श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो श्री सद्ग़ुरु बाळ्कॄष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला.
श्री बाळ्कॄष्ण महाराज यांचा जन्म सुरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ साली झाला. लहानपणीपासूनच त्यांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती. पुढे ते आपले चुलते शिवशंकर यांचे कडे मुंबईला शिक्षणासाठी आले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त त्यांना या गोष्टीचे दुःख झाले त्यांचे शेजारी श्री रामचंन्द्र व्यंकटेश बरडकर उर्फ़ सारस्वत ब्रांम्हण भेंडे, हे महाराजांचे गुरु "तात महाराज" श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त रहात असत. त्यांना महाराजांच्यात सुधारणा करण्यास त्यांनी विनंती केली. त्यांनी श्री सदगुरु बाळ्कॄष्ण महाराजांना भुलेष्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वूत्तीमध्ये आमुलाग्र फ़रक केला गेला व त्याचक्षणी माहाराजांनी श्री तातमाहाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त बनले. महाराजांना इंग्रजी व संस्क्रूतचे उत्तम ज्ञान होते. ते शिकवण्या करत व गोकुळदास संस्क्रूत पाठशाळेत संस्क्रूतचे मस्तर होते. त्यावेळी ते मस्तर या नावाने ओळखले जात जांभुळ्वाडीत महाराजांचे शेजारीच धोत्रे नावाचे कुटुंब रहात असे. त्या कुटुंबातील पिशाच्चबाधा महाराजांनी दुर केली व तेंव्हापासुन हे साधे ’मास्त्तर’ नसुन एक दिव्य महात्मे आहेत याची ओळख लोकांना झाली.
जांभुळ्वाडीतुन महाराज पुढे मालाडात त्यांचे मित्र द्वारकादास, यांच्याकडे रहावयास गेले. महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे पुष्कळ लोक त्यांचेकडे येऊ लागले. महाराजांना भजन फार आवडत असे व त्यांचेकडे येणा-यांना कटाक्षाने भजन करण्यास गुरुवारी व शनिवारी बोलावीत असत शनिवारी सबंध रात्र भजन होत असल्यामुळे द्वारकादासांच्या मंडळीस त्रास वाटू लागला. हि गोष्ट कै. विश्वनाथ मोरेश्वर कोठारे (माजी विश्वस्त) व त्यांच्यां मातोश्री पुतळाबाई यांना कळल्यावर त्यांनी महाराजांना मालाडला मामलेदार वाडीतील आपल्या घरात आणले. तेथेही पूर्विप्रमणेच गर्दी सुरु झाली. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत इतक्या लांबुन शनिवारी रात्री ते ही त्याकाळात मालाडला भजनास येणे हे गैरसोयीची असल्याने महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती व महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला तो भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले,"काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्त्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा." वरील मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला. वर भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या मठाचे स्थान आहे. सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरु केले. त्याकाळात मठ माटुंग्याला दुसऱ्या जागेत हलवणे भाग पडले. ऑगस्ट १९१३ मध्ये पुरे झाले व ३० ऑगस्ट रोजी मठ परत पहिल्या जागी आला. मधोमध मोठा हॉल. हॉल मधोमध कमान.
दोन्ही बजुस दोन मोठ्या ख़ोल्या व पुढ्च्य बाजुस म्हणजे रस्त्यावरुन आत शिरण्याच्या बाजुला मोठा ओटा. दोन्ही बजुस बसावयास दगडी ओटे व पुढे चढण्यास पाय-या येण्याच्या मार्गावर दुतर्फा फुलांच्या कुंड्या, तसेच गॅस बत्त्या पण लागल्या. मठात परत आल्यावर महाराजांनी सध्याचे सिंहासन सुरतहुन कारागिर आणून तयार करविले व सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालुन त्यावर संगमरवरी लादी बसवुन समर्थांच्या फोटोची स्थापना केली. महाराज पक्के सिंहासन करतात हे पाहुन यमूताईंनी विचारले "महाराज, हा भाड्याचा मुसलमानाचा बंगला, हे स्थान कायम कसे होणार ?" तेंव्हा महाराजांनी, "जो बसणार तोच कायम करणार" असे म्हणून 'कायम कायम कायम' असा त्रिवार उच्चार केला.
हे स्थान कायम ठेवण्याचा समर्थांच्या अघटीत लीलांचे वर्णन पुढे येईलच. बंगल्यात मठ आल्यावर दर्शनास व भजनास येणा-या भक्त्तांची गर्दी फारच होऊ लागली. गॅसबत्त्यांमुळे प्रकाशाचा झगझगाट होऊन रात्री रंम्य व शोभिवंत दिसू लागले. रिवाजानुसार लांबून येणा-या भक्तांसाठी गुरुवार-शनिवार आरती रात्री १० ला सुरु होऊन ११-३० ला संपे. त्यानंतर महाराज, हल्ली महाराजांचे छायाचित्र आहे तेथे आरामखुर्चीत बसत. अर्धा एक तास भक्तजनांचे महाराजांना हार घालणे चाले. हार इतके येत की, तीन-तीन वेळा काढून ठेवावे लागत. त्यानंतर महाराज गुजराथी असुनसु्द्धा मराठीत एकनाथी भागवतावर रात्री दोन वाजेपर्यत प्रवचन करीत. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येई. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे.
'एकात अनेक पहावे व अनेकांत एक पहावा,’परि प्रीतीजे अंतरी आत्मभावे । तया प्रीतीला भक्त्ति असे म्हणावे’, ’दाताने जीभ चावली म्हणुन कोणी बत्तीशी तोडली’, असा उपदेश महाराज करीत. श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन व त्यांची उपासना करुन ज्याने त्याने आपला हेतू साधावा, आपणाकडे काही नाही, असे सांगत असत. महाराजांचे प्रवचन चालू असता श्रोते मंत्रमूग्ध होत असत. मठाचा मुख्य वार शनिवार त्यादिवशी कोणीही येथील कींवा सुरतेचा मठ सोडून जावयाचे नाही. असा महाराजांचा दंडक आहे. तसे गाभा-यात कोणीही टोपी, पगडी किंवा रुमाल घालून जावयाचे नाही. ती काढूनच गाभा-यात जाऊन प्रदक्षिणा कराव्यात, असा त्यांचा आदेश आहे. समर्थंना तांबडी फुले, कण्हेर, जास्वंद, तगर घलू नयेत, असा त्यांचा दंडक असे व घातल्यास ताबडतोब कटाक्षाने सांगून काढून टाकत. तांबडा गुलाब चालत असे.
माहीमकर मंडळी दुसरीकडून भजन आटपून येत. रात्री दोन वाजेपर्यंत व उजाडेपर्यंत भजन करत. महाराजांनी भजनास कधी पुरे म्हटले नाही. मंडळी दमल्यास त्यांनी जावे.
महाराजांना पूजा-पाठास आठ तास लागत. त्यामूळे दर्शनास गर्दी लोटल्यास किंवा भजन लांबल्यास काही वेळा महाराजांना तीन-तीन दिवस उपास घडत; कारण सेवा आटोपल्याशिवाय ते पाण्याचा थेंबसुद्धा घेत नसत. पूजा आटोपल्यावर महाराज दूध घेत किंवा फराळाचे खात. त्यांनी अन्न सोडले होते. फराळात शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, व-याचे तांदूळ, शेंगदाणे, बदाम, फळे घेत असत. महाराजांस आंबा फार आवडे. ते स्वत: चहा पीत नसत, पण भक्तांस मठाचा प्रसाद म्हणून देशी साखरेचा चहा देत असत. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे या मठात स्प्रुश्य-अस्प्रुश्य, हिंन्दू-अहिंन्दू असा भेद नव्हता व आजही नाही. ज्याला त्याला आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करावयास सांगत पार्शांना कस्ती, ख्रिश्चनांना प्रेअर, मुसलमानांना नमाज करता येत असे.
श्री सदगुरु बाळकृष्ण महाराजांच्या समाधीचा प्रसंग :
दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत येथे सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांचा पलंग श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभार्यात ठेवलेली आहे.
महाराज नेहमी श्री स्वामी समर्थांची पुण्यतीथीची पालखी मुंबईस काढून दुसरे दिवशी तशीच पालखी सुरतेस काढण्यास जात असत, त्याप्रमाणे ,महाराज १० मे १९१८ रोजी रात्रीच्या गाडीने सुरतेस गेले. त्यावेळेपासून महाराजांनी निर्याणास जाण्याच्या पुष्कळ पूर्वसूचना दिल्या, पण कोणालाच समजल्या नाहीत.
वैशाख वद्य दशमी शके १८४० संवत १९७४ तारीख ४ जून १९१८ मंगळवार रात्रौ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरतेच्या मठात भजनाचा कार्यक्रम होत असताना महाराजांनी तो बंद करून सर्वाना घरी जाण्यास सांगितले.परंतु एक तासाने यावे लागेल असे म्हणाले. त्यांचा अर्थ त्यावेळी कोणालाही कळला नाही. सूर्योदय होण्याच्या थोड्या वेळापूर्वी महाराज मागील चौकात गेले. तेथे एक दोरी टांगलेली होती.तिला धरून महाराज नाचू लागले. 'खडावांचा खड खड खड खड ' असा आवाज ऐकून परमपूज्य आई खाली आल्या व महाराजांस म्हणाल्या, "दोरी जुनी आहे,ती तुटेल व तुम्ही पडाल." महाराजांनी उत्तर दिले, "दोरी तर केव्हाच तुटली आहे,ह्या घे किल्ल्या ! " असे म्हणून त्या प.पु.आईच्या अंगावर फेकल्या व म्हणाले, " सांभाळ." प.पु. आई म्हणाली," मला किल्ल्या का देता?" इतक्यात सूर्योदय झाला. सूर्यास नमस्कार करून बाजूला असलेल्या आरामखुर्चीवर बसून छातीवर हाता ठेवून त्रिवार "ओ तात, ओ तात, ओ तात" असे स्मरण करून महाराजांनी मान टाकली. याप्रमाणे वैशाख वद्य एकादशी शके १८४० संवत १९७४ बुधवार, तारीख ५ जून १९१८ रोजी सूर्योदयी निर्याणास गेले.
भजन चालू असताना ते बंद करा असे महाराजांनी केव्हाच सांगितले नव्हते; परंतु त्या दिवशी मात्र ते पाच वाजता बंद करा असे सांगितले व परत एक तासाने यावे लागेल असे म्हणाले व दोरी केव्हाच तुटली या शब्दावरून बोध असा होतो कि या महान संताने काळास सूर्योदयाची वेळ होईपर्यंत एक तास थांबवून देह ठेविला. बाळकृष्ण महाराजांची समाधी हि सुरत येथील स्वामींच्या मठाजवळच आहे.