श्रीगोरक्षनाथ, श्रीस्वामी समर्थ व श्री शंकर महाराज यांचे वास्तव्याने परम पावनतपस्याभूमी श्रीक्षेत्र माचणूर !
अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज जेव्हा मंगळवेढा व आसपासच्या परिसरात वावरत असत, त्याकाळी त्यांचे वास्तव्य जेथे काही काळ झाले होते असे मंगळवेढ्याजवळील श्रीक्षेत्र माचणूर! भगवान श्रीसिद्धेश्वर महादेव, पंढरपूर येथीलश्रीविठ्ठलाच्या पदस्पर्शाने पुनित होऊन माचणूरच्या दिशेने प्रवाहितहोणारी भीमा नदी व नाथपंथी सिद्धांचे ठाणे असलेल्या या रमणीय स्थानी श्रीस्वामी समर्थ रमले यात नवल ते काय!धनकवडीचे श्रीशंकर महाराजांचे बालपणीचा काळसुद्धा याच क्षेत्री गेल्याचा उल्लेख प्रत्यक्ष श्रीशंकर महाराजांनी त्यांचे अंतरंग शिष्य श्री अप्पा धनेश्वर यांना स्वमुखाने सांगितलेल्या गोष्टीत केला आहे. ‘माझे आडनाव उपासनी असून सुमारे १८०० साली माझा जन्म मंगळवेढ्याजवळ झाला. बालपणी मी फार व्रात्य होतो. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी एकदा एका हरिणाचा पाठलाग करत असताना ते माचणूर येथील चंद्रभागेतीराजवळील जंगलात शिरले. मी तेथे गेलो तेव्हा एका शिवमंदिराजवळ गेलो. तेथून त्या हरिणास बाण मारणार तोच तेथे एक संन्यासी आला. त्याने त्या हरिणास आपल्या हातात उचलले व मला म्हटले, ‘‘बेटा, निरपराध प्राण्यास का मारतोस? शिकार करायची तर जंगली प्राण्यांची कर.’’ पण मी त्याच्याकडे लक्ष न देता हरिणास बाण मारला. पण तो त्याला लागताच बोथट होऊन खाली पडला. परत एकदा बाण मारला असता तसेच घडले. मी गोंधळलो. तेव्हा तो संन्यासी हसला, त्याने त्या हरिणास खाली सोडले व महाराजांस जवळ घेऊन कुरवाळले. तो संन्यासी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थमहाराजहोते.’ नंतर श्रीस्वामी समर्थमहाराज शंकर महाराजांस घेऊन तेथे सहा महिने राहिले, त्यांचेकडून साधना करून घेतली. त्यानंतर श्री स्वामींनी श्री शंकर महाराजांस तपस्येकरिता हिमालयात पाठविले. हिमालयातील काही कालाच्या तपस्येनंतर श्रीशंकर महाराज नगर जिल्ह्यातील वृद्धेश्वर येथे आले.’ असे हे श्रीक्षेत्र माचणूर!
परमेश्वराचे, साधुसंतांचे एक निमिषभर वास्तव्य झाले तरीही ती भूमी पावन होते, येथे तर या अशा महासिद्धांचा दीर्घकाळ वास झालेला आहे. मग अशा स्थळाचे माहात्म्य काय वर्णावे! श्रीस्वामी समर्थ, श्रीशंकर महाराज, नाथसंप्रदायी, शिवभक्त, वैष्णव, निर्गुणोपासक अशा कुठल्याही भक्ताने, साधकाने दर्शन घ्यावे, वास्तव्य करावे, साधना करावी असे हे एक पावन तपस्याक्षेत्र आहे. म्हणूनच अलिकडच्या काळात श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांना त्यांच्या पंधरा वर्षांच्या दीर्घ तपस्येअंती ते जेव्हा अक्कलकोट क्षेत्री आले तेव्हा श्रीस्वामी समर्थांनी त्यांना आदेश दिला की, ‘मंगळवेढा येथील माचणूर, येथे श्रीसिद्धेश्वर मंदिराजवळ तुझी कर्मभूमी आहे तेथे जा व कार्य सुरु कर!’.