श्री दत्तपुराण

श्री दत्तपुराण
श्री दत्तपुराण

शके १८१४ मध्ये ब्रह्मवर्त मुक्कामी  श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी असताना, श्री दत्तपूराण नावाचा ३५०० श्लोकांचा ग्रंथ  लिहला. त्याचे ८ भाग असून, त्या भागांना ऋकसंहितेप्रमाणे अष्टक असे नाव ठेवले आहे.त्या प्रत्येक अष्टकाचे ८ अध्याय असून सर्वाग्रंथाचे ६४ अध्याय आहेत. या दत्तपुरणाचे महत्व अवर्णनीय आहे.

या ग्रंथात निरनिराळ्या पुष्कळ विषयाचे सार थोडक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे साधारण मनुष्याच्या समजुतीत येण्यास  हा ग्रंथ बिकट झालेला आहे. या ग्रंथावर महाराजांनीच टीका लिहिली आहे. परंतु त्या टिकेतही अन्य आधारभूत ग्रंथातील पुष्कळ विषय घेतले असल्यामुळे ती टीकाही समजण्यास फार कठीण जाते. हा ग्रंथ सर्वत्र  उपयोगात येण्यासाठी यावर विस्तृत व सुलभभाषेत टीका होणे आवश्य आहे व त्याविषयी अभ्यासकांकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु हे काम खर्चाचे व बराच कार्यकाळ लागणारे आहे. त्यामुळे गुरुमहाराजांचे इच्छेने सिद्धीस जाईल तो सुदिन. ज्ञानी व विद्वान अभ्यासकांच्या मते  या ग्रंथात कोणताही विषय येण्याचे शिल्लक राहिले नाही. वेदान्त, न्याय, ज्योतिष, योग, वैद्यक, लग्नविधी (याज्ञीक) वगैरे सर्वकाही त्यात आलेले आहे व ते सर्व विषय समजून घेणे हे फक्त स्वामींनाच शक्य होते.

स्वामींच्या पश्च।त अशी चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती पुढे आलेली नाही कारण  एवढ्या सर्व शास्त्र व  विषय याबाबत एकाच व्यक्तीला ज्ञान असणे अशक्यच. निरनिराळ्या विषयांसाठी निरनिराळा  शास्त्री शोधावा लागेल. इतकेही करून आपले समाधान होईल का नाही ते सांगता येणे कठीण. कारण कोणीही आला तरीही फारतर शाब्दिक समाधान करेल पण अनुभवाने समाधान होणे कठीणच. या सर्व पुराणात ऋकसंहितेचे साम्य अणण्याचा अनेक रीतीने यत्न केला आहे. सर्वमान्य ग्रंथात ऋकसंहिता हा ग्रंथ श्रेष्ठ मानला जातो, त्याप्रमाणे सर्व पुराणात दत्तपुरा ण श्रेष्ठ मानले जावे अशीच परमेश्वराची  इचछा असावी. व्यासांनी १८ पुराणे लिहिली, पण त्यात दत्तपूर्ण नाही. या भरत खंडात दत्तांच्या महात्म्याची वाढ होत चाललेली आहे पण स्वतंत्र पूराण नाही ही न्यूनता भरून काढण्यासाठीच श्री दत्तानी अवताररूप लीला करून, त्याच अवताराचे हातानेच आपल्या नावाचे पुराण करविले. प्रत्यक्ष दत्तावतारच अशा प. प. वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेले दत्तपुराण यातील भाषा मुळातच प्रौढ, पण साधी-सरळ-सोपी त्याचबरोबर प्रासादिक वेदशास्त्रातील जीवनमूल्ये पुराण ग्रंथात कथा, आख्यान, उपख्यानांच्या माध्यमातून, जास्तीत जास्त लोकाभिमुख केलेली पुराणे ह्या भाकड कथा नसून तो वैदिक संस्कृतीचा इतिहास आहे. महामना, व्यासांच्या पुरानाप्रमाणेच या दत्त पुराणात श्रीगुरुदत्तात्रेयांच्या अवतार लीला चरीत्र, गुण महात्म्यांचे विचारवर्णन प्रमुख्याने या दत्तपुराण या ग्रंथात आहे. मूळ श्री गुरुदत्तात्रय चरित्र  हे अत्यंत अदभुत! त्यांच्या लीला, चमत्कार सर्वच अगम्य! पण हा गुरूतत्वाचा अवतार, ते शुद्ध परब्रह्म आहे. लिलाचरित्रातील प्रसंगाचा अर्थ कळण्यासाठी बुद्धी स्वच्छ निर्मळ, व आत्मकार झालेली लागते. त्यामुळे श्रेष्ठ-जेष्ठ अध्य।त्म विचारच भक्तांचे हृदयावर ठसतो. दत्त पुरणाचे श्रवण पठाण।ने दत्त भक्त सश्रद्ध होतील व डोळस पणे परामार्थास लागतील.

