ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर

श्रीदत्तमहाराज कवीश्र्वर
विद्यावाचस्पती, न्यायचूडामणि, महामहोपाध्याय, ‘ब्रह्मर्षी, योग वेदान्त सार्वभौन, महर्षी श्रीदत्तमहाराज कवीश्र्वर

जन्म: २ मार्च  १९१०, माघ वाद्य ६ शके १८३१, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे
आई/वडील:  सरस्वती/धुंडिराज शास्त्री
पत्नी: लक्ष्मीबाई यांच्याशी विवाह १९३० साली  
कार्यकाळ: १९१० - १९९९
गुरु: 
मंत्रदीक्षा- धुंडिराज शास्त्री, 
शक्तीपात दीक्षा- परम पूज्य गुळवणी महाराज
विशेष: प्रकांड पंडित, भारताच्या चार राष्ट्रपतींच्याकडून सन्मानित
निर्वाण: १ मार्च  १९९९, पुणे येथे 
वाड्गमय: श्री वासुदेवानंद सरस्वती वांग्मय पुनर्मुद्रण

जन्म व बालपण 

विसाव्या शतकातील संत परंपरेतील आणि या आधुनिक काळातील ऋषी म्हणता येईल असे व्यक्तिमत्त्व म्हणजे, ‘ब्रह्मर्षी दत्तमहाराज कवीश्वर’ हे होते. दत्तमहाराजांचा जन्म एका शास्त्री-पंडिताच्या घराण्यातच झाला होता. त्यांचे पिताश्री धुंडिराज शास्त्री म्हणून होते आणि मातोश्रींचे नाव सरस्वती होते. दत्त महाराजांचा जन्म ‘नृसिंहवाडी’ येथे झाला. म्हणूनच नाव ‘दत्त’ ठेवण्यात आले. दत्त महाराजांचा जन्म माघ वद्य षष्ठीचा शके १८३१. इंग्रजी दिनांक २ मार्च १९१० श्री दत्त महाराजांनी आपली जीवनायात्रा पुणे येथे १ मार्च १९९९ रोजी संपवली म्हणजे त्यांना नव्वद वर्षांचे आयुष्य लाभले होते. 

दत्त महाराजांचा विवाह लक्ष्मीबाई यांचेशी झाला. लक्ष्मीबाईंचा जन्म १९१८ सालचा आणि विवाह १९३० साली झाला म्हणजे विवाहाचे वेळी दत्त महाराज वीस वर्षांचे नि लक्ष्मीबाई केवळ बारा वर्षांच्या होत्या. त्यांनी आपल्या पतीला जन्मभर अप्रतिम साथ दिली. पं. दत्त महाराजांच्या मृत्यूपूर्वी केवळ महिना-दीड महिना आधी त्यांनी देह सोडला (१० जानेवारी १९९९). 

श्रीदत्त महाराजांचे शिक्षण पिताश्री धुंडिराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. त्यांच्याकडे त्यांचे वेदाध्ययन झाले. वेदविद्येखेरीज ते मंत्रविद्या, साहित्यशास्त्र, व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादि विषयांचाही त्यांनी व्यासंग केला ते अनेक गुरूंकडे शिकले. पं. शंकरशास्त्री जेरे, व्यंकटेशशास्त्री अभ्यंकर, नागेश्वर शास्त्री, सुब्बा शास्त्री, राजेश्वर शास्त्री द्रवीड यांच्यासारख्या गुरूजनांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले; आणि त्यांची कृपा संपादन केली. 

श्री दत्त महाराजांची विद्वत्ता आणि नम्रता अतुलनीय होती. त्यांना अनेक शास्त्रांचे शाब्दिक ज्ञान प्राप्त झाले होते. कमी होती ती प्रत्यक्ष अनुभूती! त्यांना तेही भाग्य लाभले. ते गुळवणी महाराजांच्या सहवासात आले. थोड्याच दिवसांत एकमेकांचा स्नेह जुळला. गुळवणी महाराजांनी त्यांना शक्तिपातदीक्षा दिली. एवढेच नाही, तर त्यांना आपले उत्तराधिकारी नेमले. 

उपासने बाबत चिंतन 

पू. महाराज हे अत्यंत मितभाषी होते. तथापि प्रवचन, व्याख्यानाच्या वेळी अत्यंत ओघवत्या भाषेत बोलत असत. त्यांच्या शब्दांत देववाणीच्या परतत्त्वाचा एक स्पर्श असे; त्यामुळे सर्वजण, मंत्रमुग्ध होत असत. पू. महाराज म्हणजे ऋजुता व अमानित्वाचे मूर्तिमंत रूप होते. त्यांची वृत्ती सदैव अंतर्मुख असे, ते अत्यंत विनम्र असत. ते प्रज्ञावंत होते; त्यामुळे ते शब्दप्रभू होते असे म्हणणे यथार्थ होईल. “अधिकार तैसा करू उपदेश !” प्रमाणे ते साधकांशी संवाद करीत असत. त्यांनी वेळोवेळी जे उपदेश केले होते, त्यात उपासनेबद्दल जे चिंतन व्यक्त झाले आहे, त्याचा मागोवा खालील प्रमाणे; 

मनुष्याच्या ठिकाणी राग, मत्सर, द्वेष इ. विकार आणि पाप वासनांनी मनुष्याच्या हातून पापकर्मे घडत असतात. तसेच, ज्याचा मन:स्ताप केला जातो, त्यातून विकार निर्माण होतात. हे तर पूर्व कर्माचे फळ असते, त्याने परमार्थ घडत नाही. यासाठी मनुष्याने सद्गुणांचा अंगिकार करावा. मनातील दोष गेले म्हणजे मन:शुद्धी होते. हा ईश्वराचा प्रसाद असतो. तेव्हा साधक, उपासकांनी सदैव उपासना करावी. उपासना करताना संसार सुख मिळावे; म्हणून उपासना करू नये, परंतु उपासना करताना जरी सुख मिळाले, तरी ईश्वराच्या कृपेने मिळाले हे जाणले पाहिजे. तसेच, असे जे संसारसुख असते, ते मुक्तीकडे नेणारे ठरते. याने संसारात, कुटुंबात सुखसमाधान राहते. त्या वेळी उपासनेने परमार्थही साधू शकतो. 

उपासना करताना आपण जे करतो, त्यावर पूर्ण श्रद्धा हवी आणि देव व गुरू यांचेवर पूर्ण श्रद्धा हवी. उपासनेत रोज मन व चित्ताचे निरीक्षण करावे. याने मनातील चित्ताचे दोष जातात. विकारांचे उपशमन होते. उपासकांचा साधकांबरोबर मैत्रीभाव धरावा. दु:खी माणसाबरोबर दया व करुणा उत्पन्न झाली पाहिजे असे वागावे. नेहमी दुसऱ्याला मदत करण्याची तयारी ठेवावी. बरं, सुख मला मिळावे वाटते, तर ते अधिक दूर जाते. तेव्हा कुटुंबात, समाजात इतर संबंधीत्त सुखी होतील तेव्हा आपणही सुखी होऊ शकतो. उपासनेत ‘मी’ व ‘माझं सुख दु:ख’ याची विस्मृती झाली पाहिजे. निरनिराळे ग्रंथ वाचन करावे, संतचरित्रांचे वाचन करावे. अभंग गायन करावे ही-ही एक उपासना आहे. थोडक्यात, “ज्याचे मन, बुद्धी, चित्त शांत-स्थिर होते, ती उपासना होय,” हा पू. महाराजांचा विचार आहे. उपासनेत फलदाता ईश्वर आहे, हे पूर्णपणे समजले पाहिजे. हाही एक अभ्यास आहे. उपासना करताना माहात्म्यांच्या शब्दांवर, ऋषींच्या शब्दांवर श्रद्धा हवी, ते ऐकून आचरण करावे. माझ्या मनाला, बुद्धिला पटत नाही ते मी करणार नाही ही दर्पोक्ती असू नये. संतांच्या शब्द सामर्थ्याने मन, बुद्धी चित्तातील दोष नष्ट होतात. प्रपंचातील गोष्टी प्रारब्धाने घडतच असतात. यासाठी परमार्थ विचारात राहावे, सद्बुद्धी राहील हे पाहावे, सत्कर्म, सदाचारांनी दृढता ठेवली, तर प्रारब्धाने आलेल्या संकटाचे निराकारण होऊ शकते. उपासनेने देहबुद्धी नष्ट होऊ शकते हे ध्यानी ठेवावे.

उपासनेत साधक रमू लागला की, त्याचे लौकिक व्यवहारात मन रमत नाही. परमार्थात प्रगती वेगाने होते. यासाठी साक्षी भावाने उपासनेत रमून जावे. तसेच, वेदशास्त्रावर देव व गुरूंना प्रिय होईल अशी उपासना ठेवावी. उपासनेत शुचितेला फार महत्त्व असते. उन्नत अवस्था प्राप्त होत असल्याने तारतम्य भाव निर्माण होत असतो. उपासनेत उपासक साधकाने आहार विहार सांभाळावा. सात्त्विक अन्न ग्रहण करावे. उपासना सगुण असो किंवा अन्य कोणतीही उपासना असो, उपासनेबद्दल भ्रम उत्पन्न होता कामा नये. यासाठी मनोनिग्रह हवा आहे. तसेच, साधकांच्या शुभ वासना असाव्यात. उपासनेत राहिल्याने कर्मबंधन शिथील होते. 

श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांनी “वेदान्त पारिजात सौरभ” नावाचा ग्रंथ लिहिला आहे. 

