चातुर्मास १७- तंजावर सभामंडप तामिळनाडू, नदी- कावेरी, इ. स. १९०७, शके १८२९
शके १८२९ आषाढ पौर्णिमेपासून तंजावर येथे महाराजांचा चातुर्मास सुरू झाला. महाराजांचे यथाशास्त्र आचरण व पूर्ण ज्ञान पाहून तेथील लोक त्यांना देवाप्रमाणे मानू लागले. ब्रह्मावर्तास श्रीगुरुसंहिता म्हणजेच संस्कृत समश्लोकी गुरुचरित्र महाराजांनी केले होते. त्या ग्रंथावर या ठिकाणी चूर्णिका म्हणजे मूळ ग्रंथाचा गद्यात्मक गोषवारा लिहिण्याविषयी देवांची आज्ञा झाल्यावरून ती चूर्णिका येथे लिहिली. एकदा एक दिगंबर असे तेजस्वी साधुपुरुष महाराजांकडे आले. रात्रभर त्यांचे व महाराजांचे बोलणे झाले. पहाट झाल्याबरोबर ते कोठे निघून गेले ते काही समजले नाही.
तंजावरालाच महाराजांनी कृष्णालहरीवर संस्कृत टीका लिहिली. भाद्रपद पौर्णिमेस चातुर्मास संपल्यावर अवधूतरावांचे विनंतीवरून त्यांचे घरी दुसरे दिवशी भिक्षा करून महाराजांनी तंजावर सोडले. जाता जाता एका ब्राह्मणाला महामारीचा उपद्रव सुरू झालेला महाराजांनी पाहिला. लगेच त्याला औषधाने बरा करून घरी पाठविले. नंतर सत्यमंगल, जंबुकेश्वर, कोटिलिंग इत्यादि क्षेत्रे पहात पहात कावेरीतीरावर श्रीरंग मुक्कामी शृंगेरी मठाचे शंकराचार्य आहेत असे समजल्यावरून त्यांचे दर्शनार्थ महाराज श्रीरंगमुक्कामी आले. तेथे गेल्यावर श्रीशंकराचार्यांच्या सन्निध जाऊन महाराजांनी त्यांना वंदन केले. महाराजांना पाहिल्याबरोबर आचार्य म्हणाले की,‘आपल्या दर्शनाची पुष्कळ दिवसांची असलेली इच्छा ईश्वराने आज पूर्ण केली. नंतर महाराजांनी आचार्यांची व शारदाम्बेची स्तुती केली.
भिक्षा वगैरे आटोपल्यावर आचार्यांनी सर्व लोकांना उद्देशून महाराजांचेबद्द्ल चार शब्द सांगितले ते असे, ‘शिष्यमंडळींनो ! तुम्ही आज येथे आलेल्या या महान संन्याशांना ओळखले नाही. करिता दोन शब्द त्यांचेबद्द्ल आम्ही सांगतो. ते प्रत्यक्ष दत्तप्रभूच मातापित्यांच्या अत्यंत पुण्याईने त्यांच्या पोटी आले. आद्य शंकराचार्यांच्याप्रमाणेच हे धर्मसंस्थापनेचे कार्य करीत आहेत. वर्णाश्रमधर्माचे परिपालन कडकडीतपणाने हे करीत असून लोकांचा उद्धार यांचेकडून झालेला आहे. आसेतुहिमाचल पायानेच सर्व यात्रा करून त्यांनी कर्म, उपासना व ज्ञान यांचा अधिकारी जीवांना उपदेश करून त्यांना कृतार्थ केले आहे. करितां यांना पूर्ण आयुष्य लाभून यांचे हातून धर्मसंस्थापनेचे कार्य नित्य घडो, एवढीच परमेश्वराजवळ आमची प्रार्थना आहे.
क्षौर विधीची अद्यापी काहीच तजवीज झाली नाही. लोक सरळ बोलायला देखील राजी होईनात. ते पाहून महाराजांनी श्रीकृष्णमातेपुढेच आपले गा-हाणे मांडले. महाराज म्हणाले की, ‘माते आपल्याविषयी आम्ही इतका अभिमान बाळगीत असता आपणास या देहाचा काहीच अभिमान नाही काय? उद्या या गावात जर क्षौराची तजवीज झाली नाही तर पुढे यावज्जीव आपण क्षौर करणार नाही व दंडत्याग करून इच्छेप्रमाणे आपण कोठेही फिरत राहू. आजपासून आपली आज्ञा पाळण्याचे काहीच कारण दिसत नाही,’ याप्रमाणे प्रेमकलह करून महाराज प्रार्थना करून निजले. श्रीकृष्णामातेने स्वप्नात महाराजांना दर्शन देऊन सांगितले की, ‘ उद्या क्षौर विधीची सर्व व्यवस्था होईल. मला तुमच्याबद्द्ल पूर्ण अभिमान आहे’ हे मातेचे भाषण ऐकून महाराजांनी स्तुती केली व नंतर कृष्णामाता गुप्त झाली.
स्वामी महाराजाच्या कृपेने मृत बालक जीवंत झाले.
