श्री संत साईबाबा

श्री साई-बाबांचा मुळ फोटो
श्री साई-बाबांचा मुळफोटो

जन्म: ज्ञात नाही 
आई/वडील: ज्ञात नाही
कार्यकाळ: १८३८ -१९१८
गुरु: ज्ञात नाही.
शिष्य: श्री उपासनी बाबा 

श्री संत साईबाबा योगारूढ पुरूष असून निराकार परमेश्वराचे साकार रूप होते. साईबाबांचे मातापिता कोण होते, त्यांचा जन्म कुठे व केव्हा झाला यासंबंधीची माहिती उपलब्ध नाही. अर्थात त्याकाळी शिर्डी गावातील नाना चोपदार नावाच्या ईश्वर भक्ताच्या आईने बाबांना तरूण अवस्थेत पाहिले होते. तिने बाबांचे वर्णन असे केले आहे, एक सोळा वर्षांचा तरूण मुलगा लिंब वृक्षाचे तळी ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. तो अत्यंत तेजस्वी असून जणू काही परमेश्वराचा अवतार होता. त्याला पहाताच शिर्डी गावातले तमाम स्त्री-पुरूष त्याच्या दर्शनासाठी लिंब वृक्षापाशी जमा झाले. हा तरूण मुलगा कोण आहे व आपल्या गावात कशासाठी आला असा प्रश्न अनेकांना पड्ला. त्यांनी त्या तरूणाला विचारणा केली असता त्याने आपले मौनव्रत सोडले नाही. योगायोगाने त्याच वेळी एका खंडोबा देवाच्या भक्ताला दृष्टांत झाला की याच तरूणाने काही काळ लिंब वृक्षाखाली असलेल्या भुयारात तपस्या केली आहे. त्या भक्ताच्या दृष्टांतानुसार लोकांनी लिंब वृक्षाखाली जमीन खोदली असता त्यांना एक भुयार दिसून आले. आतमध्ये एक दिवा प्रज्वलित होता. तो पाहताच सर्व लोकांनी त्या तरूणाचा जयजयकार केला. तेव्हाच त्या तरूणाने मौनव्रत सोडून विनंती केली. “कृपा करून हे भुयार बुजवून टाका कारण ते माझ्या गुरूचे स्थान आहे.” त्याच्या म्हणण्यानुसार लोकांनी भुयार बुजविल्यानंतर तो तरूण अचानकपणे अदृश्य झाला. तो तरूण म्हणजे साईबाबा असून आजही शिर्डीत असलेले त्यांचे गुरूस्थान पवित्र मानले जाते.

श्रीसाई शिर्डीक्षेत्र
श्रीसाई- शिर्डीक्षेत्र

औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या धुमगावचे पाटील चांदभाई औरंगाबादला जात असता लघुशंकेसाठी आपल्या घोडीवरून खाली उतरले. लघुशंका झाल्यावर पहातात तो काय त्यांची घोडी दिसेनाशी झाली. ते घोडीचा शोध घेत असता, एका आम्रवृक्षाखाली एक फकीर आपल्या हातात असलेला चिमटा जमिनीवर आपटून अग्नी निर्माण केला आणि चिलीम पेटवली. हे पाहताक्षणीच चांदभाई आश्चर्यचकित झाले. तोच फकीर म्हणाला, “अरे पगले, घोडी शोधण्यासाठी का वेळ दवडतोस? तुझी घोडी त्या समोरच्या झाडाखाली उभी आहे.” घोडी पाहताक्षणीच चांदभाईने हर्षभरित होऊन त्या फकीराच्या चरणी आपले मस्तक टेकवले आणि त्याला सन्मानपूर्वक आपल्या घरी आणले. तो फकीर दुसरा तिसरा कोणी नसून ते साईबाबा होते.

चांदभाईच्या मेव्हण्याच्या मुलाचा विवाह शिर्डी गावच्या पाटलाच्या मुलीशी ठरला होता. मुलाची वरात शिर्डी गावी निघाली असता तो फकीरही वरातीत सामील झाला. वरात शिर्डी गावच्या प्रवेश व्दारी आली असता फकिराने वरात सोडली व तो खंडोबा देवाच्या मंदिरासमोर येऊन उभा राहिला. त्याच वेळी खंडोबा देवाचे पुजारी म्हाळसापती देवाची पूजा आटोपून मंदिराबाहेर आले. ज्याने शरीराभोवती कफनी धारण केली असून मस्तकी पांढरे फडके गुंडाळले आहे; ज्याची कांती तेज:पुंज असून डोळे तेजस्वी आहेत आणि मस्तकामागे तेजोवलय पसरले आहे; अशा फकिराला पाहून म्हाळसापतींनी आदराने नमस्कार करून साद घातली, “या साईबाबा, या. आम्ही आपलीच प्रतीक्षा करीत आहोत. आपण स्थितप्रज्ञ असून महान योगी आहात. आपल्या पदस्पर्शाने ही शिर्डी पावन झाली.” अशातऱ्हेने शिर्डी या पवित्र क्षेत्री प्रकट झालेले साईबाबा म्हणजे साक्षात परमेश्वराचे प्रेषित असून लोककल्याणार्थ त्यांनी मानवरूपात अवतार धारण केला होता. त्यांचे भक्तांना आश्वासन होते की, “जो माझ्यावर अंत:करणपूर्वक श्रद्धा ठेवून मला शरण येतो, त्यांच्या संसाराचा कार्यभाग सांभाळून मी त्यांचा उद्धार करतो.”

‘साई अविनाश पुरातन । नाही हिंदू ना यवन ।
जात पात कुळ गोतहीन । स्वरूप जाण निजबोध ॥

साईबाबा समाजाचे उत्कृष्ट शिक्षक होते. आईच्या मायेने ते उपदेश करीत. त्यांचा भक्त वाईट मार्गाला लागला तर त्याला ते सन्मार्गाला लावीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते अध्यात्माचे महान तत्वज्ञान सांगत. कधी कधी गोष्टी सांगूनही ते लोकांना उपदेश करीत.

एकदा राधाबाई देशमुख नावाची बाई बाबांकडे आली. बाबांनी आपल्याला गुरूमंत्र द्यावा अशी तिची इच्छा होती. तिने हट्ट धरला, अन्नपाण्याचा त्याग केला. बाबा तिला म्हणाले, ‘अग, माझ्या गुरूने जर मला काही गुरूमंत्र दिला नाही, तर मी तुला गुरूमंत्र कोठून देऊ?’ ती बाई काही ऐकेना. तीन दिवस ती बाई उपाशी होती. नंतर बाबा तिला म्हणाले, ‘माझा गुरू अवलिया होता. त्याची सेवा करून करून मी थकलो. पण त्याने काही गुरूमंत्र दिला नाही. शेवटी माझ्याकडून त्याने गुरूदक्षिणा म्हणून दोन पैसे घेतले व दोन गोष्टी मला दिल्या. पहिली गोष्ट श्रद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी. परमार्थात गुरूवर नितांत श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर परमार्थ सफल होत नाही. श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी पाहिजे. कोणतीही गोष्ट झटपट मिळत नाही; त्यासाठी धैर्य धारण करावे लागते. प्रत्येक गोष्टीकरिता तपश्चर्या करावी लागते. योग्य वेळेची वाट पहावी लागते.