श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर यांनी अत्यंत समर्पक शब्दांत करून दिला तो असा “श्रीदत्त महाराज हे सनातन परंपरेतून घडलेले अलौकिक प्रज्ञावंत होते आणि खुल्या मनाने मुक्तपणे चिंतन करणारे प्रतिभाशाली तत्त्वज्ञही होते. धर्मशास्त्रांवर प्रभुत्व असणारे प्रकांड पंडित होते आणि ‘सर्वभूताहिते रत:’ या वृत्तीचे निखळ संतही होते. तर्ककठोर महाज्ञानी होते आणि भावकोमल भक्तही होते. ते ब्रह्मविद् होते आणि धर्मसुधारकही होते. अनेक परस्पर विरोधी भिन्न गोष्टी त्यांच्या एकाच व्यक्तिमत्वात एकवटल्या होत्या. वैचारिक विसंगती दूर करणारा अलौकिक प्रज्ञेचा हा शान्त तत्त्वज्ञ आणि योगी सदैव वैश्विक पातळीवरील बुद्धिमंतांच्या रूपानेच जगाला दिसत राहिला. भविष्यकालात भावी पिढ्यांना असा इतक्या विविधांगी कर्तृत्वाचा अलौकिक प्रज्ञावान भारतात होऊन गेला यावर विश्वास ठेवणेही अवघड वाटेल आणि तो प्रज्ञावंत पूर्णतया निरहंकारी आणि विनयशील असल्याने अमानित्त्वाच्या भूमिकेतून प्रसिद्धीपासून पूर्णतया दूर राहिला यावर विश्वास ठेवणे त्याहूनही अवघड वाटेल!”

उपासकांनी उपासना म्हणून नामजप, ध्यान करीत असावे. नंतर क्रमाक्रमाने योगक्रियेचा अभ्यास करीत त्यात रमून जावे, तन्मय व्हावे. उपासकांनी नित्य भगवंत, सद्गुरुशी आत्मनिवेदन करावे. आपल्या उणिवा समजून घेऊन, त्या परत होणार नाही इकडे लक्ष द्यावे. सद्गुरू, देवता कोणतीही असेल; सर्वत्र आपल्या उपासनेचे आणि उपास्य देवतेचे स्मरण ठेवावे. इतरांना कमी लेखू नये. प्रत्येक कर्म समर्पणभावाने करावे. 

उपासना करताना प्रपंच हा अलिप्तपणे करावा. प्रपंचात कर्तव्य कर्मे केली, तर मन आपोआप अलिप्त होते. ही कर्तव्य कर्मे करताना, आपल्याला कितीही त्रास झाला, तरी सन्मार्ग सोडू नये. धर्माला अनुसरून उपासना ठेवावी, म्हणजे प्रपंच व परमार्थ दोन्ही साधू शकतात. 

पू. महाराजांचे वैशिष्ट एक होते की, साधकांनी उपासना करूनच जीवनात इच्छित गोष्टींची प्राप्ती करून घ्यावी; म्हणून ते साधकांना मंत्रउपदेश, श्रीगुरुचरित्राचे अनुष्ठान, देवी माहात्म्य इ. ग्रंथ वाचन किंवा जपाची उपासना सांगत. यावरून एकच समजते की, श्रीमद् नरसिंह सरस्वती स्वामी महाराज (गाणगापूर) यांनी ज्याप्रमाणे साधकांना, भक्तांना उपासना सांगून त्यांची कार्यसिद्धी केली. त्याप्रमाणे पू. महाराजांचे कार्य होते. ते साक्षात सिद्धपुरुषच होते. वास्तविक, पू. महाराजांच्या सांगण्यात एक संकल्प शक्ती व संजीवन शक्ती होती, म्हणून साधकांची उपासना फलद्रुप होत असे. 

देवाजवळ काय मागावे?  -  ब्रह्मर्षी  दत्तमहाराजकवीश्वर  

मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिम्।
यत्कृपा तमहं वन्दे परमानंद माधवम्॥

आपली सर्वही दु:खं दूर व्हावीत व पूर्ण सुख आपल्याला मिळावं, ही सर्वांचीच इच्छा आहे. मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच आहे. दु:खाची कायमची निवृत्ती व्हावी, पुन्हा कधीही दु:ख उत्पन्न न होता पूर्ण आनंद प्राप्त होणं म्हणजेच मोक्ष. त्या पूर्ण आनंदात कमी-जास्तपण काहीही नसतो. यासाठीच भगवत्भक्त महात्मे अखंड ईश्वरचिंतन करण्याचा प्रयत्न करीत असतात. 

आनंदाचे अनेक प्रकार उपनिषदांमध्ये सांगितले आहेत. मनुष्याचा आनंद, गंधर्वाचा आनंद, देवाचा आनंद अशी एकापेक्षा एक अधिक आनंदाची सीमा उपनिषदाकारांनी दाखविलेली आहे. पण हे सर्वही आनंद, एक जो महात्मा, महत् श्रोत्रीय म्हटलंय त्याला, ते मिळतात असं सांगितलं आहे. हा जो महत् श्रोत्रीय महात्मा असतो त्याच्या मनात कोणतीही इच्छा राहिलेली नसते. त्याचं अंत:करण निष्काम झालेलं असतं आणि त्याला पूर्ण ज्ञानही झालेलं नसतं. अज्ञान काहीही शिल्लक नसतं. अहंकारादि विकार पूर्ण दूर झालेले असतात. असा जो ज्ञानी महात्मा असतो त्याला हे सर्व आनंद मिळतात. त्याच्या आनंदामध्ये सर्वही आनंदाचा अंतर्भाव होतो, असे उपनिषदांत सांगितलं आहे.

तर ही मोक्षाची म्हणजे पूर्ण आनंदाची इच्छा सर्वांनाच आहे. मनुष्य, गंधर्व, देव फार काय पशुपक्षीदेखील यातून सुटलेले नाहीत. या मोक्षाचं – पूर्ण आनंदाचं साधन म्हणून महात्मे भक्तिमार्गाकडे वळले आहेत. ईश्वराच्या भजनाने, सेवेने हा मोक्ष – पूर्ण आनंद मिळतो.

आता असा प्रश्न निर्माण होतो की, ईश्वराची सेवा म्हणजे काय? मोक्षाकरता – या पूर्ण आनंदाकरता – काय करावं?  कोणती साधना करावी? याबद्दल सद्गुरू श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे एक पद आहे. भजनाच्यावेळी पंचपदीनंतर म्हणतात हे पद!

दत्त मजला प्रसन्न होसी – जरी तू वर देसी ।
तरी मी आन न मागे तुजसी – निर्धारुनि मानसी ॥

पदाची अशी सुरुवात आहे. देवा ! तू मला प्रसन्न झालास तरी मला दुसरं काहीही मागायचं नाही ! म्हणजे या मागण्यात जाणतेपणा आहे. नेमकेपणा आहे म्हणून दुसरं काहीही मागण्याची इच्छा होत नाही. म्हणतात –

स्मरण तुझे मज नित्य असावे । तव गुण भावे गावे ॥

तुझं स्मरण अखंडित राहिलं पाहिजे. तुकाराममहाराजसुद्धा हेच मागणं मागतात. “तुझा विसर न व्हावा !” तुझं कधीही विस्मरण होऊ नये. अंत:करणात अखंड स्मरण राहायचं म्हणजे चित्तातली संसाराची आस कमी झाली पाहिजे. 

सर्व भक्तींमध्ये ‘स्मरणभक्ती’ श्रेष्ठ म्हणून सांगतात. श्रवण, अर्चन, वंदन, दास्य, आत्मनिवेदन असे भक्तिचे अनेक प्रकार आहेत. शरीराने केली जाणारी, वाणीने होणारी, मनाने होणारी भक्ती असते. यामध्ये ‘स्मरण’ ही मोठी भक्ती आहे. चित्ताला ईश्वराचे स्मरण राहणं फार महत्त्वाचं आहे. 

ईश्वराची अनंत नावं आहेत. ही सर्व त्याच्या गुणावरून उत्पन्न झालेली आहेत. गोविंद (म्हणतो आपण) म्हणजे गाईंचा इंद्र – श्रीकृष्ण आहे. गाईंवर संकट आलं होतं. इंद्रानं पाऊस पाडायला सुरुवात केली. सर्व गोकुळाचा नाश करायचा ठरविला. त्या वेळी श्रीकृष्णानं करंगळीवर पर्वत धारण करून त्याच्याखाली गायी, गोकुळवासी लोक यांचं संरक्षण केलं. म्हणून त्या कामधेनूनं कृष्णाला म्हटलं, “आमचा तू इंद्र आहेस”, गाईंचा इंद्र म्हणून गोविंद हे नाव दिलं. अशा या लीला आहेत. त्यांचं स्मरण करून देणारी ही नावं आहेत. यांना “गौण” नावं म्हणतात. गुणप्रवृत्त नाव. नावातून ईश्वराच्या गुणांचं-ऐश्वर्याचं-सामर्थ्यांचं स्मरण होतं. म्हणून त्याच्या नावाचं स्मरण म्हणजे पाठीमागं घडलेल्या सर्वही लीलांचं, चरित्राचं स्मरण हे त्या वेळेला अनायासे घडतं. 

त्याचप्रमाणे अनंत कर्म ईश्वराची आहेत. म्हणजे कितीतरी लीला झाल्या आहेत. ईश्वराला कालमर्यादा नाही. म्हणून त्याच्या लीला अनंत आहेत. आपलं आयुष्य ठरलेलं आहे. तेसुद्धा सगळं पदरात पडत नाही. ब्रह्मदेवालाही कालमर्यादा आहे. इतरांच्या पेक्षा तो जास्ती काळ राहू शकेल, परंतु त्याचाही काल मर्यादित आहे. देव पुण्य करून स्वर्गलोकांत जातात, पण “क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम् विशन्ति” हे त्यांनाही आहेच. पुण्य संपलं की तिथं राहता येत नाही. ही कालमर्यादा ईश्वराला नाही. तो कालातीत आहे. अनेक जीवांच्याकरिता, भक्तांकरिता, संतांकरिता, पुष्कळ लीलाचरित्रं भगवंताकडून घडत असतात. 
ईश्वराची अनंत नामं आहेत, अनंत कर्म आहेत आणि अनंत रूपंही आहेत. अनेक अवतार आहेत. अशा सर्वही ईश्वरासंबंधी नाम, रूप, कर्म या सर्वाचं स्मरण करणं हा मोठा भक्तिविषय आहे. किती वेळ स्मरणभक्ती करायची? वेळच पुरा पडत नाही? अनंताच्या स्मरणाला अंत कसा चालेल?

