श्री क्षेत्र नरसी

करुणा त्रिपदी
.

राष्ट्रसंत प पू नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या श्री क्षेत्र नरसी नामदेव येथे शके १८२७, इ. स.१९०५ मधे प प श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचा १५ वा चातूर्मास संपन्न झाला. 

करुणा त्रिपदी जन्मकथा

श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ' मनोहर पादुका ' कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता-नियमावली स्वत: प. प. श्री. टेंब्ये स्वामींनीच घालून दिली आहे. त्यानुसार चातुर्मासातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी येथे श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.

इ.स.१९०५ मध्ये एकेदिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे, असे जाणून ते सगळे पुजारी प्रचंड घाबरले. त्यावेळी प. प. श्री. टेंब्ये स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मासानिमित्त मुक्कामाला होते. पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. त्यांच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामी ध्यानाला बसले. ध्यानात त्यांनी दत्तप्रभूंना कारण विचारले, त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, " तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी ! " ध्यानातून उठल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी पुजाऱ्यांना रोषाने सांगितले की, " जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे !

पुजाऱ्यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची, जशी घालून दिली आहे त्याबरहुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी कळवळा येऊन भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही तीन पदांची करुणात्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणेला तीन थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते.

श्रीक्षेत्र नरसी
श्रीक्षेत्र नरसी येथील सिद्ध दत्त पादुका 

करुणा त्रिपदीचे महत्व

श्री गुरुमूर्ती चरित्रात करुणात्रिपदीचे महत्व काय आहे ह्याचे सर्व भाविकांना अतिशय उदबोधक असे वर्णन दिसुन येते. मंत्ररुप प्रसादीक व दत्तभक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणार्‍या ह्या श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्रग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३,अध्याय ९२ ह्यात करुणात्रिपदीचे महत्व विशद केले आहे.

त्यातील महत्वाच्या ओळी अशा:-

आपत्ति येता श्रद्धापुर्वक | या त्रिपदीचे पाठ देख |
एकविंशतिवर नि:शक | नित्य करिता एकनिष्ठेनें ||५०||
आपत्तिचे होते निरसन | तसेंच व्याधिग्रस्तासि जाण |
एकविशतीवर नित्य श्रवण | दत्तत्रिपदी एकवितां ||५१||
व्याधी पासुनियां तो रोगी | मुक्त होईल जाणिजे वेगीं |
परि श्रध्दा पाहिजे अंगीं | श्रध्देसमान फल लाभे ||५२||
करुणात्रिपदींचे हे फल | निवेदिलें भक्त हो सकळ|
यास्तव त्रिपदें सर्वकाळ | दत्त दयाळ स्तवावा ||५३||

श्री गुरुमुर्ती चरित्र||अध्याय- ९२||

ह्याचा संक्षिप्त भावार्थ असा,

काही आपत्ति येता जो नित्य एकवीस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणतीही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण  करेल त्याच्या आपत्तीचे पूर्ण निरसन होईल. तसेच पूर्ण श्रध्दावंत अंत: करणाने जो ह्या त्रिपदीचे एकवीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दूर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्यथामुक्ती लाभेल.

भक्तांसाठी करुणात्रिपदीचे  हे तत्कलिक फळ निवेदन केले आहे. परंतु सौख्य व सदगुरुक्रुपा ह्यांचा लाभ होण्यासाठी भक्तांनी नित्य नियमाने सर्वकाळ ह्या त्रिपदी पाठाने दत्तगुरुंचे स्तवन करावे. म्हणजेच त्रिपदी नियमितपणे म्हणत जा ही कृपावंत सदगुरुंचीच आज्ञा आहे  व नानामहाराजांचेही आग्रहपूर्वक हेच सांगणे आहे. म्हणून आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करुया व सदगुरुंना प्रिय होण्याचे प्रयत्न करुया.

चातुर्मास पधंरावा, शके १८२७— इ.स.१९०५ 

चातुर्मास पधंरावा शके १८२७— इ.स.१९०५ नरसी येथे संपन्न झाला. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांनी येथे दत्तचंपू हे ३५१ श्लोकांचे काव्य रचले. नरसोबाच्या वाडीला श्री गुंडोपंत खोंबारे या पूजार्यांच्या हातून उत्सवमूर्ती खाली उतरली व त्यावर उपाय म्हणून दररोज करुणात्रिपदीने प्रार्थना करावयास सांगितले तेही नरसी येथेच.

नरसीमध्ये श्री महादेवराव म्हणून एक नापीत (न्हावी) होते. श्रीस्वामीमहाराजांचे भक्त होते. श्रीस्वामीमहाराज कोणाचाही स्पर्श करून घेत नसत. महादेवरावांची तीव्र इच्छा होती की स्वामीमहाराजांची सेवा घडावी व त्यांच्या देहाला स्पर्श करण्याचे भाग्य लाभावे. पण हे घडावे कसे? भक्ताची इच्छा भगवानच नाही का पूरी करणार?

पुढे भाद्रपद शुद्ध १४ ला चातुर्मासाचा शेवटचा दिवस आला. (संन्याशांचा चातुर्मास २ महिन्यांचा असतो). सायंकाळी पुराण संपल्यावर श्रीस्वामीमहाराज म्हणाले," उद्या क्षौर करून सीमोल्लंघन करावयाचे आहे."

माधवरावांनी आपले मनोगत एका ब्राम्हणा मार्फत महाराजांच्या कानावर घातली.

महाराजांनी अनुमती दिली. दुसऱ्या दिवशी महादेवराव पहाटेच येऊन बसले. प्रथम त्यांना महाराजांच्या शरीराला स्पर्श करताच सर्वांगाला कंप सुटला व वस्तरा नीट चालवता येईल की नाही अशी भीती वाटली, पण हातात धरताच त्यांचा कंप गेला व त्यांनी श्री स्वामीमहाराजांचे क्षौर उत्तम रीतीने केले.

श्रीस्वामीमहाराजांचा संचार अनवाणी व पुष्कळदा काट्या-कुट्यातून होत असे. त्यामुळे कितीतरी काटे त्यांच्या पायाला टोचले होते व अनेक काटे त्यांच्या पायात रुतून बसले होते. तीथे असलेल्या लोकांनी श्री महादेवरावांना श्रीस्वामीमहाराजांच्या पायातील काटे काढून टाकण्यास सांगितले.

श्रीमहादेवरावांनी महाराजांचे पाय पाण्याने स्वच्छ धुतले व ते चरणोदक तीर्थ म्हणून प्राशन केले. पाय आपल्या जवळील वस्त्रांने पुसून कोरडे केले व हळुवार हाताने पायातील काटे काढावयाला सुरुवात केली. त्यावेळी महाराजांच्या पायातून वीस काटे काढले. या सेवेमुळे श्री महादेवरावांचा उद्धार झाला.

श्री महाराजांच्या प्रेरणेने स्वामी स्थित प्राचीन दत्त मंदिर जीर्णोद्धार  कार्य सिद्धीस नेण्यासाठी आपण तन -मन धन स्वरूपात योगदान करावे.

- गणेश पाहिनकर, श्रीक्षेत्र नरसी 

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।