नर्मदा-परिक्रमा हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतू ह्याबाबतीत वस्तुनिष्ठ माहिती सहज उपलब्ध नसल्यामुळे परिक्रमेच्या खडतरपणाचाच विनाकारण बाऊ केला जातो. परिक्रमेचं मर्म आणि माहात्म्य ह्याच्याकडे म्हणावं तितकं लक्ष न दिल्यामुळे नर्मदा-परिक्रमेसाठी निघावं अशी इच्छा मनात बाळगणारे लोक द्विधा मनस्थितीत सापडतात.
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. नद्यांच्या दैवी प्रभावाची कल्पना-जाणीव आपल्या पूर्वसुरीना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्यभावना कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमित चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रितीभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा आहे. नर्मदा परिक्रमेची !
भरतखण्डात नर्मदेपेक्षाही आकार विस्तार नि लांबीत अन्य मोठ्या नद्या असल्या तरी त्यांचं आकारमान आणि विस्ताराच्या मोजमापांपेक्षा नर्मदेचं प्राचीनत्व नि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व अशा वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते !
नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक श्रीमार्कण्डेय मुनी ! त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या ९९९ नद्यांच्या धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केलं. अशा पूर्णत: शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना २७ वर्षे लागली !
अलिकडे - म्हणजे सुमारे दीडशे वर्षापूर्वी धुनीवालेबाबांच्या परंपरेतील श्रीगौरीशंकर महाराजांनी मोठा जथा घेऊन नर्मदा-परिक्रमा केल्यापासून ह्या परंपरेला खऱ्या अर्थानं चालना मिळाली.
हल्ली कमी - अधिक कालावधीनुसार तसंच मार्गक्रमणाचा रीतीनुसार नर्मदा-परिक्रमेच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. अर्थात त्यामुळे प्रत्येक पद्धतीनुसार परिक्रमेचं माहात्म्य कमी-अधिक आहे असं मानणारे काही महाभाग आढळतात ! अशापैकी परिक्रमेच्या वाटेवर चालून आलेले कुणी किंवा नर्मदातटीचे काही रहिवासी जे परिक्रमेची वाट कधीही चाललेले नसतात असे काही लोक-परिक्रमावासीयांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवून त्यांना त्रस्त करतात की अनवाणी पायानं नि विशिष्ट पेहराव-म्हणजे धोतर वा लुंगी नेसून नि छाटी वा सदरा अशा पेहेरावात केलेली, अमूक एक कालावधीची, तमूक रितीनं केलेली अन् अलाण्या-फलाण्या वाटेनं केलेली परिक्रमा म्हणजेच खरी परिक्रमा ! असं केलं नाहीत तर ती कसली आलीय परिक्रमा !
नर्मदेच्या दक्षिण तटावरील राजघाट ते अंकलेश्र्वर दरम्यानच्या दीडशे किलोमीटर टापूतील शूलपाणीची तसेच उत्तरतटावरील गरुडेश्वर ते धर्मराय कोटेश्वर दरम्यानची जंगल-झाडीची वाट नर्मदेच्या तटानंच पार करणे हा काही परंपरावादी लोकांनी कळीचा मुद्दा बनवला आहे. ह्या वाटेनं जाणाऱ्या परिक्रमावासींना त्या परिसरातील भिल्ल केवळ लुटतंच नाहीत तर अक्षरश: नागवतात. परंपरावादी लोकांच्या मते असं लुटवून घेणं हा परिक्रमेदरम्यानच्या वाटचालीतील अटळ-अपरिहार्य भाग असल्यानं तो अनुभव प्रत्येक परिक्रमावासीना घेण अगत्याच आहे.
खरं तर हे भिल्ल लुटारू नाहीत ! ह्या परंपरेमागचं खरं कारण असं की, नर्मदा-परिक्रमा करत असताना परिक्रमावासीयांनी मोह, माया, आसक्ती, लोभ इत्यादींचा त्याग करणं अभिप्रेत आहे नि ते तसं सहजा-सहजी घडत नसल्यामुळे हा धडा गिरवण्याची नर्मदेच्या तटी अशी ‘सोय’ केली असावी.
स्वाभाविकच ह्या वाटेत भिल्लांकडून लुटलं जाण्याच्या भयानं बहुतेक परिक्रमावासी हा टप्पा वाहनातून प्रवास करून ही वाट टाळतात किंवा कुणी नर्मदेच्या तटाची वाट सोडून थोडीशी दूरची वाट पायी-पायी आक्रमतात. अर्थातच ह्या अनुभवाकडे परिक्रमावासींनी पाठ फिरवणं हे काही ह्या परंपरावादी लोकांना मान्य नाही !
इथे एक महत्त्वाचा खुलास करावासा वाटतो की, ३०-४० वर्षापूर्वीच्या काळात गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील ही शूलपाणीची जंगलझाडीची वाट पार करताना भिल्लांकडून लुटलं जाण्याचं भय एवढंच संकट भेडसावायचं ! त्यानंतरच्या काळात नर्मदेवर सहा-सात धरणे निर्माण झाली. प्रामुख्याने शूलपाणी झाडीच्या टापून झालेल्या महाकाय धरणाच्या बांधकामामुळे सरदार सरोवर हा प्रचंड जलाशय निर्माण झाल्याकारणानं तिथली बहुतांशी जंगल-झाडी तर त्या जलाशयात बुडालीच, त्याचबरोबर पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या परिक्रमेच्या सगळ्या पायवाटासुद्धा जलमय झाल्यानं हल्ली शूलपाणीच्या वाटेनं लुटलं जाण्याच्या भयापेक्षाही सर्वथा अतिअवघड नि जोखमीच होऊन बसलं आहे. खरं तर कुणीही, किमानपक्षी जे कुणी नर्मदा-परिक्रमेची वाट चालून आलेले आहेत नि ज्यांना परिक्रमेची वाट चालण्याबरोबरच त्यामागचा हेतू नि खरं मर्म उमगलेलं आहे अशांनी तरी परिक्रमेच्या वाटचालीच्या संबंधानं किंवा परिक्रमेदरम्यान पाळावयाच्या बाबतीत कोणताच अभिनिवेष आग्रहानं प्रतिपादन करण्याचं नि परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काही एक कारण नाही. तो त्यांचाच काय कुणाचाच अधिकार वा मिरासदारी नव्हे. तेव्हा परिक्रमा करणाऱ्या व्यक्तींनी अशा लोकांबरोबर चर्चा किंवा स्वत:च समर्थन करुन वादविवाद करू नये हे इष्ट ! नर्मदेची परिक्रमा ही नर्मदामाईच्या इच्छेनुसार तीच करवून घेते.
नर्मदा परिक्रमेदरम्यान मला जाणवलेली वा उमगलेली बाब अशी की परिक्रमावासीयांनी कोणता पेहेराव करावा असा कोणताच दंडक घालून दिलेला नसला तरी परंपरेनं चालत आलेला पेहेराव धोतर वा लुंगी नि सदरा ह्यामुळे परिक्रमावासीयांची जी प्रतीमा लोकांच्या मनात ठसलेली आहे तिला पेहेरावामुळे तडा जातो हे ध्यानात घेऊन शक्य असल्यास असा पेहेराव करावा. स्त्रियांचा पेहेराव पांढरं लुगडं-पोलकं असा असतो.
नर्मदा-परिक्रमेदरम्यान पाळावयाचे परंपरागत नियम आहेत त्यापैकी स्वत:ला पाळणे शक्य आहेत असे वेचक नियम परिक्रमा करणाऱ्यांनी स्वत:च ठरवून घ्यावेत किमान काही नियम तरी आवर्जुन पाळायचे ठरवावे नि ते निष्ठापूर्वक पाळावेत. मग परिक्रमा कितीही कालावधीची वा पद्धतीची, कुठल्याही मार्गानं पायी किंवा वाहनातून कशीही असू, परिक्रमेची वाटचाल नर्मदामाईप्रती अतीव आदरानं नि श्रद्धेनं करणं एवढंच महत्त्वाचं अन् पुरेसं आहे !
नर्मदा-परिक्रमा कुणी, का, कोणत्या वयात, कशी नि कशासाठी करावी ? नर्मदा-परिक्रमा कुणीही करावी. इथे जन्मजात वंश-जाती-धर्म-लिंगभेद, वय ह्यांची अजिबात आडकाठी नाही. नर्मदा-परिक्रमा का करावी ह्यांचं उत्तर असं की नर्मदा-परिक्रमा हे मानवी मनाच्या उन्नयनाचं/ सबलीकरणाचं - निर्मलीकरण साधणं हे आपल्या स्वत:शिवाय दुसऱ्या कुणाच्याच हातात नाही. दुसऱ्याचे अनुभव वाचून-ऐकून ते उमगलं कळलं तरी त्याची अनुभूती स्वत:ची स्वत:च घेणं केव्हाही श्रेयस्कर !
नर्मदा-परिक्रमा कोणत्या वयात करावी ? कुणी म्हणतील, नर्मदा-परिक्रमा ही जेव्हा रिकामपण येतं तेव्हा म्हणजे उत्तर आयुष्यात करण्याची-वानप्रस्थाश्रमाची वाटचाल आहे. खरं तर मानवी मनाचं उन्नयन निर्मलीकरण सबलीकरणाचं साधण्याचा मानवी जीवनातील आदर्श कालखंड म्हणजे ब्रह्माचर्याश्रम नि गृहस्थाश्रम ह्या दरम्यानचाच आहे. कारण ह्या कालावधीत जर प्रत्येकानं आपापल्या मनाचं उन्नयन/सबलीकरण निर्मलीकरण साधलं (सांगायला जरी हे ठीक असलं तरी ते सोपं निश्चितच नाही!) तर ते त्या व्यक्तीच्या पर्यायानं समाजाच्या स्वास्थ्याला उपकारकच असणार आहे. अर्थात चांगलं कृत्य करायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे नर्मदा-परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहीच हरकत नाही.
आपले पूर्वसुरी-ऋषी-मुनी ह्यांनी दीर्घ तपश्चर्या करुन अध्ययन, प्रयोग, चिंतन, मननाद्वारे अगणित ज्ञानशाखाच्या भांडाराचा ठेवा हस्तगत केला. आजच्या विज्ञानयुगातल्या शिक्षणपद्धतीनं मानवाला प्राप्त होणारं ज्ञान निश्चितच भौतिक लाभ आणि सुखसाधनं उपलब्ध करुन देत आहे. दिवसेंदिवस त्यात नावीन्य, विविधता, सहजता नि विपुलता येत असली तरी काही मर्यादेपर्यंतच ते ठीक पण… ठराविक मर्यादेपुढे काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर आजचं उद्याचं नि नंतरचही विज्ञान देऊ शकणार नाही. ह्याचा अर्थ असा नव्हे की आजच्या विज्ञानयुगातलं सगळंच काही कुचकामाचं नि टाकाऊ आहे. त्याचा सीमित लाभ-उपभोग जरुर घ्यावा, पण सबुरीनं-हव्यास अजिबात नसावा.
नर्मदा-परिक्रमा कशी करावी ज्यांना शारीरिकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अशांनी अगदी तीन आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे नर्मदा-परिक्रमा केली तरीसुद्धा चालेल. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे नि श्रद्धेनं करणं अगत्याचं आहे.
नर्मदा-परिक्रमा करण्यामागचा हेतू कोणता असावा हेसुद्धा इथे सांगणं अगत्याच आहे. कारण कुणी गृहकलहामुळं उद्वेगानं ह्या वाटेवर येतात तर कुणी प्रायश्चित्त म्हणून! काहीजण एखादी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून किंवा नवस फेडण्यासाठीसुद्धा येतात. ह्या हेतूंच्या इष्टनिष्टतेचा विचार इथे जरी करायचा नसला तरी असे हेतू मनात बाळगून कुणी-कुणी ही वाट चालतात हे सर्व लक्षात घेऊन ज्या कुणाला परिक्रमेला निघायचं आहे अशांनी परिक्रमेची वाट श्रद्धेनं नि नर्मदामाईवर पूर्ण भरवसा ठेऊन अलौकिक लाभ मिळविण्यासाठी चालणं अगत्याच आहे.
नर्मदा-परिक्रमेची फलश्रुती-परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीमध्ये होणारं आमूलाग्र परिवर्तन, मनाच उन्नयन/ सबलीकरण नि निर्मलीकरण साधलं गेल्यानं त्यांच्या शारीरिक तसंच मानसिक दोषांचं निर्मूलन होऊन स्वस्थ शरीर, शांत स्थिर आणि संतोषी वृत्ती प्राप्त होणं अशी असली तरी ह्या वाटेनं चालून प्राप्त होणारे उपलाभसुद्धा काही कमी मोलाचे नाहीत! त्यापैकी थोडेसे सांगतो.
आपल्याला असलेले ज्ञान आणि माहिती ह्यांचा पडताळा परिक्रमेदरम्यान घेण्याची अपूर्व संधी लाभते ती अशी वनस्पती, भूगर्भ, पुरातत्त्व, प्राणी-पक्षी अशी शास्त्र, इतिहास, भूगोल, आयुर्वेद, संगीत, शिल्पकला, रेखाटन, चित्रकला, छायाचित्र काढणं… ही यादी कितीही लांबू शकेल. ह्यापैकी ज्यांचं आपल्याला ज्ञान आहे त्याची प्रचिती घेणं हे जमू शकेल तसंच अन्य विषयांचं ज्ञान मिळविण्याची प्रेरणा मिळू शकेल.
नर्मदा-परिक्रमेचं एक अपूर्व वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा-परिक्रमा करणारी प्रत्येक व्यक्ती केवळ धार्मिक नि सामाजिक दृष्ट्या नव्हे तर आर्थिक स्तरावरसुद्धा समान पातळीवरची मानली जाते. हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. नर्मदा-परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीनं ती कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्तरावर असो. तिनं अत्यावश्यक किमान गरजांची पूर्तता होईल एवढंच धन वा साधन-सामुग्री परिक्रमेदरम्यान सोबत बाळगावी. अनावश्यक संग्रह करू नये असा दंडक आहे.
आपला वेगळेपणा मोठेपणा लोकांच्या ध्यानात येईल असे वर्तन नर्मदा-परिक्रमेत अभिप्रेत नाही. आपल्याकडे पंढरीच्या वारीत उच्च-निच, लहान-थोर, गरीब-श्रीमंत भेदाभेद नाहीत हे तर आपण नित्य अनुभवतो. नर्मदा-परिक्रमेत ‘समभावाचं’ हेच तत्त्व स्वत: आचरणात आणायचं आहे. थोडक्यात नर्मदा-परिक्रमेची वाट माणसातलं अपुरेपण घालवून त्याला परिपूर्ण करणारी अभिनव वाट आहे.
नर्मदा परिक्रमा एक दिव्य अनुभूती
नर्मदा परिक्रमा: नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते . ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.
हि परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवीय अनुभूती फक्त पायी परीक्रमेतच मिळू शकतात. परंतु आताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थ्यामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक हि यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५ दिवस, २१ दिवसांत पूर्ण करतात.
या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा, तर अयोध्या - मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा, नैमिषारण्य - जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा, जी जवळजवळ ३,५०० कि.मी. आहे . सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. असे सांगितले जाते कि प्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषीनीं अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात कि श्री मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली ती इतकी खडतर होती कि त्यांनी श्री नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व उपनद्या, ओढ़े, नाले देखील त्यांच्या प्रवाहातून पार न करता त्यांच्या उगम अथवा विलया पर्यंत जाऊन तेथून ते पार केले होते.
नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत तसेच अनुभवांचे भंडार देखील आहे. या परीक्रमे नंतर प्रत्येक परिक्रमावासी चे आयुष्य बदलल्या शिवाय रहात नाही. नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे झाली असल्याने साधारण पायी नर्मदा परीक्रमेचे एकूण अंतर ३,५०० किलोमीटर आहे. शास्त्रात सांगितल्या नुसार नर्मदा परिक्रमेचा अवधी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाचा आहे , तसेच हि परिक्रमा 108 दिवसांत देखील पूर्ण करतात. बरेचसे परिक्रमावासी आपआपल्या शक्ती नुसार शक्य तेवढ्या दिवसांत परिक्रमा पूर्ण करतात. परिक्रमा किती दिवसांत पूर्ण केली या पेक्षा परिक्रमा पायी पूर्ण केली याला अनन्यसाधारण महत्व आहे. परिक्रमावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास परीक्रमेस निघतात आणि निरंतर पायी चालत परिक्रमा पूर्ण करतात.
नर्मदा मैया मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे.
नर्मदा परिक्रमा या विषयी माहिती मिळवण्यासाठी मराठी तसेच इतर भाषेत देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मराठी मध्ये ‘श्री जगन्नाथ कुंटेजी’ यांचे ‘नर्मदे हर हर ’ हे पुस्तक खुपच प्रसिद्ध आहे. तसेच ‘भारती ठाकुरजी’ यांचे ‘नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा’ हे पुस्तक देखिल खुप माहितीपूर्ण आहे. ‘दा.वि.जोगळेकर’ यांचे ‘नर्मदा परीकम्मा’ हे पुस्तक देखील छान आहे. अशी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
नर्मदे हर ! नर्मदे हर हर ! नर्मदे हर हर हर !
उत्तरवाहिनी एक दिवसाची नर्मदा परिक्रमा स्वरूप व महत्व
नर्मदा परिक्रमा म्हणजे सर्वात कठीण व खडतर परिक्रमा आहे ,ज्यांना हि परिक्रमा करायची फार इच्छा आहे परंतु, प्राकृतिक अथवा संसारिक अडचणी मुळे हि परिक्रमा करता येत नाही, त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हा उत्तम पर्याय आहे. एखादी नदी ज्या वेळेस उत्तरवाहिनी होते त्यावेळेस ती फार पवित्र मानली गेली आहे, असेच नर्मदा मैया तिलकवाडा ते रामपुरा या क्षेत्रात फक्त चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी होते त्यामुळे त्या परिसराला फार पवित्र मानतात. नर्मदा पुराण व स्कंद पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला पूर्ण नर्मदा परिक्रमेचे फळ मिळेल असा नर्मदा मैयाचा आशीर्वाद आहे. त्यामु़ळे चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात. हि परिक्रमा करण्यासाठी प्रथम तिलकवाडा येथे यावे लागते. संकल्प विधि करून आपली परिक्रमा पहाटे उत्तरतटावरून सुरू होते.वाटेत लागणारी मंदिरे व आश्रम ह्यांना भेट देत आपला साधारण १० किमीचा टप्पा पूर्ण होतो. उत्तर तट संपल्यावर आपल्याला नावेने दक्षिण तटावर म्हणजे रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तिर्थेश्वर महादेव मंदिरात पिंडीवर जल अर्पण करून आपली दक्षिण तटाची परिक्रमा चालू होते.दक्षिण तट सपंल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. अशी ही २१ किमीची एक दिवसाची परिक्रमा आहे.
परिक्रमा पूर्ण झाल्यावर सायंकाळी कन्यापूजन करून परिक्रमेची सांगता होते. परिक्रमेसाठी पांढरा ड्रेस आवश्यक, महिलांसाठी पांढरी साडी. प्रत्येक भक्ताने हि परिक्रमा करून अगणित पुण्याचे भागीदार व्हावे.
त्वदीयपाद पंकजं नमामी देवी नर्मदे !