स्थान: नगरमध्ये सावडी परिसरात, मनमाड रोड
सत्पुरूष: प. पू. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज
विशेष: श्री. क्षीरसागर महाराज प्रतिष्ठीत दत्तमंदीर
ओळख: वेदपाठ शाळा
प. पू. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत ११ मार्च १९७४ यादिवशी श्री दत्तमंदिराची स्थापना झाली. या मंदीर परिसरात अत्यंत नयनमनोहर व पवित्र वास्तु श्री लक्ष्मी मंडप व वेदांत या वास्तु उभ्या केल्या. स्वामीजींचे ध्येय वेदविद्येचे संगोपन व संवर्धन होते. त्यामुळेच स्वामीजीने वेदांत विद्यापीठाची स्थापना केली. वेद यज्ञ आणि धर्मशास्त्र येथे गुरूकुल पद्धतीने शिकविले जाते. पूर्वी वेद, मंत्र हे ऋषींना आपल्या समाधी काळात स्फुरत ते शिष्यांना शिकवीत असत. ते मंत्र गुरूकडून शिष्यांकडे जात असत. याठिकाणीही तरुण शिष्य येतात. १२-१४ वर्षे राहून वैदीक मंत्र, यज्ञ पद्धती, मंत्रशास्त्र, वैदिक सुक्त शिकतात व जातात. चारीही वेद शिक्षणाची सोय येथे आहे.
श्रीक्षीरसागर महाराजांना वयाच्या ७व्या वर्षी साक्षात्कार झाला. त्यांनी वेदविद्या संगोपनांचे विशेष उद्दीष्ट धरले. आज १००पेक्षा जास्त विद्यार्थी येथे विविध वेदांचे अध्ययन करीत आहेत.
स्थान महात्म्य
सध्याच्या अशांत व धकाधकीच्या जीवनात तरुणांना मन:शांती प्राप्त व्हावी या उद्देशाने या मंदिराचे निर्माण केले आहे. येथील दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्रृगेरी मठाचे शंकराचार्य यांनी केली. सदर दत्तमंदीर वेद विद्यापीठाच्या मागच्या बाजूस असून ते बन्सी पहाडपूर दगडात हलक्या गुलाबी रंगात बनवले आहे. हे सर्व कारागीर राजस्थानातून आणलेले होते. सदर मंदीराचे बांधकाम पूर्णतया शास्त्रोक्त पद्धतीने केलेले आहे व शास्त्रार्थानुसारच बांधकाम आहे. मंदिराचा शिलान्यास आश्र्विन शुद्ध ९ (२००२)मध्ये झाला. त्यावेळी श्रृंगेरीच्या शंकराचार्याचे विशेष प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी महाराष्ट्राचे विविध भागातून घनपाठी ब्राह्मण उपस्थित होते. या मंदिरास लागणारा सर्व निधी भक्तांकडून भिक्षा मागून जमा करण्यात आला.
या संस्थानामार्फत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भक्तांची सत्संग मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत. ही मंडळे भारतातच नाहीत तर परदेशातही आहेत. मंदीराचे कार्यक्रम स्वामीजींचे विचारधन प्रसृत करण्यासही सत्संग मंडळे कार्यरत आहेत. याच संस्थानामार्फत गुरुवाणी, अमृतकलश सद्गुरू संवाद यासारखी मासिक प्रकाशने व इतर धार्मिक पुस्तके प्रकाशित केली जातात.
"वैदिक धर्म व संस्कृती छात्रांना अध्यापनाच्या मार्गाने स्पष्ट होते. क्षीरसागर महाराजांचा उपदेश गुरुवाणीतून सर्वत्र प्रसारीत केला जातो. धर्मशास्र व भक्तीमार्ग यातील तत्त्वबोध अमृतकलश या पुस्तकाचे रूपाने प्रकट झालेला आहे." क्षीरसागर महाराजांचा उपदेश उपदेशामृत नावाचे खंडातून समाविष्ट झालेला आहे. त्यांच्या काही लेखांचे हिंदी, गुजराथी, कन्नड भाषांत अनुवाद झालेले आहेत. वेदकार्य हे सामान्य जनांपर्यंत पोहोचवावे हिच आश्रमाची इच्छा आहे.
हे मंदीर देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगात हे सर्वात मोठे दत्तमंदिर आहे.
श्री वेदांतानगर! श्री दत्तात्रेय निवासाची प्रचिती शृंगेरी पीठाधिशांना देखील!
इसवीसनाच्या चवथ्या शतकात श्रीमद्आद्य शंकराचार्यांनी भारतभ्रमण करुन भारताच्या चारही दिशांना मठ स्थापन केले. दक्षिणेकडे शृंगेरी, उत्तरेला ज्योतिर्मठ, पूर्वेला गोवर्धन पीठ जो जगन्नाथ पुरी येथे आहे, व पश्चिमेला द्वारका पीठ आहे. यापैकी सर्वात पहिले पीठ शृंगेरीला स्थापन केले. या सर्व मठात गुरु-शिष्य परंपरा सुरु आहे.
अहमदनगर आणि शृंगेरीचा इतिहास असा की १९८२ साली शृंगेरी पीठाचे तत्कालीन ३५ वे पीठाधिश स्वामी श्री अभिनव विद्यातीर्थ हे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरला आले होते. मात्र तेथे त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या दिनचर्येला अनुकूल नसल्याने इतरत्र शोध सुरु झाला व श्री दत्तात्रेय निवासाची माहिती त्यांना कळाली. तोपर्यंत श्री दत्तात्रेय निवास हे कोणत्याही पीठाला माहिती नव्हते.
अश्या प्रकारे शुभ दिवस उजाडला आणि शृंगेरी स्वामींचे आगमन श्री दत्तात्रेय निवासात झाले. पाऊल ठेवता क्षणी त्यांना या स्थानाच्या कडक पावित्र्याची व ईश्वरी अस्तित्वाची अनुभूती आली. आश्रमात भगवंताचे उमटलेले श्री नृसिंह सरस्वतींचे चरणकमल पाहताच त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यांनी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांना आलिंगन दिले आणि "आपने ये क्या प्राप्त कर लिया है।" असे भावोत्कट उद्गार देखील काढले. आणि श्री दत्तात्रेय निवासातील चिंतामणी पादुकांना त्रिवार साष्टांग नमस्कार केला व उपस्थित लोकांना श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज ज्यांना ते ब्रह्मचारी महाराज म्हणायचे त्यांचा अधिकार ओळखा! आणि तुम्ही फार भाग्यवान असल्याने असे गुरु प्राप्त झाले आहेत! असे मत प्रकट केले.
त्यानंतर स्वामी श्री श्री श्री अभिनव विद्यातीर्थांनी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचा दर्जा व त्यांना आलेली ईश्वरी अनुभूती ओळखून शृंगेरीला येण्याचे निमंत्रण दिले व या भेटीत अत्यंत दिव्य वस्तू ज्या अनेक काळापासून शृंगेरीच्या पूजेत होत्या त्या परमपूज्य सद्गुरुंना भेट केल्या! तसेच पुढे दर १२ वर्षांनी विजय यात्रेला निघाल्यानंतर श्री दत्तात्रेय निवासात भगवान श्री दत्तात्रेयांच्या सेवेला थांबण्याची परंपरा सुरु केली. त्यानुसार दर १२ वर्षांनी विद्यमान पीठाधिश या ठिकाणी येवून भगवान श्री दत्तात्रेयांची सेवा करतात.
असाच सुवर्ण योग पुन्हा एकदा प्राप्त झाला आहे. २००७ साली तत्कालीन विद्यमान पीठाधिश श्री श्री श्री भारतीतीर्थ स्वामी यांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या भगवान श्री दत्तात्रेय मूर्तीची पूजा व श्री दत्त क्षेत्राचा कलशाभिषेक करण्यासाठी दिनांक १८ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत शृंगेरी पीठाचे विद्यमान पीठाधिश स्वामी श्री विधुशेखर भारती हे श्री दत्तात्रेय निवासात भगवान श्री दत्तात्रेयांची सेवा करण्यासाठी येणार आहेत. तसेच आचार्यांचे आराध्य दैवत भगवान श्री चंद्र मौलेश्वराची पूजा श्री महालक्ष्मी मंडपात होणार आहे. सर्वांनी या दुग्धशर्करा योगाचा लाभ घ्यावा.
nbsp;