प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी

प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी
प. पू. सद्‍गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी

जन्म: १२-०२-१९३८, पुणे येथील अत्री गोत्रीय ब्राह्मण कुळात 
कार्यकाळ: १९३८ ते आजपर्यंत 
गुरु: प. पू. योगिराज गुळवणी महाराज 
विशेष: ४० वर्षे विनामूल्य भविष्य व आध्यात्मिक मार्गदर्शन  

हरिश्चंद्र वैद्य वामन मूर्ति ।
परी लोकी असे बहु कीर्ती ॥
स्वामी म्हणे जात-कुळ अकारण ।
हरिसी प्रमाण भाव एक ॥
आणिकांचे दु:ख देखोनिया डोळा ।
येई कळवळा तोचि संत ॥

जन्म आणि बालपण 

संपूर्ण नाव श्री. हरिचंद्र रघुनाथ जोशी यांचा जन्म १२/२/१९३८ रोजी सुसंस्कारित व कुलीन कुटुंबात पुण्यनगरीत झाला. वडील, दत्तभक्त व तोच वारसा डॉ. जोशी यांना लाभला. बालपणीच मातृछत्र हरपले. श्री. रघुनाथांनी डॉ. जोशींना अनाथ करून गुरूपदाच्या ओढीने घर सोडले ते आजवर बेपत्ताच. सातव्या वर्षानंतर २-४ वर्षे मामाकडे कोकणात शिक्षण त्यानंतर काही वर्षे मुंबई येथे शिक्षण.

नोकरी व्यवसाय

मुंबई येथे काही काळ नोकरी केल्यानंतर जन्मगावी पुणे येथे नोकरीनिमित्त स्थलांतराचा योग. थोडेफार वैद्यकीय ज्ञान व होमिओपॅथीचा अभ्यास काही काळ सरकारी नोकरीही केली. याच काळात सातारा येथील श्री. दिवेकर यांचे कन्येबरोबर विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमाची सुरवात झाली. त्याच्या सुखी संसारात गुरुकृपेने एक मुलगा व एक मुलगी असा प्रपंच बहरला.

गुरुकृपा व दिक्षा

वडीलांच्याकडून आलेल्या श्री गुरुचरित्राच्या वारसाची पाठराखण चालू ठेवली. त्यात प.पु. गुळवणी महाराजांकडून शक्तीपात दिक्षेचा लाभ व त्यापासून मिळालेली दिव्य अनुभूती यामुळे जीवनच उजळून निघाले. अखंड गुरुचरित्राची पारायणे, प.पू. वासुदेवानंद सरस्वती समाधी सानिध्यात केलेली ध्यानधारणा, पारायणे व नामस्मरण व त्याला भविष्यज्ञानाची जोड यामुळे लोकांच्या अडलेल्या प्रश्नासंदर्भात मोफत मार्गदर्शन सुरू झाले. गुरुकृपेने भक्तांची कामे होत गेली. भक्तांना आश्रयस्थान मिळाले.

श्री अमरजाई देवीच्या कृपाछायेत बेगडेवाडी ता मावळ येथे वैद्यकीय ज्ञान, पंचाग, प्रश्न, आध्यात्मिक तोडगे असे ४० वर्षे विनामूल्य सेवा करुन प.पू. डॉक्टर लोकांच्या आदरास व पर्यायाने प्रशंसेस पात्र झाले. ही सर्व दत्तप्रभूची कृपा कारण डॉ. साहेबांच्या रुपाने सद्गुरुच भक्तांच्या उद्धारासाठी जन्माला घालतात. डॉक्टरसाहेब सद्गुरुंना भक्तांच्या साठी साकडे घालीत. त्यात गरीब श्रीमंत भेद नाही. जाती पातीची बंधने नसत. एकच वृत दु:खी, पिडीत व त्रस्तांना मदतीचा हात. कुठलीही प्रसिद्धी कधी घेतली नाही की कोणाकडून मोबदला. महाराजांच्या आज्ञेने केलेली निरपेक्ष समाजसेवा.

ह्या भक्तोद्धारासाठी डॉ. जोशी यांनी भक्तसेवेची कास धरली व सर्व भक्तजनांना यातील पुण्याचा प्रसाद वाटला.

  • आजपर्यंत श्री गुरुचरित्राची २५०० चे पुढे पारायणे केली. अजूनही चालूच आहेत.
  • एक हजार पारायणांनंतर दत्तयाग.
  • दर अष्टमीला सप्तशक्ती पाठ जवळजवळ ३० वर्षापुढे.
  • दरवर्षी नवरात्रात अष्टमी कार्यक्रम, घागरी फुंकणे, भजन व सत्संगाचा कार्यक्रम गेल्या दोन दशकांपुढे.
  • नवचंडी याग.
  • श्री गणेशगुरुभ्योनम: म्हणून गणेशयाग.
  • भारतातील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन व विधीवत सेवा.

अत्यंत साधी रहाणी, गुरुंबद्दल दत्त संप्रदाया बद्दल असिम निष्ठा, सर्व कार्य फक्त समाज हितासाठी विनामुल्य. सर्व जाती धर्माच्या सर्व यशातील लोकांसाठीचा समभाव त्यांनी अनेकांचे संसार मार्गी लावले अनेकांना व्याधी व तणावमुक्त केले. सर्वांना सन्मार्गाला व ईश्वरभक्तीसाठी उपयुक्त केले. दत्तभक्तीचा प्रसार केला.

डॉ. जोशींच्या कृपाछायेत अनेक सांसारिक, व्यावसायिक, राजकारणी अत्युच्च पदाला पोहोचले आहेत. अनेक पारमार्थिक त्यांच्या मार्गदर्शनाने परमार्थात प्रगती करीत आहेत.

गेल्या चाळीस वर्षाच्या काळाचा विचार केला तर सर्व जाती-जमातीतील लोकांची सुख-दु:खे ही आपलीच मानून जो कळवळा यावा व त्या पोटी त्याचे दु:ख हलके करावे म्हणून अथक प्रयत्न करावे व श्री दत्त सेवेचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्या क्षेत्री स्वत: जाऊन व लोकांना त्या ठिकणी आणून त्याची गोडी लावली हे सर्व करीत असताना त्यांचेकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांचे दु:ख जाणून ते श्री दत्त कृपेने कसे दूर होईल व त्यांना दत्त भक्तिची महती व गोडी कशी लागेल या दृष्टीने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यामुळे वरील स्वामीच्या उक्तीप्रमाणे हे आज चालते बोलते संतच म्हणावे लागतील.

धन-सुत-दारा असू दे पसारा ।
नको देऊ थारा आसक्तीतें ॥  

असे सर्व करीत असताना स्वत:चा प्रपंच प्रकृती याचा थोडा देखील विचार केला नाही आणि अत्यंत निरासक्त बुद्धीने आजपर्यंत सर्व करत आले. अनासक्तीचे उदाहरण द्यायचे म्हटले तर त्यांच्या दवाखान्याला आजन्म कधीही कुलूप किल्ली नाही. अशा प्रकारे सर्व भार भगवान दत्तात्रेयांवर टाकून केवळ शक्ती देणारा तोच आहे ही दृढ निष्ठा ठेवून आज तागायत भक्त लोकांच्या कल्याणाकरिता त्यांचे हे कार्य अविरत चालू आहे.

आज त्यांच्या वयास ८० वर्षे होत असून काही शारिरीक व्याधी असून सुद्धा भक्तांचा एखादा प्रश्न उद्भवला तर ते विव्हळ होतात व त्याकरिता देवाला साकडे घालून त्यांच्या पूर्ततेसाठी स्वत:च प्रार्थना करून देवाला तसे करायला भाग पाडतात एवढा त्यांचा अधिकार असल्याचे दिसून येते.

या सर्व कार्यासाठी स्वत:जवळ आत्मिक बल असावे याची जाणीव असल्याने त्यांनी प.पू. योगिराज श्री. गुळवणी महाराज यांचेकडून शक्तिपात दीक्षा घेतली व महाराजांच्या आज्ञेप्रमाणे अनेक जपानुष्ठाने, श्री गुरुचरित्र पारायणे, सप्तशती पाठ, दत्त याग, गणेश याग, चंडी होम, अन्नदान, गोप्रदान, पौर्णिमा वारी आदि धार्मिक अनुष्ठाने स्वत: केली. त्यांचा परिपाक म्हणून श्रीदत्त महाराजांनी अशा निस्पृह व भक्त लोकांच्या दु:खाने कळवळणारा आर्त भक्त, त्यांच्या लोकांच्या मन: कामना परीपूर्ण अशा केलेल्या आहेत याची साक्ष असंख्य भक्त लोकांनी वर्षानुवर्षे घेतली व घेत आहेत.

यांचे घरी नवरात्रामध्ये अष्टमीचे दिवशी महालक्ष्मीचा जागर असतो त्यावेळी त्यांचे सौभाग्यवतीच्या अंगात श्री महालक्ष्मीचा संचार होतो केवळ महालक्ष्मीच्या दर्शनाने अनेक भक्त लोकांच्या प्रापंचीक अडचणी सोडविल्या जातात. देवीचा मुख्य मुखवटा तांदळाच्या उकडीचा असतो पण तो पाहिल्या नंतर संगमरवरी मूर्ती जशी असावी तशी ती रेखीव मूर्ती डॉ. स्वत: तयार करतात. त्या मूर्तीवरील तेज पाहून त्या मूर्तीच्या सामर्थ्याची कल्पना येते.

तळेगाव या गावी डॉ. आठवड्यातून काही दिवस आयुर्वेद दवाखाना चालवित असत त्यावेळी ही ३०० ते ४०० रूग्ण एका दिवसात हाताळून त्यांना औषधोपचार देत असत हा त्यांचा उपक्रम तीन तपाहून अधिक काळ चाललेला होता. किती ही मोठा माणूस असला तरी त्याला सामान्या सारखीच वागणूक त्या ठिकाणी मिळत असे यावरून डॉ. चे ठिकाणी गरीब-श्रीमंत, लहान मोठा असा भेदभाव कधीच नव्हता. हे कार्य करीत असताना त्यांनी कधी तहान-भूक म्हटली नाही किंवा पैशाचा कोणताही व्यवहार त्यात आणला नाही आणि म्हणूनच भगवान दत्तात्रेयांनी त्यांना भक्तांच्या कार्यासाठी यश व उदंड आयुष्य देवो ही श्रीचरणी प्रार्थना ।

गुरुपरंपरा

श्री दत्तात्रय
   ।
श्री वासुदेवानंद सरस्वती
   ।
प. प. गुळवणी महाराज
   ।
प. प. हरिश्चंद्र जोशी