श्री जनार्दन स्वामी खेर

सत्पुरुष नाव: प. पु. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर, बडोदा                       
जन्म: २३ जून १९२७ बडोदा येथे
आई / वडील: डॉ शंकर राव (एम. बी. बी एस.)
दीक्षा गुरू: प. पु. नानामहाराज तराणेकर

प. पु. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर, बडोदा   
प. पु. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर, बडोदा   

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामींचा जन्म वडोदरा येथे एका संस्कारी, उच्च शिक्षित, श्रीमंत घराण्यात २३ जून १९२७ रोजी झाला. त्यांचे वडील डाॅ. शंकर राव (एम. बी. बी एस.) हे लुणावाडा (गुजरात) संस्थानात  वैदकीय अधिकारी होते. त्यांचे आजोबाही तेथेच डाॅक्टर होते. परंतू पुढे डाॅ. शंकर रावांच्या कारकिर्दीत संस्थानच्या ब्रिटिश अधिकार्या बरोबर तीव्र मतभेद झाल्यामुळे, त्यांनी लवकरच नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली व वडोदराच्या स्वतःच्या घरी राहू लागले. करड्या स्वभावाचे त्यांचे व्यक्तिमत्व होते. Theosophy व Masonry विषयामध्ये त्यांना खूप गती होती व ते सिध्दपुरुषच होते. परंतु काही प्रयोगात झालेल्या अतीव ताणामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला व नोकरी सोडल्यामुळे आर्थिक परिस्थिति भक्कम असूनही हळूहळू ताण येऊ लागला. तरी जनार्दन स्वामींच्या लहानपणीचा काळ ऐश्वर्यातच गेला. सांभाळ करायला अनेक गडी माणसे होती. परंतु मोठे एकत्र कुटुंब व बदलत्या परिस्थितीमुळे स्वामींना काॅलेजचे शिक्षण घेता आले नाही व ते लवकरच मॅट्रिक नंतर वडोदरा सचिवालयात मध्ये नोकरीला लागले.

"योग:कर्मसु कौशलम" या सूत्राप्रमाणे व त्यांच्या अंगभूत हुशारी व काम पार पडण्याच्या हातोटीमुळे त्यांनी वयाच्या ४९ व्या वर्षी ज्यावेळी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळी ते मॅजिस्ट्रेट च्या हुद्यावर होते. हे झाले लौकिक जीवनातले हे त्यांचे कर्तृत्व.

पण ईश्वरीकृपा मात्र त्यांच्यावर अगदी लहानपणापासून पूर्वसुकृतामुळे प्रचंड व सतत होती.

अगदी वयाच्या ४ थ्या वर्षी सूक्ष्मरुपाने गरुडपक्षी पाठीवर बसवून तीर्थयात्रा व मंदीरातील दर्शने घडवीत होता. येणारे भक्तांचे अंतरंग कसे आहे व ते कसे ओळखावे हे शिकवीत होता आणि विष्णुरुप घेऊन स्नान संध्या करुन पुन: गरुडरुपाने घरी पोचवीत होता.

नंतर वयाच्या १४ व्या वर्षी अगदी ध्यानी मनी नसताना महाकालीची कृपा झाली, तिच्या अक्राळविक्राळ रुपातून एक पडती प्रगट होऊन ज्योतीरुपाने स्वामींशी संभाषण करु लागली व स्वामींच्या शरीरात प्रवेश करण्याची परवानगी मागू लागली, शरीरात प्रवेश करण्यास स्वामींनी नकार दिला, तेव्हा तिने स्वामींच्या इच्छेने भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या तेव्हा त्याचा परिणाम असा झाला की, अंत:करण चतुष्टयाचा लय होऊन १३ तास समाधीत स्वामींना बसविले. देहभान पूर्ण हरपून गेले.

तिसरा मजल्यावर पद्मासन घातलेल्या स्थितीत काष्ठवत बसल्यामुळे, सर्वांनी शोध घेतल्यावरच स्वामी सापडले.

श्री दत्तप्रभू मंदिर, संस्थान टाखरखेडा
श्री दत्तप्रभू मंदिर, संस्थान टाखरखेडा 

पुढे आपल्या थोरल्या बहिणीकडे मणीनगरला गेलेवेळी ताईंचे पती श्री मोघे यांनी त्यांच्या (स्वामींच्या) विचित्र अवस्था बदल व्हावा या हेतूने अहमदाबाद जवळील सारंगपूरला प. पू. माताजी अम्मूमैय्यांकडे पाठवून दिले, तिथे गेल्यावर माताजींमध्ये त्यांना भुवनेश्वरी देवीचे दर्शन झाले, माताजींनी त्यांच्यावर कृपा करुन परत पाठविले.

प. पू. टेंबेस्वामींच्या कृपेमुळेच तिलकवाड्याहून बडोद्याला आई रक्तदाबाने आजारी असताना, आश्चर्यकारक रीतीने घरी पोचले व आईला दिलेले वचन पाळले.

स्वामींच्या आयुष्यातील साधकावस्थेतील महत्वाचा टप्पा म्हणजे १९७५ साली त्यांच्या सासूबाईंबरोबर असताना घडून आलेली प. पू. नाना महाराज तराणेकरांची भेट. सासूबाई त्यांच्या शिष्या होत्या. त्या भेटीत स्वामी नानांना म्हणाले, " गेल्या ३५ वर्षा पासून हे सर्व देव माझा सतत पिच्छा पुरवत आहेत, मला त्यांचा कंटाळा आला आहे, तुमचा कोणी चांगला शिष्य असेल तर त्याला हे देव देऊन टाका." नाना महाराज म्हणाले, "असे चालायचे नाही, देवांना तुझ्याजवळच रहायचे आहे व तुझ्याकडून पुष्कळ कार्य करवून घ्यायचे आहे". 

त्याभेटीत त्यांच्याकडून मिळालेल्या शक्तिपात दीक्षेमुळे अष्टसात्विक भाव जागृत झाले व तीव्र क्रिया पण झाल्या व शांत होण्यासाठी २ तास लागले. स्वामींच्या मध्ये आमूलाग्र बदल घडून आले. नानांनी तेव्हाच सांगितले होते की, पुढील काळात अक्कलकोट स्वामी समर्थ व दत्तप्रभू यांची पण कृपा होणार आहे. 

मार्च १९७६ मध्ये स्वामी समर्थांनी दर्शन दिले व लागोपाठ तीन वेळा भेटून स्वामींना (जनार्दन स्वामी) घराबाहेर पडायला उद्युक्त केले. पहिल्या भेटीत खूप शिव्या देऊन बोलले व म्हणाले , "अरे एवढा मी बोलतोय काही जातेय का डोक्यात? यावर जनार्दन स्वामी म्हणाले, "शिव्या देणे हा तुमचा स्वभाव आहे आणि शिव्या देणे तुम्हाला आवडतात आणि मी ऐकायचं काम करत आहे" 

दुसरे भेटीत स्वामी समर्थ म्हणाले, "मी तुला असेच तुझे पुण्याचे गाठोडे घेऊन वर जाऊ देणार नाही, दु:खी कष्टी लोकांवर मायेची पाखर घाल, त्यांना सन्मार्गाला लाव, तुला बाहेर पडावेच लागेल. "यावर जनार्दन स्वामी म्हणाले, "स्वामी मला ज्योतिष शास्त्र, मंत्र विद्या व औषधांबद्दल काही ज्ञान नसताना कशी लोकांची सेवा करता येणार?" समर्थांनी उत्तरादाखल सांगितले, "याचा काही एक विचार करायचे कारण नाही, तू जे बोलशील त्या प्रमाणे होईल".

श्री दत्तप्रभू टाखरखेडा
श्री दत्तप्रभू टाखरखेडा 

तिसरे वेळी स्वामी समर्थ प्रगट झाले, चेहरा उग्र होता, हिंदी मध्येच तंबी भरी, "ज्यादा बकवास मत करो, हम तुम्हारा कुछ नही सुनना चाहते, हम जो कहेंगे वही होगा, चलो मेरे साथ" अशा निश्चयी बोलल्याने स्वामींची (जनार्दन स्वामी) वाचाच बंद झाली एखाद्या कळसूत्री बाहूलीप्रमाणे ते स्वामी स्वामी समर्थांकडे ओढले गेले, समर्थांनी स्वामींना सदेह आकाशमार्गाने एका निर्जन जंगलातल्या किल्यात नेले व मांडीवर प्रेमाने बसवून, आता कसे वाटते? कसे विचारले, यावर बरे वाटते एवढे म्हटल्यावर विश्वाची सैर घडवून अनेक तास फिरवून वडोदरा शहराच्या वाडी भागात अलगद आणून सोडले, या विलक्षण अनुभवामुळे स्वामींचा (जनार्दन स्वामी) जो काही विरोध होता तो मावळला व पूर्ण बदल घडून आला. (जनार्दन स्वामींचे चरित्र "एक दिव्य ईश्वरी शक्ती" यांत वरील अनुभव सविस्तर व रोमांचकारी दिलेला आहे.) 

पुढे काही महिन्यांनंतर Small Farmers' Development Agency च्या कार्यालयात काम करीत असताना अचानक व बेसावध असताना श्री दत्तकृपेची सुरवात झाली, तेव्हा स्थूल देह खुर्चीला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्या अज्ञात हालचालींना आवर घालणे जमेना व अचानक सूक्ष्म शरिराच्या अवस्थेत उर्ध्वगमन जोरात सुरु झाले व स्वामींचे देहावरचे नियंत्रण सुटले, आकाशात अधांतरी लटकणाऱ्या झोळीमध्ये पडून राहावे लागले. भगवान दत्तात्रेय झोळी हालवत होते व त्यांच्या वरुन स्वामी समर्थ व टेंबेस्वामींच्या मध्ये वाद झाला, टेंबे स्वामी हे स्वामी समर्थांना म्हणाले, "जनू माझा आहे तो नेहमी माझ्या समाधी स्थानी येतो, प्रसादाच्या एका शिताचिही अपेक्षा करित नाही तेव्हा तुम्ही येथून निघून जा," यावर स्वामी समर्थ म्हणाले, "चूप ! तो सर्वस्वी माझा आहे, याच नाही तर जन्मो जन्मी तो माझा आहे, चले जाव यहाँ से!" तसे टेंबे स्वामी अंतर्धान झाले. असे होत असताना, हळूच  प्रभू दत्तात्रेयांच्या लहान मूर्तीने जी झोळी हलवत होती तिने स्वामींच्या आज्ञाचक्रावर उभे राहून कृपा केली आणि स्वामी 'समाधी', 'समाधी' असे ओरडले व त्यांचे देहभान हरपले. अशा अवस्थेत ऑफिस मधून त्यांना त्यांचे मामेभाऊ शरद कानेटकर यांच्याकडे पोचविण्यात आले. ही अवस्था सतत सात दिवस टिकली व प्रत्येक दिवशी वेगवेगळे दिव्य अनुभव आले. पूर्णपणे व्यवहारिक स्थितीत यायला अनेक सत्पुरुषांचीही मदत मिळाली.

या दिव्य अनुभूति नंतर स्वामींनी आपले गुरुपदाच्या कार्याला सुरवात केली. ऑफिस च्या कामातून स्वेच्छानिवृत्ती घेतली व पूर्णपणे या कार्याला वाहून घेतले.

सुरवात च्या दोन वर्षात म्हणजे १९७६-७७ मध्ये 'समर्थ विहार' वड़ोदरा येथे ध्यान मंदिरात व अहमदाबादला श्री जांभेकर वाड्यात अनेक भक्तांना अनुग्रह देऊन मार्गदर्शनाचे कार्य सुरू झाले. हळूहळू या अध्यात्मिक कार्याचा विस्तार होत होत, आनंद, नडियाद व नंतर मुंबई, पुणे, अहमदनगर व पुढे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक असे ईतर राज्यातही कार्य विस्तारत गेले व सतत ३७ वर्ष संचार चालू राहिला. धुळे जिल्हयाच्या (आता नंदूरबार) शहादा जवळील टाकरखेडा या ठिकाणी श्रीदत्तमंदीराची केली व तेथे आश्रम सुरु केला व दरवर्षी गुरुपौर्णिमा व दत्त जयंती असे उत्सव साजरे होऊ लागले.

अगदी अल्प काळात ते ईतके लोकप्रिय व सर्वांकडून भरभरून प्रेम मिळविते झाले याचे रहस्य काय आहे? आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांबरोबर  सुध्दा प्रेमळ संबंध ठेवणे कठीण जाते. स्वामींबाबत एक प्रमुख कारण म्हणजे  म्हणजे त्यांनी अगदी वेगळी एकदम वेगळी वाट पत्करली. तसे पाहिले तर संन्यासी पण भ्रमंतीत राहून ३/३ दिवस एकेक ठिकाणी राहतात. स्वामी गृहस्थी होते. बरेच ठिकाणी सांप्रदायामध्ये असे आढळते की गुरु आपल्या आश्रमात स्थिर राहून शिष्य-भक्त त्यांच्या कडे जातात. पण स्वामींनी सगळी गणितं बदलून टाकली. 

भक्तभेटीची आखणी करुन दौरे सुरू केले, प्रत्येक भक्ताच्या घरी आपणच जायचे ठरविल्यामुळे बराच फरक पडतो. श्रीपादवल्लभांच्या चरित्रात एक उल्लेख आहे की नुसते ज्ञान म्हणजे पांगळे व नुसती शक्ति म्हणजे आंधळी आणि प. पू स्वामींकडे गुरू म्हणून ज्ञान आणि शक्ती यांचा ईश्वरी कृपेमुळे अमर्याद साठा होता व हृदयात दया, कणव  असल्यामुळे भक्तांच्या उध्दाराची आर्तता-ओढ पण होती. त्यामुळे ते घरी आले की आजोबांपासून-नातवंडांपर्यंत व घरातल्या गृहिणींनाही ते आपले वाटायचे. ज्याला संपर्कपद्धती म्हणतात ती पूर्णपणे त्यांच्यात विकसित होती. दुसरे महत्वाचे म्हणजे नुसते शुष्क पांडित्य आणि ज्ञान असलेले ते संत-गुरु नसून, लौकिक जीवनाच्या प्रत्येक अंगाचे ज्ञान असलेले व वेळप्रसंगी तज्ञांनासुध्दा बुचकळ्यात पाडणारे समर्थ पुरुष-सिध्दपुरुष होते.

उपाय सुचवून समस्येचा परिहार हमकास होत होता. एखादा कौटुंबिक प्रश्न समोर आला की, प्रत्यक्ष कृतीतून विनाविलंब बदल घडवून आणण्यासाठी, उपाय सुचविण्यासाठी ज्ञान व सामर्थ्य तर होतेच पण वेळप्रसंगी आपली पुण्याई खर्च करून भक्तांना संकटातून सोडविलेले आहे. त्यामुळे भ्रमंतीमध्ये भूत-पिशाच्च बाधा, सामाजिक ताण तनाव, आर्थिक समस्या, कौटुंबिक व वैवाहिक समस्या, घटस्फोट, घटस्फोटीतांचा विवाह, नोकरी, बदली, घरबांधणी, कोर्टकचेरी, आजारपण, दवाखाने, राजकारणी लोकांच्या समस्या अशा अनेक मुद्यांवर आयुष्यभर उसंत नाही ते न कंटाळता पहाटेपासून रात्रिपर्यंत स्वामीनी योगदान दिले आहे. शिवाय खरेखुरे परमार्थी साधकाची जिज्ञासा बोधप्रद ज्ञान देऊन व काही काळानंतर त्याला दीक्षा व प्रत्यक्ष अनुभव देऊन मार्गस्थ केलेले आहे. या सगळ्या गदारोळात त्यांनी आपली टापटीप, स्वच्छता व निरागस विनोदी स्वभाव पण छान जपला होता. या विषयावर त्यांच्या मराठी व इंग्रजी चरित्रात जेवढ्या गोष्टी आलेल्या आहेत, त्याहीपेक्षा कितीतरी गोष्टी अप्रकाशित आहेत. अनेक कुटुंबांतील मनोरुग्णांना स्वामींनी बरे केले नसते तर आयुष्यभर या संसारात ते जीव अंध:कारात पिचत पडले असते. त्यांना बरे करून, आशेचा किरण कुटुंबाला देऊन स्वामी खरोखरच त्यांचे तारणहार ठरलेले आहेत. ही कुटुंबे कायम स्वामींची ऋणी आहेत व त्या कुटुंबाचा स्वामींविषयी प्रेम, ओढ व जिव्हाळा कायमच राहणार हे निर्विवाद आहे.

अखेर २२ फेब्रुवारी २०१३ रोजी प. पू. जनार्दन स्वामींनी अचानकपणे कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना आपला देह सोडला. त्यांची समाधी टाकरखेडा जि. धुळे येथील त्यांच्या दत्त आश्रमात आहे.

विशेष म्हणजे देह सोडून आज १० वर्ष झाली, आजही भक्तांना त्यांचे मार्गदर्शन होत आहे आणि आजही टाकरखेडा येथे दीक्षा विधी होतो, व भक्तांना अनुभव ही येत आहेत. 

टीप: विस्तार भयास्तव संपूर्ण चरित्र माहीती लिहिणे अशक्य आहे, सविस्तर स्वामी चरित्र " एक दिव्य ईश्वरी शक्ती" या नावाने प्रकाशित आहे. वरील पुस्तक मिळण्याचे ठिकाण :

श्री सुहास जोशी                             
"दुग्धसागर" दुकान, दादर (पश्चिम), मुंबई

श्री क्षेत्र टाकरखेडा आश्रम पत्ता : 
श्री दत्तप्रभू मंदिर संस्थान, टाकरखेडा, मु. टाकरखेडा, पो. सारंगखेडा, तालुका. सिंधखेडा, जिल्हा- धुळे - ४२५४१०