स्थान: खामगाव, जिल्हा बुलढाणा (महाराष्ट्र)
सत्पुरुष: प. प. संत पाचलेगांवकर महाराज
विशेष: श्री वासुदेवानंदांनी दिलेली दत्तमूर्ती, निर्गुण पादुका
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एक सुंदर दत्त मंदिर आहे. येथेच श्री संत पाचलेगांवकर महाराजांचा मुक्तेश्वर आश्रम आहे.
या मंदीरातील त्रिमूर्ती हि शडभूज अशी आहे. हि मूर्ती श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी बनवून घेतली होती व आपल्यानंतर हि मूर्ती प. प. पाचलेगांवकर महाराजांना देण्यात यावी असे निर्देश केलेले होते. याप्रमाणेच हि मूर्ती श्री पाचलेगांवकर महाराजांना मिळाली. याच मूर्तीची त्यांनी मुक्तेश्वर मंदीरात प्रतिष्ठापना केली. परंतु येथले मुख्य वैशिष्ठ म्हणजे प. प. श्री पाचलेगांवकर महाराजांना प्राप्त झालेल्या श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुका होत. मुक्तेश्वर मंदिराच्या महाद्वाराखाली जमिनीत एक तळघर करण्यात आले असून त्यात या पादुकांची स्थापना मार्गशीर्ष वद्य १२ ला करण्यात आली. पादुकांच्या मागेच एक अत्यंत सुंदर स्फटीकांची श्रीपादश्रीवल्लभांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. हि मूर्ती इतकी विलोभनीय आहे की दर्शनाबरोबरच भक्त देहभान विसरतो. येथील निर्गुण पादुका संदर्भात एक अशी कथा प्रचलित आहेकी प. प. पाचलेगांवकर महाराजांना गाणगापूरला निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यास अटकाव करण्यात आला. महाराज काहीही न बोलता बाहेर आले व एका औदुंबर वृक्षाखाली साधनेस बसले. इकडे आरतीचे वेळी निरंजनाची वात काही केल्या पेटेना. शेवटी एका वृध्दास आधीचा प्रसंग आठवला आणि महाराजांची ओळख पटली.
पुढे श्रीपाद श्रीवल्लभानी महाराजांना दर्शन देऊन पादुकांसाठी अनुष्ठान करण्याचा आदेश दिला असे सांगितले जाते. त्याप्रमाणे प. प. पाचलेगांवकर महाराज अनुष्ठानास बसले आणि अनुष्ठान पार पाडताच महाराजांना पादुकांची प्राप्ती झाली. त्यामुळे श्रीे निर्गुण पादुका ज्या श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वादाने मिळाल्या व दत्तस्वरूप श्रीवासुदेवानंद सरस्वती यांचे कडून मिळालेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान अत्यंत जागृत असे मानले जाते. या ठिकाणी पिशाच्च मोचन व ऋण मोचन यंत्राची स्थापना केलेली आहे. येथे शिवरात्र, सोमवार व गुरुवार हे महत्वाचे दिवस मानले जातात, पण इथला मोठा उत्सव असतो तो म्हणजे मार्गशीर्ष वद्य १२ हा आहे. या दिवशी एकूण ३ दिवस उत्सव चालतो. पण तत्पूर्वी १० दिवस आधी अनुष्ठान असते.
मुक्तेश्वर आश्रम खामगाव, श्री निर्गुण पादुका मंदिर
मुक्तेश्वर आश्रम खामगाव, मु.पो.ता. खामगाव -४४४३०३ जि.बुलढाणा महाराष्ट्र.
दूरध्वनी ०७२६३ - २५४८०२