शंकर व पार्वती माता संवादातून प्रकट झालेली ही गुरुगीता समग्र स्कंदपूरणाचा सारांश आहे.
भगवान शंकर सांगतात. हे प्रिये! वेद, शास्त्रे, पुराणे, इतिहास आदी मंत्र यंत्र, मोहन, उच्चाटन आदी विद्या, शैव शाक्त, आगम आणि अन्य सर्व मत-मतांतरे, या सर्व गोष्टी गुरुतत्व जाणल्या वीणा भ्रांत चित्ताच्या जीवांना पथभ्रष्ट करणाऱ्या आहेत आणि जप, तप, व्रत, यज्ञ, दान ही सर्व व्यर्थ होतात. हे सुमुखी! आत्म्यामध्ये गुरुबुद्धिशिवाय अन्या काहीही सत्य नाही. सत्य नाही म्हणूनच हे आत्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी बुद्धिमानांनी प्रयत्न केला पाहिजे. ज्या गुरुदेवांच्या पाद सेवनाने मनुष्य सर्व पापांपासुन विशुद्धआत्मा होऊन ब्रह्मरूप होतो,ते तुझ्यावर कृपा करण्यासाठी सांगत आहे. श्री गुरुदेवांचे चर णामृत पापरूप चिखलाचे संम्यक शोषक आहे,ज्ञानतेजाचे सम्यक उद्दीपक् आणि संसार सागराचे साम्यन्क तारक आहे. अज्ञानाचे मूळ उखडून टाकणाऱ्या, अनेक जन्माच्या कर्माचे विवरण करणाऱ्या ज्ञान आणि वैराग्य सिद्ध करणाऱ्या श्रीगुरुदेवांच्या चरणामृताचे पान केले पाहिजे. आपल्या गुरुदेवांच्या नामाचे कीर्तन अनंतस्वरूप भगवान शिवाचेच कीर्तन होय. गुरुदेवांचे निवासस्थान काशी क्षेत्र आहे. श्री गुरुदेवांचे पादोदक मा भगवती गंगाजी आहे. गुरुदेव हे भगवान विश्वनाथ आहेत आणि निश्चितच साक्षात तारक ब्रम्ह आहेत. गुरुदेवांची सेवाच तीर्थराज गया आहे. गुरुदेवांचे शरीर हे अक्षय वटवृक्ष आहे. गुरुदेवांचे श्रीचरण भगवान विष्णूचे श्री चरण आहेत. तेथे लावलेले मन तदाकार होऊन जाते. आपले आश्रम (ब्राम्हचर्यश्रमादी) जाती, कीर्ती (पदप्रतिष्ठा), पालन-पोषण, हे सर्व सोडून गुरुदेवांचाच सम्यक आश्रय घेतला पाहिजे. विद्या गुरुदेवांच्या मुखात राहते आणि ती गुरुदेवांच्या भक्तीनेच प्राप्त होते. ही गोष्ट तिन्ही लोकी देव, ऋषी, पितृ आणि मानावाद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे.
- ‘गु' शब्दाचा अर्थ आहे अंधः कार (अज्ञान) आणि ‘रु’ शब्दाचा अर्थ आहे प्रकाश (ज्ञान) अज्ञान नाहीसे करणारा जो ब्रम्हरूप प्रकाश आहे तो गुरु आहे यात काही संशय नाही.
- 'गु' कार अंधः कार आहे आणि त्याला दूर करणारा 'रु' कार आहे. अज्ञानरूपी अंधः काराला नष्ट करतात म्हणूनच गुरु म्हणले जातात.
- 'गु'कार म्हणजे गुणातीत होय.' रु 'कार म्हणजे रूपातीत होय. गुण आणि रूप यांच्यापेक्षा वेगळे असल्यानेच "गुरु " म्हणले जातात.
- ('गुरु' शब्दाचे)अक्षर ‘गु’ कार माया आदि गुणांचे प्रकाशक आहे आणि दुसरे अक्षर 'रु'कार मायेच्या भ्रांतीपासून मुक्ती देणारे परब्रम्ह आहे.
- गुरु सर्व श्रुतिरुप श्रेष्ठ रत्नांनी सुशोभित चरणकमलांचे आहेत आणि वेदांताच्या अर्थाचे प्रवक्ता आहेत. म्हणून श्री गुरुदेवांची पूजा केली पाहिजे.
- ज्यांच्या केवळ स्मरणानेच ज्ञान आपोआप प्रकट होऊ लागते आणि तेच सर्व (शम, दामादी) संपदारूप आहेत, म्हणून श्री गुरुदेवांची पूजा केली पाहिजे.
- संसाररूपी वृक्षावर चढलेले लोक नरंकरूपी सागरात पडतात त्या सर्वांचा उद्धार करणाऱ्या श्री गुरुदेवांना नमस्कार असो.
- जेव्हा बिकट परिस्थिती उपस्थित होते तेव्हा तेच एकमेव परम बांधव आहेत आणि सर्व धर्माचे आत्मस्वरूप आहेत अशा गुरुदेवाना नमस्कार असो.
- संसाररूपी अरण्यात प्रवेश केल्यानंतर दिग्मूढ स्थिती मध्ये (जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही) चित्त भ्रमित होते, त्यावेळी ज्यांनी मार्ग दाखविला त्या श्री गुरुदेवांना नमस्कार असो.
- या पृथ्वीवर त्रिविध तापरूपी (आधि-व्याधी-उपाधी) अग्नीने जळाल्यामुळे अशांत झालेल्या प्राण्यांसाठी गुरुदेवच एकमेव उत्तम गंगाजी आहेत,अशा श्रीगुरुदेवांना नम स्कार असो.
- साता समुद्रा पर्यंतच्या सर्व तिर्थामध्ये स्नान जे फळ मिळते ते फळ श्री गुरुदेवांच्या चरण।मृताच्या एका बिंदूच्या फळाचा हजारावा हिस्सा आहे.
- जर भगवान शंकर नाराज झाले तर गुरुदेव वाचविणारे आहेत,परंतु गुरुदेव नाराज झाले तर वाचविणारा कोणी नाही. म्हणून गुरुदेवांचे स्मरण करून नेहमी त्यां च्या आश्रयात राहिले पाहिजे.
- हे प्रिये ! गुरु हेच त्रिनेत्ररहित (दोन नेत्र असलेले) शिव आहेत, दोन हात असलेले भगवान विष्णू आहेत आणि एक मुख असलेले ब्रम्हदेव आहेत.
- देव, किन्नर, गंधर्व, पितृ, यक्ष, तुंबरू (गंधर्वांचा एक प्रकार) आणि मुनिलोक देखील गुरुसेवेचा विधी जाणत नाहीत.
- तार्किक, वैदिक, ज्योतिषी, कर्मकांडी आणि लौकिक जन निर्मळ गुरुतत्व जाणत नाहीत.
- तप आणि विद्येच्या बळामुळे आणि महा अहंकारामुळे जीव या संसारात राहाटा प्रमाणे सतत फिरत राहतो.
- गुरूंच्या सेवेपासून विमुख झालेले गंधर्व, पितृ, यक्ष, चारण, ऋषी,सिद्ध आणि देवता आदी देखील मुक्त होणार नाहीत.
जे ब्रह्मनंद स्वरूप आहेत, परमंसुख देणार आहेत, जे केवळ ज्ञानस्वरूप आहेत, (सुख-दुःख, शीत-उष्ण आदी) द्वंद्वापासून रहित आहेत, अकाशास मान सूक्ष्म आणि सर्व व्यापक आहेत. तत्वमसी आदी महवाक्यांचे लक्ष्यार्थ आहेत, एक आहेत, नित्य आहेत, मतरहित आहेत. अचल आहेत, सर्वबुद्धीचे साक्षी आहेत, भावनेच्या पलीकडचे आहेत, सत्व,रज आणि तम् या गुणांनी रहित आहेत अशा गुरुदेवाना नमस्कार. श्री गुरुदेवांच्या द्वारे उपदिष्ट मार्गाने मनाची शुद्धी केली पाहिजे. ज्या कोणत्याही अनित्य वस्तु आपल्या इंद्रियांचा विषय होतील,त्याचे खंडन किंवा निराकरण केले पाहिजे. करूणारूपी तलवारीच्या प्रहाराने शिष्यांच्या आठही पाशांना (संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान आणि संपत्ती) तोडून निर्मळ आनंद देणार्याला सद्गुरू म्हणतात. असे ऐकल्यावर देखील जो मनुष्य गुरुनिंदा करतो तो मनुष्य जोपर्यंत सूर्य-चंद्र यांचे अस्तित्व आहे तो पर्यंत नरकात राहतो. हे देवी ! देह कल्पाच्या अंतापर्यंत राहिल तोपर्यंत श्री गुरुदेवांचे स्मरण केले पाहिजे आणि आत्मज्ञानी झाल्यावरही (स्वच्छन्द अर्थात स्वरूपाचा छंद मिळाल्यानंतरही) शिष्याने गुरुदेवांचे चरण सोडता कामा नये. श्री गुरुदेवांच्या समक्ष प्रज्ञावान शिष्याने कधी हुंकार शब्दाने (मी असे केले, मी तसे केले) बोलता काम नये. कधीही असत्य बोलू नये.
- गुरुदेवांसमोर जो हुंकार शब्दाने बोलतो अथवा गुरुदेवांशी जो एकेरी भाषेत बोलतो तो निर्जन मरू भूमीत ब्रम्ह् राक्षस होतो.
- सर्वदा आणि सर्व अवस्थांमध्ये अद्वैताची भावना केली पाहिजे परंतु गुरुदेवांशी अद्वैताची भावना कदापिही करता काम नये.
- जोपर्यंत दृश्यप्रपंचाची विस्मृती होतनाही तो पर्यंत गुरुदेवांच्या चरणांची पूजा केली पाहिजे.
श्री गुरुगीता
(श्रीजगद्गुरु श्रीशंकर आणि जगन्माता पार्वतीदेवी ह्यांचा सिद्ध-साधक स्वरूपातील संवाद. ज्याद्वारे त्यांनी जगाला मोक्षाचा मार्ग समजावून दिला.)
सूत उवाच । कैलासशिखरे रम्ये, भक्तिसंधान-नायकम् । प्रणम्य पार्वती भक्त्या, शंकरं पर्युपृच्छत ॥१॥
रम्य अशा कैलास शिखरावर, भक्तीचे साधन सांगण्यात कुशल असलेल्या श्रीशंकराला, भगवान शिवाला, भक्तीपूर्वक नमस्कार करून मोठ्या भक्तिभावाने पार्वतीने प्रश्न विचारला.
