श्री सद्गुरु शंकर महाराज दगडे यांचा जन्म श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी इ स १९१८ सकाळी ११ वाजता, आंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा या गावी झाला. लहानपणापासुनच त्यांना निसर्गाबद्दल आत्मिक ओढ आणि जिज्ञासा होती, निसर्ग आणि भगवंताची कृपादृष्टी याबद्दल त्यांचे सतत चिंतन-मनन आणि निजध्यास चालू असे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. इयत्ता दुसरी (मोडी लिपी) पर्यंत शिक्षण घेतले. त्याच्यानंतर ते शेतीची कामे करु लागले. इ. सन १९३५ मध्ये सो. भागुबाई यांचीशी त्यांच्याशी विवाह झाला. इ. सन १९४१ मध्ये ते गुजरातला सुत गिरणी मधे जॉबर म्हणून कामाला लागले. परंतु दैवी शक्ती लाभल्यामुळे ते जास्त दिवस कामावर राहिले नाही. ते तासनतास गोदावरीतिरी बसून चिंतन मनन करीत असे. तेथील साधुंबरोबरील सत्संग सहभागी होत. गुजरात मधेच पाटील बुवा यांच्या सहवासात ते अनुयायी बनले. पाटील बुवा हे नाथ पंथीय होते. १९४८ काळात त्यांनी महात्मा गांधी यांच्या रक्षाकलस ढोलवादन मध्ये भाग घेतला. महिन्यांतर ते पुन्हा आपल्या गावी आंदोरी येथे आले आणि शेती करु लागले. इ. सन १९६७ साली यात्रे निम्मत ते सेवागिरी (पुसेगाव) यांच्या दर्शनास गेले. त्या वेळी सेवागिरी समाधीतून दृष्टांत दिला "इथे का आलास? जा, तुझ्या शेतात संजीवनी समाधी आहे. त्या समाधिची तु मनोभावे सेवा कर."
सेवागिरी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी स्वतःच्या शेतातील सर्व भाग पिंजून काढला, परंतु त्यांना शेतात समाधी भेटली नाही. महीना होउन गेला होता. महाराज नेहमी प्रमाणे काम करु लागले. महाराज ऐके दिवशी बैलगाडीत शेणखत भरून शेतात टाकत होते. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते उकिरड्याच्या खड्ड्यात बसले असता त्यांना झोप लागली, त्यांच्या समोर नवनाथ उभे राहिले. प्रत्येक नाथजी त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून ते दसव्या द्वारातून बाहेर पडत होते आणि आशीर्वाद देत होते. काही दिवसानंतर त्यांनी आपल्या आई शेवंताबाई याना त्या शेतातील समाधी बद्दल विचारले असता, त्यांच्या शंकेचे समाधान मिळाले. त्या संजीवन समाधीचा भूतकाळ त्यांना त्यांच्या आईकडून समजला कि, शंकर महाराजांच्या आजोबांच्या म्हणजेच बाबाजी सखु दगडे काळात एक योगी अवलिया यांचे वास्तव्य आंदोरी गावच्या आसपास असायचे. त्यांची सेवा महाराजांच्या आजोबांकडून होत असे. त्यांची सेवा पाहून ते साधू प्रसन्न होत असे, त्या साधुंना तेथील स्थानिक लोक "गोसावी बुवा" या नावाने प्रचलित होते ते म्हणजेच ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महारांजाचे सद्गुरु संत तुकामाई होत.
काही दिवसांनंतर तुकामाई यांनी सद्गुरु शंकर महाराज दगडे यांच्या आजोबांना आपल्या समाधीचे संकेत दिले आणि" येथून पुढे माझे जनकल्याणाचे कार्य तुमच्या नातंवंडाच्या हातून होईल" असा कृपार्शिर्वाद दिला. आजोबांनी जड अंतःकरणाने संत तुकामाईची समाधी तयारी हि त्यांच्याच आदेशानुसार करुन पुर्णत्वास नेली तो दिवस म्हणजे इ. सन. १८६२, चैत्र बारस होय. संततुकामाई ची समाधी नंतर सलग १४ दिवस महाराजांच्या आजोबानी संततुकामाई याना दुध पाजले.
ह्याच समाधीचे पुर्नबांधणी सद्गुरु शंकर दगडे यांनी त्यांच्या काही सहका-यांच्या आणि गावक-यांच्या मदतीने केली. संत तुकामाई समाधी बांधकाम १९७१ साली मा. बाळासाहेब भारदे आणि मठाचे बांधकाम plan इंजिनियर जांभळे यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून त्यांच्या जनसेवेला सुरुवात झाली मानवाच्या सद्स्थितील आलेली प्रापंचिक अडचण, व्याधी, संकट यांचे निवारण आणि दुसरी म्हणजे प्रपंचामध्ये परत न येण्याचे जेणेकरुन कायम सुख परमानंद ब्रह्मरुप होण्याचा मार्ग दाखवित. आलेल्या भाविकांमधील काही शाररिक-मानसिक पिडा, कोर्ट-कचेरी, व्यवसाय-धंदा, शुभ-मंगल योग, संतती लाभ, शांती-समाधान, जललाभ, आत्मज्ञान अशा नाना प्रकारच्या व्यक्तींना ज्या त्या पध्दतीने विभुति आशिर्वाद देत. आपल्या पाठीशी कोणीतरी आहे याची जाण सतत भाविकांना होत असे, ज्याठिकाणी डोक्टरानी हात टेकले अश्या असाध्य असणाऱ्या रोगाला महाराजांनी घालवले. ते इतके ज्ञान देत असत की ते म्हणत "ज्ञानासाठी माझा शिष्य इतरत्र कोठेही हात पसरु शकत नाही" गृहस्थी अश्रमातून आध्यात्मिक प्रगती कशी करुन घेयची ते स्वतः कृतीतून दाखवत असे.
महाराजांचे राहणीमान हे एकदम साधे होते.त्यांचा पोशाख शक्यतो हे धोतर, उपरणे ,खांद्यावर शाल, डोक्यावर पटका आणि कपाळावर भस्म-चंदन विभूती,त्यांच्या भोवती सतत सुगंध दरवळत,नवीन आलेल्या व्यक्तीस प्रथमता महाराज कोण आहेत ? हे सुध्दा ओळखणे अवघड जाई. महाराजांनी कधीही इतरांसी श्रीमंत -गरीब,जात -पात ,ज्ञानी- अज्ञानी,अस्तिक-नास्तिक असा कोणताही भेदभाव केला नाही .त्यांच्या अंगी कधीही वेगळेपण जाणवत नसत.ते सतत उपदेश करीत
"तुझा तुच देव l तुझा तुच भक्त ll१ll
तुझा तूच गुरु l तुझा तूच शिष्य ll२ll”
“निर्गुण परब्रम्हाला आशा लागली..... आशा लागली....
आशाने पंढरी.. आळंदी.. चारी धाम करतो...
संसार करतो... प्रपंच करतो....
रुची सांडोनी चवी सांगतो...
तुका म्हणे.. पोट कशाने भरेल...
शेवटी झुरुन झुरुन मरेल..”
"परब्रम्हाने जन्म घेतला.. त्या माया ठाईच राहिल्या...
अनादी माया सृष्टी झाली... त्यावर पाच महा मायेचा खेळ....
ह्यामध्ये चार अवस्था.. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी, शून्य माया...
पाच मायेचा खेळ शून्यातुन आला... शून्य झाला..
ह्याप्रमाणे भगवंताने सिद्ध केल्या चवी, आशा आणि रुचि...
तिन्ही मध्ये संपला... भगवंत आहे तशाच आहे..“
“देह दर्शने.. सुचतो अभंग... मूळ पुरुषा शी करोनी संग..”.
आत्तापर्यन्त महाराजांच्या विभुती कृपार्शिवादाने लाखोंच्या संख्येंने व्यसनमुक्त होऊन, ते नविन जीवन जगत आहेत. लिंबु-नारळ, मांत्रिक-देवऋषी, पशुहत्या, ज्योतिषी, भोंदूगिरी या विषयी त्यांना सतत चिड असे. त्यांनी त्याविषयी कधीही प्रोत्साहन दिले नाही. अंधश्रद्धे विषयी ते सतत समाज प्रबोधन करत असत. त्यांनी अनेक तप सतत पिडीतांची दुःखे दुरु करुन आदिनाथ संप्रदायाची शिकवण देत राहिले. त्यासाठी त्यांनी कधीही स्वतःच्या देहाची काळजी केली नाही. आलेल्या भाविकास ते माऊली प्रमाणे विचारपुस करीत, प्रेमाने त्यांच्या पाठीवर-डोक्यावर हात फिरवित, प्रत्येकाला ते आपलेच आहेत असे वाटत असें. त्यांच्या नेत्रातून प्रकाश वाहत आणि त्यांच्या मुखकमलावरील स्मीत हास्याने त्या सावळ्या सद्गुरु मूर्तिमुळे सर्वांचे देहभान विसरुन जाई.
एकदा दुपारी चार वाजता महाराज माणगावला पोहचले गावात रथाची मिरवणूक चालली होती. महाराज शिष्यसमवेत वृक्षा खाली बसले होते.मिरवणुकीचा रथ महाराजांच्या जवळ आल्यावर तेथे थांबला.तो काही केल्या हालेना .महाराजांनी ऐक मोठ्याने आवाज काढला आणि गम्मत म्हणजे गावातील सर्व श्वान (कुत्री) महाराजांच्या भोवती गोळा झाली. गावातील लोकांना कळून चुकले कि हे कोणीतरी अवधूत यती आहेत. त्यांनी विनंती केली कि रथाची हालचाल पूर्ववत करावी महाराजांनी रथाला हाताने स्पर्श केला आणि चार लहान मुलांना बोलावून रथ ओढण्यास सांगितले. आणि काय लीला ! रथ त्या चिमुकल्या मुलांनी सहजपणे हलविला.
इतर साधक, बद्ध- मुमुकक्ष, सद्गुरु, साधु-मुनी, गिरी, गोसावी, आखाडेवाले साधू, सुफीपंथ हे महाराजांची गाठी घेऊन अध्यात्मिक मार्गदर्शन घेत असत. महाराजांचे अगणित शिष्य आहेत. "पिंडी ते ब्रह्मांडी" आदिनाथांची उपदेशा प्रमाणे अनुग्रहीत होऊन जन्माचे सार्थक करत, महाराजांच्या बोधाप्रमाणे अंदाजे ४५ मठामध्ये कार्य चालू आहे. शिष्यगणामध्ये मुख्य पिंपरीचिंचवड, पुणे, महाड, कोकण, राजेवाडी, (सासवड), निपाणी, सोनके, पिंपोडे बुll, चिंचनेर वंदन, माळशिरस, अंबवडे, आणेवाडी, वाकड, हिंजवडी, सारोळे, पिंपळे गुरव, कलेढॉण, सातारा, वाफगाव, कराड, आशा अनेक ठिकाणामधील असून तिथे सत्संग, प्रवचन, पारायणे ही महाराजांच्या आशिर्वादाने होत असतात. गेली पाच वर्षे आदिनाथ सांप्रदाय या नावाने आंदोरी-सोनके-पुसेगाव-गोंदवले मार्गे पंढरपुर ही आषाढी दिंडी जाते.
सद्गुरु शंकर महाराज दगडे यांच्या कार्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे व त्याने स्वःताची ओळख करुन घ्यावी ही त्यांची सतत तळमळ असे. अश्या ह्या महान संतविभुतिने वयाच्या १०८ वर्षी, सन २०१६ आश्विन शु. ७ मध्ये रात्री १० च्या सुमारास पुर्वनियोजना नुसार आंदोरी येथील बुवासाहेब गोसावी मठ येथे संजीवन समाधि घेतली. अजूनही निर्गुण रुपाने समाधीतून कार्य आणि आशीर्वाद चालू असून त्याची सतत प्रचिती येत असते.
विभूति आशीर्वाद, जनसेवेचे कार्य व मठातील सर्व कार्यक्रम हे महाराजांचे चार हि मुले करीत असतात. संत तुकामाई आणि ब्रम्हचैतन्य सद्गुरू शंकर दगडे महराज यांची समाधी, अंधोरी. ता. खंडाळा, जिल्हा सातारा येथे आहे. अंदोरी हे शिरवळ- लोणंद रोडवर असुन, लोणंद पासून ११ किमी आहे. प्रत्येक साधक, मुमुक्षू, नाथ पंथीय यांनी या समाधीचे दर्शन घेवून जीवन सार्थक करावे.
सर्व शिष्य आणि भक्तगण यांची एकच प्रार्थना,
आठवण महाराज तुमची नेहमी रहावी I
काया ही माझी चरणी झिजावी II
देहाच्या या मंदिरात तुम्हाला पुजीले I
आदिनाथ देव तुम्ही तुम्हाला मी अंकिले II
ध्यान तिजोरीची ती तुम्हां हाती चावी II1 II
काया ही माझी चरणी झिजावी I
राजाधिराज योगी शंकर महाराज II
भाव भक्तीला तुम्ही रंगविले आज I
भक्तीच्या गुढाची युक्ती कळवावी II2II
काया ही माझी चरणी झिजावी I
निसर्ग देवा तुम्ही दयावे अम्हा दान II
दया, क्षमा, शांती, वैराग्यन ज्ञान I
विभूती आशीर्वाद तुमचा महान II3II
काया ही माझी चरणी झिजावी I
तारिले तुम्ही हो अज्ञानी जीवांना I
नमस्कार माझा आदिनाथ शिवांना II4II
आठवण महाराज तुमची नेहमी रहावी I
काया ही माझी चरणी झिजावी I