संत श्री बाबामहाराज आर्वीकर

जन्म: श्रावण शुद्ध चतुर्दशी शके १८४७ – दि.३ ऑगस्ट १९२५
महानिर्वाण: मार्गशीर्ष पौर्णिमा शके १८९३ – दि. २ डिसेंबर १९७१

श्रीबाबामहाराजांनी त्यांच्या कुठल्याही ग्रंथात त्यांचे चरित्र देण्यास मनाई केली होती. तसेच त्यांचे स्वत:चे वाङ्‌मय जरी सद्गुरुभक्तीने ओतप्रोत ओथंबलेले असले तरीही आपल्या सद्गुरुंबद्दलसुद्धा त्यांनी कधी वाच्यता केली नाही. तरीही बाबांचे शिष्य श्री. रंगनाथ स. उर्फ काका गोडबोले यांनी श्रीबाबांच्या दिव्यामृतधाराग्रंथात दिलेला परिचय पुढीलप्रमाणे आहे:

वर्धा जिल्हयातील आर्वी गावच्या एका धर्मशील व प्रतिष्ठित जोशी घराण्यात श्रीबाबांचा जन्म झाला. अत्यंत निस्पृह, सात्विक व निस्सीम दत्तभक्त प्रभाकरपंत हे श्रीबाबांचे वडील आर्वीला शिक्षक होते. श्रीबाबांच्या आध्यात्मिक जीवनास सुरुवात त्यांच्या वडिलांमुळेच झाली होती. श्रीबाबांच्या वडिलांनी त्यांच्याकडून अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून घेतला होता व त्यामुळे श्रीबाबांची आध्यात्मिक जडणघडण वडिलांद्वारे झाली होती. श्रीबाबांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी प्रभाकरपंतांना देवाज्ञा झाली. नंतर केवळ दोनच वर्षांनी श्रीबाबांनी गृहत्याग केला व गावातील दत्तमंदीरात वास्तव्य केले. त्याकाळात ते भिक्षान्नावर रहात असत. त्यानंतर काही महिन्यातच श्रीबाबांनी आर्वी सोडले व भ्रमंती सुरु केली. नाशिक श्रीक्षेत्री श्रीशंकराचार्यांच्या मठात वास्तव्य केले. त्याकाळात गोदातीरी स्नानानिमित्त येणार्‍या विविध पंथाच्या व आखाड्याच्या अनेक साधुसंतांचे दर्शन श्रीबाबांस झाले. तेथून श्रीबाबा पंढरपूरास गेले. तेथील काही काळ वास्तव्यानंतर त्यांनी उत्तरेस नर्मदाकिनारी ओंकारेश्‍वर गाठले. तेथे श्रीबाबांची भेट श्रीसद्गुरुंशी झाली असे त्यांच्या साधनासंहिता ग्रंथावरून दिसते. त्यानंतर श्रीबाबांनी वृंदावन गाठले व तेथे सुमारे अडीच वर्षांचा दीर्घ काळ व्यतीत केला. वृंदावन-मथुरा येथील वास्तव्यानंतर श्रीबाबा गंगाकिनारी हृषीकेशला गेले. तेथे स्वर्गाश्रमासमोरील एका कुटीत वर्ष दीडवर्ष राहिले. त्यानंतर काही काळ उत्तरकाशीस राहिले. हरिद्वार, हृषिकेश, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, बद्रिनाथ, केदारनाथ अशी स्थाने पहात त्यानंतर श्रीबाबा नेपाळला गेले. तेथून पश्‍चिम बंगाल येथील श्रीरामकृष्ण परमहंसांचे दक्षिणेश्‍वर, कालीका माता या ठिकाणी निवास करून श्रीबाबा जगन्नाथपुरीस गेले. अशी अनेक तीर्थक्षेत्रे करीत नंतर श्रीबाबा महाराष्ट्रात परत आले. सप्टेंबर १९५४ साली साली श्रीअक्कलकोट स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात श्रीबाबांचे प्रथम प्रवचन झाले आणि त्यांची प्रसिद्धी अक्कलकोटला झाली. पुढे त्यांच्या प्रवचनामुळे सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढे आदि भागातील मंडळी श्रीबाबांना जोशीमहाराज म्हणून ओळखू लागली. त्यानंतर श्रीबाबा श्रीक्षेत्र माचणूर येथील सिद्धेश्‍वर मंदीराच्या जवळील श्री  काशिनाथ महाराजांच्या समाधीजवळील पडक्या जुनाट ओवरीत रहात असत. नोव्हेंबर १९५५ च्या श्रीक्षेत्र माचणूर येथील चातुर्मास्यसमाप्ति महोत्सवाने त्यांची कीर्ति संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पसरली, इतका तो महोत्सव भव्योदात्त झाला. १९५६ साली श्रीबाबांचा चातुर्मास श्रीक्षेत्र आळंदी येथे झाला. तेथेच वयाच्या केवळ एकतिसाव्या वर्षी त्यांनी ‘साधनासंहिता’ हा आत्मानुभवाचा अमोल ग्रंथ लिहिला. १९५७ साली मुंबईतील लक्ष्मीनारायण बागेत साधनासप्ताह महोत्सवाने मुंबईतील लोकांना श्रीबाबांचा परिचय झाला. मुंबईत असताना दादर भागातील भिकोबा निवास येथील श्रीमती पुरोहित यांचे घरी श्रीबाबांचा निवास असे. सौ. पुरोहित काकूंस श्रीबाबांनी मातेप्रमाणे मानले होते व त्यांना ते काकू मॉं असे संबोधित असत. श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावर श्रीबाबांनी दिव्यामृतधारा हा बृहत्‌ग्रंथ लिहिला. श्रीज्ञानदेवांना अभिप्रेत असलेले भक्ति, ज्ञान व योगाचे स्वानुभवान्त:स्फुर्त अपूर्व असे अंतरंग दर्शन या ग्रंथात आहे. साधकांना अत्यंत मार्गदर्शक असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाखेरीज श्रीबाबांचे बरेच अन्य वाङ्‌मय  आहे व त्याची सूची पुढे दिलेली आहे. देहत्याग करेपर्यंत श्रीबाबांचे वास्तव्य श्रीक्षेत्र माचणूर येथेच होते. मार्गशीर्ष पौर्णिमा शके १८९३ (दि. २ डिसेंबर १९७१) रोजी श्रीबाबांनी माचणूर येथे देहत्याग केला.

