औदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष

औदुंबर वृक्ष
औदुंबर वृक्ष

औदुंबर वृक्ष पूर्वोतिहास व कल्पवृक्ष वरदान

हिरण्यकशिपु नावाचा एक दैत्य होता. देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यु येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे, तो फार उन्मत्त झाला होता. त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी सहाजिकच होते. त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद. तो मुलगा मात्र विष्णूभक्त निपजला. त्याचे त्या हिरण्यकशिपुने फार हाल केले. अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहीले, पण देव तारी त्याला कोण मारी? अखेर दरवेळी मृत्यूमुखांतून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून, हिरण्यकशिपु प्रल्हादाला म्हणाला," काय रे कारट्या, तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे?" 
"बाबा, तो चराचरात सर्वत्र आहे." 
"महालाच्या या खांबात आहे का?" 
"हो आहे." 
ते ऐकताच हिरण्यकशिपुने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेंव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानवशरीरासारखा अशा रूपांत श्रीविष्णु बाहेर पडले. तोच त्यांचा नरसिंहअवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपुला त्या महालाच्या उंबरठय़ावर, आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेऊन, त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्रीविष्णूंने केला खरा; परंतु त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते, ते त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखांत भरले. त्यांच्या नखांंचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती. या वेळी महालक्ष्मीने, मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्रीनृसिंहंना त्या फळांत आपली नखे खूपसावयाला सांगितले. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहांंच्या नखांंचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाला. तेंव्हा लक्ष्मीवर विष्णु प्रसन्न झालेच, परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला,

"हे औदुंबरवृक्षा, तुला सदैव फळे येतील, तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिध्द होईल. तुझे भक्तिने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझे दर्शन होताच उग्र विष्णुसुद्धा शांत होईल. ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्यप्राप्ती होईल." औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच.

श्री गुरु नृसिंहयती नरसिंहमंत्राची उपासना करताना औदुंबराखाली बसत. ते स्वतः नरसिंहाचे अवतार. त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदुंबराची शितलता अजूनही त्यांना आवडत होती. अमरेश्वर सान्निध्यात राहत असताना ,मध्यान्ह काळी चौसष्ट योगिनी तेथे येऊन श्री गुरूंची पूजा करीत व नंतर त्यांना आपल्या मंदिरात घेऊन जात. त्यांच्याकडून श्री गुरु पुन्हा औदुंबराखाली परत येत. त्यावेळी श्री गुरुयती गांवात भिक्षा मागायला जात नसत. त्यामुळे सदासर्वकाळ अरण्यवासात राहणारा तो यती जिवंत तरी कसा राहतो, याचेच सर्वांना आश्चर्य वाटू लागले. एखाद्या इसमाला पाळतीवर ठेवून तो यती दुपारच्या वेळी काय करतो हे बघावे, ठरविण्यापर्यन्त लोकांच्या कुतूहलाची मर्यादा गेली. त्याप्रमाणे काही ब्राह्मण लोक माध्यान्हसमयी वस्तुस्थिती पाहावयाला संगमस्थानावर गेले; परंतु त्या ब्राह्मणांच्या मनात अचानक भीती निर्माण झाली व मग मदोन्मत्त झालेले ते विप्र मदरहित होऊन परतले. त्या वेळी एक गंगानुज मात्र आपल्या शेताची राखण करीत होता. त्याने काठावरुन श्रीगुरुंना पाहीले. योगिनी नदीतून पूजेला आल्यावर, श्रीगुरु पाण्यातून पुढे जाऊ लागतांच, नदीचे पाणी दुभागांत होऊन, श्रीगुरुंना वाट मिळाली. त्यानंतर चौसष्ट योगिनींसह ते गंगेत मध्यापर्यंत चालत गेले व तेथे भिक्षा करून नंतर ते परत आले. नदीच्या पाण्यातून वाट मिळणे व देवकन्यांकडून पूजा होणे या गोष्टी पाहून त्यावेळी आपल्या शेतांतुन ते सर्व दृश्य पाहणारा तो गंगानुज आश्चर्यचकित झाला व श्रीगुरु हे परमेश्वराचेच अवतार आहेत याबद्दल त्याची खात्री पटू लागली. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या प्रकाराची नीट परीक्षा घेण्याचे त्याने ठरविले. ठरल्याप्रमाणे माध्यान्हकाळी श्रीगुरु नदीवर आले. नदीच्या पाण्यांत त्यांनी पाऊल टाकतांच पाणी द्विभाग झाले व नदीच्या मधोमध रस्ता तयार झाला. त्यांच्या पाळतीवर असलेल्या गंगानुजानेही त्यांच्या मागोमाग जाण्याचे ठरविले व त्याप्रमाणे गेल्यावर त्याला नदीच्या प्रवाहांत एक रत्नखचित गोपुरांनी युक्त असलेले अनुपम नगर दिसू लागले. दूसरी अमरावतीचं होती जणू काय ती! श्रीगुरुरुपी सूर्य उगवतांच सारे लोक आरती घेऊन आले व त्यांनी श्रीगुरूंची षोडशोपचारांनी पूजा केली. श्रीगुरुंनी आपल्यामागून आलेल्या गंगानुजला विचारले, "काय रे, तू का आलास येथे?"
 
"स्वामी, मी सहजच आपल्या दर्शनाला आलो आहे. हे यतीराज, तूच गिरिजारमण शंकर आहेस. तूंच त्रिमूर्ती आहेस. तुझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान मायामोहामुळे मला झाले नाही, परंतु आता मला आपण उद्धरावे. मी आपणाला शरण आलो आहे." 

"अरे गंगानुजा, आजपासून तुझे दैन्य संपले व उर्जीतावस्था चालू झाली. तुझ्या मनातल्या सर्व कामना पूर्ण होतील. पण ही सर्व हकीगत कोणाला सांगू नकोस. ज्या दिवशी या रहस्यातले आवाक्षर कोणाला सांगशील त्याच दिवशी या जगाचा तू निरोप घेशील हे लक्षात ठेव." 

"मुनीराज, मी कोणालाही हे वर्तमान सांगणार नाही." असे बोलून श्रीगुरुंंबरोबर तोही परत काठावर आला. ती दिव्य नगरी लुप्त झाली व नदीचे पाणी पूर्ववत वाहू लागले. त्याचे दोन भाग होऊन वाट तयार झाल्याचा मागमुसही तिथे राहिला नव्हता. काठावर परत आल्यावर श्रीगुरु औदुंबराखालील आपल्या नित्य वसतीस्थानाकडे गेले व तो शेतकरी आपल्या शेतात गेला. त्या दिवशी शेताची देखभाल करताना त्याला एक विचित्र वेल एका ठिकाणी दिसली. ती वेल उपटुन टाकावी म्हणून त्याने प्रयत्न केला; परंतु तिची मुळे खोलवर गेली होती. त्यामुळे हाताने ती उपटता येईना. कुदळ आणून खणताच त्याच जागी त्याला जमिनीत पुरलेला, संपत्तीने भरलेला हंडा मिळाला. त्याने तो निधी मिळतांच श्रीगुरुंकडे धाव घेतली व त्या दिवसापासून तो श्रीगुरुंचा निस्सीम भक्त झाला. तो गरीब आता श्रीमंत झाला होता. एकदा त्याने काशी व प्रयाग ही क्षेत्रे पाहण्याची उत्सुकता श्रीगुरुंना दाखविली, तेंव्हा पंचगंगा संगम म्हणजे दक्षिणेकडील काशिपुर व कोल्हापूर हेच दक्षिण प्रयाग असे सांगून, प्रत्यक्षात त्रिस्थळी दाखविण्याचे आश्वासनही दिले व व्याघ्रजिनावर आपण बसून त्या ब्राह्मणाला ते कातडे मागून घट्ट पकडावयाला सांगितले. तेंव्हा योगप्रभावाने ते आकाशातून संचार करीत लगेच म्हणजे सकाळीच प्रयागला गेले. तिथे स्नान करून माध्यान्ही विश्वनाथाचे दर्शन काशीक्षेत्रांत घेऊन, पुढे गया या तीर्थक्षेत्रालाही त्याला घेऊन गेले. मनोवेगाने जाणाऱ्या त्या श्रीगुरुंना स्थलकालाच्या मर्यादेचे कसले बंधन! सूर्यास्त होण्याच्या सुमाराला त्रिस्थळी यात्रा आटोपून अमरेश्वरला परतसुद्धा आले ते. थोडीफार कीर्ति प्रगट झाली आहे, तेंव्हा आता अमरेश्वराहुन गुप्त व्हावे असा विचार श्रीगुरुंनी नंतर केला. त्या गंगानुजाने श्रीगुरुंची स्तुतीस्तोत्रे गायिली व मनोवेगाने जाण्याचा अनुभव घेऊन तो घरी परतला. चौसष्ट योगिनींना श्रीगुरुंनी दुसऱ्या दिवशी, मध्यान्हीला त्या पूजेला आल्या असताना, ती सर्व हकीकत सांगून गुप्त होण्याचा निश्चय सांगताच त्यांनी त्यांचे पाय धरले व श्रीगुरुंशिवाय जगणे म्हणजे यमदुतांना बोलाविणे, अशी आपली स्थिति असल्याचे विनविले. तेंव्हा, "आपण औदुंबरावर नेहमी राहू, कधी वाटेल तेंव्हा माझ्या भेटीची इच्छा झाली की औदुंबराकडे जात जा.", असा दिलासा श्रीगुरुंनी त्यांना दिला तेंव्हा कृष्णानदीच्या पश्चिम तीरावरील खमरपुर या स्थानी जो औदुंबर आहे तिथेच रोज पूजेला जाण्याचे त्या चौसष्ट योगिनींनी ठरविले. त्या ठिकाणी योगिनींनी श्रीगुरुंंची पूजा केली. त्या औदुंबराखाली जप किंवा अनुष्ठान करणाऱ्याचे पाप, ताप, दैन्य, भीती, आधी, व्याधी व क्लेश सर्व काही दूर होईल असा आशीर्वाद श्रीगुरुंनी दिला व ते तेथून निघून गाणगापुरला प्रगट झाले. 
(दत्त गुरूंच्या साधनेत औदुंबरोपासनेचे अनेकांना आश्चर्यकारक फळ मिळाले)

औदुंबर वृक्ष
औदुंबर वृक्ष  - कल्पवृक्ष

श्रीमहाविष्णु हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रुपात प्रकट झाले. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटु लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रल्हादास

दवेतसिध्दांताविषयी आसक्ति असल्याचे जाणून घेऊन, श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतीवेष धारण करून दीन जनांचा उध्दार करशील असा आशिर्वाद दिला होता. परम पवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्रीदत्तांच्या चरण कमलावर पडून मला सुध्दा वर द्या अशी प्रार्थना केली. तेव्हा श्रीदत्तात्रेय म्हणाले,

“प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्या मधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन. असे माझे वचन आहे.”

दत्त भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्या समोर आपण अगदीच क्षुद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असले तरी गुरूदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुर्नजीवन देतात. तसेच अवतारी पुरूष त्यांच्या आश्रितांचे दु:ख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुर्नजन्मप्रदान करतात. दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ति देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राण शक्तिव्दारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अल्पबुध्दिचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरे तर ती प्राणशक्ति औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शरीरव्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राण शक्ति भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. ही प्राणशक्ति परिपूर्ण असते, कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रेय असतात.”

औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते.

औदुंबर महात्म्य व  नाथ संप्रदाय

नाथ पंथांच्या परंपरेतील थोर विभूतींनी चित्रकूट येथून पंथ कार्य केल होत. चित्रकूट येथे माधवनाथांनी कार्याला आरंभ केला आणि नंतर तेथील स्थानमहात्म्य व पंथ महात्म्य हे देवगांवरंगारी जिल्हा औरंगाबाद येथे आणले. त्यानंतर चित्रकूटच्या स्थानाची परंपरा बंद झाली. ते सर्व कार्य व महात्म्य देवगांवरंगारी येथून सुरू केले. माधवनाथां नंतर व्यंकटनाथांनी कार्य केले. त्यांच्या समाधी नंतर पुढील कार्य त्यांच्याच कृपा आशिर्वादाने ह्या नाथ शक्तिपीठातून होत आहे. या संबंधीचा इतिहास या पूर्वी वाचकां समोर सादर केला आहे. पंथाची अशी ही अखंड परंपरा अजून कार्यरत आहे. पंथाच्या सिध्दतेची अनुभूती या नाथ शक्तिपीठातून अनेक जण घेत आहेत. या सर्व गोष्टीमुळे या नाथ शक्तीपीठाला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. 

या शक्तिपीठाच्या गाभार्‍याच्या मागे भगवान दत्तात्रेयाच्या अत्यंत प्रितीचे औदुंबर वृक्ष स्वयंभू पणे प्रस्थापीत झाले आहे. भगवान श्री दत्तात्रेयांच्या गुरुचरित्रात औदुंबराचे महत्व विशेष प्रकाराने सांगितले आहे गुरूचरित्रांत वर्णन केलेल्या कथानका प्रमाणे असे सांगीतले आहे की हिरण्यकश्यपु हा एक थोर भक्त होता त्याचा मुलगा हा विष्णुचा महान भक्त होता. आपला मुलगा प्रल्हाद हा एक थोर विष्णु भक्त आहे हे हिरण्यकश्यपाला सहन होत नव्हते. त्याचा द्वेष एवढा वाढत गेला की रागाच्या भरांत त्याने प्रल्हादाचा छळ करायला सुरवात केली आणि सरते शेवटी प्रल्हादाला मारून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. 

आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यासाठी विष्णुने नृसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपूला मिळालेल्या वराचा भंग न होवू देता आपल्या पंजाच्या नखांनी त्याचे पोट फाडून जीव घेतला. या गोष्टीं मुळे नृसिंहाच्या नखांची अतीव आग होवू लागली. नृसिंहाचे हे दु;ख दूर करण्यासाठी आणि हाताच्या नखांची शांती करण्यासाठी महालक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणली व नृसिंहाची नखे या औदुंबराच्या फळांत खुपसून ठेवण्यास सांगितली. त्यामुळे अती उग्र, क्रोधायमान झालेला नृसिंहदेव शांत झाला. त्यानंतर नृसिंह देवाने महालक्ष्मी व औदुंबरास वर दिला व म्हणाले की तू सदैव फुलत राहशील. आणि कल्प वृक्ष म्हणूनच प्रत्येक ठिकाणी राहतील. जे जे लोक भक्तिभावनेने औदुंबराची पुजा करतील त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येईल. त्यांच्या पापांच क्षालन होईल. पूर्ण भक्ति भावनेने औदुंबराची आराधना केली तर ज्यांना पुत्र प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची देखील कामना पूर्ण होईल असा ह्या औदंबराचा महिमा आहे. ज्यांना भू संपत्ती आदींची अपेक्षा आहे ती देखील पूर्ण होवू शकते असा हा कल्पवृक्ष आहे. 

औदुंबराच्या छायेत बसून जपानुष्टान केले. तर अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होवून जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली औदुंबराच्या छायेत पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान करावे म्हणजे भागिरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. या कलियुगा मध्ये हा कल्प वृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या ज्या कामनेने आपण सेवा करू ती ती कामना पूर्ण होईल असा हा कल्पवृक्ष आहे. धन, धान्य, भू संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते. सोम सूर्य ग्रहणाला अथवा संक्रांती च्या महिन्यात भक्तीयुक्त अंत:करणानी स्नान केले असता अश्वमेधाचे अनंत पुण्य मिळते. सोमवारी, अमावास्येला, व्यतीपातादी पर्वणीला असे स्नान केले असता सुरनदीतीरीं ब्राह्मणांला सोन्याने मढवलेल्या १००० कपीला गाईचे दान दिले असता जे पुण्य मिळते ते पुण्य मिळेल असा या औदुंबराचा महिमा आहे. 

अशाच भक्ती भावाने औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षातळीं निर्मळ मनाने जप करिता अनंत गुणांनी त्याची फळें मिळतात. तसेच औदुंबर वृक्षातळीं निर्मळ मनाने हवन केले असता अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळीं निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रूद्र केला असता अतिरूद्र केल्याचे फळ मिळते. मंदगतीने प्रदक्षिणा केल्या तर खूप मोठे पुण्य पदरी पडते असा याचा महिमा आहे. एक लक्ष प्रदक्षिणा केल्या तर कुष्ठरोगा सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. सर्व दिशेकडून संरक्षण देणार्‍या नृसिंहांची उपासना औदुंबरा खाली करतात. त्यांचा वास सदैव औदुंबरी असतो. 

वरील प्रमाणे औदुंबर वृक्षांचे महात्म्य वर्णन केले आहे. हे पुराणातले आहे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. या शक्तिपीठांत देखील औदुंबर व अश्वत्थवृक्षाच्या महतीची अनुभुती अनेकांनी घेतली आहे. या पुरातन काळातील औदुंबर वृक्षाच्या महात्म्याचे वर्णन हा केवळ इतिहास नसून आजही येथे यथासांग कर्म केले तर त्याची अनुभुती आपण घेऊ शकता. नाथ शक्ती पिठातील या नैसर्गिक वृक्षाबरोबर येथील अधिष्ठीत देवतांची कृपा शक्ती कार्य करीत आहे. उपासना, पूजा अर्चा, हवन, दानादी कर्म करुन आपण आपल्या व्यक्तिगत जीवनातील व्यथा, अडचणी जीवनात भेडसावणारे प्रश्‍न इत्यादींचे निराकरण करून मनःशांतीचा अनुभव घेवू शकता. 

नाथ शक्ती पिठातील ह्या औदुंबराच्या छायेत गुरुचरित्राचे पारायण करुन तसेच अश्वत्थाखाली मंत्र आदी उपासना करुन, प्रदक्षिणा घालून व आमच्या मार्गदर्शनाखाली साधना करुन आपले इप्सीत व मनःशांतीचा अनुभव बर्‍याच लोकांनी घेतला आहे. आज नाथशक्तिपीठातून जे कार्य होते ते भारताच्या कोणत्याही भागातून होत नाही, असे येथे येवून जाणारे जाणकार सांगतात. शक्तिपीठाच्या या कार्याला गुरूंच्या आशिर्वादा बरोबर सामर्थ्य संपन्न साधु संतांचेही आशीर्वाद मिळाले आहेत. वेद मंत्राच्या माध्यमातून भाग्याचे पुनरूज्जीवन ही पुस्तिका नाथशक्तिपीठाने प्रकाशीत केली आहे. या शक्तिपीठाच्या माध्यमातून आपल्या भाग्याचे पुनरूज्जीवन झाल्याची अनुभूती बर्‍याच लोकांनी घेतली आहे. ही संस्था गेल्या १८ वर्षा पासून कार्यरत आहे. गुरू कृपेच्या अखंड परंपरेच्या छत्रा खाली आपले जीवन सत्शील, सत्प्रवृत्त व सद्भक्त करून रामदास स्वामींनी म्हटल्या प्रमाणे- 

तरीच परमार्थ घडे | मुख्य परमात्मा आतुडे | अनुभवेसी | 

याची अनुभूती आजच्या काळात देखील घेतल्याची उदाहरणे आहेत.

औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग

दाह शमन करणारा दैवी वृक्ष: औदुंबर अर्थात उंबर. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उदुम्बराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया;

१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे. कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा.
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो ...
६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते. पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात.
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.
९. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.
१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.
११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला. तो कशानेच थांबेना. मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला. भगवान दत्तगुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही.

औदुंबर वृक्ष प्रदक्षिणा
औदुंबर वृक्ष प्रदक्षिणा

औदुंबर वृक्ष माहात्म

दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबरतळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रूत आहे अनेक पुण्यवृक्ष त्यजून ।काय प्रीती औदुंबरी ?असा प्रश्न विचारल्यावरून एकोणविसाव्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्रीनृसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. हिरण्यकशिपूचा श्री र्नसिंहानी वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहीली. त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचे फळ आणले आणि 
तये वेळी शीतलार्थ । नखे रोविली औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला । 
अशा औदुंबरास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. या वृक्षाचे माहात्म वर्णन करतांना श्री गुरूचरित्रकारांनी म्हटले आहे,

तया समयिं औदुंबरासी देती वर हृषीकेशी । "सदा फळित तूं होसी । 'कल्पवृक्ष' तुझे नाम ॥१७॥
जे जन भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं । तुज देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥
जे सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक । फळ प्राप्त होय निके । पापावेगळा होय नर ॥१९॥
वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता । जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥
तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान । अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥
तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥
तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥
जें जें कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥
सदा वसों तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी" । म्हणोनि वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥
ऐसा वृक्ष औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु । 

  ।।श्री गुरूदेव दत्त ।।