श्री आनंदभारती स्वामी महाराज

नाव: श्री आनंदभारती स्वामी महाराज. मूळ नाव पांडू                      
जन्म: १८३१ ठाणे येथील चेंदणी गावी कोळी वाड्यात.                       
वडील: गुलाम नाखवा.  
लग्न: १८५१.                                                                  
अवतार समाप्ती: मार्गशीर्ष शु ५ शके १८२३ इ. स १९०१
प्रमुख कार्य: 
ठाणे येथे दत्त मंदिर व शितलादेवी स्थापना १८७९. 
श्रीगुरुलीलामृत’ ह्या ग्रंथाचे मूळ प्रेरणास्त्रोत

आनंद भरती महाराज
श्री आनंदभारती स्वामी महाराज

परमआदरणीय सत्पुरुष ब्रह्मीभूत श्रीआनंदभारती महाराज यांच्याविषयी !

श्रीआनंदभारती महाराज यांचा जन्म शके १७५३ मध्ये (इ. स. १८३१) ठाणे येथील चेंदणी कोळीवाड्यात धीवर (कोळी) समाजातील नाखवा घरण्यात झाला. त्यांचे पूर्वज फत्तेमारी व मासेमारीचा व्यवसाय करीत असत. बहुतेक करून या सर्वांचे जीवन दर्यावरच्या सफ़री आणि मासेमारी ह्यावरच अवलंबून असे. श्रीमहाराजांच्या वडिलांचे नाव गुलाम नाखवा होते. ते दूरवरच्या सफरी व मासेमारीचा धंदा करीत असत. त्यांच्या घरची स्थिती गरिबीची होती. महाराजांचे मूळचे नाव पांडू होते. आपल्या मुलाने शिक्षण घेऊन सुशिक्षित होण्यापेक्षा आपल्या धंद्यात लक्ष घालावे असे त्यांच्या वडिलांना वाटत असे. त्यामुळे शिक्षण घेण्याच्या वयात पांडुबुवांवर उद्योगधंदा करण्याची जबाबदारी पडली. महाराजांनी धंद्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली असली तरीही बालपणापासूनच त्यांचे सर्व लक्ष ईश्वराच्या उपासनेत गुंतले होते. परमेश्वराच्या नामसंकीर्तनात दिवसाचा बराचसा वेळ निघून जात असे. मासेमारीच्या धंद्याकरिता ते रोज होडीत किंवा पडावात बसून दर्यावर जात-येत असले तरीही प्रात:काळी समुद्र स्नान, प्रात:स्मरण, नेहमीची भजने व प्रार्थना केल्याशिवाय दिवसाचे कोणतेही नवीन काम ते सुरू करीत नसत. उद्योगधंद्यानिमित्त इतर कोणत्याही ठिकाणी जरी जाणे झाले तरीही ते आपला नित्यक्र्म कधीही विसरत नसत. परमेश्वराची आराधना नैमित्तिक न करता सदासर्वदा केली पाहिते अशा मताचे ते होते. दिवसें दिवस त्यांचे मन परमेश्वराचे ध्यान पूजन व स्मरण चिंतनात ओढ घेऊ लागले. इथे फत्तेमारीवर ते मुख्य तांडेलही झाले. सध्या ठाणे रेल्वे स्टेशन लाईनच्या बाजूने दक्षिणेकडे जाणारा छोटासा रस्ता (जो ‘श्रीआनंदभारती रस्ता’ म्हणून ओळखला जातो). त्या रस्त्याच्या पूर्वेस असलेले पुंडलिक विठू नाखवा (आनंदभारती महाराजांचे पुतणे) यांचे घर हेच महाराजांचे मूळ घर होय. महाराजांचे बालपण तेथेच गेले. या घराच्या माळ्यावर महाराज बालपणी भजने म्हणत असत. शेजारपाजाऱ्यांना व घरच्या मंडळींना त्यांच्या भजनाचा त्रास वाटू लागला तेव्हा त्यांनी रस्त्याच्या पूर्वेस असलेल्या रामभाऊ कोळी यांच्या घराशेजारी छोटीसी झोपडी बांधली आणि त्या झोपडीतच ते राहू लागले. तिथेही ते चुलतबंधु शनवार नाखवा व आजूबाजूची लहान मुले यांना जमवून भजने म्हणत बसत. त्यांना फत्तेमारीस दूरवर जावे लागत असे, पण तरीही त्यांच्या परमेश्वराच्या उपासनेत कधीही खंड पडत नसे. त्यांची परमेश्वरावरील भक्ती आणि विरक्त होत चाललेला स्वभाव पाहून त्यांच्या घरच्या मंडळींना त्यांच्याविषयी काळजी वाटू लागली. महाराजांचे लग्न आणि सुखाचा संसार व्हावा, अशी त्यांच्या घरच्या मंडळींची इच्छा होती मात्र महाराजांनी त्यास विरोध केला. असे असतानाही घरच्यांनी त्यांचे लग्न ठरविले. शके १७७३ (इ. स. १८५१) मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. मात्र महाराजांना संसारसुखात गोडी वाटली नाही. त्यामुळे संतान वगैरे झाले नाही. याच सुमारास म्हणजे इ. स. १८५१ मध्ये दुर्दैवाने त्यांच्या आईचे निधन झाले. आपल्या वडिलांना या गोष्टीचे दु:ख होऊ नये म्हणून त्यांनी आग्रह करून व पुढाकार घेऊन वडिलांचे दुसरे लग्न करून दिले आणि त्यानंतर आपली सावत्र आई, वडील व आपल्या पत्नीसह त्यांनी संसारात काही काळ व्यतित केला.