असा आदेश देऊन जणू काळाच्या ओघात लपलेल्या श्रीक्षेत्र माचणूर या तपस्यास्थानास साधकजनांसाठी पुन:प्रकाशात आणण्याची श्रीस्वामी समर्थांची योजना होती जणू! श्रीक्षेत्र माचणूर येथील अक्कलकोट स्वामींच्या वास्तव्याची खूण मुंबई येथील कै. सौ. विमलाबाई पुरोहित उर्फ काकू मॉं यांस कशी मिळाली त्याची कथा पुढे पाहूच. श्रीक्षेत्र माचणूर येथील वास्तव्यात श्रीबाबांनी मोक्षधाम आश्रमाची स्थापना केली व संतधर्म प्रसाराची मुहुर्तमेढ रोवून श्रीबाबा महाराज १९७१ साली सूक्ष्मात विलीन झाले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढातालुक्यात मंगळवेढ्यापासून आठ मैलांवर भीमा नदीच्या तीरावरील ‘श्रीक्षेत्रमाचणूर’ हे छोटेसे खेडेगाव. येथून वाहणारी भीमा नदी, तिच्या प्रवाहाच्या चंद्रकोराकृति दर्शनामुळे चंद्रभागा नावाने ओळखली जाते. या चंद्रभागेच्या नाभीमध्यावर व भूगर्भरेषेवरश्रीक्षेत्र माचणूर हे पवित्र क्षेत्र वसले आहे. त्याकारणाने तपस्येसाठी हे स्थान फार महत्वाचे आहे व अशी स्थाने फारच दुर्मिळ आहेत. हा परिसर इतका निवांत व रमणीय आहे की इथे कुठेही बसल्यास साधकाची वृत्ति सहजीच अंतर्मुख होऊन जाते व भान कूटस्थाकडे केंद्रित होते. नीरानरसिंगपूरपासून पंढरपूरपर्यंत पसरलेला भीमेकाठचा परिसर ‘हरिक्षेत्र’ आणि पंढरपूरपासून सरकोली, माचणूर, सिद्धापूर हा भाग ‘हरक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे.अशा प्रकारे हरिहरांच्या मंगल मिलनाचे वरदान लाभल्याने हा भाग ‘हरिहर’ क्षेत्र म्हणून ओळखला जातो. श्रीगुरुचरित्र ग्रंथात श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज आपल्या शिष्यांस तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा देतात व विविध क्षेत्रांची माहिती देतात त्यात माचणूर क्षेत्राचा उल्लेख आहे. (अध्याय १५. ओवी ५१. हरिहरक्षेत्र महाख्याती | समस्त दोष परिहरती | तैसीच असे भीमरथी | दहा गावे तटाकयात्रा ॥५१॥) माचणूरला श्रीसिद्धेश्वरांचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरासमोर नदीला सुंदर विस्तीर्ण घाट आहे. तो दानशूर राणी अहिल्यादेवीने बांधला असे म्हणतात. यावरूनच त्या काळी हे तीर्थक्षेत्र फार प्रसिद्ध असले पाहिजे हे ध्यानात येईल. पात्रात श्रीजटाशंकराचे देवालय असून वर वेशीकडील एका बाजूला श्रीमल्लिकार्जुन मंदिर आहे.दुसर्या बाजूला मोक्षधाम आश्रमात काशीहून आलेले शिवभक्त संन्यासी परमहंस श्रीकाशिनाथ महाराज, ज्यांनी येथे तपाचरणकेले व शके १५४५च्या ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला ब्रह्मलीन झाले, त्यांचीसमाधि आहे. तेथेच श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांचेही समाधि मंदिर आहे वतो भागमोक्षधाम आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे.बेगमपूर येथे चौदापंधरा वर्षे वयाचे परमहंस सिद्धपुरुष होते.त्यांची समाधि नदीतीरावर आहे.
श्रीक्षेत्र माचणूर ही प्राचीनतपस्याभूमी असून ‘नाथांचे ठाणे’ म्हणून ओळखले जाते. चंद्रभागेच्या नाभीमध्य असलेल्या या क्षेत्रात श्रीगोरक्षनाथ यांनीएकवीस दिवसांचे तपानुष्ठान करून एका गुप्तलिंगाची स्थापना केली होती असे श्रीबाबा महाराज सांगत असत. अधर्माचा नाशकरून धर्मस्थापना करण्यास्तव यति श्रीसिद्धरामांचे आगमन झाले होते. श्रीसंत बाबामहाराजांनी आपल्या एका काव्यात यासंबंधी पुढीलप्रमाणे उल्लेख केलेलाआहे.
भूमीभार सारुनी ज्ञानदीप्ती पाजळी |धर्मवीर प्रसवले सिद्धराम ये स्थळी॥
यापुढील संपूर्ण काव्याचा सारांश पुढीलप्रमाणे आहे:
दुष्टता व अधर्म वाढून मंदिरे भ्रष्ट झाली, कुणी कुणाला विचारीनासे झाले. भक्ति विकळ झाली, धैर्यवान धीर सोडून थरथर कापू लागले. सृष्टीरूपद्रौपदीचे हे दैन्य दूर करण्यास तिला कुणीही त्राता उरला नाही, अशा वेळी श्रीसिद्धराम या स्थळी प्रवेशले. त्यावेळी विमल जलवाहिनी, कोरीव कड्यातून वाहणार्या चंद्रकोराकृति भीमेच्या कांठी दक्षिण दिशेस घोर वनराजी असलेल्या स्थानी पूजा केलेले एक शिवलिंग श्रीसिद्धरामांच्या द्दष्टीस पडले.हिंस्त्र श्वापदांची भीती न बाळगता, देहप्रीति दूर करून या निबिड अरण्यात कोणता भक्त शिवपूजेस येऊ शकेल असे वाटून पूजकाच्या दर्शनाकरिता श्रीसिद्धराम आतुर झाले. मावळत्या सूर्यास वंदन करून रात्रीच्या अंधाराचे भय न बाळगता श्रीसिद्धराम, तो दिव्यपुरूष ध्यानावस्थेत शिवाच्या पूजकाला शोधू लागला आणि जगन्माता अंबिकेला पूजा करताना पाहून ‘अंब अंब’ म्हणून तिचे पदी लीन झाला. अत्यानंदाने सिद्धरामांचे देहभान हरपले. विश्वजननीने प्रेमाने त्या पुत्रास स्वहस्ताने धरून जागविले आणि हर्षोत्फुल्लतेने शिवलिंगाची कथा सांगितली. त्रैलोक्यात वंद्य असणारे, गौरविले जाणारे ऋषिकुळातील तेजस्वी, ज्ञानी, शिवस्वरूप, हेतुरहित भ्रमण करीत असलेले श्रीवामदेव एक दिवस मावळतीच्या सुमारास येथे आले. चंद्रभागेत स्नान केले. रात्रीचा काळोख पसरू लागला होता, अशा वेळी त्यांना जळावर लिंग तरंगताना दिसले. हर्षित चित्ताने त्यांनी ते पाण्यातून काढून जमिनीवर ठेवले. वेदोक्त वाणीने त्या लिंगाची स्थापना करण्यास्तव त्यांनी शौनकादि ब्रह्मनिष्ठ, भारद्वाज मुनि, कौशिकादि सांख्यमति, शुकदेवांसारखे आत्मनिष्ठ, जपी, तपी, योगी, धर्मवीर, भक्तवृंद, सान, थोर, तत्वदर्शीयांना निमंत्रणे केली. विमल मनाचे हे सारे धर्मधुरीण या स्थळी आले. पुरोहितांची योजना करून यज्ञकर्म आरंभिले आणि या मातृलिंगाची स्थापनाकेली. देवांनाही अचंबा वाटावा असा हा सोहळा संपन्न झाला. ते हे माचणूर-ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर!