स्मरण तुझे मज नित्य असावे । तव गुण भावे गावे ॥

असा हा चित्ताला व्यापक विषय मिळावा. अखंड भगवंतांच स्मरण घडावं! आणि वाणीनं तुझ्या गुणांचं वर्णन करावं. वाणीलाहा विषय मिळाला म्हणजे व्यवहारात वाणीचाही दुसरा काही विनियोग नाही आणि मनाचाही विनियोग नाही. हे सगळं घडण्याकरता महाराज पुढे सांगतात –

अनासक्तीने मी वागावे । ऐसे मन वळवावे ॥

मन जर संसारामध्ये आसक्त झालेलं असेल तर ईश्वराचं स्मरण, भक्ती वगैरे कशी घडणार ? मन तिकडेच जाणार ! म्हणून ही प्रार्थना आहे. स्मरणभक्ती अतिशय कठीण आहे. वाणीनं एखादे वेळेला काही भजन वगैरे करणं, मन दुसरीकडे गेलं तरी चाललं असतं, पण अखंड स्मरण घडायचं म्हणजे मन दुसरीकडे जाऊन उपयोगी नाही. इतकी मनाची भूमिका होण्याकरता ‘अनासक्ती’ – मनातली विषयांची आवड कमी झाली पाहिजे. ‘तया सत्कर्मी रति वाढो’ ही ‘रति’ उत्पन्न होण्याकरता अनासक्ती हे एक साधन सांगितलं आहे. 

हे देवाजवळ का मागितलं ? याचा देवाशी काय संबंध ? असा प्रश्न उपस्थित होतो. पण महाराज पुढे लगेच सांगतात,

सर्व इंद्रिये आणि मन हे । तुझे हाती आहे ॥

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज सांगतात, प्रयत्न मी करू शकणार नाही. इंद्रियं आणि मन हे माझ्या सत्तेने काही करू शकणार नाही. तरी मी ते माझे कर्तृत्व समजतो. तो कर्तृत्वभिमान, तो अहंकार तुझं अखंड स्मरण होऊ देत नाही. प्रयत्नांनी कदाचित बाकीच्या गोष्टी मिळतील. अभ्युदय ज्याला म्हणतात, उन्नती, ती कदाचित प्रयत्नाने साधेल. एकापेक्षा एक पदार्थ आपल्याला जगात दिसतात. संपत्ती आहे. त्यामध्येसुद्धा श्रेणी आहेत. लक्षाधीश, कोट्यधीश ! किंवा मंत्री, प्रधानमंत्री ! कीर्ती आहे. या गोष्टी मिळविण्याकरता नाना प्रकारची कर्म करून म्हणजेच प्रयत्न करून त्या त्या भूमिका मिळू शकतात. प्रयत्न हा मनाने, शरीराने, इंद्रियाने होऊ शकतो. त्याचं कर्तृत्व आपलं आहे असं आपण समजतो. कदाचित् हे ग्राह्य धरताही येईल. संसारातसुद्धा कर्तृत्व आपलं आहे असं मान्य केलं तरी त्या कर्तृत्वाचा, प्रयत्नांचा या मार्गात उपयोग होईल की नाही, हे सांगता येत नाही. मन विषयातून बाजूला काढायचं! इंद्रियावर ताबा मिळवायचा! आणि ईश्वराचं स्मरण करायचं हे आपल्या प्रयत्नानं होणारं नाही. ईश्वरीकृपेनेच ही गोष्ट घडून येणारी आहे. म्हणून महाराज सांगतात – 

सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे । 
यास्तव आता तू लवलाहे स्वपदी मन रमवावे ॥

कर्तृत्वशक्ती खरी ईश्वराची आहे. तिथं अहंकार काहीही चालत नाही. मी करणारा आहे – करू शकेन – वृथा कर्तृत्वाभिमान आहे, अहंकार आहे. तो चालणार नाही. 

परि मने वाचा देहे । ऐसा तो व्यापार नोहें ।
तो मी करीत आहे । ऐसे न म्हणे ॥

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी तरी हेच मुद्दाम सांगितले आहे. मन-वाणी आणि शरीर यांचा व्यापार मी करीत आहे असे म्हणू नकोस. मी करतो या अहंकाराचा, कर्तृत्वाभिमानाचा काहीही उपयोग नाही. इंद्रियांचा अधिपती परमेश्वर आहे. ‘ह्र्दयस्थ’ म्हणतात त्याला! ‘अंतर्यामी’ म्हणून उपनिषदांतही सांगितलं आहे. 
पंचमहाभूतांना शास्त्रकारांनी केवळ जड पदार्थ मानलं नाही. त्यांच्या देवता मानल्या आहेत. त्यांचा नियामक वेगळा आहे. पृथ्वीचं नियमन करतो, जडाचं नियमन करतो, तेजाचं नियमन करतो, वायूचं-प्रकाशाचं नियमन करतो, सूर्यचंद्रांचं नियमन करतो, पण हा सर्वांचा नियामक सर्वांच्याही अंतर्यामी आहे. त्यांच्याहून वेगळा पण त्यांच्यातच असलेला आहे. परंतु हे मात्र कोणीही त्याला जाणू शकत नाहीत. आपला कोणी नियामक आहे याचं ज्ञान त्यांना नाही. ही ईश्वराची मोठी शक्ती आहे. ज्ञानशक्ती तर मोठी आहेच. तो सर्वज्ञ आहे आणि त्याची नियामक शक्तीही सर्वांत मोठी आहे. ह्र्षिकेश म्हणतात ईश्वराला. ह्र्षिक् म्हणजे इंद्रिय. ईश्व म्हणजे स्वामी. इंद्रियांचा तो स्वामी आहे. म्हणून त्याने आमची इंद्रियं, मन आपल्याकडे वळवावं हीसुद्धा प्रार्थना केली आहे. महाराज यासाठी आणखी साधन सांगतात, 

विवेक आणि सत्संगती हे । नेत्र द्वय बा आहे ॥
वासुदेवा निर्मल देहे । जेणे त्वपदीं राहें ॥

विवेक आणि सत्संगती ही मोठी साधना आहे. काही मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे साधना. विवेक आणि सत्संगती दुर्लभ आहे. संतांची संगती होणं कठीण आहे. संतसंगतीमधून काय घ्यायचं, याची जाणीव झाली पाहिजे. संतांच्याबद्दल मनात अनादर असेल तर त्यांच्या गुणांची कल्पनाही येणार नाही. शारीरिक सहवास घडेल पण अंतरंगामध्ये त्याचा काही परिणाम होणार नाही. अशा मानसिक अवस्थेत संतांची संगती घडणार नाही आणि घडली तरी त्याचा उपयोग होणार नाही. 

तर हा जो अज्ञानाचा पडदा आहे तोच अविवेक आहे. अविवेक म्हणजे मोह. गुण ग्राहकतेपेक्षा दोषैक मोह जास्त. हा मोह चित्तात असल्यामुळे संतांच्या गुणांचं, अवस्थांचं ज्ञान होत नाही. आपल्याला कुठे संतच दिसत नाहीत, कुठे आहेत संत असं आपण म्हणतो आणि योगायोगाने संत भेटले तरी त्यांच्यापासून आपला फायदा होईल असं काही सांगता येत नाही. दुर्योधनाकडे पुष्कळ ऋषिमुनी येत होते की, तो त्यांची पूजाअर्चाही करीत होता! पण काय? त्याच्या दोषैकदृष्टीच्या मोहामुळं त्याच्या मनावर कोणाचाही काहीच परिणाम झाला नाही. त्यानं श्रीकृष्णाचंसुद्धा ऐकलं नाही. 

ईश्वरशक्तीबद्दल विश्वास नाही. ईश्वराचं सर्व कर्तृत्व आहे ही जाणीव नाहीशी झाली म्हणजे अभिमान हा जास्तीत जास्त वाढीस लागतो. पण त्या अभिमानानं आपल्या मनाप्रमाणं सर्व काही घडून येतं असं मात्र नाही. अशा वेळी मनाविरुद्ध झालं, आपले प्रयत्न निष्फळ झाले तरीसुद्धा मनावर परिणाम होत नाही. स्वकर्तृत्वाभिमान अधिक उफाळतो आणि पुन्हा तेच करण्याची बुद्धी होते. आपलं काही चालत नाही ही जाणीव येत नाही. हा अभिमान आहे. अहंकार आहे. 

म्हणून तर विवेक पाहिजे. नित्य काय, अनित्य काय याचा विवेक पाहिजे. जगात स्थिर काय आहे, अस्थिर काय आहे, याचा विवेक पाहिजे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा विवेक पाहिजे. शरीरादिक पदार्थ आणि त्यांचा द्रष्टा-आत्मा-जीवात्मा-मी वेगळा आहे हे विवेकाशिवाय समजत नाही. शरीर म्हणजे मी नाही. हा मी वेगळा आहे, हा विवेक पाहिजे. म्हणजे काय सोडावं आणि काय घ्यावं ते समजतं. हे समजलं पाहिजे. ही बुद्धीची तयारी इतकी झाली पाहिजे. हे सगळे विवेकाचे प्रकार जर बुद्धीजवळ असतील म्हणजे बुद्धी विवेकसंपन्न असेल तर तो जीवात्मा सर्वत्र सुखी आहे. 

यासाठी सत्संगती हवी. संत विवेक सांगणारे, विवेक दाखविणारे असे महात्मे असतात. ते भेटले पाहिजेत. त्यांच्या संगतीत राहिलं म्हणजे आपोआप ज्ञान होतं. त्यांचं आचरण पाहून – ते कसं बोलतात – काय करतात त्यावरून तो विवेक आपल्याला मिळतो. पण त्यालाही जिज्ञासा लागते. म्हणून सत्संगती आणि विवेक हे ज्ञानदृष्टीचे दोन नेत्र आहेत. हे नेत्र मिळाले म्हणजे जीव आपल्या ठिकाणी स्थिर होईल. ईशभक्ती त्याच्या चित्तामध्ये निर्माण होईल. म्हणून महाराजांनी ईश्वराचं स्मरण असावं इथून सुरुवात केली. या स्मरणासाठी विषयांचं स्मरण, विषयांची आसक्ती सुटावी ही दुसरी प्रार्थना केली. अनासक्त व्हावं, इंद्रियांवर ताबा मिळावा, कारण इंद्रियं विषयांकडे जाणारच! विषयांचं स्मरण सुटावं, विषयसंग सुटावा, यासाठी ईश्वराने आपल्या कृपाशक्तीचा उपयोग करावा म्हणून प्रार्थना आहे. म्हणजे इंद्रियं आपल्या ताब्यात येतील. बुद्धीमध्ये विवेकाची उत्पत्ती व्हावी आणि सत्संगती मिळावी हे मुख्य मागणं आहे. देवाजवळ काय मागायचं हे कळलं पाहिजे. मागणी समजली पाहिजे. 