श्री स्वामी महाराज तंजावर ला असतांना स्नानासाठी कावेरी नदीवर जातांना पुढे श्री शिष्यमंडळी व श्री गांडामहाराज असे निघाले. वाटेत कुठे घाण केरकचरा असल्यास बाजूला करीत चालता चालता कपड्यात गुंडाळून ठेवलेले एक लहान गाठोडे या मंडळीच्या दृष्टीस पडले. त्यांनी ते उघडून बघीतले तेव्हा त्यात एक मेलेले मृत बालक आढळले. त्यावर श्री गांडामहाराज म्हणाले "कोणीतरी बाईने आपले मृतबालक गुंडाळून ईथे टाकून दिले". त्यावर स्वामी महाराज म्हणाले की "हे मेलेले नाही ! त्याच्या अंगाला भस्म चोळा म्हणजे हे जागे होईल". आणि झाले ही तसेच ! ते बालक सावध होऊन रडू लागले. आडोशाला ऊभी असलेली बाई धावत येऊन तिने बालकाला जवळ घेतले, आणि स्वामी महाराजांना नमस्कार केला. आणि नम्रपणे म्हणाली "माझी दोन्ही मूले गेल्यामूळे आणि हाही मृत बालक आपल्या चरणस्पर्शाने तरी जीवंत व्हावा, म्हणून मी त्याला आपल्या वाटेत गुंडाळून ठेवले. आपणास अशा प्रकारे त्रास दिला त्याबद्दल क्षमा असावी. आपण माझ्यावर जी कृपा केली त्याबद्दल मी जन्मोजन्मी आपली ऋणी राहील". असे म्हणून तिने साष्टांग दंडवत घातला. अशा रितीने स्वामीमहाराजांनी मृत बालक जीवंत केले.
चातुर्मास १८- मुक्त्याला आंध्रप्रदेश, नदी- कृष्णा, इ. स. १९०८, शके १८३०
मुक्त्याला येथील ब्राह्मण सदाचारसंपन्न, विद्वान आहेत हे पाहून महाराजांना हे स्थान पसंत पडले. तेथे सर्व तेलंगी ब्राह्मण राहात असून त्यांच्या स्त्रियासुद्धा उत्तम संस्कृत ज्ञानी आहेत. तेथील लोकांची भाषा जरी तेलगु व द्रविडी होती तरी संस्कृत भाषा पुष्कळ लोकांना येत असल्यामुळे महाराजांना काही अडचण भासली नाही. महाराजांचे अगाध ज्ञान पाहून तेथील सर्व मंडळींच्या मनात त्यांच्याविषयी आदर उत्पन्न झाला. तेथेच शके १८३० आषाढ पौर्णिमेस महाराजांनी व्यासपूजा करून चातुर्मास केला, तेथे विशेष कोणी मंडळींचे फारसे येणे नसल्याने महाराजांना विश्रांतीही चांगली मिळाली. तेथील मुक्कामातच युवशिक्षा, वृद्धशिक्षा व स्त्रीशिक्षा हे ग्रंथ महाराजांनी केले.
शृंगेरी मठाचे शंकराचार्य महाराजांचा मोठा आदर ठेवत असत. त्यांनी महाराजांची भेट झाल्यावेळी महाराजांनी केलेले ग्रंथ काही बरोबर असल्यास मागितले. तेव्हा बरोबर काहीच ग्रंथ नव्हते म्हणून महाराजांनी एक ‘मंत्रगर्भ स्तोत्र’ तेवढे आचार्यांना लिहून दिले. ते पाहून अत्यंत संतोष होऊन मागाहून पुस्तके पाठविण्यास आचार्यांनी महाराजांस सांगितले. पुढे दत्तमाहात्म्य, गुरुचरित्र वगैरे ग्रंथ शृंगेरीस पाठविले गेले. तसेच एक स्तोत्र करून ते आचार्यांजवळ राहणारे ब्रह्मानंदसरस्वती यांचेजवळ दिले व ते आचार्यांना वाचून दाखविण्यास सांगितले. ब्रह्मानंदसरस्वतींच्या विनंतीवरून पूर्वी कबूल केल्याप्रमाणे महाराज राजमहेंद्रीस आले. तेथे आचार्यांच्या मठात मुक्काम झाला. ब्रह्मानंदसरस्वतींनी त्या ठिकाणी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्रिमुखी दत्तमूर्तीची व दत्तपादुकांची स्थापना महाराजांच्या हाताने करविली.
ज्येष्ठ मासाच्या अखेरीस, वेनगंगेच्या तिरावर असणा-या पवनी या गावात येऊन दाखल झाले. प्रथम तेथील लोक महाराजांना गावात राहूसुद्धा देईनात. तेव्हा महाराज तेथील विठ्ठल मंदिरात राहिले व गांडाबुवा मुरलीधरांचे मंदिरात राहिले.
चातुर्मास १९- पवनी महाराष्ट्र, नदी- वैनगंगा, इ. स. १९०९, शके १८३१
या वर्षीचा चातुर्मास पवनीसच करण्याचे महाराजांनी ठरवून त्याप्रमाणे आषाढ पौर्णिमेस व्यासपूजा झाली. प्रथम महाराजांची योग्यता लक्षात न आल्यामुळे तेथील मंडळींकडून महाराजांस फार त्रास झाला उन्मत्तपणे वाटेल तसे महाराजांना बोलणे, भिक्षेचीसुद्धा व्यवस्था न करणे असे प्रकार तेथील मंडळींनी आरंभी केले. पण ते सर्व महाराजांनी शांतपणे सहन केले. पवनीस पद्यावरी पुरी असे पुराणांतरी नाव आहे. तेथे वेनगंगा नावाची नदी आहे. महाराजांनी वेनगंगेच स्तोत्र केले आहे.
याप्रमाणे ठिकठिकाणची मंडळी महाराजांचे दर्शनास येऊ लागलेली पाहून मग मात्र पवनीच्या मंडळींचे डोळे उघडले. नंतर त्यांनी महाराजांची क्षमा मागितली व ते सर्व महाराजांचे पूर्ण भक्त बनले. बाहेरून हजारो लोक पवनीस येऊ लागले. त्यावेळी पवनीच्या आसपासच्या गावातून प्लेग जोरात होता. दूषित हवेतून मंडळी येतात त्यामुळे आपल्याही गावात हवा बिघडण्याची भीति आहे असे सर्वांना वाटू लागले. इतक्यात गांडाबुवा रहात होते त्या मुरलीधराच्या देवळात उंदीर पडल्याची वार्ता महाराजांचे कानावर गेली. महाराजांनी लगेच श्रीदत्तमहाराजांची प्रार्थना केली की,‘ प्रभो ! आपल्या आज्ञेप्रमाणे येथे चातुर्मासास आरंभ झाला असून सर्व बालगोपाळ मंडळी येथे दर्शनाकरिता जमली आहेत. यापैकी कोणी मेला तर आपणास न्यूनता येईल. म्हणून आपणास चातुर्मास संपण्यापूर्वीच निघून जाणे भाग आहे’ हे ऐकून देवांनी सांगितले की,‘चातुर्मास संपेपर्यंत येथे कोणालाच त्रास होणार नाही तरी चातुर्मास सोडून जाऊ नये.’
महाराज पवनीस आले. त्यावेळी प्रथम वैजनाथाच्या देवळात तीन दिवस राहिले. नंतर दशपुत्रे यांच्या विठ्ठल मंदिरात राहाण्यास गेले. पहिल्या दिवशी नाईकांच्या घरी भिक्षेस गेले, पण ते गुजराथी असल्याचे समजल्यामुळे भिक्षा तशीच ठेवली. दुसरें दिवशीही काही कारणाने उपवास घडला. तिसरे दिवशी भटांचे घरी भिक्षेस गेले असता त्यांनी महाराजांची फारच चौकशी चालविली, तेव्हा महाराज त्यांना म्हणाले ‘आलेल्या अतिथीस भिक्षा घालणे एवढे गृहस्थाचे काम आहे. जास्ती विचारपूस करू नये’ असे महाराज बोलत असता इतक्यात भटांची उमरेड येथे दिलेली मुलगी उमाबाई बाहेर आली. तिने महाराजांना ओळखून सर्व लोकांना त्यांनी माहिती करून दिली. तिला ब्रह्मावर्त मुक्कामी महाराजांचे दर्शन झाले होते. नंतर ती स्वत: महाराज रहात होते त्या देवळात जाऊन रोज झाडलोट करू लागली.
रोज लोक महाराजांनी गंधाची उटी वगैरे लावून महाराजांची महापूजा करीत असत व भोजनाचा भंडाराही बराच मोठा होत असे. सर्व जातींच्या लोकांना भरपूर अन्न मिळत असे.
पवनी येथील एका बाईचा नवरा रागाने घरातून निघून गेला होता. बारा वर्षे झाली तरी त्याचा काही पत्ता नव्हता. ती बाई अत्यंत दु:खात दिवस कंठित होती. तिने एकदा महाराजांचे दर्शनास येऊन आपले दु:ख सांगितले. तिच्याकडे फक्त एकदा महाराजांनी पाहिले आणि तिला सांगितले की,‘ बाई! लवकरच तुमचा नवरा घरी परत येईल’ असे तिला सांगून एक मंत्र लिहून दिला व त्याचा रोज मानसिक जप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने श्रध्देने जप सुरू करताच एक महिन्यातच ‘आपण लवकर’ येतो असे तिच्या नव-याचे पत्र आले व त्याप्रमाणे पुढे तो घरी येऊन राहिला.
नरसोबाचे वाडीतील पुजारी संकटाने त्रासून महाराजांचे दर्शनास पवनीस आले होते. एकदा पंगत जेवणास बसली असता त्यांनी सत्याग्रह केला. ते म्हणाले, ‘आमचे संकट दूर करण्याकरितां आपण जर वाडीस येण्याचे वचन दिले तरच आम्ही भोजन करू. आम्ही भोजन न करता व वाडीलाही न जाता वाट फुटेल तिकडे जाऊ.’ हे ऐकून महाराजांनी देवांजवळ प्रार्थना केली. देवांनी सांगितले, ‘आता चातुर्मास संपताच उत्तरेकडे न जाता वाडीकडे जावे.’ ही देवांची आज्ञा महाराजांनी पुजा-यांना कळविताच त्यांचे समाधान झाले व नंतर सर्वांनी आनंदाने भोजन केले.
महाराजांना भेटण्यासाठी येतो असा उमरावतीच्या गुलाबराव महाराजांनी एकदा निरोप पाठवला होता. तेव्हा महाराजांनी त्यांना परत कळविले की, ‘तुमचे आमचे अंतरंगात प्रेम आहेच. करिता प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नाही.’ गुलाबराव हे सखीसंप्रदायातील असून स्त्रीवेष घेत होते. तरी असे नटदर्शन महाराजांना नको होते.
कोल्हापूर प्रांतातील वडार गावातील नरहरी दिवाण हे वाडीस महाराजांचे जवळ येऊन राहिले होते. त्यांच्या मातेकडून एकनाथ महाराज आठवे पुरूष होते. त्यांना महाराजांचे सहवासाने वैराग्य उत्पन्न होऊन ते परमार्थाकडे वळले. पंधरा वर्षांचे त्यांचे वय होते. महाराज वाडीहून गेल्यावर ते गाणगापुरास गेले. तेथे स्वप्नात त्यांना श्रीदत्तदर्शन झाले. नंतर पंढरपुरी येऊन त्यांनी हरिहर महाराजांचा अनुग्रह घेतला. हरिहर महाराजांनी संन्यास घेतला. त्यांचे नांवही त्यांचे गुरुंनी ‘वासुदेवानंदसरस्वती’ असे ठेवले होते.
यांनी पायानेच तीर्थयात्रा केल्या. महाराजांचे दत्तपुराण व दत्तमाहात्म्य यावर हे पुराण सांगत असत. हेच पुढे अष्ट्याचे दत्तमहाराज म्हणून प्रसिद्धीस आले. यांची समाधी सांगलीपासून जवळच अष्टे मुक्कामी आहे.
महाराज एकदा सकाळी संगमावर स्नानास गेले. पाण्यात बुडी मारली. ब-याच वेळाने वर आल्यावर सर्वांना हातातून आणलेला कोरडा अंगारा दिला आणि ‘काशीरामेश्वराच्या यात्रेला जाऊन येण्यास इतका वेळ लागला. हा अंगारा तेथलाच आहे’ असे त्यांनी सांगितले.
चातुर्मास २०- हावनूर कर्नाटक, नदी- तुंगभद्रा, इ. स. १९१०, शके १८३२
महाराज हावनूर येथे त्रिपुरान्तकेश्वराच्या देवळात राहिले होते. तेथे गेल्यावर त्रिपुरान्तकेश्वर व तुंगभद्रा यांची स्तुती केली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांनी यथाशास्त्र व्यासपूजा केलेली पाहून तेथील सर्व मंडळींचे मनात महाराजांचेविषयी पूर्ण आदर उत्पन्न झाला. सर्व मंडळी आपापल्या घरी महाराजांना भिक्षेस बोलावू लागली. वैष्णवांच्या घरी मात्र महाराज भिक्षेस जात नसत. येथे आषाढ व॥ १३ स वामनरावजी गुळवणी महाराजांचा शोध करीत आले. ते येण्याबरोबर ‘येथे चातुर्मास असल्याबद्दल कोणालाही पत्र पाठवायचे नाही’ असे महाराजांनी त्यांना सांगितले.
हावेरी स्टेशनमास्तर दक्षिणी ब्राह्मण असून ते महाराजांचेकडे येणा-या यात्रेकरूंची व्यवस्था चांगली ठेवीत असत. त्यांनी महाराजांचे दर्शनास येणेकरिता रजेचे दोन अर्ज केले पण रजा मिळाली नाही. शेवटी चातुर्मास समाप्तीचे आदले दिवशी त्यांना रजा मिळून ते महाराजांचे दर्शनास आले. त्यावेळी महाराज त्यांना म्हणाले की, ‘तुम्ही अर्ज केला तेव्हाच रजा मिळाली असती तर येणा-या यात्रेकरूंची व्यवस्था कशी झाली असती ?
तुंगभद्रा तिरावर गळगनाथ देवस्थानांत चिक्काप्पाशास्त्री म्हणून एक विद्वान प्रेमण ब्राह्मण रहात होते. त्यांचे घरी भिक्षा करून महाराज परत हावनूरला आले. त्याच साली तूळ राशीस गुरु आल्यामुळे तुंगभद्रेला गंगा येऊन मिळते त्या पर्वकाळांत महाराजांनी तेथे स्नान केले व सुवासिनी स्त्रियांना हळदीकुंकू देऊन खण दिले. शास्त्रीमंडळींना उपरणी व लहान मुलांना खाऊ दिला. हावनूरहून निघून महाराज तुंगभद्रा - वर्धासंगमावरून आगठीस आले.
नंतर पुढे प्रवास करीत महाराज श्रीपादश्रीवल्लभांचे स्थानी कुरुगडी येथे वैशाख वैद्य ६ रोजी येऊन पोचले. याच्या सर्व बाजूंनी कृष्णेचा प्रवाह असून तेथे जंगलच आहे. त्यामुळे या बेटात पूर्ण एकांत आहे. सेंट्रल रेल्वेच्या रायचूर व कृष्णा स्टेशनहून हे स्थान १८-२० मैल आहे. तेथे तपश्चर्येला उपयुक्त अशी एक सुंदर गुहा आहे. तेथे नदीत खडक असल्यामुळे नाव चालत नाही. भोपळ्याच्या सांगडीवरून जावे लागते. ‘या स्थानी चातुर्मास करावा म्हणजे पुष्कळ मंडळी येऊन हे स्थान प्रसिद्ध होईल’ असे श्रीपादवल्लभांनी महाराजांना सांगितल्यामुळे महाराज येथे आले.
चातुर्मास २१- कुरवपूर (कुरगड्डी) कर्नाटक, नदी- कृष्णा, इ. स. १९११, शके १८३३
कुरूगड्डी गांव म्हणजे कृष्णाप्रवाहातील एक बेट आहे. यालाच कुरवपूर म्हणतात. येथेच श्रीपादश्रीवल्लभांचे तप होऊन ते आश्विन वद्य द्वादशीस येथे अदृश्य झाल्याची कथा गुरुचरित्रात आलेली आहे. येथे तेलगू व कानडी भाषा आहेत. दोन मैल रूंद कृष्णेच्या प्रवाहामध्ये हे बेट एक मैल लांब, अर्धा मैल रूंद असे आहे. एका टोकास दत्तमंदिर व दुस-या टोकास गाव व मध्ये शेते आहेत. मंदिरात श्रीदत्तपादुका आहेत. बेटाच्या दुस-या बाजूस असलेल्या प्रवाहाचे तिरावर एका दगडावर श्रीपादश्रीवल्लभांच्या पावलांचे ठसे पुष्कळच उठलेले दिसतात. एका शरीरावर नमस्कार घातल्याप्रमाणे सर्व शरीराचा ठसा उठलेला आहे.
तेथील पुजा-यांचा तो शुद्रवत आचार पाहून महाराजांना तेथे रहावेसे वाटेना. तेव्हा श्रीपादश्रीवल्लभांनी ब्रह्मचारी वेषाने महाराजांकडे येऊन सांगिरले की, ‘ही भूमि रजकभक्ताने मला दिली आहे. नैवेद्य, नंदादीप यातून चालू आहे, तरी येथे भिक्षा घेण्यास हरकत नाही. या लोकांच्या आचारांचेकडे लक्ष देऊ नये. मुख्यत: द्रव्यशुद्धि व भावशुध्दि येथे असल्यामुळे त्यांचे आम्हाला चालते, तर तुम्हाला का चालू नये. तुम्ही यापुढे कोणालाही पायाचे तीर्थ देऊ नये व अनधिका-यास मंत्रही देऊ नये. येथे येणा-यांनी गाणगापूर व वाडीप्रामणे शुचितेने वागावे.’ असे सर्व श्रीपादवल्लभांनी महाराजांना सांगितले.
कुरुगड्डीस जाणा-या यात्रेकरुंकडून नावाडी लोक फार पैसे घेत. ही गोष्ट महाराजांना समजताच त्यांनी नावाड्यांना बोलावून आणून तसे न करण्याबद्दल ताकीद केली व एका माणसाने बाजेवरून जाणे असल्यास आठ आणे द्यावेत, स्वतंत्र भोपळ्याच्या सांगडीवरून जाण्याकरिता प्रत्येकाने एक रूपया द्यावा व ओझ्याकरिता एका ओझ्याच्या रांजणास आठ आणे अशी व्यवस्था करून दिली.
महाराजांनी कुरुगड्डीस गुरुद्वादशीपर्यंत मुक्काम केला. नंतर गुरुद्वादशी करून व तेथे सर्व लोकांना उपदेश करून महाराज तेथून निघाले.
स्वाहाकाराचे वेळी हंपी विरुपाक्ष मठाचे शंकराचार्य, टाकळीचे दाजीमहाराज, हैद्राबादचे भटजीबापू इत्यादि मोठमोठी मंडळी आली होती. परळीचे नानासाहेब देशपांडे यांनी या यज्ञात देखरेखीची मेहनत बरीच घेतली. तेथील मुसलमान तालुकादारही चार दिवस कचेरी बंद ठेवून बंदोबस्तासाठी तेथे येऊन राहिले होते. वेदपाठस्तुतीची पुस्तके महाराजांनी स्वत: आपल्या हातांनी सर्व अधिकारी विद्वानांस वाटली. आठ दिवस सोहळा अप्रतिम झाला. एक लाखावर मंडळी येऊन गेली. नित्य हजारो मंडळी भोजनाकरिता येत असत. शेवटी महाराज स्वाहाकाराच्या मंडपात एक प्रहरभरच जाऊन बसले. त्यावेळी महाराजांचे पुढे पैशाचा पाऊस पडला. १९ वेळा मोठ्या पाट्यांतून रूपये भरून गेले. एका भाट्याच दोन लाख देतो म्हणाला, पण महाराजांनी ती गोष्ट मान्य केली नाही.
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज- घोरकष्टोद्धरण स्तोत्र
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा २१ वा चातुर्मास शके १८३३ (इ. स. १९११) कुरुगड्डी (कुरवपूर) येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्रीास्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. "आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसर्या कोणाजवळ सांगावयाची?", असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामीमहाराजांच्या कानावर घातल्या. स्वामीमहाराजांनी श्री. शेषो कारदगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल व कर्ज फिटेल असा आशिर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली व कर्जही फिटले. शेषो कारदगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना वेंकटरमणचे पद करून दिले होते. या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी रहावेत आणी सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री. शेषो कारदगेकर यांनी श्री स्वामीमहाराजांना अशी प्रार्थना केली की, "माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपादश्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे." शेषो कारदगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी "घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्र" रचून त्यांना दिले. श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हंटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे. काहीजण तर याचा १०८ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे ऐहलौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे. खरोखर श्री शेषो कारदगेकरांचे आपणा सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र प्राप्त झाले आहे.
संकटनिवारण होण्यासाठी तसेच गुरूग्रहपिडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्रे घोरकष्टोद्धरण स्तोत्त्र.
!! घोरकष्टोधरणस्तोत्रम !!
