श्री क्षेत्र कडगंची

स्थान: गाणगापूर पासून ३४ कि. मी. अंतरावर, आळंद-गुलबर्गा मार्गावर (कर्नाटक राज्य)   
सत्पुरूष: श्रीगुरूंचा पट्टशिष्य सायंदेव साखरे  
विशेष: कळ्या पाषाणाची दत्त मूर्ती, श्री गुरुचरित्राची मूळ प्रत  
पादुका: करुणा पादुका.

श्री दत्तात्रय मंदिर कडगंची
श्री दत्तात्रय मंदिर कडगंची

श्री कडगंची, श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ! कर्नाटक राज्यातील आळंद-गुलबर्गा मार्गावर असलेलं सुमारे १०,००० च्या आसपास लोकसंख्या असलेलं एक काहीसं अज्ञात आणि दुर्लक्षित खेडं! श्रीदत्तात्रेय संप्रदायात वेदतुल्य असलेल्या 'श्रीगुरुचरित्र' या श्रीदत्तप्रभूंच्या दिव्य अवताराच, ज्यांना भक्तगण अत्यादरानं ‘श्रीगुरु’ म्हणतात अर्थात् श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराजांचं, अलौकिक चरित्रवर्णन करणा-या दैवीग्रंथाचं लेखनस्थान असल्यानं या परमपावन स्थानी प्रत्येक दत्तभक्तानं माथा टेकवण्यासाठी आवर्जून जायला हवं.

श्रीगुरुंचा कालावधी हा इ.स. १३७८ ते इ.स. १४५८ मानला जातो. बाळसरस्वती, कृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, माधवसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतिसरस्वती आणि सिद्धसरस्वती असे श्रीगुरुंचे मुख्य ७ संन्यासी शिष्य होते. या बरोबरच संसार करुनही श्रीगुरुंना निरंतर समर्पण भावानं पूजणारे अनेक संसारीजन श्रीगुरुंचे शिष्य होते. या संसारी शिष्यांत श्रीगुरुंचे अंतरंग शिष्य होते श्री सायंदेव साखरे, अर्थात् श्रीगुरुचरित्रकार श्री सरस्वती गंगाधरांचे खापर पणजोबा, जे कडगंची या मूळ गावी राहून वासरब्रह्मेश्वर (आज आंध्रप्रदेशात असलेलं बासर! या ठिकाणी सरस्वतीमंदिर आहे.) या ठिकाणी अधिकारी म्हणून तत्कालीन यवनराजाच्या पदरी कार्यरत होते. श्री सायंदेव-नागनाथ-देवराव-गंगाधर आणि सरस्वती (श्रीगुरुचरित्राचे लेखक) असा हा श्री सायंदेव साखरे घराण्याचा वंशविस्तार आहे.

dattaray mandir kadganchi
श्री दत्तात्रय मंदिर कडगंची

श्री. सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातच ३८ व्या ओवीत 'भाषा न ये महाराष्ट्र्' असा उल्लेख करुन स्वतःला मराठी भाषा येत नसल्याचं सांगून, केवळ श्रीगुरुंच्या दैवी कृपेनंच आपण हा एवढा महान आणि काव्यात्मक ग्रंथ मराठीत लिहू शकलो हे पुनःपुन्हा कथन केलं आहे.

यावनी शब्द नसणं हे पहाता श्री. सरस्वती गंगाधरांवर श्रीगुरुंचा अखंड वरदहस्त होता हेच काय ते निर्विवाद सत्य आहे. श्री सायंदेवांच्या भाग्याचं थोरपण वर्णन करण्यास तर शब्दसंपदाही अपूरी आहे. यवनराज्यात नोकरी करुनही अनन्यभावे श्रीगुरूंच्या श्रीचरणी त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. श्रीगुरुंच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांच्याच आज्ञेनं त्यांनी यवनाची चाकरी सोडली आणि पूर्णवेळ श्रीगुरुसान्निध्यात ते राहू लागले.