श्रीसिद्धेश्वर मंदिराचा सर्व परिसर अत्यंत सुंदर असून सर्व बांधकाम पाषाणाचे आहे. दगडी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दोन्हीबाजूला सुंदर देवड्या आहेत. डावीकडे श्रीमल्लिकार्जुन मंदिर लागते. पुढे प्रशस्त पायर्या उतरल्यावर द्वितिय प्रवेशद्वार आहे. श्रीसिद्धेश्वराच्या मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. श्रीसिद्धेश्वर मंदिरात प्रवेशद्वारापाशी तीन फूट उंचीचा भव्य नंदी आहे. आत उजवीकडे श्रीगजानन आहेत. गाभार्यात जाण्यासाठी पहिला दरवाजा पाच फूट तर दुसरा अडीच फूट उंचीचा असे दोन दरवाजे ओलांडून जावे लागते. मंदिर परिसरात मोठ्या ओवर्या, दीपमाळी व खोल्या आहेत. गाभार्यात श्रीसिद्धेश्वर महादेवांचे भव्य शिवलिंग आहे. चांदीचा भव्य मुखवटाही आहे. मंदिराच्या आवारात उजवीकडे श्रीस्वामी समर्थांनी स्थापन केलेल्या लहानशा पाषाण दत्तपादुकाआहेत. तेथून मंदिराच्या तटाला लागून साधारण पन्नास पायर्या खाली उतरल्यावर भीमानदीच्या किनारी बांधलेला प्रशस्तघाट नजरेत भरतो. नदीपात्रात मध्यभागी श्रीजटाशंकराचे छोटेसे परंतु सुबक व देखणे मंदिर आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्यास मंदिरापर्यंत पाण्यातून चालत अन्यथा बोटीने जाता येते. मंदिराच्या गाभार्यात श्रीजटाशंकराचे सानिद्ध्यात ध्यानास बसल्यास एक गूढ अन विलक्षण शांतीचा अनुभव येतो. भीमानदीला १९५६ साली आलेल्या पुरात पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले होते. पूर इतका प्रचंड होता की पाणी सिद्धेश्वराच्या मंदिरात आले होते. त्या पुरात श्रीजटाशंकर मंदिराचा कळस वाहून गेला. महाशिवरात्रीला येथे श्रीसिद्धेश्वर महादेवांची फार मोठी यात्रा भरते व मोठा उत्सव साजरा केला जातो. लाखो भाविक श्रीसिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात सोमवारीसुद्धा येथे बरेच भाविक दर्शनास येतात.
नाथपंथी सिद्ध श्रीगोरक्षनाथ,परमहंस श्री काशिनाथ महाराज, अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ,धनकवडी येथील समाधिस्थ सत्पुरुष श्रीशंकर महाराजव अलिकडच्या काळात (इ.स. १९५४ ते १९७१) नाथपंथी संत श्रीबाबा महाराज आर्वीकरया सर्व महात्म्यांच्या वास्तव्यामुळे आध्यात्मिकतेने स्पंदित असलेले हे श्रीक्षेत्र माचणूर सर्व पंथाच्या साधकांसाठी उत्तम साधनाक्षेत्र आहे. श्रीबाबामहाराजांनी मोक्षधाम आश्रमाची स्थापना केली होती. आता तेथे श्रीबाबांचे समाधि मंदिर आहे. मोक्षधाम आश्रमाचा परिसर अत्यंत रमणीय तसेच पवित्र व शांत आहे. इथल्याइतकी निवांतता व एकांत क्वचित ठिकाणी सापडेल. येथे येणारा साधक, मग तो कुठल्याही संप्रदायाचा असो, त्याला येथून मार्गदर्शन मिळेल असे स्वत: श्रीबाबामहाराज सांगत असत. सिद्ध सारणा संघ या श्रीबाबांनी स्थापन केलेल्या संस्थेद्वारे मोक्षधाम आश्रमाची व्यवस्था पाहिली जाते. साधकांसाठी आश्रमात निवासाची सोय आहे व पूर्वकल्पना दिल्यास संस्थेद्वारे भोजनप्रसादाची व्यवस्थासुद्धा केली जाते. एकांतप्रिय साधकांनी जप-तप-ध्यान-पारायण-चिंतन करून लाभ घ्यावा असे हे महाराष्ट्रातील एक विरळा तपस्यास्थान आहे.
धन्यसिद्ध ग्राम
धन्यसिद्ध ग्राम | सिद्धांचा हा गांव |
सिद्धेश्वरदेव| नांदे तेथें ॥
वाहे चंद्रभागा | चरणापासोन |
तीर्थराज पावन | भक्तजनां ॥
संतमुनि तेथें | इच्छिले पावती |
सहज भाव भक्ति | आवडे देवा ॥
मूळ गणपति | सेवेमाजीं रत |
फणिधर डुल्लत| नाचे पुढें ॥
मोरेश्वर म्हणे | तयाच्या दर्शने |
पळताती विघ्ने | दशदिशां ॥
–संत मोरेश्वर (प. पू. संत श्रीबाबामहाराज आर्वीकर)
कै. विमलाबाई पुरोहित यांना झालेला श्रीस्वामी समर्थ यांचा श्रीक्षेत्र माचणूर व श्रीबाबा महाराज आर्वीकर यांचा दृष्टांत
इ. स. १९५४ दरम्यान मुंबईत श्री रं. स. उर्फ काका गोडबोले यांचेकडे श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचा सत्संग होऊ लागला. गिरगावात सौ. विमलाबाई पुरोहित रहात होत्या. श्रीसाईबाबा व श्रीस्वामी समर्थ यांच्या भक्त. संसारात कन्येचे अल्पवयात निधन झाल्याने त्यांचे मन सैरभैर झाले होते. सौ. विमलाबाईंच्या घरच्यांनी, त्यांना खूप आग्रह केला की तिने एकदा श्रीबाबांचे दर्शन घ्यावे, जेणेकरून दु:खी मनाला दिलासा मिळेल. परंतु बराच काळ गेला तरी ते काही घडले नाही.