श्रीदेव्युवाच । ॐ नमो देवदेवेश, परात्पर जगद्गुरो । सदाशिव महादेव, गुरुदीक्षां प्रदेहि मे ॥२॥
पार्वतीदेवी म्हणाली, हे देवांच्या देवा, परात्पर म्हणजे महानाहून महान अशा सद्गुरो, तुला प्रणाम ! सदा कल्याणप्रद शिवा, सर्व स्थळ, काळ व्यापून असणाऱ्या महादेवा, मला गुरुदीक्षा द्यावी. ॥२॥
केन मार्गेन भॊ स्वामिन्, देही ब्रह्ममयो भवेत् । त्वं कृपां कुरु मे स्वामिन्, नमामि चरणौ तव ॥३॥
हे स्वामिन्, देहधारी असूनही कोणत्या मार्गाने गेले असता ब्रह्ममय होता येईल ते कृपा करून सांगावे. हे स्वामी, हे गुरुदेव, मी आपल्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करते. ॥३॥
ईश्वर उवाच । ममरूपासि देवी त्वं, त्वत्प्रीत्यर्थं वदाम्यहम् । लोकोपकारकः प्रश्नो, न केनापि कृतः पुरा ॥४॥
हे देवि, तू माझेच दिव्य रूप, स्वरूप आहेस. तू प्रसन्न व्हावीस म्हणून सांगतो. सर्व लोकांना उपकारक असा हा प्रश्न पूर्वी कोणीही केला नाही. ॥४॥
दुर्लभं त्रिषु लोकेषु, तच्छृणुष्व वदाम्यहम् । गुरुं विना ब्रह्म नान्यत्, सत्यं सत्यं वरानने ॥५॥
हे श्रेष्ठ पार्वती ! तिन्ही लोकांत दुर्लभ असे गुरुतत्त्व मी सांगतो ते ऎक. श्रीगुरुच सदोदित ब्रह्म होय. श्रीगुरुशिवाय दुसरे ब्रह्म नाही. हे सत्य मी तुला द्विरुक्तीने सांगतो. ॥५॥
वेदशास्त्रपुराणानि इतिहासादिकानि च । मंत्रयंत्रादिविद्याश्च, स्मृतिरुच्चाटनादिकम् ॥६॥
वेदशास्त्रे, पुराणे, इतिहास इ. तसेच मंत्रयंत्रादि विद्या, स्मृतिउच्चाटन, तीर्थ, व्रत, तप, साधना कितीही घडली तरी संसारबंधनातून मुक्तता होत नाही. ॥६॥
शैवशाक्तागमादीनि, अन्यानि विविधानि च । अपभ्रंशकराणीसह, जीवानां भ्रांतचेतसाम् ॥७॥
शैव, शाक्त, शास्त्रे, आणि इतर विविध पंथ चित्तभ्रांत जिवांना चुकीचा समज गैरसमज करून देण्यास मात्र कारणीभूत होतात. ॥७॥
यज्ञो व्रतं तपो दानं, जपरतीर्थं तथैव च । गुरुतत्त्वमविज्ञाय, मूढास्ते चरते जनाः ॥८॥
यज्ञ, व्रत, तपश्चर्या, दानधर्म, जप, तीर्थयात्रा करणारे लोक जोवर गुरुतत्त्व जाणत नाहीत तोपर्यंत मूर्खासारखे भटकतात, वागतात. ॥८॥
गुरुबुद्धयात्मनो नान्यत् सत्यं सत्यं न संशयः । तल्लाभार्थ प्रयत्नस्तु, कर्तव्यो ही मनीषिभिः ॥९॥
ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरू भिन्न नाही. गुरुविषयी पूज्य बुद्धी, श्रद्धा असली की मग गुरुभक्ताला दुसरे काही कर्तव्य नाही, हे अगदी खरे (द्विवार सत्य) होय. ॥९॥
गूढविद्या जगन्माया, देहे चाज्ञानसंभवा । उदयः स्वप्रकाशेन, गुरुशब्देन कथ्यते ॥१०॥
ह्या देहात अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रूपात राहाते. आत्मप्रकाश वा आत्वविकासाने ज्ञानाचा उदय होतो. गुरू शब्दाने तो उदय दर्शविला जातो. सद्गुरू स्वयंप्रकाशी असतो. ॥१०॥
सर्वपापविशुद्धात्मा, श्रीगुरोः पादसेवनात् । देही ब्रह्म भवेद्यस्मात्, तत्कृपार्थं वदाभि ते ॥११॥
श्रीगुरुचरणाच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांपासून शुद्ध होऊन जाते. त्यामुळे देहधारी जीव ब्रह्मरूप बनतो. त्या गुरुकृपेचे तत्त्व, तुझ्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून मी तुला कथन करतो. ॥११॥
गुरुपादांबुजं स्मृत्वा, जलं शिरसि धारयेत् । सर्वतीर्थावगाहस्य, संप्राप्नोति फलं नरः ॥१२॥
श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून मस्तकावर पाणी ओतले असता म्हणजेच स्नान केले असता (चरणतीर्थ मस्तकी धारण केल्यास), सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला मिळते. सद्गुरुचरणतीर्थ निरंतर सर्व तीर्थांचे माहेर होय. ॥१२॥
शोषणं पादपंकस्य, दीपनं ज्ञानतेजसाम् । गुरुपादोदकं सम्यक्, संसारार्णवतारकम् ॥१३॥
श्रीगुरुचरणतीर्थ पापरूपी चिखलाला सुकविणारे, पापहारक आहे. ज्ञानरूपी तेजाला उज्ज्वल, अधिक प्रकाशित करणारे, ज्ञानवर्धक आहे. संसारसागरातून पार करणारे तारक आहे. ॥१३॥
अज्ञानमूलहरणं, जन्मकर्मनिवारणम् । ज्ञानवैराग्यसिद्धयर्थं, गुरुपादोदकं पिबेत् ॥१४॥
समूळ अज्ञान दूर करणारे, जन्म आणि कर्म ह्यांचे निवारण करणारे हे गुरुपादोदक, श्रीगुरुचरणतीर्थ, ज्ञान आणि वैराग्यप्राप्तीसाठी प्राशन करावे. ॥१४॥
गुरोः पादोदकं पीत्वा, गुरोरुच्छिष्टभोजनम् । गुरुमूर्तेः सदा ध्यानं, गुरुमंत्रं सदा जपेत् ॥१५॥
गुरुचरणतीर्थ प्राशन करून, श्रीगुरुआज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून, श्रीगुरुमूर्तीचे अंतरी सदैव ध्यान करित गुरूने दिलेल्या मंत्राचा सदा जप करावा. ॥१५॥
काशीक्षेत्रं तन्निवासो, जान्हवी चरणोदकम् । गुरुर्विश्वेश्वरः साक्षात्, तारकं ब्रह्म निश्चितम् ॥१६॥
श्रीगुरुचे निवासस्थान म्हणजेच काशीक्षेत्र, चरणतीर्थ म्हणजेच गंगा, श्रीगुरू म्हणजेच प्रत्यक्ष श्रीविश्वेश्वर समजावेत, श्रीगुरुच मानवाला तारणारे निश्चित ब्रह्मस्वरूपच होत. ॥१६॥
गुरोः पादोदकं यत्तु, गयाऽसौ सोऽक्षयो वटः । तीर्थराजः प्रयागश्च, गुरुमूर्ते नमो नमः ॥१७॥
श्रीगुरुचे चरणतीर्थ हेच प्रत्यक्षात गयातीर्थ होय. गुरुच जणू गयेचा चिरंतन वटवृक्ष होय. सर्व तीर्थात जे प्रमुख प्रयाग तीर्थ ते गुरुच होय. अशा महान गुरुमूर्तीला द्विवार नमस्कार असो. ॥१७॥
गुरुमूर्ति स्मरेन्नित्यं, गुरुनाम सदा जपेत् । गुरोराज्ञां प्रकुर्वीत, गुरोरन्यन्न भावयेत् ॥१८॥
श्रीगुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्रीगुरुची आज्ञा मनःपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरुखेरीज मनात अन्य भावभावना ठेवू नये. ॥१८॥
गुरुवक्त्रस्थितं ब्रह्म, प्राप्यते तत्प्रसादतः । गुरोर्ध्यानं सदा कुर्यात्, कुलस्त्री स्वपतेर्यथा ॥१९॥
गुरु ब्रह्मरूप होय. गुरुमुखस्थित ब्रह्म हे गुरूच्या कृपेनेच प्राप्त होते. म्हणून कुलीन स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीचे चिंतन करते त्याप्रमाणे स्त्रीगुरुचे ध्यान, चिंतन सदा करावे. ॥१९॥
स्वाश्रमं च स्वजातिं च, स्वकीर्तिपुष्टिवर्धनम् । एतत्सर्व परित्यज्य, गुरोरन्यन्न भावयेत् ॥२०॥
आपले घरदार, आपली जात, कुळ, वंशाभिमान, आपली कीर्ति, वैभव, कला, विद्या, धन इ. वृद्धीचा लोभ, हाव, आसक्ती सोडून देऊन केवळ गुरुशिवाय इतर कोठेही कशावरही भावना ठेवू नये. एकमेव गुरुच भजावा. गुरुचेच ध्यान करावे. ॥२०॥
अनन्याश्चिन्तयन्तो मां, सुलभं परमं पदम् । तस्मात्सर्वप्रयत्नेन, गुरोराराधनं कुरु ॥२१॥
अनन्यभावाने, एकनिष्ठेने जे कोणी शिवरूप गुरूचे चिंतन करतात त्यांना परम पद सुलभ आहे. म्हणून सर्व प्रकारे प्रयत्न करून श्रीगुरुची आराधना, भक्ती करावी. ॥२१॥
त्रैलोक्यस्फुटवक्तारो, देवाद्यसुरपन्नगाः । गुरुवक्त्रस्थिता विद्या, गुरुभक्त्या तू लभ्यते ॥२२॥
त्रैलोक्यात स्पष्टवक्ते, देवादिक, दैत्य, असुर आणि पन्नग म्हणजे नाग, सर्प इ. असले तरी गुरुमुखी असलेली विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही. ॥२२॥
गुकारस्त्वन्धकारश्च, रुकारस्तेज उच्यते । अज्ञानग्रासकं ब्रह्म, गुरुरेव न संशयः ॥२३॥
गु शब्दाचा अर्थ अज्ञानांधःकार होय. आणि रु शब्दाचा अर्थ ज्ञानप्रकाश, तेज होय. अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म गुरुच होत ह्यात मुळीच संशय नाही. ॥२३॥
गुकारः प्रथमो वर्णो, मायादिगुणभासकः । रुकारो द्वितीयो ब्रह्म, मायाभ्रान्तिविनाशनम् ॥२४॥
गुकार हा पहिला वर्ण मायादि गुण प्रगट करणारा आहे. दुसरा जो रुकार तो ब्रह्माचे द्योतक असून मायानिर्मित भ्रमनिरसन करणारा होय. ॥२४॥
एवं गुरुपदं श्रेष्ठं, देवानामपि दुर्लभम् । हाहाहूहूगणैश्चैव, गन्धर्वैश्च प्रपूज्यते ॥२५॥
अशा प्रकारे गुरुचरण श्रेष्ठ होत. देवांनाही ते दुर्लभ आहेत. हाहाहूहू नावाच्या प्रमुख गंधर्वाकडून हे गुरुचरण, गुरूपद एकनिष्ठेने पूजिले जाते. ॥२५॥
ध्रुवं तेषां च सर्वेषां, नास्ति तत्त्वं गुरोः परम् । आसनं शयनं वस्त्रं, भूषणं वाहनादिकम् ॥२६॥
खरोखर शाश्वत, सर्वात, सर्वदाही गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्त्व नाही. म्हणून जेणेकरून गुरू संतुष्ट होईल असे आसन, शयन, वस्त्र, भूषण, वाहन इ. गुरूला अर्पण करावीत. ॥२६॥
साधकेन प्रदातव्यं, गुरुसंतोषकारकम् । गुरोराराधनं कार्यं, स्वजीवित्वं निवेदयेत् ॥२७॥
श्रीगुरुची आराधना करावी. आपले सर्व जीवितच गुरूला समर्पण करावे. साधकाने गुरुकार्यासाठी आपले तनमनधनासहित संपूर्ण जीवितच समर्पण करावे. ॥२७॥
कर्मणा मनसा वाचा, नित्यमाराधयेद्गुरुम् । दीर्घदण्डं नमस्कृत्य, निर्लज्जो गुरुसन्निधौ ॥२८॥
