मानसपूजा

मानसपूजा
मानसपूजा

मानसपूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्यनियमाने त्यांची मानसपूजा केल्याने सद्गुरु संवादही करु लागतील, व तेव्हापासून साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल.

"अहं ब्रम्हास्मि" असे अध्यात्मशास्त्र सांगते. याचा अर्थ, "मी" ब्रम्हस्वरुप आहे. 

येथे “मी” याचा अर्थ मानवी शरीर असा नाही. 'मी' म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा 'आत्मा' होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरुपे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण-निराकार असल्याने, भगवंताचे प्रातिनिधिक स्वरुप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकाला सद्गुरुंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्मरुपाने साधकाजवळच असतात. साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते. हे वायुसुत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभु राम चंद्राची मूर्ति सीतामाईला दाखविली, या वरुन स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्मरुपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरुंना सचेतन देहस्वरुपात कल्पनेने निर्माण करुन मानसपूजेस प्रारंभ करावा.

पहाटेची वेळ मानसपूजेस चांगली असते. अशा वेळी सुखासन घालून बसावे. चर्मचक्षू बंद करावे. अंतर्मुख होऊन कल्पना करण्यास प्रारंभ करावा.

मानसपूजा

आकाशात क्षितिजावर गुलाबी रंगाची स्वैर उधळण होत आहे, 
सुगंध चौफेर दरवळतो आहे,
सतारीचे झंकार उमटत आहेत, 
मुरलीचा गोड मंजुळ ध्वनी आसमंतात घुमतो आहे, वेद घोषांचे मंद स्वर एकू येत आहेत.

हृदयातील रक्तवर्ण कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलतात. प्रफुल्लित कमळाच्या मध्यभागी सद्गुरुंच्या तेजस्वी पादुकांचे दर्शन घडते* 
त्यानंतर सूक्ष्मरुपातून प्रकट होण्यासाठी सद्गुरुंना मनोमन प्रार्थना करावी. एक तेजाचा झोत हृदयातील पादुकांपासून निघेल, आणि त्यामघून आपल्या समोर सद्गुरुंची सुहास्यवदन सगुण मुर्ती उभी राहील. 

सुस्वागतम् सुस्वागतम् असे म्हणून आपण आपल्या सद्गुरुंचे स्वागत करावे.
त्यानंतर चंदनाचा पाट मांडून त्यावर उभे राहण्याची सद्गुरुंना विनंती करावी. ते पाटावर उभे राहील्या नंतर त्याच्या चरणकमलावर सुवर्ण कलशाने पाणी घालावे.
त्यानंतर चांदीच्या वाटीतील दुध घालून पुन्हा पाणी घालावे. अशा प्रकारे पादप्रक्षालन झाल्यावर एक शुभ्र वस्त्राने चरणकमल पुसून त्यावर हळद-कुंकू वहावे. 
सद्गुरुंचा भाळी कुंकुमतिलक लावून सुवर्ण तबकातील रुपेरी नीरांजनांच्या ज्योतींनी पंचारती ओवाळावी.
आपल्या घरातील मखमली मंचकावर विश्रांती घेण्यासाठी सद्गुरुंना प्रार्थना करावी.

थोड्या विश्रांती नंतर त्यांच्या अंगातील कफनी काढून ठेवावी. गळ्यातील तुळशीमाळा, कुबडी आणि स्मरणी बाजूस काढून ठेवावी. 
कौपीनधारी सद्गुरुंना स्नानगृहात घेऊन जावे. तेथे सुवर्णाच्या चौरंगावर बसवावे.
चांदीच्या वाटीतील सुगंधी तेल सद्गुरुंच्या सर्वांगास हळूवार लावावे.
रूप्याच्या घंगाळ्यातील गंगोदक सुवर्ण कलशांत घेऊन सद्गुंना अभ्यंगस्नान घालावे.
नंतर सर्वांगास उटणे लावून पून्हा गंगोदक घालावे.
स्नानानंतर स्वच्छ आणि शुभ्र वस्त्राने सद्गुरुंचे सर्वांग पुसून घ्यावे.
नवी कौपीन बदलण्यास द्यावी.

नंतर पुन्हा मखमली मंचकावर बसण्यास विनंती करावी.
त्यांना भरजरी कफनी घालावी. गळ्यात तुळशीमाळा घालाव्या हातात कूबडी स्मरणी द्यावी.
त्यानंतर रत्नजडित सिंहासनावर सद्गुरुंना आणून बसवावे. चरणकमल ठेवण्यास सिंहासनापुढे शिसवीचा चौरंग ठेवावा. जैसा शोभे राजा रघुवीर असे भासले पाहिजे.

त्यानंतर पाद्यपूजेची अनुज्ञा घेऊन, पाद्यपूजेस आरंभ करावा.
शिसवीच्या चौरंगावरील सद्गुरुंच्या गुलाबी चरणकमलावर सुवर्ण पात्राने शुध्दोधक घालून पादप्रक्षालन करावे. त्यानंतर पंचामृताने पादुकांना स्नान घालावे. पुन्हा एकदा शुध्दोदकाने स्नान घालावे. नंतर चरणकमलावर अत्तर लेपन करावे. 
शेवटी आणखी एकदा उष्णोदकाने पादुकांना स्नान घालून शुभ्र चरणकमल पुसून घ्यावेत.

त्यानंतर स्वस्तिक चिन्हांकित चंदन गंध लेपन करावे.
सद्गुरुंच्या भाळी उभे गंधलेपन करुन मध्यभागी बुक्याचा टिळा लावावा. 
दोन्ही नेत्रांच्या बाजुस गंधाच्या मुद्रिका लावुन घ्याव्या.
सद्गुरुंच्या गळ्यामध्ये जाई- जुईच्या शुभ्र फुलांचा सुंदर पुष्पहार अर्पण करावा.
दोन्ही हातांच्या मनगटावर छोटे गजरे घालावेत.
नंतर पादुकांवर विविध सुवर्णालंकार घालावेत. पादुका तुळशीहाराने सुशोभित करुन शेवंती, चंपक, गुलाब, पुष्पे अर्पण करावीत. 
शेवटी अष्टभाव प्रतिक अष्टदल कमळ वहावे. अक्षता, हळद, कुंकू वाहुन घ्यावे.
अहंकाररुपी धूप घालावा. 
निराभिमानी बोधवृत्तीच्या तेजाची निरांजने लावून घ्यावी.

सद्गुरुंना शिऱ्याचा नैवेद्य दाखवुन रुपेरी पात्रांतुन केशर-वेल दोडे मिश्रीत दुग्ध प्राशन करण्यास द्यावे.
शेवटी तेजाने तेजाची आरती करावी.
पूजेने नटलेल्या शांत सुंदर आणि तेजस्वी सद्गुरुंच्या मुर्तीचे अवलोकन करुन साष्टांग दंडवत घालावे. 

सिंहासनारुढ सद्गुरुंसमोर हात जोडून उभे राहून शरणागतीकरीता आत्मकथन करावे.
आत्मकथनात एक दिवसातील आपल्या जीवनातील घडलेल्या बऱ्या -वाईट घटनांचे कथन करावे. चुकल्या मुकल्या गोष्टीबद्दल क्षमा याचना करावी.
त्यानंतर सद्गुरुंना भोजनासाठी भोजनगृहात घेऊन जावे.

भोजनगृहात पाटरांगोळ्या घातल्या आहेत, अगरबत्तीचा सुगंध दरवळत आहे. 
चंदनी पाटावर सद्गुरुंना विराजमान करावे.
चांदीच्या ताटांत सोन्याच्या वाट्यांतुन सर्व भोज्य पदार्थ वाढले आहेत.
 सद्गुरुंना भोजनास प्रारंभ करण्याची विनंती करावी.
 खाऊन होताच रुपेरी पात्रातून गार पाणी पिण्यासाठी द्यावे. भोजनोत्तर तांबूल द्यावा. 

आता आपल्या सद्गुरुंना स्थूलरुपातून सूक्ष्मरुपात हृदयकमलावर विराजमान होण्यासाठी विनवणी करावी.
सद्गुरुंच्या सगुणरुपामघून एक प्रकाश -शलाका निर्माण होईल आणि आपल्या हृदयांत प्रवेश करील. सद्गुरुंचे सगुणरुप अदृश्य होईल.
पण हृदयातील रक्तवर्ण कमळावर सद्गुरुंचा सतेज पादुका दिसतील. त्यांचे दर्शन घ्यावे.

हळूहळू कमळाच्या पाकळ्या मिटू लागतील. शेवटी जागेपणीच पाहात असलेल्या मानसपूजेच्या स्वप्नातून आपण भानावर येऊ. अशी मानसपूजा फारच लवकर संपल्याचे आपल्याला हूरहूर वाटल्यास आपण मानसपूजेत रमलो होतो असे समजावे.

सद्गुरुंना मानसपूजा फार आवडते. प्रत्येक साधकाने रोज नियमाने मानसपूजा करावी.

साधकाच्या दैवतालाही भक्ताकडे येण्याची ओढ लागते. एखादे दिवशी जर मानसपूजेला उशिर झाला तर साधकाचे मानसपूजेतील दैवत त्यास जाणीव करुन देते.

सद्गुरुंची मानसपूजा म्हणजे सदेह सद्गुरुंचा सहवास लाभणे होय. सगुणोपासनेचा हा कळस आहे.

क्रममुक्तीच्या  पायऱ्या

क्रममुक्ती चार प्रकारे प्राप्त होते
१) सलोकता
२) समिपता
३) सरूपता
४) सायुज्यता
या क्रममुक्तीच्या पायऱ्या आहेत.

१) सलोकता:- आपले आराध्य दैवत ज्या लोकामध्ये वास्तव्य करून असते त्या लोकांत राहायला मिळते याला 'सलोकता मुक्ती' असे म्हणतात. जसे शिवभक्त शिवलोकांत राहतात. तर विष्णुभक्त विष्णुलोकांत राहतात. ज्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना 'भारतीय' असे म्हटले जाते; परंतु पंतप्रधानांची भेट सर्वच भारतीयांना मिळत नाही. अशी शंभरकोटी माणसे आहेत, की ज्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पाहिलेले नाही. अगदी त्याचप्रमाणे विष्णुभक्त विष्णुलोकांत राहतात. परंतु त्यांना भगवान विष्णुंचे दर्शन प्राप्त होत नाही. ते विष्णुलोकांत राहून विष्णुभक्ती करत रहातात. हळूहळू त्यांची प्रगती होत राहते व त्यांना समिपता ही मुक्तीची दुसरी अवस्था प्राप्त होते.

२) समिपता:- समिपता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्ताला देवाच्याजवळ जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्याशी बोलण्याचे भाग्य त्याला प्राप्त होते. भक्ताने स्मरण करताच त्याची आराध्य देवता त्याच्या समोर प्रगट होते व त्याला मार्गदर्शन करते. क्रममुक्तीचा दुसरा टप्पा येथे संपतो व सरूपता या तिसऱ्या अवस्थेकडे साधकाचा प्रवास सुरु होतो. 

३) सरूपता:- सरूपता मुक्ती प्राप्त होण्यापूर्वी साधकाला उत्तम प्रतीचे ध्यान लागण्यास सुरवात होते. साधक जर विष्णुभक्त असेल तर तो विष्णुरूपाचे ध्यान करतो. हळूहळू त्याला स्वतःच्या सूक्ष्म देहामध्ये विष्णुचे रूप दिसू लागते. मीच विष्णू आहे, असा भाव त्याच्यामध्ये प्रकट होऊ लागतो. हळूहळू त्याला पूर्णपणे विष्णुचे रूप प्राप्त होते. शनैः शनैः ही शक्ती वाढत जाते व साधक विष्णुच्या रुपात कोणालाही दर्शन देऊ शकतो.
पृथ्वीतलावर असे असंख्य साधक आहेत, की त्यांना त्यांच्या आराध्य दैवताचे दर्शन झालेले आहे. या दर्शनामागील रहस्य हे आहे, की सरूपता मुक्ती प्राप्त केलेले आत्मे अशा भक्तांसमोर त्यांच्या देवतेच्या रूपांत प्रकट होतात व त्यांना आशीर्वाद देतात, वरदान देतात. परंतु या सर्व गोष्टींना एक विशिष्ट मर्यादा असते. सरूपता मुक्ती प्राप्त केलेल्या आत्म्यांना मूळ देवतेचे फक्त रूप प्राप्त होते, सामर्थ्य व अधिकार प्राप्त होत नाहीत.
परदेशामधील अनेक साधक क्रुसावरील येशूख्रिश्ताचे ध्यान करतात व त्यातच ते एकरूप होतात. हळूहळू त्यांच्या देहाला जखमा होतात व त्यातून रक्त वाहू लागते. 'मी क्रुसावरील येशुख्रिस्त आहे.' या भावसमाधीत ते राहतात. देहासहीत प्राप्त केलेली ही सरूपता मुक्ती आहे असेच म्हणावे लागेल.

