स्थान: इस्ट गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश
सत्पुरूष: श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज
विशेष: श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान, कुकुटेश्वर मंदिर, अनघा लक्ष्मी मंदिर, सत्यनारायण मंदिर
पादुका: श्रीपाद पादुका
आंध्र प्रदेशात ‘पीठापूर’ गावी एक आपळराजा नावाचा आपस्तंब शाखेचा ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता भार्या सुमति नित्य अतिथि-पूजा करीत असे. एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्रीदत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले. ब्राह्मण भोजन झाले नव्हते. त्यावेळी आपळाराजा घरी नव्हते. त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. भगवान् श्रीदत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे. त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली. ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षहीन, पादहीन आहेत. कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे? मला तुमच्यासारखा ज्ञानवंत, ईश्वरासमान पुत्र व्हावा. हे ऐकून श्रीदत्त-महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले "तुला कुलभूषण, तपस्वी, कीर्तीमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करील." हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्यात श्रीदत्त महाराज अदृश्य झाले. तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला. तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्रीदत्त-स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत.
या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरू असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. सात वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक चारही वेद, मीमांसा इ. म्हणू लागला. तो १६ वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ, धर्म आचार इ. शिकवत असे. १६ वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले. पण पुत्राने पूर्ण नाकारले, उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली. माता - पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरूष आहे. तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले. पुत्रानेदेखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधु जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशिर्वाद दिला संततीयुक्त, दीर्घायुषी, मातृ-पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल. वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल. आपल्या आई-वडिलांना श्रीदत्त-स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पीठापूर सोडले. हेच पीठापूर श्रीपाद-श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त-महाराज भिक्षेस येतात. तसेच पादगया हे ठिकाणही श्रीक्षेत्र पीठापूर येथे आहे. तेथील मंदिरासमोरच्या तीर्थ कुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. या क्षेत्रामध्ये स्वत: भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रुपामध्ये आहेत. हे एक शक्तीपीठ आहे.
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे. सन १३२० साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पल्लराजु शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. साधारणत सन १९८३ साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन १९८५ साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.
या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्ती आहेत. या मुर्तचीी स्थापना दिनांक ६/२/१९९२ ला झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत. तेथील दृश्य फार आनंदीदायक व शांतीदायक असे आहे. हे मंदीर पहाटे ५.०० वाजता उघडते व साधारणत सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरूवात केली जाते. दुपारी साधारणत एक ते चारच्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदीर बंद केले जाते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदीराभोवती केल्या जातात. यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लीत व आनंदीदायक असते. यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिध्द मंगल गायली जातात. या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मुर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर, दिव्य, मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदीर लहान असल्यामुळे सध्यातरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळच केली जाते. सधारणत रात्री ९.०० वाजता मंदीर बंद होते.
श्रीपादांच्या तीथीप्रमाणे इथे बरेच उत्सव केले जातात. त्यापैकी
१) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती
२) श्री दत्तजयंती
३) श्री गुरूद्वादशी
४) श्री कृष्णाष्टमी
५) श्री पू. वासूदेवानंद सरस्वती जयंती
६) गुरूपौर्णिमा.
श्री दत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. येथे भक्तांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्यापैकी नित्यसेवा, पालखी सेवा, बिल्वार्चना, तुळशीपत्र व ब्राह्मण भोजन इत्यादी.
पीठापुर हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजु शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रध्दाभावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये अध्याय ६ पान क्र. ३८ येथे सांगितले आहे की, श्री अप्पलराजु शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्नीशमन दत्तात्रेयांच्या लहान मुर्तीतून श्रीदत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजुंच्या समोर बसून बोलत असत व श्रीदत्तप्रभु परत त्या लहान मुर्तीमध्ये विलीन होत असत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृता मध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पीठापूर हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्याप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडीसुध्दा जागा शिल्लक राहणार नाही. हे श्रीपादांचे वाक्य काळ्या दगडावर मारलेल्या रेघेप्रमाणे आहे.
पुरातन काळात दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञात सर्व देवतांना (यक्ष गरूड, गंधर्व, किंपुरुषम, महर्षी, विष्
स्थान माहात्म्य
श्रीपादांची बहीण विद्याधारी, राधा व सुरेखा यांचा विवाह पिठापूर येथे झाला. त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापूरात सवित्रकाठकचयन यज्ञ केला. काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे. ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते. पीठापुरला खास पौराणिक महत्त्व आहे. कुक्कुटेश्वर मंदिरासमोर १२१ Χ १२१ फूटाचा पक्का तलाव आहे. येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते. मंदिराचे आवारात मागील भागात चार हात, तीन शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू श्रीदत्त मंदिर आहे. तेथे एक महाशक्ती-पीठ आहे. हा परिसर ‘पुरुहुत्तिका’ म्हणून प्रसिद्ध आहे.
पीठापूर हे पूर्वकाळापासूनच सिद्धक्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की, सुर्योदय होईपर्यंत उठायचे नाही, मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासुर सकाळ झाली समजून उठला. भगवंतानी त्याचा उद्धार केला ते कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापूरात आहे.
दक्ष यज्ञात सती देवीने योगाग्नीने आत्मदहन केले. भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्रानी त्यादेहाचे खंड खंड केले. ते भाग अन्य अन्य ठिकाणी पडले ते शक्तीपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्तीपिठातील पुरुहत्तिका हे शक्तीपीठ येथेच आहे.
याच परिसरात कालाग्नीशमन दत्तमंदिर आहे. काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते. हे दत्तमंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते. ह्या परिसरातील स्पंदने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अस्तित्त्वाची ग्वाही देतात.
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय ३०मध्ये श्रीपादप्रभू म्हणतात, "शंकर भट्टा, भविष्यात माझे महासंस्थान श्री पीठीकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. श्रीपीठीकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्याप्रमाणे रीघ लागेल. कलियुगात अनेक आश्चर्ये घडतील. वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला साधक श्रीपादश्रीवल्लभ संस्थानचा पूजारी नेमला जाईल. त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणोक्षणी दिव्यलीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील." पीठापूर आंध्रप्रदेशातील पूर्ण गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतात ५१ शक्तीपिठापैकी मानले जाते. तेथे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. येथील दत्तमंदिरात श्री दत्तगुरु व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या मूर्ती आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका आहेत. भारतात काशी येथे बिंदुमाधव प्रयाग व वेणीमाधव, रामेश्वर येथे सेतुमाधव, त्रिवेत्रम येथे सुंदरमाधव तर पिठापूरमध्ये कुंतीमाधव अशी माधवाची ५ मंदिरे आहेत. पांडवांची माता कुंती हीने माधवाची पूजा केली ते हे स्थान.
श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे. येथे अभिषेक लघुरुद्र करुन आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी ७ वाजता पालखी सेवा असते. स्नान करुन सोवळे घालून आपणास पादूकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. संस्थान तर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे. मंदिरातून सोडून जाताना डोळे अक्षरश: पाणावतात. व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्र्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात.
या स्थानाची वैशिष्ट्ये
१. श्रीपाद श्रीवल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केला.
२. कुक्कुटेश्वर कालाग्नीशमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत.
३. श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याचठिकाणी घडल्या.
४. श्रीपादश्रीवल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत.
५. त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली.
६. श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनच भक्त पिठापूरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातील असे हे सिद्धस्थान.
७. चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरितामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील.
८. येथे आलेल्या सर्वांची बाधा पिडा निरसन होऊन ते सुखी होतात.
९. रक्षाबंधन दिवशी जे भक्त पिठापूरी वास्तव्य करुन श्रीपाद श्रीवल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील. त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्रीवल्लभ घेतील.
रस्त्याने पीठापूरला जाण्याचा मार्ग
१. मुंबई - पुणे - सोलापूर येथून रस्त्याने जाण्याचा मार्ग व अंतर कि. मी मध्ये अंदाजे
(मुंबई- पुणे- सोलापूर - हैद्राबाद - सूर्यपेठ - खम्मम - अस्वरावपेठ - राजमुंद्री - सामलकोट - पीठापूर)
१. मुंबई ते हैद्राबाद - ७०० कि.मी. अंदाजे
२. हैद्राबाद ते खम्मम - २०० कि.मी. अंदाजे
३. खम्मम ते राजमंद्री - १७२ कि.मी अंदाजे
४. राजमुंद्री ते पीठापूर - ५५ कि.मी अंदाजे
एकूण अंतर: मुंबई ते पीठापूर - अंदाजे ११५० ते १२०० कि.मी
पुणे ते पीठापूर - अंदाजे - ९५० ते १००० कि.मी
पीठापूरला कसे जावे?
पीठापूर हे आंध्र प्रदेशात आहे. मुंबई-भुवनेश्र्वर कोणार्क एक्सप्रेसने सामलकोट जंक्शन येथे उतरावे. (अंदाजे अंतर १३०० कि.मी) पीठापूर हे रेल्वे स्टेशन आहे. परंतु पॅसेंजर अथवा हैद्राबाद, सिकंदराबाद येथून सुटणाऱ्या काही गाड्या येथे थांबतात. जवळचे रेल्वे स्टेशन काकीनाडा, व थोडे लांबचे विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन आहे. सामलकोट येथे उतरल्यानंतर ऑटोरिक्षा करावी व श्रीपादश्रीवल्लभ महासंस्थान (वेणूगोपाळ मार्ग) येथे जावे. सामलकोट ते पीठापूर फक्त १२ कि.मी आहे. वाहन व्यवस्था भरपूर आहे. पीठापूर रेल्वे स्टेशनपासून मंदिर ५ मिनिटाच्या अंतरावर आहे. महासंस्थान येथे आधी फोन केल्यास आणि हिंदी, इंग्रजी भाषेतून येण्याबाबत कळवल्यास तेथे राहायला खोल्या मिळतात. गाडी उशिरा पोहोचल्यास रेल्वे वेटींग रूम अथवा लॉजमध्ये राहता येईल. पीठापूर येथील श्रीपाद- श्रीवल्लभ जन्म-स्थानात आरती, अभिषेक, रात्री पालखी सोहळा होतो. दोन्ही वेळा मोफत प्रसादाची सोय आहे. कुक्कुटेश्वर मंदिर, कुंती माधव मंदिर, काकीनाडा समुद्र किनारा, अन्नावरम् (सत्यनारायण मंदिर) जवळच राजमहेंद्री (गोदावरी नदी) या ठिकाणी भेट द्यावी.
मुंबईहून सुटलेली कोणार्क एक्सप्रेस सायंकाळी ६ वाजता सामलकोट येथे पोहोचते.
भुवनेश्वर येथून सुटलेली कोणार्क एक्सप्रेस सामलकोट येथे रात्री १ वाजता येते.
गाडी फक्त १ मिनिट थांबते.
स्वर्ण पीठिकापूर वर्णन
श्री भास्कर पंडिताने त्या दिवशी आम्हास त्यांचे आदारातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला व श्रीपाद श्रीवल्लभाचे चरित्र ऐकविण्याची विनंती केली. आम्ही भास्कर पंडिताचा आग्रह मोडू शकलो नाही. रात्री त्यांचेकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो. तेथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचे विवेचन झाले. वक्त्याने आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.
श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान
हे श्रोते हो ! श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिव स्वरूप आहेत. ते पीठिकापुरम् गावी अंतर्धान पावून काशी नगरीत अवतरीत होत आणि गंगेचे स्नान करीत. त्यांच्या पीठिकापुरम् मध्ये अवतरीत होण्याने तेथील भूत पिशाच्च बाधेचे निर्मूलन झाले होते. पीठिकापुरम् मधील त्यांच्या जन्म स्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती. भविष्यात, कांही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल. तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करील. तेथील जन समुदाय पीठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील. ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न कळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो.प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द, स्पर्श रूप, रस, गंध या तत्त्वांनी बनलेले असते. योग दृष्टीने पहाता ज्या शरीरात पृथ्वीतत्त्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करूणा भावामुळे पीठिकापुरम् या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात. यावर मी प्रश्न केला ''आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृती मुळे पीठिकापुरमला भौतीक रूपाने येतात का ?''
सुवर्ण पीठिकापुर महिमा
श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले ''तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पीठिकापुरम् मध्ये एक सुवर्ण पीठिकापूर आहे. जितकी भौतिक पीठापुरमची व्याप्ति आहे तेवढीच सुवर्ण पीठिकापुरची सीमा आहे. सुवर्ण पीठिकापुर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. वास्तविक पहाता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पीठिकापुरात वास्तव्य करीत असल्या सारखे वाटते. या सुवर्ण पीठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी, तपस्वी, महापुरुष या सुवर्ण पीठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात. परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पीठिकापुर केवळ योग चक्षु, ज्ञान चक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते.''
काशीतील पंचकोश यात्रा विशेष
सुवर्ण पीठिकापुरा प्रमाणेच सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थानी निर्मित आहे.''काशि यात्रां गमीष्यामि तत्रैव निवसाम्यहम् । इतिब्रुवाणस्सततं काशीवास फलं लभेत् ॥'' असे शास्त्र वचन आहे. ''मी काशीला जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे.'' असे सतत म्हणणाऱ्या लोकाना सुध्दा काशीवासाचे फल प्राप्त होते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकांने त्यांचे निरंतर, मोठ्या श्रध्दाभावाने, चिंतन केले पाहिजे. तुझ्या अन्नमय कोषाच्या संबंधित एक भौतिक पीठिकापुर आहे तसेच एक भौतिक काशी सुध्दा आहे. प्राणमय कोषाच्या संबंधीत एक भौतिक पीठिकापुर आहे तसेच एक भौतिक प्राणमय काशी सुध्दा आहे. मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष, या प्रत्येक कोषाच्या संबंधाने एक एक पीठिकापुर व काशी आहे. या आनंदमय पीठिकापुरमलाच सुवर्ण पीठिकापुर असे म्हणतात. तसेच या आनंदमय काशीलाच सुवर्ण काशी असे म्हणतात. या वक्तव्यावर मी म्हणालो, ''महोदया, मी अल्पज्ञ आहे. कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे सुबोध विवेचन करून सांगा. काही लोक काशीतील पंचक्रोष यात्रेच्या फला बद्दल सांगतात ती यात्रा कोणती ?'' माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले ''बाळा, पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते. वास्तविक पाहता आपण करावयाची असते ती यात्रा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष म्हणविली जाणारी ही पंचक्रोष यात्रा. ही आपण चैतन्य रूपानेच करायची असते. हेच या पंचक्रोषमय यात्रेचे गूढमय दैवरहस्य आहे. श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकाला पंचक्रोष यात्रा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते त्यामुळेच पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद प्रभूंच्या योगशक्तीने सिध्द होतात. या पंचमहायज्ञाचे प्रतिक म्हणून कुरुगड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केलेला आहे. दैव रहस्याचे अनुष्ठान ज्यांनी केले, ज्यांची योगदृष्टी आहे अशा साधकालाच हे सर्व आकलन होते. इतर सर्व सामान्य मानवांना त्या बद्दल कांहींच बोध होत नाही.''श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगास्नान केले तेंव्हा गंगामाता प्रत्यक्ष प्रगट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली. त्या वेळी श्रीपादांनी ''मी दररोज गंगेत स्नान करीन'' असा वर दिला यामुळेच गंगामातेचे चैतन्य सुध्दा पंचक्रोषात सामावलेले आहे. तसेच गंगामातेचे वास्तव्य पंचक्रोशात आहे. यावर मी म्हणालो महाराज ''गंगामाता जल स्वरूप असते असते ना ? ती पंच कोशात कशी असेल ? मला हे समजत नाही.'' यावर हसून भास्कर पंडित म्हणाले, ''बाळा, देवता या मंत्रस्वरूप असतात. त्या भौतिक स्वरूपात नसतात मंत्रस्वरूप म्हणजे शब्दब्रह्माचे शक्तीरूप होय. गंगामाता ही शक्ति देवता आहे. चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे. ती भौतिक स्वरूपातील गंगानदी ही तादात्म्यस्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे. त्याच प्रमाणे सूर्यदेवता (चैतन्य स्वरूप) जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोलात तादात्म्य स्थितीतील चैतन्यरूप देवता असतात. हे धर्मसूक्ष्म गूढ असलेले दिव्य रहस्य तुला आता चांगले समजले असेल.प्रत्येक मानवात जलतत्व असते त्याच्या शुध्दिकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी ते दररोज काशीतील गंगा स्नानास जातात. या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते. पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचे मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात. गंगा, गोदावरी या सारख्या महानद्या पापी मानवानी केलेल्या त्यांच्यातील स्नानाने अपवित्र होतात. या नद्यांमध्ये जेंव्हा चैतन्यस्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात तेंव्हा या महानद्या पूर्ववत् पवित्र होतात. जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीव राशींच्या शरीरात जल स्वरूप आणि जलतत्वांचेच शुध्दिकरण असते. श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत. केवळ एका आदेशाने कोटयानी कोटी ब्रह्मांडांची रचना, रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ति स्वरूप दत्त प्रभूच आहेत. त्रेता युगात भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार, भारद्वाज गोत्रातील सावित्रिकाठक महायज्ञ केलेल्या पुण्य स्थळी म्हणजेच पीठिकापुरम् या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला. त्यांच्या अवताराचे प्रयोजन, महायोग्यांना, महासिध्दांना, महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या करवी धर्माचा उध्दार करायचा. त्यांनी या अवतारानंतर नरसिंह सरस्वती नामरूपाने अवतार घेणार असल्याचे सांगितले, या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाच्च योनी प्राप्त होईल. ते बलहीन आणि अत्यंत हीन दीन अवस्थेस प्राप्त होऊन नरक यातना भोगतील. अशा पापी व्यक्तींना गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ति मिळेल असे श्रीपादांनी सांगितले आहेतू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरश: अक्षर सत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ सर्व भाषेमध्ये अनुवादिला जाईल. या महान ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता त्याचे विशिष्ट फळ प्रत्येकाला मिळेलच. याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वत:च करतील. या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल. हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेऊन त्यांची पूजा केल्यास त्यांना कृपालाभ होईल. या ग्रंथ पारायणाने, कलीयुगात, सर्व शुभ गोष्टी घडतील. असे महाप्रभू म्हणाले. तुझे हे ग्रंथ लेखनाचे काम श्रीचरण तुझ्या कडून पूर्ण करून घेतील.'' त्यावर मी म्हणालो ''महाराज तुम्ही सांगितलेले सर्व योग्यच आहे. पण मी पंडित मुळीच नाही. शिवाय वेद वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे. या अल्पज्ञाकडून आपण केवढे महत्कार्य करून घेत आहात याचे मला आश्चर्य वाटते आणि आंनदही होतो.'' यावर भास्कर पंडित म्हणाले ''खरे तर असे दत्तविधानच आहे की निषिध्द पदार्थाने रोग बळावतात परंतु आश्चर्य असे की अद्भूत अशी महतकार्ये कांही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करवून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे. हे त्यांच्या दिव्य शक्तीचेच निदर्शन आहे.'' एके दिवशी एक संन्यासी पीठिकापुरम् मधील कुक्कुटेश्वर मंदिरात आले. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बालअवस्थेत होते. श्री नरसिंह वर्मा (महाशय) आणि वेंकटप्पय्या श्रेष्ठी (महाशय) बालक श्रीपाद श्रीवल्लभांना घेऊन घोडागाडीतून कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आले. त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्तमंदिरात ध्यान अवस्थेत बसले होते. त्यांना पाहून श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले ''या साधूला मंदिरात का येऊ दिले ?'' नरसिंह वर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले ''अरे बाळा, ते संन्यासी आहेत. त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील.'' श्रीपाद म्हणाले, ''म्हणजे यांना सुध्दा राग येतो तर. मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे ?'' तितक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले. त्यांच्या जवळ माशांचा वास येत होता. ते त्या संन्याशांना समजले. ते खरेखुरे संन्यासी होते. त्यांनी श्रीपादांकडे पाहिले. त्यांना मत्स्य अवतारातील श्रीविष्णुंची आठवण झाली. तेंव्हा श्रीपाद म्हणाले ''तुमच्या कमंडलूत सुध्दा छोटे छोटे मासे आहेत, तुम्हीच पहा.''
संन्याशावर विशेष अनुग्रह
संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले. श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहात होते. तितक्यात ते संन्यासी अंत:र्मुख झाले. त्यांना योग दृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्त नलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले. ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते. एक एक थेंब जणु काही एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत होता. ''अहा ! मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय ?'' असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले. या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञानप्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्याशांना कळाले. संन्यासी बहिर्मुख झाले. त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रध्दा भावाने पाहिले. श्रीपादांनी सुध्दा मंदहास्य करीत त्यांच्या कडे बघितले. संन्यासी श्रीपादांच्या चरण कमलावर नतमस्तक झाले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेऊन त्यांच्यावर अनुग्रह केला. त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला. या वेळी त्या संन्याशास पराशर मुनींनी आपल्या कृपा दृष्टीने मत्स्यगंधेच्या शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली. याच प्रमाणे पतिव्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे म्हणूनच तिला सुवासिनी असे म्हणत. ज्या प्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात त्या प्रमाणे भौतिक शरीरात सुध्दा बदल होऊन सुवासाची अनुभूति येते असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशाला मौनबोध केला. यानंतर श्रीपाद म्हणाले, ''अरे बाबा, तुला मत्स्य अवतारा बद्दल कळाले. दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुर्मावताराचा आधार आहे. मंदार पर्वताला कूर्मावर प्रस्थापित करून देव दानवांनी समुद्र मंथन केले होते. तू अंतर्मुख होऊन कासव ज्या प्रमाणे संकटाचे समयी आपली इंद्रिये आत ओढून घेऊन ती नियंत्रणात ठेवतो त्याच प्रमाणे तू आपल्या ज्ञानेद्रिंयांना आणि कर्मेद्रिंयांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील. असे न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील. तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणी तरी तुला मारून टाकील. तुला जीवन हवे असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर. असे केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल.''
या क्षेत्री असे जावे
पिठापूर-(पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश (PITHAPUR)-
हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचेजन्मगाव आहे. या क्षेत्रास पादगया सुध्दाम्हणतात. आंध्रप्रदेशमधे पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाड्याजवळ हे क्षेत्र आहे. आपस्तंब शाखेतीलआपलराज, आणि सुमती माता या ब्राह्मणदांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने दत्तात्रेयांना भिक्षा वाढली. त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी मी तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशिर्वाद सुमती मातेस दिला. जीवनात एकवेळेस या क्षेत्रास जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन जरूर घ्यावे.
हैद्राबाद, विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे उतरून रिक्षा अथवा बसने (१० किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर या क्षेत्राला जाता येते. या ठिकाणी जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वेआहेत. शिर्डी, विशाखापट्टनम, काकिनाडा एक्सप्रेसया रेल्वे गाडया मराठवाडयातून पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत. पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई-भुवनेश्वर (कोणार्क एक्सप्रेस), तर विदर्भातील लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा-पुरी एक्सप्रेस ह्या रेल्वे गाडया सोयीच्या आहेत. या ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे. पिठापूरला जाणारया भक्तांनी १५ दिवस अगोदर आपली पिठापूरला जाण्याची तारिख संस्थानला फोन करून कळवावी. जेणेकरून तिथे गेल्यावर रूम मिळ्ण्यास अडचण निर्माण होणार नाही.
श्रीपाद-श्रीवल्लभ महासंस्थान, जि. पूर्व गोदावरी, आंध्रप्रदेश - ५३३४५०,
फोन - (०८८६९) २५०३००, २५२३००
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
पीठापूर परिसरातील या स्थानी अवश्य दर्शन घ्या
१) कुंतीमाधव मंदिर
पूर्वजन्मीचा ब्राह्मण असलेल्या राक्षसाचा वध इंद्राने केला. त्याचे प्रायश्चित्ता दाखल ब्रह्मदेवाने पाच माधव मंदिर बांधण्यास सांगितले. संपूर्ण भारत देशात
१) काशी येथे बिंदू-माधव,
२) प्रयाग येथे वेणी-माधव,
३) रामेश्वर येथे सेतू-माधव,
४) त्रिवेंद्रम येथे सुंदर-माधव, व
५) पीठापूर येथे कुंती-माधव मंदिर आहे. त्यास दक्षिण काशी असेही म्हणतात.
२) श्रीदत्त अनघालक्ष्मी मंदिर
पीठापूर शहरापासून ३किमी अंतरावर श्रीदत्त अनघालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर भव्य व सुंदर असून या ठिकाणी परवानगी घेऊन नामस्मरण करता येते. भाविकांना अनघाष्टमीचे व्रत व पूजा करता येते. सकाळी व दुपारी पूजा होते.
३) अंतरवेदी मंदिर
पीठापूर पासून ८० कि. मी. अंतरावर वसिष्ठ नदीजवळ श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी यांचे १५ व्या शतकातील प्राचीन कालीन मंदिर आहे. तेथे ब्रह्मा - विष्णू - महेश स्वरुपात त्रिमूर्ती आहेत.
४) बिकोवोल मंदिर
काकीनाडा पासून ३५ कि. मी. अंतरावर भगवान शंकरांचे ९ व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे.
५) द्राक्षारामम मंदिर
काकीनाडा पासुन २५ कि. मी. अंतरावर भिमेश्वरा स्वामी मंदिर आहे. हे प्राचीन कालीन मंदिर १० व्या शतकातील आहे. तसेच तेथे 'मणिक्यंबा' हे एक प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे. (शक्तीपीठ)
६) गोदावरी पुष्करम (राजमुंद्री)
राजमुंद्री जवळ पुष्कराम तिर्थ आहे. गोदावरी पुष्करम १२ वर्षामध्ये एकदा येथच असतो. राजमुंद्री येथे बरीच वर्षे श्री मार्कण्डेय ऋषींचा वास होता. त्यांनी ग्रंथाचे लेखन येथेच केले. तेथे भव्य मार्कण्डेय मंदिर आहे. तेथे अर्ध कुंभमेळा भरतो. गोदावरी नदीमध्ये स्नानास तेथे महत्व आहे. तसेच गोदावरी नदी पार करुन दुसर्या बाजूस " कोटीलिंगेश्वर" हे १० व्या शतकामध्ये बांधलेले प्राचीन कालीन मंदिर आहे.
७) मंदापल्ली
राजमुंद्री येथून २८ कि. मी. अंतरावर व काकीनाडा येथून ४० कि. मी. अंतरावर भगवान शंकराचे मंदिर आहे. त्या मंदिरास "मंडेश्वर स्वामी" मंदिर असे म्हणतात. तेथे 'तेलाभिषेक' होतो.
८) रयाली
राजमुंद्री पासुन ३५ कि. मी. अंतरावर असलेले व वशिष्ठ व गौतमी नदीच्या मध्ये वसलेले हे " जगम मोहिनी केशव स्वामी मंदिर" आहे. तेथे भगवान विष्णू व मोहिनी यांची काळ्या दगडा मधील प्राचीन मूर्ती असून ते एक महत्त्वाचे क्षेत्र आहे.
९) क्षेत्र अन्नावरम
पीठापूर येथून ३२ कि. मी. अंतरावर असलेले " श्री सत्यनारायण मंदिर".
श्री क्षेत्र अन्नावरम येथे "श्री वीरा व्यंकटा सत्यनारायण स्वामी" यांचे मुख्य मंदिर आहे. हे मंदिर डोंगरावर वसलेले आहे. या डोंगराला "रत्नागिरी डोंगर" असे म्हणतात. जवळच श्रीराम, वनदुर्गा व कनकदुर्गा यांचीही मंदिरे आहेत. मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे व पूर्ण व्यवस्था आहे. चेन्नई - हावडा रेल्वे लाईनवर अन्नावरम आहे. रेल्वे स्टेशनपासून अन्नावरम मंदिर ३ कि. मी. अंतरावर आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचे व जगप्रसिद्ध मंदिर मानले जाते. मंदीर दुमजली असुन तळमजल्यावर "त्रिपाद विभूती नारायण" यंत्र असून वरच्या मजल्यावर देवांच्या मूर्ती आहेत. हे "त्रिपाद विभूती नारायण उपनिषद" यंत्र अथर्ववेदांमधील एक भाग आहे.