भस्म शब्द व्युत्पत्ती
‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.
व्याख्या
कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
अर्थ: भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय.
भस्माचे महत्त्व
भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते.
भस्माचा टिळा
शिवभक्तीचे प्रतीक असणे
भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.
भस्म लावण्याचा उद्देश
आम्हाला आमचे देहतादात्म्य सोडून या जन्ममरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे आहे, याची आठवण म्हणून.
भस्माचा वापर
दंडावर भस्माचा वापर
अ. भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.
अ १. भस्म कपाळाला लावतांना पाळावयाचा दंडक:
उपनिषदे एक दंडक पाळायला सांगतात, ‘भस्म कपाळाला लावतांना ‘महामृत्यूंजय मंत्रा’चा जप करावा.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ।।
– ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२
अर्थ: कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.
आ. बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात.
इ. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.
भस्माचे इतर प्रचलित शब्द
विभूती:- विभूती म्हणजे गौरव. विभूती लावणार्यांना ती गौरव प्रदान करते.
रक्षा:- रक्षा म्हणजे सुरक्षेचा स्त्रोत. रक्षा लावणार्यांना तो निर्मल बनवतो आणि अनारोग्य अन् विपत्ती यांपासून त्यांचे रक्षण करतो.
भस्मातील औषधी गुण
भस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात. शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.
ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्वत असणे
लाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे ‘सत्य’ विद्यमान रहाते. –*
भस्माची शिकवण
१. मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे
२. मानवी देह हा नश्वर असल्याने मरणानंतर त्या देहाची जळून राखोटी होणार आहे. त्यामुळे कोणीही देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, याची जाणीव ठेवून मोठ्या महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे भस्म सूचित करते. अर्थात् यांतून साधनेचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखितहोते.
भस्म माहात्म्य व ब्रम्हरराक्षसाचा उद्धार, संदर्भ- श्री गुरुचरित्र अध्याय २९ वा
नामधारकाने सिद्ध्योग्यांना विनंती केली, "पूर्वी त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरुंना भस्म माहात्म्य विचारले होते. मग पुढे काय झाले, ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." नामधारकाने अशी विनंती केली असता श्रीगुरुंनी त्रिविक्रमभरतीला काय सांगितले ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले. श्रीगुरू त्रिविक्रमभरतीला म्हणाले, मी तुला आता भस्म माहात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते. ते सुखदुःखरहित, शांत, समदर्शी, आत्माराम, गृह व गृहिणी - विरहित होते. ते भस्मधारी, जटाधारी, वल्कले धारण करणारे होते. एकदा ते फिरत फिरत भयंकर अशा क्रौंचवनात गेले. निर्जन अशा त्या वनात तहानभुकेने व्याकुळ झालेला एक भयानक ब्रम्हराक्षस होता.
वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो राक्षस धावत आला, परंतु वामदेव थोडेसुद्धा घाबरले नाही. वामदेवांच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पापे तत्क्षणी नष्ट झाली. वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रम्हराक्षसाच्या अंगाला लागले त्यामुळे त्याचा राक्षसभाव नाहीसा झाला. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या राक्षसाचे सगळे जीवनच बदलून गेले. त्याची तहान-भूक नाहीशी झाली. शांत झालेला तो वामदेवांच्या पाया पडून विनवणी करू लागला, "स्वामी, तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा." वामदेवांनी त्याला विचारले, "तू कोण आहेस? या अरण्यात का हिंडतोस?" राक्षस म्हणाला, "स्वामी, तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझे पूर्वजन्मीचे पंचवीस जन्म आठवत आहेत. मी केलेली सर्व पापपुण्यकर्मे मला चांगली आठवत आहेत."
