श्रीपाद मंदिर, दाढ़ीवाला दत्तमंदिर पुणे

श्रीपाद मंदिर
श्रीपाद मंदिरातील श्री दत्त महाराजांची मूर्ती

(एका दत्तभक्ताचे  प्रत्यक्ष दर्शना नंतर चे निवेदन)

पुण्यात जुनी व प्रासादिक दत्त मंदिरे आहेत त्यापैकी हे प्रासादिक दत्त मंदिर अगदी शहराच्या मध्यभागी पण प्रवेश करताच मन प्रसन्न होते. पुण्यातील जुन्या पेठेत अनेक लहान-मोठी, नवी-जुनी अशी शेकडो मंदिरं आहेत. त्यात दत्त मंदिरं सुध्दा अनेक आहेत. पुरातन दत्त मंदिरांपैकी एक म्हणजे ''दाढीवाला दत्त''. खरं तर या मंदिराचं नाव श्रीपाद मंदिर असं आहे. पण, ते फ़ारसं कुणालाच माहित नाही. दाढीवाला दत्त मंदिर हेच नाव जास्त प्रचलित आहे. 

जुन्नरकर दत्त मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या मंदिराविषयी श्री जुन्नरकर काकांकडूनच कळलं. जुन्नरकर दत्त मंदिराप्रमाणेच हे श्रीपाद मंदिर सुध्दा खाजगी आहे. या मंदिराची स्थापना श्री दत्तात्रय कृष्णाजी घाणेकर यांनी सन १९११ मध्ये केली. श्री दत्तात्रय आणि श्री वामन हे दोघे घाणेकर बंधू अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य श्री बाळप्पा महाराज यांचे शिष्य होते. श्री बाळप्पा महाराजांनी या दोघांनाही महाराजांचा मठ स्थापन करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार श्री वामन घाणेकर यांनी केडगांव, पिंपरी येथे मठ स्थापन केला तर श्री दत्तात्रय घाणेकर यांनी या श्रीपाद मंदिराची स्थापना दिनांक १ जून, १९११ रोजी औदुंबर वृक्षाच्या छायेखाली केली. 

श्रीपाद मंदिरातील श्री दत्त महाराजांची मूर्ती जयपूरच्या कारागिरांनी घडविली असून ती मुंबईहून इथे आणण्यात आली. मूर्ती संगमरवरी त्रिमूखी असून मूर्तीच्या सहा हातात ब्रम्ह स्वरुपातील माला व कमंडलू, विष्णू स्वरुपातील शंख आणि चक्र व महेश स्वरुपातील डमरु आणि त्रिशूळ आहे. या मूर्तीच्या चेहऱ्यात ना एक वेगळाच गोडवा आहे. डोळ्यातून वात्सल्य, प्रेम, माया, करुणा हे भाव ओतप्रोत भरून वाहतायेत असंच वाटतं या मूर्तीकडे पाहिल्यावर देहभान हरपून जायला होते. या मंदिराचा कळस करवीर पीठाचे जगद्गुरु श्री कुर्तकोटी शंकराचार्य यांच्या हस्ते सन १९३४ मध्ये चढविण्यात आला होता.  

वास्तविक हे श्री दत्तात्रय घाणेकर हे वकीलीचा अभ्यास करत होते. परंतु, मध्यंतरी त्यांना बाळप्पा महाराजांचं सान्निध्य लाभलं आणि ते दत्त महाराजांच्या सेवेत रुजू झाले. श्री दत्तात्रय घाणेकर यांना मोठी पांढरी शुभ्र अशी दाढ़ी होती. त्यामुळे, स्थानिक लोकं “दाढ़ीवाल्याचा दत्त” म्हणून या मंदिराला ओळखू लागले आणि कालांतराने अपभ्रंश होता होता या मंदिराचं दाढीवाला दत्त असं नामकरण झालं. श्री दत्तात्रय घाणेकरांनी आपलं उभं आयुष्य स्वामीनाम घेत या मंदिरात व्यतित केलं. दिनांक १६ ऑक्टोबर १९४८ रोजी वयाच्या ७६व्या वर्षी श्री गुरुचरित्राचे पारायण चालू असताना त्यांचं निधन झालं.

श्री दत्तात्रय घाणेकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या दोन मुलांमध्ये वाटण्या झाल्या आणि ज्या मुलाच्या वाट्याला या मंदिराचा भाग आला त्यांनी तो भाग सन १९५५ मध्ये श्री पंडित यांना विकला. त्यांच्या भगिनी श्रीमती नेत्रावतीबाई पंडित या मंदिराचं व्यवस्थापन पाहत असत. त्यांच्या नंतर त्यांची मुलगी श्रीमती हेमलता पंडित आणि आता त्यांची मुलगी श्रीमती प्रतिभा वईकर अशा ३ पिढ्या हे मंदिर सांभाळत आहेत.

 श्रीपाद मंदिर
श्रीपाद मंदिर उर्फ़ दाढ़ीवाला दत्त मंदिर

आपण सकाळच्या वेळी  मंदिरात गेलो की  दत्त महाराजांवर होणारा अभिषेक, भरजरी वस्त्र, विविध अलंकार आणि नाना प्रकारच्या फ़ुलांनी केला जाणारा त्यांचा श्रुंगार पहायला मिळतो. जवळपास अर्धा ते एक तास हा शृंगार चालतो. मंदिर हे रहिवासी इमारत असल्याने लोकांची ये जा सतत सुरु  असते, बाहेर तर लक्ष्मी रोडची भर बाजारपेठच. पण तरीही आत श्रीपाद मंदिरात मात्र कमालीची शांत शीतल स्पंदनं अनुभवता येतात. तुम्ही जर का या श्रीपाद मंदिरात गेलात तर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर मागच्या बाजूला असलेल्या औदुंबर वृक्षाजवळ जरा मुद्दाम रेंगाळून पहा. गेली  ११२ वर्षे ज्या वृक्षाखाली महाराजांची सेवा अव्याहतपणे सुरु आहे त्या वृक्षाला न्याहाळा, त्याची छाया आपल्या देहावर पडू द्या, त्या वृक्षाच्या छायेत आपण महाराजांच्या छत्रछायेत आलोय याची प्रचिती घ्या. होय, ही प्रचिती सर्व दत्तभक्तांना परिचित आहे. आपणही हा प्रासादिक अनुभव जरा घेऊन पहा.

श्रीपाद मंदिर उर्फ़ दाढ़ीवाला दत्त मंदिराचा पत्ता: 

४७६, शशिकांत गोडबोले रोड, भटांचा बोळ, नारायण पेठ, पुणे – ४११ ०३०.

गुगल लोकेशन: https://goo.gl/maps/uESrmvU6z3tKrMy19

खाणाखुणा: नारायण पेठेत कुंटे चौकाजवळ हुजूरपागा शाळेच्या दरवाजाच्या बरोबर समोरच्या इमारतीत हे श्रीपाद मंदिर आहे.

||श्री गुरुदेव दत्त||