स्वामी समर्थ मठ हि एक प्रासादिक वस्तू असून इ. स. २०१७ मध्ये या मठाला १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ठिकाणी सातत्याने धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम सुरूच असतात. सामुदायिक तसेच अखंड नामस्मरणाचे अनेक कार्यक्रम येथे चालूच असतात. हि वस्तू पूर्णतया अध्यात्मिक स्पंदनाने भरलेली आढळते कारण चेंबूर मठामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना आपले पुत्र मानले अशा स्वामीसुतांना श्रीस्वामी महाराजांकडून प्रसाद म्हणून लाभलेल्या 'आत्मलिंग पादुका' याच मठात आहेत. अशा या सिद्धस्थानी दर्शन व नामस्मरण सोहळ्याचा लाभ घेता येणे आपल्या स्वामीभक्तांसाठी खरोखरच परमभाग्याची बाब आहेच. प्रतिवर्षी चेंबूर मठात श्री स्वामी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात सलग ३ दिवस साजरा केला जातो. पण यंदा या मठाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून यावर्षी हा "श्री स्वामी जयंती" उत्सव ५ दिवसांचा साजरा करण्यात आला. या उत्सवाचा शुभारंभ रविवार, २६ मार्च २०१७ रोजी ४ वाजता या सामुदायिक नामस्मरण सोहळ्याने करण्यात आला. मागीलवर्षी याच नामस्मरण सोहळ्याला उदंड प्रतिसाद लाभला होता. या ही वर्षी अधिकाधिक संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहून स्वामी नामस्मरणाचा व स्वामींच्या आत्मलिंग पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला व स्वामींचा आशीर्वाद घेऊन भक्तांनी कृतकृत्यता व्यक्त केली. याच वेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतेश्री स्वामी जयंती चैत्र शु. द्वितीया या दिवशी असते. स्वामी प्रकट दिन साजरा करण्याची सुरवात स्वामी सुतानीच केली. स्वामीसुत व आत्मलिंग पादुकांची गोष्ट खालिल प्रमाणे आहे.
श्री स्वामीसुत महाराज व त्यांना प्रसाद म्हणून लाभलेल्या आत्मलिंग पादुकांची गोष्ट
प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना आपला पुत्र मानलं असे श्रीस्वामीसुत महाराज हे फार विलक्षण विभूतिमत्व होते. श्री हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत महाराज व त्यांचे मित्र गजानन खत्री या दोहोंना त्यांच्या व्यापारात फार नुकसान झाले. त्यांचे एक स्नेही लक्ष्मण पंडित हे देखील व्यापारात बराच तोटा झाल्याने कर्जबाजारी झाले होते. तरीही स्नेही या नात्याने त्यांनी या उभयतांची हमी घेतली. त्यावेळी लक्ष्मण पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले. ही स्वामीकृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले. श्रीस्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की, "तू कुळावर पाणी सोड व माझा सुत (पुत्र) हो!" झालेल्या फायद्यातील तीनशे रुपये त्यांनी सोबत आणले होते, त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने त्यांनी सलग चौदा दिवस वापरल्या. अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात, अशी इच्छा होती, पण स्वामींनी मात्र त्या पादुका प्रसन्नतेने आपल्या हात, पाय, तोंड वगैरे अवयवांस लावून नंतर श्रीस्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या. स्वत: श्रीस्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत. तसंच "या आत्मलिंगामध्ये माझा आत्म्याचा निवास आहे" असे स्वामी सांगत. हे आत्मलिंग त्यांनी स्वामीसुतांना प्रसाद देताना म्हटले, "तू तुझे घरदार, धंदा सोडून दर्याकिनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर!" अशी आज्ञा केली. स्वामीसुतांनी श्रीस्वामीआज्ञा तंतोतंत पाळत खरोखरच आपला होता नव्हता तो सारा संसार उधळून लावला. त्यांच्या पत्नीचे सारे दागिने दान केले. साधे मंगळसूत्र देखील शिल्लक ठेवले नाही. ते स्वत: भगवी कफनी नेसले व बायको ताराबाईला पांढरे पातळ नेसायला लावून स्वामीसेवा सुरु केली. अत्यंत निस्पृहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवाकार्य केले. हजारो लोकांना स्वामीभक्तीस लावले. सुरुवातीला त्यांनी मुंबईच्या कामाठीपुरा या भागात मठ स्थापन केला, नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरीत केला. श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडी मठात होत्या. कालांतराने श्रीस्वामीसुतांच्या पश्चात श्रीस्वामीसुत यांच्या कन्या सिद्धाबाई यांनी श्री स्वामींच्या आत्मलिंग पादुका व इतर वस्तू सध्याच्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेल्या. याच मठाला यावर्षी तब्बल १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
स्वत: श्रीस्वामींनी अनेकांना दर्याकिनाऱ्यावर जाऊन स्वामीसुतांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केलेेली होती. स्वामीसुतांनी अवघ्या मुंबईला स्वामीभक्तीचे वेड लावले. "श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ' या महामंत्राने मुंबई अक्षरशः दणाणून सोडली. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्रीस्वामीसुतांनीच प्रथम शके १७९२ म्हणजेच १८७० साली सुरू केली. मुंबईकरांमध्ये श्रीस्वामीभक्तीची आवड निर्माण व्हावी म्हणून स्वामीसुत अनेक उत्सव मुंबईमध्ये देखील साजरे करत. स्वामींच्या आत्मलिंग पादुका या चेंबुर मठात असल्याने मुंबईकरांसाठी हे प्रति अक्कलकोटच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
श्रीस्वामीसुतांच्या नंतर श्री स्वामींच्याच कृपाशीर्वादाने स्वामीसुतांचे वंशज नलावडे कुटुंबीय या चेंबूर मठाची व्यवस्था उत्तम रीतीने सांभाळात असून श्रीस्वामी जयंती, महापर्वणी उत्सव, गुरुपौर्णिमा, श्रीदत्त जयंती इत्यादी उत्सव नलावडे कुटुंबीय मनोभावे साजरे करतात. यावर्षी या मठाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने यावर्षी संपन्न होणाऱ्या उत्सवांना विशेष महत्त्व आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीस्वामीकृपाशीर्वादाने श्री स्वामीसुतांचे वंशज नलावडे कुटुंबीय यांच्या संमतीने व तेथील सेवेकरी भक्तांच्या साथीने रविवार, २६ मार्च २०१७ रोजी ४ वाजता "श्री स्वामी जयंती उत्सवाचा" शुभारंभ सामुदायिक नामस्मरण सोहळ्याने झाला. तर सर्वांनी अशा या विशेष नामस्मरण सोहळ्याचा तसेच श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
सर्व स्वामी भक्तांनी या प्रासादिक मंदिरास अवश्य भेट द्यावी.
श्री स्वामी समर्थ मंदिर,
चेंबूर (पूर्व), जैन मंदिर जवळ, मुंबई.
संपर्क: ९२२०२३८३४३/९८३३२२८८३०/