वामदेव म्हणाले, "तुला पंचवीस जन्मापूर्वीचे स्मरत असेल तर संग पाहू, तू कोणकोणती पापे केलीस?" राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगण्यास सुरुवात केली. राक्षस म्हणाला, "पंचविसाव्या जन्मापूर्वी मी यवन राजा होतो. मी अत्यंत पापी व स्वैराचारी होतो. मी रोज नवीन स्त्रियांचा उपभोग घेत असे. रोज एकेका स्त्रीचा उपभोग घेऊन तिला सोडून देत होतो व नवीन स्त्रीचा अपहार करीत होतो. मी सधवा, विधवा, कुमारी, रजस्वला अशा सर्व स्त्रियांचा अपहार केला व त्यांच्याशी कुकर्म केले. अशारीतीने विषयभोगत आसक्त झालेल्या, मद्यपान करणाऱ्या मला तरुणपणी क्षयादी अनेक रोग झाले. मंत्र्यांनी व सेवकांनी माझा त्याग केला. शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले. शेवटी, माझ्या कुक्रमाणे मला मृत्यू आला. जो मनुष्य धर्मभ्रष्ट होतो त्याचे आयुष्य नष्ट होते, त्याला अपयश येते. भाग्य क्षीण होते. तो अत्यंत दुर्गातीला जातो. त्याचे पितरसुद्धा स्वर्गभ्रष्ट होतात. मृत्यूनंतर मला यमलोकात नेले. तेथे मला भयंकर अशा नरककुंडात टाकले. हजारो वर्षे मी तेथे पडून होतो. त्यानंतर जे पाप शिल्लक होते त्याचे फळ म्हणून मला यमाने पिशाच योनीत जन्म दिला. हजारो वर्षे अनेक यातना भोगल्यानंतर मी यमाकडे गेलो. यमाने मला पृथ्वीवर ढकलून दिले. मग मला वाघाचा जन्म मिळाला. दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो.तिसऱ्या जन्मी लांडगा, चौथ्या जन्मी डुक्कर, पाचव्यात सरडा झालो. सहाव्या जन्मी कुत्रा, सातव्या जन्मी कोल्हा, आठव्यात गवा, नवव्यात मी वानर झालो. तेराव्या जन्मी बगळा झालो, चौदाव्या जन्मी रानकोंबडा. त्यानंतर गिधाड. मग मांजर, त्यानंतर मी बेडूक झालो. अठराव्या जन्मी मी कासव झालो. त्यानंतर मासा, पुढे उंदीर व घुबड झालो. बाविसाव्या जन्मी मी रानहत्ती झालो. त्यानंतर मला उंटाचा जन्म मिळाला. त्यानंतर निषाद व आता राक्षस झालो. तुम्हाला पाहताच मी तुम्हाला ठार मारून खाण्यासाठी धावून आलो. मी तुम्हाला पकडले, पण तुमच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठवले. तुम्ही खरोखरच परमेश्वर आहात. आज तुमच्या दर्शनाने व भस्माच्या स्पर्शाने मला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो. या भस्माचे केवढे हे माहात्म्य !" त्यावर वामदेव म्हणाले, "माझ्या भस्माचा स्पर्श होताच हा चमत्कार घडला हे खरे आहे. भगवान शिवशंकर या भस्माचा लेप स्वतःच्या शरीरावर लावतात, एवढा या भस्माचा मान आहे. याचे माहात्म्य विशेष ते काय सांगणार? पण याविषयी मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून या भस्माच्या ठिकाणी केवढे सामर्थ्य आहे याची तुला कल्पना येईल."
वामदेव कथा सांगू लागले, पूर्वी द्रविड देशात एक आचारभ्रष्ट ब्राम्हण राहत होता. त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलगांनी व मित्रांनी त्याला वाळीत टाकले होते. तो एका हीन जातीतील एका स्त्रीच्या नादी लागला. त्याने त्याच्याशी विवाह केला. तो इतर स्त्रियांशीसुद्धा व्यभिचार करीत असे. तो चोऱ्या करून पोट भरीत असे. तो एकदा चोरी करावयास गेला असता त्याला एका माणसाने ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले. त्याच्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत. यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले ? एक शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकराची पूजाअर्चा करीत होते. त्यावेळी तेथे एक कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत त्या भस्मात लोळला. तेथून उठला व जिथे त्या ब्राम्हणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. त्यावेळी त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते चुकून ब्राम्हणाच्या प्रेताला लागले. त्याचक्षणी तो ब्राम्हण पापमुक्त झाला. शिवदूतांनी ते भस्म पहिले आणि त्यांनी त्या ब्राम्हणाला यमदूतांजवळून हिसकावून घेतले व ते यमदूतांना मारू लागले. यमाला कळताच तो धावत आला व शिवदूतांना रागारागाने विचारू लागला. शिवदूत म्हणाले, "त्या ब्राम्हणाच्या कपाळी भस्म लागले होते. त्यामुळे तो पावन झाला आहे. भगवान सदाशिवाची आज्ञा आहे की, जे भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे. यमलोकांत नाही. यापुढे तुमच्या दूतांना सूचना द्या की, "ज्यांनी जाणते-अजाणतेपणे भस्म लावले आहे ते कितीही मोठे पापी असले तरी त्यांना शिवलोकातच पुढील गती मिळते." रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीच गती मिळते." वामदेवांचे हे भाषण ऐकून राक्षस म्हणाला, "माझी पूर्वपुण्याई थोर म्हणूनच मला आज आपले दर्शन लाभले व भस्माचा स्पर्श झाला. मी पूर्वी जेव्हा राजा होतो तेव्हा मी एक तळे बांधले होते व ब्राम्हणांच्या उपजीविकेची व्यवस्था केली होती.माझ्या पुण्यकर्माची नोंद चित्रगुप्तने यमाकडे केली होती व 'पंचविसाव्या जन्मी मला या पुण्याचे फळ मिळेल' असे भविष्य वर्तविले होते. ते पुण्य आज फळाला आले. आता या भस्माचा विधी कसा करायचा, हे भस्म कसे लावावयाचे हे सर्व मला सांगा." राक्षसाने अशी विनंती केल असता वामदेव म्हणाले, ऐक.
पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदर पर्वतावर भगवान शंकर सर्व देव, ऋषी, यक्ष, किन्नर, विद्याधर यांच्यासमवेत बसले होते. त्यावेळी सनत्कुमारांनी शंकरांना भस्मविधी विचारला. त्यावर भगवान शंकर म्हणाले, "पवित्र अशा गोमायाच्या चांगल्या गोवऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचा एक कणही असू नये. नंतर त्या गोवऱ्या जाळून त्यांची राख करावी. तेच भस्म, नंतर ते शिवगायत्रीने (ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्) अभिमंत्रित करावे. त्यावेळी अग्निरीति भस्म. इत्यादी मंत्र म्हांवे. संद्योजात० या मंत्राने भस्म तळहातावर घ्यावे. मग ते अंगठ्याने मळावे. त्र्यंबक० या मंत्राने भस्म भाळी लावावे. त्र्यायुषे० या मंत्राने कपाळास व सर्वांगाला लावावे. भस्म लावताना तर्जनी व करंगळी वापरू नये.
कपाळावर दोन बोटांनी भस्म लावावे. अंगठ्याने मध्यरेषा काढावी. नंतर त्रिबोटीने सर्वांगास भस्म लावावे. या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जाळून भस्म होतात. त्याचप्रमाणे मद्यपान, ब्रम्हहत्या, अभक्ष्यभक्षण इयादी महापातकेसुद्धा या पवित्र भस्माने नष्ट होतात. भस्मधारक पुण्यात्मा होतो. त्याला पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सर्व सुखे यांचा लाभ होतो. त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व त्याला मान देतात. शेवटी तो दिव्य विमानातून स्वर्गास जातो. तेथून ब्रम्ह्लोक व वैकुंठलोक येतेह अनंतकाळ वास्तव्य करून तो कैलासलोकी जातो. त्याला सायुज्यमुक्ती प्राप्त होते." भगवान शंकरांनी केलेले हे भस्मनिरुपण ऐकून सर्व देवांना अतिशय आनंद झाला.
हे भस्ममाहात्म्य ऐकून राक्षसाला अतिशय आनंद झाला. त्याने वामदेवांना विनंती केली, "स्वामी, माझा उद्धार करा." मग दयाघन वामदेवांनी त्या ब्रम्हराक्षसाला अभिमंत्रित केलेले भस्म दिले. त्याने ते भस्म आपल्या कपाळी लावले. त्याचक्षणी त्याला दिव्यदेह प्राप्त झाला. मग तो वामदेवांना प्रदक्षिणा घालून आकाशमार्गाने आलेल्या दिव्य विमानात बसून दिव्य लोकास गेला.
हे भस्ममाहात्म्य सांगून श्रीगुरूनृसिंहसरस्वती त्रिविक्रमभारतीला म्हणाले, "वामदेव हे साक्षात शिवस्वरूप होते. जगाच्या उद्ध्रासाठीच ते सर्वत्र संचार करीत होते. त्रैमूर्ती दत्तप्रभूंशी सार्धम्य असलेल्या त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्यामुळे ब्रम्हराक्षसाचा उद्धार झाला. म्हणूनच गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे." हे ऐकून अतिशय आनंदित झालेले त्रिविक्रमभारती स्वस्थळी निघून गेले.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