श्रीबाबांनी स्वत: लौकिकार्थाने शिष्यपरंपरा निर्माण केली नाही परंतु त्यांची श्रीगुरुदेवांची कल्पना फार भव्य होती. आपल्या प्रार्थनेत श्रीगुरुदेवांस नमन करताना श्रीबाबाम्हणतात,

॥ ॐ स्वानंदस्वरूपस्थिताय, परब्रह्मणे, सर्वात्मक गुरुदेवाय नमो नम: ॥
॥ जगन्मूर्तिने, निजात्मने, प्राणधारिणे, व्यक्ताव्यक्तस्थिताय गुरुदेवाय नमोऽस्तु ते ॥

श्रीबाबांची प्रवचने व वाङ्‌मय हे त्यांचे साधकांस मार्गदर्शन आहे. श्रीबाबा सांगत की एकवेळ मला विसरलात तरी हरकत नाही परंतु माचणूरला विसरू नका. येथे राहून साधकांनी उपासना करावी व त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, मग तो साधक कुठल्याही संप्रदायाचा असो, येथून मिळेल. हा सर्वच परिसर इतका निवांत व रमणीय आहे की इथे कुठेही बसल्यास साधकाची वृत्ति सहजीच अंतर्मुख होऊन जाते व भान कूटस्थाकडे केंद्रित होते.

श्रीबाबा महाराजांनी स्वत: लिहिलेले त्यांचे जीवन त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे आहे.

