महात्मा फुले मंडई आणि अवतीभवतीच्या परिसरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि स्वामी समर्थ मठ या दोन ठिकाणी दत्तभक्त हमखास दर्शन घेतात . पण त्याच भागात छोतसे पण अत्यंत जुने व शांत व प्रासादिक असे दत्त मंदिर आहे. आवर्जून दर्शनाचा योग जूळवुन आणावा. आपणास प्रासादिक अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही .
हे दत्त मंदिर म्हणजे लक्ष्मी रोडवरील जुन्नरकर दत्तमंदिर. अगदी मुख्य गजबजलेल्या लक्ष्मीरोडवर असंख्य दुकानांच्या गर्दीत लपलेली ही अगदी छोटेखानी परंतु प्रसन्न दत्तमंदिराची वास्तु. त्या परिसरात असलेल्या मोठ्या मोठ्या दुकानांच्या मोठाल्या पाट्यांमध्ये या मंदिराची छोटीशी पाटी आपल्याला पटकन दिसूनही येणार नाही.
एका लहानशा बोळातून आत प्रवेश केल्यावर एक लहानसा हॉल आणि त्याला लागून मंदिराचा गाभारा दिसून येतो. गाभाऱ्याला जाळीचा बंद दरवाजा असल्याने जाळीतूनच दर्शन घ्यावे लागते सकाळी महाराजांचे पूजेनंतर हा जाळीचा दरवाजा बंद करतात. पितळी कमानीखाली दत्त महाराजांची संगमरवरी सुबक, प्रसन्न, सुहास्यवदन मूर्ती. मूर्तीचे डोळे अतिशय चित्तवेधक व भक्तांना आश्वासक आहेत. भक्तांची नजर तर महाराजांच्या डोळ्यांवरच खिळून राहते. तीन शिरे सहा हात असलेली ही दत्त महाराजांची मूर्ती. मूर्तीच्या खालच्या दोन हातांमध्ये जपमाळ आणि एक कमंडलू, मधल्या दोन हातांमध्ये डमरु आणि त्रिशूल आणि वरच्या दोन्ही हातांमध्ये शंख आणि चक्र आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला महाराजांच्या माता अनसूया आणि पिता अत्रिमूनी यांच्याही सुबक मूर्ती देखील आहेत.
मंदिरावरील पाटीवर सदर मंदिर हे खाजगी मंदिर असल्याचा तसेच या मंदिराची स्थापना वैशाख वद्य १, इ. स. १७६४ मध्ये झाल्याचा उल्लेख आहे. यावरुनच हे मंदिर किती पुरातन आहे याची कल्पना येते. मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठच्या बाजूला एक पडका, भग्नावस्थेतील वाडा दिसतो. तसेच, डाव्या बाजूला औदुंबर वृक्षाचं खोड दिसलं. बहुधा इमारत बांधकामाच्या वेळी हा वृक्ष छाटण्यात आला असावा. या पुरातन मंदिराबद्दल अधिक जाणून घ्यायच्या उद्देशाने श्री जुन्नरकर यांचेशी संपर्क झाला असता ते म्हणाले, "बाहेरची रहदारी, गजबजाट या कशा कशाचीही जाणिव या मंदिरात महाराजांसमोर बसल्यावर रहात नाही". आत इतकी कमालीची शांतता आणि शीतलता जाणवली. लक्ष्मी रोड परिसरात गेलात तर आडवाटेवरच्या या जुन्नरकर दत्त मंदिराला अवश्य भेट द्या.
गुगल लोकेशन आणि पत्ता
५९६, लक्ष्मी रोड, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०
https://goo.gl/maps/h4KTeGM5Rx5HY7sz5