स्थळ: ४२/१७ एरंडवणा, कर्वे पथ, पुणे ४११००४
सत्पुरूष: श्री गुळवणी महाराज, श्री दत्तमहाराज कविश्र्वर, श्री नारायण काका ढेकणे, श्री शरद जोशी महाराज
विशेष: दैदिप्यमान गुरुपरंपरा, प्रसाद पादूका
श्रीवासुदेवनिवास आश्रम पूर्व इतिहास
श्रीगुळवणी महाराज नारायण पेठेतील गोवईकर चाळीतील दोन खोल्यात राहत होते. अनेक शिष्य आता झाले होते. श्रीगुरूमहाराजांची स्वत:ची जागा असावी आणि ती मोठी असावी असे अनेकांना वाटे. परंतु श्रीगुरूमहाराजांनी याला कधीही संमती दिली नव्हती. पुढे इ. स. १९६१ मध्ये पानशेतचे धरण फुटले आणि पुणे शहरात महापूर आला. गोवईकर चाळीतही पुराचे पाणी शिरले आणि श्रीगुरूमहाराजांच्या जागेचे बरेच मोठे नुकसान झाले. त्यामुळे नवीन जागा आता आवश्यकच झाली. श्रीदत्तमहाराजांनी पुढाकार घेतला आणि श्रीगुरूमहाराजांची संमती मिळवून आश्रम बांधण्यास सुरूवात केली. एक समिती नेमली गेली. त्या समितीचे सूत्रधार श्रीदत्तमहाराजच होते. अनेकांनी निधी गोळा केला. कर्वे रोडवरील जागा ठरली. खरेदी केली आणि भूमिपूजन झाले. बांधकाम सुरू झाले. १९६५मध्ये वास्तू तयार झाली. वास्तूशांतीचा मोठा कार्यक्रम आखण्यात आला. अनेक धार्मिक अनुष्ठाने झाली. ह्या सर्व कार्याचे श्रेय श्रीदत्तमहाराजांचेच होते.
वासुदेव निवास आश्रम निर्माण करण्यासाठी, ‘श्रीदत्तमहाराजांच्या शब्दासाठी मी तयार झालो. मला दोन खोल्या पुरेत. त्यांच्यासाठी याला संमती दिली. या शब्दात आपले स्पष्ट विचार श्रीगुरूमहाराजांनी अनेकदा बोलून दाखविले. वयाच्या ७८व्या वर्षापर्यंत अनेकांनी स्वतंत्र जागा घेऊन निवासस्थान करण्याबद्दल श्रीगुरूमहाराजांना, विनंती, आग्रह केलेला होता. तो व्याप नको. म्हणून श्रीगुरूमहाराज ते टाळत आले होते. पण श्रीदत्तमहाराजांनी हा विषय काढल्यावर श्रीगुरूमहाराजांनी आपली भूमिका समजावून सांगितली. त्यावर श्रीदत्तमहाराजांनी असे उत्तर दिली की- गुरूचा आश्रम करणे ही फार मोठी गुरूसेवा असते. आपल्या गुरूंचे स्मारक करणे हे आपले कर्तव्य आहे.’ यासाठी शास्त्रवचने दाखवली. प. पू. श्रीलोकनाथतीर्थस्वामी महाराजांचे या आशयाचे एक पत्रही दाखविले. इतके झाल्यावर श्रीदत्तमहाराजांची इच्छा म्हणून श्रीगुरूमहाराजांनी संमती दिली.