यामुळे संसार सुखाचा होतो. परमार्थाचं फळ तर आपल्या पदरात पडतंच. ज्ञानेश्वरमहाराज संसारी नव्हते. तरीसुद्धा सर्व विश्वाचा संसार त्यांनी केला. जीवाला मार्गाला लावलं. विश्वाला मार्गदर्शन केलं. एकनाथमहाराज तर अगदी गृहस्थाश्रमी होते. पण संसार हा ईश्वराचा आहे, आपलं काहीही नाही, अशी त्यांची भूमिका होती. विवेकसंपन्न असल्यामुळं त्यांची संसाराची आसक्ती गेली होती. संसार बंधनकारक नाही तर आसक्ती बंधनकारक आहे हे विवेकानं स्पष्ट होतं. असे महात्मे ईश्वराजवळ हे गुण मागतात आणि त्या गुणांनी संपन्न होऊन ईश्वराची त्यांच्यावर कृपा झाली असल्यामुळं त्यांना भगवंताचं अखंड स्मरण घडतं. 

विवेकानं पूर्ण सुख मिळतं, दु:खनिवृत्ती होते, याचा अर्थ दु:ख होतच नाही असा नाही. तुकाराममहाराजांना दु:खं नव्हती, असं पाहणाऱ्याला तरी वाटणार नाही. त्यांच्या घरामध्ये काहीही नव्हतं. हे शिवाजीमहाराजांना कळल्यावर त्यांनी सोन्यानाण्यांनी भरलेली ताटं तुकाराममहाराजांच्या घरी पाठविली. तुकाराममहाराजांनी ती परत पाठवून दिली, ‘नको’ म्हणाले. सुखाची साधनं म्हणून जी जी समजली गेली आहेत, ती खऱ्या सुखाची साधनं नाहीत. याचा विवेक तुकाराममहाराजांचा पक्का होता. म्हणून घरात काहीही नसतानासुद्धा त्याचा स्वीकार केला नाही. हेच तुकाराममहाराज म्हणतात, “चित्ती असू द्यावे समाधान” म्हणजे चित्ताची आसक्ती संपली की सुख असतं. हा उपदेश ते करतात. हा उपदेश त्यांनी कुठे वाचून केलेला नाही. त्यांचा स्वत:चा तो अनुभव आहे. 

विवेक मनात असेल तर अंत:करणात पूर्ण समाधान आहे. म्हणजे सुख आहे. सुखाची साधनं पुष्कळ आहेत, पण मानसिक स्वस्थता नसेल तर त्या साधनांचा काय उपयोग? सुबत्ता असून त्या सुबत्तेचा काहीही उपयोग नाही. सुखाची साधनं नसतानाही विवेकानं जीव सुखी राहू शकतो. समाधान मानू शकतो. साधनं असतानाही विवेक नसला म्हणजे असमाधान आहे, दु:ख आहे. व्यावहारिक दृष्टीनं सुखदु:खाची कल्पनाच वेगळी आहे. त्यामुळे चित्ताचा संतोष राहत नाही. 

म्हणून विवेक-सत्संगती ही जी साधना आहे, यानं अनासक्ती प्राप्त होते. इंद्रियांवर ताबा मिळतो. मन ताब्यात येतं. अशा मनाला एक भगवंताचं अखंड स्मरण हा विषय मिळाला की झालं! तो पूर्ण आनंदरूप होतो. तेथे दु:ख राहतच नाही. या ठिकाणीच मोक्ष मिळाला! मोक्ष म्हणजे ही जागा सोडून दुसऱ्या जागेत जायचं असा याचा अर्थ नाही. स्वामीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, 

मोक्ष नाही पृथ्वीवरी । अथवा तो स्वर्गावरी ।
जो अहंकारा ठार मारी । त्याचे ह्र्दयी मोक्ष वसे ॥

ही स्थिती आपल्याला मिळावी म्हणून महाराजांनी ही प्रार्थना केली आहे. हे महत्त्वाचं पद आहे. पंचपदीनंतर मुद्दाम म्हणायची पद्धत संप्रदायामध्ये आहे. देवाजवळ हे मागणं मागायचं आहे. तशी स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी. मग आपल्याला संपत्ती मिळते आहे, खर्च होतो आहे, चाललं आहे सगळं काही! त्या संपत्तीचा काहीतरी विनियोग ईश्वराप्रित्यर्थ जितका होईल तितका करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे सर्व भगवंताने आपल्याला द्यावं व करून घ्यावं. शास्त्रकारांनी भागवतात अविस्मरणाचं – सतत स्मरणाचं म्हणजे तुझा विसर न व्हावा या स्थितीचं फल सांगितलं आहे. 

श्रीदत्तमहाराजांनी आपल्या दैवी शक्तीचे किंवा अतींद्रिय शक्तीचे कधीही प्रदर्शन केलेले नाही. असे असले तरीही त्यांच्याकडे अनेक भक्त आणि अनुयायी यांची पत्रे नियमितपणे येत असत. त्यांत श्रीदत्तमहाराजांनी केलेल्या चमत्कारांचा उल्लेख असे. श्रीदत्तमहाराजांनी केलेल्या चमत्कारांच्या तपशीलवार हकिकती या पत्रांतूनही असत आणि अशा प्रसंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले अनेक भक्त त्या हकिकती ठासून सांगत असत. त्यात अनेक डॉक्टर, प्राध्यापक, प्राचार्य, चार्टड् अकाउंटंटस्, इंजिनियर आणि उच्च अधिकारी अशा उच्चविद्याविभूषित व्यक्तीही आहेत. श्रीदत्तमहाराजांनी रोग कसे बरे केले, अपघातापासून भक्तांना कसे वाचवले, परीक्षेत यश मिळवण्यासाठी कशी मदत केली, दूर ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन देऊन मार्गदर्शन कसे केले अशा अनेक हकिकती ऐकायला मिळतात. त्या हकिकती सांगणारे जबाबदार व उच्चविद्याविभूषित असल्याने या हकीगती केवळ अंधश्रद्धा म्हणून दूर सारता येणार नाहीत. काही भक्तांना श्रीदत्तमहाराजांचे स्वप्नात दर्शन आले. परंतु त्या स्वप्नात श्रीदत्तमहाराजांनी कपाळावर भ्रुकुटीमध्याला बोटाने केलेला स्पर्श अनेक महिने जाणवत राहिला. स्वप्नात श्रीदत्तमहाराजांचे दर्शन झाले व त्यावेळी झालेला चरणस्पर्श कपाळावर अनेक आठवडे जाणवत राहिला असे काही भक्त सांगतात. काही भक्तांना श्रीदत्तमहाराजांचे किंवा ताईमहाराजांचे दिवसाउजेडी प्रत्यक्ष दर्शन झाले आणि त्यामुळे शांती मिळाली किंवा अडचणीच्या वेळी मदत मिळाली असे काहीजण सांगतात. काही भक्तांना अडचणीच्या वेळी श्रीदत्तमहाराज किंवा ताईमहाराज यांनी दर्शन देऊन मदत केली किंवा मार्गदर्शन केले आणि अडचणीच्या प्रसंगातून सुखरूप बाहेर काढले असेही काहीजण सांगतात. अनेक भक्तांनी परगावी असताना प्रार्थना करुन मदत मागितली आणि श्रीदत्तमहाराज देहाने पुण्यातच असले तरी त्या भक्तांना परगावी आश्र्चर्यकारकरित्या मदत मिळाली असेही अनेक भक्त सांगतात. या चमत्कारांचा स्पष्ट व तपशीलवार उल्लेख अनेक पत्रांतूना आहे.

ही अंधश्रद्धा आहे, हा भास आहे किंवा खोटेपणा आहे असे म्हणून या हकिगती बाजूला सारता येणार नाहीत. कारण असे चमत्कार सातत्याने सांगितले जातात, आणि सांगणारे भक्त सुशिक्षित व जबाबदारीच्या जागांवर काम करणारे असतात. श्रीदत्तमहाराजांनी हे चमत्कार जाणीवपूर्वक केले काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी स्वत: कधीच दिलेले नाही. कोणी उल्लेख केला तर श्रीदत्तमहाराज त्याकडे दुर्लक्ष करतात, स्पष्टपणे ते उत्तरही देत नाहीत. श्रीदत्तमहाराज ज्या वैश्विक पातळीवर किंवा ईश्र्वरी पातळीवर वावरत असतात त्या पातळीवर असे चमत्कार म्हणजे सहज घडलेल्या घटना आहेत.

वाडीला पू. दीक्षितस्वामींनी पू. महाराजांना प्रथम सोळाव्या वर्षी श्रीमद्भागवत सप्ताह करण्यास सांगितले. पू. दीक्षितस्वामींनी महाराजांवर कृपा केली. पू. धुंडिराजमहाराजांकडून उपनयनाचा मंत्रोपदेश मिळाल्यावर पू. दीक्षितस्वामींनी पू. महाराजांना प्रत्यक्ष अनुग्रह दिला व मंत्रोपदेशाही दिला. आधीच असलेल्या प्रगल्भ ज्ञानाला चैतन्यरसाने प्रवाहित केले व सोळाव्या वर्षी पहिला भागवत सप्ताह संपन्न झाला. असा सप्ताह कोणी कुठे केल्याचे ऐकिवात नाही. केवळ शुकाचार्यमहाराजांनी बाराव्या वर्षी भागवताची संथा घेतल्याचे दिसते. तशी संथा पू. महाराजांनी या अवतारी जीवनात घेतल्याचा संदर्भ तोंडी वा लेखी कोठेही नाही. पू. महाराजांचा सातवीपर्यंतचा संस्कृत अभ्यास जेरेस्वामींच्या पाठशाळेत काव्य व व्याकरणाच्या अभ्यासाने झाल्याचे समजते. मग हा पुराणसेवेचा सोळाव्या वर्षीचा अभ्यास कोठे झाला, तर हा अभ्यास गतजन्मीचा (वक्रतुंडबुवाचा) होता. पू. दीक्षितस्वामींच्या कृपाअनुग्रहाने ते ज्ञान प्रकट झाले होते असे वाटते. पू. महाराजांच्या प्रवचनातूनही लक्षात येईल की, इतका अभ्यास आपल्यासारखा अडीअडचणीचा प्रपंच करताना कसा केला असेल ! तर हा अभ्यास, ज्ञान वक्रतुंडबुवांपासून प्रवाहित झालेला होता. अशी ही ज्ञानसत्ता अबाधित आहे. 

थोडक्यात पू. दत्तमहाराजांचे भक्तीविषयी चिंतन असे होते की, 
•    भगवंताचे, सद्गुरूंचे, संतांचे चरित्राचा अभ्यास करावा. 
•    मनानी ते सर्व विचार ग्रहण करावेत. 
•    चिंतनात भगवंताचे चिंतन वा ध्यान करावे. 
•    मुखाने भगवंताचे नाम घ्यावे. 
•    डोळ्यात भगवंताचे रूप साठवावे. 

यातून जो प्रेमानंद निर्माण होईल ती ‘भक्ती’ होय. या भक्तीचा एकच निष्कर्ष आहे की, ‘गुरू व ईश्वर’ हे एक आहेत सर्व विश्व ‘वासुदेवाचे’ स्वरूप आहे. या ज्ञानाचे पर्यवसन हे ‘भक्तीत’ होणे आवश्यक आहे. अशाच भक्तीप्रेमात पू. दत्तमहाराज होते.

उपासना एक चिंतन

विसाव्या शतकातील संत परंपरेतील आणि या आधुनिक काळातील ऋषी म्हणता येईल असे व्यक्तिमत्त्व म्हणजे, ‘ब्रह्मर्षी दत्तमहाराज कवीश्वर’ हे होते. 

पू. महाराज हे अत्यंत मितभाषी होते. तथापि, प्रवचन, व्याख्यानाच्या वेळी अत्यंत ओघवत्या भाषेत बोलत असत. त्यांच्या शब्दांत देववाणीच्या परतत्त्वाचा एक स्पर्श असे. त्यामुळे सर्वजण, मंत्रमुग्ध होत असत. पू. महाराज म्हणजे ऋजुता व अमानित्वाचे मूर्तिमंत रूप होते. त्यांची वृत्ती सदैव अंतर्मुख असे, ते अत्यंत विनम्र असत. ते प्रज्ञावंत होते. त्यामुळे ते शब्दप्रभू होते असे म्हणणे यथार्थ होईल. 

श्रीदत्तमहाराज कवीश्र्वर
भारताच्या चार राष्ट्रपतींच्याकडून सन्मानित, प्रकांड पंडित
श्रीदत्तमहाराज कवीश्र्वर

“अधिकार तैसा करू उपदेश !” प्रमाणे ते साधकांशी संवाद करीत असत. 

न्याय, व्याकरण, वेदान्त, मीमांसा, महायोगविज्ञान आणि धर्मशास्त्र ही ज्यांची जणू निश्वासिते होती असे महाराजांचे ब्रह्मकालीन श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांच्या निमित्ताने सर्व साधकांना नव्या जागृतीचा अनुभव यावा. ‘ऐहिक व पारलौकिक गोष्टींबद्दलचे ज्ञान’ हे खरं ज्ञानच नव्हे...

खरे ज्ञान म्हणजे, परमतत्त्वाची (प्रत्यक्ष) अनुभूती. आत्मस्वरूपाची अनुभूती हेच खरे ज्ञान असे ज्यांचे मत होते ते श्रीदत्तमहाराज हे (महा)ज्ञानाचे सगुण साकार मूर्तिमंत रूप होते. ‘ज्ञानमय’, ‘ज्ञानात्मा’ अशा श्रीदत्तमहाराजांचे मन मात्र भाषण, चिंतन, प्रवचन, यात असण्यापेक्षा ‘केवळ ईश्वरभक्तीतच डुंबत राहणे’ पसंत करीत होते. महाभागवत हेच त्यांचे जीवन होते.

"श्रीदत्तमहाराज कवीश्वर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे भूषण असलेले अखिल भारतीय व्यक्तिमत्त्व आहे" असे जगद्गुरू शंकराचार्य श्रीविद्याशंकरभारती स्वामिमहाराजांचे स्पष्ट मत होते.

अमानित्व व अदंभित्व या सद्गुणांचे व्यक्त व साकार रूप म्हणजे श्रीदत्तमहाराज कवीश्वर! स्वत:च्या परमगुरूंचे श्रीदत्तावतारी प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांचे स्थायी स्मृतिस्थळ निर्माण करण्यात श्रीदत्तमहाराजांचा सिंहाचा वाटा आहे. स्वामिमहाराजांचे समग्र वाङमय प्रकाशित करण्याचा संकल्प प. पू. योगिराज गुळवणीमहाराजांनी केला. त्यात रामाबरोबर लक्ष्मण जसे होते तसे श्रीदत्तमहाराज कवीश्वर होते. अमरेश्वर हे गुरुस्मृतीचे दुसरे स्थूल रूप! पुण्याला ‘श्रीवासुदेव निवास’ निर्मितीचा त्यांचाच लडिवाळ हट्ट श्रीगुळवणीमहाराजांनी पूर्ण केला. सद्गुरू स्मारक असे दुहेरी झाले.

पू. दत्तमहाराज कवीश्वर यांना प्राप्त झालेल्या पदव्या

  • २ जुलै, १९६१ दिल्ली: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते “विद्यावाचस्पती” पदवी प्रदान. “देववाणी संस्कृतमध्ये अनन्यसाधारण वैदुष्याबद्दल” असा गौरव. 
  • १९ मार्च, १९७७ पुणे: वेदशास्त्रोत्तोजक सभा, पुणे यांची “न्यायचूडामणि” पदवी प्रदान. 
  • २ सप्टेंबर, १९७१ पुणे:  “ श्री द्वारका शारदा पीठाधीश्वर श्रीमद् शंकराचार्यांकडून “महामहोपाध्याय” पदवी प्रदान. 
  • २९ मे, १९८३: ‘ब्रह्मर्षी पदवी प्रदान, श्रीमन् समर्चनाय नालम् प्रयागवासिन : 
  • ९ जून, १९८३: अखिल भारतीय महाराष्ट्र-तीर्थ पुरोहित संघ, वाराणसी यांच्या तर्फे “योग वेदान्त सार्वभौन” पदवी प्रदान 
  • ‘महर्षी’ पदवी प्रदान, श्री महासिद्ध योग मंडल संघ 

पू. दत्तमहाराज कवीश्वर यांना सन्मानाने पुरस्कार प्रदान

  • १९५७: श्रीमद् कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकराचार्यांकडून सुवर्णकंकण आणि सन्मानपत्र. 
  • १८ डिसेंबर, १९६८ दिल्ली: भारत सरकारचे “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” 
  • २५ मे, १९६९: महाराष्ट्र-कर्नाटक भगवद्भक्त ५१ संस्था संचालकांकडून सन्मानपत्र “कोविदचूडामणि व वेदशास्त्रर्थतत्वज्ञ” असा गौरव. 
  • २१ एप्रिल, १९७० दिल्ली: भारताचे राष्ट्रपती श्री. व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पंडित’ ही पदवी प्रदान. “संस्कृत में पांडित्य तथा शास्त्रनिष्ठा के लिए यह प्रमाणपत्र प्रदान” असा गौरव. 
  • ९ फेब्रुवारी, १९८९: श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती, कोथरूड यांच्यातर्फे श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार. 
  • १९९० पुणे: महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानतर्फे पू. श्री किशोरजी व्यास यांच्या हस्ते “महर्षी वेदव्यास” पुरस्कार प्रदान. 
  • १९ नोव्हेंबर, १९९० पुणे: श्री गुरुचरित्र अखंड पारायण संस्था आनंदाश्रम, पुणे यांच्यातर्फे श्री. चिं. ग. काशीकर यांच्या हस्ते गौरव. 
  • १९९०: दाते पंचागकर्ते यांच्यातर्फे सन्मानदर्शक स्मृतिचिन्ह प्रदान. 
  • १९९३  पुणे: त्वष्टा कासार समाज संस्था, पुणे यांचेतर्फे सन्मानदर्शक स्मृतिचिन्ह प्रदान. 
  • ४ ऑगस्ट, १९९४: श्री क्षेत्र आळंदी ब्रह्मवृंद अनुष्ठान मंडळ यांच्यातर्फे सन्मानपत्र. 
  • १४ मे, १९९५: श्रीमद् शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्यातर्फे सांस्कृतिक पुरस्कार.  

गृहस्थाश्रमातील ज्ञानयोग 

  1. सर्वांनी विद्यार्जन करावे. सामान्य साधकांनी कर्म, उपासना भक्तीमार्गाने जावे. वेदवेदान्त उपनिषदांचा सखोल अभ्यास वानप्रस्थात करावा. 
  2. नव-नवीन गोष्टींचा स्वीकार अलिप्त राहून करावा व ईश्वरस्वरूप समजून घ्यावा. 
  3. सर्वांत असावे, तसे सर्वांत नसावे असे कमलपत्रवत् असावे. 
  4. असा आचार ठेवावा की, सर्वांच्या मनातील आध्यात्मिक शक्ती जागृत झाली पाहिजे. याबरोबर नोकरी व्यवसाय करून जास्तीत जास्त काळ ईश चिंतनात ठेवावा. 
  5. अशा प्रकारे प्रपंचात राहून समाजसेवा यथाशक्ती करून भक्तीपंथाची संघटना करावी. याने समाजजीवन समृद्ध व शांतीपूर्ण कसे राहील ते पाहावे. 
  6. जीवन केवळ परोपकारासाठी समर्पित करावे हीच ईशसेवा आहे. 
  7. असा ज्ञानयोगपूर्ण गृहस्थाश्रम महाराजांचा होता.

संतसाहित्य अभ्यासकांच्या नजरेतून ब्रह्मर्षी दत्तमहाराज

॥श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम:॥

भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून वर उपस्थित केलेल्या प्रश्र्नांचा शोध विचारवंतांनी चिंतनाच्या अंगाने घेतलेला दिसतो. वेद, उपनिषदे, गीता इ. ग्रंथांनी लौकिकाचा आणि जीवनाच्या पलीकडच्या अलौकिकाचा कसोशीने शोध घेतला. ऋषी-मुनींनी त्यावर भरपूर चिंतन केले. अशा चिंतनगर्भ परंपरेतील एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे प. पू. दत्तमहाराज कवीश्र्वर. श्री वासुदेव निवासातील योगिराज गुळवणी महाराजांचे उत्तराधिकारी. नाथ महाराजांच्या जीवनात जसा प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय दिसतो, तसाच समन्वय प. पू. दत्त महाराजांच्या जीवनात होता. षड्दर्शनांचा अभ्यास केलेले कोणत्याही विषयाची खोल जाणारी सूक्ष्म, मर्मग्रही दृष्टी असलेले, भक्तीमार्गाचे पुरस्कर्ते, नम्रता, विनयशीलता, ज्ञान, भक्ती आणि शास्त्रशुद्ध आचरण ही ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची अंगे होती असे दत्तमहाराज कवीश्र्वर !

‘शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।’ ह्या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे प. पू. दत्त महाराजांचा जन्म पिढ्यान्पिढ्या निष्ठा ठेवणाऱ्या कवीश्र्वराच्या घराण्यात झाला. कवीश्र्वरांचे मूळ आडनाव सप्तर्षी. प. पू. दत्तमहाराजांचे पणजोबा श्री. दाजी दीक्षित हे व्युत्पन्न पंडित होते आणि त्यांचा रामायण-महाभारताचाही चांगला अभ्यास होता. नरसोबावाडीला ते रोज पाच श्लोक करुन श्री दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करीत असत. त्यांच्याजवळ असलेल्या प्रतिभासंपन्नतेमुळे लोक त्यांना ‘कवीश्र्वर’ नावाने ओळखू लागले. (ह्याच प्रतिभेचा अविष्कार पुढे प. पू. दत्तमहाराजांच्या ठायी झालेला दिसतो.) ह्यांचे चिरंजीव श्री. वक्रतुंड महाराज ह्यांचाही रामायण-महाभारताचा व्यासंग होता. त्यावर ते प्रवचने करीत. त्यांच्या पत्नी सौ. सावित्रीबाई ह्यांची वीस बाळंतपणे झाली, पण फक्त दोन मुली जगल्या. नंतर श्री. गोविंदस्वामींच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्ररत्न झाले. ते म्हणजे प. पू. श्रीदत्तमहाराजांचे वडील श्री. धुंडिराज शास्त्री. त्यांचा न्यायशास्त्राचा अभ्यास होता. त्यांना सद्गुरू वासुदेवानंदसरस्वतीस्वामी महाराजांचा सहवास खूप लाभला. त्यांच्या पत्नी सौ. सरस्वतीबाई वाडीला रोज प्रदक्षिणा घालत असत. त्यांच्या पोटी बुधवार दि. २ मार्च १९१०, माघ वद्य शके १८३१ रोजी प. पू. दत्तमहाराजांचा जन्म झाला. त्यानंतर वाडीलाच श्री. दीक्षित स्वामी महाराजांचा मंत्रोपदेश मिळाला. प. पू. महाराजांचा पहिला भागवत सप्ताह श्री. दीक्षितस्वामी महाराजांच्या प्रेमळ कृपादृष्टीखाली सिद्ध झाला. सप्ताहसमाप्तीनंतर स्वामी महाराजांनी प. पू. दत्तमहाराजांच्या अंगावर शाल पांघरली आणि त्यांना चांदीचे फुलपात्र दिले. कृष्णेच्या एका तीरावर वाडी आणि दुसऱ्या तीरावर दत्तअमरेश्वराचे मंदिर आहे. ते जागृत असून चौसष्ट योगिनींचा तिथे निवास आहे. दीक्षित स्वामी महाराज तेथे वस्तीला होते.

धारवाड इथे पं. नागेशशास्त्री उप्पन बेट्टीगिरी यांच्या साक्षेपी नजरेखाली प. पू. महाराजांनी न्यायशास्त्राचे धडे गिरवले. पुढे विद्वज्जनांच्या अनेक सभांमध्ये त्यांची विद्वता निखालसपणे सिद्ध झाली. कांची कामकोटीला सद्गुरू शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांनी आयोजित केलेल्या विद्वत सभेत प. पू. दत्त महाराजांनी वेदान्त विशद करून त्यांची वाहवा मिळविली. धारवाडच्या अद्वैत ब्रह्मविद्या परिषदेतील प. पू. दत्तमहाराजांनी केलेल्या वेदान्तावरील अप्रतिम विवेचनाचा वृत्तांत कांची कामकोटीच्या श्रीमद् शंकराचार्यांना कळल्यावर त्यांनी श्री. दत्तमहाराजांसाठी आदरपूर्वक सुवर्णकंकण, वस्त्र आणि श्रीफळ पाठवले. १९३०मध्ये बार्शी येथील श्री. भगवंतराव पाठक यांच्या कन्येशी प. पू. दत्तमहाराजांच्या विवाह झाला. योगिराज गुळवणी महाराजांनी त्यांच्यावर अपरंपार प्रेम केले. त्यांचा सहवासही खूप दिला. १९३७ साली पुण्याला नातूंच्या वाड्यात प. पू. दत्तमहाराजांचे बिऱ्हाड झाले. पुढे १९५७ साली इन्फ्लूएंझाच्या साथीत प. पू. महाराजांची शोभा नावाची मुलगी दगावली. त्यावेळेस दत्तमहाराज औखाडला सप्ताहासाठी गेले होते. ह्या सर्व काळात प. पू. गुळवणी महाराजांनी कवीश्र्वर कुटुंबियांना अत्यंत ममतेने सांभाळले. मुलीच्या मृत्यूचा आघात प. पू. दत्तमहाराजांनी अत्यंत धीराने सहन केला. कसोटीचे प्रसंग संतांच्या आयुष्यातही येतात आणि तिथेच त्यांच्या स्थिर विवेकशील मनाचा प्रत्यय येतो.

योगिराज गुळवणीमहाराज गोवईकरांच्या चाळीत राहत होते. त्यावेळेस पानशेतचे धरण फुटले, पुण्यात हाहा:कार झाला आणि चाळीत पाणी शिरले. लोकांनी प. पू. गुळवणीमहाराजांना बाहेर काढले परंतू त्यांचे देव, पोथी वगैरे बाहेर आणता आली नाहीत. दुसऱ्या दिवशी मातीतून लोकांनी देव बाहेर काढले. देवांसाठी आश्रमासारखी वास्तू असावी असे. प. पू. दत्तमहाराजांना वाटत होतेच आणि त्यांचा संकल्प पूर्ण झाला आणि ‘वासुदेव निवास’ ही वास्तू आकाराला आली. ह्या वास्तूला ‘वासुदेव निवास’ हे नावही प. पू. दत्तमहाराजांनीच सुचवले. अनेक नावे येत होती. पण हे नाव निश्चित करण्यामागे प. पू. दत्तमहाराजांचा काही विचार होता. त्यांनी सांगितले, ‘वासुदेव याचा अर्थ सर्वांना धारण करणारा असा आहे. ह्या आश्रमाचे कार्य व्यापक स्वरूपाचे असेल, सर्व जगाच्या कल्याणाचे कार्य इथून होईल.’ ह्या जाणिवेतून ‘वासुदेव निवास’ हे त्या वास्तूला नाव सुचवले गेले. या वासुदेव निवासात प. पू. गुळवणी महाराजांच्या आज्ञेनुसार पहिला सप्ताह प. पू. दत्त महाराजांच्या भागवताचा झाला.

एकदा सज्जनगडावरून प. पू. श्रीधरस्वामींनी दासनवमीच्या उत्सवाला प. पू. दत्तमहाराजांना बोलावले. त्यावेळी दत्तमहाराजांनी प्रकृती ठीक नव्हती. ताप येत होता तरी प. पू. गुळवणी महाराजांच्या आज्ञेवरून ते गेले, गडाच्या पायथ्याशी आल्यावर ‘प्रकृती अस्वस्थ आहे’ असा त्यांनी श्रीधरस्वामींना निरोप पाठवला. ‘डोली करून या’ असा उलटा निरोप आला. पण प. पू. दत्तमहाराज तसेच वरती गड चढून गेले. आणि तिथे पहाटे त्यांना शक्तिपात दीक्षा झाली. ‘ते कुंडलिनी जगदंबा । चैतन्यचक्रवतींची शोभा । जिथे विश्र्वबिजाचिये कोंभा । साऊली केली ॥’ असे ज्या शक्तीच्या अनन्यसाधारण शक्तीचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले तिचा उत्सव प. पू. दत्तमहाराजांच्या ठायी मूर्त झाला.

दीक्षा मिळाली तरी प. पू. गुळवणी महाराज सगुणात होते. तोपर्यंत आपल्या गुरुविषयी अपरंपार प्रेमादराची भूमिका असणाऱ्या प. पू. दत्तमहाराजांनी इतर साधकांना दीक्षित केले नाही. १५ जाने. १९७४ला प. पू. गुळवणी महाराजांची इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन प्रयागला झाल्यावर त्यांनी दीक्षा द्यायला सुरुवात केली.

योगिराज गुळवणी महाराजांच्या अधिकारसंपन्न दृष्टीखाली प. पू. दत्तमहाराजांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा झाला. नंतर २५ मे ३१ मे १९८१ ह्या सात दिवसांत अमृत महोत्सव साजरा झाला. ११ मे ते १८ मे १९९० ह्या काळात सहस्त्रचंद्रदर्शन शांती महोत्सव, २३ एप्रिल ते २९ एप्रिल १९९७ ह्या काळात देऊळगावराजा-बुलढाणा इथे आणि २० मे ते २३ मे १९९४ पुणे येथे रौद्रीशांती महोत्सव झाला. भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, श्री. वराहगिरी गिरी आणि श्री. शंकरदयाळ शर्मा यांच्याकडून त्यांच्या विद्वत्तेचा गौरव झाला. आयुष्यभर महाराष्ट्राच्या खेडोपाडी हिंडून त्यांनी भागवत सप्ताह केले. तिथेही अनेक भाविक, विद्वानांकडून त्यांचे सत्कार समारंभ झाले.

प. पू. दत्तमहाराजांनी बरेच लेखनही केले. सद्गुरू टेंबे स्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय १९५४मध्ये श्री. स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांनी १२ खंडांत प्रकाशित केले. १९६५मध्ये टिळक विद्यापीठाने त्यांच्या द्वैताद्वैतवादी निम्बार्काचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील भाष्याचा अनुवाद प्रदीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह ‘वेदान्तपारिजात सौरभ’ या नावाने प्रसिद्ध केला. श्री. वासुदेवानंद सरस्वतींचे चरित्र ‘गुरुदेवचरित्र’ ह्या शीर्षकाने प्रसिद्ध केले. गुण गाईन आवडी, चांदणे कैवल्याचे, संतसंग, नारायण नमोस्तुते इ. पुस्तकातून प्रकाशित झालेली त्यांची प्रवचने साधकांना मार्गदर्शन करणारी आहेत. ‘विवेकचूणामणि’ हा त्यांच्या प्रिय ग्रंथ ! त्यातील १२५ श्र्लोकांचे त्यांनी केलेले विवरणही प्रसिद्ध झाले आहे.

‘वामन निवास’ ही भव्य वास्तू त्यांनी अथक परिश्रमाने उभी करून आपल्या गुरूंच्या संदर्भातील कृतज्ञता व्यक्त केली. ह्याच वास्तूत ‘तुळजाभवानी आरोग्यधाम’ उघडले. इथे स्त्रियांसाठी औषधोपचाराची व्यवस्था आहे. वाडीच्या पैलतीराला श्री. दत्तअमरेश्र्वराचे जे स्थान आहे, त्याचा जीर्णोद्धार त्यांनी केला. तिथे एका भव्य वास्तूत प. पू. स्वामी महाराजांच्या आणि प. पू. दीक्षित स्वामी महाराजांच्या पादुका आहेत. स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले यंत्र आहे. त्याशिवाय प. पू. दीक्षित स्वामी महाराजांच्या पूजेतील देव, फोटो वगैरे गोष्टींचा सांभाळ तिथे पावित्र्याने केला जातो. श्री. दत्तअमरेश्र्वराची मूर्ती आणि योगिनी असून ती वास्तू अत्यंत पवित्र व मंगल वातावरणाने भारलेली आहे. ते कृष्णेच्या काठावरचे जागृत देवस्थान आहे.

संतांच्या लौकिक जीवनाचा आलेख रेखाटता रेखाटता त्यांच्या अंतर्यामीही थोडेसे उतरण्याचा प्रयत्न करायला हवा. चिमणीच्या किलकिल्या डोळ्यांनी अनंत अवकाशात भरारी घेणाऱ्या गरुडाची झेप थोडीशी न्याहाळायला हवी. पण कशी? संतांच्या अलौकिक विचारसरणीचा मागोवा त्यांच्या शब्दांतून घेता येतो. त्यांच्या अंतरंगात वसणाऱ्या असीम शांतीचे थोडेफार तरंग अनुभवता येतात.

षड्दर्शनांचा मन:पूर्वक अभ्यास करणाऱ्या प. पू. दत्तमहाराजांना भागवत पुराण अत्यंत प्रिय होते. त्यातल्या कथा, सिद्धांत सांगताना त्यांचा आवाज भक्तीरसात चिंब भिजलेला असायचा. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी भागवत सप्ताह केले. भागवत सांगून शुकाचार्य महाराजांनी परिक्षित राजाला मृत्यूच्या भयापासून मुक्त केले. आणि तेच भागवत कथन करून प. पू. दत्तमहाराजांनी अनेक आर्त जीवांच्या दु:खावर फुंकर घातली. भागवत पुराणाच्या केंद्रस्थानी भक्तीविचार आहे. प. पू. महाराज ज्ञानी पंडित होते, तरी त्यांचा ओढा भक्तीकडे होता. प्रल्हादजी अकामभक्त म्हणून त्यांना परमप्रिय होते. प्रल्हादजींनी ईश्र्वराकडे काहीच मागितले नाही. मन निर्वासन व्हावे, कुठलीच कामना मनात राहू नये अशी प्रल्हादजींनी इच्छा होती, हा त्यांचा विशेष प. पू. महाराज आवर्जून सांगत असत. पद्मपादाचार्यांच्या कथेचाही ते अनेकदा उल्लेख करत. श्रेष्ठ भक्त आपल्या इष्ट दैवताचे ध्यान करता करता त्याच्याशी कसा एकरूप होऊन जातो हे सांगायला त्यांना आवडे. पद्मपादाचार्य हे आद्या शंकराचार्यांचे परमभक्त ! ते नरसिंहाची उपासना करीत असत. त्याचे ध्यान करताना ते एकदा इतके तद्रूप झाले की जगद्गुरू शंकराचार्यांना मारायला आलेल्या कापालिकावर ते नरसिंह रूपाने धावून गेले आणि त्याचा त्यांनी नि:पात केला. ही कथा प. पू. महाराजांना फार आवडत असे. कर्मज्ञानभक्तीयोग ह्या चारही ईश्र्वराप्रत जाण्याच्या मार्गात भक्तीमार्गाचे श्रेष्ठत्व त्यांनी परत परत सांगितले. कारण प्रारब्ध भोगूनच संपवायचे असते, अज्ञान हे ज्ञान झाल्यावर नाहीसे होते पण मन निर्वासन होत नाही तोवर, पुनरपि जननं पुनरपि मरणं । पुनरपि जननी जठरे शयनम् ।’ हे चक्र चालूच राहते. भक्तीने मन निर्वासन होते हे भक्तीचे महत्त्व आहे.

नित्य ईश्र्वराची आठवण मनात राहायला हवी हे त्यांचे सततचे सांगणे होते. महाभारतातील ‘कुंती’विषयी ते आत्मियतेने विचार मांडत. भारतेय युद्धात पांडवांना विजय मिळाला. श्रीकृष्ण हस्तिनापुराहून परत जायला निघाले तेव्हा कुंतीने त्यांच्याकडे मागणे मागितले की, ‘सुखात तुझी आठवण आम्हाला राहील का? ती रहावी म्हणून तू आम्हाला सदैव दु:खात ठेव.’ ईश्वरावरील प्रेमाचा, भक्तीचा उत्कट स्पर्श कुंतीच्या शब्दांना आहे. दु:खात बुडून गेलेल्या भक्तांनी दु:ख बाजूला सारून ईश्र्वराचे स्मरण केले आहे, असे तुकारामांच्या ज्या एका अभंगात वर्णन आलेले दिसते, तो अभंग महाराजांना फार प्रिय होता. तो असा-

पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ।
प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनी नारायण ।
सुदामा ब्राह्मण दारिद्र्ये पिडला । नाही विसरला पांडुरंगा ।
तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दु:खाचे डोंगर आले तरी ॥

कृष्ण भक्तीमध्ये अंतर्बाह्य रंगून गेलेले पितामह भीष्म आणि विदूर ही सुद्धा प. पू. महाराजांना अंत:करणापासून प्रिय असलेली माणसे ! कृष्ण शिष्टाईच्या वेळेस विदुरजींच्याकडे जाऊन राहिला तेव्हा विदुरजी आणि त्यांच्या पत्नीला विलक्षण आनंद होऊन, आपल्या ह्या प्रिय दैवतासाठी काय करू आणि काय नको असे त्यांना झाले. अतिशय प्रेमाने विदुरजींची पत्नी श्रीकृष्णाला फळे सोलून देऊ लागली, पण त्याच्या श्रीमुखाकडे बघताना ती इतकी तन्मय झाली की, फळे स्वत: खाऊन फळाची साल कृष्णाला भरवू लागली. भक्तीभावनेची उत्कटता दाखविणारी ही कथा त्यांना फार आवडायची. रामभक्तीमुळे हनुमानजीही त्यांना प्रिय होते. गीत रामायणातले, ‘कधी न चळावे चंचल हे मन । श्रीरामा ह्या चरणापासून’ हे गीत त्यांनी अनेकदा आवर्जून ऐकले.

