विविध धर्मग्रंथातून विविध प्रकारांनी वर्णिलेल्या विविध तीर्थांची संविधान पायी यात्रा करणे यालाच तीर्थयात्रा म्हणतात. स्नान, देवदर्शन, श्राद्ध, दान इत्यादि धार्मिक कृत्यासाठी पवित्र स्थळी जाणे यालासुद्धा तिर्थयात्रा म्हणतात. ब्रह्मांडपुरणाच्या तिर्थकल्पामध्ये व विविध धर्मग्रंथातून तिर्थ यात्रेचे विधान सविस्तर कथन केलेले आहे.
हिंदू धर्मात अनेक पंथभेद असले तरी तिर्थयात्रेला सर्वच पंथांनी मान्यता दिलेली आहे. बहुतेक सर्व तीर्थ सर्वच पंथाना सामान आदरणीय आहेत. त्यामुळे सर्वांच्या अंतःकरणात भारताच्या मूलभूत एकात्मतेची भावना प्राचीन काळापासून जोपासलेली आहे. या एकात्मतेच्या भावनेला प्राचीन काळापासून ऋशी-मुनींच्या पासून अजतागायतच्या सर्व पंथाच्या सत्पुरुषांनी स्वतः तिर्थस्वरूप असूनसुद्धा आपल्या भक्तांच्यासमोर आदर्श राहावा व ते भक्त उत्तम उत्तम साधक बनावेत यासाठी संविधान भारतवर्षातील तीर्थयात्रा करून मूलतः पवित्र असणाऱ्या तिर्थांना पवित्रतम् करून अध्यात्मिक स्वरूप प्राप्त करून दिले.
आध्यात्मिकता हा मूळ स्वभाव असणारे सश्रद्ध भाविक विविध महापार्वकाल, पर्वकाळ, यात्रा, सूर्य-चंद्र ग्रहण, तिथी-वार-नक्षत्र योग् करण आदी पंचांगाच्या विशिष्ट योगाच्या निमित्ताने होणारे व ठराविक काळानंतर येणारे, कपिलाष्टयादी दुर्लभ महायोग. गुरु ग्रहाच्या स्थित्यंतराने येणारे कुंभ मेळे व कन्यागतादी महापार्वकाल, कुळधर्म व कुलाचार या ना त्या कारणाने परंश्रध्येने पुण्यप्राप्ती व सत्संगाच्या मिषाने तीर्थक्षेत्री लाक्षावधींच्या संख्येने प्रतिकुलाची तमा नबाळगता एकत्र जमतात. हे जगतातील विविध स्तरातील अभ्यासकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय आहे.
तीर्थयात्रा हा राव, रंक, सबळ व दुर्बल या सर्वांच्या पापक्ष।लनाचे व पुण्यप्राप्तीचे एक साधन आहे.
"तिर्थाभिगमनं पुण्यम यज्ञेरपी विशेषते". महाभारताच्या वनपर्वात तिर्थपर्व नामक उपपर्वात तिर्थ यात्रा करणे हे यज्ञा पेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानले आहे. तिर्थ यात्रेच्या मिषाने धार्मिक भावनांना बळ मिळते व भौगोलिक जाणिवा वाढतात. तिर्थयात्रेमुळे मनुष्याचे पाप व पापप्रवृत्ती नष्ट होते. तीर्थयात्रा विधियुक्त यम नियमांचे पालन करून सदाचार युक्त व श्रध्दायुक्त अंतःकरणाने केल्यास विशिष्ट धर्मग्रंथातून वर्णिलेले तिर्थयात्रेचे फळ तिर्थ यंत्रिकास मिळून त्याचे जीवन कृतार्थ होते.
तिर्थाचे प्रकार
तिर्थाचे दैवतिर्थ, आर्षतिर्थ, म।नुषतिर्थ, असुरतिर्थ याशिवाय नित्यतिर्थ, देवतिर्थ, संततिर्थ असे प्रकार आहेत.
१) दैव तिर्थ- गोदा, गंगा, काशी, प्रयाग, पुष्कर इत्यादि देवनिर्मित तीर्थे दैव तिर्थ आहेत.
२) आर्ष तिर्थ- प्रभास, नर नारायण, बद्रिकाश्रम, इत्यादि ऋशी निर्मित तीर्थे आर्ष तिर्थ आहेत.
३) मानूष तिर्थ- अंबारिष, पुरु, मनू इत्यादि राजांनी निर्मित तीर्थे मानुष तिर्थ म्हणून ओळखली जातात.