श्री वासुदेवनिवास नावाची सार्थकता
श्रीवासुदेव निवासाचे बांधकाम जेव्हा पूर्ण झाले तेव्हा या वास्तूला काय नाव द्यावयाचे यासंबंधी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. त्यावेळी श्रीदत्तमहाराज परगावी गेलेले होते. श्रीगुरूमहाराजांनी श्रीदत्तमहाराजांना पत्र पाठवून या वास्तूचे नाव काय ठेवावे अशी विचारणा केली. श्रीदत्तमहाराजांनी श्रीगुरूमहाराजांना पत्र लिहून कळविले की या वास्तूचे नाव "श्रीवासुदेव निवास" असे ठेवावे. काही लोकांना श्रीवासुदेव निवास या नावापेक्षा वेगळे नाव ठेवावे असे वाटले. काही लोकांनी प. प. लोकनाथतीर्थ स्वामीमहाराज यांचे नाव वास्तूला द्यावे असे सुचविले. श्रीदत्तमहाराजांनी यावेळी श्रीवासुदेव निवास नाव कसे समर्पक ठरेल हे पटवून दिले. श्रीदत्तमहाराज म्हणाले, "वासुदेव हे प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचे तर नाव आहेच परंतू वासुदेव या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक असा आहे. "वासुदेव म्हणजे ईश्वरस्वरूप. श्रीवासुदेव निवास हे दिल्यामुळे श्रीगुरुमहाराजांचे कार्य ईश्र्वराचे आहे व्यापक आहे आणि सर्वांच्या कल्याणाकरता आहे हे सूचित होते".
श्रीदत्तमहाराजांचे हे विचार सर्वांनाच पटले आणि म्हणूनच या वास्तूला "श्रीवासुदेवनिवास" असे समर्पक नाव दिले गेले.
१९६५ च्या पौष वद्य नवमीला आश्रमाची वास्तुशांती थाटामाटाने संपन्न होऊन तो गुरु महाराजांना समारंभपूर्वक अर्पण करण्यात आला. महाराजांनी लगेच एक विश्वस्त मंडळ नेमून सर्व कारभार त्यांच्या हाती दिला. ह्या न्यासाचे नाव "प. प. वासुदेवानंद सरस्वती आणि प.प. लोकनाथतीर्थ स्मारक न्यास." त्या दिवसा पासून आश्रमात धार्मिक अधिष्ठानाची सुरु झालेली परंपरा अखंडपणे आज पर्यंत चालू आहे. पहिल्या तीन चार महिन्यातच लोकनायक बापूजी अणे, मामा दांडेकर, भगवान श्रीधर स्वामी यांची आश्रमास भेट झाली. आश्रमात वास्तव्य करायला आल्यापासून गुरुमहाराज।ना बऱ्याच दिवसात प. प. थोरले स्वामीमहाराज यांचे दर्शन झाले नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले. आपण येऊन चूक तर केली नाही ना? अशीही शंका मनात आली. पण आश्रमात हौदावर बसून प्रसन्नपणे हसत असल्याचे दर्शन झाल्याने ते सुखावले. अमरेश्वर मंदिरात दीक्षित स्वामींना प्रत्यक्ष स्वामी महाराजांकडून प्राप्त झालेल्या पादुका प.प. वासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापन केले. वासुदेव निव।स वास्तुशांती नंतर काही महिन्यातच एका सेवेकार्याने वासुदेवानंद सरस्वतीच्या औरवाड येथील पादुका चोरल्या व शोध लागेना. पुढे एकदा दत्तमहाराजांना स्वप्न पडलेकी तो सेवेकरी पादुकांचे गाठोडे घेऊन वासुदेव निवासात बसला आहे. पुढे २-३ दिवसात तोच सेवेकरी वासुदेव निवास मध्ये बसलेला दिसला. त्यांनी तात्काळ ओळखून त्या पादुका हस्तगत केल्या. व गुरुमहाराजांसमोर नेऊन ठेवल्या. महाराज म्हणाले, "आपल्या मनातील हि इच्छा सद्गुरू महाराजांनी पूर्ण केली." प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजचही या शिष्योत्तमाकडे आश्रमात आले असेच सर्वाना वाटले. या पादुका ४महिने आश्रमात ठेऊन पूजा केली व नंतर त्या सन्मान पूर्वक औरवाडला पाठविल्या. त्या वर्षांपासून भागवत सप्ताह वासुदेव निवास येथे सुरु झाला.
