जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५
कार्यकाळ: १८२५ - १८७१
गुरु: दत्तात्रय
समाधी: १८ फेब्रुवारी १८७१
विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक
विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी. विष्णुबाबा भावंडांमध्ये दहावे. ते पाच वर्षांचे असतांना वडील गेले. तरीदेखील एक वर्ष वेदाध्ययन करता आले. त्याच काळात लेखन, वाचन, हिशेब करणे असे जीवनावश्यक शिक्षणही मिळाले. त्यात अक्षर अतिशय सुंदर! ह्या एवढया शिदोरीवर अवघ्या नवव्या वर्षी त्यांना त्या काळांत जमीन-महसूल खात्यात नोकरी मिळाली. पण आईने नोकरी सोडावयास लावून त्यांना पुन्हा घरच्या शेतीत आणि गाईगुरांना रानात चारण्यासाठी नेण्याचे काम करण्यास सांगितले. मात्र विष्णुबुवा फार काळ ह्या कामात रमले नाही. कोणाला न सांगता घर सोडून ते महाडला एका किराणा दुकानात नोकरी करु लागले. त्याच काळात सरकारी नोकरीसाठी आवश्यक ती परीक्षा देऊन साष्टी तालुक्यात कस्टम खात्यात रुजू झाले. सात वर्षांच्या नोकरीच्या काळात ते अनेक ठिकाणी फिरले.
हे करीत असतानाही त्यांची धार्मिक वृत्ती सतत सजग होती. एवढया लहान वयातही कीर्तन-प्रवचनें, पूजा-अर्चा नेमाने करीत असत. कधी ना कधी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणारा गुरु मिळेल अशी त्यांना आशा वाटत असे. आत्मज्ञानाची त्यांची भूक काही शमेना. दुसरीकडे धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण, मनन चालूच होते. ह्या विषयातील त्यांची प्रगती एकलव्याप्रमाणे होत होती. अखेर व्यावहारिक जीवनाचा कंटाळा येऊन त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी नोकरी सोडली. घर त्यागले. पुन्हा गुरुप्राप्तिसाठी पुष्कळ हिंडूनही निराशाच पदरी आली. शेवटी सप्तशृंगीच्या डोंगरावर स्वतःच्या मनानेच घोर तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.
ह्या आत्मसाक्षात्काराचा लाभ सर्व समाजालाही व्हावा, संपूर्ण हिंदु समाजाचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ख्रिश्चनांच्या धार्मिक अतिक्रमणाने ते अस्वस्थ झाले. त्यांनी ह्या धर्मांतरविरोधात लढा देण्यास सुरुवात केली. लेख लिहून आणि भाषणे करून ते ख्रिस्तीधर्मातील दोष लोकांना दाखवून देऊ लागले. त्यांच्या ह्या कार्याला उदंड प्रतिसाद मिळत गेला. उदंड म्हणजे किती? तर त्यांना व्याख्यानाला जागा कमी पडू लागली. 'कुठलीही शंका घेऊन या, मी त्या शंकांचे निरसन करण्यास समर्थ आहे' ह्या त्यांच्या आश्वासकतेमुळे लोकांना धीर आला.
समाजाची उन्नती होण्यासाठी स्त्री मुक्तीची आवश्यकता आहे. त्याचवेळी स्त्रीशिक्षणाची जोडही दिली जाणे गरजेचे आहे. हा विचार समाज मनावर त्यांनी प्रथम बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरीनेच स्त्रीचा विवाह तिच्या अनुमतीने व्हावा, तो योग्य वयात व्हावा. पती-पत्नींमध्ये वयाचे अंतर फार नसावे, तीस वर्षांवरील गृहस्थाने विधवेशीच लग्न करावे. सतीप्रथा पूर्णतः बंद होणे गरजेचे आहे, विधवा विवाह होणे आवश्यक आहे. जाती किंवा वर्ण जन्मावरुन न ठरविता कर्मावरुन ठरविणे योग्य ठरेल, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावयास हवे. असे अनेक क्रांतिकारक विचार त्यांनी सतत सोळा वर्षें आपल्या व्याख्यानांमधून समाजासमोर मांडले.
१८७१ मध्ये ह्या जगाचा निरोप घेतला.
विष्णुबोवा ब्रम्हचारी (इ.स.१८२५ ते १८७१) हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत व धर्मसुधारक होते. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. ते रायगड जिल्ह्यातील शिरवली या गावचे राहणारे होते. यांचे वडील लहानपणीच गेले. मौजीबंधन व थोडे वेदाध्ययन झाल्यावर त्यांनी आईच्या सांगण्यावरून शेती केली, गुरे राखली. नंतर ते महाडला आले. नंतर संगमेश्वर येथे काही काळ कस्टम खात्यात नोकरीही केली. नंतर तीही नोकरी सोडली. ते साधु-संतांबरोबर खूप भटकले. त्यांनी कथा-कीर्तने ऎकिली. वयाच्या तेवीसाव्या वर्षीच त्यांनी सर्वसंगपरित्याग केला. त्यांनी विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध, बोधसागर इत्यादी ग्रंथांचे सखोल वाचन व चिंतन केले. नंतर ते सप्तशृंगी गडावर जाऊन राहिले. कंदमुळे खाऊन तपस्या केली. त्यांना आत्मज्ञान झाले.
विष्णुबोवांचा प्रथमत: भर व्याख्यानांवर होता. नंतर त्यांनी ग्रंथलेखन केले. वेदोक्त धर्मप्रकाश, भावार्थसिंधु, चतु:श्लोकी भागवताचा मराठीत अनुवाद, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, बोधसागर असे पाच ग्रंथ प्रसिध्द आहेत. भगवद्गीतेवरील ‘सेतुबंधिनी टीका’ ही अपूर्ण राहिली.
तो ब्रिटिश राज्याचा काळ होता. ख्रिश्र्चन मिशनरी अनेक प्रकारे हिंदुधर्मावर टीका करीत आणि औषधे देऊन, शाळा काढून, कधी विहिरीत पाव टाकून हिंदूंना ख्रिश्र्चन धर्मात ओढीत. त्यांच्याच पध्दतीने ही लाट परतविण्याचे प्रयत्न केले. त्यांनी ख्रिश्र्चन धर्मातील वैगुण्यांवर व्याख्यानांची झोड उठविली. त्यांचे खंडन-मंडन आवेशपूर्ण असे. त्यांच्या सभा मुंबईस चौपाटीवर होत; कारण त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी होत असे.
जातिभेदाबद्दलही त्यांची मते विलक्षण क्रांतिकारक होती. जाती कार्यावरून ठरतील, आणि वर्ण ‘गुणधर्मावरून’ ठरेल. एकाच पित्याची चार मुले चार वर्णाची असू शकतील! कारण ‘वर्ण’ गुणावरूनच ठरतो. जो सत्वगुणयुक्त आहे व धर्ममार्ग दाखविण्यास समर्थ आहे, त्यास ब्राम्हण म्हणावे. अशा ब्राम्हणांनी आदिवासींना ज्ञान द्यावे व उन्नत करावे अशी त्यांची विचारसरणी होती. इंग्रजी राज्यामुळे कारखानदारी सुरू झाली. यंत्रयुग सुरू झाले. त्यामुळे नवाच कामगारवर्ग निर्माण झाला. विष्णुबोवा ब्रम्हचारी यांनी ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ लिहून कार्ल मार्क्सच्या कितीतरी वर्षे आधी समाजवादी समाजरचनेबद्दलचे विचार मांडले आहेत. ते म्हणतात, ‘खाजगी संपत्ती हेच सर्व दु:खांचे व गुन्ह्यांचे उत्पत्तिस्थान आहे. म्हणून सर्व प्रजा एक कुटुंब मानावी. गावाची सर्व जमीन सर्वांची मानावी. सर्वांनी कष्ट करावेत. गावाची कोठारे असतील, त्यातून गरजेप्रमाणे धान्य, कापड इत्यादी न्यावे.’
विष्णुबोवांनी ‘सेतुबंधिनी’ नावाची गीतेवर टीका लिहिली आहे. ही टीका गीता अध्याय १८, श्लोक १७ पर्यंत लिहिली गेली; पुढील टीका त्यांच्या एका शिष्याने पुरी केली. ही टीका इ.स. १८७० च्या सुमारास लिहिली- पण १९८० ला प्रकाशित झाली. या टीकेचे वैशिष्टय म्हणजे ती गद्य स्वरूपात व तत्कालीन ज्ञात वैद्यानिक परिभाषेत लिहिली आहे. वैद्यानिक परिभाषेत लिहिलेली ही पहिलीच टीका मानावी लागेल. या टीकेतही इंग्रजी राज्य व ख्रिश्र्चन धर्म यावर परखड मते मांडली आहेत.
विष्णुबोवा ब्रम्हचारी यांनी १८ फेब्रुवारी १८७१ या दिवशी मुंबई मुक्कामी देह ठेवला.
अव्वल इंग्रजीच्या काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विरुद्ध चळवळ उभारून हिंदू धर्माची बाजू मांडणाऱ्या विष्णू भिकाजी गोखले यांच्या कार्यामागे श्रीदत्तात्रेयांची प्रेरणा होती. यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील शिरवली गावी झाला. घरच्या गरिबीमुळे यांना शिक्षण फारसे घेता आले नाही. तालुका कचेरीत, भुसार मालाच्या दुकानात, कस्टम खात्यात यांना नोकरी करावी लागली. वयाच्या तेविसाव्या वर्षी हे आत्मसाक्षात्कारासाठी घराबाहेर पडून सप्तशृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या करीत राहिले. यांनी आपल्या संक्षिप्त आत्मवृत्तात लिहिले आहे,
‘मी लग्न केले नाही, या कारणावरून व माझ्या वर्तणुकीवरून मला ब्रह्मचारीबाबा म्हणतात;
…. लहानपणापासून मला वेदोक्त धर्मांचा विचार करण्याची सवय होती. पुढे माझ्या वयाचे विसावे वर्षी मला ईश्वराकडून साक्षात्काराद्वारा सूचना झाली. नंतर मी आपले वयाची तेवीस वर्षे, आठ महिने, तेवीस दिवस झाल्यावर कौपीन धारण करून एकान्तविचार करण्याकरिता सप्तशृंगीच्या डोंगरावर व आजूबाजूच्या अरण्यात वगैरे गेलो. त्या ठिकाणी निर्मनुष्य स्थलावर काही वर्षे, मास, दिवस भक्ती करून निवास केला.’ यानंतर आपणांस आत्मसाक्षात्कार कसा झाला, दत्तात्रेयांचा वर कसा मिळाला, हे सांगताना विष्णुबुवांनी म्हटले आहे; ‘मला आत्मप्राप्तीच्या उत्कंठतेमुळे व विचारामुळे ईश्वराचा साक्षात्कार होऊन आत्मज्ञानप्राप्ती झाली. पहा, मला ईश्वरावाचून सद्गुरू कोणी मिळाला नाही.’ विष्णुबुवांची चांगल्या गुरूशी भेटच झाली नाही. बहुतेक सर्व अज्ञानी व ढोंगी भेटले. कोणी जादूच्या, कोणी किमयेच्या, कोणी विषयाच्या छंदात होते, तर कोणी द्रव्यलोभी होते. म्हणून त्यांनी सप्तशृंगीच्या डोंगरावरील एकान्तवास पत्करला. ‘ईश्वरावर भरवसा ठेवून अरण्यासंबंधी कंदमूलभक्षण करून, निर्झरोदक पान करून गुहेत वगैरे ठिकाणी निर्मनुष्य स्थळी नग्न राहून अवधूत राहिलो आणि वेदान्त विचार, ध्यानधारणा अतिशय केली. तेणेकरून ईश्वराने दयाळूपणाने मला अनुभविक आत्मज्ञानी करून उपदेश करण्याची आज्ञा केली. म्हणून मी उपदेश करीत फिरत आहे.’
विष्णुबुवांनी नाना प्रकारचे भलेबुरे अनुभव घेतले. नाना मतमतांतरे तपासली. परंतु त्यांत त्यांचे मन रमले नाही. त्यांना साक्षात् ईश्वरी कृपेचे वरदान मिळाल्याची हकीकत ऐकण्यासारखी आहे. ते म्हणतात, ‘मला हजारो मनुष्यांच्या सभेत ज्या ज्या इसमास जे जे पाहिजे, तेच सुचते. हाच काय तो माझ्यात गुण आहे. तो मला दत्तात्रेयांचा वर आहे. मला प्रश्नाबरोबर तत्काळ आणि जलद उत्तर देऊन समाधान करता येते… मला दत्तात्रेयांचा वर आहे; त्यामुळे बोलण्यात कोणी जिंकील असे नाहीच नाही.’ ज्या दत्तात्रेयांनी त्यांना वर दिला त्यांना उद्देशून ते आपल्या आत्मवृत्तात म्हणतात; ‘हे ईश्वरा, तू मला अरण्यात शंकर-पार्वती रूपाने अनेक वेळा दर्शन देऊन आज्ञा दिलीस की, माझ्या वेदोक्त विषयात ज्या तारक गोष्टी आहेत त्या लोकांच्या मनात ठसवून दे; कारण की त्या गोष्टींचा लोप झाला आहे. त्या तू सांगितलेल्या गोष्टी मी जगात प्रकट केल्या आणि ह्या वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथात व भावार्थसिंधू ग्रंथात लिहून सर्वांस दिल्या. या गोष्टी ऐकून सर्वांचे अंत:करणात ज्ञान उद्भूत व्हावे याविषयी तुझी कृपादृष्टी सर्वांकडे व्हावी. हे ईश्वरा, बापा, तू दत्तात्रेय अवताररूपाने दर्शन देऊन बोललास की, तू जगात तारक उपदेश कर. पण त्या वेळेस मी बोललो की, मला संस्कृत भाषा येत नाही. मग तू हास्यवदन करून बोललास की जा, विष्णू, तू सहज भाषण करशील. तोच वेदगर्भीचा परमसिद्धांत होईल. त्याप्रमाणे या जगात मी बोलतो आणि सर्व पोकळीत तुझे ज्ञानरूपी कान आहेत म्हणून तू ऐकतोस.’
याप्रमाणे परमतखंडण करून वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी दत्तात्रेयांकडून विष्णुबुवांनी प्रेरणा मिळाली. पंढरपूर, सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे, नगर, मुंबई इत्यादी ठिकाणी त्यांचे प्रचारकार्य चाले. भावार्थसिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, चतुश्लोकी भागवत याचा अर्थ, सहजस्थितीचा निबंध, सेतुबंधनी टीका इत्यादी त्यांच्या ग्रंथांतून त्या काळच्या मानाने खूपच प्रगत व क्रांतिकारक विचार आहेत. ‘सर्व प्रजा एक कुटुंब आहे’ अशा विचाराचा विस्तार त्यांनी केला. फारसा शास्त्रीय आधार नसला तरी बावांचे साम्यवादी विचार आजही चकित करणारे आहेत.