श्रेष्ठ महात्मे, संत, ज्ञानीपुरुष याविषयी प. पू. महाराज नेहमीच अत्यादाराने बोलत असत. नुसते बोलत नसत, तर स्वत:च्या कृतीतून तो आदर व्यक्त करीत असत. एकदा आश्रमात करवीरचे शंकराचार्य आलेले असताना, त्यांना उच्चासनावर बसवून, त्यांचा गौरव करून प. पू. महाराज त्यांच्या पायांशी बसले. अध्यात्माच्या क्षेत्रात ‘आत्मज्ञान’ कसे प्राप्त होईल ? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. प. पू. महाराजांनी जडभरताची गोष्ट सांगताना हे स्पष्ट केले. रहूगण राजा जडभरताला प्रश्र्न करतो, ‘व्यवहारापासून निवृत्त व्हायचं, संसार सोडून जायचा तर संसार खोटा आहे असं कुठं आहे ? संसार खरा आहे की !’ जडभरतांनी उत्तर दिले, ‘तू हा प्रश्न विचारलास पण ही ज्ञानी माणसाची दृष्टी नाही, केवळ अध्ययनाचे ज्ञान होत नाही. महात्मे जे आहेत त्या महात्म्यांना शरण गेल्याशिवाय, त्यांची कृपादृष्टी झाल्याशिवाय ज्ञान होत नाही.’ आणखी एका ठिकाणी ते म्हणतात की, ‘आत्मज्ञानासाठी बुद्धीची स्थिरता हवी. बुद्धीची स्थिरता संपादन करणं हे मुख्य आहे. बुद्धीस्थैर्य हे आत्मज्ञानाला अत्यंत उपयोगी आहे. ही स्थिरता ईश्र्वरप्रणिधानाने येते तशीच, ती वीतराग महात्म्यांच्या संकल्पानेसुद्धा होऊ शकते.’ पूर्ण बुद्धीचे महात्म्ये म्हणजे साक्षात् ईश्र्वरस्वरूपच झालेले असतात. अशा महात्म्यांचा जो संकल्प आहे, त्यांची दृष्टीसुद्धा इतके शक्तीसंपन्न असते की ती ज्याच्यावर पडेल त्याचा सर्व ही पापक्षय होतो.’ ‘मन एकाग्र होण्यासाठी संत चरित्रे वाचावीत.’ असे ते नेहमी म्हणत असत.

एकदा प. पू. महाराजांजवळ गीतेविषयी काही चर्चा करताना विचारले, ‘शेवटी ज्ञान होणं हे महत्त्वाचं आहे..’ त्यावर प. पू. महाराज क्षणभर शांत राहिले आणि म्हणाले, ‘नाही. त्या ज्ञानातून शांतीची अवस्था प्राप्त होणं महत्त्वाचं आहे. गीतेत एक श्र्लोक आहे,

‘विहाय कामन्य: सर्वान्पुमांश्र्चरति निस्पृह: ।
निर्ममो निरहंकार: सशान्तिमधि गच्छति ॥’

शेवटी शांती अनुभवणं हेच महत्त्वाचं आहे.’ आपण जगताना प्रत्येक गोष्टीचे कर्तृत्व स्वत:कडे घेण्यासाठी धडपडत असतो. त्यातून आपल्या अहंकाराचे छानपैकी पोषण होत असते. आणि मग तोच अहंकार आपल्याला आपल्या शुद्ध रूपापासून, मूळ रूपापासून दूर नेत असतो. ईश्र्वराची साधनाही आपणच करतो हा अहंभाव आपल्यापाशी असतो. यावर प. पू. महाराजांनी अतिशय सोप्या पण ठाम भाषेत भाष्य केले आहे. ते लिहितात, ‘उपासना पक्की होणं याचा अर्थ त्याचा भ्रम गेला पाहिजे. ‘मी उपासना करतो आहे, एकच आहेत ते दोघेही. उपासनेचं कर्तृत्व जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत उद्धार नाही. ‘मी उपासना करणारा आहे.’ असं जर वाटत असेल तर त्यामुळेही अध:पात होतो.’ (दैवी संपदा पृ. ७४)

प. पू. महाराजांची कृती-उक्ती एकरूप होती. साधकांना दीक्षा मिळाल्यावर साधक प. पू. महाराजांना म्हणत, ‘आपण मला दीक्षा दिलीत. तो आनंद काही विलक्षणच आहे.’ प. पू. महाराज त्यावर उत्तर देत, ‘आम्ही कुठे काय केलं. पोस्टमन पत्र नेऊन टाकतो, आम्ही पोस्टमनचं काम केलं.’ ज्यांच्या वृत्ती तदाकार झाल्या आहेत, असे महाराज कसलेच कर्तृत्व स्वत:कडे घेत नसत. ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्यांचा ह्या दृष्टीने ते अनेकदा उल्लेख करत त्या अशा-

परी मने वाचा देहे । जैसा जो व्यापारू आहे ।
तो मी करीत आहे । ऐसे न म्हणे ॥
करणे वा न करणे । हे आघवे तोचि जाणे ।
विश्र्व चळतसे जेणे । परमात्मेनी ॥

एकदा प. पू. महाराज गावाला गेलेले असताना त्यांच्या चिरंजीवांनी सुंदर शोकेस बनवून त्यात वेळोवेळी झालेल्या त्यांच्या सत्कारातली मानपत्रे, भेटवस्तू वगैरे मांडून ठेवले. प. पू. महाराज गावाहून आल्यावर त्यांनी तिकडे क्षणभर दृष्टी टाकून म्हटले, ‘अहो, हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं त्याच्या अगदी विरुद्ध झालं. त्यांनी काय सांगितलं आहे ?’

पूज्यता डोळा न देखावी । स्वकीर्ती कानी नायकावी ।
हा अमुक ऐसा हे नोहावी, सेची लोकी ॥ श्री ज्ञानेश्वरी ॥

ज्या विभूतींचा ‘मी’ विश्र्वाकार झाला त्यांची ही अमृतमयी वाणी ! त्याच्या उदात्त विचार सरणीचा प्रत्यय त्या शब्दातून येतो.

शब्दांचा अन्वय सांगण्याची त्यांची पद्धतीही अशीच उदात्त होती. ‘गृहेषु अतिथीवद् वसेत्।’ याचा अर्थ सांगताना ते एकदा म्हणाले होते, ‘गृह’ या शब्दाचा अर्थ ‘शरीर’ असाही घ्यावा. शरीरात आपण अतिथी आहोत हा विचार पक्का झाला तर देहाविषयी ममत्व राहणार नाही.’

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥’

ह्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीचा अर्थ सांगताना ते म्हणाले होते, ‘ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मस्वरूपच सगळीकडे आहे हे मांडले. आधी तर्क केला, ज्याअर्थी सृष्टी निर्माण झाली त्याअर्थी कर्ता हा असणारच. न्यायशास्त्र तर्काच्या मार्गाने जाते. नंतर वेदांनी सांगितले, म्हणजे शब्दप्रचिती आहे आणि शेवटी ‘स्वयंवेद्या’ म्हटल्यामुळे आत्मप्रचिती आहे. म्हणजेच तिन्ही प्रमाणांनी त्याचे अस्तित्त्व सिद्ध होते. अशा रितीने पहिल्याच ओवीत आत्मरूप सिद्ध करून मगच त्यांनी ज्ञानेश्वरीला आरंभ केला.’ १९९५मध्ये बार्शी येथे पंचागकर्ते धुंडिराजशास्त्री दाते यांच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना प. पू. महाराज म्हणाले की, ‘शास्त्राच्या अभ्यासानंतर संतवाङ्मय जास्ती स्पष्ट झाले असे श्री. धुंडीमहाराज देगलूरकर म्हणाले होते.’

पितामह भीष्मांचे चरित्र त्यांना आवडायचे. उत्तरायण लागल्यावर देह विसर्जनाच्या वेळेस, भीष्मांनी कृष्ण स्तुती केली ती अशी-

इति मति रूपकल्पिता वितृष्णा ।
भगवति सात्वत पुङ्गवे विभूम्नि ।
स्वसुखमुऽपगते क्वचिद् विहर्तुं ॥

याचे स्पष्टीकरण करताना प. पू. महाराज म्हणायचे की, ‘तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही सृष्टी निर्माण करता, प्रकट होता, नाही तर निर्गुणातच असता. हा भवप्रवाह सगळा प्रकृतीमुळे निर्माण झाला आहे.’

ज्ञानेश्वर महाराजांचा ‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रे’ हा अभंग ह्याच अर्थाचा आहे.’ ‘भीष्म शरपंजरी पडले होते तरी त्यांची सर्व इंद्रिये शेवटपर्यंत त्यांच्या ताब्यात होती.’ असे ते सांगत. प. पू. महाराजांनी शेवटच्या आजाराच्या आधीच्या आजारपणात महाभारत वाचून घेतले. पण परमात्म स्वरूपावर स्थिर केले. प. पू. महाराजांनीही १३ फेब्रुवारीपासून मौन धारण केले ते अखेरपर्यंत सोडले नाही. ते १ मार्च १९९९ रोजी दत्तचरणी लीन झाले.

प. पू. ब्रह्मश्री श्री दत्तमहाराज कवीश्वर यांची अमृतवाणी

  • शरीरापासून मन बाजूला झाले पाहिजे. 
  • 'माझे माझे' म्हणून द्रव्य वगैरे जे आहे ते; तेथून मन बाजूला झाले पाहिजे. मनाला सगळ्यापासून बाजूला करायचे आहे.
  • 'संसार हा ईश्वराचा आहे' ही बुध्दी असल्यानंतर ममता कमी होते.
  • 'प्रपंचाला वेळ पुरत नाही आणि परमार्थाला वेळ मिळत नाही' हे म्हणणे योग्य नाही. परमार्थाकरिता वेळ काढलाच पाहिजे.
  • पूर्ण विवेक मनामध्ये उत्पन्न झाल्यावर संशय कधीच वाटणार नाही. धर्माचे आचरण काही फलाकरता करायचे नाही.
  • ज्ञान संपादन करतांना बुध्दी अत्यंत अवधानयुक्त पाहिजे. मनामध्ये बाकीचा इतर कोणता संस्कार असून उपयोग नाही.
  • सर्व प्राण्यांबद्दल मनामध्ये  दया पाहिजे. अनुकूल प्रतिकूल कोणतीही परिस्थिती असली तरी संतोष वृत्ती पाहिजे.
  • सर्व इंद्रियांवर संयम पाहिजे. इंद्रिये जर बाहेर जायला लागली तर मनात आलेले थोडेफार गुणही जातील आणि दोष येतील.
  • शुध्द बुध्दीने धर्माचरण झाले पाहिजे. ईश्वरार्पण बुध्दीने धर्माचरण झाल्यावर आसक्ती, ममता, अहंता हे जे दोष आहेत ते सगळे दोष जातात आणि वैराग्य येते.
  • 'जो आपल्यासमोर आहे तो भगवंताचे रूप आहे' असे समजले पाहिजे. सगळे विश्व त्याचेच रूप आहे, अशी आमची बुध्दी बनली पाहिजे.