श्री आनंदभारती स्वामी महाराज
गाभाऱ्यातील दत्तमूर्तीची स्थापना श्री आनंद भारती स्वामी महाराजांनी केली. गाभार्यामघ्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काष्ट पादुका विराजमान आहेत. 

महाराजांचा बराचसा वेळ भजन-पूजनात जात असे. त्यांची चित्तवृत्ती हळूहळू विरक्त बनत चालली होती. अशातच ठाणे येथील श्रीमारुतीमंदिरात त्यांना श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. सद्गुरु दर्शनाचा लाभ झाला. संसारसुखाचा त्याग करून सद्गुरुसेवेत जीवन व्यतीत करावे असे त्यांना वाटू लागले. मात्र, त्यासाठी संसाराचा त्याग करणे कठीण होते कारण ते घरातील कर्ते पुरुष होते. घरची जबाबदारी त्यांच्यावरच होती.

एकदा महाराज काही मंडळींसमवेत फत्तेमारीसाठी निघाले असता एकाएकी आकाशात ढग जमा झाले, विजा कडाडू लागल्या. सागराने रौद्र रूप धारण केले, लाटांचा खळखळाट वाढला तशी जहाज हेलकावे खाऊ लागले. जहाजावरील लोक समोर दिसणाऱ्या मृत्यूच्या भीतीने अर्धमेले झाले असले तरीही महाराज मात्र शांत चित्ताने ‘श्रीहरिविजय’ ग्रंथवाचनात मग्न झाले होते. लोकांनी त्यांना वादळाची कल्पना दिली. मुख्य तांडेल या नात्याने जहाजावरील सर्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी महाराजांचीच होती. दुर्दैवाने वादळात जर का जहाज बुडाले तर आपल्या सोबतच्या कितीतरी लोकांचे संसार उध्वस्त होतील, हे महाराजांस कळून चुकले. तेव्हा महाराजांनी ‘श्रीहरिविजय’ ग्रंथ समोर ठेवून त्यांच्या सद्गुरुचरणी प्रार्थना केली. ‘अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ महाराज, हे वादळ शांत करा. आमचे जहाज सुखरुपपणे परत किनाऱ्यास लागले तर मी सर्वसंग परित्याग करून माझे आयुष्य तुमच्या सेवेत आणि परमेश्वरोपासनेत घालवीन’ महाराज प्रार्थना करताच तोच दैवी चमत्कार व्हावा, त्यानुसार वादळ शांत झाले. जहाजावरील सर्वांनीच अक्कलकोटच्या स्वामीमहाराजांचा आणि ‘पांडुबुवा’ चा जयजयकार केला. महाराजांच्या पुण्याईने आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने बुडणारी फत्तेमारी वाचली.

त्याचवेळी अक्कलकोटांसही मोठा चमत्कार घडून आला. सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराज शिष्यगणांसमवेत बसले असता एकाएकी ओरडले, “अरे तो पहा, समुद्रात पांडु बुडाला!” आणि स्वामीमहाराजांनी हवेतच हात मारले आणि पांडूला वाचविल्यासारखे केले. त्यावेळी त्यांच्या हातून जे पाणी सांडले ते समुद्राच्या पाण्यासमान खारट होते.

त्या वादळानंतर जहाजाची फत्तेमारी व्यवस्थितपणे पार पडली असली तरीही महाराज मात्र घरी न जाता थेट अक्कलकोट येथे सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास निघून आले. अक्कलकोट येथे पांडुबुवा येताच श्रीस्वामी समर्थ महाराज भावसमाधीतून जागे झाले आणि उठून उभे राहिले. पांडुबुवांनी धावत येऊन भक्तिभावपूर्वक स्वामींच्या चरणांस कडकडून मिठी मारली व ते म्हणाले, “सद्गुरु महाराज, मला संसार नको. आता आपली सेवा हा माझा संसार. मला आशीर्वाद द्या.” श्रीस्वामी समर्थ महाराजांनी त्यास प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला आणि उठवून आपल्या हृदयाशी कवटाळले. सारे शिष्य विस्मयाने पाहात होते तेवढ्यात स्वामी म्हणाले, “अरे कोळ्याच्या पोरा, साध्या सागराला घाबरतोस ? तुला तर या दुनियेचा सागर तरून जायचा आहे!”

श्री आनंदभारती स्वामी महाराज
ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील पुरातन दत्त मंदिर. श्री आनंदभारती महाराज येथे साधना करीत असत. त्यांनी त्यांच्या अवतारकार्यातील जास्तीजास्त काळ येथे व्यतित केला.

त्यानंतर महाराज दोन तीन वेळा अक्कलकोटास श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास गेले. अखेर एकदा, वडील व सावत्र मातेसह पांडुबुवा अक्कलकोटास गेले असता आपल्या सोबत घेतलेली भगवी वस्त्रे त्यांनी मठात जाऊन श्रीस्वामींच्या नकळत त्यांच्या बिछान्याखाली ठेविली. श्रीस्वामी समर्थ महाराज काही वेळानंतर आपल्या बिछान्यावर बसले. महाराज त्यांच्यापुढे येऊन हात जोडून उभे राहिले. महाराजांची अनन्य निष्ठा, गुरुभक्ती आणि दृढनिश्चय पाहून श्रीस्वामी समर्थांना परमानंद झाला आणि पांडुबुवांच्या मनातील विचार अंतर्ज्ञानाने जाणून घेत त्यांनी बिछान्याखाली ठेवलेली भगवी वस्त्रे स्वहस्ते मोठ्या प्रेमाने देत पांडुबुवांना “घ्या ! आनंद घ्या ! आणि ‘आनंद भरती’ व्हा !” असा आशीर्वाद दिला. 

पांडुबुवांनी श्रीस्वामी समर्थांचे चरण धरले तसे श्रीस्वामींनी त्यांच्या मस्तकावर कृपावरदहस्त ठेवून त्यांना अनुग्रह दिला. भगवी वस्त्रे परिधान करून ‘आनंदभारती महाराज’ ब्रह्मानंदाने श्रीस्वामीमहिम्याची भजने गात नाचू लागले. श्रीस्वामी समर्थ महाराजांसारख्या सद्गुरुंचा अनुग्रह आणि आशीर्वाद लाभले हे महद्भाग्यच होय. त्यामुळे आनंदभरतींना श्रीस्वामी महाराजांना सोडून जावे असे वाटेना, सद्गुरुंच्या सेवेत, त्यांच्या सदुपदेश श्रवण, चिंतन करण्यात आणि भजनपूजनात त्यांचा वेळ सार्थकी लागला. सद्गुरुंच्या प्रभावाने आणि आत्मबलाने आनंदभारती उन्मनी अवस्थेला पोहचले. अशातच, अकरा वर्षे उलटली अखेर, श्रीस्वामी समर्थांची जाण्याची आज्ञा होताच ते अक्कलकोटहून मुंबईस आले आणि कांदेवाडी येथील स्वामी सुतांच्या मठात येऊन राहिले. येथे आल्यानंतर दर गुरुवारी श्रीस्वामींच्या आज्ञेनुसार ते भिक्षा मागून राहात असत. त्यांच्या भजनपूजनाचा नित्यक्रम सतत चालू होताच. श्रीस्वामीसुतांच्या मठामध्ये असताना एके दिवशी श्रीआनंदभारतींना श्रीस्वामी समर्थांचा दृष्टांत झाला. श्रीस्वामींनी त्यांना पुन्हा मुक्कामी परतण्यास सांगितले. आनंदभारती महाराज ठाण्यास आले. ठाणे रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडे सध्याच्या श्रीदत्त मंदिराजवळील औदुंबराखाली छोटी झोपडी बांधून त्यात रात्रंदिवस ते नामसंकीर्तन करू लागले. दुपारी व रात्री ते ठाण्यामधील श्रीकौपिनेश्वराच्या देवळात एकांतात धार्मिक ग्रंथांचे वाचन, मनन व चिंतन करीत असत.

महाराज औदुंबराखाली ज्या पर्णकुटीमध्ये राहात तिथे, त्यांच्यासोबत ‘काशी’ नामक गाय, ‘कल्याणी’ नामक कुत्री आणि एक मधुरभाषी पोपटही मुक्कामास होता. त्या तिघांवरही आनंदभारतींचे जिवापाड प्रेम होते, त्यांना स्वत:च्या हाताने जेवू घातल्याशिवाय महाराज स्वत:साठीच्या अन्नाला स्पर्श करीत नसत. 

आनंदभारती महाराज भक्तमंडळीसमवेत भगवे निशाण घेऊन भजने म्हणत रस्त्याने भिक्षा मागत जात असत. ते कोणाच्याही दारात उभे राहात नसत. कोणी भिक्षा वाढलीच तर मोठ्या प्रेमाने घेत आणि त्यास आशीर्वाद देत. महाराजांना थोडीशी भिक्षा मिळाली की ते खूश असत, मात्र कोणी अधिक भिक्षा घातली तर ते नाखूष होत. भिक्षा घेत भजने म्हणत रस्त्याने चालत असता समोरून दुसरा कोणी दीनदुबळा भिकारी दिसला की, त्यांस मोठ्या आपुलकीने बोलावून महाराज स्वत:च्या झोळीमध्ये हात घालून आपणांजवळ जमलेली भिक्षा देत असत. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असे आणि त्यांच्याविषयी असलेला आदर वाढत असे. मात्र काहीजण श्रीमहाराजांची ‘कोष्टीबुवा’ म्हणून चेष्टाही करीत असत. तसेच त्यांच्या झोळीमध्ये माती, दगड-धोंडे, मासे, हाडे, वहाणा अशा वस्तूही टाकीत असत, मात्र आनंदभारती महाराज त्यांच्यावर कधीही रागवत नसत.

एका गुरुवारी दुपारच्या समयी आनंदभारती महाराज भोजन घेत होते, इतक्यात त्यांची आवडती ‘कल्याणी’ कुत्री आली व महाराजांच्या पानांत तोंड घालून जेवू लागली. त्यावेळी तिथेच असलेले पांडुरंग मास्तर कळवेकर यांना महाराजांच्या पानांत कुत्री जेवत असल्याचे पाहून विलक्षण संताप आला. त्यांनी जवळचीच एक काठी घेऊन त्या कुत्रीच्या पाठीवर मारली. कुत्री ओरडू लागली तशी महाराजांना संताप आला, (खरं तर तेव्हा पांडुरंग मास्तरांच्या भाग्योदयाची वेळ आली होती म्हणूनच महाराजांना संताप आला.) महाराज रागारागाने उठले आणि त्यांनी पांडुरंग मास्तरांच्या श्रीमुखात भडकावली. पांडुरंग मास्तर कोलमडून खाली पडले. त्यांची शुध्द हरपली. मात्र, काही काळाने त्यांनी डोळे उघडले, तेव्हा महाराजांच्या सोबत साक्षात श्रीदत्तात्रयांचे त्रिमूर्ती रूप भोजन घेत असल्याचे त्यांनी पाहिले. श्रीदत्तात्रेयांच्या दुर्लभ दर्शनाने त्यांना कृतार्थ झाल्याचा परमानंद झाला. 

पांडुरंग मास्तरांनी हा प्रसंग श्रुत केला तशी अनेकांची रीघ श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी होऊ लागली. सर्व भक्तगण त्यांच्या भजनी लागले. श्रीआनंदभरती महाराजांच्या भक्तमंडळीत श्रीस्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त होते. त्यांनी सर्वांनी अक्कलकोटास जाऊन तेथून श्रीसद्गुरुंच्या पादुका आणून ठाण्यामध्ये त्यांची स्थापना करण्याचे ठरविले. त्यानुसार, श्रीआनंदभारती महाराज व इतर भक्तमंडळी सोबत पादुका घेऊन श्रीसद्गुरुंच्या आज्ञेसाठी अक्कलकोटास गेली. सर्वांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांकडे ठाणे येथे पादुका स्थापन करण्यासाठी आज्ञा मागितली. श्रीस्वामी समर्थ महाराजांनी मंडळींनी आणलेल्या पादुका जवळ घेऊन त्या नारायण नाखवांना पुन्हा अनुग्रहपूर्वक परत देत मोठ्या प्रेमाने म्हटले, “लेव गंगासिंग, जाव बेदर का किल्ला बनाव.”

सन १८६६ मध्ये, सध्या जिथे श्रीदत्तमंदिर आहे तिथेच आनंदभारती महाराजांनी मठ बांधून श्रीस्वामी पादुकांची स्थापना मोठ्या उत्साहाने केली. श्रीआनंदभारती त्या मठातच येऊन राहू लागले. पुढे काही भक्तांच्या सहकार्याने आनंदभारती यांनी माघ शु.३ शके १८०१ रोजी श्रीदत्तात्रेय आणि श्रीशितळादेवीची मूर्ती स्थापून या मठाचे रुपांतर श्रीदत्तमंदिरामध्ये केले. आनंदभारती भजनपूजनासाठी श्रीदत्तमंदिरात वास्तव्य करीत असले, तरी श्रीस्वामींच्या भेटीसाठी ते अधूनमधून अक्कलकोटास जात असत. आनंदभारती महाराजांसोबत या मंदिरात भरतानंद, जती, हरि व चंचल भारती (हिरा पाटील) हे त्यांचे शिष्यही राहात असत. पुढे श्रावण शुद्ध १४ बुधवार शके १८४३ मध्ये कोळी जमातीने पंचवीस हजार रुपये जमवून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्रीआनंदभारती महाराज श्रीदत्तमंदिरातच राहात असल्यामुळे तेथे दिवसरात्र भजनपूजनादी कार्ये चालत असत. आषाढी एकादशीचा नामसप्ताह, मार्गशीर्ष शु.६ चंपाषष्ठी उत्सव, मार्गशीर्ष शु. १५ ची श्रीदत्तजयंती वगैरे धार्मिक उत्सव, ह्या मंदिरात होत असत.

चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १८०० मंगळवारी चतुर्थ प्रहरी वटवृक्षाखाली अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेत त्यांच्या अवतारकार्याची समाप्ती केली. त्यांचे अगणित शिष्य आणि भक्तगण शोकसागरात बुडाले. श्रीस्वामींनी अनेक शिष्यांचा उद्धार केला. त्यांच्या कृपाप्रसादाने जे काही शिष्य ब्रह्मपदाला पोहोचले त्यात श्रीआनंदभारती महाराजांचे स्थान अग्रगण्य होते. श्रीस्वामी समर्थ समाधिस्थ झाल्याची दु:खद वार्ता श्रीआनंदभारती महाराजांना समजली. त्यांना अपरिमित दु:ख झाले. आपण श्रीसद्गुरुंच्या प्रस्थानाच्या वेळी अक्कलकोटास हजर नव्हतो याचे महाराजांना अतिशय वाईट वाटले. काही दिवसांनी श्रीस्वामी समर्थांच्या समाधीदर्शनास श्रीआनंदभारती महाराज गेले. ज्या वटवृक्षाखाली श्रीस्वामी समर्थांनी समाधी घेतली होती, त्या वटवृक्षाखाली त्यांच्या शिष्यमंडळींनी छोटीशी घुमटी बांधून त्यात श्रींच्या पादुका ठेविल्या होत्या. महाराज तेथवर जाताच अक्षरश: लहान मुलासारखे धाय मोकलून रडले. ‘सद्गुरुराये कृपा मज केली । परी नाही घडली सेवा काही ॥’ ह्या गोष्टीचे महाराजांना राहून राहून वाईट वाटत होते. त्यानंतर महाराज तेथे अदमासे सहा महिने राहिले. वटवृक्षाखाली बसून ते भजन-नामस्मरण करीत असत. त्यानंतर मात्र समाधीजवळ जाऊन श्रीसद्गुरुंची आज्ञा घेऊन ते ठाण्यास परतले. श्रीआनंदभारती महाराज माघारी परतल्याचा त्यांच्या भक्त मंडळींना अतिशय आनंद झाला.

मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १८२३ सोमवारी रात्री श्रीआनंदभारती महाराजांनी आपल्या सर्व शिष्यांना आणि भक्तमंडळींना बोलाविले आणि श्रीदत्तमंदिरात मोठ्या आनंदाने भजन केले. त्यानंतर सर्व शिष्यांना आपण अवतार समाप्ती करणार असल्याचे सांगून सर्वांचा मोठ्या प्रेमाने निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी परमेश्वराची आणि श्रीसद्गुरु स्वामीसमर्थ महाराजांची प्रार्थना केली. आरती म्हटली, सर्वांना पुन्हा एकदा हात जोडले आणि महाराज स्वर्गस्थ झाले. सर्व शिष्य आणि भक्तमंडळींनी रडून एकच आकांत केला. महाराज म्हणजे प्रत्येकाच्या जिवाभावाची एकच वात्सल्यमूर्ति । आता यापुढे आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी श्रीसद्गुरुंची मूर्ती आपणांस लाभणार नाही ह्याचे प्रत्येकास अतोनात दु:ख झाले.     

दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ‘चंपाषष्ठी’ होती. सर्व भक्त मंडळींनी हत्तीच्या श्रीदत्तमंदिरासमोरील दीपमाळेपाशी श्रीआनंदभारती महाराजांची समाधी बांधण्याचे ठरविले. मात्र काही नास्तिक, विघ्नसंतोषी आणि दुष्ट लोकांनी त्यास हरकत घेतली. महाराजांची समाधी कोठे बांधावी ह्या विचारात ही सर्व मंडळी होती. तोच श्रीदत्तमंदिरात महाराजांच्या समाधिस्थ देहाजवळ बसलेल्या दोन भंडारी स्त्रियांनी आपली जागा समाधीस देऊ केली. नवपाडा (सध्याचा नौपाडा परिसर) येथील श्रीलक्ष्मीनारायण मंदिराजवळील दाट झाडी व आजूबाजूस भाताची शेते असलेल्या ठिकाणी त्या स्त्रियांची जागा होती. त्या दोन स्त्रियांमधील जमुनाबाई वारे यांची जागा श्रीमहाराजांसमोर कौल मागून मुक्रुर करण्यात आली. सध्याच्या श्रीलक्ष्मीनारायण मंदिरातील मूर्तीच्या खाली जागा खणून समाधीकरिता जागा तयार केली. त्यानंतर त्याच दिवशी चंपाष्ठीस गोपाळराव विद्धांस, गोपाळराव ठाणकर वगैरे प्रभृतींनी पुढाकार घेऊन श्रीआनंदभारती महाराजांचा देह मिरवणुकीने तिथवर आणला. समाधीसाठी खणलेल्या जागी श्रीआनंदभारती महाराजांचा समाधिस्थ देह ठेवण्यात आला. सर्व भक्त मंडळींनी मोठ्या प्रमाणात भजन केले, त्यावेळी गोपाळराव ठाणकर यांनी श्रीआनंदभारती महाराजांनी केलेले कटाव आणि स्वत: महाराजांच्या वर केलेले अभंग गायले. अखेरीस, सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने श्रीमहाराजांची आरती म्हटली, तीर्थप्रसाद घेऊन मंडळी घरी परतली.

'श्रीगुरुलीलामृत’ ह्या ग्रंथाचे लेखनकर्ते आदरणीय कै. गोपाळराव महादेवराव विद्धांस  व आनंदभारती

श्रीआनंदभारती महाराजांच्या प्रेरणेने ‘श्रीगुरुलीलामृत’ या ग्रंथाचे लेखनकार्य करणारे कै. गोपाळराव महादेवराव विद्धांस धार्मिक ब्राह्मण होते. हे मूळचे रत्नागिरीतील श्रीपरशुराम क्षेत्र अर्थात केळशी या गावचे. तत्कालीन पेशवे सरकारांनी या घराण्यातील वेदशास्त्रपारंगत वैदिक ब्राह्मणांस पुण्यास आमंत्रित करून सरकार दरबारी रुजू केले, त्याच्याच वंशावळीतील कै.महादेवराव या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पदावर कार्यरत असलेल्या कर्तबगार पित्याच्या पोटी गोपाळराव यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव उमा होते. उत्तम शिक्षण व कौटुंबिक वारसा लाभल्यामुळे गोपाळरावांची कारकीर्दही पी.डब्ल्यू.डी. मध्ये ओव्हरसिअरच्या रुपाने बहारास आली.

पुण्यामध्ये काही कामानिमित्ताने एका सोनाराच्या घरी गेले असता गोपाळरावांच्या दृष्टीस श्रीआनंदभारती महाराजांचे छायाचित्र आले. तेव्हापासून श्रीसद्गुरुंच्या ध्यासाने पछाडलेले गोपाळराव थेट ठाण्यास आले आणि श्रीआनंदभारती महाराजांच्या चरणसेवेत रूजू झाले. लिखाणाची आवड असलेले गोपाळराव त्यांच्या काव्यातून इंग्रज सरकारवर टिका करीत असल्याचे पाहून श्रीआनंदभारतींनी त्यांना अध्यात्माकडे वळण्यास सुचविले आणि त्यातूनच पुढे ‘श्रीगुरुलीलामृत’ या ग्रंथाची निर्मिती झाली. पुढे गोपाळराव विद्धांस यांचे निधन १७ डिसेंबर १९३५ रोजी झाले. 

श्रीआनंदभारती-हरिभक्त संवादे’ स्वरूपातील २१ अध्यायी ‘श्रीगुरुलीलामृत’ ह्या ग्रंथ निर्मितीच्या संकल्पनेविषयी

श्रीआनंदभारती महाराजांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी कै. गोपाळराव महादेवराव विद्धांस यांच्याकडून लिहवून घेतलेल्या ‘श्रीगुरुलीलामत’ ग्रंथ. श्रीदत्तसंप्रदायातील श्रेष्ठ ग्रंथ ‘श्रीगुरुचरित्र’ हा याचा मूळ आधारभूत ग्रंथ आहे. आबालवृद्धांमध्ये श्रीगुरुभक्तीची आवड निर्माण होऊन भक्तिमार्गाचा प्रसार व्हावा या उदात्त हेतूने श्रीमहाराजांनी हे ‘श्रीगुरुलीलामृत’ विध्दांसांकरवी पूर्णत्वास आणून मराठी संतवाड़्मय समृद्ध केले. ‘शके अठराशे सतरा भितरी । श्रावणमासी इंदुवासरीं । कृष्ण चतुर्दशीचे अवसरीं । झाला लेखना आरंभ ॥६॥ - श्रीगुरुलीलामृत (अध्याय २१). श्रीआनंदभारती महाराजांनी कै. गोपाळराव महादेव विद्धांस यांची विद्वत्ता, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास आणि भक्तिप्रीतीची तळमळ पाहून त्यांना ‘श्रीगुरुचरित्र’ या मूळ ग्रंथावरून ‘श्रीगुरुलीलामृत’ लिहिण्याची प्रेरणा दिली. श्रावण सोमवार कृ. चतुर्दशी शके १८१७ पासून ग्रंथ लिखाणास प्रारंभ झाला. गोपाळराव विद्धांस त्यांच्या नोकरीतून वेळ काढून ठाण्यास येत. श्रीदत्तमंदिरात महाराज त्यांना लिहावयास सांगत असत. पहिला ‘नमनाध्याय’ लिहून झाल्यावर प्रापंचिक अडचणींमुळे पुढे सहा वर्षे विद्धांस यांच्याकडून काहीच लेखन झाले नाही. श्रीगुरुकृपेने अडचणी दूर झाल्यावर मात्र शके १८२३ च्या श्रावण शु. प्रतिपदा ते कार्तिक मासापर्यंत १५ अध्याय लिहून पूर्ण झाले. ‘श्रीगुरुलीलामृता’तील पंधरावा अध्याय समाधीयोग विषयाचा आहे. हा अध्याय संपत असतानाच श्रीआनंदभारती महाराज त्यांचे अवतारकार्य संपविण्याची घटिका जवळ आल्याचे जाणवू लागले. श्रीमहाराज सहजच विद्धांस यांना म्हणाले. “गोपाळराव, माझे जीवितकार्य आता संपते आहे. माझ्या समाधीग्रहणानंतर हे ग्रंथलेखनाचे कार्य लवकर उरका.” त्यावर विद्धांस म्हणाले, “महाराज, आपण समाधी घेतल्यानंतर मी हे कार्य कसे करणार ? मजसारख्या पामराला कोण मार्गदर्शक लाभणार?” त्यावर श्रीमहाराजांनी त्यांची समजूत काढीत त्यांना सांगितले, ‘‘गोपाळराव, तुम्ही अगदी निश्चिंत रहा. श्रीस्वामीकृपेने ‘श्रीगुरुलीलामृत’ लवकरच पूर्ण होईल.”

’श्रीगुरुलीलामृता’चा पंधरावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर गोपाळराव विद्धांस यांची बदली एकाएकी अहमदाबादेस झाल्याने ते तिकडे गेले आणि इथे चंपाषष्ठीस श्रीआनंदभारती महाराजांनी देहत्याग केला. त्यांच्या निवेदनाअभावी विद्धांस यांना ग्रंथलेखन करणे अवघड जाऊ लागले. पुढे श्रीआनंदभारती महाराजांची समाधी बांधून पूर्ण झाल्यानंतर गोपाळराव यांस श्रीमहाराजांनी स्वप्नदृष्टांताद्वारे ग्रंथ लेखन पुढे चालविण्याची आज्ञा केली. श्रीआनंदभारती महाराजांच्या कृपाशीर्वादाने आषाढ शके १८२४ पासून गोपाळराव विद्धांस यांनी पूर्ववत ग्रंथलेखन सुरु केले आणि आषाढी एकादशीच्या पुण्ययोगावर ग्रंथलेखनाची समाप्ती झाली.

’अनुग्रही सद्गुरुमूर्ती । स्वामी माझा आनंदभारती । नमस्कार असो तयाप्रती । वारंवार साष्टांग ॥’ (अध्याय २१/४५)

असा श्रीमहाराजांचरणी साष्टांग नमस्कार करून ‘सद्गुरुसच अर्पोनी स्वस्थ । बसतो आता आनंदे ।’ (अध्याय २१/५७) असे म्हणून ‘श्रीगुरुलीलामृत’ हा ग्रंथ श्रीसद्गुरुचरणी अर्पण केला.

हरि ओम् तत्सत् । हरि ओम् तत्सत् । हरि ओम् तत्सत् ।