स्थान: चौल रेवदंडा, जि. रायगड
सत्पुरुष: श्रीसद्गुरु बुरांडे महाराज, स्वामी ब्रह्मेंद्र
विशेष: निसर्गरम्य परिसरातील जागृत दत्तमंदीर, स्वयंभु शिवलिंग
पुणे मुंबई रस्त्यावर अलिबाग पासून १६ किमी अंतरावर चौल नाक्यापासून २ किमी अंतरावर डोंगरवजा टेकडीवर अत्यंत नयनरम्य टेकडीवर हे दत्त मंदिर आहे. समृद्ध वनराई उत्तम बांधलेल्या पायऱ्या यामुळे हे स्थान अतिशय प्रेक्षणीयही वाटते. सुमारे ५०० पायऱ्या चढून गेल्यानंतर डाव्याच बाजूला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. त्यानंतर आणखीन ३० पायऱ्या चढून गेल्यावर श्रीदत्तमंदिर विश्रांती स्थान आहे. येथेच श्री सद्गुरु बुरांडे महाराजांचे समाधीस्थान आहे. पुढे सुमारे १५० पायऱ्या चढून गेल्यानंतर सत्चित आनंद साधना कुटी आहे. त्यानंतर काही अंतर चालून गेल्यानंतर हरे राम विश्राम धाम व त्यानंतर हरे राम बाबाचे धुनीमंदीर व पुढे औदुंबर मठ आहे.
त्यानंतर लगेचच अत्याधुनीक अशा दत्तमंदिराचे बाह्य दर्शनच मोहरून टाकते. येथे सर्वांग सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती षड्भुज असून पाहताच मन हरवून जाते. प्रदक्षणेसाठी बाजूनी जागा असून मंदीराचा गाभारा थोडा उंचावर आहे. मंदिराच्या दक्षिणेला माई जानकीबाई व हनुमानदास बाबा यांचा मठ आहे. देवालयाच्या कमानीपासून गाभाऱ्यापर्यंत छोटासा जिना आहे. प्रतिवर्षी दत्तजयंती पासून ५ दिवस येथे दत्तजयंतीचा मोठा उत्सव होतो. या काळात येथे हजारो लोक येऊन दर्शनाचा लाभ घेतात व सुखी संसारासाठी श्री गुरुंना प्रार्थना करतात. हे मंदिर दत्तात्रेयांचे अत्यंत जागृत स्थान असून अनेक भक्त येथील दर्शनाने मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगतात.
श्री दत्त मंदिरापासून खाली पाहिले असता अत्यंत नयनमनोहर व विहंगम दृष्य दिसते. सदर मंदिर शिवरायांच्या काळात बांधल्याचे सांगतात. या अत्युच्च शिखरावरून सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी बांधल्याचे सांगतात त्या वरील लाल कळस असलेले मंदिर स्वामी ब्रम्हेंद्र यांनी बांधल्याचे सांगतात. या मंदिर परिसरात स्वयंभू शिवलिंगही आहे.
हे स्थान मुंबईपासून १०९ किमी अंतरावर आहे. दत्तभक्तांनी या मंदिरात अवश्य दर्शन करावे.