श्री गगनगिरी महाराज (श्रीपाद गणपतराव पाटणकर)

श्री गगनगिरी महाराज
श्री गगनगिरी महाराज

जन्म: १९०६, मणदुरे, ता. पाटण (महाराष्ट्र)
मूळ नाव: श्रीपाद गणपतराव पाटणकर
आई/वडिल: विठाबाई / गणपतराव
कार्यकाळ: १९०६-२००८
संप्रदाय: नाथ संप्रदाय
समाधी: ४-२-२००८, खोपोली येथे
विशेष: विश्व गौरव पुरस्कार 

जन्म बालपण व साधना 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मणदुरे नावाचे खेडे आहे. येथील गणपतराव व विठाबाई या वारकरी दांपत्याच्या पोटी एक पुत्र झाला. त्याचे नाव ‘श्रीपाद’ होते. लहानपणापासून श्रीपादाला साधुसंतांच्या संगतीची ओढ लागली. वयाच्या आठव्या वर्षी श्रीपादने घराचा त्याग करून हिमालयाची वाट धरली. तेथे तपस्या केली. चित्रकूट पर्वतावरील चित्रानंद स्वामींचे त्याने दर्शन घेतले. त्यांच्याच आश्रमात श्रीपाद राहू लागला. नंतर हिमालयातील क्षेत्रे, अरवली पर्वत, सातपुडा, निलगिरी, द्वारका, जगन्नाथपुरी, कन्याकुमारी इत्यादी स्थानांना भेट देऊन श्रीपादने कोल्हापूर जवळच्या राधानगरीजवळ एका जंगलात तपश्र्चर्या केली. आणि शेवटी जवळच्याच गगनगडावर ते स्थिर झाले. अंगावर वस्त्र नाही. वाढलेल्या दाढी-जटा यामुळे प्रथम लोकांचा त्यांना उपद्रव झाला. पण थोड्याच दिवसांत त्यांची तपस्या व ध्यानधारणा लोकांना समजली. पुढे ते गडावरील स्वामी गगनगिरी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी शरीराला कष्ट देऊन उग्र तपस्या केली. जे मिळेल ते खाल्ले. नित्य पाण्यात बसून त्यांनी तपस्या केली. आपल्या सामर्थ्याने त्यांनी हजारो लोकांना सन्मार्गास लाविले. आईवडील, कुलदैवत, इष्टदेवता यांच्यावर श्रद्धा ठेवून चिंतनात मग्न असावे, अशी त्यांची शिकवण आहे. अनेक भाविक त्यांचे दर्शन घेऊन तृप्त झाले आहेत.

गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातील हठ योगी होते. ते चालुक्यसम्राट पहिला पुलंकेशीच्या घराण्यातील होते. लहान वयात घर सोडल्यावर सुरवातीलाच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायी बरोबर ते बत्तीस शिराळा येथे आले व तेथेच त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. चित्रकूट पर्वता वर त्यांना  चित्रानंद स्वामींची भेट झाली.

गगनगिरी महाराज
श्री गगनगिरी महाराज

एकदा बद्रीनाथ जवळील व्यासगुंफेत महाराज दमून पहुडले होते. तेव्हा  पर्वतावरून एक कफानिधारी साधू आले त्यांनी आपल्या कमडलूतील पाणी  श्रीपादांचे तोंडावर  शिंपडले व कमांडलूतील  हिरवेगार कोथिंबीरीसारखे गवत  खाण्यास दिले. व म्हणाले आजपासून तुला सिद्धवस्था प्राप्त होईल. तुझ्याकडून मानव जातीचे कल्याणाचे कार्य होईल. तू आता दक्षिणेकडे जा. तसेच ते ह्रिषिकेश ला येऊन पोहोचले. थोड्याच दिवसात लोक त्याना स्वामी किंवा महाराज म्हणू लागले. पुढे भोपाळ पर्यंत गेले असता एका  तलावाचे काठी स्नान करून बसले असता, कोल्हापूरचे राजे व काही सरदार येऊन बसले व मराठीत बोलू लागले. महाराजही त्यांच्याशी मराठीत बोलू लागले. कोल्हापूरचे महाराज ह्या बाल योग्याला घेऊन कोल्हापूरला आले.

महाराजांचे तपाचरण 

त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्षे तपश्चर्या केली. सुरवातीस महाराज एका धनगर वाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले. त्या  अरण्यात कंदमुळे झाडपाला व वनस्पती  भरपूर  असल्याने ते तेथे रमले. झाडाच्या ढोलीत त्यांनी तप केले. भूत विद्या, जारण, मारणं उच्चाटन  विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचा शोध लागला. या तपात झोपण्यासाठी गवताची गादी केली होती ती गादी झाडासारखी  अंकुर फुटून वाढू लागली त्यामुळे विद्या पूर्णत्वास जात असल्याची खात्री झाली व ते सिद्ध होऊ लागले. पर्जन्य काळात अंगावर वस्त्र निर्माण करण्या साठी कुभ्याच्या सालीचा वाक व आपट्याच्या सालीचा वाक व पळसाच्या पानाचे इरले करून, पावसात हलते घरही बनवीत. पुढे गगनगडावर जल।त  उभे राहून तपश्चर्या केली व योगशास्त्रातील अनेक विद्या व अवघड सिद्धी प्राप्त करून घेतल्या. विमालज्ञान, शिवयोग उन्मनी अवस्था व विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या आत्मसात केल्या.  

गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली
श्री गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली

महाराजांनी योगशास्त्राचा संदेश सर्वत्र पोहोचविला. महाराजांनी हजारो भक्तांचे कल्याण करत त्यांना भक्ती मार्गाला लावले. महाराजांचे शिष्य महाराष्ट, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रामध्ये विखुरलेले आहेत.

सिध्द योगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे योगाश्रमात पाताळगंगा तीर्थक्षेत्री पर्णकुटीत ४ फेब्रुवारी २००८ पहाटे ३.३० वाजता देह ठेवला. तेव्हा ते १०३ वर्षाचे  होते.

गगनगिरी महाराज यांचे आश्रम गगनगड, खोपोली, मनोरीबेट, आंबोळगड, दाजीपूर, नागार्जुन सागर इत्यादी ठिकाणी आहेत. येथे दत्तमूर्ती स्थापन करून त्यांनी लाखो लोकांना भक्तिमार्गाकडे वळविले आहे. गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्र इत्यादी प्रसंगी या आश्रमात भजनपूजन थाटाने होत असते. अन्नदानही मोठ्या प्रमाणावर होते.

 

स्वामी गगनगिरी महाराज बोधवचने

१) लोकांना यश का येत नाही ? तर सर्व अर्धवट करत जातात, आत्मा ओतून करत नहीत. 
२) मी माझे सोडा घरदार नव्हे.
३) ईश्वर हेच माध्यम म्हणून जगल्यास आनंद संपणारच नाही. 
४) गुरू हे एक प्रवेशद्वार आहे. 
५) संगत करायची पण त्याच्या व्युहात अडकायचे नाही. 
६) मी सर्वांना एका विशाल क्रांतीच्या झोताकडे, दुःखावर मात करणाऱ्या आनंद यात्रेकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहे.  
७) माणसाने स्वतःचे अस्तित्व विसरुन  जगले पाहीजे. 
८) माणूसकी ही परमेश्वराची सेवा करण्याची पहिली पायरी.
९) तुम्हाला योग साधना करायची नसेल तर निदान मानवतेचे तरी आचरण करा.
१०) व्यक्तिगत जीवन अनेक स्तरांवर सम्रुद्ध् झालेच पहिजे, परमेश्वराकडे वाटचाल करण्याचे हे पहिले पाऊल.

