श्री श्रीपाद श्रीवल्लभ दत्रात्रेय मंदिर (विश्रांतीस्थान), कुरुंदवाड

स्थान: कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. श्री क्षेत्र नरसोबावाडी पासून ३ कि. मी.    
सत्पुरूष: श्रीपाद श्रीवल्लभ              
स्थान माहात्म्य: श्रीपाद श्री वल्लभ यांचे विश्रांतीस्थान   

श्री दत्तप्रभू
श्री श्रीपाद श्रीवल्लभ दत्रात्रेय 

श्री कृष्णा-वेण्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या पवित्र संगमकाठी कुरुंदवाड (कुरवपूर) हे एक प्राचीन नगर आहे. निसर्गतःच तीर्थत्व लाभलेल्या या आकर्षक परिसराकडे साधू संतांची पावले न वळतील तर नवलच ! कृष्णा नदीच्या पूर्व तीरावरील अमरापूर (औरवाड) आणि पश्चिम तीरावरील कुरवपूर (कुरुंदवाड) हि दोनही गांवे श्री. क्षेत्र नृसिंहवाडी वसण्याच्या म्हणजे इ. स. १४३५ च्या आधीपासून अस्तित्वात आहेत. गुरुचरित्रातील अ. १८, ओवी क्र. १३ मध्ये केलेल्या वर्णनावरून "

कुरवपूर महागहन | कुरुक्षेत्री तोचि जाण ||
पंचगंगा-कृष्णा संगम | अति उत्तम परियेसा ||

अशा सार्थ शब्दात कुरुंदवाडचे वर्णन केले गेले आहे.

श्री दत्त प्रभूंचे अवतार, भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करीत असतात, स्मरण करताच प्रत्यक्ष येऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात म्हणून त्यांना स्मर्तृगामी म्हणतात. कृतयुगात स्त्री अनसुया यांच्या तपाने प्रसन्न होऊन अवतार घेतला व भूतलावर दत्त भक्तीरुपी कल्पवृक्ष संवर्धित केला.

त्यांचा द्वितीय अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठीकापुरम (पिठापूर) येथे इ. स. १३२० मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्ण यजुर्वेद शाखा, आपस्तंभ सूत्र, भारद्वाज गोत्रेंवद्भव ब्रह्मश्री घंडीकोटा अप्पलराज शर्मा तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. पिठापूरम येथे १६ वर्षे तर कुरवपुरात १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षाच्या काळात त्यांनी अद्भुत अशा लीलाचरित्र दाखवून स्वभक्तांना इह परलोकातील शास्वत सुख प्रदान केले. सण १३२० ते  १३५० च्या त्यांच्या काळात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी या रूपात, या परिसरात राहून गेलेले आहेत. कुरुंदवाड (कुरवपूर) मधील सध्याचे श्रीदत्त मंदिर जे पूर्वीच्या राजप्रासादालगत, त्याच्या उत्तर दिशेच्या उतारावर "अनवडी" नामक पंचगंगेच्या उपप्रवाहाकाठी आहे, तिथे त्याकाळी गर्द वनराई होती. तिथे श्री. श्रीपाद वल्लभ वामकुक्षी घेत असत. त्यामुळे हे ठिकाण त्यांचे निद्रास्थान म्हणून ओळखले जाते.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचे समवेत या कृष्णा प्रयाग तीर्थावर आलेले श्री. रामचंद्र योगी महाराज यांना आपण श्री. नृसिंह सरस्वती स्वामींच्या रूपाने जन्म घेऊन परत या वैकुंठ भूमीत येईन त्यावेळी परत एकदा आपली भेट होईल असे भविष्य वचन दिले होते. ते खरे करणेसाठी ते कारंजा नगरीत श्री. नृसिंह सरस्वती स्वामींच्या रुपाने तेथील माता आंबा आणि माधव यांचे पोटी इ. स. १३७८ मध्ये भाद्रपद शु. ५४ रोजी जन्माला आले असून त्यांनी इ. स. १४२२ मध्ये येथील प्रयागांवर भिलवडी जवळील औदुंबर क्षेत्रावरून येऊन संगम क्षेत्रावरील दुआबाच्या जंगलात १२ वर्षे राहून आपली तपसाधना केली असून भक्तांचा उद्द्धार करताना अनेक लीला केल्या आहेत. त्यावेळी ते भिक्षेसाठी कुरुंदवाड, आलास, शिरोळ, अमरापूर, कोल्हापूर आदी परिसरात गावांत जात असत. तर कधीकाळी भक्ताघरी भोजनही करत असत. येथील तपाच्या तपःपूर्तीनंतर त्यांनी गंधर्वपूर (गाणगापूर) या भीमा अमरजा नद्यांच्या संगम क्षेत्राकडे आपल्या पुढील कार्यसिद्धीसाठी दिले वचनाप्रमाणे प्रयाण केले आहे. तत्पूर्वी भक्तांसाठी मनोहर पादुका, जान्हवी व अन्नपूर्णा यांची कृष्णा प्रयाग तीर्थावर स्थापना केली असून आलासच्या वृद्ध भैरंभटास वृक्ष तोड़ करून निवास करणेस सन १४६४ मध्ये आज्ञा केली असून वंश विस्ताराचा आशीर्वाद दिला आहे. त्या सुमारास नृसिंह वाटिका हे गांव नव्यानेच अस्तित्वात आले होते.    