आचरणाने, मनाने, वाणीने सदैव गुरूची आराधना करावी. गुरूच्या समोर सर्व लाजलज्जा, लोकेषपणा बाजूला ठेवून दीर्घ साष्टांग दंडवत, प्रणाम करावा. ॥२८॥
शरीरमिन्द्रियं प्राणं, सद्गुरुभ्यो निवेदयेत् । आत्मदारादिकं सर्वं, सद्गुरुभ्यो निवेदयत् ॥२९
शरीर, इंद्रिये, प्राण ही सद्गुरुला अर्पण करावीत. ममत्वाची आणि स्वामित्वाची भावना संपूर्णपणे त्यागावी आणि गुरूला शरण जावे. ॥२९॥
कृमिकीटकभस्मविष्ठा - दुर्गंधिमलमूत्रकम् । श्लेष्म-रक्तं त्वचा मांसं वंचयेन्न वरानने ॥३०॥
हे सुंदरी, आपले शरीर म्हणजे जरी कृमि, कीटक, भस्म, विष्ठा, दुर्गन्ध, मलमूत्र, श्लेष्म, रक्त, त्वचा, मांस आदींनी युक्त आहे तरीही त्यासकट गुरुचरणी स्वतःला समर्पित होण्यात वंचित होऊ नये. ॥३०॥
संसारवृक्षमारूढाः पतन्तो नरकार्णवे । येन चैवोद्धृताः सर्वे, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३१॥
संसारवृक्षावर आरूढ होऊन नरकार्णवांत पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला, त्या श्रीगुरुला नमस्कार असो. ॥३१॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेव परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३२॥
गुरु स्वतःच ब्रह्मा, विष्णू, सदाशिव होय. गुरुच परब्रह्म होय. अशा श्रीगुरुला नमस्कारावे. ॥३२॥
हेतवे जगतामेव, संसारार्णवसेतवे । प्रभवे सर्वविद्यानां, शंभवे गुरवे नमः ॥३३॥
जगाच्या उत्पत्तीचा हेतु, संसारसागर पार पाडणारा सेतू आणि सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदय - स्थान - धातू असणाऱ्या शिवरूप गुरूला नमन असो. ॥३३॥
अज्ञानतिमिरांधस्य, ज्ञानांजनशलाकया । चक्षुरुन्मीलितं येन, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३४॥
अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जिवाच्या नेत्रांत ज्याने ज्ञानस्वरूपी अंजन घालून दिव्य चक्षू उघडले आणि त्याला आत्मस्वरूपाचा महानिधि दाखविला त्या श्रीगुरुला नमस्कार असो. ॥३४॥
त्वं पिता त्वं च मे माता, त्वं बंधुस्त्वं च देवता । संसारप्रतिबोधार्थं, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३५॥
संसाररूपी मायेतून जाग येण्यासाठी, संसारातून निवृत्त होण्यासाठी हे गुरो, तूच माझा पिता, तूच माता, तूच बंधू आणि तूच माझी इष्ट देवता होय. अशा तुला नमस्कार. ॥३५॥
यत्सत्येन जगत्सत्यं, यत्प्रकाशेन भाति तत् । यदानंदेन नंदंति, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३६॥
ज्याच्या अस्तित्वा मुळे जगाला अस्तित्व आले आहे, ज्याच्या प्रकाशाने हे जग प्रकाशते, ज्याच्या आनंदमयी आणि आनंददायी स्वरूपामुळे सर्व आनंदित आणि सुखी होतात, अशा त्या सच्चिदानंदरूप श्रीगुरुला नमस्कार असो. ॥३६॥
यस्य स्थित्या सत्यमिदं, यद्बाति भानुरूपतः । प्रियं पुत्रादि यत्प्रीत्या, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३७॥
ज्याच्या अस्तित्वामुळे हे जग खरे, नित्य भासते, जो सूर्यरूप असल्याने सर्वांना प्रकाशित करतो, ज्याच्या प्रीतीमुळे पुत्रादि सर्व प्रिय वाटतात अशा गुरूला नमस्कार असो. ॥३७॥
येन चेतयते हीदं, चित्तं चेतयते न यम् । जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादि, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३८॥
ज्याच्यामुळे हे जग ह्या चेतन स्वरूपाने अनुभवास येते, ज्याच्यामुळे ह्या विश्वाला, व्यक्तींना चेतना, सजीवता प्राप्त होते, चित्त ज्याला प्रकाशित करू शकत नाही, जागृति, स्वप्न, सुषुप्ती आदि अवस्था ज्याच्या द्वारा प्रकाशित होतात अशा त्या गुरूला नमस्कार. ॥३८॥
यस्य ज्ञानादिदं विश्वं, न दृश्यं भिन्नभेदतः । सदेकरूपरूपाय, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३९॥
ज्याने दिलेल्या ज्ञानामुळे हे विश्व शिवाहून भिन्न अथवा भेदरूप दिसत नाही, अभेदयोग ज्याच्यामुळे साध्य होतो, एक मात्र सत् हेच ज्याचे रूप होय अशा श्रीगुरुला नमस्कार असो. ॥३९॥
'यस्यामतं तस्य मतं, मतं यस्य न वेद सः' । अनन्यभावभावाय, तस्मै श्रीगुरवे नमः ॥४०॥
ज्याला वाटते आपल्याला ब्रह्मज्ञान झालेले नाही त्याला ते झालेले असते, ज्याला आपण स्वतः ज्ञानी आहोत असे वाटते तो अज्ञानी असतो. गुरुमध्ये भेदभाव नसतो. तो पूर्ण अभेदयोगी असतो. अशा श्रीगुरुला नमस्कार असो. ॥४०॥
यस्य कारणरूपस्य, कार्यरूपेण भाति येत् । कार्यकारणरूपाय, तस्मै श्रीगुरवे नमः ॥४१॥
जगाचे मूळ कारण सद्गुरु, श्रीगुरुचे कार्य जगत् रूपाने भासते. अशा कार्यकारणरूपी गुरूला नमस्कार असो. ॥४१॥
नानारूपमिदं सर्वं, न केनाप्यास्ति भिन्नता । कार्यकारणता चैव, तस्मै श्रीगुरवे नमः ॥४२॥
नानारूपी ह्या विश्वात, कोठेही कसलीही भिन्नता नाही, केवळ कार्यकारणभावच आहे. विविधरूपे ही गुरुहून अभिन्न आहेत. अशा श्रीगुरुला नमस्कार. ॥४२॥
यदंघ्रिकमलद्वंद्वं, द्वंद्वतापनिवारकम् । तारकं सर्वदाऽऽपद्भ्यः, श्रीगुरुं प्रणमाम्यहम् ॥४३॥
ज्याचे चरणकमलयुगुल, सुखदुःख, शीतोष्ण, मानापमानादि द्वंद्वापासून होणारा ताप, त्रास निवारण करणारे आणि सर्वदा सर्वकाळी आपत्तीतून तारणारे, संकटभयनाशक करणारे आहेत. अशा श्रीगुरुला प्रणाम असो. ॥४३॥
शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता, गुरौ क्रुद्धे शिवो न ही । तस्मात्सर्वप्रयत्नेन, श्रीगुरुं शरणं व्रजेत् ॥४४॥
शंकराला क्रोध आला, तो साधकावर रागावला तर गुरुभक्ताचा पाठीराखा गुरू असतो. पण गुरुच रुष्ट झाला तर मात्र आपला त्राता त्रिभुवनात कॊणी नाही. म्हणून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुरुशरणागति पूर्णपणे पत्करण्याचा प्रयत्न करायला हवा. ॥४४॥
वन्दे गुरुपदद्वंद्वं, वाङ्मनश्चित्तगोचरम् । श्वेतरक्तप्रभाभिन्नं, शिवशक्त्यात्मकं परम् ॥४५॥
वाणी म्हणजे सर्व पंचज्ञानेंद्रिये, मन, चित्त ह्यांना दिसणारे श्वेत आणि रक्त म्हणजे पांढरा व तांबडा प्रकाश ह्याहून भिन्न जो नीलवर्ण अशा शिवशक्तीरूप श्रेष्ठ गुरुचरणांना मी वंदन करतो. ॥४५॥
गुकारं च गुणातीतं, रुकारं रूपवर्जितम् । गुणातीतस्वरूपं च, यो दद्यात्स गुरुः स्मृतः ॥४६॥
गु अक्षराने गुणातीत आणि रु अक्षराने रूपातीत स्वरूप निर्देशित होते. जो गुणरुपाच्या पलीकडे म्हणजेच निर्गुण निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरू ही संज्ञा प्राप्त होते. ॥४६॥
अ-त्रिनेत्रः सर्वसाक्षि, अ-चतुर्बाहुरच्युतः । अ-चतुर्वदनो ब्रह्मा, श्रीगुरुः कथितः प्रिये ॥४७॥
हे प्रिये, तीन नेत्र नसूनही जो सर्वसाक्षी शिवरूप आहे, चतुर्भुज नसूनही जो अच्युत, विष्णू आहे, चार मुखे नसतानाही जो ब्रह्मदेव आहे, असा हा गुरूचा महिमा वर्णिलेला आहे. ॥४७॥
अयं मयाञ्जलिर्बद्धो, दयासागरवृद्धये । यदनुग्रहतो जन्तुश्चित्रसंसारमुक्तिभाक् ॥४८॥
ज्याच्या कृपेने जिवाला ह्या भेदात्मक संसारातून मुक्त होता येते; त्या दयासागर गुरूच्या कृपेला भरती यावी म्हणून मी गुरूला हात जोडून प्रणाम करतो. ॥४८॥
श्रीगुरोः परमं रूपं, विवेकचक्षुषोऽमृतम् । मन्दभाग्या न पश्यन्ति, अन्धाः सूर्योदयं यथा ॥४९॥
श्रीगुरुचे परम रूप, विवेकरूपी चक्षूंसाठी अमृतसमान होय. परंतु आंधळ्यांना जसा सूर्योदय दिसू शकत नाही त्याप्रमाणे मंदभाग्य असलेले जीव ह्या गुरुरूपाला पाहू शकत नाहीत. ॥४९॥
श्रीनाथचरणद्वंद्वं, यस्यां दिशी विराजते । तस्यै दिशे नमस्कुर्याद्भक्त्या प्रतिदिनं प्रिये ॥५०॥
हे प्रिये, ज्या दिशेला श्रीगुरुनाथांचे चरणयुगुल विराजमान झालेले असतात त्या दिशेला प्रतिदिनी भक्तीपूर्वक नमस्कार करावा. ॥५०॥
तस्यै दिशे सततमञ्जलिरेष आर्ये, प्रक्षिप्यते मुखरितो मधुपैर्बुधैश्च । जागर्ति यत्र भगवान् गुरुचक्रवर्ती, विश्वोदयप्रलयनाटकनित्यसाक्षी ॥५१॥
हे आर्ये, जेथे भगवान सार्वभौम गुरुमहाराज विश्वाचा उदय, प्रलय, उत्पत्तिस्थितिरूपी घडामोडीचे नाटक नेहमी साक्षीभावाने बघत जागृत असतात त्या दिशेला भुंग्यांप्रमाणे गुरुस्तवन करणाऱ्या शब्दांचा गुंजारव करणारे ज्ञानी पुरुष हात जोडून नमस्कार करित असतात. ॥५१॥
श्रीनाथादिगुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं, सिद्धौघं बटुकत्रयं पदयुगं दूतीत्रयं शांभवम् । वीरेशाष्टचतुष्कषष्टिनवकं वीरावलीपञ्चकं, श्रीमन्मालिनिमंत्रराजसहितं वन्दे गुरोर्मण्डलम् ॥५२॥
श्रीगुरुदेव, परमगुरुदेव आणि परात्परगुरुदेवस्वरूप श्रीनाथादि तीन गुरुदेवांना, जगाला कारणभूत असलेल्या गणपतीला, उडीयान जालंधर आणि मूलाधारपीठ या तीन आधारमंचकांना, आत्मस्वरूप भैरवाला, सिद्धांच्या समुदायाला, वामदेव, सनत्कुमार आणि शुकदेव या तीन बटूंना, पूर्णपद आणि सिद्धपद या दोन पदांना, शिवदूती, चामुण्डा व काली या तीन दुति म्हणजे सेविकांना, शांभवी दीक्षा देणाऱ्या शंभुस्वरूप असलेल्या, जाती, लज्जा, कुल, अभिमान, देहाहंकार, आधीव्याधी, ज्ञानमय, पापपुण्यादि आठ विकारपाशांनी बद्ध जीवाला, वीरेश स्वरूप असलेल्या, चौसष्ट प्रकारच्या मंत्रांना रचणाऱया नवमातृकास्वरूप, ब्रह्मा, विष्णु, महेश, शिव व शिवस्वरूप पाच वीरांच्या रांगेला, सर्व मलांची शुद्धी करून सर्व जिवांना स्वयंप्रकाश बनविणाऱ्या श्रीमालिनीस्वरूप, गुरू अशा दोन अक्षरांनी युक्त श्रीगुरुस्वरूपी मंत्रराजाला, जो माझा अंतरात्मा आहे, तत्त्वपदाचा जो लक्ष्य साध्य आहे, ज्याने कुंडलिनी शांभवी दीक्षाद्वारा आपल्या शरणागत साधकांच्या अंतरी प्रवेश केलेला आहे अशा श्रीगुरुदेवांच्या मंडलाला मी नमस्कार करतो. ॥५२॥
अभ्यस्तैः सकलैः सुदीर्घमनिलैर्व्याधिप्रदैर्दुष्करैः, प्राणायामशतैरनेककरणैर्दुःखात्मकैर्दुर्जयैः । यस्मिन्नभ्युदिते विनश्यति बलि वायुः स्वयं तत्क्षणात्, प्राप्तुं तत्सहजं स्वभावमनिशं सेवध्वमेकं गुरुम् ॥५३॥
हठयोगाचा अभ्यास करून केलेल्या सर्व प्रकारच्या पुष्कळ दीर्घ श्वासोच्छ्वासांनी, ज्यात चुका झाल्या तर शारीरिक व्याधी उद्धवतात; त्याचप्रमाणे कष्टसाध्य शेकडो प्राणायामांनी अनेक इंद्रियांना दुःखदायक, हठयोगालाही असाध्य, ताब्यात न राहणाऱ्या, प्रयासांनी जे मिळवायचे ते; योग्य गुरू प्राप्त झाला तर त्याच क्षणी बलवान वायू स्वतः नष्ट होतो, असे आत्मतत्त्व सहज प्राप्त करून घेण्यासाठी भक्तियुक्त होऊन सतत एका श्रेष्ठ गुरुचीच सेवा करावी. ॥५३॥
स्वदेशिकस्यैव शरीरंचिन्तनं, भवेदनन्तस्य शिवस्य चिन्तनम् । स्वदेशिकस्यैव च नामकीर्तनं, भवेदनन्तस्य शिवस्य कीर्तनम् ॥५४॥
स्वरूप दर्शन घडविणाऱ्या गुरूच्या शरीराचे, मूर्तीचे चिंतन म्हणजे अनन्त शिवाचेच ध्यान केल्याप्रमाणे होय. आपल्या गुरूचे नामसंकीर्तन म्हणजेही शिवाचेच स्तवन होय. ॥५४॥
यत्पादरेणुकणिका, कापी संसारवारिधे: । सेतुबंधायते नाथं, देशिकं तमुपास्महे ॥५५॥
ज्याच्या चरणधुलीचा एक कण देखील संसारसमुद्र पार करणारा सेतू होतो अशा त्या गुरुनाथाची मी उपासना करतो. ॥५५॥
यस्मादनुग्रहं लब्ध्वा, महदज्ञानमुत्सृजेत् । तस्मै श्रीदेशिकेंद्राय, नमश्चाभीष्टसिद्धये ॥५६॥
ज्याचा अनुग्रह प्राप्त झाल्याने महान अज्ञाननाश होतो अशा गुरुदेवांना आपल्या इष्ट विषयसिद्धीसाठी नमस्कार करावा. ॥५६॥
पादाब्जं सर्वसंसार-दावानलविनाशकम् । ब्रह्मरंध्रे सिताम्भोजमध्यस्थं चंद्रमण्डले ॥५७॥
अकठादित्रिरेखाब्जे-सहस्त्रदल-मण्डले । हंसपार्श्वत्रिकोणे च, स्मरेत्तन्मध्यगं गुरुम् ॥५८॥
ज्याचे चरणकमल सर्व संसारवणव्याला नष्ट करते त्या गुरुदेवांचे, ब्रह्मरंध्रामध्ये मस्तकात ताळूच्या ठिकाणी, चंद्रमंडलांतील श्वेतकमळाच्या मध्यभागी स्थित तसेच अ, क, ठ ह्या वर्णादि तीन रेषांच्या कमळात दोन बाजूंच्या पार्श्वभागी हजार पाकळ्यांनी शोभणाऱ्या, हं सः युक्त असलेल्या, निकटवर्ती त्रिकोणात ध्यान करावे. ॥५७, ५८॥
सकलभुवनसृष्टीः कल्पिताशेषपुष्टि-र्निखिलनिगमदृष्टिः संपदां व्यर्थदृष्टिः । अवगुणपरिमार्ष्टिस्तत्पदार्थैकदृष्टि-र्भवगुणपरमेष्टिर्मोक्षमार्गैक दृष्टिः ॥५९॥
सकलभुवनरंगस्थापनास्तंभयष्टिः, सकरुणरसवृष्टिस्तत्त्वमालासमष्टिः । सकलमयसृष्टिः सच्चिदानंददृष्टि-र्निवसतु मयि नित्यं श्रीगुरोर्दिव्यदृष्टिः ॥६०॥
संपूर्ण १४ भुवने उत्पन्न करणारी; इच्छित पदार्थांची निःशेष पुष्टी करणारी; सर्व शास्त्रे, वेद ह्यांचे ज्ञान करून देणारी; लौकिक, ऎहिक ऎश्वर्याचे व्यर्थत्व दाखविणारी; अवगुणांचे परिमार्जन करणारी, तत् पदाकडे, ब्रह्मावर साधकाचे लक्ष एकाग्र करणारी; जगद्रूप दृश्याची परमदृष्टी हवन करणारी ( ब्रह्मज्ञानात त्रिगुणात्मक सृष्टीचे, संसाराचे हवन होऊन ब्रह्मज्ञान झाले की अज्ञान जाते, सर्व जगत् गुरुरूप वाटते ); मोक्षमार्गावर साधकाची दृष्टी टिकवून धरणारी; सर्व चौदा भुवनरूपी रंगमंचाच्या स्थापनेला आधारभूत स्तंभ, खांब असलेली; कारुण्याची, स्नेहाची प्रेमरसाची वृष्टी करणारी; तत्त्वज्ञानमालिकांचा समुदाय असलेली; सर्व दर्शने, शास्त्रे ह्यांचे संकेत, आचार ह्यांना निर्माण करणारी; जिच्याने सर्व नीतिनियम, आचारविशेष, कालरचना होतात; सत् चित् आनंदस्वरूपी गुरुकडे साधकाची दृष्टी खेचून खिळविणारी अशी श्रीगुरुची दिव्य दृष्टी नेहमी माझ्यावर राहो. (अशी भक्ताने नित्य प्रार्थना करावी.) ॥५९, ६०॥
अग्निशुद्धसमंतात, ज्वालापरिचकाधिया । मंत्रराजमिमं मन्येऽहर्निशं पातु मृत्युतः ॥६१॥
ज्ञानाग्नीने शुद्ध होऊन चारी बाजूंनी बुद्धीरूपी ज्वालांमध्ये सुवर्णांप्रमाणे तावून सुखावून कसोटीस उतरलेला हा मंत्रराज निरंतर, रात्रंदिवस मृत्यूपासून माझे रक्षण करो. ॥६१॥
तदेजति तन्नैजति, तद्दूरे तत्समीपके । तदन्तरस्य सर्वस्य, तदु सर्वस्य बाह्यतः ॥६२॥
सच्चिदानंदस्वरूप गुरुतत्त्व गतिशील आहे, अचलही आहे. तो दूर आहे, जवळ पण आहे. सर्वांच्या अंतरी आहे, तसाच बाहेरही आहे. सर्वव्यापी गुरुत्वाचे वर्णन अशाच शैलीने करावे लागते. ॥६२॥
अजोऽहमजरोऽहं च, अनादिनिधनः स्वयम् । अविकारश्चिदानन्द, अणीयान्महतो महान् ॥६३॥
मी आत्मा जन्मरहित आहे. मला वृद्धत्व नाही. मला स्वतःला आदि अंत नाही. मी विकाररहित आहे. मी ज्ञानमय, आनंदमय आहे. अणूहून लहान आणि मोठ्याहून मोठा आहे. ॥६३॥
अपूर्वाणां परं नित्यं, स्वयंजोतिर्निरामयम् । विरजं परमाकाशं, ध्रुवमानन्दमव्ययम् ॥६४॥
गुरु हा युगपुरुष असतो. गुरुतत्त्व नित्य, सदैव असते. ते न-असते असे कधी होत नाही. गुरू स्वयंप्रकाशी असतो, परप्रकाशी नसतो. देहमनबुद्धीच्या पलीकडे गुरू गेलेला असतो म्हणून तो शुद्ध असतो. सदा आनंदमय असतो. गुरू तत्त्वाचा कधी नाश होत नाही. ॥६४॥
श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानश्चतुष्टयम् । यत्स चात्मतपो वेद, देशिकं च सदा स्मरन् ॥६५॥
मननं यद्भवं कार्यं, तद्वदामि महामते । साधुत्वं च मया दृष्टा, त्वयि तिष्ठति सांप्रतम् ॥६६॥
ज्या गुरुदेवाचे आत्मतपोबल वेदशास्त्र, प्रत्यक्ष प्रमाण, इतिहास आणि अनुमान ह्या चार मार्गांनी जाणले जात असते अशा गुरूचे स्मरण करून हे महामते माझ्यासमोर बसलेल्या तुझ्यातील साधुत्व बघून ज्या विषयावर मनन केले गेले पाहिजे तो विषय मी सांगतो.
अखण्डमण्डलाकारं, व्याप्तं येन चराचरम् । तत्पदं दर्शितं येन, तस्मै श्रीगुरवे नमः ॥६७॥
ज्याने हे चर-अचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ व्यापले आहे, असे ब्रह्मपद दाखविणाऱ्या श्रीगुरुला नमस्कार असो. ॥६७॥
सर्वश्रुतिशिरोरत्न-विराजितपदांबुजमः । वेदान्ताम्बुजसूर्यो यस्तस्मै श्रीगुरवे नमः ॥६८॥
ज्याचे चरणकमल सर्व वेदांच्या मुकुटमणीरूप महावाक्यांनी सुशोभित आहे, जो वेदांतरूपी कमळाला विकसित करणारा जणू सूर्यच आहे, अशा श्रीगुरुला नमस्कार असो. ॥६८॥
यस्य स्मरणमात्रेण, ज्ञानमुत्पद्यते स्वयम् । य एव सर्वसम्प्राप्तिस्तस्मै श्रीगुरवे नमः ॥६९॥
ज्याचे केवळ स्मरण केले असता आपोआप ज्ञान उत्पन्न होते, जो स्वतःच सर्व प्राप्तिरूप आहे, त्या श्रीगुरुला नमस्कार असो. ॥६९॥
चैतन्यं शाश्वतं शान्तं, व्योमातीतं निरंजनम् । नादबिंदुकलातीतं, तस्मै श्रीगुरवे नमः ॥७०॥
जो चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे अशा श्रीगुरुला नमस्कार असो. ॥७०॥
स्थावरं जंगमं चैव, तथा चैव चराचरम् । व्याप्तं येन जतत्सर्वं, तस्मै श्रीगुरवे नमः ॥७१॥
पर्वतादि स्थावर आणि पशुपक्षीमानवादि स्थलांतर करणारे, तसेच चर आणि अचर, सजीव-निर्जीव असे सर्व जग ज्याने व्यापले आहे, त्या श्रीगुरुला नमस्कार असो. ॥७१॥
ज्ञानशक्तीसमारूढस्तत्त्वमालाविभूषितः । भुक्तिमुक्तिप्रदातायस्, तस्मै श्रीगुरवे नमः ॥७२॥
आत्मज्ञानाच्या शक्तीवर आरूढ झालेला, तत्त्वज्ञानसमुदायाने अलंकृत असलेला, भुक्ति व मुक्ति, भोग व मोक्ष देणाऱ्या श्रीगुरुला नमस्कार. ॥७२॥
अनेकजन्मसंप्राप्त-सर्वकर्मविदाहिने । स्वात्मज्ञानप्रभावेण, तस्मै श्रीगुरवे नमः ॥७३॥
आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने, जन्मोजन्मी साठविलेल्या सर्व संचित कर्माचे भस्म करणाऱ्या श्रीगुरुला नमस्कार असो. ॥७३॥
न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः । तत्त्वं ज्ञानात्परं नास्ति, तस्मै श्रीगुरवे नमः ॥७४॥
गुरुतत्त्व सर्वश्रेष्ठ होय, गुरुहून वरचढ दुसरे काही नाही. गुरुसेवा आणि गुरुभक्तीहून श्रेष्ठ असे दुसरे तप नाही. तत्त्वज्ञानापेक्षा दुसरे कोणतेही ज्ञान श्रेष्ठ नाही. अशा श्रेष्ठ गुरूला नमस्कार असो. ॥७४॥
मन्नाथः श्रीजगन्नाथो, मद्गुरुस्त्रिजगद्गुरुः । ममात्मा सर्वभूतात्मा, तस्मै श्रीगुरवे नमः ॥७५॥
माझे गुरुनाथ सर्व जगाचेच नाथ, स्वामी, मालक आहेत. माझे गुरू तिन्ही जगाचे गुरू आहेत. माझा आत्मा सर्वव्यापी म्हणजेच सर्वांभूती असणारा आत्मा आहे. अशा प्रकारचा अनुभव आणून देणाऱ्या श्रीगुरुला नमस्कार असो. ॥७५॥
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः, पूजामूलं गुरोः पदम् । मंत्रमूलं गुरोर्वाक्यं, मोक्षमूलं गुरोः कृपा ॥७६॥
ध्यानाचे आधारस्थान गुरुमूर्ती होय. पूजेचे मूलस्थान गुरुचरण, मंत्राचे उगमस्थान गुरुवाक्य, मोक्षाचा मूलाधार गुरूची कृपा होय. ॥७६॥
गुरुरादिरनादिश्च, गुरुः परमदैवतम् । गुरोः परतरं नास्ति, तस्मै श्रीगुरवे नमः ॥७७॥
गुरु आदि, प्रथमपासून आहे, सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. पण गुरूला स्वतःला दुसरे उगमस्थान नाही. गुरुतत्त्व स्वयंभू आहे. गुरुच परम दैवत. गुरुहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. अशा श्रीगुरुला नमस्कार असो. ॥७७॥
सप्तसागरपर्यन्त - तीर्थस्नानादिकं फलम् । गुरोरंघ्रिपयोबिंदुसहस्त्रांशे न दुर्लभम् ॥७८॥
सातही सागरापर्यंतच्या तीर्थस्थानादिकांचे फल एका गुरुचरणतीर्थाच्या बिंदूच्या हजाराव्या भागाच्या अंशातही दुर्लभ नाही. गुरूच्या चरणतीर्थात सात समुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते, इतकें गुरुचरणतीर्थ श्रेष्ठ आहे. ॥७८॥
हरौ रुष्टे गुरुस्त्राता, गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात्सर्वप्रयत्नेन, श्रीगुरुं शरणं व्रजेत् ॥७९॥
हरीचा कोप झाला तर गुरू भक्ताचे रक्षण करतो. पण गुरुच रुष्ट झाला तर भक्ताला कोणी त्राता नाही. म्हणून सर्व प्रयत्नांनी गुरूला शरण जावे. ॥७९॥
गुरुरेव जगत्सर्वं, ब्रह्मविष्णुशिवात्मकम् । गुरोः परतरं नास्ति, तस्मात्संपूजयेद् गुरुम् ॥८०॥
श्रीगुरुच सर्व जगत् होय. ब्रह्माविष्णुशिवस्वरूप गुरू होय. गुरूहून श्रेष्ठ दुसरा कोणी नाही, दुसरे काही नाही. म्हणून गुरूची उत्तम प्रकारे मनःपूर्वक पूजा करावी. सम-पूजा करावी म्हणजे सर्वत्र सर्वांच्यात गुरूचा अंश ओळखून सर्वांचा सारखा मान ठेवावा. ॥८०॥
ज्ञानं विज्ञानसहितं, लभ्यते गुरुभक्तितः । गुरोः परतरे नास्ति, ध्येयोऽसौ गुरुमार्गिभिः ॥८१॥
गुरुभक्ति केल्याने साक्षात्काराच्या अनुभवासह आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुहून दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून सिद्धयोग मार्गातील गुरुभक्तांनी गुरुचेच चिंतन करावे. ॥८१॥
यस्मात्परतरं नास्ति, नेति नेतीति वै श्रुतिः । मनसा वचसा चैव, नित्यमाराधयेद् गुरुम् ॥८२॥
न इति, न इति, गुरू काय नाही, गुरू असा नाही, गुरू हे नाही करित असे सांगत श्रुतीनें शेवटी गुरुहून श्रेष्ठ कोणी नाही, गुरू अवर्णनीय असून गुरू हा गुरूच होय असा निर्णय घेतला. अशा महत्तम गुरूची मनाने, वाणीने नित्य आराधना करणे हीच साधकाची साधना होय. ॥८२॥
गुरोः कृपाप्रसादेन, ब्रह्मविष्णुसदाशिवाः । समर्थाः प्रभवादौ च, कैवल्यं गुरुसेवया ॥८३॥
गुरूच्या कृपाप्रसादानेच ब्रह्मा, विष्णु, महेश ह्या तीन देवता सृष्टीची उत्पत्ति, स्थिती व संहाराचे आपापले कार्य करण्यास समर्थ होतात. गुरुसेवा केल्यानेच कोणतेही सामर्थ्य अंगी येते. गुरुसेवा हाच मुक्तीचाही मार्ग ठरतो. ॥८३॥
देवकिन्नरगंधर्वाः पितरो यक्षचारणाः । मुनयोऽपि न जानन्ति, गुरुशुश्रूषणे विधिम् ॥८४॥
देव, किन्नर, गंधर्व, पितर, यक्ष-चारण व मुनिजन देखील गुरुसेवेचा विधी जाणत नाहीत, गुरुसेवा हातून न घडल्याने मुक्त होत नाहीत. ॥८४॥
महाहंकारगर्भेण, तपोविद्याबलान्विताः । संसारकुहरावर्ते, घटयंत्रे यथा घटाः ॥८५॥
तप, विद्या, बल ह्यांनी युक्त असूनही जीवापोटी महान अहंकार, मी देह ही भावना हाडीमासी खिळून राहिल्याने (जीवाने उराशी कवटाळून धरल्याने) संसाररूपी विहिरीत रहाटगाड्याच्या घटांप्रमाणे फिरत असतात. ॥८५॥
न मुक्ता देवगन्धर्वाः, पितरो यक्षकिन्नराः । ऋषयः सर्वसिद्धाश्च, गुरुसेवापराङ्मुखाः ॥८६॥
देव, गंधर्व, किन्नर, पितर, यक्ष, ऋषी आणि सिद्ध देखील जर गुरुसेवेकडे तोंड फिरवून असतील, गुरुसेवा त्यांच्या हातून होत नसेल तर कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. ॥८६॥
ध्यानं श्रृणु महादेवि, सर्वानंदप्रदायकम् । सर्वसौख्यकरं नित्यं, भुक्तिमुक्तिविधायकम् ॥८७॥
हे महादेवि, सर्व प्रकारचा आनंद देणारे, सर्व प्रकारचे सुख प्रदान करणारे, भुक्ति व मुक्ति, भोग व मोक्ष इ. सहजसाध्य करण्याचे साधन म्हणजे गुरुध्यान होय. ॥८७॥
श्रीमत् परब्रह्म गुरुं स्मरामि, श्रीमत्परब्रह्म गुरुं वदामि । श्रीमत्परब्रह्म गुरुं नवामि, श्रीमत्परब्रह्म गुरुं भजामि ॥८८॥
श्रीमत् परब्रह्मगुरुचे स्मरण करावे, श्रीमत् परब्रह्मरूप गुरूचे स्तवन करावे, श्रीमत्परब्रह्मगुरुला नमन करावे, श्रीमत्परब्रह्मगुरुचे भजन करावे. ॥८८॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥८९॥
ब्रह्मानंदरूपी, परमसुखदाता, केवळ ज्ञानस्वरूप, सुखदुःखादि द्वंद्वरहित, आकाशासारखा निर्लेप, तत्त्वमसि आदि महावाक्यांचे साध्य, एक, नित्य, विमल, निश्चल, सर्व प्राण्यांच्या बुद्धीचा साक्षी, भावातीत, त्रिगुणरहित अशा सद्गुरूला मी नमस्कार करतो. ॥८९॥
नित्यं शुद्धं निराभासं, निराकारं निरंजनम् । नित्यबोधं चिदानंदं, गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ॥९०॥
नित्य, शुद्ध, आभासरहित, निराकार, निरंजन, नित्य, बोधस्वरूप, चिदानन्दरूप, परब्रह्म श्रीगुरुला मी नमस्कार करतो. ॥९०॥
हदंबुजे कर्णिकमध्यसंस्थे, सिंहासने संस्थितदिव्यमूर्तिम् । ध्यायेद् गुरुं चंद्रकलाप्रकाशं, चित्पुस्तकाभीष्टवरं दधानम् ॥९१॥
हदयरूपी कमळाच्या देठांत मध्यभागी ह्रदयसिंहासनावर दिव्यमूर्तिरूप विराजमान झालेल्या , चांदण्यांप्रमाणे आल्हाददायक असलेल्या, ज्ञानग्रंथ हाती धरलेल्या, अभीष्ट वर देणाऱ्या गुरुमूर्तीचे ध्यान करावे. ॥९१॥
श्वेतांबरं श्वेतविलेपपुष्पं, मुक्ताविभूषं मुदितं द्विनेत्रम् । वामांकपीठस्थितदिव्यशक्तिं, मंदस्मितं सांद्रकृपानिधानम् ॥९२॥
श्वेत वस्त्र नेसलेली, श्वेत चंदनाची उटी लावलेली, श्वेत पुष्पे धारण केलेली, श्वेत मोत्यांच्या अलंकारानी अलंकृत, भूषित झालेली, आनंदाने परिपूर्ण, दोन नेत्र असलेली, जिच्या डाव्या मांडीवर दिव्य आदिशक्ति स्थानापन्न झालेली आहे अशी, मंदस्मित करणारी, अती विपुल कृपेचा साठा असलेली अशी गुरुमूर्ती साधकाने ध्यानासाठी घ्यावी. ॥९२॥
आनंदमानंदकरं प्रसन्नं, ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तम् । योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं, श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि ॥९३॥
आनंदस्वरूप, आनंददाता, प्रसन्नमुख, ज्ञानस्वरूप, आत्मबोधयुक्त, योगीश्वर, स्तुती करण्यास योग्य, संसाररूपी रोगावर रामबाण औषध देणारा वैद्य, अशा श्रीगुरुला मी नित्य नमस्कार करतो. ॥९३॥
यस्मिन्सृष्टिस्थितिध्वंस-निग्रहानुग्रहात्मकम् । कृत्यं पंचविधं शश्वद्भासते तं नमाम्यहम् ॥९४॥
ज्याच्या ठिकाणी उत्पत्ति, स्थिति, लय, निग्रह आणि अनुग्रहरूप पंचकृत्यें नित्य भासतात, त्या गुरूला मी नमस्कार करतो. ॥९४॥
प्रातः शिरसि शुक्लाब्जे, द्विनेत्रं द्विभुजं गुरुम् । वराभययुतं शांतं, स्मरेत्तं नामपूर्वकम् ॥९५॥
प्रातःसमयी मस्तकातील सत्त्वगुणज्ञानदर्शक सहस्त्र पाकळ्यांचे श्वेत कमळ धारण करणाऱ्या, दोन नेत्र आणि दोन भुजा असलेल्या, आशीर्वाद आणि अभय देणाऱ्या शांत स्वरूप गुरूचे नामोच्चार करून स्मरण करावे. ॥९५॥
न गुरोरधिकं न गुरोरधिकं, न गुरोरधिकं न गुरोरधिकम् । शिवशासनतः शिवशासनतः, शिवशासनतः शिवशासनतः ॥९६॥
गुरुहून श्रेष्ठ काही नाही, काही नाही, काही नाही; हेच शिवाचे निश्चयपूर्वक सांगणे होय. ॥९६॥
इदमेव शिवं त्विदमेव शिवं, त्विदमेव शिवं त्विदमेव शिवम् । मम शासनतो मम शासनतो, मम शासनतो मम शासनतः ॥९७॥
गुरुतत्त्वच कल्याणकारी आहे, कल्याणकारी आहे, कल्याणकारी आहे, हेच कल्याणकारी होय. गुरुरूप हेच शिवरूप म्हणजेच कल्याणप्रद आहे असे माझे आज्ञापूर्वक सांगणे आहे. ॥९७॥
एवंविधं गुरुं ध्यात्वा, ज्ञानमुत्पद्यतेस्वयम् । तत्सद्गुरुप्रसादेन, मुक्तोऽहमिति भावयेत् ॥९८॥
गुरुध्यान केल्यावर शिष्याच्या ठायी आत्मज्ञान आपोआपच उत्पन्न होते. गुरूच्या कृपाप्रसादाने, 'मी मुक्त आहे' अशी अनुभूती शिष्याला येते. ॥९८॥
गुरुदर्शितमार्गेण, मनःशुद्धिं तू कारयेत् । अनित्यं खंडयेत्सर्वं, यत्किंचिदात्मगोचरम् ॥९९॥
गुरुने दाखविलेल्या मार्गाने साधना करून चित्तशुद्धी, मनःशुद्धि करून घ्यावी. अनित्य गोष्टींचे, मायेचे, अनात्म्याचे खंडन करावे. इंद्रियगोचर सर्व विषयांचा त्याग करावा. ॥९९॥
ज्ञेय सर्वस्वरूपं च, ज्ञानं च मन उच्यते । ज्ञानं ज्ञेयसमं कुर्यान्, नान्यः पंथा द्वितीयकः ॥१००॥
ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचे ते; म्हणजेच सर्वांभूती असलेला स्वस्वरूप आत्मा होय. ज्ञान म्हणजे मन. मनाला आत्मरूप बनविणे हाच एकमेव आत्मसाक्षात्काराचा मार्ग होय. ह्याहून दुसरा मार्ग नाही. ॥१००॥
एव श्रुत्वा महादेवि, गुरुनिंदां करोति यः । स याति नरकं घोरं, यावच्चंद्रदिवाकरौ ॥१०१॥
हे महादेवी, हे गुरुमहात्म्य ऎकूनही जो गुरूची निंदा करील तो, जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत म्हणजे जगाच्या अंतापर्यंत घोर नरकात जाऊन पडेल. ॥१०१॥
यावत्कल्पांतको देहस्तावदेव गुरुं स्मरेत् । गुरुलोपो न कर्तव्य:, स्वच्छंदो यदि वा भवेत् ॥१०२॥
देहाचा नाश होईतो म्हणजेच देह आहे तो गुरूचे स्मरण केलेच पाहिजे. स्वतःचा छंद लागला, साक्षात्काराचा अनुभव आला तरीही गुरूचे स्मरण चुकवू नये. ॥१०२॥
हुंकारेण न वक्तव्यं, प्राज्ञैः शिष्यैः कथंचन । गुरोरग्रे न वक्तव्यमसत्यं च कदाचन ॥१०३॥
शहाण्या बुद्धिमान शिष्याने गुरुसमोर हुंकार देऊन, (हुं, अं, हो, हां म्हणत) एकेक्षरी बोलू नये. नीट शब्दोच्चार करून बोलावे. मान हलवून, हातवारे करून, सूचना देत, हुंकारत उत्तरे देऊ नयेत. तसेच गुरुसमोर असत्य भाषण करू नये. ॥१०३॥
गुरुं त्वं कृत्य हुं कृत्य, गुरुं निर्जित्य वादतः । अरण्ये निर्जले देशे, स भवेद् ब्रह्मराक्षसः ॥१०४॥
गुरुशी, हुं अशा एकरी शब्दात बोलू नये. अनादर यत्किंचितही दाखवू नये. वादामध्ये गुरूला जिंकून त्याचा पाडाव करू पाहाणारा निर्जल अरण्यात ब्रह्मराक्षस होतो. ॥१०४॥
मुनिभिः पन्नगैर्वाऽपि, सुरैर्वा शापितो यदि । कालमृत्युभयाद्वापि, गुरू रक्षति पार्वती ॥१०५॥
हे पार्वती, मुनि, नाग, सर्प किंवा देवदेवतांनी जरी शापिले तरी त्या शापापासून, तसेच काळ, मृत्यू ह्यांच्या भयापासून गुरू रक्षण करतो. ॥१०५॥
अशक्ता ही सुराद्याश्च, अशक्ता मुनयस्तथा । गुरुशापेन ते शीघ्रं, क्षयं यान्ति न संशयः ॥१०६॥
देव, देवता, मुनिजन इ. सारे गुरुसमोर अशक्त, असमर्थ आहेत. गुरूच्या शापाने ते लौकर नाश पावतात. ॥१०६॥
मंत्रराजमिदं देवि, गुरुरित्यक्षरद्वयम् । स्मृतिवेदार्थवाक्येन, गुरुः साक्षात्परं पदम् ॥१०७॥
हे देवि, गुरू ही दोन अक्षरे तर मंत्रांचा राजा होत. श्रुतिस्मृतींच्या वाक्यांवरून गुरू साक्षात परमपद, गुरू साक्षात परब्रह्म हे सिद्ध होते. ॥१०७॥
श्रुति-स्मृति अविज्ञाय, केवलं गुरुसेवकाः । ते वै संन्यासिनः प्रोक्ता, इतरे वेषधारिणः ॥१०८॥
श्रुतिस्मृति न जाणणारे, वेदान्ताचा अभ्यास न करणारे देखील केवळ गुरुसेवा करून 'संन्यासी' ह्या संज्ञेला प्राप्त होतात. पण गुरुकृपाहीन जरी वेदान्ती असला तरी तो केवळ वेषधारी, नामधारीच समजला पाहिजे. ॥१०८॥
नित्यं ब्रह्म निराकारं, निर्गुणं बोधयेत् परम् । सर्वं ब्रह्म निराभासं, दीपो दीपान्तरं यथा ॥१०९॥
एका दिव्याने दुसरा दिवा लावावा तद्वत जो नित्य, निराकार, निर्गुण, निराभास परब्रह्माचा बोध शिष्याला करून देतो तो गुरू होय. ॥१०९॥
गुरोः कृपाप्रसादेन, आत्मारामं निरीक्षयेत् । अनेन गुरुमार्गेण, स्वात्मज्ञानं प्रवर्तते ॥११०॥
गुरुच्या कृपाप्रसादाने आत्मारामाचे निरीक्षण करावे. ह्या गुरुमार्गानेच आपल्या स्वरुपाचे ज्ञान होते. आत्मज्ञान, आत्मबोध आणि आत्मसाक्षात्कारासाठी गुरुचीच कृपा हवी. ॥११०॥
आब्रह्मस्तंबपर्यंतं, परमात्मास्वरूपकम् । स्थावरं जंगमं चैव, प्रणमामि जगन्मयम् ॥१११॥
ब्रह्मदेवापासून ते तृणवत जीवापर्यंत, परमात्मस्वरूपी स्थावर आणि जंगम, स्थिर आणि अचल चराचररूप जगन्मयाला, जगद्रूप गुरूला मी नमन करतो. ॥१११॥
वंदेऽहं सच्चिदानंदं, भेदातीतं सदा गुरुम् । नित्यं पूर्णं निराकारं, निर्गुणं स्वात्मसंस्थितम् ॥११२॥
सदा सच्चिदानंदस्वरूप, भेदरहित, नित्य, पूर्ण, निराकार, निर्गुण, स्वात्म्यामध्ये अवस्थित श्रीगुरुला मी नमस्कार करतो. ॥११२॥
परात्परतरं ध्येयं, नित्यमानंदकारकम् । ह्रदयाकाशमध्यस्थं, शुद्धस्फटिकसन्निभम् ॥११३॥
पराहून पर, ध्यानाचे लक्ष्य, नित्य आनंदकारक, ह्रदयाकाशात मध्यभागी स्थित असलेले, शुद्ध स्फटिकासमान निर्मल असे गुरूचे चिन्मय रूप होय. ॥११३॥
स्फटिकप्रतिमारूपं, दृश्यते दर्पणे यथा । तथात्मनि चिदाकार-मानंदं सोऽहमित्युत ॥११४॥
जसे दर्पणात (आरशात) शुद्ध स्फटिकाची प्रतिमा दिसते, तद्वतच आत्मप्रकाशात चिदाकार आनंदरूप तो मीच हा सोऽहं भाव प्रकट होतो. ॥११४॥
अंगुष्ठमात्रपुरुषं, ध्यायतश्चिन्मयं ह्रदि । तत्र स्फुरती भावो यः, श्रृणु तं कथयाम्यहम् ॥११५॥
(ह्याप्रमाणे) अंगठ्याएवढ्या चिन्मय आत्म्याचे ध्यान करता करता जो भाव स्फुरतो तो मी तुला सांगतो, त्याचे श्रवण कर. ॥११५॥
अगोचरं तथाऽगम्यं, नामरूपविवर्जितम् । निःशब्दं तद्विजानीयात्, स्वभावं ब्रह्म पार्वती ॥११६॥
सूक्ष्म ध्यान जमू लागले की ब्रह्मज्ञान, ब्रह्मस्वरूप साधकाला ज्ञात होते. वास्तविक जे अगोचर, पंचज्ञानेंद्रियांना अवगत न होणारे, जाणता न येणारे, नाम व रूप नसलेले, निशब्दपणाच ज्याचा भाव, मौन हेच ज्याचे स्वरूप; तेच ब्रह्म होय हे साधकाला कळून येते. ॥११६॥
यथा गंधः स्वभावेन, कर्पूरकुसुमादिषु । शीतोष्णादिस्वभावेन तथा ब्रह्म च शाश्वतम् ॥११७॥
कापूर, फुले ह्यांच्या ठिकाणी स्वभावतःच सुगंध असतो. कापूर उष्ण तर फुले शीतल असतात. स्वभाव नेहमीच शाश्वत असतो. तद्वत् ब्रह्म शाश्वत, चिरकाल होय. ॥११७॥
स्वयं तथाविधो भूत्वा, स्थातव्यं यत्रकुत्रचित् । कीटकभ्रमरवत्तत्र, ध्यानं भवति तादृशम् ॥११८॥
(ह्याप्रमाणे) ब्रह्मरूप होऊन जगात कोठेही राहावे. कीटक, भुंग्याच्या चिंतनाने जसे त्याचे रूप धारण करतो त्याचप्रमाणे ब्रह्मावर ध्यान करून जीवात्मा ब्रह्मरूप बनतो. ॥११८॥
गुरुध्यानं तथा कृत्वा, स्वयं ब्रह्ममयो भवेत् । पिंडे पदे तथा रूपे, मुक्तोऽसौ नात्र संशयः ॥११९॥
अंतःकरणात गुरूचे असे ध्यान करता करता साधक ब्रह्ममय बनतो. पिंडी म्हणजे शरीरात, पदांमध्ये, नामादि शब्दात आणि रूपातही (तो ब्रह्मच पाहतो). ॥११९॥
पार्वत्युवाच | पिंडं किंतू महादेव, पदं किं समुदाह्रतम् । रूपातीतं च रूपं किं, एतदाख्याहि शंकर ॥१२०॥
पार्वती म्हणाली, "हे महादेवा, पिंड म्हणजे काय, पद कशाला म्हणतात, रूप म्हणजे काय, रूपातीत होणे म्हणजे काय हे सारे मला सविस्तर सांगा." ॥१२०॥
श्रीमहादेव उवाच | 'पिंड' कुंडलिनीशक्तीः, 'पदं' हंसमुदाह्रतम् । 'रूपं' बिंदुरिति ज्ञेयं, 'रूपातीते' निरंजनम् ॥१२१॥
श्रीमहादेव म्हणाले, हे देवी, कुंडलिनीशक्तीला पिंड म्हणतात, हंस म्हणजे पद, बिंदूला रूप आणि निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात. ॥१२१॥
पिंडे मुक्ता पदे मुक्ता, रूपे मुक्ता वरानने । रूपातीते तू ये मुक्तास्ते मुक्ता नात्र संशयः ॥१२२॥
ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे, ज्याचा हं सः मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला आहे आणि ज्याला आत्मज्योतीचे नील बिंदूत दर्शन झाले आहे, जो निरंजन, निराकार, निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त ह्यात संशय नाही. ॥१२२॥
स्वयं सर्वमयो भूत्वा, परं तत्त्वं विलोकयेत् । परात्परतरं नान्यत्, सर्वमेतन्निरालयम् ॥१२३॥
स्वतः सर्वमय बनून त्या परम तत्त्वाचे दर्शन घेता आले पाहिजे. त्या परम तत्त्वापलिकडे दुसरे काही नाही. हे सर्व निराश्रित आहे. दुसऱ्या कशाचा आधार त्याला नाही. सर्वत्र सर्वव्यापी एक मात्र ब्रह्मच भरून आहे. ॥१२३॥
तस्यावलोकनं प्राप्य सर्वसंगविवर्जितम् । एकाकी निःस्पृहः शान्तस्तिष्ठासेत् तत्प्रसादतः ॥१२४॥
साक्षात्कार झाला, परतत्त्वाचे दर्शन घडले म्हणजे साधकाची सर्व आसक्ती सुटते, तो अनासक्त होतो. एकटा, एकाकी राहातो. निःस्पृह, शांत होतो आणि गुरुप्रसादाने स्थिर, स्वस्थ होतो. ॥१२४॥
लब्धं वाऽथ न लब्धं वा, स्वल्पं वा बहुलं तथा । निष्कामेनैव भोक्तव्यं, सदा संतुष्टचेतसा ॥१२५॥
काही लाभ होवो न होवो, थोडे मिळो वा पुष्कळ प्राप्त होवो, स्थितप्रज्ञ निरिच्छपणे ते भोगतो. कारण त्याचे चित्त सत्च्या लाभाने तुष्ट झालेले असते. ॥१२५॥
सर्वज्ञपदमित्याहु-र्देही सर्वमयो बुधाः । सदानंदः सदा शान्तो, रमते यत्रकुत्रचित् ॥१२६॥
इच्छारहित संतुष्ट चित्त म्हणजेच सर्वज्ञपद. निरिच्छ, स्वस्थचित्त होणे म्हणजेच देहधारी असूनही सर्वमय बनणे होय. स्थितप्रज्ञ सदा शांत, सदा आनंदात मग्न असतो. ॥१२६॥
