विशेष: श्री गुरुचरित्र ग्रंथ प्रत संशोधन व सुधारित प्रत तयार करणे
संबंधित दत्त भक्त: श्री कामत
महाराष्ट्रात दत्तसंप्रदायामध्ये / दत्तभक्तांमध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्व आहे. शके १४८० मध्ये लिहिलेल्या या ग्रंथामध्ये दत्तात्रेय आणि त्यांचे अवतार श्रीपादवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या चरित्रकथांचे वर्णन आहे. ज्ञानेश्वरीनंतर सुमारे २५० वर्षांनी हा ग्रंथ लिहिला गेला. नृसिंहसरस्वती यांनी त्यांच्या सायंदेव या भक्ताला तुझ्या वंशोवंशी, पिढ्यानपिढ्या आपली भक्ती चालत राहील असा आशीर्वाद दिला होता. त्या सायंदेवांच्या पाचव्या पिढीतील श्री. सरस्वती गंगाधर साखरे ( सायंदेव - नागनाथ - देवराव - गंगाधर - सरस्वती गंगाधर) यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यांची मातृभाषा कानडी होती. तरीही त्यांनी हा ग्रंथ अगदी रसाळ मराठी भाषेत लिहिला. त्यात काही पदे / श्लोक कानडीतूनही आहेत. हा पूर्ण ग्रंथ यवनी भाषेपासून मुक्त आहे. ब्रह्मसंमंधाला मुक्ती देणे, वांझ स्त्रीला पुत्रलाभ, ब्रह्मराक्षसाला सद्गती देणे, म्हाताऱ्या वांझ म्हशीला दूध येणे, दरिद्री माणसाची सहस्रभोजन घालण्याची इच्छा पूर्ण करणे, ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर करणे, रजकाला राजा बनविणे, शुद्ध भक्ती करणाऱ्या विणकराला श्रीशैल्य तीर्थस्थानाचे दर्शन घडविणे, शुष्क लाकडाला पालवी फुटणे, महारोग - हृदयशूळ - पोटदुखी - विविध रोग बरे करणे, मृत पती जिवंत करणे असे अनेक चमत्कार श्रीनृसिंहसरस्वती यांनी केले होते त्याचे वर्णन या ग्रंथात आहे. धर्मामधील अनेक प्रथा - आचार - विधी यांचे मार्गदर्शन आणि व आपले आचार व विचार व आचरण पद्धती या ग्रंथामध्ये विस्ताराने सांगितला आहे. हा ग्रंथ दत्तसंप्रदाय आणि शिवभक्तांमध्ये सारखाच प्रिय आहे. अशी एक शक्यता मांडली जाते की सिद्धमुनींनी नामधारकाला दाखविलेला मूळ ग्रंथ कदाचित संस्कृत भाषेत असावा. नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर आणि सांगणारे ते सिद्धसरस्वती ! त्यांच्याकडून हे गुरुचरित्र ऐकल्यावर, सरस्वती गंगाधर यांनी आपल्या प्रतिभेने, गुरुकृपेने, सरस्वतीच्या वरद हस्ताने हा ग्रंथ निर्मिला असावा.
त्या काळातही कलियुगाचा वाढत प्रभाव, यवनांचे आक्रमण आणि सत्ता, मौखिक परंपरा, छपाईतील दोष यामुळे गुरुचरित्र ग्रंथामध्ये अनेक दोष, पाठयभेद निर्माण झाले. या ग्रंथाचे पूर्ण संशोधन / शुद्धीकरण करणे खूपच गरजेचे झाले. श्री टेंबेस्वामी महाराज आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी या दृष्टीने प्रयत्न केले. पण कांहींनाकांही अडचणी येऊन हे काम अर्धवटच राहिले. देवाने यासाठी श्री. रामचंद्र कृष्ण कामत यांची योजना केली असावी.
हे कामत मूळचे बेळगावजवळील चंदगडचे. आई, वडील, भाऊ यांच्यासह गोव्यातील अस्नोडा येथे आले. पंत बाळेकुंद्रीकर महाराज यांनी त्यांच्या मोठ्या भावाला दृष्टांत देऊन सांगितले की तुझे कुलदैवत गोव्यातील माशेली येथे तळावलीकर शांतादुर्गा हे आहे. तेथे एक औदुंबर वृक्ष आणि जुन्या पादुका आहेत. तेथे जाऊन तू सेवा कर. तुमच्या हातून मोठे काम व्हायचे आहे. तेथे येऊन हे सर्व राहू लागल्यावर काशीचे ब्रम्हानंद सरस्वती यांनी टेंबे स्वामींना ज्या रूपामध्ये दर्शन झाले होते तशी "एकमुखी षटभुज दत्तमूर्ती" जयपूरहून करून पाठविली. या मूर्तीची स्थापना करून त्यांनी गुरुचरित्राचे संशोधन / शुद्धीकरण करण्याचे काम सुरु केले. जवळजवळ ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी हे काम केले. त्यासाठी त्यांनी गुरुचरित्राच्या शेकडो प्रतींचे संदर्भ शोधले. कडगंजी प्रत, गाणगापूर प्रत, कुरवपूर, औदुंबर, कुंदगोळ, आंबेवाडी, पेडणे, चिकोडी, दड्डी, अस्नोडे, बैलहोंगल अशा कित्येक प्रति त्यांनी वाचल्या. खूप मेहेनतीनंतर गुरुचरित्र पुन्हा एकदा शुद्ध स्वरूपात तयार झाले. प्रत्येक पानावर त्यांनी इतके तर्कशुद्ध खुलासे दिले आहेत की त्याचेच एक वेगळे पुस्तक होऊ शकते.
हे दिव्य आणि प्रचंड काम श्री. कामत यांनी जेथे बसून केले त्याचा गुरुचरित्रातच उल्लेख केला आहे.
।। श्रीशके अठराशे साठोत्तरीं । 'बहुधान्य' नाम संवत्सरीं । माशैलीं दुर्गादत्तमंदिरीं । जहाली पुरी शोधनसेवा ।।
एवढ्या उल्लेखावरून गोव्यामध्ये या मंदिराचा मी शोध घेतला. माशेली हे सुप्रसिद्ध शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे हे गाव ! हे मंदिर फारसे कुणाला माहितीच नाही. पण मंदिर सापडले ही आनंदाची गोष्ट ! श्री. रामचंद्र कृष्ण कामत यांचे नातू श्री. सनतकुमार कामत यांची भेट झाली. अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
गोव्याच्या इतर मंदिरांच्या तुलनेत हे मंदिर लहान आहे. पण त्याची खूप महत्वाची वैशिष्ठ्ये पुढे देत आहे.
श्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिराची वैशिष्ठ्ये
१) या मंदिरात प्रवेश केल्यावर येथे कांहीतरी दैवी शक्तीचा वास असावा, हे सामान्य भक्तालाही जाणवते.
२) या मंदिरातील गाभारा, पूजा आणि आरतीची जागा, प्रदक्षिणा मार्ग या गोष्टी जमिनीलगत नसून सुमारे २ फूट उंचीवर आहेत. गाभाऱ्याच्या मागील बाजूस औदुंबर वृक्ष आणि जुन्या पादुका अजूनही आहेत.
३) मंदिराचा खूप मोठा गाभारा आणि भूभाग हा पूर्ण लाकडी आणि उत्तम कोरीवकाम केलेला आहे.
४) गाभाऱ्यातील दत्तमूर्ती ही अत्यंत रेखीव आणि "एकमुखी षटभुज दत्तमूर्ती" आहे.
५) सर्वात अत्यंत वेगळे वैशिष्ठय- दत्तमहाराज हे मंत्रशक्ती, योग, गूढशक्ती यांचे अधिपती ! येथील गाभारा पहातांना एक अत्यंत वेगळेच वैशिष्ठय पाहायला मिळते. गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजावर कुंडलिनी शक्तीची मूलाधार ते सहस्राधार चक्रे अशा तऱ्हेने खोदली आहेत की आपण दर्शन घेतांना त्या त्या चक्रातून दत्तमूर्तीचा त्या त्या अवयवाचे दर्शन होते. नेहेमी आपल्याला दत्तमूर्तीच्या बाजूला चार वेदांचे प्रतिनिधी म्हणून चार श्वान पाहायला मिळतात. पण येथे मात्र श्वानांच्या ऐवजी गाभाऱ्यावरती प्रज्ञानं ब्रह्म, अहं ब्रम्हास्मि, तत्वमसि, अयमात्मा ब्रम्ह असे चार वेदांचे सार सांगणारे चार शब्द कोरून लिहिण्यात आले आहेत.
६) गोव्यातील अन्य मंदिरांप्रमाणे येथे फोटो काढण्यास सक्त मनाई नाही. उलट सनतकुमार यांनी आम्हाला मुक्तपणे फोटो काढू दिले.
७) येथील दत्तमूर्तीला प्रत्येक वाराप्रमाणे शंकर, देवी, पांडुरंग, माणिकप्रभू, ज्ञानेश्वर, बालावधूत अशा रूपांमध्ये शृंगार करण्यात येतो.
८) महाराष्ट्र आणि खुद्द गोव्यातही हे मंदिर आणि त्याचे वैशिष्टय फारसे माहिती नाही. पण आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील तेलुगू भाषिक मात्र गुरुचरित्राच्या संशोधनाचे / शुद्धीकरणाचे स्थान म्हणून आवर्जून दर्शनाला येतात.
दत्तभक्तीतून निर्माण झालेला एकमेकांवरचा विश्वास किती मोठा असू शकतो याचे उदाहरण सनतकुमार कामत यांनी सांगितले. मराठीतील सुप्रसिद्ध प्रकाशक केशव भिकाजी ढवळे यांनी गुरुचरित्र ग्रंथाच्या आजवर ३५ - ४० आवृत्त्या प्रसिद्ध केल्या. रामचंद्र कृष्ण कामत आणि प्रकाशक ढवळे यांच्यामध्ये कुठलाही लेखी करार झालेला नव्हता. आज दोघांचीही तिसरी पिढी आहे. तरीही प्रत्येक आवृत्तीनंतर ढवळे प्रकाशनातर्फे न चुकता, मानधनाचा चेक देवस्थानाला पाठविला जातो. आजच्या काळात, स्टँपपेपरवर केलेले करारही न मानण्याची पद्धत असतांना, न केलेला करारही ईश्वरी प्रेरणेने पाळणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
आपण सर्व गोव्याला गेल्यावर फक्त समुद्रकिनारे, स्वस्त मिळणारे मद्यप्रकार, मत्स्याहार अशा गोष्टी अनुभवतो. पण गोव्यातच विपुल प्रमाणामध्ये सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभवही आहे.
।। तुम्हां सर्वांना दत्तमहाराजांची कृपा भरभरून लाभो ।।
लेखक: मकरंद करंदीकर