स्वामी गगनगिरी महाराज
स्वामी गगनगिरी महाराज

नाथ सांप्रदायी महायोगी गगनगिरी महाराज

कोकणात राजापूरजवळील आंगले गावी खडकावर पाण्याच्या कडेला राहून कायाकल्प केला. नंतर मुंबईला १९४८ ते १९५० साली महाराज वाळकेश्वरजवळील शिडीच्या मारूतीजवळ दादी हिरजी पारशी स्मशानात राहू लागले व तप करू लागले. ब्रीच कँडीचा खडक, महालक्ष्मीचा खडक, बाणगंगेचा खडक या टापूंत तप करून दादी हिरजी शेठच्या पपेटी बंगल्यात अय्यारीच्या समोर,कधी कधी स्मशानबावडीजवळ खाट टाकून तप करू लागले. 

याकाळात सयाजीराव गायकवाड, माधवराव शिंदे, छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज कोल्हापूर, बावडेकर सरकार व भाऊसाहेबपंत अमात्य, महाराणी ताराबाई सयाजीराव गायकवाडांची मुलगी, व कोल्हापूर दरबारचे बरेचसे सरदार महाराजांच्या सहवासात आले. ते शिकारीच्या निमित्ताने उन्हाळ्यात अरण्यात येत व पावसाळा सुरू झाला की निघून जात. 

महाराज त्या जंगलातच एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून राहत व जवळपास कोठे कंदमुळे, जंगली भाजीपाला मिळेल अशा जवळच्या ढोलीत वास करून राहत. पाऊस पडण्याआधी अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचा वाक, आपट्याच्या झाडाच्या सालीचा वाक, व पळसाच्या पानांचे इरले करून पावसापासून बचावासाठी डोक्यावर चालते घर तयार करित असत, त्यामुळे पावसापासून त्यांचा बचाव होई. या चालत्या घरास गमतीने स्वामींनी इरले हे नाव ठेवले होते. 

अरण्यात त्यांना या वेळेला आत्मज्ञान होऊन खुप फायदा झालेला होता. अफाट पुण्याई संचय झाली होती. त्यामुळे मुंबईतील जनतेला व आम खेडुत जनतेला खुप फायदा होऊ लागला, तसे तसे लोक त्यांना भजु लागले. हळुहळु त्यांची प्रसिद्धी होऊ लागली. त्या काळापासून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, राजारामबापू पाटील, कपासे आदी सर्व मंत्री मंडळी व प्रतिष्ठित अधिकारी वर्ग त्यांना भजू लागले. मुंबई येथील चौपाटीवरील बिर्ला क्रिडा केंद्रात गुरुपौर्णिमा थाटामाटात करू लागले. 

नवनाथी तप करीत असल्याने त्यांना मौज वाटे. मन निर्विकल्प बनविणे, इंद्रिये शांत ठेवणे, शुद्ध, पवित्र, मन मानेल तसा आहार घेणे. सतरावीची जीवनकळा साधल्याने तोंडातील झरे उलटे वाहून अमृतसिंचन करतात, त्यामुळे योग्यास आहाराची जरूरी लागत नाही. वन,अरण्य, पर्वत, नदीकिनारी भरपूर एकांत साध्य झाल्याने तो योगी सिद्ध पावतो. हजारो जनजीवांचे भार उतरविण्यास तो योगी योग्यच ठरतो. सिद्धों के सिद्ध झाल्याने, जीव व परमात्मा एकरूप झाल्याने शरीररूपी आनंदवनात तो योगी सुखाने नांदतो व अंतिपक्षी मोक्षाला जातो. अशा पुण्य पुरूषाच्या सहवासात पतित मानव सुद्धा उद्धरून जातात. त्याचे परम कल्याण होते. साधुचा सहवास करावा, सेवा करावी, अनादर करू नये, स्मरण करावे, चिंतन करावे, अशा पुण्य पुरूषाच्या सहवासाने मन पुरूषोत्तम बनवावे.

ॐ गगनगिरी देवत्वं आत्मत्वं दिव्यत्वं ज्ञानत्वं परमात्मानं दिवेच श्रीयंमयः ॐ शांतीः शांतीः शांतीः

स्वामी गगनगिरी महाराज
स्वामी गगनगिरी महाराज

मुंबईच्या समृद्धीचे रहस्य, महालक्ष्मी आणि मुंबादेवी, गगनगिरी महाराज

श्रीगगनगिरी महाराज मुंबईत राहणार्यांना नेहमी सांगायचे कि मुंबईतील प्राचीन देवस्थाने, महालक्ष्मी, मुंबादेवी व वाळकेश्वर यांच्या दर्शनाला अवश्य जात जा. मुंबापुरीची जी माया आहे ती या महालक्ष्मी व मुंबादेवी मुळेच आहे. महालक्ष्मीमुळे या मुंबईला वैभव प्राप्त आहे. महालक्ष्मी व मुंबादेवीमुळेच ही मुंबई स्थिर आहे. "महालक्ष्मी या मुंबईतून जाऊ इच्छिते पण मुंबादेवी ध्यानात असल्यामुळे ती महालक्ष्मीची वाट अडवून आहे. तिला निघून जाणे शक्य होत नाही. ज्या दिवशी ही मुंबादेवी ध्यानातून जागी होईल त्यादिवशी ही मुंबईची माया महालक्ष्मी निघून जाईल. मुंबईचे ऐश्वर्य निघून जाईल. "ज्यादिवशी मुंबादेवी जागृत होईल त्यादिवसा पासून मुंबईचा आलेख, तिची संपन्नता अधोगतीला जाईल,  महालक्ष्मी सोबत निघून जाईल".

म्हणून गगनगिरी महाराज सांगत की आधी महालक्ष्मीचे दर्शन घ्या व मग मुंबा देवीचे! ह्यामुळे ती महालक्ष्मी स्थिर होते. मुंबा देवी तिला रोखून धरते. मुंबादेवी मुंबईचे सर्व आपदांपासून (संकटांपासून) रक्षण करत आहे. मुंबईतल्या गुजराती-मारवाडी-आगरी-कोळी समाजाला ह्या गोष्टी ज्ञात होत्या त्या म्हणून यांच्या दर्शनाला ते मोठ्या प्रमाणावर जातात. हे गुपित माहित असल्यामुळेच गुजराती लोकांनी मुंबादेवीच्या आसपास उद्योग सुरू केले. सोने हिर्यांचा झवेरी बाजार पण त्याच परिसरात आहे. मुंबा देवी व वाळकेश्वर ही मुंबईतील आगरी-कोळी लोकांची आराध्य दैवते! वाळकेश्वर ला अजुनही आगरी-कोळी लोक वाळक्या म्हणतात. त्याचा योग्य मानपान ठेवल्यामुळेच त्या परिसराच्या आसपास आगरी-कोळ्यांना अजुनही मोठ्या प्रमाणावर मासे मिळतात अशी येथील आगरी-कोळी लोकांची श्रद्धा आहे.

प. प. गगनगिरी महाराज ह्यांची जल तपस्या व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ह्यांची कथा

नरसोबाची वाडी तशी दत्त भक्तांसाठी जिव्हाळ्याचे स्थान. आयुश्यात निदान एकदा तरी दत्त भक्त ह्या स्वामींच्या पादुका स्थानी भेट देतोच. ही कथा आहे नरसोबा वाडीला राहणार्या मंदिरातील एका पुजार्याच्या घरची. असे ऐकण्यात होते कि त्या पुजार्याच्या कुटुंबावर पिढ्यांपिढ्या पित्रुदोष व पिशाच्चबाधेचा त्रास होता. पुर्वी त्यांचे पुर्वज ठरावीक विशिष्ट सोवळे पाळुन दत्त उपासना नित्य करत, त्यामुळे पित्रुदोष व पिसाच्छांचा उपद्रव अवाक्यात होता. पण काळांतराने पुढच्या पिढीला काही तेवढे कडक सोवळे व उपासना जमली नसेल व त्याचे वाईट परिणाम कुटुंबाच्या सौख्यावर बर्या पैकी होत होते. 

एकदा स्वामी गगनगिरी महाराज त्या पुजार्याच्या आग्रहास्तव वाडीला गेले व त्याच्या घरी जाताच तेथुन त्वरीत निघुन जायचा निर्णय महाराजांनी घेतला! कुणाला काही कळेच ना काय बिनसले ते. गगनगिरी महाराज हे नरसोबा वाडी येथील वाहणार्या कृष्ण पंचगंगा नदीत जाउन तासनतास जल तपस्येला बसले. बराच वेळ जाउन देखील योगीराज नदीच्या बाहेर आले नाही. तेथे जमलेल्या लोकांच्या मनात हुर हुर लागुन राहिली होती अनं प्रत्येकाच्या मनावर महाराजांचे असे वागणे पाहुन गुढ असे भाव उमटले असणार हे नक्कीच. शेवटी अनेक तासांनी महाराज पाण्या बाहेर आले व सरळ त्या पुजार्यास भेटले. अगदी क्रोधीत आवाजात ते पुजार्याला म्हणाले, "सिद्ध महात्मे जेव्हा कधी कुठला उपदेश करतात तेव्हा त्या मागे काही तरी उत्तम प्रयोजन असते हे जाणा. सिद्धांचा उपदेश जर मनुष्याने पाळला तर त्याच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होउ शकतो. तुम्ही कितीही ज्ञानी असलात, कितीही शास्त्रांचे ज्ञान तुम्हाला असले म्हणुन काय सिद्ध योग्यांची पातळी तुम्ही ओलांडत नसता, हे जाणुन घ्या!" तुमच्या कुटुंबावर पित्रु दोष व पिसाच्छ बाधेचा त्रास आहे ना? व तोच त्रास दुर करण्यासाठी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी तुमच्या पुर्वजांना काही उपाय सोवळे सुचवलेले, त्याचे पालन का केले गेले नाही! जर ते पाळले असते तर तुमची ह्या जठील त्रासा पासुन सुटका कढीच झाली असती! 

हे ऐकल्यावर तो पुजारी ढसा ढसा रडु लागला व गगनगिरी नाथांचे पाय धरून त्याने महाराजांचे वरील म्हणने तंतो तंत सत्य असल्याचे म्हटले व क्षमा मागुन महाराजांना क्रुपा ठेवण्याची विनंती करू लागला. 

थोडक्यात काय तर ह्या जगी "सद्गुरू-दत्त" तत्व एकच होय व गूरू उपदेश पाळने हे सर्वांच्या हिताचेच आहे.

गगनगिरी नाथ व श्री दिगंबरदास वालावलकर महाराज
श्री गगनगिरी नाथ व श्री दिगंबरदास वालावलकर महाराज

सिद्ध पुरूषांची भेट 

श्री गगनगिरी महाराज ह्यांची भेट अनेक सिद्ध पुरूष, तीब्बेती लामा, दलाय लामा, शंकराचार्य ईत्यादी दिग्गज मंडळींशी गगनबावड्याला (कोल्हापूर) होत. त्या वेळी विश्वात घडणार्या घडामोडी, कालज्ञान, भवीष्यात होणार्या घडामोडींमध्ये सिद्ध पुरूषांचे हस्तक्षेप (हिमालयातील सिद्धाश्रमातील सिद्ध योगी व अवतारीत झालेले महायोगी), सनातन धर्माचे रक्षण हे असे गुढ विषयांवर चर्चा होत. पण चर्चा शक्यतो गुप्त रितीने मनाच्या लहरींद्वारे केली जाई (बहु चर्चीत होऊ नये म्हणुन).

हा असाच एक दुर्मीळ फोटो गगनगिरी नाथ व श्री दिगंबरदास वालावलकर महाराज ह्यांच्या गगनगडावरील भेटीचा. जणु दोन्ही महात्मे योग शक्ती द्वारे मन लहरींनी एकमेकांशी संर्पक करीत आहेत.

संपर्क:

प. पु. स्वामी गगनगिरी आश्रम खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड,
फोन नंबर: ०२१९२ - २६६३५१, २६२७६४