यत्रैव तिष्ठते सोऽपि, स देशः पुण्यभाजनम् । मुक्तस्य लक्षणं देवि, तवाग्रे कथितं मया ॥१२७॥
मुक्त पुरुष जेथे राहातो ते स्थान पुण्यशाली असते. हे देवी, मी तुझ्यापुढे मुक्त पुरूषाची लक्षणे म्हणूनच सांगितली. ॥१२७॥
उपदेशस्तथा देवि, गुरुमार्गेण मुक्तिदः । गुरुभक्तिस्तथा ध्यानं, सकलं तव कीर्तितम् ॥१२८॥
हे देवी, गुरुमार्गद्वारा मुक्ती देणारा उपदेश, गुरुभक्ति, तसेच ध्यान हे सारे मी तुला सांगितले. ॥१२८॥
अनेन यद्भवेत्कार्यं, तद्वदामि महामते । लोकोपकारकं देवि, लौकिकं तू न भावयेत् ॥१२९॥
हे महाबुद्धिशालिनी, गुरुभक्तिने जे कार्य सिद्ध होते ते तुला सांगतो ऎक. त्याचा उपयोग लोकांवर उपकार करण्यासाठी करावा. लौकिक कार्यासाठी, ऎहिक भोगासाठी करू नये. ॥१२९॥
लौकिकात्कर्मणो यान्ति, ज्ञानहीना भवार्णवम् । ज्ञानी तू भावयेत्सर्वं, कर्म निष्कर्म यत्कृतम् ॥१३०॥
सिद्धीचा उपयोग लौकिक कार्यासाठी करणारे ज्ञानहीन लोक संसारसमुद्रात पडतात तर ज्ञानी लोकांनी केलेले सर्व कर्म निष्कर्म बनते. ॥१३०॥
इदं तू भक्तिभावेन, पठते श्रृणुते यदि । लिखित्वा तत्प्रदातव्यं, दानं दक्षिणयासह ॥१३१॥
श्रीगुरुगीता भक्तिभावपूर्वक पठण केल्याने, श्रवण केल्याने अथवा लिहून दिल्याने सर्व फलप्राप्ति होते. यथाशक्ती दक्षिणेसह दानाने समाप्ती करावी. ॥१३१॥
गुरुगीतात्मकं देवि, शुद्धतत्त्वं मयोदितम् । भवव्याधिविनाशार्थ, स्वयमेव जपेत्सदा ॥१३२॥
हे देवी, श्रीगुरुगीतारूपी शुद्धतत्त्व मी तुला सांगितले. भवव्याधिनाश करण्यासाठी सदा श्रीगुरुगीता स्वतः जपावी, म्हणावी. ॥१३२॥
गुरुगीताक्षरैकं तु, मंत्रराजमिमं जपेत् । अन्ये च विविधा मंत्राः, कलां नार्हति षोडशीम् ॥१३३॥
गुरुगीतेचे एक एक अक्षर परम मंत्र आहे. दुसरे अनेक मंत्र ह्याच्या सोळाव्या भागाचीही बरोबरी करू शकणार नाहीत. ॥१३३॥
अनंतफलमाप्नोति, गुरुगीताजपेन तू । सर्वपापप्रशमनं, सर्वदारिद्र्यनाशनम् ॥१३४॥
श्रीगुरुगीता पठण केल्याने अनंत फलप्राप्ति होते. सर्व पापनाश होतो आणि सर्व प्रकारचे दारिद्र्य नष्ट होते. ॥१३४॥
कालमृत्युभयहरं, सर्वसंकटनाशनम् । यक्षराक्षसभूतानां, चोरव्याघ्रभयापहम् ॥१३५॥
श्रीगुरुगीतेचे सामर्थ्यच असे की श्रीगुरुगीता काळाच्या व मृत्युच्या भयापासून भयप्राप्ती करून देते. सर्व संकटांचा नाश करते. यक्ष, राक्षस, भूत, चोर, व्याघ्रादिपासूनचे भय हरण करते. ॥१३५॥
महाव्याधिहरं सर्वं, विभूतिसिद्धिदं भवेत् । अथवा मोहनं वश्यं, स्वयमेव जपेत्सदा ॥१३६॥
श्रीगुरुगीताजपाने सर्व प्रकारच्या महाव्याधी दूर होतात. सिद्धिदायिनी विभूतीची प्राप्ती होते. सर्व ऎश्वर्यरूपी सिद्धी प्राप्त होतात. तसेच, संमोहन, वशीकरण विद्याही प्राप्त होतात. ॥१३६॥
वस्त्रासने च दारिद्र्यं पाषाणे रोगसंभवः । मेदिन्यां दुःखमाप्नोति काष्ठे भवति निष्फलम् ॥१३७॥
वस्त्रासनावर बसून श्रीगुरुगीतेचा जप केल्यास दारिद्र्य प्राप्त होते. दगडावर बसून जप केल्यास रोगाचा उद्भव होतो. जमिनीवर बसून श्रीगुरुगीतेचा जप केल्यास दुःख प्राप्त होते आणि लाकडावर बसून जप केल्यास जप निष्फळ होतो. ॥१३७॥
कृष्णाजिने ज्ञानसिद्धिर्मोक्षश्रीर्व्याघ्रचर्मणि । कुशासने ज्ञानसिद्धिः सर्वसिद्धिस्तु कंबले ॥१३८॥
काळ्या हरणाच्या कातड्यावर बसून जप केल्यास ज्ञानाची प्राप्ती होते. वाघाच्या कातड्यावर बसून जप केल्यास मोक्षप्राप्ती, कुशआसन वापरल्यास ज्ञानसिद्धि आणि कांबळ्यावर सर्व सिद्धी प्राप्त होतात. ॥१३८॥
कुशैर्वा दूर्वया देवि, आसने शुभ्रकंबले । उपविश्य ततो देवि, जपेदेकाग्रमानसः ॥१३९॥
हे देवी, श्रीगुरुगीतेचा स्वाध्याय कुश वा दूर्वासनावर किंवा शुभ्र कांबळ, घोंगडी वा धावळीच्या आसनावर बसून एकाग्रमनाने करावा. ॥१३९॥
ध्येयं शुक्लं च शांत्यर्थं, वश्ये रक्तासनं प्रिये । अभिचारे कृष्णवर्ण, पीतवर्ण धनागमे ॥१४०॥
रंगाचा परिणाम मनावर होतो. मनःशांतीसाठी शुभ्र आसन वापरले पाहिजे. पांढरा रंग सात्विक मनाचे प्राबल्य दाखवितो. मनःशांतीसाठी पांढरे आसन साहाय्यक ठरते. तामस, राजस विचार घालवायला मदत करते. आपले मन अनुकूल करून घेण्यासाठी तसेच दुसऱ्याचे मन वश करण्यासाठी लाल रंगाचे आसन साहाय्यकारक ठरते. शत्रूच्या पारिपात्यासाठी काळ्या रंगाचे आसन उपयोगी पडते. धनप्राप्तीची आशा, इच्छा बाळगून असणाऱ्याने पिवळ्या रंगाचे आसन वापरावे. ॥१४०॥
उत्तरे शांतिकामस्तु, वश्ये पूर्वमुखो जपेत् । दक्षिणे मारणं प्रोक्तं, पश्चिमे च धनागमः ॥१४१॥
आग्नेय्या कर्षणं चैव , वायव्यां शत्रुनाशनम् । नैर्क्रत्यां दर्शनं चैव, ईशान्यां ज्ञानमेव च ॥१४२॥
ज्याला मनःशांती हवी त्या साधकाने उत्तरेला तोंड करून बसावे. वशीकरणासाठी पूर्वेला तोंड करून बसावे. जारणमारण विद्येसाठी, शत्रूच्या पारिपत्यासाठी, वैरभाव नाशासाठी दक्षिणेस तोंड करून बसावे. धनप्राप्तीची इच्छा असल्यास पश्चिम दिशेला तोंड करून बसावे. व्यक्ती आणि वस्तू आकर्षित करण्यास, लोकप्रिय होण्यास आग्नेय दिशेस, शत्रूच्या नाशासाठी वायव्य दिशेस, देवदर्शनासाठी नैर्क्रत्यदिशेस आणि ईशान्येस ज्ञानसाधनेसाठी मुख करून बसावे. ॥१४१, १४२॥
मोहनं सर्वभूतानां बंधमोक्षकरं भवेत् । देवराजप्रियकरं, सर्वलोकवशं भवेत् ॥१४३॥
हा श्रीगुरुगीतापाठ सर्व प्राण्यांना मोहून टाकणारा, सर्व बंधनातून मुक्त करणारा, देवराजाची प्रीती संपादन करून देणारा आणि सर्व लोकांना वश करून घेणारा होय. ॥१४३॥
सर्वेषां स्तंभनकरं, गुणानां च विवर्धनम् । दुष्कर्मनाशनं चैव, सुकर्मसिद्धिदं भवेत् ॥१४४॥
सर्वांना मंत्रमुग्ध करणारे, स्तंभित बनविणारे, गुणवर्धक, दुष्कर्मनाशक, सुकर्मफलदायी असे हे श्रीगुरुगीतापठण होय. ॥१४४॥
असिद्धं साधयेत्कार्यं, नवग्रहभयापहम् । दुःस्वप्ननाशनंचैव, सुस्वप्नफलदायकम् ॥१४५॥
श्रीगुरुगीता जपणाऱ्याचे अपूर्ण कार्य पूर्ण होते. असिद्ध सिद्ध होतो, अपयश जाऊन यश येते, नवग्रहांची पीडा दूर होते, वाईट स्वप्नांचा नाश होतो. चांगली स्वप्ने सत्य, खरी ठरतात. ॥१४५॥
सर्वशान्तिकरं नित्यं, तथा वंध्यासुपुत्रदम् । अवैध्यव्यकरं स्त्रीणां, सौभाग्यदायकं सदा ॥१४६॥
श्रीगुरुगीतापठणाने सदैव सर्व तऱ्हेची शांती मिळते, वठलेल्या झाडाला पालवी फुटते म्हणजे वंध्येला पुत्रप्राप्ती होते. वैधव्याची कुऱ्हाड कोसळत नाही. नेहमी सौभाग्याचीच वृद्धी होते. ॥१४६॥
आयुरारोग्यमैश्वर्य-पुत्रपौत्रप्रवर्धनम् । अकामतः स्त्री विधवा, जपान्मोक्षमवाप्नुयात् ॥१४७॥
श्रीगुरुगीता जपल्याने आयुष्य दीर्घायुष्य होते, आरोग्य लाभते. ऎश्वर्यप्राप्ति होते, पुत्रपौत्रवृद्धि होते. विधवा स्त्री जर निष्काम भावाने श्रीगुरुगीता जपेल तर तिला मुक्ती मिळेल. ॥१४७॥
अवैधव्यं सकामा तु, लभते चान्यजन्मनि । सर्वदुःखभयं विघ्नं, नाशयेच्छापहारकम् ॥१४८॥
विधवेने भक्तीने श्रीगुरुगीता जपल्यास दुसऱ्या जन्मी सौभाग्यप्राप्ति होईल. विरक्ती, वैराग्य पूर्ण होऊन निष्काम भक्ती जमेल. श्रीगुरुगीता सर्व दुःख, भय, विघ्न, आणि शाप ह्यांचा नाश करणारी आहे. ॥१४८॥
सर्वबाधाप्रशमनं, धर्मार्थकाममोक्षदम् । यं यं चिंतयते कामं, तं तं प्राप्नोति निश्चितम् ॥१४९॥
श्रीगुरुगीता जपल्याने सर्व बाधांची शांती होते. पीडा पीडित नाहीत. काहीही बाधत नाहीत. जीवन सर्वांगपरिपूर्ण होते. जो जे वांच्छिल ते लाभते. ॥१४९॥
कामितस्य कामधेनुः, कल्पनाकल्पपादपः । चिंतामणिश्चिंतितस्य, सर्वमंगलकारकम् ॥१५०॥
सकाम भक्ती करणाऱ्यांची श्रीगुरुगीता सर्व इच्छापूर्ती करणारी कामधेनु होय. कल्पना (कामना) करणाऱ्यांसाठी संकल्प (कामना) तडीस नेणारा कल्पवृक्ष म्हणजे श्रीगुरुगीता होय. मन व बुद्धीप्रमाणे चित्ताचेही सुखसमाधान, शांती श्रीगुरुगीतापठणाने होते म्हणून श्रीगुरुगीता चिंतामणी पण होय. श्रीगुरुगीता सर्वांचेच मंगल करते. अमंगलाला शुद्ध करून त्याचे कल्याण साधते. सर्व प्रश्न मिटवते. सर्व गरज भागवते. ॥१५०॥
मोक्षहेतुर्जपन्नित्यं, मोक्षश्रियमवाप्नुयात् ॥ भोगकामो जपेद्यो वै, तस्य कामफलप्रदम् ॥१५१॥
मोक्षप्राप्तीचे ध्येय ठेवणाऱ्या मुमुक्षूने श्रीगुरुगीता नित्य जपली तर त्याला मुक्ती नक्की लाभेल. त्याचबरोबर केवळ भोगप्राप्तीचीच इच्छा धरून श्रीगुरुगीता वाचणाऱ्यालाही सर्व इंद्रियभोगसुख लाभेल. ॥१५१॥
जपेच्छाक्तश्च सौरश्च, गाणपत्यश्च वैष्णवः । शैवश्च सिद्धिदं देवि, सत्यं सत्यं न संशयः ॥१५२॥
हे देवी, शक्तीचे उपासक, सूर्योपासक, गणपति, विष्णु, शिव आदि सर्व भिन्न भिन्न देवदेवतांचे उपासक असतील तरी त्यांनाही श्रीगुरुगीता सिद्धिप्रद होते; ह्यात मुळीच संशय नाही. ॥१५२॥
अथ काम्यजपे स्थानं कथयामि वरानने । सागरे वा सरित्तीरेऽथवा हरिहरालये ॥१५३॥
शक्तिदेवालये गोष्ठे सर्वदेवालये शुभे । वटे च धात्रीमूले वा, मठे वृंदावने तथा ॥१५४॥
पवित्रे निर्मले स्थाने, नित्यानुष्ठानतोऽपि वा निर्वेदनेन मौनेन, जपमेतं समाचरेत् ॥१५५॥
हे सुमुखी, आता कामना धरून कोठे जप करावा, त्या स्थानाचे वर्णन करतो. समुद्रकिनारी किंवा नदीकाठी, शिवालयात वा विष्णूच्या मंदिरात, देवीच्या देवळात, गाईच्या गोठ्यात किंवा कोणत्याही देवालयात, शुभ अशा वडाच्या किंवा आवळीच्या झाडाखाली, मठात, तुळशीवृंदावनाजवळ तसेच पवित्र निर्मळ स्थळी ह्या श्रीगुरुगीताजपाचे नित्य अनुष्ठान शांत मनाने, मौन धारण करून श्रीगुरुगीतेचा जप करावा. ॥१५३, १५४, १५५॥
स्मशाने भयभूमौ तु, वटमूलान्तिके तथा । सिध्द्यन्ति धौत्तरे मूले, चूतवृक्षस्य सन्निधौ ॥१५६॥
स्मशान, भय वाटणाऱ्या जागी, आम्रवृक्षाच्या सान्निध्यात किंवा धोत्र्याच्या मुळाशी बसून श्रीगुरुगीता जपावी. ॥१५६॥
गुरुपुत्रो वरं मूर्खस्तस्य सिध्द्यन्ति नान्यथा । शुभकर्माणि सर्वाणि, दीक्षाव्रततपांसि च ॥१५७॥
सर्व शुभ कर्मे, दीक्षा, व्रत, जप ही सफल कोणाला होतात तर केवळ गुरुपुत्रालाच होय. मग लौकिक दृष्ट्या तो मूर्ख असला तरीही. ॥१५७॥
संसारमलनाशार्थं, भवपाशनिवृत्तये । गुरुगीतांभसि स्नानं, तत्त्वज्ञः कुरुते सदा ॥१५८॥
संसारमलनाशार्थ, भवबन्धमुक्त होण्यासाठी गुरुतत्त्वज्ञानी श्रीगुरुगीतारूपी जलात सदैव स्नान करतो. ॥१५८॥
स एव च गुरुः साक्षात्, सदा सद्ब्रह्मवित्तमः । तस्य स्थानानि सर्वाणि, पवित्राणि न संशयः ॥१५९॥
सद् ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे तोच साक्षात गुरू होय. गुरू ज्या ठिकाणी निवास करतो ती सर्व स्थाने पवित्र होत ह्यात संशय नाही. ॥१५९॥
सर्वशुद्धः पवित्रोऽसौ, स्वभावाद्यत्र तिष्ठति । तत्र देवगणाः सर्वे, क्षेत्रे पीठे वसन्ति ही ॥१६०॥
सर्वशुद्ध व पवित्र असा गुरू सहजरीत्या जेथे वास्तव्य करतो त्या क्षेत्री, त्या पिठात सर्व देवतांचा समुदाय निवास करतो. ॥१६०॥
आसनस्थः शयानो वा, गच्छँस्तिष्ठन् वदन्नपि । अश्वारूढो गजारूढः, सुप्तो वा जागृतोऽपि वा ॥१६१॥
शुचिष्मांश्च सदा ज्ञानी, गुरुगीताजपेन तू । तस्य दर्शनमात्रेण, पुनर्जन्म न विद्यते ॥१६२॥
ज्ञानी गुरुभक्त आसनावर बसो, शयन करित असो, चालत असो की उभा असो, बोलत असो, घोड्यावर वा हत्तीवर स्वार होऊन असो, गाढ झोपेत असो वा जागृतीत असो; जो श्रीगुरुगीताजपाने पवित्र बनून गेलेला आहे तो कोणत्याही अवस्थेत असो, कोणताही व्यवहार करो, त्याच्या केवळ दर्शनानेही पुनर्जन्म प्राप्त होत नाही. ॥१६१,१६२॥
समुद्रे च यथा तोयं, क्षीरे क्षीरं घृते घृतम् । भिन्ने कुंभे यथाकाश-स्तथात्मा परमात्मनि ॥१६३॥
जसे समुद्रात दुसरे पाणी, दुधात दूध, तूपात तूप आणि आकाशात घटाकाश मिळून जाते, तसा परमात्म्यात आत्मा मिळून जातो. ॥१६३॥
तथैव ज्ञानी जीवात्मा, परमात्मनि लीयते । ऎक्येन रमते ज्ञानी, यत्र तत्र दिवानिशम् ॥१६४॥
ह्या प्रकारे ज्ञानी जीवात्मा परमात्म्यामध्ये लीन होतो. हे एकत्व प्राप्त करून घेणारा ज्ञानी रात्र असो की दिवस असो, कधीही कोठेही एकटाच आनंदात मग्न असतो. ॥१६४॥
एवंविधो महामुक्तः, सर्वदा वर्तते बुधः । तस्य सर्वप्रयत्नेन, भावभक्तिं करोति यः ॥१६५॥
सर्वसंदेहरहितो, मुक्तो भवति पार्वती । भुक्तिमुक्तिद्वयं तस्य, जिव्ह्राग्रे च सरस्वती ॥१६६॥
गुरु सदाच मुक्त असतो. अशा गुरूची जो सर्वप्रयत्नपूर्वक भावपूर्ण होऊन भक्ती करतो तो देखील निःसंशय मुक्त होतो. गुरुभक्ताला भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. गुरुभक्ताच्या जिभेच्या टोकावर प्रत्यक्ष सरस्वती वास करते. ॥१६५,१६६॥
अनेन प्राणिनः सर्वे, गुरुगीताजपेन तू । सर्वसिद्धिं प्राप्नुवन्ति, भुक्तिं मुक्तिं न संशयः ॥१६७॥
श्रीगुरुगीता जपाने सर्व प्राणी सर्व सिद्धींची, भोग व मोक्ष दोन्हींची प्राप्ती करतात ह्यात मुळीच शंका नको. ॥१६७॥
सत्यं सत्यं पुनः सत्यं, धर्मं सांख्यं मयोदितम् । गुरुगीतासमं नास्ति, सत्यं सत्यं वरानने ॥१६८॥
हे सुमुखी, मी वर सांगितलेले धर्मयुक्तज्ञान सत्य आहे, पूर्ण सत्य आहे. श्रीगुरुगीते समान खरोखर अन्य काहीही नाही. ॥१६८॥
एको देव एकधर्म, एकनिष्ठा परंतपः । गुरोः परतरं नान्यन्नास्ति तत्त्वं गुरोः परम् ॥१६९॥
गुरुच एक देव होय. गुरुच एक धर्म होय. गुरुच एक निष्ठा, एकच श्रेष्ठ तपही होय. गुरुहून श्रेष्ठ काही नाही. गुरुपुढे महान कोठलेही तत्त्व नाही. ॥१६९॥
माता धन्या पिता धन्यो, धन्यो वंशः कुलं तथा । धन्या च वसुधा देवि, गुरुभक्तिः सुदुर्लभा ॥१७०॥
हे देवी, गुरुभक्ताचे माता-पिता, कुळ, वंश धन्य होय. तसेच पृथ्वी देखील गुरुभक्तांमुळे धन्यता पावते. ॥१७०॥
शरीरमिंद्रियं प्राणश्चार्थः स्वजनबांधवाः । माता पिता कुलं देवि, गुरुरेव न संशयः ॥१७१॥
हे देवी, शरीर, इंद्रिये, प्राण, स्वजनबांधव, माता, पिता, कूळ इ. सर्व गुरुमध्ये सामावून आहेत, ह्यात संशय नाही. ॥१७१॥
आकल्प जन्मना कोट्या, जपव्रततपःक्रियाः । तत्सर्वं सफलं देवि, गुरुसंतोषमात्रतः ॥१७२॥
हे देवी, कल्पांतापर्यंत म्हणजे कोटी कोटी जन्मांचे जप, व्रत, तप इ. सर्व क्रिया एक मात्र गुरूला संतोषित, प्रसन्न केल्यानेच सफल होऊ शकतात. दुसऱ्या कशाने नाही. ॥१७२॥
विद्यातपोबलेनैव, मंदभाग्याश्च ये नराः । गुरुसेवां न कुर्वन्ति, सत्यं सत्यं वरानने ॥१७३॥
विद्या, तप, बल ह्यांच्या गर्वाने गर्विष्ठ झालेले जे गुरुसेवा करित नाहीत ते हे सुंदरी, खरोखरच मोठे मंदभाग्याचे होत. ॥१७३॥
ब्रह्माविष्णुमहेशाश्च, देवर्षिपितृकिन्नराः । सिद्धचारणयक्षाश्च, अन्येऽपि मुनयो जनाः ॥१७४॥
ब्रह्मा, विष्णु, महेश, देवर्षि, पितर, किन्नर, सिद्ध, चारण, यक्ष, तसेच दुसरे मुनिजन ह्यांना देखील केवळ गुरुभक्तिने आपापले पद प्राप्त झाले आहे. ॥१७४॥
गुरुभावः परं तीथमन्यतीथं निरर्थकम् । सर्वतीर्थाश्रयं देवि, पादांगुष्ठं च वर्तते ॥१७५॥
गुरुभाव हेच श्रेष्ठ तीर्थ होय. अन्य तीर्थे निरर्थकच होय. हे देवी, सर्व तीर्थांचा आधार गुरुचरणाचा अंगठा होय. ॥१७५॥
जपेन जयमाप्नोति, चानंतफलमाप्नुयात् । हीनकर्म त्यजन्सर्वं, स्थानानि चाधमानि च ॥१७६॥
श्रीगुरुगीतेचा जप केल्याने माणूस विजयी होतो आणि अनंत फलप्राप्ति करून घेतो. हीन, त्याज्य कर्मे त्यागून; अधम, अपवित्र स्थाने वर्ज्य करून - टाळून श्रीगुरुगीताजप करावा. ॥१७६॥
उग्रध्यानं कुक्कुटस्थं, हीनकर्मफलप्रदम् । गुरुगीतां प्रयाणे वा, संग्रामे रिपुसंकटे ॥१७७॥
जपते जयमाप्नोति, मरणे मुक्तिदायकम् । सर्वकर्म च सर्वत्र, गुरुपुत्रस्य सिद्धति ॥१७८॥
कोंबडा ज्याचे वाहन आहे अशा देवदेवींचे उग्र ध्यान, प्रखर चिंतन हे हीन कर्मफळ देणारे आहे. हीनासन वर्ज्य करावे. प्रयाणाच्या वेळी, प्रस्थान ठेवण्याच्या वेळी, प्रवासास निघतेवेळी, शत्रूचे संकट उपस्थित झाल्यास, परचक्राचे भय निर्माण झाल्यास, श्रीगुरुगीतेचा जप करण्याने जय प्राप्त होतो. मरणोत्तर मुक्ती मिळते. गुरुपुत्राची सर्व कर्मे सर्वत्र सिद्ध होतात. ॥१७७,१७८॥
इदं रहस्य नो वाच्यं, तवाग्रे कथितं मया । सुगोप्यं च प्रयत्नेन, मम त्वं च प्रियात्विति ॥१७९॥
जे हे रहस्य तुझ्यासमोर मी आतापर्यंत सांगितले आहे, ते कोणासमोरही प्रगट करू नये. प्रयत्नपूर्वक हे रहस्य गुप्त ठेव. तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून ही गुह्य गोष्ट मी तुला सांगितली. ॥१७९॥
स्वाविमुख्यगणेशादिविष्ण्वादीनां च पार्वती । मनसापि न वक्तव्यं, सत्यं सत्यं वदाम्यहम् ॥१८०॥
हे पार्वती, कार्तिकस्वामी, गणेशादि मुख्य गण तथा विष्णू आदि देवांनाही हे रहस्य सांगण्याचे तू मनात देखील आणू नकोस. ही गोष्ट मी तुला द्विरुक्तीने सांगत आहे. ॥१८०॥
अतीवपक्वचित्ताय, श्रद्धाभक्तियुताय च । प्रवक्तव्यमिदं देवि, ममात्माऽसि सदा प्रिये ॥१८१॥
हे देवी, ज्याचे चित्त पूर्ण परिपक्व झालेले आहे, श्रद्धा आणि भक्ती ह्यांनी युक्त आहे त्यालाच हा उपदेश करावा. हे प्रिये, तू सदैव माझेच आत्मरूप असल्याने हे आत्मकथन तुला केले. ॥१८१॥
अभक्ते वंचके धूर्ते, पाखंडे नास्तिके नरे । मनसापि न वक्तव्या, गुरुगीता कदाचन ॥१८२॥
जो अभक्त, वंचक, कपटी, लबाड, धूर्त, पाखंडी, नास्तिक आहे अशाला ही गुरुगीता सांगण्याचे कधी मनातही आणू नये. ॥१८२॥
इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखंडे ईश्वरपार्वतीसंवादे गुरुगीता समाप्त ॥
श्रीगुरुदेवदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय !