श्रीस्वामींच्या अक्कलकोट गादीनंतर श्रीस्वामी परंपरेतील दीक्षेचा मान होता मुंबापुरी गादीचा. तेच कार्य कोल्हापूर येथूनही चालू होते. हे कार्य, परमहंस यती ब्रह्मानंदस्वामीकुमार यांच्या शिष्या विठामाई मेंदरकर या पाहत असत. परंतु कोल्हापूरची गादी ही "स्वामींची गादी'' म्हणून आहे हे अनेकांना आज देखील माहीत नाही. त्याचे कारण असे की, या संदर्भातला प्रसार म्हणावा तसा झाला नाही.
श्रीस्वामींची मुंबापुरी गादी ही श्री स्वामीसुतांच्या बरोबरीने सांभाळणारे ब्रह्मानंदस्वामी यांनी श्री स्वामीसुतांच्या देहावसानानंतर कोल्हापूर येथून हे कार्य चालविले. अनेक भक्तांना याची कल्पनाही नसेल.
हे कार्य चालविणा-या विठामाई यांचे पूर्वायुष्य विलक्षण होते. त्या जन्मांध होत्या. त्यांची कुंडली उपलब्ध झाली आहे. त्यात असे दिसते की, त्यांचा जन्म तुळ लग्नावर झाला. वृश्चिक रास होती. ९ जुलै १८७०, शनिवार. त्यावेळी जन्म नक्षत्र होते अनुराधा. हे शनीचे नक्षत्र होय. लग्नेश शुक्र व द्वितियेश मंगळ हे दोन्ही मृत्युस्थानात. चंद्राची अष्टमावर म्हणजे मृत्युस्थानावर दृष्टी. अष्टमातील गुरु सप्तम दृष्टीने द्वितीयेतील चंद्राकडे पाहत आहे. नवम स्थानामध्ये मिथुन राशीत तीन ग्रह, पैकी रवि हा दृष्टीदाता(ग्रह). तो व्ययेश बुधासमवेत आणि राहुबरोबरच्या घट्ट युतीत. व्ययेश व धनेश दोघेही बिघडलेले. अशाच प्रकारची अन्यही ग्रहस्थिती. परिणामी गंभीर दृष्टीदोष. पण अष्टमात असलेल्या गुरु ग्रहाची व प्रत्यक्षात श्रीगुरु महाराजांची कृपा झाली तरच काही निभाव लागावा!
विठामाईंचा जन्म झाला तो आषाढी एकादशीचा दिवस असल्याने त्यांचे नाव विठुरायांशी निगडित राहिले. काय करतील ते प्रत्यक्ष पांडुरंगच, या विचारातच विठामाईचे पिता धोंडबा व त्यांची पत्नी हे दोघे त्या कनवाळू मूर्तीकडे डोळे लावून बसले होते. पुढे सा-या देवदेवतांची दर्शने, साधुसंतांकडे कृपाप्रार्थना करीत छोट्या विठामाईला घेऊन उभयता फिरू लागले. नरसोबा वाडीच्या श्रीनृसिंह स्वामी महाराजांवर धोंडबांची निस्सीम भक्ती होती. त्यांच्याकडे देखील मनधरणी सुरू झाली.
दिवसामागून दिवस गेले. वर्षे लोटली. वयाच्या सातव्या वर्षी एक विलक्षण प्रसंग घडला! श्रीदत्तात्रेय महाप्रभूंचा धोंडबांना स्वप्नदृष्टांत झाला. ते म्हणाले, "तुझ्या दु:खाचा परिहार होण्याची वेळ आता नजीक आली आहे. मीच तुझ्याकडे येत आहे. आता तुला माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही."
या दृष्टांताने धोंडबांच्या आशा प्रज्ज्वलित झाल्या. ते म्हणत होते, "आम्ही तरुण आहोत. ही बाळ लहान आहे इतपत ठीक आहे. पुढे तरुणपणी, वृद्धत्वात या मुलीचे कसे होईल?" त्यांची ही शंका दूर होऊन काहीतरी वेगळे घडणार ह्या चाहुलीने ते आनंदित झाले होते. तो दिवस आला कोल्हापूरच्या टेंबलाई तथा त्र्यंबोली टेकडीवरील त्र्यंबोली मातेच्या वार्षिकोत्सवावेळी. ललितापंचमीला त्र्यंबोली मातेसमोर, कोल्हापूरच्या अंबाबाईने केलेल्या कोल्हासूर वधाचे प्रतीक म्हणून होणारा "कुष्मांडभेद" या उत्सवाला देवदेवतांची उपस्थिती सूक्ष्म रूपाने असते. साधुसंत हमखास उपस्थित असतात. कोल्हापूरकर नगरजन तर असतातच. याच उत्सवाला धोंडबा हे विठामाईस घेऊन गेले असता त्यांची भेट घडली ती श्रीस्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य परमहंस यती ब्रह्मानंद स्वामीकुमार यांच्याशी!
केवळ अंदाजाने सराईताप्रमाणे चालणा-या विठामाईसमवेत पिता धोंडबा हे होतेच. त्यांची नजर मात्र भिरभिरती होती. श्रीदत्त महाराजांच्या दृष्टांताची पूर्ती करण्यास समोर कोण महाराज येतात याकडेच त्यांचे बारकाईने लक्ष होते. इतक्यात त्यांच्या समोर आली ब्रह्मानंदस्वामीकुमार यांची देदीप्यमान मूर्ती. आपल्या समवेत अनेक शिष्यमंडळींना घेऊन ते मुंबई, कोकण, अक्कलकोट अशा भटकंतीतून देवकार्य साधत असत. त्यांनी विठामाईंना नेमके हेरले. धोंडबांनीही या मूर्तीकडे पाहून आपले गा-हाणे सांगितले. ब्रह्मानंदस्वामी म्हणाले, "बाळाला दृष्टीदोष आहे ना! पण आम्ही तो त्वरित घालवू. परंतु ही बाळ मग आमच्या कार्यासाठी आपल्याला द्यावी लागेल." धोंडबा किंचित विचारात पडले व म्हणाले, "गुरुमहाराज, ही बाळ डोळस झाली, स्वत:च्या डोळ्यांनी जग पाहू लागली तर आमचे घर आपलेच झाले. आई अंबाबाई आमच्यावर पाखर घालून आहे. तिच्या मंदिरालगतच आम्ही राहतो. आपण आमचे घर आपलेच समजावे." ब्रह्मानंदस्वामी प्रसन्नतेने हसले. ते एक असाधारण महापुरुष होते. श्रीस्वामीरायांना प्रिय असे "स्वामीकुमार" होते. सारी शास्त्रे त्यांना अवगत होती. श्रीस्वामीकृपेने त्यांना सिद्धिदात्री सुप्रसन्न होती. त्यांनी सहजलीलेने धोंडबांच्या कन्येला दृष्टी प्रदान केली.
याच कृपाप्राप्त विठामाईने पुढे श्रीस्वामी समर्थांच्या कोल्हापूर गादीचे कार्य सांभाळले. तिला दृष्टी प्राप्त होताच मेंदरकर कुटुंब श्रीस्वामीचरणांशी आपली अश्रूसुमने वाहण्यासाठी अक्कलकोटी गेले. त्या श्रीस्वामीराजगुरुंच्या चंद्रशीतल कृपादृष्टीच्या चांदण्यात नहाल्याने विठामाईंनी आजन्म विरागता राखून हजारो दु:खितांची दु:खे दूर केली. भक्तगणांत त्यांना फार आदराने पाहिले जाई. श्रीस्वामींच्या वटवृक्ष देवस्थानची धुरा महाराजांच्या समाधीलीलेपश्चात वाहणा-या ज्योतिबा महाराज पाडे या सेवेकरी सत्पुरुषांनीही श्रींच्या एका उत्सवाला माईंनी हजर राहण्यासाठी निमंत्रण पाठविल्याचे पत्र उपलब्ध झाले आहे. त्यात ते माईंना "सिद्ध महाराज" असे संबोधत आहेत, हेही उल्लेखनियच होय.
मागील वर्षी फेसबुक पेजवर लिहिताना ज्या नोंदी दिल्या होत्या, त्यात काही दुरुस्त्या करून हा लेख देत आहोत. माईंच्या कार्याची ही केवळ तोंडओळख आहे. दिवाळी अंक सन २०१८ च्या "शूर सेनानी''च्या श्रीस्वामी समर्थ विशेषांकात माईंवर अधिक विस्तृत लेख देण्यात येईल. त्यातील हा महत्त्वाच्या मुद्द्याच्या संदर्भातील आरंभीचा उल्लेख आपल्यासमोर ठेवित आहोत. शूर सेनानीच्या आजपर्यंतच्या एकूण २७ दिवाळी अंकांपैकी संपूर्णत: श्रीस्वामींवर असे एकवीस अंक झाले असून, यंदाचा अंक हा बावीसावा विशेषांक असेल. त्यातील विठामाईंच्या माहितीपूर्ण सविस्तर लेखाचा हा फक्त गोषवारा.
- संजय वेंगुर्लेकर