एके दिवशी पहाटेच्या सुमारास स्वामीभक्त सौ. विमलास स्वप्नात माचणूर दिसले. श्री काशिनाथ महाराजांच्या समाधीस्थानातील मधल्या पडक्या ओवरीत श्रीस्वामी पहुडले होते. ते सौ. विमलला म्हणाले, ‘अगं सडा घालतेस नां!’ आज्ञेचे पालन म्हणून स्वामींच्या पुढील भागात सौ. विमलने सडासंमार्जनास सुरुवात केली. काही क्षणातच सध्याच्या आश्रमाच्या दरवाज्यातून लुंगी-कफनी परिधान केलेला, तेजस्वी चेहरा, भेदक डोळे, जटा-दाढी असलेला, उंचापुरा तापसी तरुण लगबगीने आत येत होता. त्याला पाहून सौ, विमलची बोबडी वळली. हातातला तांब्या तेथेच टाकून ती खाटेवर स्वामींचे चरण जोरजोराने चेपू लागली. चेहरा गोरामोरा झाला होता. स्वामी म्हणाले, ‘काय झालं! अशी घाबरलेली कां?’ तिने केवळ आत येणार्या त्या व्यक्तीकडे अंगुली-निर्देश केला. पाठीवरून हात फिरवीत स्वामी म्हणाले, ‘घाबरू नकोस! अग, हा तर आपला मोरू! मोरू ये. बैस येथे’. स्वामींनी स्मित केले आणि सौ. विमलचा हात मोरेश्वराच्या हातात दिला आणि म्हणाले, यापुढे आता हा तुझा सांभाळ करील! स्वप्न संपले व सौ. विमलला जाग आली. दुसरे दिवशी विमल श्री गोडबोले यांचेकडे जाण्यासाठी निघाली. नियमित साई-लीला वाचणार्या सौ. विमलने साईबाबांना म्हटले तुमच्या पोथीतला एखाद्या प्रसंगाची अनुभूति आली तरच नतमस्तक होईन. हरीची लीला हरी जाणे. झाले. इकडे सीताराम प्रासादात श्रीबाबा सौ. गोडबोलेताईंना डोक्याला गुंडाळण्यासाठी पांढरे फडके मागत होते. सौ. ताईंना समजेना की पूर्वी कधी डोक्याला काही न गुंडाळणारे श्रीबाबा त्यांचेकडे फडक्याचा आग्रह कां धरीत होते. फडके मिळताच श्रीसाईबाबांसारखे डोक्याला फडके गुंडाळून श्रीबाबा बसले. तेवढ्यात सौ. विमल आली. श्रीबाबांना पाहून साईबाबांचेच दर्शन झाल्याचा आनंद तिला झाला. दुसर्याच क्षणी पहाटे पडलेल्या स्वप्नातील विभूति ती हीच असे म्हणून ती श्रीबाबांकडे टक लावून पाहू लागली. श्रीबाबा प्रसन्नपणे म्हणाले, ‘काय पटली कां ओळख?’त्याबरोबर सौ. विमलच्या डोळ्यांतून अश्रुगंगा वाहू लागली, श्रीबाबांचे स्पर्शांने नंतर ती थांबली. अशी ही त्यांची प्रथम भेट!
काकू मॉं काही काळाने दादर येथील ‘भिकोबा निवास’ या इमारतीत राहावयास आल्या. १९५८ पासून त्या वास्तूत श्रीबाबांचे खूप वास्तव्य झाले. श्रीबाबांच्या परिवारात सर्वजण त्यांना काकू मॉं असेच संबोधत असत. श्रीबाबांवर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. आजही माचणूर येथील श्रीकाशिनाथ महाराजांच्या समाधि मंदिरातील मधल्या ओवरीतील देवघरात श्रीस्वामी समर्थांची तसबीर पहावयास मिळते.
एका पत्रात श्रीबाबा लिहितात, ‘मला माणूस समजून फसू नकोस. माणसाच्या आकारातून कुणी वेगळाच विहरत आहे हे लक्षात ठेव!’
अक्कलकोट संस्थानचे खजिनदार श्री नामदेवराव कासेगावकर हे श्रीबाबांस (१९५४) भेटले. त्यांनी सांगितलेली हकिगत
‘‘स्वामी समर्थांच्या मठात मी रोज दर्शनास जात असे. त्यावेळी महाराज (श्रीबाबा) पारावर बसले होते.त्यांची दृष्टी उर्ध्व लागलेली होती. एक-दोन दिवस ते पारावरच बसलेले होते. चौथे दिवशी उत्सुकता म्हणून जवळ गेलो. नमस्कार केला. ‘महाराज, आपण कोठले? कोण गाव?’ म्हणून विचारले मात्र! तोंच ‘तुम्ही काय सोयरीक जमवायला आलात की काय?’ असे महाराज रागावून म्हणाले. ‘वेळ असेल तर बसा नाहीतर चालू लागा.’ असे ऐकल्यावर मी तेथेच बसलो. थोडा वेळ बोलल्यानंतर लक्षात आले की हा महात्मा आहे. नंतर भीतभीतच विचारले, ‘महाराज आपण प्रवचन कराल का?’ त्यांनी माझ्याकडे एकटक पाहिले व नंतर म्हणाले,’करू की’. अशी आमची पहिली भेट!’’
पहिले दिवशी प्रवचन सुरु होण्यापूर्वी मी त्यांना विषय सांगितला ‘सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज’. परंतु महाराज म्हणाले की, ‘मी फक्त भक्तियोगावरच प्रवचन करीन. दुसरा विषय हवा असल्यास मी प्रवचन करणार नाही.’ ६ दिवस सुंदर प्रवचने झाली. पहिले दिवशी प्रवचनानंतर ताट फिरविले. लोकांनी त्यात पैसे टाकले. मग ते ताट महाराजांपुढे ठेवले. महाराज एकदम रागावले. ‘हे कुणी सांगितले?’ असे विचारले, ‘मी एकही पैसा घेणार नाही’. एका गृहस्थाने धीर करून विचारले की, ‘मग हे पैसे पेटीत टाकू?’ महाराज म्हणाले, ‘ते मी कसे सांगू? पैसे पेटीत टाका हे सांगण्याचा अधिकार मला नाही’. त्या पैशांचे काय करावे हा पेच पडला. तेव्हा महाराजच म्हणाले, ‘हे ताट तेथे ठेवा. ज्यांनी पैसे टाकले ते त्यांनी परत न्यावेत’. प्रत्येकाने आपापले पैसे परत उचलून घेतले व ताट रिकामे झाले. महाराज तेथील दर्ग्यात रोज जायचे पण एकटेच. ते काय करीत ते कुणासच माहित नाही. ते त्यांचा ठावठिकाणा कोणासच समजू देत नसत. माझ्या घरी येऊन जात पण कधी वस्तीला राहिले नाहीत. श्रीबाबांचे वास्तव्य अक्कलकोटास व्हावे म्हणून आम्ही जागा पाहिल्या पण त्यांना पसंद पडल्या नाहीत. ब्रह्मपुरीतील महामुनी ही माझे आजोळ. श्रीबाबांना तेथे घेऊन गेलो असता, बाजूचे माचणूर येथील श्री काशीनाथ महाराजांची समाधि हे स्थान त्यांना आवडले. अशा रितीने अक्कलकोट स्वामींचा माचणूर येथे रहाण्याचा आदेश सहजच पूर्ण झाला. त्यावेळी माचणूरचे वयोवृद्ध सधन शेतकरी श्री तात्या भवाळकर यांनी श्रीबाबांचे भोजनाची जबाबदारी स्वीकारली. हळुहळु गावतील बरीच तरुण मंडळी जमू लागली. श्रीमती तुकामाई डोके यांनी बाबांना आपली शेतजमीन दान केली. त्यांचे नातू श्री नानासाहेब डोके, हे सिद्ध सारणा संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनीही आपली माळजमीन सिद्ध सारणा संघास दान दिली. सोलापूरचे सोन्याचांदीचे व्यापारी होनप्पा गायकवाड यांनीही आपली दोन एकर जमीन आश्रमास दान दिली.