४) असुर तिर्थ- गया हे असुर निर्मित तिर्थ आहे.
याशिवाय,
१) नित्य तिर्थ- कैलास, मानस सरोवर, काशी इत्यादि अनादिकालापासून येथील भूमीत शक्ती असलेने ती तीर्थे नित्यातीर्थ म्हणून ओळखली जातात. याशिवाय गंगा, यमुना, सिंधू, कावेरी, नर्मदा, कृष्णा गोदावरी यांचाही यात समावेश आहे.
२) देव तिर्थ- जेथे दुरितांच्या निवारणासाठी व भक्तांच्या उद्धारासाठी ईश्वराच्या विविध आवतारांच्या रूपाने कार्य घडलेले असते ते तिर्थ देव तीर्थ म्हणुन ओळखले जाते.
३) संत तिर्थ- संत हे कलियुगातील चल स्वरूप असल्यामुळे त्यांच्या चरण स्पर्शाने पुनीत झालेले तिर्थ हे संततिर्थ म्हणुन ओळखले जाते.
तिर्थ यात्रा करताना पाळावयाचे यम नियम
तिर्थ यात्रा करताना विविध यम नियमांचे पालन काटेकोर पणे करावे असे पूर्वसुरींचे आग्रही मत आहे.
१) यात्रेचा दिवस निश्चित झाल्यावर अदल्यादिवशी उपवास,गणेशपूजन, पितरांना वंदन, प।र्वण श्राद्ध, सत्पात्र ब्राम्हण सत्कार व यात्रा संकल्प करावा. यात्रेहून परत आल्यावर सुद्धा परत तसेच करावे.
२) यात्रेला निघण्यापूर्वी मुंडन आवश्यक आहे (पद्म स्कंदपुराण).
३) मुंडन,उपवास,व स्नान हा सर्व तिर्थातील प्रमुख विधी आहे.
४) ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सातू, चरू, गुळ, पीठ, पायस, पेंड, यांनी पिंडदान करावे व आवाहन अर्घ्य वगळून श्राद्ध करून लगेच तर्पण करावे.
५) काल-अकाल न पाहता तिर्थाचे ठिकाणी श्राद्ध करावे.
६) तीर्थक्षेत्री गेल्यावर मुंडन करणे अत्यंत आवश्यक आहे.कारण मुंडनाने मस्तकाच्या ठिकाणी असलेली पापे नष्ट होतात.
७) प्रसंगी केव्हाही तीर्थक्षेत्री जाणे झाल्यास स्नान करावे.
८) तिर्थ यात्रेमध्ये जप-तप-परम।र्थसाधन, मनाची शुद्धी, संयम, नियम, दोषांचा त्याग, कामक्रोधादिकांचा त्याग, श्रद्धेने स्नान व निष्काम दान व निस्वार्थी सेवा याचे अवश्य पालन करावे.
९) तीर्थे जवळ आल्यास वाहनांचा त्याग करून माणसाने पादचारी व्हावे. भक्तीने जमिनीवर लोळण घ्यावी. कार्पटीक वेष घ्यावा व तीर्थात अमंत्रक स्नान करून, समंत्रक स्नान करून, तिर्थ श्राद्ध तर्पणादि करावे.
१०) श्राद्ध दिवशी रात्रौ उपवास करावा व त्यादिवशी प्रयाण न करता दुसरे दिवशी प्रयाण करावे.
११) दुसऱ्याला तिर्थयात्रेच्या कमी मदत केल्यास यात्रेचे १/४ पुण्य मिळते.
१२) दुसऱ्यासाठी तीर्थयात्रा करणाऱ्याला १/१६ फळ मिळ ते.
१३) प्रसंगोपात ज्याला तीर्थयात्रा घडते त्याला अर्धे पुण्य मिळते.
१४) एखादा धनिक आपल्या जवळचे द्रव्य, वाहन घेऊन दुसऱ्याला तीर्थयात्रा घडवतो त्याला स्वतः तीर्थयात्रा केल्यावर मिळणाऱ्या पुण्याच्या चौपट पुण्य मिळते.
१५) दुसऱ्या कार्यप्रसंगाने तिर्थास गेल्यास अर्धे फळ मिळते.
१६) व्यापाराचे निमित्ताने गेल्यास १/४ फळ मिळते.