स्थान माहात्म्य
वासुदेव निवास ही एक अत्यंत पवित्र वास्तु असून अनेक सत्पुरूषांच्या आगमन व निवासामुळे ती परम पवित्र झाली आहे. येथे सकाळपासून सातत्याने धार्मिक विधी पूजा अर्चा नामजप किर्तन प्रवचने यज्ञयाग व मंत्रजागर इ. धार्मिक कृत्ये चालूच असतात. सकाळच्या वेळेस ९॥ नंतर श्रीगुरुमहाराजांच्या मातोश्रीला मिळालेल्या प्रसाद पादूकांचे दर्शन होते व पादुकांचे तीर्थही मिळते. वासुदेव निवासाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यापासूनच मंगल व पवित्र वातावरणांची साक्ष प्रत्येक भक्तास पटते. तळ मजल्यावर, देव्हारा व त्या पाठीमागे श्री गुरुमहाराज व दत्तमहाराजांचे फोटोचे दर्शन होते. देव्हाऱ्याच्या वर श्री गुळवणी महाराजांनी काढलेले अत्रिवरद दत्तात्रेयांचे चित्रफ्रेम प्रत्येक भक्तास नतमस्तक करते. देव्हाऱ्यात देव श्री गुरुमहाराजांचेपासून आहेत त्यात एक देवीची मूर्तीही आहे. देव्हाऱ्यासमोर एक मोठा हॉल असून येथेच भजन किर्तन प्रवचनाचे कार्यक्रम होतात. समोरच भिंतीवर दोन मोठे फोटो आहेत. एक श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा तर दुसरा प. पू. लोकनाथ तीर्थस्वामी महाराजांचा आहे हे दोन्हीही गुळवणी महाराजांचे गुरू. मंदिराच्या लागूनच छोटेखानी ऑफिस व स्वयंपाकघर आहे. पाठीमागचे बाजूस श्री गुरू महाराजांचे काळापासूनचा औदुंबर वृक्ष असून त्यास पार बांधलेला आहे. अनेक भक्त या पवित्र वृक्षास प्रदक्षिणा घालताना दिसतात. या पारावरच प. पू . श्री गुळवणी महाराज बसलेले अनेकांनी पाहिलेले आहेत.
योगिराजांनी गुरुकृपेतून उतराई होण्यासाठी आश्रम बांधण्यास परवानगी दिली व गुरु कृपेने आश्रम पूर्णही झाला. 'वासुदेव निवास' हे नावही दत्तमहाराजांमुळे नक्की झाले. तेव्हा गुरुमहाराज।ना भक्तांनीच प्रश्न केला 'वासुदेव निवास' हे एकाच गुरूंचे स्मृतिस्थल होत नाही का? गुरूमहाराज म्हणाले, आपण वैष्णव आहोत, आपला मार्ग वैष्णवांचा आहे. प्रथमपासूनच श्रीविष्णूसहस्रनामाचा मी रोज पाठ करतो. या सहस्रनामात एकाच देवाचे सहस्त्र प्रकारे सांगितले आहे. वासुदेव व लोकनाथ हि एकाच देवाची दोन नावे आहेत. दोनीही गुरु मला समान पूज्यच आहेत. प्रथम थोरले महाराज भेटले व त्यांच्याच इछेने दुसऱ्या शक्तिपात मार्गाचा लाभ झाला. श्री वासुदेवानंद नावातच लोकनाथ तिर्थ समाविष्टच आहेत. वास्तुशांती च्या वेळेसच दोनीही स्वामींचे भव्य फोटो त्यांनी तेथे उभे केले. श्री वासुदेव निवास ट्रस्ट स्थापन केला तेव्हाही दोनीही स्वामींचे नावाचा त्यात व पावत्यातही त्यांचा उल्लेख येतो.
पहिल्या मजल्यावर एक ध्यान मंदीर व चार दालने आहेत. त्यापैकी गुरूमहाराज, दत्तमहाराज व नारायणकाकाच्या स्मृती खोल्या असून तेथील वातावरण अतिशय पवित्र स्पंदनांनी भारावलेले आहे. तेथेच निवासाच्या काही खोल्याही आहेत. परगावचे साधक, साधू, सत्पुरूष येथे वास्तव्यास असतात. सध्याचे प्रमुख विश्र्वस्त प. प. श्री. शरदभाऊ जोशी महाराज हे अत्यंत सजग असून त्यांनी वास्तुचे प्रासदिक महत्त्व कायम ठेवून आधूनिक तंत्रज्ञानाचे मदतीने वेबसाईट, भक्तांशी सातत्याने एस एम एसद्वारा माहिती व रविवारची सामुदाईक साधना व आध्यात्मिक मार्गदर्शन याने भक्तांशी सातत्याने सुसंवाद ठेवला आहे.
वासुदेव निवास हे शक्तीपीठ दिक्षेचे प्रमुख केंद्र आहे. येथून भारतातीलच नाहीतर परदेशातील साधकांना अनुग्रह व मार्गदर्शन केले जाते. पुण्यनगरीतील हे अत्यंत पवित्र स्थान आहे. भक्तांनी या संस्थानच्या सातत्याने संपर्कात रहावे.
श्रीवासुदेव निवासमधील उत्सव
श्रीवासुदेव निवासमध्ये अनेक मोठे उत्सव दरवर्षी साजरे केले जातात. या मोठ्या उत्सवांची श्रीगुरुमहाराजांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे माहिती पुढे दिली आहे.
प. पू. स्वामीमहाराज पुण्यतिथी: | आषाढ शुद्ध १ |
श्रीगुरूपौर्णिमा: | आषाढ शुद्ध १५ |
प. पू. स्वामीमहाराज जयंती: | श्रावण वद्य ५ |
भागवत सप्ताह: | भाद्रपद शुद्ध ९ ते १५ |
नवरात्र: | अश्र्विन शुद्ध १ |
प. पू. श्रीगुळवणीमहाराज जयंती: | मार्गशीर्ष वद्य १३ |
प. पू. श्रीगुळवणीमहाराज पुण्यतिथी: | पौष वद्य ८ |
प. पू. श्रीलोकनाथतीर्थ स्वामीमहाराज पुण्यतिथी: | माघ वद्य ३ |
प. पू. श्रीदत्तमहाराज कवीश्र्वर वर्धापन दिन: | माघ वद्य ६ |
प. पू. नारायण स्वामीमहाराज पुण्यतिथी: | चैत्र वद्य ३० |
प्रत्येक उत्सवात प्रवचने, कीर्तने, भजने असे कार्यक्रम संपन्न होतात व अन्नदानही होते. स्थानिक साधक नियमितपणे या उत्सवांत सहभागी होतातच शिवाय परगावातून शिष्य येतात आणि ज्ञानयज्ञाचा प्रसाद घेण्यात धन्यता मानतात. उत्सवात सहभागी झाल्याने स्वत:ची उन्नती झाल्याचा अनुभव असंख्य साधकांनी घेतलेला आहे. म्हणूनच या उत्सवात नियमितपणे अनेक वर्षे सातत्याने सहभागी होत असलेल्या शिष्यांची संख्या खूपच मोठी आहे. वासुदेव निवासमध्ये इतरही काही उत्सव संपन्न होतात या उत्सवांची माहिती पुढे दिली आहे.
श्री वासुदेव निवासमधे होणारे अन्य उत्सव
श्रीपाद श्रीवल्लभ जयंती | भाद्रपद ४ |
श्री नरसिंह सरस्वती जयंती | पौष शुद्ध २ |
गोकुळ अष्टमी | श्रावण कृष्ण ८ |
रामनवमी | चैत्र शुद्ध ९ |
हनुमान जयंती | चैत्र शुद्ध १५ |
श्री शंकराचार्य जयंती | वैशाख शुद्ध ५ |
महाशिवरात्र चारी यामांची महापूजा | माघ कृष्ण १३ |
श्रावणातील श्रावणी (२) | नागपंचमी/ नारळी पौर्णिमा |
श्रीतुळजाभवानीची महापूजा | श्रावण |
गुरुद्वादशी महानैवेद्य | अश्र्विन व. १२ |
विश्र्वात्मक चैतन्य शक्तीपीठ
श्री वासुदेव निवास
४२/१७ एरंडवणा, कर्वे पथ, पुणे ४११००४, महाराष्ट्र
मोबा. ९४२३५८०६७५
फोन : ०२०-२५४५५५८४