४) सायुज्यता:- सायुज्यता मुक्ती म्हणजे आराध्यदेवतेमध्ये आत्मा विलीन होणे. आत्म्याचा परमात्मा होणे.

मानसपूजा का करावी?

शरीराचे व्यायाम आधी करून शरिर मजबूत करत असतो, परंतु मन आज सर्वत्र बलहीन असताना दिसते. या मनाचा सर्वसाधरणतः कोणी विचार करताना दिसत नाही।परंतु, सत्य हे आहे की, जो पर्यंत मन मजबूत होत नाही, तोपर्यंत जीवन सुदृढ होत नाही. मनाला मजबूत करण्यासाठी मनाला उभारी देणाऱ्या विचार, कल्पना, भावना यांची खतपाणी घालण्याची गरज असते. मानसपूजेत आपण देवाला, अर्थात सद्गुरुनां, त्या साऱ्या गोष्टी देतो, जे, वास्तविक आपल्याकडे नाही आणि आज रोजी आणता ही येत नाही, पण मनात आणता येतो, आणि एकदा मनाने ते सारे धरले की जीवनातही मिळवता येतो. दुसरी गोष्ट, जे वस्तू अत्यन्त मौल्यवान आहेत, अश्या वस्तू देवाला अर्थात सद्गुरुनां अर्पण करणे म्हणजे त्यांना सांगणे आहे की "देवा! ह्या सर्यापेक्षाही तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस, म्हणून हे सारे मी तुझ्या चरणी अर्पण करतो", आणि तुलाच मागतो

।। पै नाथ!आता ऐसे करावे, तुझ्यात मी विरून जावे, आणि फक्त तूच तू उरावे।।

सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "सदगुरू" सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा, लहान मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो तसे आपली प्रत्येक गोष्ट सदगुरुंना सांगून करायाची सवय असावी, सदगुरुंची सचेतन मूर्ति मनश्चक्षूपुढे आणून मनातच तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार म्हणजेच उत्तम वस्तू, फुले व नैवैद्य आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनांतल्या मनांत आणि अत्यंत शुद्ध व पवित्र भावनेने ते सदगुरुंना अर्पण करावेत. पूजा आटोपल्यावर सदगुरुंच्या सचेतन मूर्तिचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांति द्यावि. 'तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही' अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी.

मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सदगुरुंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सन्निध आहेत आपल्याशी बोलत आहे, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत, आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत,आपली कृती चुकीची असेल तर तसे सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा, ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सदगुरुंना सांगून करावयाचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सदगुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोषदर्शन होतं ,मीपणा जातो आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू असावं, त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही, हे रामनाम सदगुरुंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं, किंबहुना रामच त्याचं नाम घेतो हे सदगुरुंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो.
 
मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास आपण सांगतो इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यातच मानसपूजेची खरी मेख आहे -ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे व तसेच वर्तन ठेवले पाहिजे कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वाईट विचार व आणि असे गैर वर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नये, नाही का? थोडक्यात आपल्या हातून सदगुरुंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये, अशी एक वेगळीच जागरुकता आपल्या अंगी आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे , मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत, असा भाव असला पाहिजे .मी तुम्हाला शरण आहे, जे तुम्ही कराल ते मान्य आहे. 

जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, थोडक्यात षडरिपुच्या स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चित धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! हे भान जर सतत ठेवले तर आपला देहच मंदिर बनेल, आणि असे वागू लागलो कि आपला मीपणा आपोआप कमी होवून सद्गुरूविषयीचे प्रेम वाढीस लागेल.अशी मानसपूजा हि दिवसाचे चोवीसही तास चालली पाहिजे त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल. 

मानसपूजा- स्वामी समर्थांची

मानसपूजा करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे!

मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्वसमर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा. 
आपल्याला शिवमानसपूजा किंवा देवी मानसपूजा परिचित असेलच.  अशीच मानसपूजा सद्गुरूंचीही करावी. 

*गुरू गोविंद दोऊ खडे* *काके लागू पाय* 
*बलिहारी गुरू आपने* *गोविंद दियो बताय (संत कबीर)*

सद्गुरू आणि देव दोन्ही समोर असता प्रथम सद्गुरूंच्या पाया पडावे कारण देवाची भेट घडवून आणण्याचे काम सद्गुरू करतात. 
त्यात सद्गुरू जर *परब्रह्म नित्यचिदानंद योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज* असतील तर गोष्टच वेगळी! 
स्वामी म्हणजे चालता बोलता देव!
आपण रोज घरी देवपूजा करतो (?) खर तर उरकून टाकतो पण त्यात आपले मन क्वचितच रमते. नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती खर तर एक औपचारिकता झालेली असते. आपली स्वतःची भावना मात्र त्यात क्वचितच असते. आणि मी पूजा केली तेव्हा आता देवाने प्रसन्न व्हायलाच हवे आणि माझ्या ईच्छा पूर्ण करायलाच हव्यात हा व्यर्थ भावच त्यामध्ये अधिक असतो. पूजेच्या नावाखाली मूर्तीवर किंवा तसबिरीवर केलेले ते कोरडे उपचार असतात. 
जेथे पूजेची ही अवस्था तेथे जप, नाम, अनुसंधान, ध्यान ह्या तर फारच दूरच्या गोष्टी. 
वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजापण जमत नाही तेथे चित्ताची बैठक (स्थिरता) कशी निर्माण होणार? 
*सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे* असे जगद्गुरू तुकाराम महाराजही म्हणतात पण सगुण आराधना करत करत निर्गुण अवस्थेपर्यंत पोहोचण्याइतपत सातत्य आणि निष्ठा अभावानेच आढळते. 
अशा वेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा! जेथे तुम्हाला बाह्य पूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते. सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा!
परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पणभाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते. 

बाह्य कर्म पूजा करताना आपल्या समोर देवाची मूर्ती असते परंतु मानसपूजेत भगवंताचे अधिष्ठान स्वतःच्या हृदयात करायचे असते म्हणूनच पूजेची सुरूवात ही देवतेच्या ध्यानाने करावी. प्रथम ध्यान श्लोकाने महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे.

ध्यान श्लोक:

नमो स्वामीराजम् दत्तावतारम्  
श्रीविष्णूब्रम्हाशिवशक्तीरूपम् ।
ब्रम्हस्वरूपाय करूणाकराय 
स्वामी समर्थाय नमो नमस्ते ।

*("आदिगुरू श्री दत्तप्रभूंचे अवतार स्वरूप असलेल्या स्वामी महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो. आपण साक्षात श्री ब्रम्हदेव, श्रीहरी विष्णू आणि श्री महादेवांचे त्यांच्या शक्तिसहित असलेले एकत्रित स्वरूप आहात.*
*करूणेची मूर्ती असलेल्या परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थांना माझा नमस्कार असो!)*

देहरूपाने जरी महाराज या भूमीवर असले तरी प्रत्यक्षात महाराज म्हणजे चैतन्यस्वरूपच आहेत. गुरूपरंपरेचा उगमस्थान असलेले *श्री दत्तात्रेय* हे स्वामींमध्येच अंतर्भूत आहेत.
एकदा महाराज खासबागेत बसले होते तेव्हा स्वामींची लाडकी गाय भागीरथी आपल्या कल्याण असे नाव ठेवलेल्या वत्सासह तेथे आली. महाराजांनी लगेच आपल्या खडावा पायात घातल्या, हातात कमंडलू घेतले आणि कौपिनधारी स्वामी मूर्ती अवधूतरूपात आविष्कृत झाली. स्वामी अचानक म्हणाले, "अलख अलख माय गे!" जमलेले सगळे भाविक आनंदाने उभे राहून ते तेजस्वी रूप भावभक्तीने न्याहाळू लागले. 
हिमालयातील साधूंनाही महाराजांनी असेच दर्शन दिले होते.
अनेकांना संततीचा आशिर्वाद देऊन जीवनिर्मिती करणारे ते *ब्रम्हदेव* आहेत.
भक्तांचे पालनपोषण करणारे ते *नारायण* आहेत. परम ज्ञानाचा उपदेश करणारे ते *भगवान सदाशिव* आहेत.
प्रकृतीसुध्दा जिच्या अधीन आहे अशी आदिशक्ती सुद्धा स्वामींमध्येच सामावलेली आहे. सर्व देवता आणि त्यांच्या *शक्ति* एकत्र सामावलेले त्यांचे उगमस्थान महाराज म्हणजे परब्रह्म चैतन्यच आहे. ही सर्व सृष्टीच त्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे त्यामुळे तेच आपले जनक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मनात समस्त जीवसृष्टीविषयी अपार करूणाभाव आहे.