१७) मार्गात द्विवार भोजन केल्यास व छत्री, जोडा यांचे सेवन केल्यास १/४फळ मिळते.
१८) वाहनावर आरोहण होऊन प्रयाण केल्यास १/२ फळ मिळते.
१९) दुसऱ्याच्या अनुषंगाने तिर्थ प्राप्त झाल्यास तिर्थ स्नानाचे फळ मिळते. मात्र तिर्थयात्रेचे फळ मिळत नाही. (धर्मसिन्धु) वरील नियमांचे पालन करून सश्रद्धतेने तिर्थ यात्रा केल्यास सश्रद्ध भाविकास निश्चितच त्या तिर्थ यात्रेचे फळ आनंद व समाधान मिळून त्या सामान्य भाविकांचे उत्तम साधकात रूपांतर होईल व त्याचे जीवन कृतार्थ होईल.
वरील यम-नियमाप्रमाणे तिर्थ यात्रेमध्ये गेल्यानंतर कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात याचा सुद्धा सांगोपांग विचार विविध धर्मग्रंथातून केलेला आढळतो.
१) काम-क्रोध इ. षडविकारांच्या आहारी जाणे,मौज मजा, वाह्यात मनोरंजन मिथ्या भाषण।दी निषिद्ध गोष्टी वर्ज्य कराव्यात.
२) क्षेत्रस्थ पुरोहितांच्या अंगी क्षेत्रस्थ देवतांचा वास असल्याने त्यांनी केलेल्या कर्माची चिकीत्सा न करता श्रद्धेने कर्म करावे. अन्यथा द्रव्य मनःशांती व श्रद्धा यांची हानी होते.
३) तीर्थयात्रा प्रयश्चित्म।त्मक असल्याने तसे पापाचरण परत घडू नये याची काळजी घ्यावी.
४) एका तीर्थात स्नान करताना दुसऱ्या तिर्थाचे स्मरण करू नये. अपवाद:गंगा महातीर्थ.
५) तिर्थ क्षेत्रातल्या ब्राह्मणांची परीक्षा करू नये जो अन्नर्थी, तो भोज्य समजावा.
६) तीर्थात जाऊन परान्न, प्रतिगृहादी घेऊ नये.
७) तीर्थयात्रा वाहनात बसून नकरता पायी केल्याने श्रेष्ठ पुण्य लागते. असे तिर्थप्रकाश ग्रंथात म्हणले आहे.
८) तीर्थात नित्यक्रमाचा व आचारांचा त्याग करू नये.
९) तीर्थक्षेत्रात पापा चरण केल्यास ते पाप वज्रलेपा प्रमाणे आपल्या कपाळी कायमस्वरूपी रहाते. म्हणून तिर्थ क्षेत्रात चुकूनसुद्धा पाप करू नये.
अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्य क्षेत्रे विनश्यती । पुण्य क्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती ।।
पुराण।त वर्णिलेल्या विविध निषेधाचा त्याग करून विधियुक्त रीतीने तिर्थ यात्रा केल्यास पुण्यप्राप्ती होईल. या उलट त्या सहली सारख्या करमणुकीचे साधन म्हणून केल्यास त्या तीर्थयात्रा परामार्थास व पुण्य प्राप्तीसाठी उपयुक्त ठरण्या ऐवजी कोणत्याही प्रयश्चित्ताने न जाणाऱ्या पापाच्या धनी होतात.
तीर्थयात्रा केव्हा करू नयेत?
१) पत्नी गर्भिणी असताना तिर्थयात्रा करू नये.
२) घरात मंगलकार्य झाल्यावर पूर्वी न पाहिलेल्या देवांचे दर्शन व तिर्थयात्रा करू नयेत.
३) घरातील व्यक्ती मृत झाली असताना १ वर्ष पर्यंत तीर्थयात्रा करू नयेत.
ज्या श्रद्धेय भाविकांना द्रव्याच्या कमतरतेमुळे, शारीरिक व्यंगामुळे, एखाद्या जाबाबदारीमुळे, एखाद्या तिर्थस्वरूप व्यक्तीचे सेवेत व्यस्त असल्याने, किंवा या ना त्या कारणाने तिर्थ यात्रा करणे अशक्य असल्यास साधकास त्याच्या शरीरापासून शास्त्रानी त्या साधकास गुरु, आई, वडील, ब्राम्हण याना तिर्थस्वरूप समजून त्यांची सेवा करावी अशी शास्त्राने आज्ञा केलेली आहे. गुरु, आई वडील, पती, पत्नी कर्मभूमी, धर्मस्थान, धर्मकृत्य, ब्राह्मण चरण तिर्थ, ब्राम्हणांचा उजवा कान उजवा हात ह्यांना लाक्षणिक अर्थाने "तिर्थ" आधी संज्ञा शास्त्राने दिली आहे. भगवतभक्त भागवतादी धर्मग्रंथांचे वाचन होणारे गृहशास्त्रांनी दिलेले आहे.