साई-बाबा शिर्डी मध्ये वावरताना भक्तगणा समावेत
साई-बाबा शिर्डी मध्ये वावरताना भक्तगणा समावेत

बाबांच्या चरित्रात दोन गोष्टींना फार महत्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे उदी आणि दुसरी गोष्ट दक्षिणा. पण या दोन्ही गोष्टी फार सूचक आहेत. त्यात गहन तत्वज्ञान भरलेले आहे. उदी ही विवेकाची खूण आहे आणि दक्षिणा ही वैराग्याची खूण आहे. विवेकाशिवाय वैराग्य निरर्थक असते म्हणून बाबांनी विवेक आणि वैराग्याची सांगड घातली. उदी आणि दक्षिणेची सांगड घातली. उदी म्हणजे बाबांच्या धुनीतील राख. ती राख भक्तांना देऊन बाबा जणू हेच शिकवतात की ज्या देहाचे तू पालनपोषण करतोस, ज्या देहावर तू इतके प्रेम करतोस. त्या देहाची शेवटी चिमूटभर राख होणार आहे- या उदीसारखी. या जगात कोणी कोणाचे नाही. एकटा आलास आणि एकटाच जाणार. तुझ्याबरोबर या जगातील काहीच येणार नाही. असा विवेक करून आजपासूनच परमार्थ मार्गाला लाग. जीवनाची नश्वरता या उदीने सांगितली. या उदीने बाबांनी भक्तांचे असाध्य रोग दूर केले. नानासाहेब चांदोरकरांची मुलगी प्रसूतीवेदनांनी व्याकुळ झाली होती. बाबांनी रामगीर गोसाव्याबरोबर उदी व आरती पाठविली. उदी पाण्यात मिसळून ते पाणी प्याल्याबरोबर ती वेदनेतून मुक्त झाली. मालेगावच्या डाक्टरांच्या पुतण्याचा हाड्याव्रण उदीने बरा झाला. पिल्ल्यांचे सात नारू उदीने बरे झाले. एक ना दोन, किती उदाहरणे सांगावीत. देह जरी नश्वर असला तरी परमार्थ साधनेकरिता देह निरोगी पाहिजे. त्यासाठी उदीचे प्रयोजन. आजही साईभक्तांमध्ये उदीला फार महत्व आहे.

बाबा भक्तांजवळ दक्षिणा मागत. खरे म्हणजे बाबांना दक्षिणेची काय जरूर होती? बाबांना ना पोर ना बाळ. एकटा फकीर मशिदीत राहायचा. पण बाबा त्या दक्षिणेचा उपयोग गरिबांसाठी करीत असत. दक्षिणा ही वैराग्याची खूण आहे. दक्षिणा मागून बाबा भक्तांच्या मनातील आसक्ती व लोभ दूर करीत असत. दक्षिणेमागे एक सामाजिक विचारही आहे. समाजातील एकाजवळ खूप पैसा आहे आणि दुसऱ्याजवळ काहीच नाही. बाबा धनिकाजवळून पैसा घेऊन त्याचा गरिबांसाठी उपयोग करीत. दक्षिणेमुळे दानाची प्रवृत्तीही वाढते. समाजामध्ये आपण एकटे नाही. इतरही लोक आहेत. त्यांना देऊन मगच आपण खावे. ‘तेन त्यक्तेन भुज्जीथा:’ या तत्वाचे दक्षिणा हे सुंदर उदाहरण आहे. दक्षिणेमुळे समाजाच्या ॠणातून मुक्त होता येते. श्रीमंतांचा पैसा ते गरिबांसाठी उपयोगात आणीत. त्यांच्याच आज्ञेने गोपाळराव बुटी व हरिभाऊ साठे या दोन धनिकांनी शिर्डीत वाडे बांधले. त्यामुळे असंख्य भक्तांची उतरण्याची सोय झाली. बाबा दक्षिणेसाठी जबरदस्ती कधीच करीत नसत. जे दक्षिणा द्यायची नाही असे ठरवून येत त्यांच्याजवळ बाबा कधीच दक्षिणा मागत नसत. बाबांच्या दक्षिणेची रक्कमही ठराविक असे. त्या रकमेमागे काहीतरी आध्यात्मिक अर्थ किंवा संकेत असे. 

साई-बाबांची चावडी
साई-बाबांची चावडी

त्यांची वचने जर श्रद्धेने पठण केली आणि जीवनात आचरणात आणली तर निश्चित समजावे की ते बाबांच्या कृपाशीर्वादास पात्र ठरले आहेत. सारांशरूपाने त्यांचे म्हणणे आहे की “भक्तजन हो, राम असो अथवा रहीम असो, ते माझेच रूप आहे. सबका मालिक एक है. भगवद्-गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे वचन अर्जुनाला दिले आहे त्याचेच मी पालन करतो.” ते म्हणत “अरे भाई, माझ्यात असलेल्या षड्रिपूंना या धुनीमध्ये लाकडे टाकून मी आहुती देत असतो. खरे म्हणाल तर मी फकीर आहे. ना मला घरदार, ना माझा परिवार. आपल्या सारख्या दु:खितांना संकटातून आणि व्याधीतून मुक्त करावे, यासाठी मी आलो आहे. माझ्यावर श्रद्धा ठेवून सबुरीने वागा आणि स्वधर्माचे आचरण करा. तुमचे कल्याण होईल.”

गीता हा अलौकिक ग्रंथ आहे. त्याचे पठण केल्यास ज्ञानाची प्राप्ती होईल. भगवान म्हणतात, “जो माझ्यावर श्रद्धा ठेवून मला शरीराने व मनाने शरण येतो त्याच्या सर्व संकटांचा परिहार करून त्याला मोक्षाचा मार्ग उपलब्ध करून देतो.” खरे पाहता भाग्यात जे लिहिलेले असते तेच घडत असते. आम्ही फकीर फक्त निमित्ताला कारणीभूत असतो. तरीही योगासिद्धीने आणि परमेश्वराचे कृपेने आम्ही काही प्रसंगी थोडयाफार प्रमाणात का होईना भाग्यरेखा बदलू शकतो. अर्थात ती व्यक्ती श्रद्धावान आणि भक्तिप्रधान असावी.” उपासतापासावर माझा विश्वास नाही. पोटाला विश्रांती मिळावी म्हणून काही न खाता पिता उपास केला जातो. खऱ्या अर्थाने उपवास करावा. उप म्हणजे जवळ व वास म्हणजे बसणे. परमेश्वरासमोर बसून त्याचे ध्यान करणे होय. काम, क्रोध व अहंकाराचा त्याग करून तो सर्वांभूती ईश्वर पाहतो, संशय मनात न धरता मनावर संशय ठेवून जो प्राणिमात्राचे हित पाहतो तो संसारात असला तरी खऱ्या अर्थाने योगी असतो. श्रद्धा व सबुरी हीच त्यांची मोलाची शिकवण असून ते नेहमी म्हणत असत. “जो माझे नित्य स्मरण करून अनन्य भावाने मला शरण येतो, त्याला अन्न, वस्त्र व निवाऱ्याची कधीही टंचाई पडणार नाही.”

श्री साई-बाबा भक्तां समावेत
श्री साई-बाबा भक्तां समावेत

साईबाबांचे त्यांच्या भक्तांवर फार प्रेम होते. त्यांच्या भक्तमंडळीत सर्व प्रकारचे व सर्व जातीचे लोक होते. नानासाहेब चांदोरकरांसारखे सरकारी अधिकारी, दासगणूंसारखे विद्वान, काकासाहेब दीक्षितांसारखे सॉलिसीटर, खापडर्यांसारखे पट्टीचे वक्ते रावबहादूर हरिभाऊ साठे व गोपाळराव बुटींसारखे शाळामास्तर इतकेच नव्हे तर बायजा, लक्ष्मी, तात्या कोते, रामचंद्र पाटील, म्हाळसापती इत्यादी सामान्य व गरीब लोकसुद्धा त्यांचे भक्त होते. त्यांनी आपल्या भक्तांची सर्व संकटे यथायोग्य मार्गदर्शनाद्वारे दूर केली व त्यांना परमार्थाला लावले. कोणाचे अपमृत्यू टाळले, कोणाला पुत्रसंतान दिले, कोणाला गरिबीतून वर काढले तर कोणाला मन:शांती दिली. बाबा म्हणत की, “तुम्ही फक्त मला अनन्यभावाने शरण या. मी तुमची सर्व दु:खे दूर करून तुम्हाला मुक्त करीन. तुम्ही माझ्याकडे पाहा, मी तुमच्याकडे पाहीन. माझा भक्त कितीही दूर असला तरी मी त्याला माझ्याकडे खेचून आणीन.” अशा कितीतरी भक्तांना त्यांनी स्वप्नदृष्टांत व निरोपाच्या द्वारे आपल्याकडे ओढून घेतले. साईचरित्रकार गोविंदराव दाभोळकरांना, हेमाडपंतांना त्यांनी असेच खेचून आणले. साईबाबांच्या तावडीतून काकासाहेब दीक्षितांना सोडविण्यासाठी आलेले दाभोळकर शेवटी बाबांचे निस्सीम भक्त बनले व त्यांनी ‘साई सच्चरित्रा’ सारखे रसाळ साईचरित्र लिहिले. कासवी जसे केवळ दृष्टीने आपल्या पिलांचा संभाळ करते, त्याप्रमाणे बाबा आपल्या भक्तांचा सांभाळ करीत असत. १९१८ सालच्या विजयादशमीला या भक्तवत्सल महापुरूषाने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.

इहलोकीची यात्रा संपविताना साईबाबांनी आपल्या भक्तांना फार मोठे आश्वासन दिले आहे.

श्रीसाई शिर्डीक्षेत्र
श्रीसाई शिर्डीक्षेत्र

ते म्हणाले, की ‘मी देह ठेविला तरी मी गेलो असे तुम्ही समजू नका. तुमची दु:खे दूर करण्यासाठी मी शिर्डीत बसलो आहे. समाधीतून माझी हाडे सुद्धा तुमच्याशी बोलतील, तुमच्याशी हितगुज करतील, तुमची संकटे दूर करतील. जो भक्तिभावाने ‘साई साई’ म्हणेल त्याला मी सात समुद्र बहाल करीन. साईभक्ताच्या घरी कधी अन्नवस्त्राला कमी पडणार नाही. शिर्डीस ज्याचे पाय लागतील त्याची सर्व दु:खे दूर होतील.’

‘शिरडीस ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे ॥
माझ्या समाधीची पायरी चढेल, दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥’

आजही साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीस जातात. आजही दीनांचा सोयरा, पतितांचा पावनकर्ता, दलितांचा कैवारी, भक्तांचा सखा असा श्रीसाई शिर्डीक्षेत्री नांदतो आहे, आपल्या भक्तांची वाट पाहतो आहे.

दि. १५ आक्टोबर १९१८ ला विजयादशमी होती. त्या दिवशी शिर्डी येथे बाबा समाधिस्त झाले. त्यादिवसापासून आजतागायत लाखो भाविक बाबांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी रोज शिर्डीत येत असतात. बाबा समाधिस्त झाले असले तरी आपल्या निष्ठावान भक्तांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत देतात, त्यांची संकटे व व्याधी दूर करतात याची प्रचीती आजही हजारो भक्तांना येत असते. 

श्री संत साईबाबा
श्री संत साईबाबा

साईबाबा एक दिव्य सत्पुरुष 

शिर्डीचे नाव साऱ्या भारतात प्रसिद्ध करणाऱ्या श्रीसाईबाबांचे स्थान दत्तपंथीयांत महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर बाबा रामाचे उपासक, शिर्डीस दत्तात्रेयांचे मंदिरही नाही. ज्या पादुका आहेत त्या बाबांच्या गुरूंच्या आहेत. बाबांनी स्वत: द्त्तोपासनेचा प्रचारही केलेला दिसत नाही. श्रीसाईबाबांची जात कोणती, त्यांचा जन्म केव्हाव कोठे झाला, ते शिर्डीस केव्हा व कसे आले, इत्यादींची फारशी माहिती कोणासही नाही. श्रीबाबा हे थोर दैवी व साक्षात्कारी पुरुष लोकांची दु:खे नाना मार्गांनी दूर करतात, एवढीच त्यांची कीर्ती, ते कोणाचे अवतार आहेत? याही प्रश्नाचे नेमके एकच उत्तर नाही, राम, कृष्ण, हनुमान, शंकर, गणपती, गुरुदत्तात्रेय, स्वामी समर्थ अक्कलकोटकर, माणिकप्रभू, इत्यादींचा संबंध श्रीबाबांच्या अवतारलीलांशी पोचतो. दासगणूसाररव्या श्रेष्ठ भक्तास ते पंढरीच्या विठ्ठलासारखे दिसतात. 

‘शिर्डी माझें पंढरपूर । साईबाबा रमावर’  असे त्यांचे वचन आहे.

साईबाबांची धुनी, उदी, त्यांचा हिंदुमुसलमान भक्तपरिवार, त्यांचे लोकविलक्षण वागणे, त्यांची आर्तांबद्दलची करुणा ध्यानात घेऊन अनेकांनी त्यांना दत्तावतारीही मानले आहे.माणिकनगरप्रमाणे शिर्डीसही हिंदु व मुसलमान यांना पंथीयांत सारखाच मान आहे. साईबाबा हे नाथपंथीय दत्तात्रेयांचे अवतार आसल्याचे अनेकांना मान्य आहे. ज्ञात असलेल्या त्यांच्या जीवनक्रमाचा प्रारंभ थोडक्यात असा.

औरंगाबाद जिल्ह्यातील धूप नावाच्या एका गावालगतच्या जंगलात चांदभाई नावाचा एक सधन व्यापारी आपली लाडकी घोडी शोधीत होता. या घोडीचा तपास एका मुसलमानी वेषातील तरुण बैराग्याने करून दिला. चांदभाईची निष्ठा या तरूण फकिरावर जडली. त्याने चिमटा जमिनीवर आपटून चिलमीसाठी निखारे तयार केले, तेव्हा तर या तरुणाच्या दैवी शक्तीबद्दल चांदभाईची खात्रीच पटली. चांदभाईने या फकिरास आपल्या घरी आणले. चांदभाईच्या घरी एक लग्न निघाले. त्या वऱ्हाडाबरोबर हा तरुण फकिर शिर्डीला येऊन शिवेवरील खंडोबाच्या देवळात आला. पण या मुसलमानाला पुजाऱ्याने आत येऊ दिले नाही. तेव्हा तो देवळाबाहेर एका वडाच्या झाडाखाली चिलीम फुंकत बसला. याच वेळी खंडोबाच्या देवळाचे मालक म्हाळसापती सोनार हे तेथेआले. झाडाखाली बसलेल्या फकिरास ते म्हणाले, ‘आवो, साईबाबा!’ तेव्हापासून हा फकीर साईबाबा म्हणून ओळखला जाऊ लागला.

श्री संत साईबाबा
श्री संत साईबाबा

म्हाळसापतीबरोबर श्रीसाईबाबा शिर्डीतच राहू लागले. काशिराम शिंपी, आप्पा जागले अशा काही लोकांची बाबांवर श्रद्धा जडली. ज्या निंबाच्या वृक्षाखाली बसून बाबा चर्चा करीत त्याच्या खाली त्यांच्या गुरूंच्या पादुका असल्याचे आढळून आले. येथूनच जवळ असलेल्या एका पडीक जागेतबाबांनी फुलबाग तयार केली. बाबांचे वागणे, बोलणे वरवर पहाता वेडयासारखे होते. हातात पत्र्याचे टमरेल, मळकट कापडाची झोळी, अंगावर एखादी कफनी, अशा वेषात बाबा भिक्षा मागत असत. खाण्यापिण्याचीही नीट शुद्ध त्यांना नसे. काही दिवसांनी गावातील एका पडक्या मशिदीत ते राहू लागले. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली हीच जागा पुढे द्वारकामाई म्हणून प्रसिद्धीस आली. रामानामाचा जप येथे सुरू झाला. अक्षय जागृत असणारी धुनी तयार झाली व हजारो, लाखो भक्तांना उदीभस्म मिळत राहिले.बाबांनी अनेक चमत्कार केले, दुकानदारांनी तेल दिले नाही म्हणून त्यांनी पाण्याच्या पणत्या पेटवून लोकांना चकित केले. बाबांनी अनेकांची शारीरिक व्याधी दूर केली, पिशाचबाधा दूर केली; अनेकांना धनाचा, यशाचा मार्ग दाखविला.

पुणतांबे येथील संत गंगागीर महाराज व स्वामी अक्कललोटकरांचे शिष्य महंत आनंदनाथ यांनी बाबांचे दर्शन घेऊन कृतार्थता व्यक्त केली. वासुदेवानंद सरस्वती हे बाबांचे गुरुबंधू असल्याचे सांगतात. साईबाबांच्या अंगुळातून गंगायमुनांचा झरा वहात असतानाची साक्ष दासगणूंची आहे. योगविद्येतही श्रीबाबा तत्पर होते. संसारग्रस्त जीवांना सुखी व समाधानी करण्यासाठी बाबा यायोगसामर्थ्याचा उपयोग करीत. त्यांच्या उदीचा प्रभाव अनेकांच्या अनुभवातला होता. उमरावतीचे दादासाहेब खापर्डे यांची श्रीबाबांवर नितान्त श्रद्धा होती. श्रीबाबांच्या वास्तव्याने  लौकरच शिर्डी हे एक क्षेत्र बनले. भक्तांच्या निवासासाठी तेथे नवीन इमारती झाल्या. पाण्याची, विजेची सोय झाली. साठे. दीक्षित, नागपुरचे बुटीयांच्या इमारतींनी शिर्डीस एक नवे वैभव प्राप्त करुन दिले. श्रीबाबांचे चमत्कार व त्यांचा उपदेश यांनी सर्वसामान्यलोकही भारावून गेले. बाबा म्हणत असत,

“कधीही न मिळणारा हा मनुष्यजन्म विषयभोगांच्या नादाने फुकट घालवू नका, तुम्हांला जे समजणार नाही ते मला विचारा. तुमच्या सेवेसाठी मला परमेश्वराने येथे पाठविले आहे. तुमच्यासाठी माझा जीव तळमळत आहे. तुमचा उद्धार करणे हे या अल्लाच्या सेवकाचे पहिले कर्तव्य आहे. या जगात अमर कोणीही नाही. प्रत्येकाला एक दिवस मरावयाचे आहे. मरणाचे भूत नित्य डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे त्या भितीने तरी तुम्हांस परमेश्वराची आठवण होईल.”

असा त्यांचा साधा व सरळ उपदेश असे. त्यांना फारसे कर्मकांडही नको होते. विशिष्ट देवाचा वा देवतेचाही त्यांचा आग्रह नव्हता. मनातील अहंकार सोडून आपल्याला आवडेल त्या देवाची अढळ विश्वासाने आराधना करण्यास ते सांगत. सांसारिक लोकांना परमार्थाची गोडी श्रीसाईबाबांनी लावली.श्रीबाबांनी अशा रीतीने कधी कनवाळूपणाने, कधी रागावून, कधी लोभावून, कधी नीट समजूत काढून लाखो लोकांची पीडा दूर केली. त्यांना परमार्थाचे मार्गदर्शन केले. कसल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता ते अन्नदान करीत.

हजारो लोकांच्या शारीरिक व मानसिक व्याधी दूर करणारा हा अवतारी पुरुष १५ ऑक्टोबर १९१८ रोजी समाधिस्थ झाला. अखेरच्या प्रसंगी त्यांना बुटींच्या वाडयात आणले होते. तेथेच त्यांचे समाधिस्थान निर्माण झाले. श्रीबाबांनी कोणासही मंत्र देऊन शिष्य केले नसले तरी आजही लाखो भक्तांचे डोळे शिर्डीकडे लागलेले असतात.

शिर्डीच्या जवळचे साकुरी येथील उपासनी महाराजांचे दत्तस्थान साईबाबांच्या प्रेरणेनेच निर्माण झाले.

साई बाबा
माझ्या समाधीची पायरी चढेल । दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥

श्री साईबाबांची अकरा वचने

शिरडीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ॥ १ ॥
माझ्या समाधीची पायरी चढेल । दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥ २ ॥
जरी हे शरीर गेलो मी टाकून । तरी मी धावेन भक्तासाठी ॥ ३ ॥
नवसास माझी पावेल समाधी । धरा द्रुढ बुध्दी माझ्या ठायी ॥ ४ ॥
नित्य मी जिवंत, जाणा हेंची सत्य । नित्य घ्या प्रचीत अनुभवे ॥ ५ ॥
शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा ॥ ६ ॥
जो जो, मज भजे, जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे, मीही त्यासी ॥ ७ ॥
तुमचा मी भार वाहीन सर्वथा । नव्हे हे अन्यथा वचन माझे ॥ ८ ॥
जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस । मागे जे जे त्यास ते ते लाभे ॥ ९ ॥ 
माझा जो जाहला कायावाचामनीं । तयाचा मी रुणी सर्वकाळ ॥ १० ॥ 
साई म्हणे तोची तोची झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ॥ ११ ॥

श्रीसाईबाबा व श्रीगजानन महाराज यांचे आंतरिक संबध

दिनांक ८/९/१९१० रोजी श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. इकडे शिर्डिमध्ये श्रीसाईबाबांनी प्रातःकाळी साडेपाच वाजता न्हाव्याला बोलावले व केस कापून घेतले आणि स्नान केले. ही घटना आपल्या दृष्टीने सामान्य असली तरीही श्रीसाईभक्तांच्या दृष्टीने मात्र वेगळी होती. कारण श्रीसाईबाबा साधारणतः दुपारी हजामत करून घेत असत व आंघोळ करीत असत. त्या दिवशी मात्र त्यांनी केलेली ही कृती पाहून भक्तगण जरा अचंब्यातच पडले. त्याच दिवशी स्नान झाल्यानंतर त्यांना एक भक्तास दुकानातून नारळ, थोडीशी साखर व भुईमूगाच्या शेंगा आणावयास सांगितल्या. आणलेला नारळ त्यांनी स्वतःच्या हाताने फोडला व त्याचे छोटे-छोटे तुकडे करून त्यासोबत साखर व भुईमूगाच्या शेंगा तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये वाटल्या. त्यानंतर त्यांनी “बोलो श्रीगजानन महाराज की जय” असा जयजयकार करावयास सुरूवात केली.

