स्थान: गुलबर्गा कल्याण व बेदर या त्रिकोणी भूभागावर गुरुगंगा व बिरजा नद्यांच्या परिसरात.
सत्पुरूष: श्री माणिकप्रभु यांचे वास्तव्य.
विशेष: सकलमत संप्रदायाची स्थापना, माणिकप्रभु समाधी, संस्थान मार्फत शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, इ. करून स्थानाचा विकास.
स्थान माहात्म्य
हुमणाबादच्या माणिकनगर या दत्तस्थानाची महती श्रीमाणिकप्रभूंच्या मुळेच लोकांच्या ध्यानात आली. गुलबर्गा, कल्याण व बेदर या शहरांच्या त्रिकोणी भूभागास पूर्वी मणिचूल पर्वत असे नाव होते. ‘मणिगिरी’ असा उल्लेख, या भागाचा गुरुचरित्रकार करतात. ‘वृषभाद्रि’ असेही नाव या प्रदेशाचे कोठे कोठे आढळते. वीरशैव अथवा लिंगायत धर्मपंथाचे संस्थापक बसवेश्र्वर याच भागातले. इतिहासप्रसिद्ध चंद्रसेन जाधवाने वसविलेली जयसिंहपेठ पुढे हुमणाबाद या नावाने ओळखली गेली. सदानंद, पूर्णानंद, शिवरामस्वामी याच बसवकल्याणच्या परंपरेतील. याच पावनभूमीत श्रीमाणिकप्रभूंचे अवतारकार्य झाले. माणिकप्रभू हे दत्तावतारी म्हणून प्रसिद्ध असून संगीतादि कला आणि भौतिक ऐश्वर्य यांनी शोभणारा यांचा सकलमत संप्रदाय आहे. अनेक तीर्थक्षेत्रांची दर्शने घेत घेत प्रभू कल्याणहून मणिचूल पर्वताकडे आले. गोट्टमगोट्टीचे जंगल, करतनकल्लीच्या वक्क प्रभूंची समाधी, रेकुळीचा केतकीसंगम अशी काही स्थाने प्रभूंना तेथील एकांतामुळे आवडली. बेदर, झरणीनृसिंह ही स्थानेही प्रभूंना आवडली. बेदरहून प्रभू कल्याणाकडे जात असताना हुमणाबादेच्या ओढ्यावरून गडवंतीच्या वाटेस लागले. बाभळीच्या काटेरी झाडीत त्यांचा मेणा अडकला. त्यामुळे त्यांना हुमणाबादच्या जवळ संगमावरच राहावे लागले.
कर्नाटकातील एक सत्पुरुष सर्वज्ञ याने पावणेतीनशे वर्षापूर्वी भाकित केले होते, ‘बसवाच्या ओढ्यावर नवीन नगर होईल; माणिकप्रभू या नावाचे योगी येथे येतील. नंतर मोगलाईस नवीन वळण मिळेल.’ प्रभू ओढ्याच्या काठी आहेत असे समजताच सर्व बाजूंनी लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. ओसाड व निर्जन प्रदेश गजबजून गेला. तेथे इमारती तयार झाल्या आणि माणिकनगरची उभारणी झाली. प्रभूंनी चोरांना उपदेश केला; अनेकांच्या व्याधी दूर केल्या. गुरुगंगा व बिरजा (वृषजा) या दोन नद्यांच्या परिसरात माणिकनगरची वाढ होत राहिली.
नगरात प्रभू वास्तव्य करुन राहिले आणि एका नव्या दत्तपंथाची निर्मिती झाली. सकलसंप्रदायात हिंदू, मुसलमान, जैन, लिंगायत यांना स्थान मिळून दत्तभक्तीचा विस्तार झाला. अवधूत दत्तास ऐश्र्वर्याची जोड मिळाली. रामनवमी, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी, दत्तजयंती इत्यादी उत्सव थाटाने होत राहिले. प्रभूंसाठी, दत्तासाठी झोपडी होती, तेथे आता नव्या इमारती दिसू लागल्या. व्यापारपेठ वाढली. भंडारखाना तयार झाला, पाण्याची व्यवस्था झाली; चौक्या, पहारे, शिपाई यांची शिस्त वाढली. गणेश, मारुती, सर्वेश्वर यांचे माहात्म्य दत्ताबरोबरच वाढीस लागले. प्रभूंच्या दरबाराचे ऐश्र्वर्य दृष्ट लागण्यासारखे वाढून माणिकनगर हे नवे केंद्र दत्तभक्तांना आकर्षित करून राहिले.
माणिकनगरचे क्षेत्रमाहात्म्य भक्तांना पटत राहिले. काळभैरवरूपी कालाग्निरुद्र (मारुती), दंडपाणीसर्वेश्र्वर, काशिकारूपी महादेवी, निरालंब गुहेतील महालिंग, मधुमती व्यंकम्मादेवी, विरजा-गुरुगंगा संगमाचे मणिकर्णिका स्थान, कैलासमंडप, वीरभद्र, भुवनेश्र्वरी भवानी, संगमेश्र्वर, श्रीम्हाळसा, मार्तंडभैरव, श्रीचक्रेश (दादा महाराजांची समाधी), महामाया (श्रीबयांबा), अखंडेश्वर, श्रीविठ्ठल, श्रीनागनाथ, श्रीप्रभूंचे मंदिर अशा अनेक देवदेवतांनी हे स्थान समृद्ध बनले आहे.
या क्षेत्री असे जावे
माणिकनगर (बिदर, कर्नाटक)-
सोलापूर-हैद्राबाद बसमार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून १ किमी अंतरावर माणिक नगर हेक्षेत्र आहे. कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते. सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे. रामनवमीच्या दिवशी सव्यं सद्गुरु दत्तप्रभुंनी बयाबाईंना (माणिकप्रभूंची आई) दृष्टांत देऊन मीतुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेइल असा आशिर्वाद दिला. २२ डिसेंबर १८१७ साली (मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी) दत्त जयंतीच्या दिवशी बसव कल्य़ाण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला. माणिक नगर, बसवकल्य़ाण, बिदर या परिसरामध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ज्या प्रमाणे श्री नृसिंहसरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले, आणि त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दाहोते; त्याचप्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले. आणि त्याच वेळी ते देहरूपाने झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते. त्यांचे एक वैशिष्टय होते की, त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले नाही. शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते. श्रीमाणिकप्रभूजी हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते. त्यांचा एकमेकांचा आपसात परिचय होता. त्यांच्या नेहमी भेटी होत असत. श्री माणिक प्रभूंनी सकलसंत संप्रदायाची स्थापना करुन १९ व्या शतकाच्या मध्य काळामध्ये या महान देशाच्या मध्य काळामध्ये एका मुसलमान अधिराज्यामधे (तत्कालीन, निजाम इलाका) हिंदी समाजाच्या एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करुन आम्हापुढे एक आदर्श ठेवला. पुढे श्रीरामकृष्ण परमहंसांनी याच तत्वाचा उद्घोष केला व महात्मा गांधीनीही हेच तत्व अंगीकारून आपली राष्ट्रीय ऎक्याची इमारत रचली. हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की, ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे. माणिकप्रभू संस्थान आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे. अंधशाळा, वेदपाठ शाळा, पब्लिक स्कूल, संगीत विद्यालय, संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिकप्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगिण विकास केला जातो. असे दत्त अवतारी पुरुष मार्गशीर्ष शुध्द एकादशी सन १८६५ मध्ये माणिकनगर येथे संजीवन समाधीमध्ये लीन झाले.
हे क्षेत्र सोलापूर पासून १४० कि. मी. अंतरावर आहे. गुलबर्गा-बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हुमानाबादसाठी (माणिकनगर साठी) नियमित बससेवा आहे. बीदर पासून ४० कि. मी. आणि गुलबर्गापासून ६५ कि. मी. अंतरावर हुमनाबाद (माणिकनगर) आहे. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास असून दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
श्री माणिकप्रभू संस्थान,
माणिकनगर ता. हुमनाबाद जि. बिदर
फोन- (०८४८३-२०३२४२) ०९४४८४६९९१३