही. कारण ते एवढे तन्मय होत असत की, समोर दत्तप्रभू उभे असतील याचेसुद्धा त्यांना भान नसे. परंतु एकनाथ महाराजांचा गैरसमज होऊन आपण आल्याची जाणीव करून देत ते म्हणाले, समोर दत्त उभे आहेत, मी अतिथी येऊन ठाकलो. तुला जर का अतिथीचे, देवाचेही भान राहत नाही; तर ते काव्य कुणालाही ठाऊक होणार नाही.’ मग दासोपंतांनी त्यांचे पाय धरून क्षमा मागितली व म्हटले, ‘मी हे जाणूनबुजून दुर्लक्ष केले नाही. मला समजलेच नाही आपण आलेले, तरी शाप मागे घ्या.’ तेव्हा एकनाथ महाराज बोलले, ‘आता शाप मागे घेता येत नाही. पण उ:शाप देतो की, पाचशे वर्षानंतर एक श्रीदत्तावतारी महान् पुरूष येईल व त्या काव्याचे (प्रकटीकरण) भाषांतर करून देईल तेव्हाच समाजाला कळेल. जरी उत्सवात तुझे शिष्य ते पद गातील तरी त्याचा अर्थ मात्र कळणार नाही. पण जेव्हा श्रीदत्तावतारी पुरूष येऊन त्याचे संस्कृत भाषांतर करील तेव्हाच अर्थ कळेल.’

पुढे पंतांनी आपले कर्तव्य व जनतेला मार्गदर्शनाचे कार्य पूर्ण करून अंबेजोगाईल नृसिंहतीर्थ हे आपले समाधिस्थान निवडले. तिथे नृसिंहमंदिर आहे. दोन महादेवांची मंदिरे आहेत. काही लेण्या आहेत. समोर तीन तीर्थेही आहेत. अशा निवांतस्थानी त्यांनी समाधी घेतली. त्यांनी जरी समाधी तरी अजूनही जे कोणी भक्त निर्मळ मनाने भक्ती-सेवा करतील त्यांना दर्शन घेतात. पुढे काही दिवसांनी माळे-गावी देवाच्या उत्सवाच्या खर्चासाठी जमीन मिळाली होती. ती जमीन नांगरताना त्या ठिकाणी एकमुखी काळी पाषाणाची मूर्ती सापडली. अगदी नुकतीच घडविल्यासारखी सुबक आहे. तेजस्वी आहे आणि जागृत दैवत आहे. तिथेही उत्सव होत असतो.

पुढे फिरत फिरत प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी अंबेजोगाईला आले. त्यांनी सर्व माहिती काढून जनकल्याणार्थ ते सर्व साहित्य सोप्या भाषेत लिहून ठेवले. तेव्हापासून सर्व जनतेला कळू लागले. दासोपंतांनी दोन मुलांसाठी एकसारखी दोन दत्तमंदिरे बांधून ठेवली. त्यांना थोरले व धाकटे देवघर म्हणतात. सोप्याचा वाडा, गुरूरूप मंदिर, कमलनयनतीर्थ अशा बऱ्याच पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यांचे इथे वर्णन केले तर मोठा ग्रंथ होईल. श्रीदत्तजयंतीच्यावेळी इथे मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण महिनाभर उत्सव चालू असतो.

दत्तात्रेय शोडश अवतार

श्रीदत्तांच्या सोळा अवतारांचा उत्सव फक्त अंबेजोगाईलाच होतो. पूर्ण भारतात दुसरीकडे कुठेच होत नाही. या अवतारांचा जन्म केव्हा, कुठे व कशासाठी झाला, याची संपूर्ण माहिती इथे मिळते व त्यांचे वेगवेगळे जन्मोत्सवही साजरे होतात. ते सर्व पाहताना जेवणाचीसुद्धा आठवण होत नाही. तरी ज्या भक्तांना हे सर्व जाणून घ्यायचे असेल त्यांना त्या त्या वेळी येऊन हा उत्सव सोहळा पहावा व मनाने तृप्त व्हावे.

दत्तात्रेय शोडश अवतार
दत्तात्रेय शोडश अवतार

सोळा अवतारांची क्रमश: नावे

दत्तात्रेयप्रभूंचा पहिला अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेस झाला. याला योगिराज असे नाव दिलेले आहे.

दुसरा अवतार कार्तिक वद्य प्रतिपदेस झालेला असून त्याला अत्रिवरद असे नाव दिलेले आहे.

तिसरा अवतार कार्तिक वद्य द्वितीयेला झालेला असून तो दत्तात्रेय या नावाने ओळखला जातो.

चौथा अवतार मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीस झाला. याला कालाग्निशमन असे म्हणतात.

पाचवा अवतार मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस झाला. याला योगिजनवल्लभ असे म्हणतात.

सहावा अवतार पौष शुद्ध पौर्णिमेस झाला असून याला लीलाविश्वंभरदत्त असे म्हणतात.

दत्तप्रभूंचा सातवा अवतार माघ शुद्द्ध पौर्णिमेस झाला असून याला सिद्धराज असे म्हणतात.

आठवा अवतार फाल्गुन शुद्ध दशमीस झाला. हा ज्ञानसागर या नावाने ओळखला जातो.

नववा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेस झाला. तो विश्वंभरावधूत या नावाने प्रसिद्ध आहे.

दत्तगुरूंचा दहावा अवतार वैशाख शुद्ध चतुर्थीस झाला असून त्याला मायामुक्त अवधूत असे म्हणतात.

अकरावा अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस झाला असून तो मायामुक्त अवधूत या नावाने प्रसिद्ध आहे.

दत्तगुरूंचा बारावा अवतार आषाढ शुद्ध पौर्णिमेस झाला असून त्याला आदिगुरू नाव देण्यात आलेले आहे.
ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा या नावाने सर्वत्र ओळखली जते. आदिगुरूंच्या अवतारामुळेच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे नाव दिले गेले असावे. रामनवमी, कृष्णाष्टमी याप्रमाणे गुरुपौर्णिमा असे नाव आदिगुरूंच्या ज्ञानदानाच्या क्षेत्रातील विशेष कार्यामुळे व्यासपौर्णिमा या नावानेहि ओळखली जाऊ लागली.

दत्तात्रेयांचा तेरावा अवतार शिवरूप, श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी झाला.

दत्तात्रेयांचा चौदावा अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस झाला असून त्याला देवदेव अथवा देवदेवेश्वर असे म्हणतात.

दत्तात्रेयांचा पंधरावा अवतार आश्विन शुद्ध पौर्णिमेस झाला असून त्याला दिगंबर हे नाव देण्यात आले.

सद्गुरू भगवान् श्रीदत्तात्रेय यांचा सोळावा अवतार कार्तिक शुद्ध द्वादशीस झाला असून तो श्रीकृष्णश्यामकमलनयन या नावाने ओळखला जातो.

असे हे दत्तात्रेय यांचे सोळा अवतार आहेत. या अवतारांची वर वर्णन केलेली चरित्रे ही दत्तात्रेयांचीच चरित्रे आहेत, हे भक्तजनांनी लक्षात घ्यावे.

भक्तजनांच्या सोयीसाठी आम्ही सोळाही अवतारांची चतुर्थ्यंत नावे खाली देत आहोत.
ॐ योगिराजाय नम: । ॐ अत्रिवरदाय नम: । ॐ दत्तात्रेयाय नम: । ॐ कालाग्निशमनाय नम:। ॐ योगिजनवल्लभाय नम: । ॐ लीलीविश्वंभराय नम: । ॐ सिद्धराजाय नम: । ॐ ज्ञानसागराय नम: । ॐ विश्वंभराय नम: । ॐ मायामुक्तावधूताय नम: । ॐ मायायुक्तावधूताय नम: । ॐ आदिगुरवे नम: । ॐ शिवरूपाय नम: । ॐ देवदेवाय नम:, अथवा देवदेवेश्वराय नम: ।  ॐ दिगंबराय अथवा दिगंबरावधूताय नम: । ॐ श्रीकृष्णश्यामकमलनयनाय नम: ।

याप्रमाणे नावे घेऊन त्या त्या अवताराची पूजा करावी. ‘द्रां’ हे दत्तात्रेयांचे मुख्य बीजाक्षर आहे. हा दत्तात्रेयांचा एकाक्षरी मंत्रहि आहे. अधिकारी लोकांनी ॐ च्या पुढे द्रां हे बीजाक्षर उच्चारून गुरूंनी उपदेशिल्याप्रमाणे वर दिलेल्या नमोंत नावाचा मंत्रजपहि करण्याची पद्धत आहे.

दत्तात्रेयप्रभूंच्या या अवतारांपैकी काही अवतार बारा महिन्यांचे अधिपति मानलेले आहेत. तो क्रम असा-

  • मार्गशीर्ष महिन्याचे अधिपति प्रत्यक्ष दत्तात्रेयच आहेत;
  • तर लीलाविश्वंभरदत्त हे पौष महिन्याचे अधिपति होत.
  • माघ महिन्याचे अधिपति सिद्धराज असून
  • ज्ञानसागर हे फाल्गून महिन्याचे अधिपति मानले जातात.
  • विश्वंभरदत्त चैत्र महिन्याचे अधिपति असून
  • मायाभक्त अवधूत हे वैशाख महिन्याचे अधिपति होत.
  • मायायुक्त अवधूत हे ज्येष्ठ महिन्याचे अधिपति मानले आहेत तर
  • महिन्याचे अधिपति आदिगुरू दत्तात्रेय होत.
  • श्रावण महिन्याचे अधिपति शिवरूप दत्तात्रेय असून
  • भाद्रपद महिन्याचे आधिपत्य देवदेवेश्वरांकडे आहे.
  • आश्विन महिन्याचे अधिपति दिगंबर अवधूत असून
  • योगिराज हे कार्तिक महिन्याचे अधिपति आहेत.
  • तसेच अधिक महिना असेल त्यावेळी त्या अधिक मासाचे अधिपति अत्रिवरद दत्तात्रेय हे समजावेत.

ज्या महिन्याचे जे अधिपति असतील त्यांचा नाममंत्र गुरुमुखातून घेऊन भोजनापूर्वी त्याचा जप करावा. याप्रमाणे बारा वर्षे अनुष्ठान करून तज्ज्ञ ब्राह्मणाकडून त्याचे उद्यापनही करावे अशी संप्रदायपद्धती आहे. हे वर्णन प. प. वासुदेवानंदसरस्वती महाराज यांच्या श्रीदत्तात्रेय षोडशावतार जयंतीकल्प या ग्रंथात आलेले आहे.​​​​​​

श्रीदत्तात्रेयांनी अवधूतरूपाने दर्शन दिल्यानंतर यदुराजाला, स्वत:च्या अखंडानंदाचे - परिपूर्ण आनंद स्वरूपाचे - कारण, त्यांना वेगवेगळ्या परंतु नित्य परिचयातीलच - चोवीस गुरूंपासून मिळालेले ज्ञान आहे; हे सांगितले. अशा सर्वज्ञ दत्तात्रेयांना ‘त्रैलोक्यगुरू’ म्हटले आहे. दत्तभक्त दासोपंत देशपांडे यांच्या अंबेजोगाई येथील ‘देवघर’ या मंदिरात, श्रीदत्तात्रेयांनीदेखील धारण केलेल्या सोळा अवतार, (निरनिराळ्या महिन्यात विशिष्ट मुहूर्तावर) त्यांच्या पंचधातूमध्ये घडविलेल्या सोळा मूर्ती आजही जतन केलेल्या आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध आहेत. दासोपंतांच्या कालखंडाच्या नंतर सुमारे तीन शतकानंतर श्रीदत्तात्रेयांच्या आज्ञेने सर्व जीवन आचरणाऱ्या प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामींनी अंबेजोगाईला काही दिवस राहून त्या परंपरेत उपलब्ध असलेल्या अवतारकथांच्या अनुरोधाने षोडशावतार चरित्रे संस्कृतमध्ये विधान-कथा रूपाने लिहिली. तथापि त्या अवतारांची ध्याने (मूर्ती) प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहेत, ही गोष्ट आजही अनेक श्रीदत्तसांप्रदायिकांना माहीत नाही; असे दिसते. योगायोगाने प. प. श्रीटेंबेस्वामी वाङमय पारायण मंडळाच्या पुणे व बडोदा निवासी सदस्यांना ८-९ वर्षांपूर्वी सर्व मूर्तींचे दर्शन व विधानानुसार पूजा एकाच वेळी करण्याचा भाग्यलाभ झाला !

तत्वज्ञानी संत: सर्वज्ञ दासोपंत

(१०० च्या वर ग्रंथ रचना करणारे तत्वचिंतक संत सर्वज्ञ दासोपंत)

अंबाजोगाईला आल्यावर प्रथम गावाबाहेरच्या नृसिंहाच्या देवळा जवळ. लगतच सर्वज्ञ दासोपंताची समाधी आहे. तिच्यासमोर प्रत्येक जण नतमस्तक होतो ते. दासोपंताचे वाडमयीन कर्तृत्व पाहून. पण पूर्वी समाधी दर्शनास. समाधी भोवती दगडी चौथरा व याभोवती भिंती आच्छादन आणि जाळीचा दरवाजा पुर्वी होता. आता त्यात बराचसा बदल झाला आहे. 

मराठवाड्याला लागून असलेल्या बिदर जिल्ह्यातल्या नारायणपेठचे दिगंबरपंत आणि पार्वतीबाई देशपांडे यांचे विवाहीत सुपूत्र म्हणजे दासोपंत वयाच्या सोळाव्या वर्षी घर सोडून हिलालपूर, नांदेड, माहूर अशा अनेक ठिकाणी फिरत राहिले. १५ वर्षानंतर गोदावरीच्या काठावर एका ठिकाणी पुन: पत्नी आणि इतर कुटूंबिय भेटले आणि त्यांनतर ते अंबाजोगाईला स्थायिक झाले. 

दत्तभक्त दासोपंतांनी दत्ताच्या पुजाअर्चेबरोबरच मराठी कवितेचीही उपासना सुरु केली. अंबाजोगाईला देशपांडे गल्लीत दासोपंतांचे देवघर आहे. थोरले देवघर व धाकटे देवघर अशी आज दिसणारी विभागणी नंतरच्या काळात झाली असावी. दासोपंतांच्या काव्यरचनेचे प्रयोजन दत्तभक्ती, भक्तांना उपदेश आणि तत्वज्ञानाचे विवरण-विवेचन असे तिन्ही असल्याचे दिसते. दासोपंताएवढे प्रचंड लेखन क्वचितज्ञ कोणी मराठी लेखकाने केले असेल का? त्यांच्या कितीतरी  ग्रंथाची नावे ज्ञात आहेत. काही लेखन मुद्रित स्वरुपात प्रसिध्द झाले असले तरी बरेचसे अद्याप हस्तलिखित स्वरुपात आहेत. अनेक ग्रंथांचा आकार अवाढव्य आहे. गितार्णवाचा अठरावा अध्याय वा. ल. कुलकर्णी आणि सुधीर रसाळांनी संपादित करुन विद्यापीठातर्फे प्रकाशित केला. त्यातीलच ओवी संख्या सोळा हजाराहून अधिक आहे. दासोपतांना रोज ढबू पैशाची शाई लागे असे म्हणतात. त्यावेळचा ढबू पैसा आकारानेच नव्हे तर किंमतीनेही चांगलाच ढब्बू होता. नाथकालीन कवी पंचकापैकी एक असलेल्या दासोपंतांच्या रचना प्रकाशात आणण्यासाठी त्यांच्या प्रमुख शिष्या पैकी मोहरीर तसेच विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनीही परिश्रम केले. ख्यातनाम कांदबरीकार हरि नारायण आपटे यांनी ईश, केन आणि कठ या उपनिषदावरील दासोपंतांचे भाष्य छापण्याचे ठरविले होते. ते बहुधा प्रसिध्द झाले असावे असे वाटते.दासोपंतांची सर्वात प्रसिध्द रचना म्हणजे पासोडी एका वस्त्रावर पंचीकरण लिहून काढले आहे. मराठीचे हे महावस्त्र न. शे. पोहनेरकरांनी संपादित केले. व मराठवाडा साहित्य परिषदेने ते प्रसिध्द केले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुराभी लेख पुर तत्व विभागाच्या वतीने देखील पासोडीचे पुनरमुद्रन करण्यात आले. पासोडी जतन करणार्‍यासही केंद्र सरकारने साह्य केले. आज ती अंबाजोगाईच्या थोरले देवघरात पहावयास मिळते. गेल्या काही वर्षापुर्वी दासोपतं संशोधन मंडळ अंबाजोगाईत स्थापन झाले कार्य सुरु आहे. अनेक युवक मंडळीचा त्यात सहभाग असल्याचे ही समजले दासोपंताचा गीतार्थबोध चंद्रिका हा ग्रंथ स्व.भगवंत देशमुखांनी संपादित केला. पुढील अध्याया बाबतच्या प्रकाशनाची मात्र माहिती मिळाली नाही. 

दासोपंतांनी अनेक मराठी व काही हिंदी, इतर भाषेतील पदे रचली. पासोडीवरील लेखनाला त्यांचे चित्र कौशल्य उपयोगी पडले, तसे पद रचनांना त्यांचे शास्त्रीय संगीताचे ज्ञान उपयोगी पडले आहे. दासोपंतांची पदे गोस्वामी, शिष्य देशपांडे, अ. दा. केसकर, यांनी प्रसिध्दही केली आहेत. त्यांच्या पदार्णवातली सोळाशे पदे काशिनाथ वामन लेल्यांनी बर्‍याच काळापूर्वी छापली होती. खुप पदे उपलब्ध नाहीत. मराठवाड्यातील सर्वच संतांच्या अशा पद रचनांचा चिकित्सक अभ्यास व्हावयाचा आहे. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती नवरात्र महोत्सावाची धुमधाम सुरु असते. पौर्णिमेस दत्तजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात दासोपंतांच्या देवघरात श्रध्दा आणि भक्तीने साजरा होतो. आर्थिक समृध्दी नसली तरी भक्ती समृध्दी कायम आहे. दासोपंतांच्या गोस्वामी घराण्यातले, डीघोळकर, मोहरीर, व इतर शिष्य सांप्रदायीक गायक पारंपारिक पध्दतीने दासोपंतांच्या रचना गात असतात. या निमित्ताने पुरातन पध्दतीमधील स्वर आणि तालाचे स्मरण होत असते. या निमित्ताने काही वर्षापासून सुरु असलेली अखंडीत परंपरा अबाधीत ठेवण्याचा हा प्रयत्न चालू आहे. हेच मोठे परिश्रमाचे कार्य आहे. असेच म्हणावे लागेल त्यांच्या साहित्याचा यज्ञ असाच चालू राहावा.

।। आनंदे दत्तात्रेय देवदेव ।।