आश्चर्य असे की तेव्हा तेथे उपस्थित लोकांपैकी बऱ्याच जणांना गजाननमहाराजाविषयी काही एक माहिती नव्हती. तरीही त्यांनी श्रीसाईबाबांसोबत जयजयकार केला. नंतर श्रीसाईबाबनी स्वतः त्या उपस्थित भक्तांना सांगीतले की, “आज सुबह मेरा भाई जाता रहा.” इकडे खरोखरच सकाळी दि. ८/९/१९१० रोजी शेगावी श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. तेव्हा शिर्डी येथे उपस्थित असलेल्या काकासाहेब दिक्षीत यांना दोन दिवसानंतर गोपाळराव बुटी यांचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहीले होते की दि. ८/९/१९१० रोजी श्रीगजानन महाराजांनी देहत्याग केला व अंतिम समयी आम्हां लोकांना आश्वसन दिले की, “अब आगेसे मेरे भाई श्रीसाईबाबा आप लोगोंकी देखभाल करेंगे उनके पास शिर्डी चले जाना.” “श्रीगजानन विजय” या ग्रथात छापल्या अभिप्रायमध्ये बा. ग. खापर्डे यांनी लिहिले आहे की त्यांना त्याचे वडिल दादासाहेब खापर्डे यांनी सांगितले होते की श्रीगजानन महाराजांनी ज्या दिवशी देह ठेविला त्या दिवशी श्रीसाईबाबा दिवसभर शोक करीत होते. ज्याक्षणी श्रीगजानन बुवांचे देहावसान झाले त्यावेळी श्रीसाईबाबा गडाबडा लोळले आणि “माझा जीव चालला, मोठा जीव चालला” असे विव्हळून अनेकदा ओरडले. 

या दोन्ही संदर्भावरून असे लक्षात येते की आंतरीक दृष्टीने या दोन्ही संतांची एकमेकांशी अतिशय जवळचा संपर्क होता. संत बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असेल तरी अंतरंगातून ते एकत्र मिसळलेले असतात यात शंका नाही.

श्रीसाई निर्वाण व त्यासंबंधी महत्वपूर्ण माहिती

साईनिर्वाणाची कथा सर्वांना माहित आहे म्हणून त्यातील फक्त काही महत्वाच्या घडामोडींचा येथे विचार करत आहोत.

१) साईनिर्वाण: १५/१०/१९१८. वेळ: २.३५ मी.
२) २८ सप्टेंबर पासून बाबांना ताप आला.
३) सकाळी ९ किंवा १० चा दरम्यान वीट दुभंगली.
४) बायजा बाईंच्या अंगावर प्राण सोडले.
५) नाना साहेबांनी पाण्याची झारीने पाणी पाजले पण पाणी बाहेर आले. त्यासरशी "देवा" म्हणून मोट्याने किंचाळी मारली.
६) हिंदु मुस्लिम वाद झाला हिंदू म्हणायचे बाबाना वाड्यात त्यांच्या अंतिम ईच्छे प्रमाणे समाधी द्या तर मुस्लिम त्यांना बाहेर समाधीस्त करून थडके बांधून आम्ही व्यवस्था पाहू. 
७) काही हिंदू म्हणत बाबानी देह द्वारकामाईत ठेवला तेथेच समाधी बांधा.
८) नगरहून काकासाहेबांनी कलेव्टर बोलावले.
९) सर्वानी आपले मत कागदावर लिहावे, ज्यांचे जास्त त्याप्रमाणे निर्णय होईल. म्हणून रामचंद्र कोतेंनी कंबर कसली व गावातून वाड्यात समाधी द्यावी यासाठी २००० मते मिळाली व प्रती पक्षाला ५००/६०० च मते मिळाली आणि बाबांचा देह वाड्यात ठेवावा असा ठराव मंजूर झाला.
१०) "त्यानंतर "उपासनी महाराजांनी" सशास्त्र पद्धतीने साई बाबांचा सर्व अंतिम संस्कार विधी पार पाडला.
११) २७ ओक्टो. १९१८ ला तेरावे बापुसाहेब जोग व उपासनी महाराज यांनी गंगेसारख्था पवित्र ठिकाणी केले. त्यासाठी भंडारा वर्गणी २४०० रू जमली.
१२) बाबां नंतर त्यांच्या सर्व वस्तू ज्यांची किंमत १०,००० चा आसपास होती ते जतन करायला शिर्डी ट्रस्टची स्थापना झाली.
१३) पहिले वर्षश्राद्ध काशीमध्ये उपासनी बाबानी व बापुसाहेब जोग यांनी केले. तेथे मोठ्या स्वरूपात अन्नदान, गोदान, सब्राम्हण दक्षिणा देऊन हा सोहळा पार पडला.

श्री साईबाबा एक अवलिया फकीर

श्रीसाईबाबांचा जन्म केव्हा, कुठे झाला हे अजूनही अज्ञात आहे. त्यांचे गुरु, आई, वडिल, त्यांची परंपरा याबद्दल काहीही माहीती उपलब्ध नाही. जेव्हापासून ते प्रकट झाले तेव्हापासून ६०-६५ वर्षे ते शिर्डीलाच होते. त्यांनी स्वतःबद्दल कोणाला काही सांगितले नाही. आणि काही लिहूनही ठेवले नाही.

श्रीसाईबाबांचे चरीत्र म्हणजे एकमेव श्री साईसच्चरित ही पोथी होय. या पोथीचे लेखक हेमाडपंत म्हणजेच श्री. गो. द. दाभोळकर हे आहेत. ही पोथी सर्व साई भक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. श्रीसाईबाबा हे संत-परंपरेतील एक अवतारी सत्पुरुष आणि अवलिया विभूती होते. काही भक्त बाबांना रामाचा अवतार मानतात तर काहीजण कृष्णाचा अवतार मानतात. जया मनी जैसा भाव! तया तैसा अनुभव या वचना प्रमाणे साईबाबांनी आपल्या भक्तांना दत्त, राम, कृष्ण, विठ्ठल अशा विविध देवतांच्या रुपात दर्शन दिले आहे.ते स्वतःला मात्र अल्लाचा बंदा आहे असे म्हणवून घेत.

श्रीसाईबाबा हे भक्तांना सहज संवादातून बोध करीत.बरेच वेळा त्यांचे बोलणे गूढ व अतर्क्य वाटे.इंग्रजी राजवटीच्या काळात अंधश्रध्दा फार होत्या त्याच वेळी भारतीय वेदविद्यांचाही प्रसार होत होता.खुद्द लोकमान्य टिळकांनीही श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले होते.आधूनिक संतकवी दासगणू महाराज हे त्यांचे शिष्य होते.

त्याच्या असंख्य लीला पोथीत वर्णन केल्या आहे.कोणाची निंदा करु नये,सत्याने वागावे,भुकेलेल्याला अन्न व तहानलेल्याला पाणी द्यावे, कोणाचा द्वेष,मत्सर हेवादावा करु नये.अहंकार असू नये,अडलेल्याला परोपकारी वृत्तीने मदत करावी, ईश्वरी सत्ता श्रेष्ठ मानून नेहमी ईश्वराचे स्मरण करावे असा उपदेश त्यांच्या लीलांमधून स्पष्ट होतो. जा-धर्म,पंथ-सांप्रदाय उपासना पध्दती असे कोणतेही भेद त्यांना मान्य नव्हते. सबका मालिक एक हा त्यांचा संदेश प्रसिध्दच आहे.त्यामुळे शिख, हिंदू, मुसलमान, पारशी अशा सर्व समाजातीललोक त्यांचे भक्त आहेत 

श्रीसाईबाबा आपल्या भक्तांना उपदेश करतांना सांगत, "साधे सरळ,प्रामाणिक पणे कष्ट करुन रहावे,नीतीने धन कमवावे,गरजूंना मदत करावी,वादात व्यर्थ तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा अंतःकरणात परमेश्वराचे स्मरण करुन ओठातून त्याचे नाम घ्यावे. श्रध्देने आपल्या धर्मग्रंथांचे वाचन करावे,सतत आपल्या दैवताचे नामस्मरण करावे आणि माणुसकीने वागावे, किडा, मुंगी, प्राणी या सर्वामध्ये परमात्मा लपलेला आहे. मनातील, हृदयातील ईश्वरावर नामाची धार अखंड ठिबकू द्या" जगाला मानवतेची, विश्वबंधुत्वाची शिकवण देण्याचे महान कार्य बाबांनी केले.

१८५० च्या सुमारास गोदावरी तटी,शिरडीमध्ये श्री साईबाबांचे वास्तव्य होते.सतत ते परमेश्वराचे नामस्मरण करीत, "अल्ला मालिक ! हरी हरी" रोगग्रस्तांना ते वनऔषधी देत. नंतर ते म्हणतात, "हरी, हरी म्हणता तो परमेश्वर माझे सद्गुरु प्रसन्न झाले, माझ्या हातून साधा अंगारा दिला तरी तो अमृत होई, ती परमेश्वराची लीला." श्री साईबाबांना ज्या व्यक्ती अनन्यभावे शरण गेल्या त्यांचे ऐहिक जीवन सुखकर झाले, मनःशांती लाभली, त्यांचेमरण सुध्दा सूर्यास्तासारखे सहज विनासायास लाभले.

श्रीसाई म्हणजे साक्षात ईश्वर होय, पूर्वी, आज आणि उद्या ही त्यांच्या कृपेची प्रचिती! लाखो अनुभव, कोट्यावधी लीला!

श्रीसाईबाबा फकिरी वृत्तीचे अवलिया होते. मानवाच्या सुखाचे सार त्यागात, प्रेमात, आपलेपणात, परमेश्वराच्या नामस्मरणात आहे असा त्यांचा उपदेश आहे. श्रीसाईबाबा इ. स. १९१८ मध्ये देहरुपाने अनंतात विलीन झाले पण त्यांचे अस्तित्व आजही जाणवते.

साईबाबा- एक अवलिया दत्तसंप्रदायी सत्पुरूष; एक अभ्यासक

साईबाबा (इ. स. १८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय हिंदू संत होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

जन्म: इ. स. १८५६ पाथरी, महाराष्ट्र (या बाबत अभ्यासका मध्ये मतभेद आहेत)
निर्वाण: १५ ऑक्टोबर, १९१८  शिर्डी, महाराष्ट्र 
उपास्यदैवत: मालिक (ईश्वर)
भाषा: उर्दू आणि मराठी
कार्यक्षेत्र: शिर्डी, महाराष्ट्र
प्रसिद्ध वचन: सबका मलिक एक, श्रद्धा आणि सबुरी

साईबाबा

साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी (?) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली कारण त्यावेळी फारशी-उर्दू-मराठी-हिंदी मिश्रित भाषा लोक वापरीत असत, साई चा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू मुस्लांसह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. 'सबका मालिक एक' हे साईंचे बोल होते. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसर्‍याच्या दिवशी साईबाबांचे शिर्डीतच निधन झाले.

कार्य

साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी 'सबका मालिक एक' हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेही म्हणायचे.

भक्त समुदाय

साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे. साईबाबा हे मुस्लिम फकीर नसून ते जन्माने ब्राम्हण होते, त्यामुळे ते हिंदूच आहेत. असा दावा कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने सप्टेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना मुस्लिम फकिराने केलेल्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले. पण नंतर त्या फकिराने साईबाबांना वेकुंशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. साईबाबा यांचे खरे नाव हरिभाऊ आहे. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही साईधाम चॅरिटबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.

इतिहास

शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.

साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालिन मंदिर

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबालोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ. स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.

साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज  हजारो भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.

आजही दीनांचा सोयरा, पतितांचा पावनकर्ता, दलितांचा कैवारी, भक्तांचा सखा श्रीसाई शिर्डीक्षेत्री नांदतो आहे
साईबाबा समधी मदीर- आजही दीनांचा सोयरा, पतितांचा पावनकर्ता, दलितांचा कैवारी, भक्तांचा सखा श्रीसाई शिर्डीक्षेत्री नांदतो आहे

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा अर्थात "श्री दत्त जयंती व श्री साईबाबा"

या दिवशी रात्री सुमारे १० वाजता श्री सदगुरू साईबाबांनी द्वारकामाईत ३ दिवसांची अर्थात ७२ तासांची समाधी घेतली होती. तीन दिवस म्हणजेच ७२ तास बाबांचे शरीर पार्थिव स्वरुपात पडून होते. शरीरात प्राण नाही, हृदयाचे ठोके बंद, श्वासोच्छवास आणि नाडी देखील बंद होती. ३ दिवसाच्या नंतर बाबांच्या शरीरात पुन्हा प्राण आले.  मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात श्री दत्त जयंतीच्या दिवशी श्री साईबाबांनी म्हाळसापतींना जवळ बोलावले आणि सांगितले कि, येथून पुढे तीन दिवस आम्ही आपला प्राण ब्रह्मांडी चढवत आहोत. तीन दिवसपर्यंत माझ्या देहाचे जतन करा. यावेळी बाबांना हलका दमा दम्याचा दौरा देखील आला होता. 

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा । बाबा अस्वस्थ उठला दमा ।।
सहनकरावया देहधर्मा । ब्रह्मांडी आत्मा चढविला ।।६४।।

(श्री साई सच्चरित अध्याय ४४ वा)

असे बोलत असताना बाबांनी "जर मी तीन दिवसांनंतर परत नाही आलो तर द्वारकामाईतल्या एका कोपर्याची जागा दाखवून मला तिथे समाधिस्त करा आणि तिथे दोन निशाने लावून ठेवा" असेही सुचित केले. 

स्वये म्हाळसापतीस लक्षून । बाबा तदा वदति निक्षून ।।
नका मज सांडू उपेक्षून । दिवस तीन पर्यंत ।।६७।।
तयेस्थानी निशाने दोन । लावूनी ठेवा निदर्शक खुण ।।
एसे वदता वदता प्राण । ठेविला चढवून ब्रम्हांडी ।।६८।।

असें म्हणताच बाबांनी तीन दिवसांची महासमाधी घेतली. म्हाळसापती यांनी बाबांना मांडी दिली आणि ३ दिवसांपर्यंत बाबांचा देह आपल्या मांडीवर सांभाळून ठेवला. तोच हा आजचा दिवस म्हणून जर आज आपल्याला शक्य झाले तर या दिवसाचे स्मरण आणि वैशिष्ट्य म्हणून "श्री साई सच्चरित" चा ४४ वा अध्याय जरूर जरूर वाचा!

श्री साईबाबा व लोकमान्य टिळक, एक हृद्य प्रसंग

एकदा शिर्डीला साईबांबाना भेटण्यासाठी लोकमान्य टिळक आले. सोबत त्यांची मोटार गाडी व काही जवळचे लोक होते लोकमान्य टिळकांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. गळयात हार घातला पेढे व १०१ UN रूपये दक्षिणा ठेवली. साईबाबा आलेल्या पैशांचा विनीयोग तत्काळ भक्तांसाठी व गोरगरीबांसाठी करीत असत हे सगळयांना माहित आहेच. बाबांनी तमाम भक्तांना पेढे वाटून टाकले व व १०१ रूपये अन्नदानासाठी ठेवले टिळक साईबांना म्हणाले की, "ब-याच दिवसांपासून आपल्या दर्शनासाठी यायचे होते पण आताशी आपले दर्शनाचा लाभ झाला". बाबांनी टिळकांना देशसेवेच्या कार्यात यशस्वी होण्याचा आशिरवाद दिला. दुपारची वेळ असल्याने बाबांनी लोकमान्य टिळकांची सोय गावातील आपल्या जवळच्या एका गांवक-याकडे केली होती व साईबाबांनी टिळकांना त्या गांवक-याचे घरी जेवणास पाठविले. जेवण साधेच होते ज्वारीची भाकरी कांद्याचे पिठले व मिरचीचा ठेचा. लोकमान्य टिळकांना कांद्याचे पिठले खाल्ले की अंगावर मोठया प्रमाणात पुरळ उठत असायचे. त्यामुळे ते कधीच कांंद्याचे पिठले खात नसत परंतू आता साईबाबांनी जेवायला सांगीतले आहे आता खाउ असा विचार करून टिळकांनी पोटभर जेवण केले आणि परत निघतांना पुन्हा साईबाबांचे दशर्न घेतले व जाण्याची परवानगी मागीइतली. तेंव्हा बाबा म्हणाले की, "आता तू कुठे जाणार?" तर टिळक म्हणाले "पुण्याला" तेव्हा बाबा म्हणाले की, "तू आता पुण्याला न जाता कोपरगांव-वैजापूर-औरंगाबाद असा जा" तर टिळक म्हणाले, "बाबा ते उलट होईल दुप्पट अंतर होईल" तर बाबा म्हणाले, "तू माझे ऐक" आणि म्हणाले "आता तुझे अंगावर पुरळ कधीच येणार नाही". टिळकांना अचंबा वाटला की बाबांना माझा विकार कसा ठाउक आणि बाबांच्या म्हणण्याप्रमाणे टिळक कोपरगांव कडून रवाना झाले आणि संध्याकाळी अहमदनगरहून इंग्रज पोलीस टिळकांना पकडण्यासाठी शिर्डीस दाखल झाले यातून बाबांच्या दिव्य द्ष्टीची आपणास कल्पना येते.

श्री साईबाबा
श्री साईबाबा व बेलाचे पान

श्री साईबाबा, द्वारकामाई व बेलाचे पान

शिर्डी श्रीसार्इंच्या "द्वारकामाई' मधील तासबिरीत बाबांच्या माथ्यावर नेहमी "बेलाचे पान" का दाखवलेले असते? किंवा श्रीसार्इंच्या नित्यपुजेत भक्त बेलाचे पान का वापरतात?

१) मेघा हा बाबांचा लाडका भक्त होता. तो साईभक्त हरी विनायक साठे यांच्याकडे नोकर म्हणून काम करत होता. शिर्डी गावात साठेसाहेबांनी मोठा वाडा बांधला होता त्या वाड्यात श्रीसार्इंची दिव्य तसबीर होती. ज्यावेळी साठे गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात होते तेव्हा शिरडीतील साठेवाड्यातल्या त्या तसबीरीची देखभाल, पुजा, आरती करणे आणि त्यानंतर द्वारकामाईत जााऊन प्रत्यक्ष श्री सार्इंची आरती व पुजाविधी करणे या दोन मुख्य कामांसाठी त्यांनी मेघाला शिर्डीस पाठवले होते. 

२) पण गंमत अशी होती की, मेघा हा शिवभक्त होता. सुरूवातीला तो बाबांना मुसलमान समजत होता नंतर हळू हळू त्याचा भ्रम दूर होत गेला "साई हेच शिव आहेत; आणि शिव हेच साई आहेत'' अशी त्याची प्रगाढ श्रद्धा बनली. त्याला बाबांचा ध्यास लागला. 

तो जो आला तोच रमला । साईपायी भाव जडला ।
सार्इंचा अनन्य भक्त बनला । साईच त्याजला देव एक ।।१४६।।
मेघा आधीच शंकरभक्त । होतां साईपदी अनुरक्त ।
शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा ।।१४७।।अ.२८

परिणामी दिवसेंदिवस त्याचे बाबांवरील प्रेम वाढत गेले आणि तो बाबांचा अत्यंत लाडका भक्त बनला; एवढा लाडका कि, त्याच्या देहान्तासामयी बाबा धाय मोकलून रडले होते. हा मेघा बाबाना शिव शंकराचा आवतार मानत होता; म्हणून तो बाबांच्या पूजेसाठी नित्याने मैलोनमैल पायी जावून गोदावरीचे पाणी आणून बाबांना शिवलिंगाप्रमाणे अभिषेक करत असे. त्यावेळी शिर्डीत बेलाचे झाड नव्हते म्हणून मेघा लांबलांबहून बेलपत्र तोडून आणत असे. 

शंकरास बेलाची आवड । शिरडीत नाही बेलाचे झाड ।
मेघा तदर्थ कोस दीड । जाउनि निज चाड पुरवीतसे ।।१५१।।अ.२८

३) तो संपूर्णपणे बाबाना शरण गेला होता. तो बाबांना शिवशंकराचा अवतार मानत असल्याने गोदावरी जलाने स्नान घालत असे स्नान घालत असताना तो "हर हर गंगे" असे मुखाने गुणगुणत असे. बाबांचा अभिषेक झाला कि तो याथोचित पूजा करत असे. भगवान शंकराला बेल प्रिय आहे म्हणून तो बाबांच्या पायावर आणि डोक्यावर (शिवलिंगावर) वाहतात तसे बेलपत्र, गंध आणि अक्षता वाहत असे. आजही बाबांचे "द्वरकामाई"चे पेंटिंग चित्र विकत घेतले तर बाबांच्या डोक्यावर बेलपत्र, फुल आणि अक्षता असलेले हमखास पहावयास मिळते. किंबहुना काही साईभक्त बाबांच्या डोक्यावर बेलपत्र नसलेले पेंटिंग विकत घेत नाहीत, कारण त्यांना ते चित्र अपूर्ण वाटते.

४) शिर्डीतील काही जुने साईभक्त सांगतात की बाबांच्या मस्तकावर छोटेसे टेंगूळ होते जे शिवलिंगाप्रमाणे दिसत असे, त्यातून दिव्य तेज देखील बाहेर पडत असे, ज्यावेळी बाबांची दाढी-कटींग करण्यासाठी न्हावी द्वारकामाईत येत असे तेव्हा तसेच बाबा जेव्हा स्नानाला बसत तेव्हा मेघा सहीत अनेक भक्तांनी हा चमत्कार स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला होता. त्यामुळे बाबांच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी सर्वांची श्रद्धा होती त्यातूनच ते बाबांच्या मस्तकाची बेलपत्रांनी शिवलिंगाप्रमाणे पुजा करत असत.

५) श्रीसाईनाथांचे अनेक भक्त आहेत; काही जण त्यांना श्रीरामाचा अवतार मानतात, कोणी कृष्णाचा, कोणी विष्णूचा, काही शिवाचा अवतार मानतात तर काही अल्लाचा बंदा, कोणी मसिह (मॅसेंजर ऑफ येशू) तर काही त्यांना पर्वदिगार मानतात त्यामुळे शिरडीत श्रीसार्इंना प्रत्येक भक्ताच्या श्रध्देनुसार पुजले जाते. त्यात कोणत्याही प्रकारचा धार्मिक भेदभाव केला जात नाही. श्रीसाईनाथ हे महादेवाचा अवतार आहेत असे मानणारे लाखो भक्त आहेत त्यामुळे श्रवणात प्रत्येक सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिरडीत देशातल्या मोठ्या शिवमंदिरात होतात ते सर्व विधी साजरे करून उत्सव साजरा केला जातो. यावेळी श्रींच्या समाधीला आणि मुर्तीला भक्त गण "शिव बोला भंडारी साई भोला भंडारी'' अशा गर्जना करत बेलापत्रांचे हार मोठ्या श्रद्धेने अर्पण करतात. 

६) मेघाने बाबांची "शिवशंकर'' भगवंतचा अवतार समजून जी बेलपूजा सुरू केली ती अजूनही अखंड सुरूच आहे. 

साईबाबा, समाजसेवी संत

"साई’ या शब्दाचा हिंदीतील अर्थ साधू, संत, संत्पुरुष असा होतो. त्यामुळेच साईबाबायांना ‘साई’ हे नाव पडले. ज्यांची कीर्ती कस्तुरी अखिल भारत वर्षात दरवळत आहे, असे महान लोकोत्तर महापुरुष आणि परम आदरस्थान असलेले महान अवतार सद्गुरुश्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली शिर्डी आज जागतिक पातळीवर साधनाभूमी आणि समाधीभूमी म्हणून परिचित आहे.  अहमदनगर जिल्ह्यात अर्वाचीन काळात एक महान योग्याच्या आगमनाने आणि अकृत्रिम प्रेममुग्ध सहवासामुळे त्या स्थानास महत्त्व आलं. ते धाम म्हणजे शिर्डी. 

शिर्डीचे अतिप्राचीन नाव ‘शिलधी’ शके १२१२ च्या दरम्यान यदुवंशी राजा रामदेवराय यादव याच्या कारकीर्दीत या भागात जुन्या वाड्याचे फक्त अवशेषच काय ते उरलेले होते. भग्नावस्थेत असलेल्या त्या गावाचा उपोगय केवळ मृतांना जाळण्या-पुरण्यासाठी करण्यात येऊ लागला. या शिलधीचेच पुढे शिर्डीत रुपांतर झाले. ‘शिलधी’ हा शब्द श्री बाबांनी आपल्या कठोर तपोबलाने पुढे प्रभावी बनविला आणि पवित्रतेचे धाम म्हणजेच ‘शिलधी’ अशा अर्थाने त्या नावाचे अक्षरश: शिर्डी क्षेत्रात रुपांतर करून टाकले.

श्री साईबाबांचे वास्तव्य शिर्डीत कित्येक वर्षे होते. १९१० सालार्पत त्यांची नगर किंवा शिर्डीबाहेर फारशी प्रसिध्दी नव्हती. पण त्या आधी ते सुरुवातीला निंबवृक्षाखाली मौनधारण करून बसत. दिवसरात्र भोजन न करता त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्र्चर्या करून सार्‍या भारतात श्रेष्ठ संत म्हणून कीर्ती संपादित केली. त्या काळात जे जे योगी, सिध्द, तपस्वी शिर्डी श्री बाबांच्या दर्शनार्थ आले त्या सर्वाची खात्री पटली होती की, श्री साईबाबा हे महान दत्तावतारी सत्पुरुष आहेत. ते योगीयांचे योगी, गुरुंचे गुरु आहेत. सर्वसाक्षी, सर्वज्ञ, आनंदमय, निरजंन आहेत. 

बीदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथील महान साक्षात्कारी संत माणिकप्रभू यच्याशी साईबाबांचे संबंध आल्याचही समजते. एकदा अवतारी महापुरुष माणिकप्रभू यच्या भक्तदरबारात एक फकीर गेले होते. तेथे जाऊन त्यांनी लोटा पुढे करून भिक्षा मागितली आणि माणिकप्रभूंनी त्या लोट्यात दोन खारका आणि गुलाबफुले टाकली आणि ‘साई ये लेव’ असे म्हटले आणि हां हां म्हणता तो फकीर अदृश्य झाला. हा फकीर म्हणजे साक्षात साईबाबा होते. ‘साई’ या शब्दाचा हिंदीतील अर्थ साधू, संत, संत्पुरुष असा होतो. त्यामुळेच या महापुरुषाला ‘साई’ हे नाव पडले. महात्मे आपल्या केवळ अस्तित्वाने आध्यात्मिक शक्तीची लाट उसळून देतात. त्यांची ठायी अपार पुण्यराशी साठलेल्या असतात. त्यामुळे देहत्यागानंतरही जगदोध्दाराचे त्यांचे कार्य अखंडपणे चाललेले असते. त्यांच्या केवळ नामसंकीर्तनाने संसारबंधन तुटून जाते. जीवन कृतार्थतेचा तत्काळ अनुभव देण्याचे अलौकिक सामर्थ्य अशा पुण्पुरुषांच नामस्मरणामध्ये असते. जे साईभक्त झाले त्यांची नामस्मरणाने जन्म -मरणाची येरझारा चुकेल. सर्व पापे जळून भस्म होतील.

श्री साईबाबांना सर्व रिध्दी, अष्टौ सिध्दी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे योगसामर्थ्य अद्वितीय होते. ते अंर्तज्ञानी योगी होते. ते प्रसंगी पर कायाप्रवेश करीत असत. त्यांना पूर्वजन्मीचेही ज्ञान होते. ते अजानुबाहू होते. श्री साईबाबा शेगावच्या गजानन महाराजांना आपले गुरुबंधू मानीत असत. गजानन महाराज शेगावी जेव्हा समाधीस्थ झाले, तेव्हा तेथे शिर्डीत श्री बाबा ‘माझा गज निघून गेला’ म्हणून शोक करू लागले. भक्तांना बाबा असे का करतात, हे समजेना. अखेर बाबांच्या अनावर शोकाचे कारण समजले.

बाबांना अंतज्ञानान ही गोष्ट समजली होती. श्रध्दा, सेवा आणि सबुरी हा साईबाबांचा सुवर्ण संदेश आहे. तो त्यांनी जगाला दिला. त्याशिवाय श्री बाबांनी अखेर भक्तांना शिकवण दिली. ‘एकटे कधी खाऊ नका आणि अन्नदान करा. द्रव्यापाशी देव नाही व द्रव्य लोभला मोक्ष नाही’ असे ते भक्तांना आवर्जून सांगत. त्यानुसार साईभक्त श्री साईबाबा उत्सवानिमित्त ठिकठिकाणी मोठमोठे भंडारे आयोजित करून अन्नदान करत असतात.

श्री साईबाबा झोपत असलेली फळी
श्री साईबाबा झोपत असलेली फळी

श्री साईबाबा झोपत असलेली फळी

आरंभीच्या काळात जाळी निमगावचे नानासाहेब डेंगळे यांनी पडक्या मशिदीत बाबांना नीट झोपता यावं म्हणून दीड फूट रूंद व चार हात लांब अशी एक लाकडाची फळी आणून दिली होती. बाबांनी त्या फळीच्या चार टोकाला जीर्ण चिंध्या बांधल्या व त्यांच्या सहाय्याने फळी वर अगदी मधोमध मशिदीच्या आढ्याला टांगली. फळीच्या चारही बाजूला पणत्या तेवत ठेवून ते फळीवर झोपत. ते कसे झोपतात व कसे उतरतात हे बघण्यासाठी रात्री माणसं जमत. पण हे कोडं कोणालाही कधीच उमगलं नाही.*