जन्म: १८६० नगर जिल्हा बेलापूरचे
कार्यकाळ: १८६०-१९०५
सप्रदाय: अवधूत संप्रदाय
समाधी: १९०५
बेलापूरचे विद्यानंद यांचे सर्व आयुष्य अद्भुतरम्य आहे. त्यांचा जन्म १९६० असा असला तरी तो त्यांचा प्रकटकाल मानणे योग्य होईल. हे स्वामी नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठी असणाऱ्या बेलापूर या गावचे होते. येथील नदीला अमृतवाहिनी म्हटले जाते. पूर्वी येथे बेलाचे वृक्ष होते. जवळच केशव गोविंद यांचे स्थान आहे. या देवतीर्थावर एक स्वामी स्नान करून केशव गोविंदाची पूजा करीत होते. त्यावेळी स्वामींनी एका मुलाला सांगितले, “महादू, कोणास सांगू नकोस आमचे नाव विद्यानंद आहे.”
विद्यानंद गौरवर्णाचे होते. त्यांची छाती रुंद होती. स्वर गंभीर होता. विशाल नेत्र होते. कडुनिंब आणि विषारी वनस्पती सोमल, असा त्यांचा आहार होता. बेलापूरचे गोविंदभटजी गोरे व त्यांच्या पत्नी राधाबाई यांनी त्यांची सेवा केली. स्वामींच्या अंगावर जखमांच्या खुणा होत्या. यावरून ते पूर्वी युद्धात असावेत, ते नेहमी एकलिंगजीमाहात्म्य सांगत. त्यावरून ते उदेपूरचे असावेत असे वाटते. काहीजण त्यांना नानासाहेब पेशवे समजत. अक्कलकोटच्या महाराजांशी त्यांचा संबंध होता; वाघोलीचे कुवरस्वामी त्यांच्या जवळचे होते. स्वामींनी खूप प्रवास केला होता; बद्रिनारायण, हृषीकेश, मंगळवेढे इत्यादी ठिकाणी त्यांचा प्रवास असताना त्यांना अक्कलकोटचे स्वामी दिसत. स्वामींचे केस पायांच्या टाचेपर्यंत लांब होते. म्हणून त्यांना बंडखोर समजून इंग्रज अधिकाऱ्यांनी अटक केली. पण तेथून सुटका होऊन स्वामी ओंकारमांधाता येथे गेले व त्यांनी नर्मदेत आपल्या जटा विसर्जित केल्या. आणि ते परमहंस दीक्षा घेऊन अवधूत झाले. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. एकदा ते औदुंबरला गेले होते. त्यावेळी नरसिंहसरस्वती व स्वामी एकच आहेत असा समज लोकांचा झाला. स्वामींना त्रिकालाचे ज्ञान होते. स्वामी इंदूरलाही गेले होते. भुसावळचे श्रीपतराव पटवर्धन त्यांचे शिष्य होते. गजाननमहाराज आणि नारायणमहाराज केडगाकरगावकर ही त्यांची रूपे असावीत. स्वामींनी नारायणमहाराजांच्या रूपाने पुन्हा अवतार धारण केला. नारायणमहाराज म्हणजे विद्यानंद स्वामी असे भक्तांना वाटे.
स्वामींना सुगंधी द्रव्ये, फुले, स्वच्छता यांची आवड होती. दत्तात्रेयांची अवधूत परंपरा त्यांनी चालविली. स्वामींनी अनेक लोकांना सन्मार्गास लाविले. स्वामींचे एक भक्त पानसे सोनोरीकर यांनी म्हटले आहे की,
हरिहर विधी तनु मूर्ति साजिरी प्रवरा तीरी राहे ।
विद्यानंद महाराज सद्गुरु दत्तात्रेय आहे ॥
स्वामींचे चरित्र पां. श्री. आपटे, दा. गो. पाटील यांनी लिहिले आहे.