श्री सरस्वती गंगाधरांना ‘श्रीगुरुचरित्र’ श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलं. हेच श्रीसिद्धसरस्वती आपण श्रीगुरुंच्या प्रमुख ७ संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं, १३ अध्यायातील २० व्या ओवीत सांगतात. म्हणजेच, श्री सायंदेवांच्या काळातील श्रीसिद्धसरस्वतींनी, स्वतः येऊन श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं असाच सर्वसाधारण समज आहे.

परंतु यात दडलेला गूढार्थ पुढ़ीलप्रमाणे आहेः- १०० वर्षांत साधारणतः ४ पिढ्या होऊन जातात. याचाच अर्थ असा की त्यावेळी श्रीसिद्धसरस्वतींचं वय १००हून अधिक असायला हवं. मात्र ‘अवतरणिका’ या नामाभिधानानं प्रसिद्ध झालेल्या, ५२ व्या अध्यायातील १०५वी ओवी 'आपण आपली दावूनि खुणा, गुरुशिष्यरुपे क्रीडसी' याचा सखोल विचार केल्यास श्रीगुरुंनीच, आपलं तत्कालीन अवतारकार्य समाप्तीसाठी कर्दळीवनात अंतर्धान पावल्यानंतर १०० वर्षानी पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन आपले परमशिष्य असलेल्या श्री सायंदेवांचे खापरपणतू श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं. श्री सायंदेव आपल्याच घराण्यात, श्री सरस्वती गंगाधर या रुपानं पुनर्जन्म घेऊन आले आणि त्यांना स्वयम् भगवन् श्रीदत्तात्रेयांनी (श्रीगुरु श्रीनृसिंहसरस्वतींनी) श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात श्रीगुरुचरित्र कथन केलं असं मानलं जातं. स्वतःच्याही नावात 'सरस्वती' असल्यानं श्री सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्रात स्वतःचा उल्लेख 'नामधारक' (श्रीगुरुंच्या 'श्रीनृसिंहसरस्वती' या नावातही 'सरस्वती' असल्यानं) असा केलेला आहे.

कडगंची
श्री. सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी

कडगंची हे स्थान गुलबर्गा जिल्ह्यात, आळंद तालुक्यात आळंद-गुलबर्गा मार्गावर आहे. श्री सायंदेवांचे पुढे वंशज नसल्यानं १९९५ साली, जेंव्हा त्यांच्या कडगंचीतील रहात्या वाडयाचा जीर्णोद्धार करायचं ठरलं, तेंव्हा जुन्या झालेल्या एकेक भिंती पाडण्यास सुरुवात झाली. कार्यात एका ठिकाणी 'करुणा पादुका' आणि नाणीयुक्त कलश आढळला. आजही त्या पादुका कडगंचीस पहावयास मिळतात. खोदकाम करताना माती निघून येण्याऐवजी सुगंधी भस्म येऊ लागलं. त्याचा परिमल मैलो न् मैल पसरला होता. श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलेली आणि श्री सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आजही याच ठिकाणी गुप्तरुपात आहे. श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या मागे असलेल्या पाताळगंगेतून, पुष्पांच्या आसनावर बसून कदलीवनात जाण्याआधी श्रीगुरुंनी काठावर उभ्या असलेल्या चार शिष्यांना (ज्यामधे श्री सायंदेवही होते), "आम्ही पैलतीरावर पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची ४ प्रसादपुष्पं येतील. ती काढून घ्या." अशी आज्ञा दिलेली होती. त्यातील एक शेवंतीपुष्पं श्री सायंदेवांना लाभलं आणि शेवंतीचं तेच प्रसादपुष्प आजही त्या मूळ हस्तलिखितावर ठेवलेलं आहे. ‘अधिकारी’ दत्तभक्तांना त्याचं दर्शन आजही होतं. कडगंची मंदिराच्या गाभा-यात अधूनमधून येत असलेला अद्वितीय सुगंध हे त्याचंच कारण आहे.

मूळ श्रीगुरुचरित्रात श्री सरस्वती गंगाधरांनी स्वतः लिहीलेला मंत्रशास्त्राधारित असा एक अध्यायही होता. म्हणजेच मूळ श्रीगुरुचरित्र ५३ अध्यायांचं होतं. मात्र श्रीसिद्धसरस्वतीरुपातील श्रीगुरुंच्या आज्ञेनं त्यांनी तो त्यात समाविष्ट केला नाही. "गायत्री मंत्राचं पुरःश्चरण केलेल्यालाच तो वाचता येईल" असं श्रीसिद्धसरस्वतींनी श्री सरस्वती गंगाधरांना सांगितलं. या ५३व्या अध्यायाच्या रक्षणार्थ श्रीगुरुंनी एक सर्प आणि 'चंडदुरितखंडनार्थ' असा एक दंड यांचीही व्यवस्था करुन ठेवलेली आहे.

कडगंची पोथी
श्री. सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी

श्री सायंदेवाची वंशावळीची ५व्या पिढीतील (वंशावळी- सायंदेव, नागनाथ, देवराव, गंगाधर, सरस्वती) संततीचे कारणीक पुरुष श्री सरस्वती गंगाधर यांच्याकडून श्री गुरूंवरील अत्यंत भक्तिभावाने व लोककल्याणाच्या तळमळीने, श्री गुरुंच्या संकल्पित प्रेरणेने निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे, भक्तांचे मनोवांछित पूर्ण करण्यासाठी, कल्पवृक्ष सदृश्य पारायणासाठी अत्यंत उपयुक्त, हृदय असा हा वेदतुल्य श्री गुरुचरित्र ग्रंथ होय.

श्री क्षेत्र कडगंची हे गाव कर्नाटकातील तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा येथे आहे. श्री गुरुचरित्रात १४व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. या अध्यायाचा नायक आहे सायंदेव. सायंदेव हा श्री नृसिंहसरस्वती यांचा प्रिय व सर्वश्रेष्ठ परमभक्त होता. त्यांच्याच पाचव्या पिढीत जन्माला आले सरस्वती गंगाधर. हेच सध्याच्या गुरुचरित्राचे लेखनकर्ते. 

अद्भुत चमत्कार दाखवून श्री नृसिंहसरस्वती महाराजांचे आवडते शिष्य सायंदेव ज्यांनी गुरुचरित्र लिहिले त्यांचे स्थान म्हणजे कडगंची येथील दत्तमंदिर. त्यामधील दत्ताची भव्य मूर्ती पाहून मनाला भुरळ पडते. या दत्त मूर्तीची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी केली आहे. येथे ठाकूर महाराज, दंडवते महाराज यांनी येऊन कार्यास आरंभ करण्यास आशीर्वाद दिला. स्वामीसेवक दादा जोशी कडगंचीपासून थोड्या अंतरावर असलेल्या लाड चिंचोळा येथील सद्गुरू श्रीधरस्वामी (वरदहळ्ळी) यांचे जन्मस्थान पाहण्यास महाशिवरात्रीस जात असता कडगंची येथील श्री सायंदेव यांचे पडके घर पाहून ते मनी दु:खित होत. ज्यांनी गुरुचरित्र लिहून जगाच्या उद्धारासाठी प्रसिद्ध केले, मनसोक्त उपासना करून दु:खसागरातून अमृतसागरात, आनंदात डुंबत ठेविले अशा थोर व्यक्तीचे पवित्र स्थान उत्तमच पाहिजे, असे विचार त्यांच्या मनात येत होते.

एका महाशिवरात्रीला लाड चिंचोळीस जाताना कडगंची येथील सत्पुरुष सायंदेव यांचे पडक्या घरी निरीक्षण करीत बसले. अंगावर शहारे आले. गुरुचरित्राची हस्तलिखित पोथी एका पेटीमध्ये एका लाल फडक्यात बांधून ठेवली आहे. त्यावर नृसिंह सरस्वती महाराजांनी दिलेले शेवंतीचे फूल त्या पोथीवर असल्याचे दिसले. ते भान हरपून स्वस्थ बसले. भानावर आल्यावर डोळ्यास दिसलेले दृश्य लोकांना सांगितले. थोड्याच वेळात गावकरी मंडळी त्यांची विचारपूस करण्याकरिता आले. गुरुचरित्राची मूळ प्रत आहे. तेव्हा ते म्हणाले, या घरातच, या ठिकाणी आहे. ती काढण्याचा प्रयत्न करू नका. येथे मंदिर बांधून, दत्तमूर्ती स्थापून, नित्य भजन-किर्तन चालू ठेवा. अविश्र्वास दाखवू नका. शिवशरणाप्पा म्हणाले, ‘महाराज, तुमच्या शब्दाप्रमाणे आम्ही वागू. हे काम पूर्ण करण्यास आमच्या पाठीशी उभे राहा. ही तुमच्या प्रती आमची विनंती आहे.’ पुढे त्यांनी सायंदेव ट्रस्ट समिती, श्री दत्तात्रय टेंपल कडगंची या नावाने ट्रस्ट स्थापून कामास सुरुवात केली. शिवशरणाप्पा यांनी पूर्ण विश्वास ठेऊन त्याने खोदकामास सुरुवात केली. श्री शिवशरणाप्पा यांच्या घराची परंपरा दत्तसंप्रदायाप्रमाणे. दत्तावर त्यांची अपार श्रद्धा होती. हस्तलिखित पोथी कदाचित भिंतीमध्ये ठेवलेली असेल म्हणून भिंत खोदण्याचे कार्य सुरू केले. तेथे पोथी न मिळता पादुका मिळाल्या. त्या पादुका आजही पाहावयास मिळतात. मग पुण्याचे जोशी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे खोदकामास सुरुवात झाली. सुमारे ६ ते १० फुटांपर्यंत खोदून झाले. जिथे पोथे असेल म्हणून सांगितले होते, तिथून मनाला मोहून टाकणारे सुगंधी भस्म निघू लागले. लोक जमा झाली. त्यांनी भस्म कपाळी लावून श्री गुरुदत्तांचा जयजयकार केला. 

कडगंची येथील दत्तमंदिर मधील दत्ताची भव्य मूर्ती श्री सायंदेव यांचे घर
कडगंची येथील दत्तमंदिरातील दत्ताची मूर्ती आणि
श्री सायंदेव यांचे घर  

ट्रस्टींमधले सर्व मेंबर एकदिलाने मंदिराचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे यासाठी धडपडतात. नि:स्वार्थी वृत्तीने श्री शिवशरणाप्पा हे गावोगावी जाऊन डोनेशन मिळवितात. मोठमोठ्या लोकांनी बांधकामास हातभार लावला आहे, लावतच आहेत. त्यामुळे बांधकाम अखंड चालूच आहे. आजपावेतो मंदिर बांधण्यास सुमारे ८० लाख खर्च आला असून सध्या गोपूर बांधण्याचे कार्य चालू आहे. त्यासाठी सुमारे ३ लाखपर्यंत खर्च येणार आहे. त्याची तरतूद चालू आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम सुरू झाल्यापासून आजपावेतो पैशाची अडचण आली नाही. महाराष्ट्रातील थोर संत, सत्पुरुष येथे भेटी देऊन जातात. श्री ठाकूर महाराज यांनी साधनासदनात श्री नृसिंहसरस्वती यांची मनोहर मूर्ती बसविली आहे. अशातऱ्हेने कडगंची क्षेत्राची निर्मिती झाली.

श्री सायंदेवांच्या कडगंचीतील मूळ वाडयाच्या जागी आज एक सुंदर देऊळ उभारलं आहे आणि आत भगवान् श्रीदत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील नितांत सुंदर मूर्ती, करवीर पिठाच्या श्री शंकराचार्यांनी २५ फेब्रुवारी २००२ मध्ये स्थापन केलेली आहे. कर्नाटकातील गदग शहरातील एका मूर्तीकारानं ही मूर्ती घडवली आहे. ‘ही एवढी सुंदर मूर्ती श्रीदत्तप्रभूंनीच माझ्याकडून करुन घेतली आहे’, अशी त्याची श्रद्धा आहे. मूर्ती घडवतानाही त्याच्याकडून केवळ गुरुवारीच काम घडत असे.

कडगंची येथील दत्तमंदिरातील दत्ताची मूर्ती
कडगंची येथील  दत्ताची मूर्ती

खोदकाम सुरु असताना, सन २०१२ मधे, एकावेळेस दोघंजण बसू शकतील अश्या उंचीची, आणि केवळ बसूनच आत प्रवेश करता येईल अशी, आतमधे तेलाचा दिवा बसू शकेल असा कोनाडा असलेली एक गुहाही जमिनीखाली आढळली. याला ६ पाय-या होत्या. हीच श्री सायंदेवांची ध्यानगुहा आणि याच स्थळी इ. स. १५५८ च्या सुमारास (म्हणजे श्रीगुरूंच्या कदलीवन गमनानंतर सुमारे एका शतकानं), पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन श्रीगुरुंनी परमशिष्य श्री. सायंदेवांचे खापरपणतू श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं आणि त्यानुसार श्री सरस्वती गंगाधरांनी ते शब्दबद्ध केलं. मूळच्या ६ पाय-यांपैकी ३ पाय-या अजूनही आहेत. त्याच उतरुन जाऊन, खाली असलेल्या गुहेत बसून साक्षात् श्रीदत्तप्रभूंनी श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र श्रीसिद्धसरस्वतीरुपात सांगितलं.

कडगंचीचे सायंदेव दत्तसंस्थान म्हणजेच श्री दत्तगुरूंच्या अस्तित्त्वाची पुण्यभूमी होय.

दत्तगुरूंच्या पादुकांचे महत्त्व

श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ-पादुका तीन ठिकाणी आहेत. संन्यास घेऊन ते जेव्हा घराबाहेर पडले, तेव्हा प्रथमत: ते औदुंबर येथे आले. तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला. तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या. त्या पादुकांना ‘विमलपादुका’ असे म्हटले जाते. विमल म्हणजे स्वच्छ, निर्मळ, शुद्ध असा भावार्थ होतो. म्हणजेच येथील अनुष्ठानापासूनच त्यांनी आपल्या स्वत:साठी नव्हे, पण आम्हाला-तुम्हाला तेथील अनुष्ठानाचे महत्त्व कळावे यासाठी उपासनेतील शुद्ध, निर्मळ, स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे. कारण अनुष्ठानासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट हीच असते. उपासनेची प्रगती ही अशा मनोधारणेतून होत असते. पुढे श्रीनृसिंहसरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले. तेथे त्यांनी बारा वर्षे तप केले. तेथील पादुकांना ‘मनोहरपादुका’ असे म्हटले गेले आहे. का म्हणाल? तर तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते, तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंदस्वरूपही असते. त्याचे आणखीही एक कारण असे की, स्वत: श्रीगुरूंनी सांगितले की,

‘तुम्हासहित औदुंबर । आमुच्या पादुका मनोहर ।
पूजा करिती जे तत्पर । मनकामना पुरती जाणा ॥ (अ. १९ ओवी ८०)

त्यानंतर श्रीनृसिंह सरस्वतीमहाराज गाणगापूर येथे आले. प्रथम त्यांनी संगमावर चोवीस वर्षे अनुष्ठान केले. राजाने त्यांना गावात येण्याची प्रार्थना केली व वाजतगाजत गावात आणले. तेथेच सध्याचा मठ आहे. श्रीशैलपर्वतास जाऊन, पाताळगंगेपलीकडील कर्दळीवनात ते गुप्त झाले. पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या. त्यास ‘निर्गुणपादुका’ असे म्हटले जाते. निर्गुण म्हणजे परब्रह्मस्वरूप, तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारित, असाही भावार्थ आहे. सत्त्व-रज-तम या त्रिगुणापलीकडे गेलेले हे अवतारी-सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात. त्यांच्या निर्गुणपादुकांची पूजा-आराधना केल्यास निर्गुण-सगुण असे दर्शन होते.

सायंदेवांकडील ‘करुणा-पादुका’

श्रीनृसिंहसरस्वतीमहाराज यांचे चार पट्टशिष्य होते. ते म्हणजे सायंदेव, नंदिनामा, नरहरी, सिद्धमुनी- हे होत. सिद्धमुनी हे सतत महाराजांच्या बरोबरच वावरत असल्याने त्यांना अनेक हकिकती ठाऊक होत्या. त्या त्यांनी आपले शिष्य नामधारक यांना सांगितल्या. त्यामुळे सिद्धमुनी-नामधारक संवाद डोळयापुढे ठेवूनच सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्रग्रंथ लिहिला. “महाराजांनी आपल्या पादुका सायंदेव यांना पूजेसाठी दिल्या होत्या. सायंदेव त्यांची नित्य पूजा करीत असत. त्यामुळे त्या पादुका त्यांच्या कडगंची येथील घरातच ठेवलेल्या होत्या. पुढे म्हणजे तसे अलिकडे १९५५ मध्ये प. पू. श्रीगुरुनाथबाबा दंडवते महाराज कडगंचीला आले असताना त्यांच्या वंशजांनी त्यांना या पादुका दाखविल्या. त्यांनी या पादुकांचे नामकरण ‘करुणापादुका’ असे केले. या पादुका सध्या देवस्थानातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीजवळच ठेवलेल्या आहेत.” अशी माहिती श्री. शिवशरणप्पा मादगुंडी यांनी दिली. श्री. शिवशरणप्पा यांची बहुथोर पुण्याई अशी की, त्यांनी सायंदेवाच्या घराचे पुनरुज्जीवन करून तेथेच सध्याचे श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे. 

दत्त मन्दिर कडगंची
कडगंची येथील श्रीदत्तात्रेय 

श्री शिवशरणप्पांचे कार्य

श्री शिवशरणप्पांनी देवस्थानचा जीर्णोद्धार करताना अपार कष्ट घेतले आहेत. त्यांना (स्व) दादामहाराज जोशी यांची मार्गदर्शनही लाभले होते. पुष्कळ भ्रमंती केली आहे. ‘श्रीगुरुदेव दत्त” एवढ्याच नामघोषाने ते आवाहन करतात. त्यांची कानडी आणि हिंदी भाषा अत्यंत मधुर आहे. कारण त्यात कमालीची विनम्रता व सेवाभावीवृत्ती दडलेली आहे. तिचे प्रकटीकरण होताना जणू ‘भक्तिसंवाद’ घडत असल्याची अनुभूती येते. त्यांचे बोलणे हेही प्रवचन म्हणावे इतके भक्तीने होत असल्याने त्यांना सर्वांकडून सर्वतोपरी साहाय्य मिळत आहे. याची ग्वाही त्यांच्या कार्यानेच मिळते. खरे तर कोणत्याही कार्याचे श्रेय ते स्वत:कडे कधीच घेत नाहीत. नेहमी ‘श्रीनृसिंह सरस्वतीजीकी कृपा’ एवढेच वचन ते उच्चारतात. हीच त्यांच्या मोठेपणाची ओळख आहे. दत्तगुरूंची त्यांच्यावर अपारकृपा आहे, याची ग्वाही त्यांच्या मंदिर उभारणीतून दिसून येते. श्रीदत्तगुरूंची अत्यंत सुंदर अशी मूर्ती इथे विराजमान झाली.

सायंदेवाचे  घर म्हणजेच  सध्याचे कडगंची होय. याठिकाणी साधकांना सर्व  सोयी उपलब्ध आहेत. येथील दत्तमूर्ती इतरत्र कोठेही नाही. कडगंचीस बरेच जिर्णोद्धाराचे व नवीन बांधकामही चालू आहे.

श्री सायंदेव
श्री गुरूंचा पट्ट शिष्य श्री सायंदेव

श्री क्षेत्र कडगंची विशेष

औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात, पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत, जी फारशी परिचित नाहीत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय..
संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थानमाहात्म्यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्रीक्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इ. क्षेत्रे सर्वाना माहीत आहेत. मात्र काही प्रमुख दत्त क्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पीठापूर, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद इ. या ठिकाणी निवास आणि भोजनाची नि:शुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. तेथे आपल्याला गुरुचरित्र पारायण, दत्तयाग इ. विधीही करता येतात. प्रत्येक भाविकाने भेट द्यायलाच हवीत अशा काही दत्त क्षेत्रांची माहिती खालीलप्रमाणे –

श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे चार पट्टशिष्य होते असे सांगितले जाते. अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यम येथे पाताळगंगेजवळही हे चौघे शिष्य होते. स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी चार शेवंतीची फुले पाठवली ती या चार शिष्यांना मिळाली असे मानले जाते. हे चौघेजण म्हणजे श्रीसायंदेव, श्रीनंदिनामा, श्रीनरहरी आणि श्रीसिद्धमुनी हे होते. यातील श्रीसायंदेव हे कडगंची या गावचे. कडगंची हे गाव कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील आळंद या तालुक्यामध्ये आहे. श्री सायंदेव यांचे आडनाव साखरे हे होते. त्यांच्या वंशातील पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ कडगंची येथे लिहून झाला. श्री सायंदेवाची पुढील वंशावळी अशी आहे, श्रीसायंदेव – श्रीनागनाथ – श्रीदेवराव – श्रीगंगाधर – श्रीसरस्वती. श्रीगुरुचरित्र या दत्तभक्तांसाठी आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथाचे लिखाण कडगंची या ठिकाणी झाले. त्यामुळे याचे स्थानमाहात्म्य अपरंपार आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत साखरे घराण्यात होती. गुरुचरित्राची मूळ प्रत येथे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्रीदत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरूपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भरलेला आहे असे मानले जाते. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली, ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची हे आहे. म्हणूनच याला श्रीदत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल.श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीसायंदेवांना आपल्या पादुका दिल्या होत्या. त्यांची ते नित्यनियमाने पूजा करीत असत. त्याच या करुणा पादुका. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी या करुणा पादुका ठेवलेल्या आहेत. या ठिकाणचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे.

गुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक यातील संवाद रूपाने झाले आहे. सिद्धमुनींनी श्रीगुरूंच्या चरित्रातील कथानामधारकाला सांगितल्या आणि त्या डोळ्यांसमोर ठेवून श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.

या क्षेत्री असे जावे

श्री क्षेत्र कडगंची (गुलबर्गा, कर्नाटक)-

वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले. हे स्थान प्रसिध्दीस नव्हते. परंतु आता श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे. गाणगापूरपासून ३४ कि. मी. अंतरावर हे पुण्य स्थान आहे. सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता. त्याच्याच ५ व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला. श्री सिध्द मुनींनी सांगीतले आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहीले तोच गुरुचरित्र ग्रंथ होय. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनामधारक संवादे असा उल्लेख आहे. त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय. सायंदेवाचे घराचे जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानचे मोठे बांधकाम चालू आहे. येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहून मन थक्क होते. 

कडगंचीस कसे जावे

गाणगापुर गाव ते रेल्वे स्टेशन २२ कि. मी. अंतर आहे. पुढे गाणगापूर रेल्वेस्टेशन पासून ३० कि. मी. अंतरावर कडगंची हे पवित्र स्थान आहे.
गुलबर्ग्यापासून २३ कि.मी. तर अक्कलकोट पासून ६५ कि. मी. अंतरावर आहे.
अक्कलकोटहुन वागदारीला जावे. पुढे सारसंबा रस्त्याने गेल्यास आळद चेकपोस्ट असून उजव्या बाजूस गुलबर्गा रस्ता आहे. 

श्री सायंदेव देवस्थान ट्रस्ट समिती 
मुक्काम पोस्ट कडगंची 
ता. आळंदी, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक राज्य
पिनकोड- ५८५३११.
फोन: ०८४७७-२२६१०३

बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा: कडगंची,
ब्रँच नंबर: ३८५२, अकाउंट नंबर: १०८१४१८५३५७     

या ठिकाणी जावयाचे असल्यास खालील दूरध्वनीवर संपर्क केल्यास सर्व सोयी उपलब्ध होतील.  
१) शिवशरणप्पा: ० ९७४०६ २५६ ७९   
२) विश्वनाथ: ० ९९०११ ७८५ ९३