दत्त पुराणातील उद्बोधक कथा

विष्णुदत्त नावाचा एक ब्राह्मण आचारधर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भार्येसह राहात होता. त्याच्या घरासमोर एक अश्वत्थ (पिंपळ) होता आणि रोज माध्यान्हकाळी वैश्वदेव केल्यानंतर त्या अश्वत्थाच्या मुळाशी भूतबळी  ठेवायची विष्णुदत्ताची पद्धत होती. त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता आणि विष्णुदत्ताने ठेवलेला भुतबळी भक्षण करून तो संतुष्ट होत असे. एके दिवशी विष्णुदत्त ब्राह्मण भुतबळी ठेवण्यासाठी आलेला असताना तो ब्रह्मराक्षस तिथे प्रकट झाला. त्याचे विक्राळ रूप पाहून विष्णुदत्ताने दत्त महाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली. विष्णुदत्त भ्याला आहे असे जाणून ब्रह्मराक्षस म्हणाला भिऊ नकोस . रोज तू ठेवीत असलेले बळी अन्न खाऊन मी संतुष्ट झालो आहे तेव्हा जे मनात असेल ते मागावे. विष्णुदत्त मनात विचार करू लागला हा वर देण्यास सिद्ध झाला आहे खरा पण काय मागावे? घरदार कि संपत्ती, अजून मुलबाळ नाही म्हणजे संतती कि अन्य काही. मनात बराच विचार करून काही नक्की न झाल्याने आत जाऊन पत्नीला सर्व वृत्त कथन केले आणि म्हणाला काय मागावे? ती अतिशय हुशार होती, म्हणाली प्राणेश्वरा, मागू नका नश्वरा l श्री दत्ताची भेटी करा l ऐशा वरा मागावे l एकदा का दत्तात्रेयांची भेट झाली कि सर्व संपदा आपोआप मागे येतील. हेच योग्य आहे असे ठरवून विष्णुदत्त बाहेर येऊन म्हणाला कि मला काही द्यावयाची इच्छा असेल तर दत्त भेट घडवून द्यावी. यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला कि वास्तविक त्याचे नाव सुद्धा आमचा थरकाप उडवते पण मी कबुल केले आहे तेव्हा भेट घडवून देईन. 

एकदा एक मद्याच्या दुकानात एक अत्यंत गलिच्छ असा मनुष्य आलेला पाहून तो ब्रह्मराक्षस विष्णुदत्ताला हाक मारून म्हणाला, ब्राह्मणा तुझे दैवत त्या मद्याच्या दुकानात आहे तेव्हा त्वरा करावीस. विष्णुदत्त ब्राह्मण घाईघाईने तिथे गेला खरा पण त्या मनुष्याला पाहून त्याच्या मनात संशय उत्पन्न झाला हे दुर्गंधी येणारे आणि मलिन अवस्थेतील दत्तात्रेय कसे असतील? आधीच जातीचा भूत l त्यास काय ठावा दत्त l लोक हासतील  निश्चित l पाय धरिता मद्यप्याचे ll असा विचार मनात येताच तो मनुष्य गुप्त झाला. तो गुप्त होताच मात्र विष्णुगुप्ताला पश्चात्ताप झाला. आता घरी जाताच पत्नी काय म्हणेल हा विचार करीत करीत तो घरी आला. परत घरी येताच त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताची चांगली हजेरी घेतली आणि म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव. 

काही दिवसांनी एकदा स्मशानात दत्त महाराज कावळ्या-कुत्र्यांबरोबर खेळत होते ते जाणून त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताला हाक मारली आणि म्हणाला, शीघ्र जाऊन पाय धरावेत, या वेळी विष्णुदत्त ब्राह्मण स्मशानात पोहोचताच दत्त महाराजानी त्याच्यावर मोठी हाडे फेकून मारण्यास सुरुवात केली, त्या माराच्या भयाने विष्णुदत्त पळाला आणि घरी आला. ब्रह्मराक्षस घरी विष्णुदत्त येताच त्याला म्हणाला ह्या देहाला भुलून तू पळ काढलास, अरे ह्या नाशिवंत देहाची काय म्हणून ममता घ्यावीस आता यापुढे शेवटचा प्रयत्न मी करेन अन्यथा तुझ्या नशिबी दत्त दर्शन नाही असे समजावे. पुन्हा एकदा स्मशानात दत्त महाराज आलेले पाहून ब्रह्मराक्षस विष्णुदत्ताला हाक मारून म्हणाला, विप्रा ह्या वेळी मात्र धीर धरून त्या परमात्म्याचे पाय धरावेत. आणि जर त्यांनी काय हवे आहे असे विचारल्यास दर्शश्राद्धाला आपण ब्राह्मण म्हणून यावे असे आमंत्रण द्यावे. विष्णुदत्त स्मशानात जाऊन पाहतो ते खरोखर तसाच एक मनुष्य बसून काही खाद्य कावळ्या-कुत्र्यांना  वाटून देत होता, त्वरेने विष्णुदत्ताने धाव घेतली आणि प्रतिकार वा माराला न जुमानता पाय धरले. तो मनुष्य म्हणाला अरे माझे पाय काय धरतोस मी धर्माधर्म विवर्जित आहे. विष्णुदत्त हसून म्हणाला, तू परमात्मा आहेस तुला कसला धर्म वा अधर्म! तेव्हा दत्त महाराज हसले आणि त्यांनी आपले स्वरूप दाखविले. तात्काळ तिथे स्मशानाऐवजी योगभूमी दिसू लागली, कुत्रे वेदरूपात प्रकट झाले आणि ते कावळे म्हणजे सर्व शास्त्रे होती. दत्त महाराजांनी विचारताच विष्णुदत्त ब्राह्मणाने त्यांना श्राद्धाचे निमंत्रण दिले मात्र दत्त महाराजांनी एक अट घातली, जर पंक्तियोग्य ब्राह्मण असतील तरच मी भोजन करेन, यावर तसे ब्राह्मण येतील असे म्हणून विष्णुदत्त घरी आला. झालेला सर्व प्रकार त्याने ब्रह्मराक्षस आणि आपल्या पत्नीस सांगितला. ती अत्यंत आनंदित होऊन स्वयंपाकास लागली. ब्रह्मराक्षस म्हणाला, तुझा कार्यभाग जरी झाला असला तरी माझे अगत्याने स्मरण ठेव. माध्यान्हकाळी दत्तमहाराज आले, त्यांचे स्वरूप पाहून विष्णुदत्ताचे भान हरपून गेले, त्याची अवस्था पाहून पत्नी पुढे झाली आणि तिने त्यांना आसन दिले. दत्त महाराज म्हणाले, दर्श श्राद्ध आहे तेव्हा तीन ब्राह्मण पाहिजेत. विष्णुदत्त लगेच बाहेर येऊन त्या ब्रह्मराक्षसाला विचारू लागला आता कोणाला बोलवावे? यावर ब्रह्मराक्षस उत्तरला, अरे ब्राह्मणा अग्नी आणि आदित्य हे दोघे यासाठी योग्य आहेत. तेव्हा विष्णुदत्ताच्या पत्नीने दोघांना आमंत्रित केले. हे अग्नी देवा अत्रिसुत वाट पाहत आहेत तेव्हा भोजनास सत्वर यावे, त्याचबरोबर बाहेर येऊन सूर्याला वंदन करून ती म्हणाली, हे कश्यप नंदना दत्तात्रेय वाट पाहात आहेत तेव्हा भोजनास यावे. सत्वर दोघेही देव ब्राह्मण वेशात आले आणि पंगतीस बसले. तिघा देवांना आग्रहाने वाढायचा योग विष्णुदत्ताच्या प्रारब्धात होता, धन्य तो विष्णुदत्त आणि त्याची पत्नी! दत्त महाराजांचे उच्छिष्ट हे त्या ब्रह्मराक्षसाला दिल्यावर तो देखील मुक्तीस गेला.