श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।। भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।। त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।। त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।। पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् । भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।। त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।। कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ४।। धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् । सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् । भावासक्तिम् चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ५।। श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६॥ इति परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामीमहाराज विरचितं घोरकष्टोधरणस्तोत्रम सम्पूर्णम् ।
"देवांच्या सेवेत कुचराई व कसूर करू नका"
श्रीस्वामीमहाराजांची भिक्षा व सर्व लोकांची जेवणे झाल्यावर जेव्हा सर्व मंडळी एकत्र जमली तेव्हा लोकांनी त्यांना असे विचारले की "आपल्या झोळीत विंचू कसा गेला? आपण तेला काहीच केले नसता तो आपलास चावलाच कसा? आपणास फार वेदना होतात का?" लोकांचे हे सर्व प्रश्र्न एकून श्रीस्वामीमहाराज सर्व लोकांना उद्देशून असे म्हणाले की, "आज भिक्षेला जाण्यापूर्वी लक्ष्मणराव नाईक उमरेडकर यांना यंत्र तयार करून देण्याच्या गडबडीत नित्य पाठाचे एक स्तोत्र म्हणावयाचे राहून गेले. त्यामुळे देवांनी मला ही शिक्षा केली." अशा प्रकारे विंचू चावण्याचे कारण सांगून श्री स्वामी महाराज सर्व भक्तमंडळींना उद्देशून असे म्हणाले की, "आमच्याकडून नित्यक्रमातील एक स्तोत्र म्हणावयाचे राहून गेले तर देवांनी रागावून आम्हाला विंचवाकडून दंश करवून शिक्षा केली. अशी जर आमची स्थिती आहे तर मग तुम्ही रोज देवाची कितीतरी कृत्ये वीसरता. त्यासाठी देव तुम्हाला किती शिक्षा करतील यांचा तुम्हीच विचार करा. तरी तुम्ही देवांच्या सेवेत कुचराई व कसूर करू नका."
श्रीस्वामीमहाराजांच्या स्वप्नात श्रीकृष्णामाईची मागणी !
श्रीक्षेत्र कुरवपूर येथे चातुर्मास सुरू होण्यापूर्वी आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी श्रीस्वामीमहाराजांच्या स्वप्नात श्रीकृष्णामाई एका शूद्र स्त्रीच्या रूपाने आली व ती त्यांना असे म्हणाली की, "आपण बरेच दिवस उपोषित आहोत; तरी आपण निदान डाळ तरी आम्हाला घावी अशी माझी प्रार्थना आहे." श्रीस्वामीमहाराज सकाळी जागे झालेल्या बरोबर श्री कृष्णामाईच शूद्र स्त्रीच्या रूपाने येऊन आपल्याकडे डाळ मागत होती हे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारे श्रीकृष्णमाई आपणाकडे खावयास का मागत आहे ? या प्रश्नाचा विचार करताच श्री स्वामी महाराजांच्या असे लक्षात आले की, "या वर्षी आपण श्रीमलप्रभानदीच्या तीरावरील मुरगोड गावी दशाहार केल्यामुळे श्रीकृष्णामाईला काही नैवेद्य इत्यादि दाखवून तिला संतुष्ट करता आले नाही. तिला आपल्या कडून काहीच न मिळाल्यामुळे ती ही मागणी करीत आहे." श्रीकृष्णामाईच्या मागणीप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी तिला संतुष्ट करण्याचा पक्का निश्चय केला.
चातुर्मास २२- चिखलंदा मध्यप्रदेश, नदी- नर्मदा, इ. स. १९१२, शके १८३४
चिखलदा हे गाव इंदूर संस्थानामध्ये आहे. नर्मदेच्या अलिकडे बढवाणी संस्थान आहे. तेथील राजे ठाकोरसाहेब महाराजांचे भक्त होते. पूर्वी शके १८२२ चा चातुर्मास महाराजांचा चिखलदा येथे झाला होता. तेथे महाराज येण्याबरोबर सर्व भक्तमंडळी जमली. पौर्णिमेस व्यासपूजा होऊन चातुर्मास सुरू झाला. तेथे नित्यक्रमाप्रमाणे रोज भाष्यपाठदि चालू होते.
चिखलद्यास ६-७ महिने महाराजांचे राहणे झाले. तेथून निघाल्यावर नर्मदा किनारी कारतखेडा या गावी महाराज जात असता जिंतूरची अग्निहोत्रबुवा वगैरे मंडळी रस्त्यात भेटली, त्यांना पहाताच महाराज म्हणाले की, ‘अग्निहोत्रबुवा ! तुमची इच्छा गायत्रीपुरश्चरण करण्याची असेल तर ती लवकर पूर्ण करा, पण अन्नसंतर्पणात तुपाची कसर बिलकुल करू नका.’ हे ऐकून अग्निहोत्रबुवा म्हणाले, ‘आपणाजवळ पैसा नाही तर हे कसे घडावे?’ महाराज म्हणाले, ‘पैशाची काळजी नको. ते आपोआप त्यावेळी मिळतील आणि देवाच्या कार्यासाठी ऋण काढले तरी हरकत नाही. त्याची जबाबदारी देवावर राहील.’ हे ऐकून अग्निहोत्रबुवा म्हणाले की, ‘आपल्या कृपेने अग्निनारायणाची सेवा निर्विघ्न चालू आहे. तसे हेही कार्य पार पडेल, पण महाराजांनी या कार्याचे वेळी आले पाहिजे.’
महाराज चिखलद-याहून निघाले ते कातरखेडा येथील शूलपाणीश्वरास वंदन करून गरुडेश्वराकडे निघाले. शूलपाणीश्वराचे जंगलात अश्वत्थामा वास करतो. ते फारच घोर अरण्य असून धड पाऊलवाट सुद्धा नाही. तेथून जात असता एकदा एका भिल्लाने येऊन महाराजांना विचारले की, ‘आपणास कोठे जाणेचे आहे ? तेव्हा महाराज म्हणाले की, ‘गरूडेश्वरास.’ तो म्हणाला, ‘तर मग माझ्या पाठीमागून या.’ असे सांगून तो चालू लागला व महाराज त्याचे पाठीमागून निघाले. गरुडेश्वर आल्यावर त्याने सांगितले की,‘ते समोर मंदिर आहे तेथे चला,’ असे सांगून तो निघाला. इतक्यात महाराजांना काही संशय येऊन त्यांनी त्या भिल्लास विचारले की, ‘तू कोण आहेस ते खरे सांग.’ तेव्हा तो म्हणाआ, ‘मी अश्वत्थामा असून या जंगलात रहातो.’ असे सांगून तो दिसेनासा झाला. नंतर महाराज गरूडेश्वराच्या देवळाच्या ओट्यावर येऊन उतरले. तो दिवस चैत्र वद्य षष्ठी शनिवार होता.
चातुर्मास २३- गरुडेश्वर गुजराथ, नदी- नर्मदा, इ.स. १९१३, शके १८३५
गरूडेश्वर हा गाव नर्मदा किना-यावर असून तेथे भिल्ल जातीच्या लोकांचीच थोडीशी वस्ती आहे. नदीतून वहात आलेली लाकडे धरणे, मासे पकडणे हेच त्या लोकांचे उद्योग. एक दोन दुकाने आहेत. तिलकवाडा किंवा नांदोद येथून सर्व सामान आणावे लागते. गरूडेश्वर, नारदेश्वर, करोटेश्वर अशी लहान लहान मंदिरे येथे आहेत. येथे शंकरांचा प्रसाद होण्याकरिता गरूडाने तपश्चर्या केल्यामुळे या स्थानास गरूडेश्वर असे नाव पडले. येथे विष्णुपंत सोमण यांचे एक किराणा मालाचे दुकान होते. तेथे महाराज आले त्यावेळी त्यांची रहाण्याची सोय काहीच नव्हती. एक मनुष्य आत बसेल अशा नारदेश्वराच्या मंदिरात बसून महाराज अनुष्ठान करीत असत व बाहेर एका दगडावर निजत असत. फक्त विष्णुपंत सोमण यांचेकडेच माधुकरीची सोय होती. गरूडेश्वरी महाराज आहेत ही बातमी अवकरच सर्वत्र पसरली व दर्शनाकरिता मंडळींची ये-जा सुरू झाली. तेथे फार ऊन होते म्हणून मंडळींना बसण्याकरिता एक लहानसा मंडप घातला.
धोंडोपंत कोपरकर काही दिवसांनी सहकुटुंब दर्शनास आले. त्यांनी फणसपोळी, मोहाचे नारळ, फणसाचे वाळलेले गरे असे पदार्थ आणले होते. त्यावेळी फणसपोळी तेवढी भिक्षेचे वेळी घेणेस ठेवून बाकी सर्व पदार्थ मंडळींना वाटून दिले. धोंडोपंत काही दिवस तेथेच राहिले. त्यांनी महाराजांचेकरिता एक झोपडी बांधली. त्यात अर्ध्या जागेत महाराज बसत व अर्ध्या जागेत सामान होते व स्वयंपाकही तेथे होत असे. या झोपडीस पर्णकुटी असे म्हणत. या जागेवर असलेला कडुलिंब १८३५ चैत्र प्रदिपदेस प्रसाद म्हणून त्याची पाने घेतल्यावर तो गोड झाला. नवीन बांधलेल्या पर्णकुटीची वास्तुशांति वैशाख शुद्ध एकादशीस झाली. मंडळी जास्त येऊ लागली हे पाहून परशुरामभाई कुबेर इंजिनियर यांनी स्वयंपाकाकरिता निराळी जागा बांधली.
श्रीदत्तमूर्तीवर लघुरुद्राभिषेक वगैरे यथासंभव होत असे. तेथे रहाण्याकरिता परगावच्या एक दोन बायकाही आल्यामुळे महाराजांना ती घरची भिक्षेचीही सोय झाली. महाराज फक्त व-याची भाकरी, भात, ताक, भेंड्याची किंवा सुरणाची आळणी भाजी इतकेच भिक्षेचे वेळी घेत. फळाच्या पुष्कळ करंड्या रोज येत असूनही तिकडे महाराजांनी ढुंकूनही पाहिले नाही. संध्याकाळी काही विषय समजावून सांगत. रात्री महाराजांचे समोरच भोजन होत होते. भजन झाल्यावर सर्व मंडळींना हरभ-याच्या किंवा मुगाच्या डाळीची पोटभर उसळ, सांजा फळे वगैरे मिळत असे. तेथे रात्री स्वयंपाक नसल्याने ही अशी व्यवस्था केली होती.
तेथे जमणा-या मंडळींनी एकचित्ताने मानापमान सोडून सर्व कामे करावीत. कोणी पाणी आणावे, कोणी लाकडे जमवावीत, कोणी पळसाची पाणे आणून पत्रावळी कराव्यात, कोणी स्वयंपाक करावा. श्रीदत्तप्रभूंचा नैवेद्य झाल्यावर सर्वांचे जेवण होत असे. स्वयंपाकाकरिता कढ्या असत. पुढे पुढे तर रोज ३-४ शे पान होऊ लागले. पुढे येणा-या पैशातून सर्व खर्च चालत असे. रोज पोळ्या व कधीतरी पक्क्वान्न करीत असत. ‘ आज अमुक मंडळी येणार आहेत, अशा पद्धतीचा स्वयंपाक करा’ असे महाराज सकाळीच सांगत असत.
बडोद्याहून श्रीसिद्धनाथाचे मंदिरातील महंत श्रीगणपतीबुवा मंडळींसह दर्शनार्थ आले होते. तेथे महाराजांना नमस्कार करून त्यांनी आपल्या मनात काही विचार आणले. ते जाणून महाराज लगेच म्हणाले की, ‘इकडे येताना आपणास अश्वत्थामा भेटला व त्याच्याबरोबर काही संभाषणाचाही योग आला’ हे ऐकून गणपतिबुवा म्हणाले की, ‘हीच गोष्ट मी आपणास विचारणार होतो.’ याप्रमाणे मनातले विचार महाराजांनी सांगितलेले पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटले.
इंदूरचे महाराज युरोपच्या सफरीस गेले, त्यामुळे लग्नाचे काही निश्चित झाले नव्हते. अशा स्थितीत दहा अकरा महिने गेले. त्यावेळी वरील गृहस्थाच्या सूनबाई कृष्णाबाई तालचेरकर यांनी आपली भाची कु. इंदिराबाई हिचे टिप्पण वाडीचे महाराज दत्तात्रेय पुजारी यांचेमार्फत महाराजांचेकडे पाठविले. महाराजांनी टिप्पण पाहून कळविले की, ‘यात राजयोग दिसत नाही.’ तेव्हा नारायण दत्तात्रेयांनी लिहिले की, ‘ मुलीचे टिप्पण गुरुमहाराजांचे हातात गेले म्हणजे हे लग्न होणारच अशी आमची भावना आहे. तरी कृपा व्हावी.’ तेव्हा शेवटी महाराजांनी लिहिले की, ‘मुलीकडून निष्काम शिवाराधना व्हावी व ‘देवेंद्राणि नमस्तुभ्यं’ या मंत्राचा जप करावा. मार्गशिर्ष मासात कार्य होईल.’ असा आशिर्वाद दिला. त्याप्रमाणे इंदूरचे महाराज दोन तीन महिन्यातच परदेशातून येऊन मार्गशीर्ष शुद्ध दशमी सोमवार शके १८३५ या दिवशी कु. इंदिराबाईंबरोबर राजेसाहेबांनी विवाह केला. नंतर यांचे नाव सौ. महाराणी साहेब इंदिराबाई होळकर असे पडले. महाराजांचे ठिकाणी यांची निष्ठा फार मोठी आहे. गरूडेश्वर येथे त्यांनी नर्मदेस घाट बांधला आहे. माणगांव, कुरुगड्डी, कारंजा इत्यादी स्थानांतूनही अनेक देणग्या देऊन गुरुमहाराजांची शुद्ध भावाने सेवा केलेली आहे.
याप्रमाणे रोज अनेक मंडळी दर्शनास येऊन महाराजांचे कृपेने कृतकार्य होऊन जात होती. याप्रमाणे क्रम चालू असता शके १८३६ वैशाख महिन्यात महाराजांच्या मूळच्या अतिसार रोगाने उचल खाल्ली व शरीर दिवसेंदिवस क्षीण होत चालले. हे समजताच महाराजांना आराम पडण्याकरिता नससोबाचे वाडीस पुजा-यांनी देवावर संततधार अनुष्ठान सुरु केले; पण हे महाराजांना समजताच त्यांनी वाडीस कळविले की, ‘उगाच देवाला त्रास देऊ नका. हे शरीर अल्पावधीच पडणार आहे.’ महाराजांनी देवाला विचारले की, ‘येथील मूर्तीची व्यवस्था काय करावयाची?’ देवांनी सांगितले की, ‘आम्हाला येथेच रहावयाचे आहे. मूर्ति कोठेही पाठवू नये.’ अशी आज्ञा झाल्यापासून देवापुढे येणारा विषय वाडीस पाठवण्याचे बंद झाले.
मंडळींनी महाराजांना औषध घेण्याबद्दल विनंती केली, पण महाराज म्हणाले की, ‘हा देह लवकरच सोडून जावयाचे आहे, करिता औषधाचे कारण नाही. शंकराचार्य बत्तीस वर्षेच राहिले; त्या मानाने हे शरीर जास्ती टिकले. या देहाला दोन वेळा सर्पदंश, तीन वेळा महामारी, एक वेळा संनिपात, एक वेळा प्लेग, दोन वेळा महाव्याधी, दोन वेळ कोड इतके रोग उत्पन्न झाले. संग्रहणी तर कायमचीच आहे. त्यावेळी कोणी औषध दिले ? जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे तो वैद्य यावेळीहे आहेत. त्याची इच्छा असेल तसे होईल.’ असे सांगून भीष्माचार्यांनी शेवटी म्हटलेले श्लोक सर्वांना म्हणून दाखविले.