श्री. बाबामहाराजांनी स्वत: लिहिलेले त्यांचे साधनाकालीन वर्णन

सारेची देखिले वैभव सुखाचे | भोगिल्या आशेचे अनुभवे ॥१॥
उत्तम वाहनी हिंडलो स्वैर | भरविला दरबार वैभवाचा ॥२॥
वस्त्र मूल्यवान पायतळी माझ्या | वैभवाचा राजा अनुभविला ॥३॥
श्रीमंती नुरली जगामाजी कोठे | राजेपण दिठे मज पाहता ॥४॥
गज अश्वरथ झुलविले दारी | साक्ष हरिद्वारी अजुनी आहे ॥५॥
सेवकांचे तांडे चाले मागेपुढे | पाही चहुकडे वैभवासी ॥६॥
जेथे जावे तेथे मानची मिळे हो | विजय पताका फडके माझी ॥७॥
दरिद्रीही आम्ही सुखविले फार | नदीनाले डोंगर अनवाणी ॥८॥
उघड्या अंगाने फिरलो सर्वत्र | वैभवाला परत पाठविले ॥९॥
गिरीकंदराशी शिरलो भुयारी | घोर वनांतरी फिरलो आम्ही ॥१०॥
मैत्रीश्वापदांची प्रेमे आम्ही केली | एकांती देखिली माझी मूर्ती ॥११॥
भिक्षा दारोदार कराया हिंडलो | स्वानंदे भरलो माझ्या अंगे ॥१२॥
नाही भीती आम्हा सुख सामग्रीची | ठेव समाधानाची बापे दिली ॥१३॥
साता दिवसांचे पडले उपवास | तरी ना सायास घडले काही ॥१४॥
तीन दिवसांची शिळी भाकरी ती | आनंदा भरती आणावया ॥१५॥
लंगोटीही आम्हा नव्हती एकदा | हर्षानी सदा झाके अंग ॥१६॥
दारिद्रयाचा राजा वैभवाचा स्वामी | अहर्निश स्वामी भरलो ऐसा ॥१७॥
एकटा चाललो महापुरांतरी | शिवालयांतरी ओमकारीच्या ॥१८॥
रत्नांचा मुकुट महंत म्हणोनी | घातला वृंदावनी सार्‍या संती ॥१९॥
तैसेची सुखाने पादत्राण डोई | ठेविले मी पाही जनार्दन ॥२०॥
पायी तुडविला बर्फाचा डोंगर | धनाचे ढिगार ठायी ठायी ॥२१॥
ऐसी बादशाही भोगिली मी सुखे | आणिक ती दु:खे आनंदाने ॥२२॥
किती सांगू बापा हाल या देहाचे | बंध ते चोरीचे भोगले मी ॥२३॥
वेडा म्हणोनिया मार तो साहिला | कथा खांडव्याला झाली ऐसी ॥२४॥
वाहिले मी ओझे हमालाच्या परी | हीच मुंबापुरी साक्ष आहे ॥२५॥
भांडी घासायासी तीन दिस होतो | हॉटेली चहा तो ग्राहकांसी ॥२६॥
बंदरी राहिलो कोळसा फेकाया | धन्य वाटे माया मज सारी ॥२७॥
तैसाचि फिरलो राजभवनात | राहिलो सुखात तीन ठायी ॥२८॥
हजारो कोसांची पायपीट केली | बिहारी बंगाली मंत्र विद्ये ॥२९॥
परी आता झालो गोसावी मुळाचा | वीट वैभवाचा मज आला ॥३०॥
सोळा वरूषांचा निघालो आडरानी | पंढरी वाटेनी म्हणत विठ्ठल ॥३१॥
कुठेही पाहावे काहीही करावे | देई तेचि खावे भगवंत ॥३२॥
जरीचे अंबारी देह सजविला | गजावरी मिरवला नेपाळात ॥३३॥
परी गोड नाही वाटे माझ्या जीवा | म्हणोनिया देवापाशी आलो ॥३४॥
उणेपणा काही उरलाच नाही | सुखे सर्वव्यापी प्राप्त झाली ॥३५॥
चिंध्या पांघुरल्या उतार वस्त्र्यांच्या | विंध्याद्री गिरीच्या कडेलागी ॥३६॥
ऐसे बहु आहे चरित्र विटाळ | अज्ञानाचा मूळ ऐसा सारा ॥३७॥
हे काय सांगावे जगापुढे आम्ही | सदाचे निकामी वैभव हे ॥३८॥
याहुनी थोर हरिभक्त झाले | शरीर विटंबिले बहू कष्टे ॥३९॥
आम्ही काय केले व्हायचे ते झाले | हरिने ठेविले तैसे वागू ॥४०॥
सारेची जाणावे मृगजळी व्याप | वृथा हे विलाप आलापाचे ॥४१॥
बहू ऐसे आहे चरित्र आमुचे | परी ते वाणीचे वृथा शीण ॥४२॥

श्रीबाबां महाराजांची वाङ्‌मय संपदा.

१.दिव्यामृतधारा – श्रीज्ञानेश्‍वरी बारावा अध्याय प्रगत दर्शन
२.साधना सहिंता
३.मनोपदेश
४.प्रार्थना प्रभात
५.प्रभात पाठ
६.गुरुगीता
७.हरिपाठ
८.आचार संहिता
९.स्तोत्रपंचक
१०.स्वधर्म चेतना
११.वैकुठ चतुर्दशी व मानव गीता
१२.गीता प्रबोध
१३.ब्रह्मनिनाद
१४.माचणूरचे हृद्गत
१५.साधक विहार सूत्रे
१६.देवाचिये द्वारी (ज्ञानदेव हरिपाठ विवरण)
१७.संतधर्म: जीवन दर्शन
१८. The Message of Machnoor
१९.ब्रह्मवाणी (ईशावास्योपदेशक भाष्य)
२०.नवविधा भक्तियोग
२१.ब्रह्मानंद लहरी (भजनांजली)
२२.श्रीदत्तोपासना
२३.पत्रोत्सव (पूज्य श्रीबाबांची विविध पत्रे)

ग्रंथसंपदा मिळण्याचे स्थळ 

प्रकाशक: मोक्षधाम प्रकाशन मंडळ
द्वारा श्रीनिवास केसकर,
२०६, अमृतकुंभ सोसायटी, चितळे पथ, दादर मुंबई ४०००२८
दूरध्वनि: ०२२-२४२२३७३७

श्रीक्षेत्र माचणूर, श्री बाबामहाराज आश्रमाचा परिसर, काही ठिकाणे.

समोरील बाजू

१)रामवृक्ष मंदिर (आता वृक्ष अस्तित्त्वात नाही)
२)श्रीबाबांनी स्थापन केलेला मारुति. उजव्या बाजूस दिसणार्‍या खोलीचे नूतनीकरण करून तिचे रुपांतर आता सुंदर साधना कुटीत केले गेले आहे.
३)श्री बाबामहाराज समाधि मंदिर
४)श्रीबाबांनी स्थापन केलेला मारुति
५)प्रार्थना सभागृह- येथे नित्य सायंकालीन प्रार्थना होते
६)प्राचीन बुरुज
७)श्री गुरुदेव कुटीर

(परमहंस काशिनाथ महाराज समाधि मंदिर) आत एक ओवरी ब त्यापुढे समाधि आहे. त्यावर शिवलिंग स्थापन केलेले आहे. प्रवेशद्वारापाशी खाली उतरण्यास पायर्‍या आहेत व भूमिगत तपस्या खोली आहे. ती सध्या वापरात नाही. या वास्तूचा जिर्णोद्धार करणे आहे.
आतील ओवरी जेथे श्रीबाबा १९५४ मध्ये रहात असत. आता तेथे लाकडी मंदिर असून श्रीबाबांनी वृंदावनहून आणलेली श्रीकृष्ण भगवानांची मूर्ति आहे व अक्कलकोट स्वामींचे छायाचित्र आहे व यांची नित्यपूजा होते व सायंकालीन आरती केली जाते.

आतील समाधिस्थान.

साधना कुटी (ध्यानमंदिर)

आत श्रीबाबांची सुंदर छायाचित्रे व साधनासंहिता ग्रंथातील साधकोपयोगी मार्गदर्शक अवतरणे आहेत.  साधारण सात-आठ साधक साधनेस बसू शकतात अशी आसनव्यवस्था आहे.
समाधि मंदिराच्या उजवीकडून दिसणारी चंद्रकोरीप्रमाणे वाहणारी भीमा नदी
आश्रमातून प्राचीन सिद्धेश्‍वर मंदिराकडे जाणारे द्वार आश्रमाच्या डावीकडे प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आहे.पायर्‍या उतरून पुढे प्राचीन सिद्धेश्‍वर मंदिर आहे.

प्राचीन सिद्धेश्‍वर मंदिर

सिद्धेश्‍वर मंदिरातील श्रीगणपति

सिद्धेश्‍वर मंदिरातील नंदी

श्री सिद्धेश्‍वर महादेव

ओवर्‍या व दीपमाळ

खोल्या

नदीकडील भाग

मागून वर दिसणारी श्री गुरुदेव कुटीर वास्तू

नदीपात्रातील छोटेसे जटाशंकर मंदिर

सिद्धेश्‍वर मंदिर व श्रीबाबांच्या आश्रमाचा परिसर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित आहे. या जिर्णोद्धार कार्यासाठी आवश्यक असलेली पुरातत्त्व खात्याची परवानगी संस्थेस मिळालेली आहे.

॥  ॐ श्रीगुरुदेव ॥

नम्र निवेदन

श्रीक्षेत्र माचणूर येथील ‘श्रीगुरुदेव कुटीर’ जिर्णोद्धार  व श्री संत बाबामहाराज आर्वीकर आश्रम विकास व सुशोभिकरण निधि

सप्रेम नमस्कार,

नाथपंथीय संत श्री बाबामहाराज आर्वीकर यांच्या श्रीक्षेत्र माचणूर आश्रमातील ‘श्री गुरुदेव कुटीर’ ही परमहंस श्री काशिनाथ महाराज समाधि मंदिर ही प्राचीन वास्तू अत्यंत जीर्ण झालेली असून भग्नावस्थेत आहे व त्याची तातडीने संपूर्णपणे नव्याने पुनर्बांधणी होणे अत्यावश्यक आहे. आश्रमाचा सर्व परिसर सिद्ध सारणा संघ या श्रीबाबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या अखत्यारीत आहे.सिद्ध सारणा संघ संस्था महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त सोलापूर यांचेकडे नोंदणीकृत (नोंदणी क्रं. अ/६९८/सो/२५-२-१९७२) आहे. या जिर्णोद्धारासाठी आवश्यक असलेली पुरातत्त्व खात्याची परवानगीसुद्धा संस्थेद्वारे मिळविण्यात आलेली आहे. प्रथम मंदिराच्या मागील नदीच्या बाजूने खूप खालील पातळीपासून दगडी सरंक्षक भिंत (retaining wall) बांधावी लागेल  व त्यानंतरच मंदिराचे काम करता येईल. त्याकारणाने या कार्यासाठी खूप मोठा निधि आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे संस्थेस आश्रमात येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा व आश्रमाचे सुशोभिकरण करण्यासाठी काही निधि लागणार आहे.

या दोन्ही योजनांसाठी मिळून खूप मोठा निधि, अदमासे एक करोड रुपये, इतका आवश्यक आहे.  मदत रोख, धनादेश वा Online, NEFT/RTGS द्वारे करता येईल.

तरी या कार्यासाठी आपण सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी व जमल्यास आपापल्या परिचितांद्वारेसुद्धा निधि उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हे कार्य त्वरित करता येईल. मदत रोख, धनादेश याद्वारे करता येईल. संस्थेच्या बँक खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Account name: SIDDHA SARANA SANGH
Account Number: 11558469498
IFSC Code: SBIN0004746
Bank: State Bank of India
Branch: GHODESHWAR
District: SOLAPUR
State: MAHARASHTRA

आपल्या अमूल्य वेळेबद्दल धन्यवाद!

आपणाकडून या पवित्र कार्यास भरघोस अर्थसहाय्य मिळावे अशी नम्र विनंतिआहे.

अध्यक्ष
श्री नानासाहेब डोके

अध्यक्ष/मुख्य विश्वस्त
(सिद्ध सारणा संघ)
श्रीक्षेत्र माचणूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर ४१३३०५
मोबाईल क्रं. ९७३०३०२३७७

मुंबई संपर्क: श्रीनिवास केसकर, मोबाईल क्रं. ९८६९४२३७३७  दूरध्वनी क्रं. ०२२-२४२२३७३७

अधिक माहितीसाठी ई-मेल संपर्क : gurudevkuteer@gmail.com

सूचना: आपली देणगी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावर कृपया आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व देणगीची रक्कम श्री नानासाहेब डोके किंवा श्री केसकर यांस कळवावी व ही माहिती वरील इमेल वर पाठवावी म्हणजे आपणांस पावती पाठविता येईल व संस्थेस या कार्याची माहिती देता येईल.