महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. नाथसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायांत दत्तात्रेयांविषयी गाढ श्रद्धा आहे. तसेच, दत्तभक्तीचीच परंपरा विशेष करून चालविणारा दत्तसंप्रदायही महाराष्ट्रात शेकडो वर्षे अस्तित्वात आहे. या संप्रदायात दत्तात्रेयांना आपले उपास्य दैवत मानणाऱ्या दत्तभक्तांत हिंदूंबरोबर मुस्लिमांचाही समावेश आहे.दत्तात्रेय हे जरी महाराष्ट्रातील भक्तप्रिय दैवत असले तरी त्याच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली, ती श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. त्यांच्यानंतरच महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय उदयाला आला. औदुंबर, नरसोबा वाडी व गाणगापूर ही या संप्रदायाची प्रमुख तीर्थस्नाने बनली.
नृसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे जो दत्तोपासनेचा प्रवाह प्रवर्तित झाला, त्या प्रवाहाशिवाय दत्तोपासनेच्या क्षेत्रात अन्य प्रवाह निर्माण झाले आणि वाढत राहिले; परंतु त्यांचे स्वरूप व्यापक नसल्यामुळे ते वैयक्तिक उपासनेपुरतेच मर्यादित राहिले आणि म्हणूनच त्यांना संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले नाही. दत्तसंप्रदायाच्या स्वरूपावर दत्तात्रेयांच्या मूलस्वरूपाचा प्रभाव विशेष आहे, ते तर खरेच; परंतु त्याच्या घडणीत, विचारआचारात दत्तावतारी महापुरुषांचाही सिंहाचा वाटा आहे. दत्तात्रेयांच्या मूलस्वरूपात पौराणिक कल्पनेनुसार चातुर्वर्ण्यसंरक्षणावर विशेष भर आहे. पुराणांनी वारंवार असे प्रतिपादले आहे, की दत्तात्रेयांचा अवतार हा चातुर्वर्ण्याच्या संवर्धनासाठी झालेला आहे.
ज्या काळात श्रीनृसिंह सरस्वतीचा अवतार झाला, त्या काळात ‘कठीण दिवस युगधर्म । म्लेंच्छराज्य क्रूर कार्य’ अशी परिस्थिती सर्वत्र होती. परिणामी ब्राह्मण वर्ग आचारदृष्ट्या शिथिल होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनृसिंह सरस्वतींनी वैदिक परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी व संरक्षणासाठी वर्णाश्रम धर्माला प्राधान्य दिले. ‘धर्मो रक्षति रक्षत:’ ही त्यांची त्यामागची प्रमुख भूमिका होती. दत्तसंप्रदायाचे उपास्य असलेले दत्तात्रेय हे एक योगी असल्यामुळे या संप्रदायात स्वाभाविकच योगालाही प्राधान्य मिळाले. अगदी चांगदेव राऊळांपासून आजपर्यंत झालेले बहुतेक महान दत्तोपासक योगी होते. नाथसंप्रदायाने तर दत्तात्रेय ही योगप्रदायक देवताच मानली आहे. नाथसिद्धांविषयी जनमानसात असा समज रूढ आहे, की ते योगसामर्थ्याने अद्भुत चमत्कार करू शकतात.
दत्तोपासनेमुळेच अशा सिद्धी दत्तोपासकांना प्राप्त होतात आणि त्यांच्या साहाय्याने ते आपली दु:खे दूर करू शकतात, आपल्या कामनांची पूर्ती करू शकतात, ही जी भावना सर्वसामान्यांच्या मनात प्रथमपासून रुजत गेली त्यातच दत्तसंप्रदायाच्या भक्तप्रियतेचे रहस्य दडलेले आहे. केवळ दर्शन-स्पर्शनाने वा आशीर्वादाने सिद्धपुरुषांनी आपल्या व्यथा-वेदना त्वरित नाहीशा करून मनोकामना पूर्ण कराव्यात, अशीही बहुतेक भक्तांची किमान अपेक्षा असते. दत्तात्रेयांची उपासना गुरुस्वरूपात करावयाची असते. कारण ते ‘गुरुदेव’ आहेत. परिणामी गुरुसंस्थेला प्राधान्य देणाऱ्या सर्व संप्रदायात दत्तात्रेयांची पूज्यता रूढ झाली.
दत्तसंप्रदाय हा प्रत्यक्षवाई, सगुणवादी आहे. जीवनाला आवश्यक असलेल्या मंत्रशास्त्राचे संवर्धन करण्याचे महान कार्य आजवर दत्तसंप्रदायाने केले आहे. आपल्या भारतात जे अनेकानेक धार्मिक संप्रदाय आहेत त्यात ‘दत्तसंप्रदाय’ हा एक प्रमुख संप्रदाय मानला जातो. यालाच ‘अवधूत संप्रदाय’ असेही संबोधिले जाते. ‘दत्तात्रेय’ हे या संप्रदायाचे आराध्य दैवत होय !शैव, वैष्णव व शाक्त या तीनही उपासना प्रवाहांना व्यापणारा दत्तात्रेयांचा प्रभाव सर्व भारतभर गाजत आहे. आपल्या महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, सांप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे. महानुभाव, नाथ, वारकरी आणि समर्थ संप्रदायात दत्तात्रेयांविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. दत्तात्रेय हे विष्णूचे अंश असून अत्रि अनसूयेचे पुत्र आहेत; परंतु ते अयोनिसंभव आहेत. महाभारतात वन, शांति व अनुशासन पर्वात दत्तात्रेयांनी सहस्त्रार्जुनावर कृपा केल्याचा उल्लेख आढळतो.
गुंतागुंतीचा आणि रहस्यमय दत्तसंप्रदाय – हा संप्रदाय बराचसा अगम्य, काहीसा गुंतागुंतीचा आणि तितकाच रहस्यमय आहे. वास्तविक उत्तर भारत हा वैष्णवपंथी असून दक्षिण भारत शैवपंथी मानला जातो. या दोन्ही पंथांचा समन्वय दत्तसंप्रदायात झालेला दिसून येतो. या संप्रदायाची मुळे जरी महाराष्ट्रात रुजलेली असली तरी गुजरात, कर्नाटक व आंध्रमध्येही दत्तोपासना मोठ्याप्रमाणात विस्तारलेली आहे. सौराष्ट्रातील जुनागढजवळचे ‘गिरनार’ हे या संप्रदायाचे प्राचीन स्थान असून जैन, मुस्लिम, हिंदू, बौद्ध संस्कृतींचा समन्वय असलेल्या या जागी दत्तात्रेयांचे मूळ स्थान आहे.
दत्तात्रय- नाथ संप्रदाय
श्री नवनाथ - श्री दत्तात्रेय हे अवधूत योगी असून नाथसंप्रदाय हा ‘अवधूत पंथ’ आहे.
दत्तात्रेय आणि नाथसंप्रदाय – दत्तात्रेय हे अवधूत योगी असून नाथसंप्रदाय हा ‘अवधूत पंथ’ आहे आणि एवढ्या एकाच गोष्टीवरून दत्तात्रेयांचा आणि नाथसंप्रदायाचा आत्मीय संबंध सिद्ध होऊ शकतो. परमप्राप्तीसाठी योगसाधनेचा स्वीकार आणि गुरुसंस्थेची महनीयता ही दत्तस्वरूपातील दोन मोठी वैशिष्ट्ये नाथसंप्रदायाच्या सिद्धांतात आणि साधनेत अनुस्यूत आहेत. नाथसांप्रदायिकांच्या कल्पनेनुसार दत्तात्रेय हा योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्ताचे महिमान गायिलेले आहे. गिरनार हे विख्यात दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथसंप्रदाय यांच्या अनुबंधाचे जागते प्रतीक आहे. सातशे वर्षांपूर्वी दत्तात्रेयाचा जयजयकार नेपाळपर्यंत पोचविणारा संप्रदाय म्हणून दत्तोपासनेच्या इतिहासात नाथसंप्रदायाचे स्थान महनीय आहे.
नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभुंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.
गुरुदेव दत्त – दत्तसंप्रदायाचे उपास्य दैवत असलेले ‘दत्तात्रेय’ हे गुरुदेव असून त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. ‘श्रीगुरुदेवदत्त’ हा त्यांचा जयघोष आहे. काही साधकांना थेट दत्तगुरूंकडूनच बोध किंवा उपदेश झाला आहे.
विविध सांप्रदायिक ग्रंथ – ‘त्रिपुरारहस्या’ चा ‘ज्ञानखंड’ (दत्त-भार्गव संवाद), ‘दत्तप्रबोध’, ‘दत्तमाहात्म्य’ या ग्रंथांत दत्तसंप्रदायाचे तत्त्वज्ञान ग्रंथित झाले आहे. ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ संप्रदायाच्या आचारधर्माचे विवरण करणारा असून ‘अवधूत गीता’, ‘जीवन्मुक्तगीता’, ‘गुरुगीता’ या ग्रंथातही संप्रदायाचे सिद्धांत सविस्तर विशद करून सांगितले आहेत.
सगुणोपासक व गुरुभक्तिप्रधान – दत्तसंप्रदाय हा सगुणोपासक व गुरुभक्तिप्रधान असल्यामुळे दत्तोपासक दत्तात्रेयाच्या सगुण साक्षात्कारासाठी कठोर अनुष्ठानाचे आचरण करतात. इतकेच नव्हे, तर कायाक्लेश आणि आत्मक्लेशावरही त्यांचा भर असतो. त्यांनी दत्तात्रेयांचे सगुण रूप मानले असले तरी बऱ्याच ठिकाणी मूर्तीऐवजी दत्तात्रेयांच्या पादुकांचे पूजन केले जाते. दत्तात्रेयांचे चोवीस गुरू दत्तसांप्रदायिकांनीही मान्य केले आहेत. ‘जो जो जयाचा घेतला गुण । तो तो म्यां गुरू केला जाण ।’ असे एकनाथांनी म्हटले असून भागवतकारांनी या चोवीस गुरूंचा उल्लेख ज्या श्लोकात केला आहे तो असा –
पृथिवीवायुराकाशमाषोऽग्निधन्द्रमा रवि: ।
कपोतोऽ जगर: सिन्धु: पतङ्गो मधुकृत्ग्ज: ॥
मधुहा हरिणी मीन: पिङ्गला कुररोऽर्भक: ।
कुमारी शरत्कृरसर्प ऊणनामी सुवेशकृत: ॥
श्री दत्त संप्रदाय व भगवान श्रीनृसिंह
भगवान महा विष्णूचे जे दशावतार सांगितलेत त्यापैकी चतुर्थ आवेश अवतार म्हणजे नृसिंह अवतार. भगवान नृसिंह हे दत्त संप्रदायात उपसले गेलेले दैवत आहे. भागवंनृसिंहाचा अवतार शनिवारी झाला म्हणून नृसिंह उपासनेत शनिवारला अनन्य साधारण महत्व आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती या दोनीहि दत्तवातारी सत्पुरुषांचा जन्म दिवस शनिवरीच आहे. त्यामुळेच वाडीची वारी शनिवारी मानतात. तेथील नित्यक्रमातील पदात "द्वादशी, शनिवार करीत । वारी पाडवा" असा उल्लेख आढळतो. दत्तप्रभु आणि भगवान नृसिह दोघांचाही जन्म चातुर्दशीचा व दोनीही अवताराचे प्रकठिकरण भक्ती पोटीच आहे. एके ठिकाणी प्रल्हादाची तर दुसरीकडे अत्रि-अनुसया नरसिंह अवतार ज्यांच्यासाठी झाला त्या भाक्तोत्तम प्रल्हादाला दत्त प्रभुनीच उपदेश केला असा उल्लेख श्रीमद भागवत ग्रंथात आहे. श्रींपाद श्रीवल्लभचारितामृत ग्रंथात नृसिंह व औदुंबराच्या वृक्षाचा उल्लेख आहे. ज्या खांबातून श्री नृसिह प्रकट झाले तोही औदुंबर वृक्षाचाच होता. कालांतराने त्यास पालवी फुटून प्रल्हादजी त्याचीच पूजा करीत. दत्तप्रभुनी त्याऔदुंबर वृक्ष।स आशिर्वचंन देऊन "तुझ्यासाठी मी सूक्ष्मरूपांने तुझ्या ठिकाणी वास करिन व कलियुगात तुझ्यातून प्रकठलेल्या नृसिहाचे नाव धारण करील". म्हणून त्यांनी नरहरी तथा नृसिह सरस्वती असे नाव धारण केले. नृसिह यांनी दुष्टांचा नाश केला तर गुरु महाराजांनी दुष्टबुद्धीचा नाश करून समाजात अस्तिकता वाढविली. वेदतुल्य श्री गुरुचरित्रात ४ ठिकाणी श्री नृसिहाचा उल्लेख आढळतो. श्री नृसिह सरस्वती स्वामी मंजरीक क्षेत्रि राहणाऱ्या श्री माधवारण्य नामक नृसिंहभक्त संन्यासी यांस नृसिंह रूपात दर्शन दिले. पंधराव्या अध्यायात पवित्र तिर्थ क्षेत्रात भीमा अमरजा संगमावर नृसिंह तिर्थाचा उल्लेख आहे. कृष्णाकाठा वरील कोळे नृसिंहपूरचा उल्लेख श्री गुरूंनी आवर्जून केलेला आहे. १९ व्या अध्यायात अशी ओवी आहे,
अवतार आपण तयांचे । स्थान आपले असे साचे । शांतवन करावया उग्रत्व।चे म्हणून वाद औदुंबरीं ।। याकारणे श्रीगुरुमुर्ती । नृसिंह मंत्र उपासना करिती । उग्रत्वाची करावया शांति । औदुंबरीं वास असे।।
यावरून हे स्पष्ट आहे की श्रीगुरु नृसिहसरस्वती नृसिंह मंत्राचीच उपासना करीत. चोविसाव्या अध्यायातील श्री त्रिविक्रम भारती हे देखील नृसिंहाचे उपासक होते. येथे आणखीन एक संदर्भ आहे की नृसिंह वाडी ते गाणगापूर प्रवासात विजापूर येथील अतिप्राचीन नृसिंह मंदिरात श्री गुरूंचा मुक्काम होता. आजही हे स्थान अतिशय जागृत मानले जाते. ते केवळ स्वामींमुळेच. गाणगापुर मध्येही निर्गुण मठाचे जागी एक गुहेत श्रीगुरुनि नृसिह यंत्राची स्थापना केली होती व तेथेच श्रीगुरु ध्यान धारणाकरीत. काही काळ त्याची पूजा सिद्ध सरस्वती वभास्कर ब्राम्हण करीत होते. नंतर ती गुहा बंद करण्याची गुरु आज्ञा झाली. प्रातः स्मरणीय दत्तावतार श्री स्वामी समर्थ यांचे जन्मनाव 'नृसिंहभान'. प्रसंगी तेही नृसिहासारखे उग्ररूप धारण करीत. श्री दत्त संप्रदायातील अनेक सत्पुरुषांचं कुलदैवत भगवान नृसिहच असल्याचे त्यांचे चरित्रातून पाहण्यास मिळते. एके ठिकाणी प्रल्हादाची तर दुसरीकडे अत्रि-अनुसया नरसिंह अवतार ज्यांच्यासाठी झाला त्या भाक्तोत्तम प्रल्हादाला दत्तप्रभुनी उपदेश केला असा उल्लेख श्रीमद भागवत ग्रंथात आहे.
या शिवाय भाक्तोत्तम प्रल्हादाला दत्तप्रभुनी उपदेश केला हा प्रसंग आणि तो उपदेश श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांच्या 'श्री दत्तलिलामृताब्धिसार' या ग्रंथात षष्ठलहरी या अध्यायात आला आहे. या ओव्या अश्या आहेत,
नृसिंहाचा पूर्ण भक्त । प्रल्हाद न होता मुक्त । सह्याद्रीं ये तो हिंडत । दत्त पाहे ।। २ ।।
भोग नासोनी जो पुष्ट । पुसे त्याला कसा लठ्ठ । दिससी तूं ही मी गोष्ट । ऐकूं इच्छीं ।। ३ ।।
ऐसें प्रल्हादाचें वाक्य । ऐकोनीही करी हास्य । दत्त वदे रे रहस्य । हें तूं ऐक ।। ४ ।।
श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊ या.
श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश
कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.
श्रीनृसिंहसरस्वती स्वामी
दत्तात्रेयांचा दुसरा अवतार. कारंजा (लाड) जि. वाशिम या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे-त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.
श्री स्वामी समर्थ
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य श्री यशवंत महाराज देवमामलेदार, कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
।। श्री स्वामी समर्थ ।।
नित्य स्मरावे स्वामींना
दत्तस्वरुप ते निरंकार
रोज विसरावा तो अहंकार
काम, क्रोध करतो सर्वनाश
अती लोभात होतो विनाश
हृदयात ठेवा भाव निस्वार्थ
अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ
मितभाषी असतो सदासुखी
व्येर्थ बोलेल तो होईल दु:खी
समर्थ नामास रोज स्मरावे
माय बापास कधी न भुलावे
मनुष्य जन्म मिळतो एकवार
स्वामी नामात सुख ते अपरंपार
।। श्री स्वामी समर्थ ।।
श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री
ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती इ. अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी
श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे, असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त माहात्म्य, दत्तपुराण इ. अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वाना आणि विशेषत: महिलांना पारायण करण्यासाठी ‘द्विसाहस्त्री गुरुचरित्र’ आणि ‘सप्तशती गुरुचरित्र’ असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज इ. अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठय़ा प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला आहे.
श्रीमाणिकप्रभू
बिदरजवळील हुमणाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत. श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे.
श्री दत्तनाथ
उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन-विष्णू-हसकमलासन-अत्री-दत्तगोपाळ-वेडा नागनाथ-निबंजनाथ- जनार्दन – एकनाथ-दत्तभाऊ -केशवबुवा-अंतोबादादा-दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार-प्रसार केला आहे.
श्री नवनाथ संप्रदाय
नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.
नाथपंथीयांची वेशभूषा
१) भस्म- भस्माला विभूती असेही म्हणतात. काही ठीकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ते काही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावले पाहीजे. सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे. यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्माकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू काही भस्म देत आहे. शिवाय भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्तिकेंद्रेही जागृत होतात. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केल्याचे दिसते.
२) रूद्राक्ष- हे एका झाडाचे फळ असून त्यास रूद्र अक्ष म्हणतात. शिवाचा नेत्र असा शब्दाचा अर्थ आहे. जपासाठी रूद्राक्ष माळ वापरतात. लक्ष्मी स्थिरावणे, शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रूद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात. शिवाय रूद्राक्षांचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत.
३) मुद्रा- मुद्रा हे नाथपंथातील एक महत्वाचे साधन आहे. ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यात घातली जाते. ही बहूदा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात.कारण ते कानात छिद्र पाडून ती धारण केलेली असते.
४) कंथा- कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र. यालाच गोधडी अथवा गुदरी असेही नाव आहे, आपल्या वाकळेसारखे चिंध्यांचे हे बनविलेले असते.
५) मेखला- सूमारे २२ ते २७ हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून, नाथ योगी ही कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात. ही कटिबंधिनी मोळ्याच्या दोरीची करतात. कधी ही मेंढीच्या लोकरीचीही असते. मेखला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते.
६) हस्तभूषण मेखली- बारीक सुतळीएवढ्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात. चार फुटांच्या या मेखलीवर रूद्रमाळ बांधलेली असते.
७) शैली- ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते. शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो.
८) शृंगी- जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची बनवलेली ही एक प्रकारची शिट्टीच होय. शृंगी बांधलेले जानवे ''शिंगीनाथ जानवे'' म्हणून ओळखले जाते. शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे एक इंच असते. भिक्षेचा स्वीकार केला, की शिंगी वाजविण्याचा प्रघात आहे.
९) पुंगी- ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनविलेली असते. साधु दारासमोर भिक्षेसाठी आला, की पुंगी वाजवितो. पुंगी शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे ७ ते ८ इंच लांबीची असते पुंगी डाव्या खांद्यात अडकवून ठेवलेली असते.
१०) जानवे- नाथपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे. ते लोकरीच्या पाच -सात पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते चकतिच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रूद्राक्ष बसविलेला असतो.त्याच्या खालीच शृंगी अडकवलेली असते. हा गोफ म्हणजेच नाथपंथी जानवे होय.
११) दंडा- दिड हात लांबीची ही एक काठी असते.हीस गोरक्षनाथ दंडा असे नांव आहे. नाथपंथी साधूच्या हातात ती असते.
१२) त्रिशूळ- साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला, त्रिशूळ वापरतात.नवनाथश्रेष्ठी त्रिशूळधारी होते सामरस्यसिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूळधारी होत.
१३) चिमटा- अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो. याची लांबी साधरणतः २७, ३२, ५४, इंच अशी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात पुन्हा नऊ लहान कड्या असतात. नाथपंथीयांची चाल या विशिष्ट नादावर व धुंदीत असते. अग्निचे उपासक नाथपंथी धुनी सारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात.
१४) शंख- शंखास फार पुरातन काळापासून महत्व आहे. भगवान विष्णूंच्या हातातील शंख हेच दर्शवितो. भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात. शंखनाद हा ओंकाराचा प्रतिक मानला आहे.
१५) खापडी (खापरी)- नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात. हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी. कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा कांशाची बनवितात.
१६) अधारी- लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसवून हे एक आसनपीठ तयार केलेले असते. कोठेही बसण्यासाठी योगी याचा उपयोग करतात.
१७) किंगारी- हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात.
१८) धंधारी- हे एक लोखंडी वा लाकडी पटट्यांचे चक्र असून त्याच्या छीद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा ओवलेला असतो. याचा गुंता सोडविणे अतिशय अवघड असल्याने त्याला "गोरखधंधा" असेही नांव आहे. गुरूकृपेने हा गुंता सुटला तर संसारचक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे.
१९) कर्णकुंडले - जो कानफाट्या नावाचा संबंध नाथपंथाशी आहे. तो कानांस छिद्रे पाडून त्यात कुंडले अडकवितात. कुंडल धातुचे किंवा हरणाच्या शिंगाचे किंवा सुवर्ण गुंफित असते.
नवनाथ (९ नारायण)
कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.
मत्स्येंद्रनाथ
अरे हा कविनारायण । च्छोदरी पावला जनन।।
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम । जगामाजी मिरवी की ।।३३।। (नवनाथ ग्रंथ अध्याय १, ओवी ३३ वी)
एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातिरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.
शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातिरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.
गोरक्षनाथ
तरी आता न लावी उशिर । हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।।
ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र । बाळ शब्द उदेला ।।७५।। (अध्या ९ वा, ओवी ७५)
मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. "अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये', असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाशानाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे.
नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून ३ किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे.
गहिनीनाथ
तेंगे करूनी पंचभूत। दृश्यत्त्व पावले संजीवनी अर्थ।।
करभंजन ते संधीत । प्रेरक झाला जीवित्त्वा ।।६१।। (अध्याय १०, ओवी ६१)
कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.
जालिंदरनाथ
विप्रो हाते सलील बाळ ते जातें। रक्षता स्पर्शता लागे हाते।।
दृष्टी पाहता बाळाने । जुळवत रुदन करी ।।११२।। (अध्याय ११ ओवी ११२)
पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.
कानिफनाथ
त्वरे येऊन कर्णदृसी। दृष्टी पाहे ब्रह्मचारी ।
सहज करुनी उभयकरी । नमस्कारी प्रेमाणे ।।११५।। (अध्यय १२ वा, ओवी ११५)
बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते.
भर्तरीनाथ
भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरविले शकलांत ।।
क्षिकेचे मोहळ व्यक्त । तेही एकांग जाहले ।।२७।। (अध्याय २४, ओवी २७)
भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून ३१०३ वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगावफाट्यावरून जाता येते.
रेवणनाथ
पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेय ।।
सहज चाली पुढे चालत । बाळ दृष्टी देखिले ।।२१।। (अध्याय ३४, ओवी १२१)
ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (वीटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून १० कि. मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.
रेवण नाथ व दत्तगुरु
"दत्त प्रभू मजवर कृपा करा व मला सनाथ करा" या विनंतीवरुन दत्तगुरुंनी रेवणांस सिध्दी आशिर्वाद रुपाने दिली. दत्ताने दिलेल्या सिध्दीला आवाहन करुन रेवणने धान्यांच्या राशींचे सोन्यात रुपांतर करुन सिध्दीची प्रचिती घेतली.या सिध्दीच्या जोरावर गावांतील लोकांना रेवणने तृप्त व मालामाल करुन देऊन आपला भविष्यातील जनकल्याणाचा मार्गाची निवड केली.
"ब्रह्मदेव सृष्टीचा रचनाकर्ता आपल्या पौरुष्याच्या अंशापासून हजारो ऋषी तयार झाले. त्यावेळी त्याचे तेज थोडेसे रेवा नदीच्या काठी पडले होते. पूर्व ईश्वरी संकेताप्रमाणे नवनारायणांपैकी चमस नारायणानी तेथे प्रवेश केला व एका बालकाचे रूप धारण केले. जल प्रवाहाबरोबर रेवा नदीतून वाहत वाहत आलेले हे बालक किनाऱ्यावर लागले अन् ते मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्यावेळी सहनसारूक नावाचा एक कुणबी तिथं पाणी आणण्यासाठी आला असता त्याने ते सुंदर बालक पहिले. बाळ रडत होते. सहनसारुकचे मन कळवळले. त्याने त्या निराधार अजाण बालकाला उचलून आपल्या घरी आणले व पत्नीकडे दिले. तिने ते बाळ छातीस लावले व नंतर आपल्या मुलाशेजारीच तिने त्याला पाळण्यात झोपविले. एवढे सुंदर बालक ते ही रेवातीरी सापडले म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव रेवण असे ठेवले.
रेवण खरच आज्ञा धारक मुलगा होता. तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करे. एक दिवस पहाटे रेवण बैलांना घेऊन शेतात जात असताना श्री दत्तात्रय महारांजांची व त्याची भेट झाली. त्यावेळी दत्त महाराजांनी एक नजरेत हा बालक म्हणजे पूर्वीचा चमस नारायण आहे हे ओळखले. त्या छोट्या स्पर्शानेही बाळ रेवणास ज्ञानप्राप्ती झाली. त्याने हे "दत्त प्रभू मजवर कृपा करा. मला सनाथ करा" अशी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या दत्त प्रभूंनी रेवण बाळास एक सिद्धी भेट दिली. ही सिद्धी रृतुझ्या इच्छा पूर्ण करील असा आशीर्वाद ही दिला. आपल्यास प्राप्त झालेली सिद्धी खरच काय करू शकते हे पडताळून पाहण्यासाठी रेवण त्या महिमा सिद्धीला आवाहन करून म्हणाला, “ही शेतातील धान्याची रस सोन्याची करून दाखव.” त्याबरोबर सिद्धीने आपली कृपा नजर फिरवताच धान्याची रास सोन्याची झाली. मग काय ! या सिद्धीच्या बळावर रेवण गावातल्या गोर-गरिबांना यथेच्च इच्छा भोजन देऊ लागला. त्यामुळे अवघ्या पंचक्रोशीत हा बालक सिद्ध पुरुष या विशेषणाने ओळखला जावू लागला.
एक दिवस मच्छिंद्रनाथ हे त्या गावात आले. तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाची माहिती कळली. तसेच मच्छिंन्द्रनाथांच्या हे पण लक्षात आले की हा रेवण बाळ म्हणजेच चमस नारायण आहेत. तेव्हा मच्छिन्द्रनाथांनी एक गम्मत केली. त्यांना आपल्या योग सामर्थ्याने वाघ-सिंह यासारखे पशु यांना आपला मुळचा हिंस्र स्वभाव विसरून मवाळ प्राण्यांप्रमाणे जवळपास खेळवू लागले. तर पक्षी त्यांच्या अंग-खांद्यावर खेळू लागले. हे पाहून लोक मोठे चकित झाले. त्यांनी मछिंन्द्रनाथांचा प्रताप रेवणास सांगितला. रेवण बाळाने स्वत: तेथे जावून प्रत्यक्ष ते दृश्य पाहून खाती करून घेतली. घरी येऊन त्याने सिद्धी आवाहन केले. "मला अशी सिद्धी प्राप्त करून दे" अशी मागणी केली. तेव्हा तेथे प्रकट झालेल्या सिद्धीने सांगितले की ही गोष्ट केवळ एक ब्रह्मयोगीच करू शकतो. तुला ते ब्रह्मज्ञान केवळ दत्त प्रभूंच्या कृपेनेच प्राप्त होईल. हे कळताच रेवण तयार झाला. त्याने त्याजागी पहिली दत्तभेट झाली. त्या स्थानावर दृढ निश्चयाने बैठक मारून ध्यान, तपसाधना चालू केली.
मच्छिंद्रनाथ समवेत दत्त प्रभूंनी रेवण बाळाला मंत्रोपदेश दिला. त्याला नाथ पंथाची दिक्षा दिली. सर्व विद्या शक्ती यात निपुण करून त्यास ब्रह्मज्ञानी बनविले. चमस नारायणाचा प्रथम रेवण आणि नंतर दत्त-मच्छिंद्रनाथ कृपेने रेवणनाथ झाले. भक्ति प्रचाराच्या नाथपंथ कार्यात त्यांचाही सहभाग होऊ लागला.
नाथपंथीय योगींची ज्ञान, भक्ति व श्रद्धा ही लोकमानसात वाढवत नवनाथांची लोकोद्धाराचे कार्य चालू केलेले होतेच. आणि एक दिवस गावोगाव भ्रमंती अन भिक्षाटन करत रेवणनाथ हे माणदेशातील विटे ग्रामात आले. त्या गावामध्ये सरस्वती नावाचा एक ब्राह्मण अन त्याची पत्नी जान्हवी ही दंपती राहत होती. त्यांना संताने झाली पण ती टिकली नाही. जान्हवीला सहा पुत्र झाले पण ते दहा दिवसापेक्षा जास्त दिवस टिकले नाहीत. देवाची कृपा म्हणून की काय सातवा पुत्र मात्र जवळ जवळ दहा वर्षाचा होईपर्यंत वाढला. त्या आनंद प्रीतर्थ्य सरस्वती ब्राह्मण आनंदाने ब्राह्मण भोजन देत होता. नेमके त्याचवेळी रेवणनाथ हे त्यांचे घरी आले. सरस्वती ब्राह्मणाने त्यांचे उचित आदरातिथ्य केले. भोजन दिले. इतकेच नव्हे तर नाथजी जेव्हा जाऊ लागले तेव्हा त्या दम्पतीने त्यांना त्या रात्री आपल्या घरी मुक्काम करण्याची विनंती केली. रात्री ब्राह्मण रात्री त्याचे पाय दाबून देत बसला. पत्नी मुलासह आत झोपली. पण नेमके मध्यरात्री दैवाने डाव साधला. बाळ मरण पावला. तिला हे कळताच माय बिचारी स्फुंदू स्फुंदून रडू लागली. नाथांची झोपमोड होऊ नये म्हणून सरस्वती ब्राह्मण जगाचा हलला नाही. का ती ब्राह्मणी पण आपल्या मनाच्या दु:खाला मोकळी वाट करून देऊ शकला नाही.
सकाळी नाथांना जाग आली ब्राह्मण पत्नीचे रडणे ऐकूनच. नाथांनी झाल्या प्रकारची नीट चौकशी केली आणि आपण या घरांत असताना इथे यमदूत आलेच कसे? त्यांनी बालकाचे प्राण कसे काय हरण केले? याचे रेवणनाथांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांना रागही आला. रेवणनाथांनी त्या दंपतीला बाळाचे कलेवर सांभाळण्यास सांगून बालकाचे प्राण परत आनायालाते यमलोकी गेले. यमाने नाथांना सांगितले, की हे काम माझे नाही ही शिव आज्ञा आहे. तुम्ही कैलासावर जा व शिवाकडून बाळाचे प्राण आणा! यमलोकीहून रेवणनाथ कैलास पर्वतावर गेले. तेथे ही शिव गणांनी त्यांना अडवले. नाथांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांची दयनीय अवस्था केली. वार्ता मिळताच स्वत; शंकर युद्धाला आले. रेवणनाथांनी वाताकर्षण मंत्र म्हणून वायुरोधन केले त्यामुळे शिव-अष्ट भैरव, शिवगण या साऱ्यांचेच प्राण कंठाशी आले.
मग वैकुंठाहून भगवान विष्णू धावत आले. त्यांनी रेवण नाथास आवरले व आपल्याकडील सरस्वती ब्राह्मणांचे सातही बालकांचे प्राण परत देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे रेवणनाथ शांत झाले. त्यांनी शिवांसह सर्वांचे प्राण वाचवले. भगवान विष्णूंनी आदिनाथांशी भेट घडवली. त्यांना आशीर्वाद देवविले. रेवण नाथांना घेवून विष्णू वैकुंठी गेले. त्यांनी सातही बालकांचे प्राण परत आणले.
वटसिद्ध नागनाथ
असो वटवृक्ष पोखरांत । अंड राहिले दिवस बहूत ।।
अवि होत्र नारायण त्यांत । ईश्वर सत्ते संचारला ।।९२।।
दिवसेंदिवस अंडात। वाडी लागले जीववंत ।।
देह होता सामर्थ्यवंत । भगन लागे अंड ते ।।९३।।
त्यांत तलवर पोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।।
निढळवाणी कोण त्यांते । रक्षणाते नसेची ।।९४।। (अध्याय ३६, ओवी ९२, ९३, ९४)
ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून २५ कि. मी. अंतरावर चाकूर तालुक्यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.
चरपटीनाथ
या परी बहुता दिवशी । ईश्वर आता अवतार ।।
विप्पलायन त्या रेतासी । नारायण संचारला ।।२१।। (अध्याय ३८, ओवी २१)
एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो.
या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या ८४ आहे. या शिष्यांनाच ८४ सिद्ध असे म्हणतात
श्री रामदासी आणि श्रीधरस्वामी परंपरा
श्रीधर स्वामी
समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.
श्री महानुभव पंथ
महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.
वारकरी संप्रदाय
भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती केलेली आहे.
दत्त देवता गेली दीडहजार वर्षे क्रमश: विकास पावत आली आहे. आज सर्वमान्य झालेले दत्तस्वरूपही सदैव स्थिर राहील, असे सांगता येणार नाही. भक्तांच्या अनुभूतीनुसार आणि चिंतकांच्या प्रतिभेतून उद्भवणाऱ्या कल्पनांनुसार त्या रूपात कदाचित आणखीही भर पडत जाईल. दत्तावताराची ऐतिहासिक कामगिरी, तर खचितच फार मोठी आहे; परंतु दत्तोपासनेच्या व्यापक व उदार अशा समन्वयात्मक दृष्टीमुळे जीवनाच्या चिरंतन व शाश्वत मूल्यांवर भर दिल्यामुळे ही उपासनाप्रणाली व तिचे तत्त्वज्ञान आजही नितांत अनुकरणीय आहे व पुढेही तसेच राहील यात तिळमात्रही संशय नाही. जोपर्यंत जगात माणूस तापत्रयांनी त्रस्त राहील व जोपर्यंत त्याला स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव व बोचणी राहील तोपर्यंत दत्तात्रेय अज्ञान-अंधकारात त्याला दीपस्तंभाप्रमाणे पथप्रदर्शन करीत राहतील.
संत तुकारामांची दत्तभक्ती
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना, श्रीदत्तात्रेयांनी भामा डोंगरावर, दर्शन दिले. महाराजांना खूप आनंद झाला. महाराजांनी भावनावेगाने श्रीदत्तात्रेयांचे चरण घट्ट धरले. आनंदाश्रूंनी दत्तगुरूंची पाद्यपूजा केली. त्या अपूर्व अशा सगुण साकार दर्शनाने तुकाराम महाराज तृप्त झाले. महाराजांनी श्रीदत्तात्रेयांच्या या साक्षात्कारी दर्शनाला आपल्या अभंगओळीमधून अक्षररूपात साकार केले. महाराजांच्या मुखातून अभंग पाझरू लागला.
तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत।।
काखें झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचें स्नान।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभूति सुंदर।।
शंख चक्र गदा हातीं । पायी खडावा गर्जती।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार।।
तुकाराम महाराज म्हणतात, `या भामा डोंगरावरच्या विस्तीर्ण पठारावर पठारावर श्रीदत्तात्रेयांचे अभूतपूर्व दर्शन झाले. तीन मुखांचा, सहा बाहू असलेला, काखेत झोळी अडकवलेल्या अवधुत दत्तगुरुंनी मजवर कृपेचा मेघ धरला. मी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्यांच्या पुढे चार श्वान होते. जान्हवी नदीमध्ये स्नान करून शुचीभूर्त झालेल्या दत्तात्रेयांच्या माथ्यावर जटाभार शोभून दिसत होता. सर्वांगावर विभूती सुंदर शोभून दिसत होती. हातामध्ये शंख, चक्र, गदा ही आयुधे होती. पायात खडावा होत्या. दिशांचे वस्त्र पांघरलेल्या दिगंबर दत्तात्रेयांना मी वारंवार नमस्कार करतो. त्याच्याच नामात गर्क होतो.’ श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना महाराजांच्या साक्षात्कारी वाणीला बहर आला होता. दत्तात्रेयांनी सुंदर दर्शन दिले आणि तो परमानंदाचा सोहळा आपल्या दृष्टीत साठवत असतानाच दत्तात्रेय अचानकपणे गुप्त झाले. महाराज व्याकूळ झाले. त्यांनी दत्तात्रेयांचा धावा करायला सुरुवात केली.
नमन माझें गुरुराया । महाराजा दत्तात्रेया ।। तुझी अवधूत मूर्ति । माझ्या जीवाची विश्रांती ।।
जीवींचे साकडे । कोण उगवील कोडें ।। अनसूया सुता । तुका म्हणे पाव आतां ।।
दत्तगुरुंची आळवणी करताना महाराजांचा स्वर आकाशव्यापी झाला. दत्तात्रेय लुप्त झाले याचे दुःख त्यांच्या स्वरांमधून प्रकट होऊ लागले. त्यांना श्रीदत्तगुरुंच्या दर्शनाची विलक्षण ओढ लागली. महाराजांचा व्याकूळ स्वर ब्रह्मांडभर घुमू लागला. त्या स्वरांनी अवघा भामा डोंगर चंद्रप्रकाशासारखा उजळून निघाला. दत्तगुरुंनी आपल्या भक्ताची आर्त साद ऐकली आणि त्यांनी आपल्या या लाडक्या भक्ताला पुन्हा दर्शन दिले. दत्तात्रेयांनी प्रकाशरूपात आपले दर्शन महाराजांना घडवले होते. श्री दत्तगुरु आपल्या प्रत्येक भक्ताला आपले कृपावैभव अर्पण करतात. श्रीगुरुचरित्राच्या मंगल पारायणाच्यावेळी जसा दत्तवर्णन करणारा संस्कृत श्लोक म्हणतात, तसाच तुकाराम महाराजांचा हा प्रत्यक्ष अनुभूती देणारा, स्वरूप वर्णन करणारा अभंग म्हटला तर मनामध्ये चंदनगंधासारखी विलक्षण लाट उसळते. तुकाराम महाराजांनी जशी श्रीदत्तगुरुंना साद घातली ती आर्तता प्रत्येक दत्तभक्ताच्या मुखातून प्रकट होणे आवश्यक असते. मन शांत झाल्यावर आणि दत्तगुरुंचे प्रत्यक्ष दर्शन घडण्यासाठी `श्रीगुरुचरित्राचे पारायण करावे. असा एक शुभसंकेत आहे. श्रद्धा आणि पावित्र्य दत्तात्रेयांचे निश्चितपणे दर्शन घडविते.
आनंद संप्रदाय
सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरु केलेला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म जन्मेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातून झाला होता असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना १०० पावले टाकल्यावर "श्री दत्त" असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बासवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू -विधी-अत्रि-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद व प्रेम भाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वांबरोबर व्यवहार करावा आणि सर्व विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे. याशिवाय नृसिंहसरस्वती आळंदी परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्री गुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा, इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्री दत्त संप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावानी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रफाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडीत आहेत.
संप्रदायाचे ग्रंथ
- श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.
- परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्नास खंडांची रचना केली.
- सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.
- अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
- अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.
- गोरक्षनाथ लिखित हिंदी रचनांचे संकलन गोरखबानी या ग्रंथात झाले आहे.
- मुकुंदराज या आद्य मराठी कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.
- महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.
- दत्तमहिमा गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.
- गुरुगीता
- दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.
- दासबोधाच्या रचनेसाठी रामदास स्वामी यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.
संबंधित ग्रंथ
श्रीगुरुचरित्र- लेखक सरस्वती गंगाधर
दत्तप्रबोध- कावडी बुआ
दत्तमाहात्म्य- श्री टेंबे स्वामी
गुरुलीलामृत-
१) वामनबूंवा वामोरीकर
२) श्री विद्वान्स
नवनाथभक्तिसार
नवनाथ सार- लेखक धुंडिसुत मालू
दक्षिणामूर्ती संहिता
दत्तसंहिता- श्री दत्तात्रेय
ग्रंथसंपदा व स्तोत्रे
ग्रंथ व ग्रंथाचे रचनास्थळ
१) द्विसाहस्त्रीश्रीगुरुचरितम्सटीकम् (मूळ १८८९)- माणगांव, महाराष्ट्र
चूर्णिका (टीका १८९९)- प्रभास वद्वारका, गुजरात.
२) श्रीदत्तपुराण (संस्कृत) (१८९२)- ब्रम्हावर्त, उत्तरांचल
३) नर्मदालहरी (१८९६)- हरिद्वार, उत्तरांचल
४) श्रीदत्तलिलामृताब्धिसार (मराठी) (१८९७)- पेटलाद, मध्यप्रदेश
५) कूर्मपुराणाचे देवनागरीत लिप्यंतर (१८९८)- तिलकवाडा, गुजरात
६) अनसूयास्तोत्र (१८९८)- शिनोर, गुजरात
७) श्रीदत्तपुराणटीका (१८९९)- सिद्धपूर, गुजरात
८) श्रीदत्तमाहात्म्य व त्रिशति गुरुचरित्र (मराठी) (१९०१)- मपत्पूर, मध्यप्रदेश
९) समश्लोकीगुरुचरित्र (१९०३)- ब्रम्हावर्त, उत्तरांचल
१०) लघुवासुदेवमननसार (मराठी) (१९०३)- ब्रम्हावर्त, उत्तरांचल
११) सप्तशतिगुरुचरित्रसार (मराठी) (१९०४)- ब्रम्हावर्त, उत्तरांचल
१२) श्रीकृष्णालहरी (५१ श्लोक) (१९०५) श्रीगुरुस्तुति स्तोत्र- गाणगापूर, कर्नाटक
१३) दत्तचंपू व करुणात्रिपदी (१९०५)- नरसी, महाराष्ट्र
१४) दव्यर्थीषडाननस्तोत्र व कुमारशिक्षा (१९०७)- हंपी, कर्नाटक
शिक्षात्रयम् (संस्कृत) युवाशिक्षा (१९०८)- मुक्त्याला, आंध्रप्रदेश
वृद्धशिक्षा (१९०८)- मुक्त्याला, आंध्रप्रदेश
१५) गुरुसंहिता (समश्लोकी गुरुचरित्र) (१९०७)- तंजावर, आंध्रप्रदेश
१६) स्त्रीशिक्षा (मराठी) (१९०८)- मुक्त्याला, आंध्रप्रदेश
१७) गंगेचीस्तुती (१८९६)- हरिद्वार, उत्तरांचल
१८) नर्मदास्तुती- नेमावर, मध्यप्रदेश
१९) अभंग-मित्रमित्रभांडती- चिखलदा, मध्यप्रदेश
२०) सिद्धसरस्वतीस्तुती- सिद्धपूर, गुजरात
२१) कृष्णावेणीपंचगंगा स्तोत्र- मंडलेश्वर, मध्यप्रदेश
२२) अखंड आत्माअविनाशी दत्तस्तोत्र- गाणगापूर, कर्नाटक
२३) साकारतास्तोत्र (१९०६)- बडवानी, मध्यप्रदेश
२४) कृष्णालहरीसंस्कृत टिका- तजांवर, तमिळनाडू
२५) गोदावरीस्तुती- सप्तगोदावरी, आंध्रप्रदेश
२६) वैनगंगास्तोत्र (१९०९)- पवनी, महाराष्ट्र
२७) भूतपिशाचस्तोत्र- गुर्लहोसूर, कर्नाटक
२८) तुंगभद्रास्तुती, त्रिपुरांतकेश्वर स्तोत्र (१९१०)- हावनुर, कर्नाटक
२९) षट्पंचशिकावेदान्तपर स्तोत्र- हरिहर, कर्नाटक
३०) दत्तमहात्मन स्तोत्र- जैनापूर, कर्नाटक
३१) श्रीपादश्रीवल्लभ स्तोत्र (१९११)- कूरवपूर, कर्नाटक
३२) जगदंबास्तुती- तुळजापूर, महाराष्ट्र
श्री दत्तसंप्रदाय व उपनिषदे
उपनिषद: जगातला सर्वात प्राचीन ज्ञानसाठा असलेल्या उपनिषद वाडगमयात दत्तसंप्रदयाशी निगडित केवळ तीनच उपनिषदे आढळतात. आजवर ही उपनिषदे श्रीदत्त संप्रदायिकांना संस्कृत मध्ये उपलब्ध आहेत. ही उपनिषदे म्हणजे अवधुतोपनिषद, जाबालदर्शनोपनिष्द आणि दत्तात्रयोपनिषद या तीन उपनिषदातून श्री दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आणि मंत्र उपासना यावर उत्तम प्रकाश टाकला गेलेला आहे.
अद्वैतज्ञान दातारं योग विद्या विशारदम । राजयोगपरं भक्त्या श्रीप।दं सद्गुरुं भजे ।।
उपनिषदे हा वैदिक तत्वज्ञानाचा पाया. वेदांच्या शेवटच्या भागात ती आली आहेत, त्यामूळे त्यांना वेदान्त असेही म्हणतात. उपनिषद शब्दात 'उप' आणि 'नि' हे दोन उपसर्ग असून 'सद्' हा धातू आहे. सद् धातूचे बसणे, नाश पावणे, शिथिल करणे, जाणे इ. अनेक अर्थ आहेत त्या अर्थाना अनुरून प. प. जगतगुरु शंकराचार्यांनी उपनिषद शब्दाचे पुढील अर्थ दिलेले आहेत,
१) पूज्य सद्गुरुंच्या जावळ निष्ठापूर्वक बसून घ्यावयाची विद्या
२) जे मुमुक्षु या विद्येजवळ जाऊन तिचे निष्ठेने परिशिलन करतात, त्यांच्या संसार बीजाचा अविद्येचा ती नाश करते.
३) जी विद्या मुमुक्षूना ब्रम्हाजवळ नेऊन पोहोचवते ती. या सर्व व्याख्यातून उपनिषदे आत्मज्ञानाचा उपदेश करतात हे सिद्ध होते.
दत्तात्रेयांचा अवतार प्रामुख्याने अज्ञानी जिवांना आत्मज्ञान देऊन मुक्त करण्यासाठी आहे. शक्तिपात संप्रदायाचे सद्बगुरु श्री दत्तात्रेयाच आहेत त्यांनी आपले एक शिष्य "संस्कृती मुनी" याना जे ज्ञान दिले ते अवधुतोपनिषद आणि जाबालदर्शनोपनिष्द या मध्ये दिले असून दत्तात्रयोपनिषत हे भगवान नारायणांकडून भगवान ब्रह्मदेवाना मिळालेले मंत्र आहेत. पाहिल्यां दोनीत मुख्यत्त्वे ज्ञान असून तिसाऱ्यात उपासना आहे. दत्तसंप्रदायातील सुप्रसिद्ध व अत्यंत प्रभावी माला मंत्र दत्तात्रयोपनिशिदात आहे. जाबालदर्शनोपनिशिदात योगाच्या आठ अंगांचे विवेचन आहे. हे पातंजल योग दर्शनाहूंन बरेचसे वेगळे आहे. अवधुत उपनिषदात "अवधुत" असणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषांची लक्षणे दिलेली आहेत. नित्य साधनाबरोबर उपनिशीदांचा बोध झाल्यास मनोवृत्ती आत्म ज्ञानाला अनुकूल होऊ लागते.
ब्रिटिश कालीन श्री दत्त प्रतिमा असलेली चांदीची नाणी
ब्रिटिश काळांत ईस्ट इंडिया कंपनीच्या १८३५ सालीच्या नाण्यावर श्री दत्तांचे चित्र होते. श्री दत्तात्रेयाच्या प्रतिमेची ही नाणी चलनात होती.
दत्त संप्रदायाचा प्रसार
थोरल्या स्वामी महाराजांनी दत्त सांप्रदायाचा प्रसार जरी केला असला तरी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरातचा दक्षिण भाग असा भाग जास्त दत्तमय झालेला आढळतो, दत्त भक्ती दुर्लभ का असा विचार करू लागल्यास आधी या प्रांतात जन्म, त्या दैवताविषयी श्रद्धा असलेले माता पिता, त्यांनी तसे केलेले संस्कार आणि भक्तीचा दृढसंकल्प हे सर्व कारणीभूत असल्याचे जाणवते. मग त्यातूनही कोणी खडतर भक्तिमार्गाची वाट चोखाळू लागल्यास वैराग्याची भीती आणि अजून लहान आहेस दत्त भक्तीला अशा उदगारानी परावृत्त करण्याचा प्रयत्न हा अडथळा आहेच, वास्तविक पाहता माझ्या मते दत्त भक्ती एव्हडे सुलभ काही नसावे, स्मरण करताच तात्काळ हजर होणारे, केवळ स्मरणमात्रें संतुष्ट होणारे, भक्ताकडून काही अपेक्षा न ठेवणारे असे दैवत कोणते असेल? देतो त्याला दत्त म्हणतात, काय देतो तर स्वतः ला अर्पण करतो. ह्या मायामय संसाराची खरी ओळख करून देऊन जीवाला ऐहिकापासून परावृत्त करणारे असे हे दैवत अतिशय कोमल हृदयी आहे, त्याला आपले मनोगत सांगा आणि सर्व चिंता त्यावर सोडून निर्धास्त राहा.