श्री अण्णाबुवांचे बालपण व दत्तात्रेयाची कृपा
“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती” या उक्तीप्रमाणेच महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज, मिरज यांचा अवतार झाला. बोरपाडाळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथे कुलकर्णी कुटुंबात यांचा जन्म झाला. त्यांची जन्मतिथी ज्ञात नसली तरी ते अक्कलकोट स्वामी समर्थांचे समकालीन होत. आषाढ शुद्ध चतुर्थी, शके १७९४ (९ जून १८७२) या पुण्यतिथीस त्यांनी मिरज येथे आपला देह ठेवला. त्यांचे बहुतेक वास्तव्य मिरज परिसरात तसेच अर्जुनवाड, शिरोळ, नरसोबावाडी, म्हैसाळ, आरग, बेडग, सांगली येथे होते.
बालपणातील त्यांची अवधूत दिगंबर वृत्ती व मुंजीनंतरही त्याचे वर्तनात काही फरक पडला नाही असे पाहून चिंताग्रस्त आई वडील त्यांना नरसोबावाडीस घेऊन आले. त्यांचेसाठी श्री दत्तात्रेयास साकडे घातले. श्री दत्तात्रेयांनी हे अवतारी बालक माझेच रूप आहे. त्याला इथेच राहू दे. काळजी करू नये असे सांगीतले व त्यांना आपल्या गावी परत जाण्यास सांगीतले. तेव्हापासून काही काळ श्री अण्णाबुवा वाडीतच होते. वाडीतील काही खट्याळ लोकांनी त्यांना जाणूनबुजून त्रास देताच श्री दत्तात्रेयांनी ह्या खट्याळ लोकांना चोप देऊन चांगलाच समाचार घेतला व त्यांस त्रास न देण्याबाबत दरडावले. त्यामुळे अण्णाबुवा हे दत्तावतारी असल्याचे सर्वश्रृत झाले. त्यानंतर आपल्या लीलाकार्याकरीता, वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रामुख्याने मिरज व आसपासच्या परीसरात त्यांची भ्रमंती व वास्तव्य झाले.
श्री अण्णाबुवा हे आजानुबाहू व तेजःपुंज तर होतेच, पण त्यांच्या भव्य कपाळावर जणूकाही तिसऱ्या दिव्य डोळ्याची खूण होती. त्यांचे गळ्याभोवतीच्या तीन वळ्या ब्रह्मा, विष्णू व महेशाचे अस्तित्व दर्शवीत होत्या. ते दिगंबर अवलिया होते.
स्वामी समर्थांप्रमाणेच श्री अण्णाबुंवांच्या लीला भक्त-संकट निवारण करणाऱ्या, सज्जनांना अभय तर दुर्जनांना वठणीवर आणणाऱ्या आहेत. स्वतः श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटास त्यांचेकडे आलेल्या कुष्ठव्याधीग्रस्त व्यक्तीस व्याधी निवारण्याकरीता “मिरजेला कोडतात जा. तेच तुझी व्याधी निवारण करतील. ते म्हणजे मीच आहे.” असे सांगून श्री अण्णाबुवांच्याकडे पाठविले असता श्री अण्णाबुवांनी आपल्या पदस्पर्शाने त्याचे कुष्ठ निवारण केले.
अवतारी महात्म्यांची सत्ता सर्व प्राणीमात्रांवर व निसर्गावर असते. त्यांचे अंगी भूतदयेचा नितांत व निरंतर वास असतो. सांगलीच्या राजेसाहेबांचा पिसाळलेला हत्ती श्री अण्णाबुवांच्या केवळ प्रेमळ नजरेने व स्पर्शाने वठणीवर आला व नतमस्तक झाला. अण्णाबुवांच्या काही लीलांचा समावेश म्हैसाळचे अण्णाबुवांचे शिष्य व समकालीन कवी केशवानंद (केशव मोरेश्वर कुलकर्णी) यांनी त्यांच्या चरित्र ग्रंथात ओवीबद्ध केला आहे. तसेच मिरजेचे श्री. वि. गो. साठ्ये यांनी त्यांच्या “चरित्र दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज” या ग्रंथात त्यांच्या लीला व भक्तांना येत असलेले अनुभव यांचे वर्णन केले आहे.
करवीर दत्त श्री कृष्ण सरस्वती हे अण्णाबुवांच्या समाधीचे दर्शन घेण्यास आले असता त्यांचेत व अण्णाबुवांमध्ये संवाद झाला. समाधीतून अण्णाबुवा म्हणाले, “कृष्णा, तू व मी वेगळा कां आहे? तुझे कार्य चांगले चालले आहे.”
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हेही गुरूच्या शोधार्थ श्री अण्णाबुवांना भेटून गेले. श्री शंकर महाराज ही त्यांच्या दर्शनासाठी येत असत. श्री म्हादबा पाटील हे त्यांचे परम भक्त होते.
आजही भक्तांना त्यांच्या लीलांची प्रचिती येते. नुकतेच कोल्हापूरचे दत्तावतारी श्री मुंगळे महाराज यांचे घरी, पुण्याचे श्री. शिरीष सुमंत, यांनी श्री अण्णाबुवा महाराज यांच्यावरील स्वरचित पद गायिले असता, श्री मुंगळे महाराजांना अण्णाबुवा महाराज प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रकट झाल्याचे जाणविले. तसेच सांगलीतील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर मगदूम (क्रांती क्लिनिक) यांना श्री अण्णा बुवांच्या एका भक्ताची अवघड शस्त्रक्रिया करताना, अण्णाबुवा स्वतः तिथे उपस्थित राहून शस्त्रक्रियेत मार्गदर्शन करत असल्याचे दिसले.
श्री अण्णाबुवा महाराजांची प्रमुख मंदिरे
१. श्री अण्णाबुवा देवालय, सराफ कट्टा, मिरज, जिल्हा सांगली (स्थापना - १९११)
मिरजेचे तत्कालीन अधिपती श्री. गंगाधरपंत (बाळासाहेब) पटवर्धन यांचे श्री अण्णाबुवांवर विशेष प्रेम होते. एकदा अण्णाबुवा राजेसाहेबांचे निवासस्थानी असता, सांगलीचे प्रसिद्ध व्यापारी कै. बाळाजी पुरुषोत्तम शाह तेथे आले. एका दाव्यामुळे शेठजी विवंचनेत होते. त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहता, “दाव्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल” असे अभयोद्गार काढून अण्णाबुवा तेथून निघून गेले. शेठजींनी त्यावेळी मनोमन ठरविले की दाव्याचा निकाल आपल्या बाजूने झाल्यास, त्या योगे होणारा सर्व फायदा श्री चरणी अर्पण करीन. त्यांनी जेथे अण्णाबुवांचे देहावसान झाले तेथे आपल्या वचनानुसार सराफ कट्टा, मिरज येथे अण्णाबुवाचे सुंदर व देखणे पादुका मंदिर उभे केले. तसेच पूजा अर्चा व नित्य सेवा ह्यांची कायमस्वरूपी व्यवस्था केली.
मिरजेतील सराफ कट्टा येथील शहा कुटुंबियांनी बांधलेले सन १९११ मधील समाधी मंदिर
मंदिरात अतिशय शांत, प्रसन्न वाटते. देशभरातले भाविक भक्तगण दर्शनास आवर्जून येतात. नित्यसेवेची जबाबदारी श्री. आनंद गोडबोले पार पाडतात, तर देवालयाची व्यवस्था संस्थापक शहा कुटुंब (कै. आर. टी. शहा), श्री. विजय भाई शहा व कुटुंबीय, सांगली यांचेकडे आहे. हे देवालय शहा कुटुंबाचे खासगी मालकीचे आहे. त्यांचे योगदान मोठे आहे. मंदिरात प्रतिवर्षी आषाढ चतुर्थीस, पुण्यतिथी निमित्त सात दिवस उत्सव चालतो. त्यात महापूजा, अभिषेक, अण्णाबुवांचे पोथीचे पारायण, भजन, प्रवचन, कीर्तन, सांगीतिक कार्यक्रम, पालखी, सांगता समारंभ, महाप्रसाद सर्वच कार्यक्रम उत्साहाने व श्रद्धेने पार पडतात.
२. मिरज कृष्णाघाटावरती श्री अण्णाबुवांचे समाधी मंदिर
श्री. बाळासाहेब नरगुंदे हे त्याची देखभाल करतात. नित्यसेवा पार पडते. पुण्यतिथी सोहळा उत्साहाने पार पडतो.
३. बोरपाडाळे
श्री अण्णा बुवांच्या जन्मगावी, गावकुसाबाहेर, महादेव मंदिरासमोरील पादुका व मंदिराचा जीर्णोद्धार पुण्याचे डॉ. शिरीष सुमंत व स्मिता सुमंत यांनी (आपल्या माता पित्यांच्या स्मरणार्थ) दिनांक ९ सप्टेंबर २०१५ रोजी चबुतऱ्यासहित करून एक छोटेसे सुंदर पादुका मंदिर उभे केले. मंदिर हे निसर्ग सौंदर्याने वेढले आहे. नित्य पूजेची जबाबदारी श्री. जंगम व श्री. संजय शिंदे तर देखभालीची जबाबदारी श्री. सुमंत पाहतात.
तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील बोरपाडाळे, श्री अण्णाबुवा यांचे जन्म गावातील पादुका मंदिर.
श्री अण्णा बुवांच्या अस्तित्वाची प्रचिती : २०१५ साली, सप्टेंबर उजाडला तरी पावसाचे काही चिन्ह नव्हते. अवर्षणासदृश परिस्थितीमुळे सर्वजण चिंताग्रस्त होऊन आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. आश्चर्य असे की नेमक्या पादुका प्रतिष्ठापनेच्या वेळीच मोरांचा आरव चालू झाला व जलधारांनी आवेगाने श्री पादुकांना अभिषेक केला. जणू काही जलधारांनी अण्णा बुवांच्या दर्शनाने आनंदून जाऊन पादुकांना अभिषेक केला. मंदिरात मिरजेचे चित्रकार व अण्णाबुवा भक्त श्री. कुमार (शिरीष) कुलकर्णी(मो. नं. ७६६६११७३२२)यांनी चितारलेले अण्णाबुवाचे चित्र ही सुरेख आहे. येथे नित्य पूजा श्री. जंगम स्वामी करत असतात तर देखभाल श्री. संजय शिंदे व श्री. शिरीष सुमंत पाहतात.
या मंदिरास भेट देण्याकरीता कोल्हापूर बस स्थानकावरून मलकापूर, रत्नागिरी या एस. टी. ने बोरपाडाळे फाट्यावर उतरावे लागते. तेथून १.५ कि मी अंतरावर हे मंदिर आहे. बोरपाडाळे गावात अण्णाबुवाचे राहते घर ही आहे. पूर्वी तेथे अण्णाबुवांचे पूजन, भजन, कीर्तन चालत असे. पालखी निघत असे. आजमितीस ही परंपरा खंडित झाली आहे. मात्र, बोरपाडाळे भजनी मंडळ अण्णाबुवांचे पुण्यतिथीस मिरजेस आवर्जून जाऊन सेवा देतात.
४. शिरोळ
शिरोळ येथेही अण्णाबुवांचे छोटेसे सुंदर पादुका मंदिर आहे. या मंदिरातील पादुकांची स्थापना श्री. जोतिराम इंगवले या अण्णाबुवांच्या भक्तानी केली आहे. ते शिरोळ ते कृष्णाघाट अशी अण्णाबुवांची पायी वारी करत. वृद्धापकाळात त्यांना दृष्टांत देऊन अण्णाबुवांनी त्यांना या पादुका शिरोळ येथे राहत्या घरी स्थापन करण्यास सांगितले. तेथे माझा वास राहिल असे वचन दिले. त्यानुसार कै. जोतिराम इंगवले यांनी १९०५ साली पादुका स्थापना आपल्या परसात केली व त्याची पूजा अर्चा करण्याची जबाबदारी ह. भ. प. विठ्ठल गोविंद देशिंगकर यांचेवर सोपविली. श्री विनायक गजानन देशिंगकर हे आज रोजी नित्य सेवेत आहेत. २००५ साली, शतकपूर्ती समारंभ प्रित्यर्थ मंदिराचा जीणोद्धार झाला व छोटे मंदिर उभे राहिले. श्री जोतिराम इंगवले यांची पुढची पिढी डकरे कुटुंबीय मंदिराची देखभाल करतात. त्यांचे योगदान मोठे आहे.
डॉ. शिरीष सुमंत, साम्राज्य सोसायटी, पौड रोड, पुणे-३८.
मो. नं.: ८५५० ९१ ९७८५
अण्णाबुवा महाराज पद:
रचना - कवी डॉ. शिरीष सुमंत
आजानुबाहू रूप हे सुंदर, तनू दिगंबर जरी विश्वम्भर
अवतरलासी दत्त दिगंबर करण्या जगदोद्धार
स्वामी अण्णाबुवा महाराज… ।। १ ।।
दिव्य लोचने, सतेज कांती, सदा उभाचि भक्तांपाठी
करिता धावा धावुनी येशी, उंचावूनिया हात
स्वामी अण्णाबुवा महाराज… ।। २ ।।
कुणाशी देसि धनसंपत्ती, कुणास होते संतती प्राप्ती
कृपा कटाक्षे टळती व्याधी, दीनांचा तू नाथ
स्वामी अण्णाबुवा महाराज… ।। ३ ।।
तुझ्या दर्शने फुलते सृष्टी, तुझ्याच कृपे नांदे शांती
चिंता- विघ्ने पळुनी जाती, कली काळाची ही नुरते भीती, तूचि तारणहार
स्वामी अण्णाबुवा महाराज… ।। ४ ।।
झाली पळापळ गडबड गोंधळ, भीतीने तर उडाली गाळण
उरात धडधड एकच धास्ती, पिसाळलेला सुटला हत्ती
उधळू नी येई अंगावरती, थिजूनी गेली सगळी वस्ती
झाले सारेजण हैराण
स्वामी आवरा हो गजराज… ।। ५ ।।
दृष्टीस पडता आपुली काया, घडे चमत्कार घडली माया….
धावत आला आपुल्या जवळी, जणू भेटण्या माय माउली
लववूनी माथा आपुल्या चरणी, झाला नतमस्तक गजराज
स्वामी अण्णाबुवा महाराज… ।। ६ ।।
दाता त्राता तूची विधाता, पतित पावन तूचि दत्ता
रक्षण कर्ता, तू भय हर्ता, मिरजेचा तू श्वास
स्वामी अण्णाबुवा महाराज… ।। ७ ।।
करुणाघन तू भक्त वत्सला, दया सागरा दिन दयाळा
दे रे शक्ती करण्या भक्ती, चरण तुझे रे शिवण्यासाठी
हेचि मागणे आज
स्वामी अण्णाबुवा महाराज… ।। ८ ।।