दत्तक्षेत्र व गुरुक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नृसिंह वाडी, औदुंबर, गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, इ. क्षेत्रातून त्या क्षेत्रींचे पुजारी व सेवेकरी शतकानुशतके गुरुचरण सेवा अव्याहतपणे करीत आहेत. गुरुसेवा हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. त्यांची मनोभूमिका अशी असते,
अनंतकोटी तीर्थे गुरुचरणापाशी । वंदूनी सेवा करती पावती मुक्तीसी ।।
या संतोक्ती प्रमाणे तिर्थ यात्रेसाठी देशोदेशी न भटकता गुरु चरणांची सेवा व गुरुचरण तिर्थ हीच सर्व तीर्थांची तीर्थयात्रा अशी दृढ निष्ठा ठेऊन गुरुचरणाची नवविधा भक्ती प्रकाराने सेवा करून, तिर्थ प्रसाद ग्रहण करून, दुर्लभ आयुष्य सार्थकी लावत आहेत.
देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे ?
१. पादत्राणे देवळाच्या बाहेर शक्यतो आपल्या डाव्या हाताला काढावीत.
२. पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुऊन अपवित्रः पवित्रो वा..., असे म्हणत स्वत:वर तीन वेळा पाणी शिंपडावे.
३. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा, तसेच देवळाकडे जातांनाही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.
४. देवळाच्या पायर्या चढता चढता उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्याला लावावा.
५. देवळात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराला नमस्कार करा
देवतेचे दर्शन कसे घ्यावे ?
१. देवळातील घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी.
२. देवतेच्या मूर्तीसमोर असलेल्या कासवाच्या (शिवाच्या देवळात नंदीच्या) कडेला उभे राहून हात जोडून दर्शन घ्यावे.
३. आधी देवतेच्या चरणांवर दृष्टी ठेवून लीन व्हावे, नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे आणि शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यांत साठवावे.
४. फुले देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर वाहावीत. मूर्ती दूर असल्यास सर्व वस्तू समोरील ताटात ठेवाव्यात.
मंदिरात कासव का असते?
- कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो.
- कासवाला श्रीविष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते.
- कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे.
- कासव हे श्रीविष्णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.
- काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे.
- आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.
कासवाचे गुण
- कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात काम, क्रोध, मोह, लोभ, मोह आणि मत्सर.
- कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे.
- कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.
- कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.
- कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.
- कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा भावार्थ
- कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते', असा आहे.
तिर्थक्षेत्रीची पुरातन मंदिरे
दर्शन घेण्या मागील अध्यात्म आणि विज्ञान.
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक (good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई. आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही १००% विज्ञान कसे आहे ते पाहू.
१) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो.
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे (उदा. संगमरवर) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल. जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल, तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..
२) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे.
ह्यामागेही दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने (inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
३) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ) कापूर जाळणे - दृष्टी
ब) कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे- स्पर्श
क) मुर्तीवर फुले वाहणे- फुलांच्या अरोमामुळे वास.
क) कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे-चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात ८ तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ-ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन. पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा. मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जाऊ या. मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो science वर आधारित आहे.
तिर्थ यात्रेत व मंदिरात देवदर्शन घेतांना या गोष्टी टाळाव्यात
(संदर्भ: पद्मपुराण)
मंदिरात जाताना, देवदर्शन घेताना आपला व्यवहार कसा असावा, आपण कसे वागावे याविषयी आपल्या शास्त्रात बरेच निर्देश देण्यात आले आहेत.पद्मपुराणात बत्तीस (३२) सेवापराध सांगितले आहेत. मंदिरात अथवा देवदर्शन घेताना काय करु नये हे यात सांगितले आहे. या ३२ गोष्टी केल्याने देवदर्शनाचे पुण्य तर मिळत नाही पण उलट अपराध केल्याचा दोष मात्र लागतो, म्हणून धर्मिक वृत्तीच्या प्रत्येकांने मंदिरात जाताना अथवा देवदर्शन घेताना या ३२ गोष्टी टाळाव्यात.
