सिद्धमंगलस्तोत्र

shripad shriwallabh
श्रीगुरु श्रीपादराज

१)    श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
२)    श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
३)    माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
४)    सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
५)    सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
६)    दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
७)    पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
८)    सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
९)    पीठिकापूर नित्यविहारा मधुमतीदत्त मंगलरूपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनाघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात."

श्रीगुरु श्रीपादराजांचे सिद्धमंगल स्तोत्र: भावार्थ

श्रीगुरु श्रीपादराजांचा अवतार हा कुटूंबवत्सल दत्तात्रेयांचाच अवतार आहे.

पिठापूर येथील आपल्या १६ वर्षाच्या वास्तव्यात आपले वडील अप्पललक्षी नरसिंहराज शर्मा, आई सुमती महाराणी, आजोबा बापानाचार्य, आजी राजमांबा, मामा श्रीधरावधानी व आपली भावंडे श्रीविद्याधरी, राधा, सुरेखा व श्रीधरशर्मा, श्री नरसिंह शर्मा, कौटुंबिक स्नेही वेंकटप्पा श्रेष्टी व वेंकट सुब्बमांबा, नरसिंह वर्मा व अंमजम्मा यांचे अपार प्रेम मिळाले. या सर्वाबरोबर राहत असताना सर्वांचे श्रीपादराजांना प्रेम मिळत होते ते श्रीगुरूंच्या दिव्य अश्या तेजाने, त्याच्यातील बौद्धिक संपन्नेतेने. प्रत्येक घटनांचे ज्ञान, कर्माने विवरण करून त्याचा अर्थ समजावणे याचे प्रत्येकास कौतुक व आश्चर्य वाटत असे.

श्रीपादराज प्रत्यक्ष दत्तावतार आहेत हे त्यांच्या जन्माच्या अदभूत व दिव्य प्रसंगावरून सर्वाना लक्षात असले तरी, कुकुटेश्वर मंदिरातील काही ब्रह्मवृन्द व काही परिचित हे मानण्यास राजी होत नसत. त्यामुळे कायमच श्रीपादराजांच्या कुटूंबामध्ये खरेच हे श्रीदत्तप्रभू आहेत का हा प्रश्न पडत असे. सर्व कुटूंबामध्ये श्रीपादराजांना अत्यंत प्रिय अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे आपले आजोबा महापंडित श्री बापानाचार्य. वैदिक होमहवंन, याज्ञीक कर्मे, भविष्य कथन करताना आपल्या सत्यवाणीने, सात्विक आचरणाने सर्व जनाना मदत करण्यात कायमच पुढे असत. पीठापूरमधील इतर ब्रह्मवृंदासारखे दक्षिणेच्या मागे न लागता सर्व गरजूना वेळोवेळी धार्मिक उपदेश, अन्नदान करीत असत. सर्व जनतेचा लोभ असल्याने त्यांना सत्यऋषीश्वर असे ही म्हणत असत. श्रीपादराज दुसऱ्या वर्षांपासून श्री बापानाचार्य यांच्या कडेवर बसून गावात फिरत असत. वेळोवेळी आपल्या नातवाची श्रीपादराजांची अनुभूती श्री बापानाचार्याना मिळत होती. आपल्या नातवाचे लाडिक असे श्रीहरीचेच रूप दररोज ते डोळ्यात साठवीत होते.

एकदा श्रीपादराजाच्या वाढदिवशी (भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीस) श्री बापानाचार्य आपल्या लाडक्या श्रीपादराजास मांडीवर घेऊन बसले असताना त्यांनी चरण कुरवाळले. त्या तेजस्वी पाऊला मध्ये त्यांना शुभचिन्हाची मालिका दिसली. त्यांनी आपल्या नातवाच्या चरणांचे चुंबन घेतले आणि श्रीदत्तप्रभूंचे दर्शन झाले. श्रीदत्तगुरुंच्या दर्शनाने त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटना ही स्पष्ट दिसू लागल्या. त्यांनी लाडक्या श्रीपादराजांच्या कौतुकाचे कवन गाण्यास सुरुवात केली. हेच ते सिद्धमंगल स्तोत्र आहे. हे समजावयास, अर्थाने सोपे आहे. तरीही भावार्थ लिहायची मनीषा झाली. जसा भावार्थ समजला तसा लिहिला आहे. याच्या पठणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे याचे पावित्र्य आहे.

हे सिध्द्यमंगल स्तोत्र पठण करण्यास स्थळ, काळ, वेळ याचे बंधन नाही.

श्री मदनंत श्री विभूषित अपल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्रीपादराजांचा गौरव करताना श्री अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा यांना श्रीपादराजांचे वडील म्हणून त्यांनाही गौरविले आहे. श्री बापानाचार्य यांना श्रीगुरु श्रीपादराज हे दत्तप्रभूंचेच अवतार आहेत हे लक्षात आले व हेच श्री अनंत हरीनारायण म्हणून त्यांनी "श्री मदनंत" हे नामविशेषण वापरले आहे. श्री दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला आणि सर्व विकल्प दूर झाले. श्रीपादराज हेच श्रीगुरु आहेत जे "श्री विभूषित" आहेत. "श्री विभूषित" याचे वर्णन करण्यास शब्द ही अपुरे पडतील. पण थोडक्यात मोजक्याच शब्दात असे वर्णन करता येईल.

श्रीगुरु हेच सर्व चराचराचे, सर्व सजीवनिर्जीव घटकांचे स्वामी ज्यांनी पूर्ण ब्रह्माण्ड व्यापले आहे. श्रीगुरुचे गुरुतत्व आत्मस्वरूप, आनंदस्वरूप व ब्रह्मानंदस्वरूप आहे. श्रीगुरुमध्ये गणेशस्वरूप व सकाळ देवतांचे स्वरूप असून श्रीगुरुना आदीअंत नाही. बुद्धीदाता, ज्ञानदाता, भोगदाता, मोक्षदाता,परमसुखदाता, त्रिगुणरहित, निर्गुण, निराकार, निर्मल, निश्चय व नित्य अस्तित्त्वाचे चैतन्य असून गुरुकृपेशिवाय या जगतामध्ये काहीच साध्य नाही. 

श्री गुरुज्ञानाशिवाय व श्रीगुरुसेवेशिवाय या जगतात श्रेष्ठ असे काही नाही. श्रीगुरुच्या चरणकमलाचा एक स्पर्श आत्म्यासाठी ब्रह्मासाक्षात्कारच आहे. श्रीपादराजांचे पिताश्री श्रीअप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा हे पण एक वैदिकपंडित. नित्य कालाग्नीशमन दत्ताची उपासना करताना नित्य श्रीदत्तगुरूंशी संवाद घडत असे इतके महान पुण्य त्याच्या गाठीशी होते.

अश्या श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे. थोडक्यात श्रीगुरु श्रीपादराजांचे नाव घेताना सर्वांचे कल्याण होवो हीच सद्भावना श्री बापानाचार्य व्यक्त करतात.

श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य आपल्या सर्व नातवंडाचा उल्लेख करतात. श्रीगुरु श्रीपादराजांचे बहीण व बंधू असणे हा केवढा मोठा सन्मान आहे हा आनंद श्री बापानाचार्य शब्दातून व्यक्त करंतात. श्रीगुरु श्रीपादराजांच्या तीन बहिणी श्रीविद्याधरी, राधा, सुरेखा व श्री ( दोन बंधू श्रीधरशर्मा व श्री नरसिंह शर्मा जे शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत) यांनाही श्रीपादराजांमुळे कृपा प्राप्त होणार आहे हा विश्वास आजोबा म्हणून श्री बापानाचार्य यांना आहे. राखीधर याचा उल्लेख केवळ राखी बांधणारा बंधू नसून आत्म्याचे दुष्ट प्रवृत्तीपासून रक्षण करणारा श्रीगुरु श्रीपादराजांच्या स्वरूपात आहे हे कौतुक श्री बापानाचार्य यांना आहे.

सर्वांचे रक्षणकर्त्या श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य आपल्या लाडक्या मुलीचा सुमती महाराणीचा उल्लेख करतात. श्रीगुरु श्रीपादराजांचे वडील श्रीअप्पललक्षी नरसिंहराज शर्मा हे वैदिकपंडित असल्याने धार्मिक कार्य करताना त्या धार्मिककार्याचे मूल्य जेवढे होत असे तेवढेच घेत असत. विनाकार्य कुठलेच दानही घेत नसत. त्यांमुळे काही वेळा घरामध्ये अन्नाची विवंचना होत असे व अन्नसामुग्री उधारीवर आणवी लागत असे. बालपणी श्रीपादराजांना भूक लागल्यावर ते सरळ श्री कालाग्नीशमन दत्तात्रेयासमोर ठेवलेले दुधाचे भांडे पिऊन टाकत असत. श्री कालाग्नीशमन दत्तात्रेयांना नैवेद्य नाही म्हणून पिताश्री व आई त्या दिवसाचा उपवास धरत असत. आई सुमतीने आपल्या लाडक्या श्रीपादाचे हट्ट आपल्या वात्सल्यानेच पुरविले. श्री बापानाचार्य यांच्या डोळ्यासमोर सर्व घडत होते.

मातृवत्सल श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापानाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयी भव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य आपला स्वतःचा व सुमती महाराणीचा उल्लेख करतात. आपली मुलगी सुमती हिचा पुत्र श्रीगुरु श्रीपादराज आहे हा आनंद व अभिमान श्री बापानाचार्य यांना आहे. अश्या श्रीचरणाचे कायमच दर्शन घेणे, श्रीचरणावर आपले हात फिरविणे, श्रीचरणाचे चुंबन घेणे ही बापानाचार्य यांच्यासाठी कृपेचे अगणित असे समाधान होते. आपल्या वडिलांचा आनंद बघून सुमती महाराणीस बाल श्रीपादाचे कौतूक वाटत असे.

श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

सावित्री काटकचयन पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य , सावित्री शक्ती व भारद्वाज महर्षीं यांचा उल्लेख करतात. श्रीगुरुदत्तात्रेयाचा कलियुगात श्रीपादश्रीवल्लभ अवतार पीठिकापूर येथे होण्यासाठी त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काटक यज्ञ करून सावित्री शक्तीची पूजा केली होती. सावित्री शक्ती जी चराचरातील स्थिती, लय घडविणारी शक्ती आहे तिला प्रसन्न करून श्री दत्तप्रभूंनी जनकल्याणाकरिता श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घ्यावा असे विनविले होते.

सावित्रीगायत्रीस्वरूप श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

"दो (२) चौ (४) पती (९) लक्ष्मी (८)" याचा श्रीगुरु श्रीपादराज भिक्षा मागत असताना होऊन "दौ चौपाती देव लक्ष्मी" असा झाल्याने या चरणाची सुरुवात अशी झाली आहे. ही २४९८ संख्या असून गायत्री स्वरूप आहे.

२ ही संख्या सृष्टीतील सर्व द्वंदाचे प्रतीक आहे.

४ ही संख्या देहाचे स्थूल, सूक्ष्म, कारण व कारणदेह अशी प्रतिके दर्शवितात.

९ ही संख्या परमात्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे. (९ ला कुठल्याही संख्येने गुणल्यास, त्या संख्येची बेरीज ९ च येते).

८ ही संख्या लक्ष्मीची आहे जी मायास्वरूप आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्यास लहान करून दाखवण्याची, शक्ती हरण सामर्थ्य करण्याचे तिच्यामध्ये आहे. (८ ला १, २, ३, ४, ५ संख्येने गुणल्यास येणारी संख्या कमी कमी होत जाते).

परमात्मस्वरूप श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

पुण्यरूपिणी राजमांबासूत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य आपल्या पत्नीचा राजमांबा व सुमतीचा उल्लेख करतात. श्रीगुरु श्रीपादराज्यांचा जन्म ज्योतिरूपाने सुमतीच्या उदरातून होऊन आता ती "गुरुमाता" आहे हा आनंद श्री बापानाचार्य यांना आहे. आपली पत्नी राजमांबा हिने सुमतीस जन्म देऊन उपकारच केले आहेत. आपल्या आचरणाने आपली पत्नी राजमांबा ही पुण्यरूपिणीच आहे

श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य श्रीपादराजांच्या आई वडिलांचा उल्लेख करतात. आपला नातू श्रीपादराज हा आपले जावई नरहरीशर्मा व मुलगी सुमती यांचा पुत्र असून साक्षात दत्तप्रभूच आहे. ही सर्व दत्तप्रभूंचीच कृपा आपल्यावर आहे हा आनंद श्री बापानाचार्य यांना आहे.

श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य यांनी आपल्या ग्रामाचा पीठिकापूरचा उल्लेख केला असून श्री बापानाचार्यानी पुढील भविष्यात घडणारे भाकीतच केले आहे. मधुमती हा एक यॊगाचा प्रकार असून श्रीपादराज कायमच पिठीकापुरमध्ये गुप्त रूपाने राहणार आहेत तसेच श्रीगुरु श्रीपादराज आपल्या मंगलमय दत्तस्वरूपाने अनेक भक्तांचे कल्याण करणार असून जश्या मधुमाश्या मध आणून मधाचे पोळे तयार करतात तसे भविष्यात अनेक भक्त पीठिकापूर येथे आकर्षित होणार असून भक्तिभावाचे मोठे श्रीपादश्रीवल्लभ संस्थांन श्रीपादजन्मगृहामध्ये होणार आहे. जसे शुद्ध मधाची गोडी असते तसेच शुद्ध भक्तीची गोडी ही श्रीगुरु श्रीपादराजांच्या सेवेमध्येच आहे. असाही अर्थ आहे.

आता श्रीगुरु श्रीपादराजाना पीठिकापूरमध्ये अवतारित होऊन १६ वर्षे झाली होती. सर्व कुटुंब, स्नेही आज श्री बापानाचार्य यांच्या घरी जमले होते. आपले मंगलमय दत्तस्वरूप सर्वाना दाखवून सर्वजण निशब्द व भावविभोर झाले. आनंदाश्रूंचा अभिषेक श्रीगुरुच्या चरणावर सुरु झाला. आपल्या कृपाकटाक्षाने बंधूंच्या व्याधी घालवून त्यांना ज्ञानाचे तेच प्रदान केले. आता कुरवपूर येथे प्रस्थान करावयाचे होते. सर्वावर आपली कायमच कृपा आहे व आपली आठवण काढल्यास कधीही आपण पीठिकापूरमध्ये येऊ असा विश्वास सर्वाना दिला.

आपल्या लाडक्या आजोबांना श्रीपादराजांनी सांगितले होते कि माझा पुढील अवतार श्रीमद नरसिह सरस्वती असून ते रूप आजोबांचेच असणार आहे. पीठिकापूरमध्ये आपण दोघेही एकत्र मूर्तिस्वरूपात असू. एवढे प्रेम श्रीपादराज आपल्या आजोबासाठी व्यक्त करतात.

हे सिद्धमंगल स्तोत्र श्री क्षेत्र नरसोबावाडीस म्हणताना अति आनंद होतो. ज्या आजोबानी हे रचले त्याच्यांच रूपामध्ये श्रीपादराजांना बघताना धन्य वाटते.

श्रीगुरुबरोबर असाच कधीकधी संवाद सुरु असतो. एकदा मी श्रीपादराजांना म्हणालो माझे तुमच्यावर प्रेम आहेच पण तुमचे आजोबा श्री बापानाचार्यलू हे मला जास्त आवडतात. एवढे महापंडित, प्रेमळ, सतत कडेवर फिरवणारे, तुमचं कौतूक आपल्या कवनाने करणारे आजोबा प्रत्येकास हवेहवेसे वाटतात.

श्रीगुरूंच्या भक्तीसाठी विदुषी किशोरीताईंच्या "बोलावा विठ्ठल" या रचनेवर लिहिले गेले शब्द हेच आपल्या सर्वाचं मन:र्पण असेल.

बोलावा श्रीपाद पाहावा श्रीपाद । करावा श्रीपाद जीवभाव ।।
मन हे गुंतुनी उडीले पिठापुरी । पादुका समीप देह विसावे ।।
श्रीगुरु नयनी पाहता दर्शनी । देह वेगे धावे गुरु आलिंगूनी ।।
मन धरी दत्त स्मरिला श्रीपाद । अमृत वर्षाव देहावरी ।।

।।  श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।

।। नमो गुरवे वासुदेवाय ।। ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। ।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये ।।

श्री सिद्धमंगल स्तोत्र व श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत

सिद्धमंगल  स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते. ग्रंथकार शंकर भट म्हणतात," श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी "सिद्धमंगल" स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल. या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या ह्रदयावर अंकित झाले आहे. परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनतील सर्व कामना पुर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रुपाने संचार करणार्‍या सिद्धी प्राप्त होतात.