स्थान: मलठण, फलटण
सत्पुरुष: श्री सद्गुरू हरिबुवा
विशेष: श्री सद्गुरू हरिबुवा समाधी
फलटणची भूमी अनेक सत्पुरूषांच्या वास्तव्याने पूनीत झाली, त्यात सद्गुरू हरिबुवा हा ईश्वरी अवतार फलटणच्या लोकांच्या उध्दारासाठी प्रकट झाला. आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर, श्री सदगुरू हरिबुवा महाराज माघ शुध्द एकादशी शके १८२० (सन १८९८) रोजी सायंकाळी साडेचार वाजता फलटण येथे समाधिस्त झाले.
श्रीसदगुरू हरिबुवा महाराजांची जेथे मूळ समाधी बांधण्यात आली आहे तेथील समाधीचा आतील गाभारा अतिशांत व स्वच्छ असून त्या मधोमध असलेल्या महाराजांच्या समाधीवर त्यांच्या दोन पादुका कोरलेल्या आहेत. समाधीच्या मागील बाजूच्या कोनाडयात मुंबईच्या भक्तांनी दिलेली हरिबुवांची दोन फूट उंचीची पितळीमूर्ती सदगुरू श्री गोविंदस्वामी उपळेकर महाराज यांच्या हस्ते बसविण्यात आली आहे. यावेळी झालेल्या मूर्ती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. रामदास दाणी हे होते आणि त्याप्रसंगी प्रमुख भाषण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे झाले होते.
गाभा-यातील एका कोपऱ्यात रात्रंदिवस अखंड जळणारा एक नंदादीप दिसून येतो. गाभाऱ्याबाहेरचे ओटयावर संगमरवरी फरशी श्री. राजाराम रावजी केंजळे यांनी सन १९३६ साली बसविली तर ओटयाला लागून असलेल्या पायरीचे बांधकाम श्री. दगडोबा आत्माराम गाडे यांनी व मंदिराच्या शिखराचे संपूर्ण बांधकाम श्री. दत्तात्रय मनोहर बर्वे यांनी सन १९३९ साली केले. समाधीसमोर जो प्रशस्त मंडप आहे तो भक्तांच्या देणगीतून बांधण्यात आला आहे आणि त्यात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा फार मोठा सहभाग होता.
पूजा-अर्चा
सदगुरूंच्या समाधी मंदिराचा दरवाजा रोज पहाटे ५.३० वाजता उघडला जातो. सकाळी ७ वाजता व सायंकाळी ७ वाजता समाधीची सशास्त्र पूजा, नैवेद्य आदी कार्यक्रम होतात. दुपारी १२ ते ३ मंदिर बंद असते नंतर दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत ते उघडे ठेवले जाते. रात्री ९ नंतर मंदिर बंद ठेवण्यात येते. समाधीच्या समोरील मंडपात श्री अवधूत भजनी मंडळ, महिला मंडळ (केसकरबाई) केशवस्मृति भजनी मंडळ, अव्दैत भजनी मंडळ व शारदा भजनी मंडळ यांची ‘श्रीं’ च्या सेवेसाठी वरचेवर भजने होत असतात. श्रावण महिन्यात हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचने, महिलांची भजने तसेच श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी चोवीस तास अखंड हरिनाम चालू असते, शिवाय महाराजांच्या पुण्यतेथीचा सोहळा माघ शुध्द वसंत पंचमी ते माघ शुध्द व्दादशीपर्यंत मोठया उत्साहात पार पडत असतो. व्दादशीला महाप्रसाद लोकांना वाटण्यात येतो. या कार्यक्रमाव्यतिरिक्त मंदिरात तुकाराम महाराजांची बीज साजरी केली जाते. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जाणारी केन्दूर (ओतूर) जि. पुणे येथील श्री कान्होजीबाबा फाटक महाराज यांची पालखी आणि ह. भ. प. श्री दादामहाराजांची दिंडी श्री हरिबुवांचे मंदिरात मुक्कामास असते तर श्री संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री चैतन्यबाबा महाराज यांची पालखी पंढरपुराहून परत जाताना फलटण येथे श्री हरिबुवांचे मंदिरात उतरत असते.
प्रशस्त परिसर
समाधी मंदिराचे आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असून पूर्व बाजूला भजनी मंडळासाठी खोली आहे, मंगल कार्यासाठी लागणारे निवासस्थान, पाकगृह, भांडीकुंडी तेथे अल्पशा मोबदल्यात मिळू शकतात. मंदिराचे आवाराबाहेर बंदिस्त कंपाऊंड आहे. आवाराचे मोकळ्या जागेत चौफेर जवळ जवळ २५ ते ३० लहान-मोठी झाडे आहेत. तेथे एक छोटी बाग व पाण्याचा आड आहे. तसेच ट्रस्टीचे स्वतंत्र कार्यालयही आहे. महाराजांचे एक भक्त श्री गोपालदास महाराज यांची समाधी पूर्वेला असून त्या समाधीचे बांधकाम श्री. दौलतराव हरीबा पवार यांनी करून घेतले आहे. श्री हरिबुवांच्या समाधीची पूजा-अर्चा व इतर खर्चासाठी कांबळेश्वर व गणेशशेरीत थोडीशी जमीन आहे. पण त्यातून देवस्थानाला उत्पन्न मिळत नाही. होणारा खर्च भक्तांच्या देणग्यातूनच भागवतात.
देवस्थान जवळच अद्यावत भक्तनिवासाच्या बांधकामास सुरुवात केलेली आहे. श्री हरीबाबांचे भक्त सर्व महाराष्ट्राभर विखुरलेले आहेत. त्या सर्वांनी सढळ हाताने मदत करून या दिव्य व भव्य भक्तनिवासाची परिपूर्णता करावी व श्री हरीबाबांच्या कृपा प्रसादाचा लाभ करून घ्यावा.
श्री हरिबुवा समाधी देवस्थान
महानपुरा पेठ, मलठण फलटण,
जिल्हा सातारा, ४१५५२३.
फलटण अर्थात फलस्तनगरीचे पौराणिक महत्व- श्रीराम व श्रीदत्तात्रय भेट स्थान
त्रेतायुगात प्रभुरामचंद्र दंङक अरण्यात वनवासात असताना भगवान दत्तात्रयाची भेट याच नगरीत झाली. श्रीराम प्रभुने त्याना ताटिका वधाच्या (स्रीहत्या) पातका तुन मुक्त होण्यासाठी दत्तात्रयानी याच स्थानी प्रभुकङुन अर्ध चंन्दाकृती बाणाने पाताळातील जळ जमिनीवर आणून भगवान दत्तात्रयाचे चरण स्नान घातले व स्रीहत्येचे पातकातून प्रभू मुक्त झाले. ज्या ठिकाणी बाण मारले तिथ पवित्र असी नदी निर्माण झाली तिच हि बाणगंगा. आणी राम रावणाच्या युद्धानंतर जेव्हा प्रभु श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी सीतेबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने श्रीरामानां सीतेचा त्याग करावा लागला. त्यानी लक्ष्मणाला आज्ञा केली कि सीतेला दूर कुठेतरी नेउन सोड. लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्येपासून खूप दूर आला. त्यानी सीतेला एका ठिकाणी सोडलं आणि ते अयोध्येला निघून गेले लक्ष्मणाने सीतेला ज्या ठिकाणी सोडलं होत ते ठिकाण फलटणच्या शेजारी आजही 'सीतामातेचा डोंगर' या नावाने प्रसिद्ध आहे.
आजही हजारो स्त्रिया संक्रातीच्या दिवशी त्या ठिकाणी सीतामातेला वाणवसा घ्यायला जातात. याच आपल्या पावन भूमीत लव-कुश यांचा जन्म झाला. श्रीरामांनी ज्यावेळी अश्वमेध यज्ञ केला त्यावेळी या यज्ञाप्रसंगी जो अश्विनी सोडलेला होता तो लव-कुशने पकडला. त्यानंतर लव-कुश यांच्याबरोबर लक्ष्मण, शत्रुघ्न, भारत, सुग्रीव यांनी युद्ध केल. मारुतीहि या युद्धाच्यावेळी उपस्थित होते. मात्र त्यांना समजलेल कि हि दोन्ही मुले श्रीरामाचीच आहेत. त्यामुळे त्यांनी युद्धात सहभाग घेतला नाही. लव-कुशने हनुमंताला एका अस्त्राने एका लिंबाच्या झाडाला बांधून टाकल. हे युद्ध ज्या ठिकाणी झाल त्या ठिकाणाचा उल्लेख रामायण मध्ये "फलपठठनपूर" असा केलेला आहे. ज्याचा अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण फलटण या नावाने ओळखल जात.
रामायणामध्ये असा उल्लेख आहे कि लव-कुशने हनुमंताला 'सम्स्थलि' बांधलेले. 'सम्स्थळ' म्हणजे समान जागा, जिथे चढ-उतार जास्त नाहीत अशी. त्या 'समास्थाळचा' अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण 'सोमन्थलि' या नावाने प्रसिद्ध आहे. खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी एका स्त्रीला एका लिंबाच्या झाडाखाली पडलेल्या गाईच्या गोवरी मध्ये हनुमानाचे दर्शन झाले. ती बेशुद्ध होऊन पडली. काहि लोक तिला पाहायला गेले तर त्यांनाही हनुमंताचे दर्शन मिळाले. हि वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्या काळच्या एका प्रसिद्ध ब्रम्हंवृदांकडून याबद्दलची माहिती काढण्यात आली. त्यावेळी हे तेच ठिकाण निघाल जेथे हनुमानाला बांधलेलं होत. मग लोकांनी भक्तिभावाने या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पाठीमागे एक लिंबाचे झाड आहे. असे म्हणतात कि हे लिंबाचे झाड मोठे होऊन जेव्हा वाळुन जात तेव्हा त्याच ठिकाणी नवीन झाड उगवते. मारुतीचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाठीमागच्या या झाडाला मिठी मारून दर्शन घेण्याची पद्धत आहे. नवसाला पावणारा हा मारुती दक्षिणमुखी आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला सोमंथळी मध्ये मोठी यात्रा भरते.
समर्थ रामदासांनी ११ मारुतींची स्थापना केली. मात्र हा मारुती स्वयंभू आहे. या मुर्तिची स्थापना केली गेली नाही. सोमंथळी मध्ये ते स्वतहा: प्रगट झाले आहे. "श्री स्वयंभू दक्षिणमुखी मारुती मंदिर, श्री क्षेत्रसोमंथळी" या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू याचबरोबर इतरही अनेक राज्यातून लोक येथे दर्शनाला येतात.
महाभारतातील विराट राज्याची मुलगी ऊत्तरा व अभिमन्यू यानी विराटनगरला जाताणा एक दिवस मुक्काम याच भुमीत केला होता. आणी महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलस्त्य नगरी हिच व पंथातील प्रमुख अवतारातील चक्रपाणी प्रभुच्या चरण स्पर्षाने पावन झालेली भुमी आणीगावात मंदिर नव्हे तर मंदिराचं गाव अस म्हणूनही वावगे ठरणार नाही व हिच ती पवित्र बाणगंगा व पवित्र फलटण नागरी जेथे श्री हरिबाबांचे लिलाक्षेत्र आहे. व तेथेच त्यांनी समाधी घेतली.