१ – मंदिरात वाहन (चप्पल बूट ई) घालून जाणे अथवा वाहनावर बसून जाणे.
२ – देवांसंबंधीत उत्सव साजरे न करणे अथवा उत्सवात सामिल न होणे.
३ – देवासमोर जाऊन देवाला नमस्कार न करणे.
४ – अशुद्ध किंवा अपवित्र अवस्थेत देवदर्शन घेणे.
५ – देवाला एका हाताने नमस्कार करणे.
६ – प्रदक्षणेला जागा असताना देवासमोरच एका जागीच प्रदक्षणा करणे.
७ – देवासमोर पाय पसरुन बसणे.
८ – देवासमोर खाटेवर अथवा पलंगावर बसणे.
९ – देवासमोर झोपणे.
१० – देवासमोर जेवण करणे.
११ – देवासमोर खोटे बोलणे. (इतर वेळीही खोटे बोलणे हे टाळावेच).
१२ – देवासमोर जोरात, मोठ्या आवाजात बोलणे.
१३ – देवासमोर परस्पर गप्प मारणे.
१४ – देवासमोर रडणे, अश्रू ढाळाणे.
१५ – देवासमोर इतरांशी भांडणे.
१६ – देवासमोर इतरांना शिक्षा देणे, अथवा शासन करणे.
१७ – देवासमोर दुसऱ्यांवर अनुग्रह (दया, कृपा) करणे.
१८ – देवासमोर स्त्रियांवर रागावणे अथवा स्त्रियांप्रती वाईट बोलणे.
१९ – देवासमोर अंगावर कंबल अथवा चादर ओढून घेणे.
२० – देवासमोर दुसऱ्यांची निंदा करणे.
२१ – देवासमोर दुसऱ्यांची स्तुती करणे.
२२ – देवासमोर अपशब्द बोलणे.
२३ – देवासमोर अधोवायुचा त्याग करणे.
२४ – ऐपत असतानाही गौण उपचारांनी देवाची पुजा करणे.
२५ – देवाला नैवेद्य (भोग लावणे) दाखविल्याशिवाय खाणे.
२६ – नविन ऋतूतील येणारे फळ (सिजनल फळ) देवाला अर्पण केल्याशिवाय खाणे.
२७ – वापरलेले अथवा वापर करून उरलेल्यातील वस्तू देवाला अर्पण करणे.
२८ – देवाकडे पाठ करुन बसणे.
२९ – देवासमोर दुसऱ्यांना नमस्कार करणे.
३० – गुरुंचा अनादर करणे, गुरुंची स्तुती न करणे.
३१ – स्वत:च स्वत:ची स्तुती करणे.
३२ – कोणत्याही देवांची निंदा करणे.
वरवर पाहता या गोष्टी केवळ एक प्रकारचा निर्देश आहेत असे वाटतात पण नीट समजून घेतल्या, जरा विचार केला तर लक्षात येते की या मागे शास्त्रकारांना काय सांगायचे आहे. मंदिरात जाताना आपली मानसिक व शारिरीक स्थिती कशी असावी याविषयी यातून मार्गदर्शन मिळते. क्रोधीत अथवा खिन्न मनस्थितीत, घाई गडबडीत मंदिरात जाऊ नये. निवांत, प्रसन्न व उल्लासित मन असताना देवदर्शनासाठी मंदिरात जावे असे यातून लक्षात येते.
मंदिरातील “देवतीर्थ“ म्हणजे काय ?
मंदिरातील गाभार्यात असणार्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी, दुध, मध ,दही, वेलचीपूड, कापूर, केसर, लवंग तेल, तूप, तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो.
हे मिश्रण "तीर्थ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते. ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते, केसर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कपूर श्वास दुगंधी नाहीशी करतो.
चुंबकीय शक्तीने भरलेले हे “तीर्थ” रक्तशुद्धी करते. हेप्रयोग वरून सिद्ध झाले आहे . म्हणूनच हे “तीर्थ“ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते .ह्या मुळेच आपण दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी ज्यायोगे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत होत असे .
ह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा, भक्तांना वाटते कि मंदिरातील पुजारी आपल्या (अध्यात्मिक) ताकतीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील, पण असे होत नाही. जेव्हा मंदिरात “दीपाराधना“ केली जाते किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभार्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात. मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात.