श्री क्षेत्र देवगड, नेवासे

स्थान: नेवासे तालुका, अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र)
सत्पुरूष: किसनगिरी महाराज.  
विशेष: सर्वांग सुंदर प्रसंन्न दत्त मूर्ती, किसनगिरी  महाराज समाधी, शिव मंदिर, उद्यान.

दत्त मंदिर देवगड
दत्त मंदिर देवगड

नगर औरंगाबाद रस्त्यावर नगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प. प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

संपूर्ण देवगड मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्तमंदीर आहे. संपूर्ण भव्य मंदीर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेले आहे. मंदिराचे फरशी कामही संगमरवरी असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे. येथील मूर्ती समोरून हटावेसेच वाटत नाही. ही अत्यंत जिवंत आणि जागृत दत्तमूर्ती आहे. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. या मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्र उच्चारण मंदिराच्या पवित्र वातावरणात भरच टाकते. या मंदिर परिसरात दत्तमंदिर, शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्र्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. श्री दत्तमंदिराच्या बाजूसच श्रीकिसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहेत.

श्री देवगड दत्तमंदिर
सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती, दत्त मंदिर देवगड

प्रवरा नदीवर ही सुंदर घाट बांधलेला आहे. या परिसरात खूप वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. याठिकाणी नौका विहारासाठी सुविधा आहे.

या मंदीर परिसरात निवासाची व्यवस्था आहे. भोजनप्रसादाची व्यवस्था आहे. देवगडला प्रत्येक गुरूवार, एकादशी, दत्तजयंती, महाशिवरात्र, किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी सोहळा पाहिला की मन तृप्त होते.

सदर स्थान अत्यंत पवित्र व प्रासादिक आहे. अत्यंत विलोभनीय बांधकाम अतिशय रम्य परिसर भरपूर वृक्ष संपदा यामुळे हा परिसर पेक्षणीयही आहे. अनेक सत्पुरुष व सिद्ध पुरुष यांच्या वास्तव्याने येथील पावित्र्य खूप वाढले आहे.

या स्थानी अवश्य दत्तभक्तांनी भेट द्यावी.

देवगड हे नेवाशापासून १४ कि. मी. अंतरावरील मुरमे गावाजवळ उंच ठिकाणावर वसलेले देवगड अतिशय विलोभनीय निसर्ग सौंदर्य, वळसा घालून जाणारी प्रवारानदी अशा रम्य ठिकाणी हे देवस्थान आहे. या देवस्थानाचे कर्ते करविते महान तपस्वी आणि संत पू. किसनगिरी बाबा यांचे चरित्र भक्तांना प्रेरणा देणारे आहे. दत्त मंदिर आकर्षक नक्षीकाम, दगडी बांधकाम, संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर, चार फूट उंचीचा भव्य सुवर्णकळस आणि सात्विकतेची प्रचीती देणारी रंगसंगती ही या मंदिराची वैशिष्ट्ये. या सर्व वैशिष्ट्यांना पावित्र्य देणारी श्री दत्तप्रभूंची लोभस मूर्ती या मंदिराचे खरे वैभव आहे.

महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नराचा नारायण होण्याच्या अलौकिक उत्क्रांतीला गतिमान करीत सर्वसामान्याना सदाचरणाचा मार्ग दाखविणार्या संतांची थोर परंपरा होऊन गेली आहे. अतिशय घनघोर आक्रमणाच्या अंधकारमय काळातही लोकांची जीवन जगण्याची आस्था आणि मुल्यांवरची श्रद्धा कायम ठेवण्याचे महान कार्य संत परंपरेने केले आहे. संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील विविध पुण्यपावन तीर्थ क्षेत्रांमध्ये नेवाशा जवळील दत्त देवस्थान देवगड हे एक अग्रगण्य देवस्थान! अमृत वाहिनी प्रवरा नदीच्या काठावर बसलेले हे देवस्थान म्हणजे भक्तांसाठी भूलोकावरचा शांतता, पावित्र्य आणि श्रद्धेचा जणू भव्यतम आविष्कारच!

पुण्यसलीला प्रवरा नदी हि अमृतवाहिनी समजली जाते. अगस्तीऋषींच्या तपोभूमितून उगम पावलेली प्रवरा नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वरांच्या भक्तीसंवादाचा ठेवा सामावून घेत दक्षिण गंगा गोदावरीशी एकरूप होते. समन्वयाच्या विशाल भारतीय संस्कृतीची प्रचीती देणारा हा गोदा प्रवरेचा अपूर्ण संगम देवगडजवळच पहावयास मिळतो. हे देवगड आता सर्व भक्ति संप्रदायाचे आकर्षण बनले आहे. नेवाशापासून १४ कि. मी. अंतरावरील मुरमे गावाजवळ उंच ठिकाणावर वसलेले देवगड अतिशय विलोभनीय निसर्ग सौंदर्य, वळसा घालून जाणारी प्रवारानदी अशा रम्य ठिकाणी हे देवस्थान आहे. या देवस्थानाचे कर्ते करविते महान तपस्वी आणि संत पू. किसनगिरी बाबा यांचे चरित्र भक्ताना प्रेरणा देणारे आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन सध्या हरिभक्तपरायण पू. भास्करगिरी बाबा यांना समाजभिमुख अशा सहज संवादातून, उपक्रमातून आणि विविध कार्यक्रमांतून देवगडला आध्यात्माचे, आत्मोन्नतीच्या चळवळीचे केंद्र बनविले आहे. स्वच्छ, समाधानी, हव्याहव्याशा वाटणाऱ्या शांततेचा आविष्कार म्हणजे देवस्थान असे चित्र देवगड येथे दिसते आहे. भक्तांना भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवीत असतानाच येथे स्वच्छता, निसर्ग सौंदर्य याबरोबरच त्याग, तपश्चर्या आणि मानव कल्याणाच्या चिंतनाला धीरगंभीर असा सुगंध आहे. हा सुगंध पू. किसनगिरी बाबा आणि पू. भास्करगिरी बाबा यांना आपले जीवन समर्पित करून, चंदनासारखे झिजून निर्माण केला आहे. त्यांचे जीवनकार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे.

निसर्गरम्य
निसर्गाशी सख्य सांगणारा हा श्रीक्षेत्र देवगडचा निसर्गरम्य परिसर. अथक परिश्रमातून फुललेली इथली वनराई प्रयत्नवादाचे फळ सांगणारी आहे. हा सारा भव्य परिसर म्हणजे ‘सत्य संकल्पाचा दाता नारायण’ या श्री तुकोबांच्या उक्तीचा प्रत्यय देणारा. संत वास्तव्याने पावन झालेला हा परिसर आणि इथला निसर्ग भक्तीला सुगंध देणारा, मनाला उल्हास देणारा आणि एकाग्रतेला सूर देणारा आहे.

नौका विहार
पवित्र प्रवरेच्या विस्तीर्ण पात्रात श्रीक्षेत्र देवगड संस्थांच्या वतीने नावेची व्यवस्था केलेली आहे. भरपूर पाणी, संत सहवास, विस्तीर्ण वनराई आणि एकांत यामुळे येथे नौकाविहार करण्याचा मोह हा सर्वांनाच होतो अन संत सहवासात भवसागर पार केल्याचे समाधान भक्तांना या ठिकाणी मिळते

कसे जाल

अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगर पासून ६६ कि. मी. वर आहे. औरंगाबादपासून ५३ कि. मी. वर आहे.

श्रीक्षेत्र देवगडला येण्यासाठी मार्ग

विमानसेवा: औरंगाबाद ५३ कि. मी. अथवा पुणे १८० कि. मी. येथपर्यंत विमानसेवा उपलब्ध.
रेल्वेसेवा: औरंगाबाद, अ. नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या ठिकाणांपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
बससेवा: औरंगाबाद ते पुणे महामार्गावर देवगड फाटा येथून केवळ ५ कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र देवगड आहे.

अंतर

पुणे - श्रीक्षेत्र देवगड १८० कि. मी.
अ. नगर - श्री क्षेत्र देवगड ६६ कि. मी.
शिर्डी - श्री क्षेत्र देवगड ७० कि. मी.
औरंगाबाद - श्री क्षेत्र देवगड ५३ कि. मी.
नेवाशापासून - श्री क्षेत्र देवगड  १४ कि. मी.

संपर्क देवगड भक्त निवास स्थान

मोबाईल: ७७९६२०३१११