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी पादुका

पुढील काळात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आधी सूचित केल्याप्रमाणे एका जैन मतस्थाकडून श्री प्रभूंची माहिती पोहोचेल, तत्पूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात दिली आहेत. त्या चरित्रामृताचा श्री गणेशा करणेस भक्तास सुचवले असून त्या श्री वल्लभांचा महिमा कथन करताना ज्या ज्या गोष्टीं कथित केल्या आहेत. उदा. त्या गावी जी भावंडे तेथील शेतीतून उत्पन्न घेत होती तेथे पायथ्याला एक विहीर होती. तेथून गेल्यानंतर फावडा घेऊन पाणी काढण्याच्या शोधात वाळू उकरत असताना अंतर्भागात दडलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वरती आला. त्याच्यातील व्यंगदोष नाहीसे झाले, मात्र त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला, ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढणेत आली.

कुरवपूर (कुरुंदवाड) या ठिकाणीही अगदी असाच  मिळता जुळता प्रकार एका जैन श्रावकाचे माध्यमातून घडलेला आहे. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांच्या निद्रस्थळी पुढील काळात शेताची भांगलण करून गवत कापत असता त्यांच्या घर गड्याच्या खुरप्याला जमिनीखालील पाषाणांशी जोरदार संघर्ष होऊन त्यातून रक्ताची चिळकांडी उडतांना पाहिले नंतर या अनपेक्षित आणि आश्चर्यकारक प्रकाराने गर्भगळीत होऊन भीतीने बोबडी वळलेल्या अवस्थेत तो वाड्यावर परतला. या ठिकाणीही अशीच पाण्याची विहीर उपलब्ध आहे. येथील जैन श्रावकाला दृष्टांत देऊन श्रीं नी अभय दिले असून पादुकारूपी पाषाणाची स्वच्छता करून विधिवत स्थापना करणेस सुचविले. हा प्रकार सुमारे १७ व्या शतकात घडला असावा असे सन १६५८ मध्ये त्र्यंबक हरी पूजक यांना येथील पूजेसाठी नियुक्त केलेल्या दाखल्यावरून अनुभवास येते. त्या काळाचे जैन श्रावक नरसगोंडा सकगोंडा पाटील (मजरेवाडीकर) हे असावेत असे अनुमान त्यांच्या प्राप्त वंशावळीवरून निघते. विजापूरच्या आदिलशहाने त्यांना पाटीलकीचे वतनासह २०० एकर जमीनही इनामात बहाल केल्याचे समजते. १७ व्या शतकात मंदिर बांधणी कुणी केली व पूजेचा हक्क त्रिंबक पंतांना कोणी दिला हे अनिश्चित आहे. मात्र त्यांना पाटील घराण्याकडून देवासाठी ज्वारी, डाळ, तूप इ. साठी तजवीज केली जात असे. पुढील काली हीच प्रथा चालू ठेवण्यासाठी एक सामान्य लेखा करून ठेवला आहे. त्यानुसार रायगोंडा बिन नरसगोंडा पाटील, रा. मजरेवाडी यांनी वेदमूर्ती रा. रा. जिऊभट्ट बीन गंगाधर भट पुजारी-जोशी, गोत्र गार्ग्य, सूत्र आश्वलायन मौजे कुरुंदवाड यांसी मौजे मजकूर (कुरुंदवाड) येथील हद्दीमधील त्यांना आदिलशहा दुसरा यांचे कारकिर्दीत मिळालेल्या इनामाच्या पाच बिघे मधील दोन बिघे जमीन हि कुरुंदवाडचे श्री. नरसोबाचे दररोजच्या नैवैद्यासाठी जसे त्यांचे पूर्वजांनी व वाड वडील सुरु केलेल्या प्रथेनुसार देवांस ज्वारी, डाळ, तूप इ. साठी देत आले, त्याच प्रमाणे पुढे चालू ठेवण्यासाठी चालू सालापासून म्हणजे शके १७६९ (सन १८४७) पासून याचा प्लवंगणाम संवत्सर सन १२५७ फसली पासून या इनाम करून दिलेल्या दोन बिघे जमिनीचा वापर करून त्यांनी देणाऱ्याचे आणि यजमान स्वामींचे अभिष्ट चिंतन करणेचे आहे. असा मजकूर असून ते धरणगुत्तीचे बाजूस पंचगंगेपलीकडे गट नं. २६० ही पालखी चावर नावाने ओळखली जाणारी जमीन आहे. या मंदिरातील देवपूजेचे काम त्रिंबक हरी पूजक यांचेकडे सन १६५८ मध्ये सोपविण्यात आलेपासून पूजा-नैवेद्य ही देवकार्ये वंशपरंपरेने आजतागायत श्री. नारायण विष्णू जोशी व कृष्णाजी गुंडभट पुजारी हे वर्षा वर्षाच्या फेरपाळीने हे कार्य सांभाळत असतात. तसेच रायगोंडा बिन नरसगोंडा पाटील यांचे सध्याचे वारस श्री. दा. आ. तथा रावसाहेब पाटील (माजी नगराध्यक्ष) हे या मंदिराशी असणारे जुने अनुबंध कायम ठेवून आहेत.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी

इ. स. १४३६ मध्ये कुरुंदवाड गांव राणोजी कापशीकर घोरपडे यांचेकडून श्री. ब्रम्हीभूत हरभटजी बाबा पटवर्धन यांचे तृतीय पुत्र त्रिंबक हरी यांच्या अधिपत्याखाली आले. हरभटजी बाबा (इ. स. १६५५ ते १७५०) हे स्वतः नृसिंहवाडीच्या दत्तगुरूंचे भक्त होते. दत्त दर्शनासाठी ते दररोज वाडीस जात असत. पुढे त्यांना कुरुंदवाडच्या दत्त मंदिराचे महात्मेही वाडीच्या दत्त मंदिरा इतके आहे असा दृष्टांत झाला. त्यानुसार मग ते इथल्या दत्त मंदिरात नियमितपणे येऊ लागले होते. तत्कालीन शंकराचार्य व प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशा महान दत्त भक्तांचे पदस्पर्शही या मंदिरास व परिसरास लागले आहेत.

येथील दत्त मंदिरात "श्रीं" ची त्रिकाल पूजा केली जात असून चातुर्मास वगळता इतर वेळी दर शनिवारी पालखी सोहळा असतो. गुढी पाडवा, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, मार्गशीर्ष शुद्ध दशमी पासून ते मार्गशीर्ष वद्य द्वितीया पर्यंत दररोज महापूजा, पालखी, मंत्रजागर, मंत्रपुष्पांजली अशी पद्धत चालू आहे. दर पौर्णिमेला लघु रुद्र असतो. कार्तिक पौर्णिमेला शिखरासह सर्व मंदिर दिवे लावून सुशोभित केले जाते. श्रीदत्त जयंतीच्या वेळी आणि श्री. नृसिंह सरस्वती महाराज यांच्या जन्म काळा वेळी असेच विविध कार्यक्रम होत असतात. विजया दशमीला श्रींची स्वारी शिलंगणासाठी येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल च्या मैदानावर जाते आणि तिथे आरती होऊन मिरवणुकीने परतते. अशा या कुरुंदवाडच्या प्राचीन श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करणे हि आज काळाचीच गरज बनली आहे. त्याच बरोबर नूतन वास्तूत सभागृह आणि भक्त निवासाची सोय करणे हि आवश्यक आहे. एक धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र या दृष्टीने या परिसराचा विकास व्हावा हाही एक उद्देश्य आहे. एक दत्त भक्त या नात्याने आपण या जीर्णोद्धार समितीस जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य करावे आणि या उपक्रमास हातभार लावावा अशी नम्र विनंती.

लेखक :- श्री. शशिकांत बा. पाटील आणि श्री. डॉ. दिलीप पां. कुलकर्णी 

संपर्क:-
श्री. अमित पुजारी
वर्षिलिदार पुजारी  - श्री श्रीपाद श्री वल्लभ दत्रात्रेय मंदिर (विश्रांतीस्थान),
कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि - कोल्हापूर  
मो. नं.   ९४२१२ ००४९१ 

|| दत्त दिगंबर, श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर, नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर |