बडोद्याचे श्रीनीलकंठेश्र्वर महादेव मंदिर

स्थान: बाबाजीपुरा शिवाजी रोड, दांडिया बाजार, बडोदा (गुजराथ राज्य)  
सत्पुरूष: सदाशिव रामचंद्र पुराणिक (वासुदेवानंद सरस्वतीचे शिष्य)
विशेष: श्री रंगअवधुत स्वामींकडून गुरुचरित्र पारायण, नामसप्ताह, प्रथा घालून दिली. डोंगरे शास्त्रींनी सभा मंडप उभारून दिला

बाबजीपुरा (शिवाजी रोड) दांडिया बाजारात श्रीनीलकंठेश्र्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्याच्या विस्तीर्ण आवारात उत्तरेच्या बाजूस हे ‘श्रीदत्तस्थान’ आहे. देवस्थान विस्तीर्ण अशा औदुंबराच्या वृक्षछायेखाली आहे. पूर्वी प्रसिद्ध श्रीनीलकंठेश्र्वर महादेवाचे विस्तीर्ण आवारात एक औदुंबराचा वृक्ष होता.

प. पू. श्रीवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज (गरुडेश्र्वर) यांचे एकनिष्ठ परम शिष्य सदाशिव रामचंद्र पुराणिक हे शिनोर (चांदोह - नर्मदातीरी) येथे रहात असत. त्या वेळी श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचा मुक्काम मार्कण्डेश्र्वर महादेवाच्या मंदिरात होता. स्वामीमहाराज सदाशिव रामचंद्र पुराणिक यांच्या येथे भिक्षेस येत असत. स्वामी महाराजांनी त्यांना गुरुमंत्र दिला होता. त्यांचे चिरंजीव गजानन सदाशिव पुराणिक हे बडोद्यास रहात होते. पुढे त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ वरील ‘औदुंबर’ वृक्षास सन १९५२ साली पार बांधला.

सन १९५६ साली त्या ‘औदुंबर’ वृक्षाखाली श्री. लक्ष्मणराव भांबुरकर यांनी देऊळ बांधले व माघ शुद्ध रथसप्तमीच्या शुभमुहूर्तावर त्या मंदिरात श्रीगुरू दत्तात्रेय यांच्या सुंदर मूर्तीची स्थापना करण्यात आली व उत्सवास सुरुवात झाली. सात दिवस अखंड ‘श्रीगुरुचरित्र’ व अखंड ‘नामसप्ताह’ वार्षिक होऊ लागले. शेवटच्या दिवशी भंडारा (समाराधना) होतो. श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते.

प. पू. रंग अवधूत महाराज
प. पू. रंग अवधूत महाराज

या संस्थानास प. पू. रंग अवधूत महाराज (नारेश्र्वर) यांनी भेट दिली असता त्यांनीच ‘श्रीगुरुचरित्र-सप्ताह’ व ‘नामसप्ताह’ हे करण्याबद्दलची प्रथा घालून दिली आहे.

सन १९६० साली बडोद्यातील सुप्रसिद्ध लोकप्रिय श्रीमद्भागवतसप्ताहविशारद प. पू. श्री. रामचंद्र केशव डोंगरेशास्त्री यांनी औदुंबराचा पार मोठा करून सुंदर सभामंडप उभारून दिला आहे. येथे दर गुरुवारी आरती, दत्तबावनी पठन व भजन होते. त्या दिवशी दत्तोपासक मंडळींची दर्शनासाठी फारच गर्दी होते. मंदिराजवळच श्रीनीलकंठेश्र्वर महादेवाचे, श्रीगणपतीचे व दिंडोरकरांचे श्रीराममंदिर आहे. तेव्हा सर्व भक्तमंडळी एकत्र जमून दर गुरुवारी सुंदर यात्रा भरते. गुरुद्वादशी, गुरुप्रतिपदा, प. पू. श्रीवासुदेवानंदस्वामी महाराजांची पुण्यतिथी, श्रीदत्तजयंती, गुरुपौर्णिमा वगैरे उत्सव समारंभाने साजरे होतात.