श्रीक्षेत्र माचणूर जवळील पवित्र पंचक्षेत्रे
अर्धनारी- अर्धनारीनटेश्वराचे मंदिर आहे.
उचिठाण (उच्चस्थान)- येथील टेकडीवर अनेक यज्ञ झाले आहेत. य यज्ञभूमीतील भस्म श्रीसिद्धेश्वरांच्या पूजेसाठी आणले जाते.
बठाण (अवस्थान)- हे उचिठाणच्या खाली वसलेले गाव. यज्ञसमयी या गावातसिद्धांचा निवास असे.
बेगमपूर (घोडेश्वर)- प्राचीन काळी परमहंसस्वामी नावाचे सत्पुरुष चंद्रभागेच्या प्रवाहावर घोंगडे टाकून त्यावरआसनस्थ होऊन श्रीसिद्धेश्वराच्या दर्शनास येत असत. त्यांची समाधि बेगमपूर येथे नदीकाठी आहे.
सिद्धापूर- येथे चंद्रभागेच्या प्रवाहात गणपति आहे. मकर संक्रांतीचे दुसर्या दिवशी त्या मूर्तीचे दर्शन होते व तेथे मोठी यात्रा भरते.
ऐतिहासिक महत्त्व
दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता व त्यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने मंगळवेढ्याजवळील ब्रह्मपुरी गावाजवळ भीमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या आसपास किल्ला बांधला. औरंगजेबाचे येथे बरीच वर्षे वास्तव्य होते. या काळात किल्ल्यात मोगल सैन्याची मोठी छावणी होती. या भागाचे नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर आपल्या सैनिकांना श्रीसिद्धेश्वराचे शिवलिंग फोडण्याची आज्ञा केली. पण त्यासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. या प्रकाराने संतापलेल्या औरंगजेबाने श्रीशंकरांचा उपमर्द करण्यासाठी नैवेद्य म्हणून मांसाचा नैवेद्य पाठवला, पण श्रीसिद्धेश्वराचे पुढ्यात ठेवलेल्या नैवेद्याचे ताटावरील वस्त्र बाजूला केल्यावर मांसाच्या जागी पांढरी फुले दिसली. मांसाचा नूर पालटला त्यामुळे या ठिकाणाला मासनूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले. या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिद्धेश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. माचणूर पासून एक मैल अंतरावर बेगमपूर गाव आहे. तेथे बादशहाच्या बेगमची कबर आहे. या परिसरात अनेक ठिकाणी टेहाळणी बुरुज चांगल्या भक्कम अवस्थेत आजही उभे असलेले दिसतात. या बुरुजावर जाण्यासाठी त्यांना आतून जिने केलेले आहेत. बुरुजावर उभे राहून शत्रूंच्या आगमनाची चाहूल घेण्यासाठी केलेली त्यावेळची व्यवस्था होय. येथे राहणार्या लोकांनी औरंगजेबाच्या काळी जमिनीत पुरुन ठेवलेल्या संपत्तीची साक्ष अजूनही मिळते. येथे काही शेतकर्यांना जमीन नांगरताना जुनी नाणी, नरनिराळ्या आकाराचे व रंगाचे मणी, अंगठीत वापरण्याचे रंगीबेरंगी खडे व मोहरा वगैरे सापडल्या आहेत. अनेक इतिहासप्रेमी व संशोधक माचणूरला येत असतात.
श्रीक्षेत्र माचणूर येथे कसे जावे?
श्रीक्षेत्र माचणूर सोलापूर-मंगळवेढा मार्गावर सोलापूरपासून सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर आहे. पंढरपूर बाजूने आल्यास अंतर साधारण ३७ किलोमीटर आहे. सोलापूर, मंगळवेढा व पंढरपूर येथून एसटी बसेस मिळतात. मुख्य मार्गा वरील बसथांब्यावर उतरल्यावर तेथून श्रीसिद्धेश्वर मंदिर व मोक्षधाम आश्रम केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. साधकांसाठी आश्रमात निवासाची सोय आहे व पूर्वकल्पना दिल्यास संस्थेद्वारे भोजनप्रसादाची व्यवस्थासुद्धा केली जाते. जास्तीतजास्त साधकांनी येथे येऊन जप-तप-ध्यान-पारायण-चिंतन करून या श्रीक्षेत्राचा लाभ घ्यावा.