स्थान: शनिवारपेठ माधवनगर, ता. मिरज, जिल्हा सांगली.
सत्पुरूष: श्री नृसीहसरस्वती स्वामींचे स्वप्न दृष्टांता नुसार मंदिर स्थापना.
विशेष: बाल रूपातली संगमरवरी त्रिमूर्ती.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील माधवनगर गावी शनिवार पेठेत फडके यांचे दत्तमंदिर आहे. मंदिरातील दत्तात्रेयांची मूर्ती पांढऱ्या संगमरवरी पाषाणाची असून तीन मुखी व षड्भुज आहे. बालरूप दत्ताची ही मूर्ती रंगीत असून मूर्तीच्या मागे गाय व पुढे चार श्वान आहेत. मूर्तीच्या पुढे लहानसा कट्टा असून त्यावर काळ्या पाषाणाच्या पादुका आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेस विशाल औदुंबर वृक्ष आहे.
या मंदिराचे मालक वासुदेव विष्णू फडके हे सातारा जिल्ह्यात रेव्हेन्यू खात्यात नोकरीस होते; पण त्यांना काही शारिरीक पीडा असल्याने श्रीक्षेत्र गाणगापूर व औदुंबर येथे श्रीसेवेप्रीत्यर्थ त्यांनी दोन वर्ष काढली. नंतर प्रकृतिस्तव त्यांना लवकरच सेवानिवृत्त व्हावे लागले. गाणगापूर येथे श्रीसेवा करत असता त्यांच्या अंगात संचार होऊन श्रींची स्थापना करण्याविषयी त्यांना आदेश देण्यात आला. औदुंबर येथे असता मार्गशीर्ष महिन्यात एका रात्री फडके यांना श्रींनी स्वप्नात येऊन स्थापनेची प्रेरणा केली
शके १८६३च्या माघ शुद्ध सप्तमीस दिनांक २३-०१-१९४२ रोजी यथाविधी माधवनगर येथील मंदिरात श्रींची स्थापना करण्यात आली.
गाणगापूर, औदुंबर, वाडीप्रमाणेच येथेही श्रींची त्रिकाळ पूजा होते. प्रसंग-विशेष मूर्तीस अलंकार घातले जातात. चातुर्मास सोडून प्रत्येक पौर्णिमेस श्रीदत्तप्रभूंची पालखी काढण्यात येते. हा सोहळा फारच प्रेक्षणीय असतो.
या मंदिरात रामनवमी, हनुमानजयंती, गुरुपौर्णिमा, श्रीपादवल्लभजयंती (गणेशचतुर्थी), गुरुद्वादशी, श्रीनृसिंहसरस्वतीजयंती (पौष शु. २) माघ वद्य ५ औदुंबर पंचमी असे उत्सव, समारंभ साजरे केले जातात. प्रभुस्थापनेचा वाढदिवस हा सर्वात मोठा उत्सव माघ शु. सप्तमी ते नवमी असा तीन दिवसांचा असतो.