श्रीदत्त क्षेत्र बासर
श्रीक्षेत्र बासर चे नाव घेतले की आपणास श्री सरस्वतीचे भव्य, दिव्य मंदिर डोळ्यासमोर उभे राहते. तसेच तेथील प्रवेशव्दारातील श्रीदत्तात्रेयांची सुंदर, लोभस मूर्ती पण डोळ्यासमोर येते. पण ह्या व्यतिरिक्त अजून ठिकाणे आहेत ज्यांना आपण अवश्य भेट देऊ शकतो.
१) श्री कालिका माता मंदिर - सरस्वती मंदिराचा वरील बाजूस आहे.
२) श्री व्यास महर्षी गुहा - सरस्वती मंदिराचा वरील बाजूस आहे.
३) श्री एकमुखी दत्त मंदिर - बासर गावाच्या दिशेला, सरस्वती मंदिराच्या उत्तरेस साधारणतः १.०० कि. मी.
४) श्री पाप हरेश्वर मंदिर - बासर गावाच्या दिशेला, सरस्वती मंदिराच्या उत्तरेस साधारणतः १.५० कि. मी.
५) वेद शिळा - बासर बस स्टॅन्डच्या बाजूला
६) श्री चिंतामणी गणेश मंदिर - बासर बस स्टॅन्ड ते सरस्वती मंदिर रोडवर.
७) गंगा लक्ष्मी मूर्ती - गोदावरी नदीचा घाट
मंदिर – बासर
हे एक पावन श्री दत्त क्षेत्र असून, ह्या व श्री क्षेत्र ब्रह्मेश्वर ठिकाणाची माहिती आपणास श्री गुरुचरित्रात अध्याय क्र. १३ व अध्याय क्र. १४ मध्ये आढळते.
श्री एकमुखी दत्त मंदिराची वैशिष्ट्ये
हे मंदिर श्री नरसिंहसरस्वती स्वामींचे अनुष्ठान ठिकाण होते. या पवित्र ठिकाणाच्या दोन आख्यायिका आहेत. श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांची पोटशूळाची व्यथा पोटभर जेऊ घालून दूर केली आणि श्री सायंदेवांचे प्राणांतिक संकट दूर केले. श्री सायंदेव हे एका यवनाधिपती कडे नौकरी करीत असत आणि एकेदिवशी श्री सायंदेवांना त्या यवनाधिपतीने देहदंड देण्यासाठी, वध करण्यासाठी बोलावले. त्यावेळी श्री सायंदेवांची आणि श्री नरसिंहसरस्वती स्वामींची भेट झाली. श्री सायंदेवानी त्यांची अडचण श्री नरसिंहसरस्वती स्वामींना सांगितली, श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी श्री सायंदेवांना अभय वाचन दिले व सांगितले की आपण निर्धास्त पणे यवनाधिपतीची भेट घ्या. आपल्या जीवास धोका होणार नाही. जोपर्यन्त आपण यवनाधिपतीची भेट घेऊन परत येत नाही तोवर आम्ही येथेच आहोत. श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी आज्ञा केल्या प्रमाणे श्री सायंदेव यवनाधिपतीची भेट घ्यायला गेले. जसे श्री सायंदेव यवनाधिपती च्या समोर गेले तसे त्या यवनाधिपतीला मरणांतिक हृदयशूळ चालू झाला. त्याला कळून चुकले की आपण चुकीचे काम करत आहोत, आणि मग त्याने श्री सायंदेवांची पायावर लोटांगण घेऊन माफी मागितली, त्यांना उत्तमोत्तम उपहार देऊन त्यांचा सत्कार करून त्यांची रवानगी केली. यवनाधिपती कडून निघून श्री सायंदेव, श्री नरसिंहसरस्वती स्वामींच्या दर्शनास गेले आणि सर्व वृत्तांत सांगितला.
असे हे श्री नरसिंहसरस्वती स्वामींच्या पदस्पर्श्याने पवित्र आणि पावन झालेले ठिकाण, श्री एकमुखी दत्त मंदिर, पण जिर्णोद्धारा अभावी थोडेसे दुर्लक्षित झालेले आहे. श्री क्षेत्र बासर ह्या ठिकाणी श्री सायंदेवांची कचेरी आणि श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांना पोटभर जेऊ घालून श्री नरसिंहसरस्वती स्वामींच्या कृपेने श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांची पोटशूळ व्यथा गेली ते घर होते. पण आता ह्या वास्तू काळाच्या ओघात अस्तित्वात नाहीत.
श्री पाप हरेश्वर मंदिर – बासर
हे एक पुरातन सुंदर शिव मंदिर असून, छोट्याश्या टेकडीवर आहे. संपूर्ण दगडात, काळ्या पाषाणात बांधलेले असून मंदिराची तशी उंची कमीच आहे. खाली वाकून, नतमस्तक होऊनच आत जावे लागते. आजूबाजूचा परिसर झाडांमुळे पूर्ण पणे हिरवागर्द आणि मनाला प्रफुल्लित करणारा आहे.
वेद शिळा – बासर
ही एका दगडावर ठेवलेली एक मोठी शिळा असून, तिच्या एका बाजूस एका व्यक्तीने जर छोट्या दगडाने मारल्यास / ठोकल्यास आणि दुसर्याने दुसऱ्या बाजूस त्या शिळेला कान लावून ऐकल्यास आतून भांड्यांचा आवाज आल्या सारखे भासते. दोन भांडी एकमेकांवर आदळल्यावर जसा आवाज येतो तसाच आवाज येथून ऐकण्यास मिळतो.
श्रीक्षेत्र ब्रह्मेश्वर
ब्रह्मदेवाने त्रेता युगात स्थापन केलेले शिवलिंग म्हणजेच ब्रह्मेश्वर. येथील मंदिर व मुख्य गाभारा हे १६०० वर्षापूर्वीचे बांधकाम आहे. मंदिरासमोरील दगडी मंडप हा सुमारे ९०० वर्षे जुना आहे. ब्रह्मेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिरल्याबरोबर श्री दत्त मंदिर आहे त्यामुळे येथे खुप सकारात्मक लहरी व स्पंदने जाणवतात. हे मंदिर सगळ्या गोंगाटापासून, गर्दीपासून दूर व गोदावरी नदीच्या काठी शांतपणे उभे आहे.
ब्रह्मेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये
१) या पवित्र ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी १५ दिवस अनुष्ठान केले होते अशी मान्यता आहे.
२) प्रभू श्रीराम व सीतामाई वनवासात असताना ह्या ठिकाणी त्यांचे २ ते ३ दिवस वास्तव्य होते अशी मान्यता आहे.
३) श्री आदिशंकराचार्यानी ह्या पावन भूमीत येऊन दर्शन घेतले होते अशी मान्यता आहे.
४) येथे गोशाळा पण आहे.
गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक १३ व १४ मध्ये उल्लेख केलेले ब्राह्मण श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकर या मंदिरात रोज पूजा अर्चना करत, ज्यांना पोटशूळाची व्यथा होती. पोटशुळाच्या व्यथेला त्रस्त होऊन ते एक दिवस गोदावरी नदीत जलसमाधी घेण्यासाठी जात असताना महाराजानी पाहिले व त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्यांना बोलावून घेतले. श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांचे दुःख समजून घेऊन त्यांनी श्री सायंदेवाना सांगितले की ह्यांना आपल्या घरी नेऊन पोटभर जेऊ घाला मग ह्यांची पोटशूळाची व्यथा जाईल.
येथील गोदावरी नदीच्या पात्रात श्रीरामांनी आणि श्री परशुरामांनी स्थापन केलेले वाळूचे शिवलिंग आजही अस्थित्वात आहे. ज्याचे दर्शन भक्तांना फक्त पाणी ओसरल्यावरच घेता येते, इतर वेळी ते पाण्याखाली गेलेले असते. ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीच्या सौंदर्याला कुठल्याही आभूषणांची गरज भासत नाही त्या प्रमाणे गोदावरी नदीच्या ब्रह्मेश्वर येथील पात्राचे सौंदर्य वर्णन करतांना माझे शब्द अपुरे पडतात. येथील निसर्गाची मनमुराद उधळण - वृक्ष, पाणी, पक्षी व प्राणी मनाला खूप प्रसन्नता देतात. त्यामुळे आपली पाऊले परत फिरण्यास नकार देतात.
ब्रह्मेश्वर (अब्दुल्लापूर, तेलंगणा) हे ठिकाण श्री क्षेत्र बासर (तेलंगणा) पासून सुमारे ३५ कि. मी. आहे. पूर्वी येथील रस्ते अतिशय खराब होते पण आता चांगले झाले आहेत. येथे जाण्यासाठी थेट बस नाही, आपल्या वाहनातून अथवा श्री क्षेत्र बासर (तेलंगणा) पासून रिक्षाने जाता येते. येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था अजून झालेली नाही.