स्थान: बडोद्याजवळ मियागाम स्टेशनमार्गे
सत्पुरूष: श्रीरंग अवधूत स्वामी महाराज
विशेष: मातृमंदिर, श्री रंग अवधूत समाधी मंदिर
श्री रंग अवधूत स्वामी महाराजांचे परम पावन वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी. या जागेची पार्श्र्वभूमी मोठी अद्भूत आहे. श्रीरंग अवधूत स्वामी महाराज उपासनेसाठी हिमालयाच्या कुशीत जात असताना ‘मागे फिर, मागे फिर’ असे शब्द ऐकू आले. गुरूआज्ञाच समजून ते परतले. नर्मदा किनारी एकाने जागा सुचवली. त्यांचेबरोबर २-३ व्यक्ती होत्या. त्यांना सांगितले, आपण घरी जा मी येथेच मुक्काम करतो. उद्या आपण या मी आपणांस सांगेन. ते स्वामी तेथेच मुक्कामास राहिले ती जागा ८-१० गावांची स्मशानभूमी होती. पिशाच्चांचे वास्तव्य मोठमोठी झाडे सूर्यप्रकाशच भूमीवर पडत नसे. सहसा दिवसा सुद्धा येथे कोणी येण्यास धजत नसे. हिंस्त्र प्राणी, विंचू, इंगळ्या, मोर, सर्प इ. राजरोज फिरत असत. त्या बाजूस रात्री शंख फूंकण्याचे, डमरूचे आवाज ऐकले. साप-मुंगुस, मोर-साप यांच्यासारखी जन्म शत्रू प्राणी येथे प्रेमाने एकत्र असल्याचे त्या साधूने पाहिले. स्वामींनी निर्णय घेतला की येथेच तपाचरण करायचे. तेच हे श्री रंग अवधूत स्वामींचे नारेश्र्वर! नर्मदा किनारीचे पवित्र तीर्थक्षेत्र !
याठिकाणी श्री रंग अवधूत स्वामींचा अवधूत निवास हा आश्रम आहे. प्रार्थना भवन, मातृकुटीर बोधी वृक्षासारखा लिंबाचा वृक्ष इ. स्थाने दर्शनीय आहेत. हा मंदीर परिसर अत्यंत स्वच्छ, देखणा व पवित्र आहे. या परिसरात भक्तनिवास, भोजनालय इ. सुविधा आहेत. याठिकाणी रंगजयंती, दत्तजयंती इ. अनेक उत्सव साजरे केले जातात. अनेक धनाढ्य लोकांचा श्री रंग अवधूत स्वामींवरील असणाऱ्या श्रद्धेने याठिकाणी अनेक भक्त देणग्या देतात. त्यातून भक्तांसाठी अनेक सोई सुविधा निर्माण केल्या आहेत. भारतातूनच नव्हे तर जगातील अनेक देशांतील भक्त येथे येऊन सेवा करतात. संस्थान सातत्याने धार्मिक बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवते.
येथे भक्तनिवास निःशुल्क, नाममात्र शुल्काने उपलब्ध आहे. भक्तांसाठी भोजन प्रासाद येथे मोफत उपलब्ध आहे. स्मशानाच्या घेतलेल्या जागी स्वामी महाराजांनी स्वर्ग निर्माण केला आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. येथे गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, श्रीरंग अवधूत स्वामी महाराजांचा स्मृतीदिन, असे उत्सव साजरे होतात.
श्रीक्षेत्र नारेश्वर विशेष
बडोद्यापासून ६० कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्रीरंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरात राज्यात त्यांनी श्रीदत्त संप्रदायाचा फार मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला आहे. नारेश्वराचे माहात्म्य फार प्राचीन आहे. फार वर्षांपूर्वी येथे कपर्दीश्वराचे मंदिर होते. नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर पडले व पिंड खाली जमिनीत गेली. असे मानले जाते की नारोशंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एकदा शंकराने येऊन सांगितले की, मी जमिनीत गाडला गेलो आहे. मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर. त्याप्रमाणे नारो शंकरांनी ती पिंड बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना केली. येथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेथे भयाण अरण्य होते. हिंस्र श्वापदांची तेथे वस्ती होती. दहा गावची ती स्मशानभूमी होती. दिवसासुद्धा तेथे कोणी येण्यास धजत नव्हता. एकांतस्थान असल्याने व वर्दळ नसल्याने अवधूतांनी ही जागा उपासनेसाठी पसंत केली. रात्री त्यांना शंखाचे आवाज-भजनाचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. शिवाय तेथे मुंगूस व मोर एकत्र खेळताना आढळले. वरील कारणांमुळे अवधूतांनी उपासनेसाठी ही जागा पसंत केली असावी अशी श्रद्धा आहे. नर्मदाकाठ, गणेशाचे उपासनेसाठी वास्तव्य यामुळे पवित्र असे हे तीर्थक्षेत्र होतेच. त्यात पुन्हा अवधूतांच्या वास्तव्यामुळे ते तीर्थ जागृत असे तीर्थक्षेत्र झाले. नारेश्वर येथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली. तो कडुलिंब नम्र होऊन त्याच्या फांद्यांची वाढ वर (उध्र्व) न होता खाली जमिनीकडे झाली. त्या फांद्या जमिनीस टेकल्या आहेत, असे मानले जाते. इतकेच नव्हे तर अवधूतांच्या तपश्चर्येमुळे त्या कडुलिंबाची पाने गोड झाली आहेत, असे संगितले जाते. रंगावधूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे होते. त्यांचे वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये गोधरा या ठिकाणी राहात होते. महाराजांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा वाडी येथे मुक्काम होता.
थोरले महाराज कृष्णेवर स्नान करून रस्त्याने जात असताना समोर बाळ पांडुरंग उभा होता. बाळाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. स्वामी म्हणाले, ‘‘बाळ तू कुणाचा?’’ बाळ म्हणाला, ‘‘तुमचाच.’’ स्वामींनी त्याला एक खडीसाखरेचा खडा प्रसाद म्हणून दिला. तो बाळाने खाल्ला. हीच गुरू-शिष्यांची पहिली व शेवटची भेट. पुढे लौकिकदृष्टय़ा पांडुरंगाची व स्वामींची भेट झाली नाही. ही भेट शेवटची ठरली. या भेटीत स्वामींनी बाळावर पूर्ण कृपा केली. नारेश्वर जवळच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ गरुडेश्वर, त्यांनी चातुर्मास केलेले तिलकवाडा, श्रीक्षेत्र अनुसया आणि प्रतापे महाराज यांनी स्थापन केलेले भालोद ही महत्त्वाची दत्तस्थाने आहेत.
रंगावधूत महाराज नारेश्वर येथे अखेपर्यंत आपल्या आईसोबत राहिले. त्यांनी गुरुचरित्राच्या ५२ श्लोकांवर आधारित अशी रचलेली दत्तबावनी अतिशय प्रसिद्ध आहे. दत्तबावनीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्त पूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे. रंगावधूत महाराजांना बापजी असेही म्हणत असत. नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी, अवधूत मंदिर, अवधूत गुंफा, प्रार्थना मंदिर, बोधीवृक्ष-निंब, बापजींच्या पादुका आणि मातृमंदिर असा परिसर आहे. येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.
संपर्क:
श्री अवधूत निवास ट्रस्ट, मु. नारेश्वर, पो. सयार व्हाया अंकलेश्वर जि. बडोदा